बार्शी : नारळाचा एक तुकडा देवापुढे ठेवला की संपूर्ण नारळाला प्रसादाच रूप येत त्यानुसार आपल्याही जीवनाला प्रसादाच रूप येण्यासाठी प्रत्येकाने आपला वाटा मग तो पैशाच्या स्वरुपातला असो किंवा वस्तूच्या स्वरूपातला असो तो समाजातील दुर्लक्षिताच्या सेवेसाठी दिला पाहिजे. याच भावनेने बार्शीतील सहयोग स्थानिक त्राहीवशी मंडळाच्या वतीने अजित फाऊंडेशनच्या स्थलांतरित कामगारांच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या “भटक्यांच्या शाळेत” 70 मुलांना व त्यांच्या मातपित्यांना दीपावलीच्या निमित्ताने मोफत फराळ व फटाक्यांचे वाटप करण्यात आले.
      यावेळी उमरजचे तहसिलदार उमेश चव्हाण , विक्रीकर अधिकारी सचिन केदारलिंगे, मोहन चिखले, अविनाश सोलवट, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, पर्यावरणदूत मधुकर डोईफोडे, प्रकाश गव्हाने, सतीश गोडगे, विलास निंबाळकर, रामदास तिकटे,चंद्रकांत राऊत, राहुल बनसोडे, विलास जगदाळे, सुरेश वायकर, प्रताप जगदाळे, अ‍ॅड.बापू करंजकर, रमेश कास्वटे, जहांगीर बागवान, महेश निंबाळकर, पत्रकार राजा माने, शहाजी फुरडे-पाटील, चंद्रकांत करडे आदीजण उपस्थित होते.
      यावेळी बोलताना विलास जगदाळे म्हणाले की, समाजातील वंचित बालकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी आपण निमित्त व्हावं व अशा मुलांच्या चेहर्‍यावर हास्य फुलावे यामुळे आपल्या ही पराकोटीचा आनंद व आत्मिक समाधान मिळते. म्हणून स्थलांतरित बालकांच्या जीवनातील वेदना व दुख क्षणभर दूर सारून त्यांचे बालपण सुखद करण्यासाठी सहयोग मंडळाने एक पाऊल उचलले आहे. 
      अजित फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश निंबाळकर यांनी उपस्थिताना  संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली. बालकांनी एकत्रितपणे फटाके उडवून दिवाळीचा आनंद लुटला. यावेळी मुलांच्या व पालकांच्या चेहर्‍यावर दीपावलीचा आनंद झळकत होता. 
      कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंकर गव्हाने, विनया जाधव, प्रवीण शिंदे, समारा मुल्ला, अनीता शिंदे, सुलभा मिरगणे, यांनी परिश्रम घेतले. 
 
Top