Wednesday, 12 September 2012

नळदुर्ग – अक्क लकोट रस्‍त्‍याची दुरावस्था


नळदुर्ग - संबंधित खात्याच्या कर्मचारी व संबंधित ठेकेदाराने संगनमत करुन केवळ मलिदा लाटण्याच्या लालसेने नळदुर्ग ते शहापूर रस्त्याचे काही महिन्यापूर्वी केलेल्या दर्जाहीन कामामुळेच अल्पावधीतच रस्त्याची पार वाट लागल्याचे चित्र दिसत आहे. रस्त्यात खड्डे की खड्‌ड्यात रस्ता असा संतप्त सवाल वाहनचालकांतून केला जात आहे. याप्रकरणी चौकशी करुन ठेकेदाराकडून पुन्हा रस्ता दुरुस्तीचे काम करुन घ्यावे, संबंधित अधिका-यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतुन केली जात आहे.
नळदुर्गपासून अक्कलकोट कडे जाणार्‍या रस्त्याच्या नशिबी नेहमी दयनीय अवस्थाच आली आहे. रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे नळदुर्ग ते अक्कलकोट वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. हा रस्ता खराब व खड्डेमय असल्याने वाहनचालक या रस्त्यावरुन अक्कलकोटला न जाता इटकळ मार्गे अक्कलकोटला जाणे पसंद करतात. रस्त्याची दयनीय अवस्था पाहून पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यानी या रस्त्याच्या कामासाठी शासनदरबारी प्रयत्न करुन लाखो रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ना. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यावेळेस त्यांनी सदरील रस्त्याचे काम संबंधित विभागाने चांगल्या दर्जाचे करुन घ्यावे, असे आदेश दिले होते. मात्र ना. चव्हाण यांच्या आदेशाचे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग व जि.प. बांधकाम विभागाने पालन केले नसल्याचे दिसून येत आहे. काही महिन्यापूर्वी नळदुर्ग ते शहापूर या रस्त्याचे काम करण्यात आले होते. या कामावर लाखो रुपये खर्च झाले आहेत. मात्र सध्या हा रस्ता अनेक ठिकाणी रखडला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेला हा रस्ता अल्पावधीतच का रखडला? याला जबाबदार कोण? याची तात्काळ चौकशी होणे गरजेचे आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळेच आज हा रस्ता रखडला आहे. नळदुर्ग बसस्थानकाजवळ, कंदुरमळा, पाटील तांडा, वागदरी व शहापूर पर्यंत रस्ता अनेक ठिकाणी रखडला आहे. लाखो रुपये खर्चून तयार केलेल्या या रस्त्याच्या दुर्दशेला केवळ संबंधित विभागाच्या अधिका-यांची खाऊगिरी वृत्तीच जबाबदार आहे. काम सुरु असताना कामावर देखरेख करणारे शाखा अभियंताचिरीमिरी घेवून होत असलेल्या निकृष्ठ कामाकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच आज या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. एकदा रस्त्याचे काम झाल्यानंतर पुन्हा वारंवार त्याच रस्त्याच्या कामासाठी शासन निधी देत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करुन घेणे गरजेचे आहे, असे असतानाही केवळ खाऊगिरी वृत्तीमुळे या रस्त्याची वाट लावणा-या अधिकारी व ठेकेदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.