उस्मानाबाद -: विकास योजनांत सर्व ग्रामस्थांचा सहभाग घेत योजनांची यशस्वी अंमलबजावणी करणा-या भूम तालुक्यातील वांगी (बुद्रुक) या गावातील गावक-यांचे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मनापासून कौतूक केले. ही एकी कायम ठेवत शासन योजनांची अधिकाधिक प्रभावी अंमलबजावणी करुन विकास साधा, असा सल्लाही त्यांनी यावेळी गावक-यांना दिला.
       जयस्वाल गुरुवारी उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर होते. यावेळी त्यांनी वांगी (बु.) गावाला भेट दिली. यावेळी वांगी येथे सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांनी भेट देऊन विविध विभागांच्या स्टॉल्सची पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, विभागीय उपायुक्त रामनवर, उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, पंचायती समिती सभापती अण्णासाहेब भोगील, आदिनाथ पालके, सरपंच जयश्री शेळके यांच्यासह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. 
        वांगी (बुद्रुक) गावाने विकासाच्या दिशेने झेप घेण्यासाठी विविध संकल्पना राबविल्या आहेत. गटारमुक्त गाव, घर तेथे शौचालय, घर तेथे झाड अशा संकल्पना प्रत्यक्षात आणून  गावाने पर्यावरण रक्षणाचा नवा मंत्र दिला आहे. विकासात सर्वांचा सहभाग हेच गावच्या यशाचे मुख्य गमक असल्याचे श्री. जयस्वाल यांनी नमूद केले.
          लोकाभिमुख, गतिमान प्रशासनासाठी सुवर्ण जयंती राजस्व अभियान सुरु आहे. या अभियानातील सर्व उपक्रमांचा लाभ गावकऱ्यांनी घ्यावा, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करुन विकास साधावा,असे आवाहन श्री. जयस्वाल यांनी केले.
      जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी यावेळी रोजगार हमी योजनेत गावाने केलेल्या विकास कामांचे कौतूक केले. शासन योजना गावपातळीवर जाव्यात, यासाठभ्‍ तालुकानिहाय नेहरु युवा केंद्र व विविध विभागांच्या साहयाने युवक-युवती मेळावे घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
       येत्या 15 ऑगस्टपूर्वी सर्व गावकरी आणि विद्यार्थी यांना आवश्यक ती सर्व प्रमाणपत्रे देण्यात येतील त्यासाठी गावकरी व विद्यार्थ्यांनी  पुढाकार घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी राऊत यांनी यावेळी केले.
      यावेळी श्री. जयस्वाल यांच्या हस्ते जात प्रमाणपत्र, धरणग्रस्त प्रमाणपत्र, समाजकल्याण विभागाच्या वतीने ब्लॅकेट वाटप, बचत गटांना धनादेश वितरण, वृध्द कलाकारांना मानधन, राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेतंर्गत लाभार्थ्यांना लाभ, बियाणे वाटप,कृषी यांत्रिकीकरण  योजनेंतर्गत पेरणीयंत्र वाटप, शेळीपालन प्रकल्पासाठी अनुदान, कडबा कुट्टी यंत्र, शेतपंप वीजजोडणी साहित्य, दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्राचे वाटप असे प्रतिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.  कार्यक्रमानंतर श्री. जयस्वाल यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन तेथील मुलांशी संवाद साधला.
 
Top