उस्मानाबाद : नागरिकांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी सुवर्ण जयंती राजस्व अभियानाच्या माध्यमातून सकनेवाडी येथे शनिवारी समाधान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या समाधान मेळाव्यास राज्याचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे हे सकाळी आठ वाजता भेट देणार आहेत. तसेच राज्यात सर्वप्रथम सुरु करण्यात आलेल्या जमीन ई-मोजणी उपक्रमातील शेतक-यांना जमीन मोजणी नकाशा प्रमाणपत्र खडसे यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहेत.
      महसूलमंत्री  खडसे यांचे शुक्रवारी सायंकाळी 5-30 वाजता हेलिकॉप्टरने बीडहून उस्मानाबाद येथे आगमन झाले. त्यांच्यासमवेत मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव श्री. इंदुलकर, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल हे होते. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर श्री. खडसे यांचे शिंगोली सर्कीट हाऊस येथे आगमन झाले. तेथे आमदार राणा जगजीतसिंह पाटील, नितीन काळे आदींनी त्यांचे स्वागत केले. याचबरोबर विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनीही त्यांचे स्वागत केले.
     शनिवारी सकाळी आठ वाजता श्री. खडसे हे सकनेवाडी येथे ई-मोजणी उपक्रमास भेट देणार असून नकाशा प्रमाणपत्राचेही वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत समाधान मेळाव्यासही ते भेट देणार आहेत.
     त्यानंतर सकाळी 10-30 वाजता महसूलमंत्री विविध शासकीय अधिका-यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेणार आहेत.
      दरम्यान आज सकनेवाडी येथे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी भेट देऊन ई-मोजणी कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड, प्र.तहसीलदार राजेश जाधव, सरपंच दयानंद भोईटे यांच्यासह भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
      शेतजमीनीवरुन होणारे वाद मिटविण्यासाठी  महाराष्ट्रात प्रथमच सकनेवाडी येथे सरपंच व गावकऱ्यांच्या सहकार्यातून प्रायोगिक तत्वावर हा ई-मोजणीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मोजणी विभाग व प्रशासनाच्या दारी फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी हा उपक्रम आहे. ही संधी गावकऱ्यांनी दडवू नये. या उपक्रमास संबंधित गटातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून प्रतिसाद दयावा. जेणेकरुन वाद, विवाद, पोलीस स्टेशनमधील तंटे, न्यायालयातील खटले अशा विविध प्रकारापासून वाद मिटल्याने आपल्याला समाधान मिळेल. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या गावातील संपूर्ण क्षेत्र मोजून देण्याचा निर्णयही घेतला आहे. या मोजणीच्या वेळी शेतकऱ्यांना जागेवरच मोजणीचा सातबारा व नकाशा देण्यात येणार आहेत, अशीही माहिती डॉ.  नारनवरे यांनी दिली.
गावातील मोजणी करण्यासाठी डिजीटल प्लेक्स तयार करण्यात येणार असून यावर गावाची रचना व गट तयार करण्यात येणार आहेत. यापूर्वी 1930 मध्ये ब्रिटीश कालावधीत अशा प्रकारचे मोठी मोजणी झाली होती. त्यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या जमीनीच्या खुणा आखून घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आताच या नाविन्यपूर्ण उपक्रम महाराष्ट्रात प्रथमच सरपंच व गावकऱ्यांच्या पुढाकारातून सकनेवाडीत राबविण्यात  येत आहे. याचाही लाभ शेतकऱ्यांनी  घेऊन हा उपक्रम महाराष्ट्रात आदर्श निर्माण व्हावा, यासाठी सर्व गावकऱ्यांनी योगदान देण्याचे आवाहनही डॉ.नारनवरे यांनी यावेळी केले.
       आपल्या गावात समाधान योजनेच्या माध्यमातून शासन आपल्या दारी येत असून जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र, सातबारा उतारा, आधार कार्ड, रेशनकार्ड अशा अनेक प्रकारची प्रमाणपत्र आपल्याला गावातच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, महसूल विभागासह कृषी, पशुसंवर्धन,आरोग्य,शिक्षण,राज्य परिवहन, एकात्मिक बाल विकास, महिला आर्थीक विकास महामंडळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषदेचा स्वच्छ भारत अभियान कक्ष यांच्यासह विविध विभागांचे स्टॉल्स लावण्यात येणार असल्याचे  माहिती डॉ. नारनवरे यांनी दिली.
       डॉ. नारनवरे यांनी प्रत्यक्ष मोजणी स्‍थळास भेट मोजणी सर्व्हअर व तलाठी यांच्या समन्वयातून चालू असलेल्या गटनिहाय मोजणीचा पाहणी केली. जास्तीत जास्त पारदर्शकता या मोजणीच्या अनुषंगाने यावी. शेतकऱ्यांनी मोजणीची शासकीय फी भरुन मोजणी करावी. आपल्या शेतामध्ये खुणा करण्यासाठी विशिष्ट चाकोरीत आखून दिलेल्या साईजचा दगड आणावा. जेणेकरुन  भविष्यात खुणा नष्ट होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.  यावेळी गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.      ****
 
Top