Monday, 17 September 2012

आगामी निवडणुकीच्या दृष्टी ने जिल्ह्या त राजकीय जोरदार उलथापालथी


तुळजापूर तालुक्‍यात दुष्‍काळदृश्‍य परिस्थिती असून परतीच्‍या पावसानेही पाठ फिरविल्‍याने भविष्‍यात सर्वत्र भीषण पाणी टंचाई जाणवणार या एकाच प्रश्‍नाने बळीराजा धास्‍तावला आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस व राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षात भविष्‍यातील राजकारणावर डोळा ठेवून वर्चस्‍व प्रस्‍थापित करण्‍यासाठी आतापासून मोर्चेबांधणी सुरू झाले आहे. मेळावा, आंदोलन, बैठकासह अन्‍य पक्षात प्रवेश करून आरोप प्रत्‍योरापाच्‍या फैरी झडत आहे.
तुळजापूर विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्‍ला आहे. गेल्‍या अनेक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार सतत विजयी होवून वरचढ ठरत आहे. विद्यमान पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांनी सलग तीन वेळा निवडणुक जिंकून काँग्रेसचा गड कायम राखला आहे. गत निवडणुकीत भाजप-सेनेचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्‍याशी काट्याची लढत देवून विजयी झालेल्‍या ना. चव्‍हाण याना पक्षाने प्रारंभी विधानसभेचे उपाध्‍यक्षपद बहाल केले. त्‍यानंतर राज्‍य मंत्रीमंडळाची खांदेपालट झाल्‍याने ना. चव्‍हाण यांची मं‍त्रीमंडळात कॅबीनेट मंत्री म्‍हणून वर्णी लागली. सध्‍या कॉंग्रेसने जिल्‍ह्यात युवक मेळावा, विविध समाजाची बैठका घेवून जनतेपर्यंत संदेश पोहचविण्‍याचे काम युध्‍दपातळीवर सुरू केल्‍याचे दिसते. मात्र गेल्‍या काही महिन्‍यापासून काँग्रेस पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यात अंतर्गत मतभेद विकोपाला गेले. त्‍याचे पर्यावसन काँग्रेस पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते तथा माजी आमदार सिद्रामप्‍पा आलुरे गुरूजी यांचे पुतणे अॅड. दीपक आलुरे यानी आपल्‍या असंख्‍य कार्यकर्त्‍यासह एका विशेष कार्यक्रमात राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्‍ये  जाहीर प्रवेश केले. यामुळे पक्षश्रेष्‍ठी खडबडून जागी झाली. विरोधक आपल्‍यापेक्षा तुल्‍यबळ होत असल्‍याचे पाहून काँग्रेसने ‘नहिले पे दहिला’ मारण्‍यासाठी नळदुर्ग शहरात काही दिवसांपूर्वी भव्‍य युवक मेळावा घेवून काँग्रेस पक्षाने केलेल्‍या विकास कामाची माहिती व तळागाळातील झोपडीत राहणा-या सर्वसामान्‍यांची समस्‍या, व्‍यथा सोडविण्‍याचे कार्यकर्त्‍यांना कानमंत्र देवून आगामी होणा-या निवडणुकीस सामोरे जाण्‍यासाठी सज्‍ज राहण्‍याचे आदेश दिले. याच कार्यक्रमात काँग्रेस पक्षाची जनतेसाठी असलेली भूमिका, विचार व युवकाना आकर्षित करण्‍यासाठी राहुल गांधी यांचे स्‍वप्‍न साकार करण्‍यासाठी व्‍यासपीठावरून सांगण्‍यात आले. तसेच पक्षातील सर्वसामान्‍य कार्यकर्त्‍यांच्‍या मागे राजकीय पार्श्वभूमी, घराणेशही असे काहीही नसताना अमर खानापूरे या युवकास कॉंग्रेसने जिल्‍हयात काम करण्‍याची मोठी संधी निर्माण करून दिली. होतकरू युवक कार्यकर्त्‍यांने पक्ष मजबुत करण्‍यासाठी पुढाकार घेण्‍याचे आवाहन करण्‍़यात आले आहे.
काँग्रेसच्‍या हातातील सत्‍ता काबीज करण्‍यासाठी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे खा. पद्मसिंह पाटील यानी बाह्या सरसावले आहेत. त्‍यांनी तुळजापूर तालुक्‍यातील दुष्‍काळसद्दश्‍य परिस्थितीचा आढावा घेण्‍यासाठी नळदुर्ग परिसरातील होर्टी व इतर गावास भेटी देवून शेतक-यासह आपले कार्यकर्ते व जनतेची संवाद साधला. डॉ. पाटील यानी राजकारणात वर्चस्‍व सिध्‍द करण्‍यासाठी हात झटकून कामाला लागले असून त्‍यानी काँग्रेस पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांना राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमध्‍ये प्रवेश देवून सिध्‍द केले आहे. नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्‍ला पर्यटनाच्‍या द्दष्‍टीने विकास करण्‍यासाठी बीओटी तत्‍त्‍वावर देण्‍यासाठी म्‍हणून किल्‍ल्‍याची पाहणी करण्‍याकरीता 11 सप्‍टेंबर रोजी पर्यटन व सांस्‍कृतिक कॅबीनेट मंत्री ना. संजय देवतळे नळदुर्गला भेट दिली. यावेळी मंत्री महोदयाच्‍या स्‍वागतासाठी नळदुर्ग कार्यकर्त्‍यांच्‍या घरी खा.डॉ. पाटील तळ ठोकून होते.
खा. डॉ.पद्मसिंह पाटील, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,  आ. दिलीप सोपल, एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. राहुल मोटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, आण्णा लांबतुरे, बाळासाहेब पाटील, जि.प.चे माजी अध्यक्ष शिवदास कांबळे, जि.प.सदस्य संजय देशमुख, वसंत वडगावे, महेंद्र धुरगुडे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पंडितराव टेकाळे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत ऑगस्‍टमध्‍ये बार्शी येथे भव्‍य कार्यक्रमात अॅड. दीपक आलुरे यानी असंख्‍य कार्यकर्त्‍यासह राष्‍ट्रवादीमध्‍ये प्रवेश केला आहे. आलुरे यानी बोलताना तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती असताना तुळजापूरचा दुष्‍काळाच्‍या यादीत समावेश न केल्याने आम्ही कार्यकर्त्याच्या स्वाभिमानासाठी राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे सांगत आमच्या कार्यकर्त्याची काँग्रेसमध्ये अडवणूक होत होती,  असा स्पष्ट आरोप केला.
याप्रकरणी रविवार दि. 16 सप्‍टेंबर रोजी बोरगांव (ता. तुळजापूर) येथे तालुक्‍यातील लिंगायत समाजाच्‍या प्रमुख कार्यकर्त्‍यांची बैठकीचे नियोजन जि.प. कृषी सभापती पंडीत जोकार, तालुका कॉंग्रेस अध्‍यक्ष सिद्रामप्‍पा मुळे, शरणाप्‍पा कबाडे, कैलास चिनगुंडे यानी समाजाच्‍या सर्व कार्यकर्त्‍यांनी तालुक्‍यातील लिंगायत समाज पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण, माजी आमदार सिद्रामप्‍पा आलुरे गुरूजी, माजी राज्‍यमंत्री तथा विद्यमान औसाचे आमदार बसवराज पाटील यांच्‍या नेतृत्‍वावर विश्र्वास ठेवून कॉंग्रेस पक्षाच्‍या पाठीशी राहणार असल्‍याचे सांगितले. कॉंग्रेसने समाजाच्‍या विकासासाठी भरभरून कार्य केले आहे. तुळजापूर तालुक्‍यात ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या नेतृत्‍वाखाली समाज ताठ मानेने राजकारण करीत आहे. समाजातील अनेक कार्यकर्त्‍यांना ना. चव्‍हाण यानी मोठयाप्रमाणावर काम करण्‍याची संधी दिली. असे असतानाही केवळ स्‍वतःचा स्‍वार्थ साधून घेण्‍यासाठी दिपक आलुरे यानी आज पक्षांतर करून राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्‍यांच्‍या या कृत्‍याचा समाज जाहीर निषेध करीत असून त्‍याचबरोबर तालुक्‍यातील लिंगायत समाज माझ्या मागे असल्‍याचे सांगत आहे. मात्र आज हा समाज एवढा दुधखुळा नाही असू सांगून आपल्‍या समाजाची भुमिका स्‍पष्‍ट केली.
शिवसेनेमध्‍येही येत्‍या काही दिवसात नाटयमयरित्‍या घडामोडी घडणार असल्‍याचे कार्यकर्त्‍यातून संकेत मिळत आहे. तुळजापूर तालुका दुष्‍काळग्रस्‍त म्‍हणून जाहीर करावा, या मागण्‍यासाठी तुळजापूर व नळदुर्ग येथे शिवसैनिकांनी आंदोलन केले. या आंदोलनात शिवसेनेचे माजी जि.प. सदस्‍य तथा तालुकाप्रमुख राजअहमद पठाण गैरहजर राहिले होते. त्‍याचबरोबर शिवसेनेमध्‍ये काम करीत असताना क्रियाशील कार्यकर्त्‍यांना काम करण्‍याची संधी उपलब्‍ध करून दिली जात असल्‍याचे सांगून निष्‍क्रीय कार्यकर्त्‍यांची उचलबांगडी करण्‍यात येणार असल्‍याचे भाकीत कार्यकर्त्‍यांतून वर्तविले जात आहे. शिवसैनिकांनी वेळोवेळी जनतेचे प्रश्‍न, अडीअडचणी सोडविण्‍यासाठी जिल्‍हा उपप्रमुख कमलाकर चव्‍हाण, शाम पवार, बाळकृष्‍ण घोडकेपाटील, तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर यांच्‍या सहकार्याने आंदोलन केल्‍याचे सर्वश्रूत आहे. त्‍याचबरोबर महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना विविध प्रश्‍नावर उपोषण, मोर्चा व डिजीटल फलक लावून जनतेला आकर्षित करण्‍याचे प्रयत्‍न करीत असल्‍याचे दिसत आहे.

Labels: