नळदुर्ग  :- सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी (ता. तुळजापूर) या गावच्या शिवारात दि. 19 जुन च्या पहाटे पडलेल्या परप्रांतीय दरोडा प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या लालची दुय्यम फौजदारासह चार पोलीसांनी दरोडयातील जप्त केलेल्या रक्कमेत मोठी हेराफेरी केल्याचे उघडकीस आल्याने पोलीस काॅन्सटेबलच्या घरातुन सुमारे 43 लाख 77 हजार रुपये पोलिसांनी जप्त केले.
याप्रकरणी पोलीस अधिका-यांसह चार पोलीसांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता तुळजापूर न्यायालय प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांनी दि. 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. या घटनेने पोलीसांची प्रतिमा मलीन झाली असून नागरिकांत उलटसुलट चर्चा रंगत आहे.

पोलीस उपनिरीक्षक अनिल किरवाडे, पोलीस नाईक एम.बी. भिसे, एन.जी. डिगोळे, पोकॉ. राजीव चव्हाण असे पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपींचे नावे आहेत. दि. १९ जून रोजी पहाटे फुलवाडी (ता. तुळजापूर) गावच्या शिवारात हैद्राबादहून मुंबईकडे कारने (एपी ३७ सी के ४९८५) निघालेले सराफ व्यापारी किर्तीकुमार गुलाबचंद बयाज व अन्य साथीदारांना त्यांच्या कारचा चालक सुरेंद्रसिंग नयनसिंग राजपूत (रा.सेल्हा राजस्थान) यांनी दुस-या वाहनातून त्यांचा पाठलाग करणा-या सहका-याना वेळोवेळी माहिती देवून फुलवाडी शिवारात आपल्याच मालकाला लुटण्यास भाग पाडले. आरोपींनी बोलेरो जिप (क्र.के.ए.३५ एन ७०१२) आडवी लावून बयाज यांना मारहाण करून लाखौ रुपयांची रक्कम लुटून फरार झाले होते, प्रकरणी बयाज यांच्या फिर्यादीवरून चालकांसह ईतर सात आरोपी विरूद्ध प्रथम फक्त चार लाख रुपये लुटून नेल्याची तक्रार नळदुर्ग पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.  तक्रारीत चार लाख रुपये लुटीची रक्कम दाखवण्यात आली असली तरी कोट्यवधी  रुपयांची रक्कम लुटली गेली अशी जोरदार चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. यामुळे या प्रकरणात पोलीसांनी गैरप्रकार केल्याचे बोलले जात होते.

दरम्यान याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यातील पोउपनि अनिल किरवाडे यासह इतर कर्मचाऱ्यांचा पथकांनी ताब्यात असलेला एकमेव कारचालक आरोपी सुरेंद्रसिंग राजपूत याला सोबत घेवून कर्नाटकातील हाॅस्पेट (जि. बेल्लारी) येथे तपासकामी गेले असता राजपूत यानी पोलिसांच्या हातावर तुरी देवून पलायन केले असा बनाव करुन पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याला पळवून लावले व दरोड्यातील लुटण्यात आलेली रक्कम आरोपींच्या संगनमतानी लाटली, असे पोलीस अधिक्षक यांनी केलेल्या चौकशीत वरील पोलीस दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरूध्द नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी पळालेल्या आरोपीला अटक करण्यात यश आले होते. दोन्ही आरोपीची पोलीस कोठडी घेण्यात आली. त्यामध्ये स्वरुपसिंग भोरसिंग राजपूत (वय ४०, रा. हाॅसपेट, जि. बेल्लारी) याच्या घरी धाड टाकून 72 लाख 50 हजार रुपयांची रक्कम पोलीसांनी हस्तगत केली. चार लाख रुपये लुटल्याच्या फिर्यादीत तब्बल वरीलप्रमाणे मोठी रोख रक्कम मिळाल्याने आणखीन संशय बळावला. या घटनेत पाच जणांना अटक केली होती. त्यापैकी दोघांना पोलीस कोठडीत तर तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींच्या जबाब व सखोल चौकशीत पोलीस उपनिक्षकांसह कर्मचारी दोषी आढळले.

पोकॉ. राजीव चव्हाण यांच्या उस्मानाबादेतील दत्त नगर भागातील असलेल्या घरातून दरोड्यातील लुटण्यात आलेली रक्कम, पोलीस व आरोपीच्या संगनमतानी लाटलेली तब्बल ४३ लाख ७७ रुपयांची रोख रक्कम मंगळवार दि. ४ जुलै रोजी जप्त केली. तर उपनिरिक्षकांसह चौघांना अटक करून चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दि. ६ जुलै  पर्यंत तिन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास स.पो.नि प्रल्हाद सुर्यंवशी  हे करीत आहे.

चौकट-  या घटनेची माहिती घेण्यासाठी वार्ताहरानी पोलिस ठाण्यातील स.पो.नि. सुर्यंवशी याची भेट घेतली आसता माहिती देण्यास सुरुवातीला नकार देवुन  तब्बल तीन तास थांबून घेतले. ही बाब पोलिस निरिक्षक राजेंद्र बोकडे याच्या लक्षात आल्याने माहिती देण्यास भाग पाडल्याने सुर्यंवशी यानी राञी सव्वा  आठ वाजता माहिती दिली
 
Top