बार्शी - पेट्रोलपंप चालकाकडून अनेक प्रसंगी ग्राहकांची फसवणूक होत असते. या फसवणूकीची अनेक वेगवेगळे किस्से आणि अनुभव नागरिक सांगत असतात, बार्शीतील एका पंपावरुन चारचाकी वाहनात भरलेल्या पेट्रोलमध्ये चक्क ३० टक्केपर्यंत पाणीच आल्यामुळे ग्राहकाच्या वाहनात बिघाड होऊन वाहन बंद पडले.
रविवारी सकाळी भारत पेट्रोलियम कंपनीच्या मेसर्स ए आर कोठारी या पंपावर सदरचा प्रकार घडला. चारचाकी वाहन घेऊन आलेल्या दिनकर रुद्राके यांनी कोठारी यांच्या पंपावरुन सुमारे २२०० रुपयांचे पेट्रोल भरुन बाहेरगावी निघाले. गावाबाहेर पडताच त्यांचे वाहन अचानक बंद पडले. वाहनाची दुरुस्ती करणार्‍या गॅरेजचालकांना त्यांनी वाहन दाखविले. अथक परिश्रमानंतरही वाहन सुरु होत नसल्याने गॅरेजमधील कुशल कामगाराने पेट्रोलमध्ये पाहिले, यावेळी पेट्रोलमध्ये वेगळ्या प्रकारचे तरंग दिसून आल्याने त्याने त्याचा नमुना प्लास्टिकच्या रिकाम्या बाटलीत काढला. यावेळी सर्वजण बुचकळ्यात पडले कारण पेट्रोलमध्ये चक्क पाणीच मोठ्या प्रमाणात साठल्याचे दिसून आले. पाण्याचा वेगळा रंग असलेला थर खालच्या बाजूस तर पेट्रोलचा वेगळ्या रंगाचा थर वरच्या बाजूस वेगळा होतांना दिसू लागला. काही वेळात दोन्ही थरात सुमारे ३० टक्के पाण्याचा थर जमा झाला. फसगत झालेल्या रुद्राके यांनी सदरच्या पेट्रोलचा नमुना घेऊन पेट्रोलपंप गाठला. यावेळी होय नाही असे आढेवेढे घेत शेवटी पेट्रोल पंपावर भरलेल्या पेट्रोलमध्ये पाणी असल्याची कबुली पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍याने दिली. कर्मचार्‍याने पंपाच्या मालकाशी रुद्राके यांचा फोनवरुन संपर्क करुन दिला. यावेळी पंपाचे मालक कोठारी यांनी रुद्राके यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.

 
Top