महावितरणच्या निष्क्रीयेतेमुळे सर्वसामान्य ग्राहकाला फटका
नळदुर्ग - उस्मानाबाद जिल्ह्यातील महावितरण वीज कंपनी अधिका-यांच्या उदासिन धोरण व निष्क्रीयतेचा कळस गाठला असून त्याचा फटका सर्वसामान्य वीज ग्राहकांना बसत असून महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी चौकशी करुन निष्क्रीय असलेल्या महावितरण अधिकारी, कर्मचार्याची तात्काळ उचलबांगडी करुन राज्यातील अतिदुर्गम भागात बदली करण्याची मागणी वीज ग्राहकांतून जोर धरत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यापासून वीज गळती मोठ्याप्रमाणावर होत आहे व वीज ग्राहकाकडे थकबाकीही वाढत असल्याचे कारण पुढे कारण महावितरणने नुकतेच जिल्ह्यातील ६२ पैकी ३१ फिडरचा समावेश जी-थ्री मध्ये करुन दहा तासापेक्षा अधिक कालावधी भारनियमन शनिवार दि. १५ सप्टेंबर रोजीपासून सुरु केले आहे. वीज गळती रोखून थकबाकीदारानी तात्काळ वीजेचे बील भरल्यास मगच भारनियमन कमी होईल, असे महावितरण कंपनीच्या अधिका-याचे म्हणणे आहे. असे असले तरी वास्तव चित्र मात्र वेगळेच असल्याचे दिसत आहे.
नळदुर्ग शहर व परिसरात घरगुती, औद्योगिक, कृषी व व्यावसायिक वीज ग्राहकाना जून २०११ पूर्वी व त्यानंतर वीज बीलापोटी देयक असलेले वीज बीलात प्रचंड क्षम्य चुका करुन प्रसंगी मंदीर, मशीद किंवा दारिद्रयरेषेखालील वीज ग्राहकाला महिन्याकाठीचे एक लाखापेक्षा अधिक रुपयाचे बील देवून महावितरणने आपल्या कार्यप्रणालीचे आदर्श नमुना जनतेसमोर सादर केल्याने ग्राहकात खळबळ माजली. त्यानंतर वीज ग्राहक अव्वाच्या सव्वा आकारलेले चुकीचे वीज बील दुरुस्त करुन मिळावे, यासाठी गेले वर्षभर वीज कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. तरी देखील निष्क्रीय अधिकार्यांनी आजपर्यंत वीज बील दुरुस्त करुन दिले नाही. त्यामुळेमहावितरण कंपनीच्या निष्क्रीय असलेल्या व हालगर्जीपणा करणार्या अधिकार्याच्या निषेधार्थ नळदुर्ग येथील कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेेनेच्या कार्यकर्त्यांनी उपोषणही केले.त्यास वीज ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यापुढे नळदुर्ग येथेच बील दुरुस्त करुन देण्याचे वरिष्ठ अधिकार्याने लेखी आश्वासन दिल्यानंतर मनेसेने आपले उपोषण मागे घेतले.मात्र महावितरण वीज कंपनीच्या कामकाजात अजूनही सुधारणा झाले नसल्याचे दिसत आहे.
वर्षभरापूर्वी वीज ग्राहकांना चुकीचे दिलेले वीज बील आज अखेरपर्यंत दुरुस्त करुन मिळाले नाही. एवढेच नव्हे तर वीज गळती रोखण्यातही अधिका-याना अपयश आल्याचे बोलले जात आहे. नळदुर्ग येथील वीज ग्राहकांचा प्रश्न हाताळण्यात महावितरणचे अधिकारी कर्मचारी सपशेल अपयशी ठरल्याने मुंबई येथील महावितरण कंपनीच्या एका विशेष पथकाने नळदुर्ग भेट देवून अनेक वीज ग्राहकांची तपासणी करुन गेले. मात्र त्यांचा अहवाल गुपित व अलबेल असल्याची संतापजनक प्रतिक्रिया वीजग्राहकांतून व्यक्त केली जात आहे. काही कर्मचारी चिरीमिरी घेवून वीज चोरी करणार्या ग्राहकाना पाठीशी घालत असल्याची रसभरीत चर्चा नागरिकांतून होत आहे. तसेच परिसरात शेतीसाठी अनाधिकृत वीज वापर होत असल्याची ग्रामस्थांतून बोलले जात आहे. त्यामुळे वीज गळती रोखणे हे कर्मचा-यांचे काम असून किती कर्मचारी कर्तव्यदक्ष आहेत, यावरच संशय व्यक्त केला जात आहे.
जास्त आलेले वीज बील दुरुस्त करुन मिळाले तरच सर्व थकित बीले एकदाच भरणार, अशी भूमिका वीज ग्राहकाने घेतल्याने दिवसेंदिवस वीज बील थकिताचा आकडा वाढतच गेला. त्यातच शनिवार दि. १५ सप्टेंबर पासून ११ तास भारनियमन सुरु झाल्याने अगोदरच महागाई, दुष्काळजन्य परिस्थिती व इतर समस्याने शेतकरी, नागरीक त्रस्त असताना त्यांच्या जखमेवर महावितरणनेभारनियमानात वाढ करुन मीठ चोळण्याचा प्रकार केला असल्याची संतापजनक प्रतिक्रिया जनतेतून होत आहे.
नळदुर्ग शहर व परिसरातील वीजेची वितरण हानी वाढल्याने व वीज ग्राहकांची थकबाकी वाढल्यामुळे वीज भारनियमन वाढविले आहे. नळदुर्ग शहर एकूण १० तास भारनियमन होणार असून संध्याकाळी ७ ते १० या वेळेत दररोज भारनियमन होईल. भारनियमन पुढील वेळेत होणार आहे. सुधारित भारनियमन कार्यक्रम सर्व गाठवण फिडर्ससाठी नळदुर्ग शहर गट - २ - नळदुर्ग, चिकुंद्रा, मानेवाडी आदी ठिकाणी एकूण १० तास भारनियमन होणार असून सकाळी ५.३० ते ९.३०, दुपारी १२.३० ते ३.३०, संध्याकाळी ७ ते १० तर येडोळा फिडर गट ३ - नळदुर्ग डी.एड.डीपी, येडोळा, वागदरी, हंगरगा तांडा आदी ठिकाणी ११ तास भारनियन केले जाणार असून सकाळी ५.३० ते ९.३०, दुपारी १२.३० ते ४.३०, संध्याकाळी ७ ते १० तर जळकोट फिडर गट -ई नळदुर्ग कन्या शाळा डी.पी., जखनी तांडा, आपलं घर, रामतीर्थ, आलियाबाद, जळकोट आदी ठिकाणी ६ तास भारनियन होणार असून शनिवारी सकाळी ५.३० ते ९.१५, संध्याकाळी ७ ते १० व रविवारी सकाळी ११ ते २.१५, संध्याकाळी ७ ते १० याप्रमाणे भारनियमन होणार आहे.
महावितरणने केले नळदुर्गचे दोन तुकडे
नळदुर्ग शहरातील भवानी नगर व शासकीय गोडावून समोरील वस्ती असलेला परिसर चक्क ग्रामीण भागास महावितरण कंपनीने जोडले असून वीज बील व अनामत रक्कम शहरी भागाप्रमाणे घेत आहेत. मात्र ग्रामीण भागासाठी ज्या सुविधा आहेत, त्या मात्र देत नाहीत. त्यामुळे हा परिसर तात्काळ शहरी भागास जोडण्याची मागणी वीज ग्राहकांतून केली जात आहे. अन्यथा याप्रकरणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
Labels: जिल्हा


<< Home