उस्मानाबाद -  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज स्वता जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला अचानक भेट देऊन पाहणी केली. वेळेवर न येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्याचे आदेश त्यांनी दिले. प्रत्येक कार्यालय आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले.
    सोमवारी सकाळीच जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्यासह अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या पथकाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला भेट दिली. ठिक 10 वाजल्यानंतर त्यांनी विविध कार्यालयांना भेटी देत तेथील हजेरीपुस्तक ताब्यात घेतले. प्रत्येक ठिकाणी संबंधित कार्यालयप्रमुख उपस्थित आहेत काय, याची पाहणी करत तसेच उपलब्ध कर्मचारी आणि हजेरीपटावरील कर्मचारी यांची माहिती घेतली.
प्रत्येक कार्यालयांना भेट देऊन तेथील स्वच्छतेचीही पाहणी केली. ज्या कार्यालयात अस्वच्छता तसेच कागदपत्रांची अस्तव्यस्तता दिसली, त्याठिकाणी त्यांनी संबंधितांना तात्काळ कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश दिले.  त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी तात्काळ दुपारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयप्रमुखांची बैठक घेतली. त्यात पुन्हा कार्यालयीन स्वच्छता आणि कार्यालयीन शिस्तीबद्दल आणि कार्यालयात वेळेवर उपस्थित राहण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. कार्यालयात वेळेवर न येणाऱ्या आणि विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आणि संबंधित कार्यालयप्रमुखांचा अहवाल मुख्य सचिव आणि संबंधीत विभागाच्या सचिवांना पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कार्यालयातील अभिलेख्यांचे व्यवस्थित वर्गीकरण ठेवणे अपेक्षीत आहे,  अधिकारी आणि कर्मचारी यांनी ओळखपत्र लावणे तसेच वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांनी गणवेषात उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांची असल्याचेही त्यांनी नमूद केले. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करा, असे निर्देश यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.  मध्यवर्ती इमारतीच्या सभोवताली  विविध वाहने अस्ताव्यस्तपणे लावलेली असतात. आरटीओंमार्फत त्यांच्यावर कार्यवाही करावी, पार्कींगसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, नागरिकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यापुढे दर आठवड्यात जिल्हा प्रशासनाच्या पथकाकडून अशाप्रकारे भेटी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागप्रमुखांनी सर्व सूचनांची कडक अंमलबजावणी करावी. यापुढे कार्यालय अथवा परिसर अस्वच्छ दिसल्यास संबंधितांवर कारवाईचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे, अपर जिल्हाधिकारी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तांबे, उपजिल्हाधिकारी श्री. मुळे यांनी सायंकाळी पुन्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पुन्हा प्रत्येक कार्यालयांना भेटी देऊन बैठकीत दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी तात्काळ सुरु झाली किंवा नाही, याची तपासणी केली. यावेळी बहुतांश कार्यालयांनी स्वच्छता मोहीम हाती घेतल्याचे दिसून आले. मात्र, सूचनांनंतरही कार्यवाही न करणाऱ्या कार्यालय प्रमुखांना त्यांनी खडसावले आणि त्यांच्यावर कार्यवाही करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या.
कार्यालयात अथवा परिसरात धुम्रपान करणाऱ्याला तसेच थुंकणाऱ्याला दंड करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
 
Top