Wednesday, 24 September 2014

पेड न्यूज रोखण्यासाठी माध्यम संनियंत्रण समिती कार्यरत

उस्मानाबाद -  आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांकडून करण्यात येणाऱ्या प्रचारासाठी पेड न्यूजचा वापर होऊ नये यासाठी जिल्हास्तरीय मीडिया सर्टिफिकेशन आणि मीडिया मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, उस्मानाबाद हे या समितीचे अध्यक्ष राहतील. सदर समितीचे काम सुरु झाले असून विशेष म्हणजे जिल्हास्तरासह चारही विधानसभा मतदारसंघातही समिती सदस्यांमार्फत पेड न्यूजकडे नजर ठेवली जात आहे.
पेड न्यूज या सदराखाली मोडणाऱ्या जाहिराती, बातम्या यावर होणारा खर्च कोठेही दर्शविला जात नाही आणि त्यामुळे हा खर्च निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट होत नव्हता. भारत निवडणूक आयोगाने ही बाब लक्षात घेऊन जिल्हास्तरीय नियंत्रण समिती स्थापण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निवडणूक आयोगांच्या निर्देशांनुसार ही समिती काम करणार आहे.
एकच मजकूर भिन्न स्वरुपाच्या वर्तमानपत्रात एकसारखा प्रसिद्ध होणे, बातमी प्रसिद्धीची वारंवारता जास्त असणे, विशिष्ट उमेदवारास अवास्तव प्रसिद्धी देण्यात येत असेल तर त्यासंदर्भातील मजकुराची छाननी करुन सदर समिती संबंधित उमेदवारांकडून हा खर्च निवडणूक खर्चात समाविष्ट केला किंवा कसे याबाबत विचारणा करु शकेल. याशिवाय, स्थानिक केबल वाहिनी व इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातही ठराविक उमेदवारांच्याच बातम्या येत असतील आणि इतर उमेदवारांची दखल घेतली जात नसेल तर त्याबाबतही सदर समिती कार्यवाही करु शकेल. 
ही समिती  त्यांच्या कार्यश्रेत्रात येत असलेल्या वर्तमानपत्रांतील मजकुराची छाननी करेल. अशा प्रकारचा मजकूर प्रसिद्ध, प्रसारित झाल्यास जिल्हास्तरीय समितीने शिफारस केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संबंधित उमेदवारांस प्रसारण अथवा प्रकाशनाच्या 96 तासाच्या आत यासंदर्भातील खर्च निवडणूक खर्चात का समाविष्ट केला नाही अशी नोटीस बजावतील.  संबंधित उमेदवारांकडून 48 तासांत यासंदर्भातील कोणतेही उत्तर आले नाही तर समितीचा निर्णय अंतिम मानला जाईल.  जिल्हास्तरीय समितीचा निर्णय मान्य नसल्यास उमेदवार राज्य समितीकडे 48 तासांच्या आत दाद मागू शकेल. जिल्हास्तरीय मीडिया सर्टिफिकेशन ऐन्ड मीडिया मॉनिटरिंग समितीमध्ये चारही विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी, नायब तहसीलदार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक), कार्यक्रमाधिकारी, आकाशवाणी, उस्मानाबाद केंद्र, उस्मानाबाद आणि सहायक अभियंता, दूरदर्शन सहक्षेपण केंद्र, उस्मानाबाद तसेच शहाजी चव्हाण हे अशासकीय सदस्य राहणार आहेत. जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव राहतील.  


Labels: