उस्मानाबाद :- सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून 27 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक अश्विनी भोसले यांनी दिली आहे.
    विविध विभाग, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, संस्था, संघटना, बॅंका आदींनी या कालावधीत बॅनर्स, पोस्टर्सद्वारे जागृती करावी, वादविवाद स्पर्धा आयोजित कराव्यात, विद्यार्थी तसेच शाळांसाठी निबंधलेखन, व्याख्याने आयोजित करावीत. याशिवाय, सार्वजनिक क्षेत्र, स्थानिक संस्था यांनी भ्रष्टाचारविरोधी प्रतिज्ञा त्यांच्या कार्यालयात सर्व संबंधितांना द्याव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे.
      केंद्रीय दक्षता आयोगाने यासंदर्भात परिपत्रक जारी करुन सर्वांना या दक्षता सप्ताहाचा भाग  व्हावा, असे आवाहन केले आहे. तंत्रज्ञानाच्या साह्याने भ्रष्टाचाराशी लढा असे यावर्षीच्या दक्षता जनजागृती सप्ताहाचे घोषवाक्य आहे. भ्रष्टाचारविरोधी शपथही यावेळी घेतली जाणार आहे.      
 
Top