जलभूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या नावे देण्याची मागणी
यवतमाळ, दि. 28 : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले जलभूषण पुरस्कार जलसंधारणाचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या नावे देण्याबाबत पुसद उपविभागीय अधिकारी यांना राष्ट्रीय बंजारा मिशन यवतमाळ जिल्हा कमिटी कडुन निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने दरवर्षी १० मे रोजी " जलसंधारण " दिन साजरा केला जात असताना महाविकास आघाडी सरकारने माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना "जलक्रांतीचे जनक" म्हणून संबोधत १४ जुलै ला "जलभुषण" पुरस्काराचे वितरण करण्याचा दि. १२ जुन रोजी अध्यादेश काढला आहे.
सुधाकरराव नाईक यांनी राज्यात जलसंधारणाची कामे झाली नाहीत तर महाराष्ट्राचा वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, हे ओळखून राज्यभर दौरा केला. पाणी अडवा पाणी जिरवा, अशी हाक दिली. त्यामुळेच जलचळवळ ही लोकचळवळ बनली. जलसंधारण हे खाते नाईकांची देण होय. म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात १० मे हा दिवस "जलसंधारण दिन" म्हणून साजरा करण्याचे परिपत्रक काढले होते. मात्र गेल्या काही वर्षापासून राज्य सरकार हा दिवस साजरा करण्याचे हेतुपुरस्सर टाळत आहे. ते ही थोडे म्हणून की काय, सुधाकररावजी नाईक यांनी केलेल्या कामाचे श्रेय शंकरराव चव्हाण यांना देण्याचा घाट महाविकास आघाडी सरकार घालत आहे.
शाहु, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात एका मागासलेल्या समाजातून आलेल्या सुधाकररावजी नाईक यांच्याबद्दल आकस बाळगला जात आहे. शासनाच्या या चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण बंजारा समाज दुखावला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे १२ जुनला काढलेला अध्यादेश रद्द करण्यात यावा असे या निवेदनपत्रा मध्ये नमुद केले आहे.
यावेळी युवा जिल्हाध्यक्ष विकास राठोड चोंढीकर, युवा जिल्हाउपाध्यक्ष राम राठोड, तालुका सचिव सुरेश चव्हाण, तालुका युवाध्यक्ष आशिष चव्हाण, उपाध्यक्ष अर्जुन चव्हाण, महासचिव रामप्रसाद राठोड, संघटक लखन राठोड, संघटक राम आडे, संघटक सुनील आडे, पवनकुमार राठोड आदीजण उपस्थित होते.
Labels: Pradesh


<< Home