बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर) :- बार्शीत एक दिवसाचे स्त्री अर्भक मृत अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. स्त्री जन्माचे अपत्य गुप्तपणे विल्हेवाट लावणार्‍या अज्ञात व्यक्तीविरोधात बार्शी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   
     सोमवारी दि.२० रोजी सदरच्या प्रकारचा लक्षात आल्याने सोमेश्वर खलसे रा.सुलाखे हायस्कूल जवळ यांनी बार्शी पोलिसांना खबर दिली. सतत गजबलेला, रहदारीचा व मुख्य बाजारपेठेचा रस्ता म्हणून प्रसिध्द असलेल्या पांडे चौक परिसरात बेंगलोर अय्यंगार बेकरी जवळ असलेल्या कचराकुंडीत सदरचे अर्भक टाकण्यात आले होते. जनन दरातील असमतोल व स्त्री जन्मदरातील घटते प्रमाण लक्षात आल्यानंतर शासनाने गर्भलिंग तपासणी करण्यास प्रतिबंध घातला आहे. यानंतरही काही वर्षांपूर्वी बार्शीतील नामवंत डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टरांच्या धंद्यातील वास्तव समोर येऊन माणुसकीला काळीमा फासणार्‍या कुर्डूवाडी रोडवरील नामवंत डॉक्टरचा पर्दाफाश झाला होता. बीड येथील कुख्यात डॉक्टर सरस्वती मुंढे व डॉ.सुदाम मुंढे यांचा पर्दाफाश झाल्यानंतर बार्शीतील धन्वंतरी मेडिकल या दुकानातून व्हेक्रेडिल या गर्भपाताच्या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात बेकायदा विक्री झाल्याची बाबही समोर आली होती व बार्शीतील वैद्यकिय क्षेत्राचे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या डॉक्टरांशी लागेबंधे असल्याचे समोर आले होते. अनेक डॉक्टरांकडून मोठ्या रकमेसाठी सोनोग्राफी मशिनमध्ये केलेल्या गर्भलिंग तपासण्यांचे रेकॉर्ड समोर आल्यानंतर वैद्यकिय अधिकार्‍यांनी गुन्हे दाखल केले होते. बार्शीतील स्त्री जन्मदराचे अल्प प्रमाण हे वैद्यकिय क्षेत्रातील होत असलेल्या बाजारांचे द्योतक असून कठोर कायदेशीर मार्गाने कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
 
Top