उस्मानाबाद - भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबर रोजी साजरी होणारी जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी रन फॉर युनिटीचे आयोजन केले आहे. या आयोजनासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विविध सामाजिक संस्था, संघटना आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
  येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज ही बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शिल्पा करमरकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
    राष्ट्रीय एकता दिनानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम होणार असून यात सकाळी एकता दौड, सकाळी 10 वाजता जि.प. सभागृह येथे व्याख्यान आणि सायंकाळी पोलीस विभागाच्या वतीने संचलन असा कार्यक्रम होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग यात राहणार असून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवावा आणि राष्ट्रीय एकात्मतेप्रती असणारी बाधीलकी अधिक दृढ करावी, असे  आवाहन डॉ. नारनवरे यांनी उस्मानाबादकरांना केले आहे. विशेष म्हणजे, रन फॉर युनिटीनंतर सहभागी झालेले सर्वजण सामुदायिक स्वच्छता मोहिम राबविणार आहेत. तसेच सायंकाळच्या संचलनावेळी मानवी साखळी केली जाणार आहे.
    राज्य प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार 31 ऑक्टोबर रोजी या रन फॉर युनिटीचे आयोजन केले जाणार आहे. सकाळी 7 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरुवात होणार आहे. शहरातील विविध उत्सव मंडळे, असोसिएशन्स, सामाजिक संघटना, डॉक्टर्स, वकील, व्यापारी यांच्या संस्थांचे प्रतिनिधी, क्रीडा मंडळे यांचे प्रतिनिधी यांत सहभागी होणार आहेत. 
 
Top