अणदूर :- माझा पराभव करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी जोर लावला होता. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. मतदारसंघातील विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही मला सहकार्य केले. त्यांचा रात्रभर माझ्याशी फोनवरून संपर्क होता. "साहेब आमच्या पक्षाच्या नेत्यांबरोबर प्रचारासाठी फिरत असलो तरी आम्ही तुमच्या बरोबरच आहेत, काळजी करू नका' असे कार्यकर्ते सांगत होते. त्यामुळे मताधिक्यासह विजयाची खात्री होती, असा गौप्यस्फोट आमदार मधुकरराव चव्हाण यांनी केला.
    विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांचा विजय झाल्याने अणदूर येथे राईस मिल मैदानावर त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, माझ्यावर अनेकांनी टीका केली. परंतु, मी कोणावरही टीका केली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुळजापूर येथे सभा झाल्या. मला पराभूत करण्यासाठी दिग्गजांनी हजेरी लावली. मात्र, त्याचा काहीही फरक पडला नाही. शरद पवार यांनी केलेल्या टीकेमुळे दु:ख झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. मला सोडून गेले, ते नंतर कधीच खुर्चीवर बसले नाहीत. जनतेच्या प्रेमामुळेच अटीतटीच्या लढतीत माझा विजय झाला.
आता वारसाला पुढे आणणार
आजतागायत मी लोकांसाठीच काम केले. घरासाठी काही केले नाही. यापुढे आता घरातील माणसांना राजकारणात पुढे आणण्याचा विचार करावा लागेल, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले. त्यानुसार पुत्र सुनील यांना राजकारणात सक्रीय करणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
 
Top