उस्मानाबाद :- पोलीसांना कायदा व सुव्यवस्थेबरोबर गुंड, अतिरेकी, दहशतवादी  व समाजद्रोही  अशा लोकांचाही  सामना करावा लागतो. कर्तव्य पार पाडीत असताना  बऱ्याचवेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्राणास मुकावे लागते. तेंव्हा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना शिस्त व संयम ठेवून देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे संरक्षण करण्यास नेहमी तत्पर राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उस्मानाबादचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सुरेंद्र तावडे  यांनी केले. 
उस्‍मानाबाद येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित पोलीस अधिकारी व कर्मचा-याच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करताना प्रमुख न्यायाधिश तावडे बोलत होते. यावेळी शहीद झालेल्या शूरवीर शहीदांप्रती कृतज्ञता  म्हणून हुतात्मा स्मृतिस्तंभास न्या. तावडे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस अधिक्षक अभिषेक त्रिमुखे, अपर पोलीस अधिक्षक बी. यु. भांगे  आदिंनी पुष्पचक्र वाहून अभिवादन करुन मानवंदना दिली.
      एक सप्टेंबर 2013 ते 31 ऑगस्ट 2014 या कालावधीत देशातील 662 पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावताना हुतात्मा झाले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा शहीद दिन पाळण्यात येतो, असे जिल्हा पोलीस प्रमुख त्रिमुखे यांनी  सांगितले.
      परेड कर्मचारी रायफलच्या सहाय्याने बंदुकीच्या 3 फैरी फायर करुन सलामी दिली.  बिगूलवर शोकधुन वाजवण्यात आल्यानंतर  प्रमुख अतिथींना मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंबादास दानवे यांनी केले.
      उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे आणि विकास नाईक यांनी हुतात्म्यांच्या नावाचे वाचन केले. यावेळी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या  संख्येने उपस्थित होते. 
 
Top