उस्मानाबाद :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्‍ट्राची कुलस्‍वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्‍या पावन नगरीत प्रचार सभा होऊनही उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात भाजपाचा एक उमेदवार विजयी झाला नाही. त्‍यामुळे मोंदीच्‍या सभेनंतरही जिल्‍ह्यात कमळ कोमजले. 
   विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील भाजप पदाधिका-यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. परंतु, जिल्ह्यात भाजपचे बळ नसल्याने निवडणुकीतील एकाही उमेदवारला यश मिळाले नाही. जिल्ह्यातील चारपैकी केवळ उस्मानाबाद मतदारसंघातील मतदारांनी बदल केला आहे. अन्य तिन्ही मतदारसंघात विद्यमान आमदारांच्याच गळ्यात पुन्हा विजयाची माळ घातली आहे. त्यानुसार तुळजापूर मतदारसंघातून मधुकरराव चव्हाण चौथ्यांदा, उमरगा-लोहारा मतदारसंघातून शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले दुस-यांदा तर भूम-परंडा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांनी सलग तिस-यांदा विजय पटकावला आहे. विशेष म्हणजे ५२ वर्षांच्या काळात परंडा मतदारसंघात एकाही उमेदवारला विजयाची हॅट्‌ट्रिक साधता आली नव्हती. राहुल मोटे यांनी विजयाची हॅट्‌ट्रिक साधत इतिहास चरला आहे. परंडा मतदारसंघात भाजप युतीमधील घटकपक्षा रासपला यश मिळेल, असे चित्र होते. मतदारांनी रासप उमेदवार बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांना नाकारले आहे. तसेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतलेल्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकराना पराभव पत्करावा लागला आहे. तसेच तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे संजय निंबाळकर यांचाही पराभव झाला आहे. शिवाय अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या उमरगा-लोहारा मतदारसंघात भाजपचे उमेदवार तथा जिल्हा परिषद सदस्य कैलास शिंदे पराभूत झाले आहेत.
 
Top