बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर)  कायदेशीर मार्गाचा अवलंब करुनही सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या संबंधीतांकडून कोणतीही दाद न दिल्याने व आर्थिक फसवूणक करुन संगणमताने कागदपत्रांची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी दत्तात्रय भगवान चाबुकस्वार (वय ६९) हे बँकेसमोर आमरण उपोषणास बसले आहेत.     
    येथील सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँकेच्या बार्शी शाखेने देशमाने यांना सन १९९९ साली गजानन ऑईल मिल या व्यवसायासाठी तीन लाख रुपये कर्ज दिले होते. सदर कर्जास अशोक विश्वनाथ देशमाने हे जामीनदार क्र.१, दत्तात्रय भगवान चाबुकस्वार हे जामीनदार क्रमांक २ होते. सदरचे कर्जदार देशमाने यांनी वेळेत परतफेड न केल्याने कर्ज प्रकरण थकबाकीत गेले. मार्च २००४ साली बँकेने कर्जदार अरुण देशमाने यांची गजानन ऑईल मिल जागेसह इंगळे फुड कंपनी यांना विक्री केली. सदरच्या मिलची किंमत ही कर्ज रकमेच्या कित्येक पटीने जास्त होती या रकमेतून कर्ज, व्याज, दंडव्याज इत्यादी सर्व रक्कम जमा करुन रक्कम शिल्लक राहील इतक्या रकमेची प्रॉपर्टी विक्री लिलाव प्रकरणाची कसलीही कल्पना जामीनदार यांना देण्यात आली नाही. या कर्ज प्रकरणातील अशोक देशमाने जामीनदार क्र.१ यांची जागा परस्पर विक्री करण्यास संगनमताने परवानगी देण्यात आली. यानंतरही ज्यांना ऑईल मिल विकली गेली त्या इंगळे यांना बँकेने जामीनदारांच्या संमतीशिवाय मार्च २००४ सालीच बेकायदेशीरपणे ८ लाख रुपये कर्ज दिले व त्यानंतर ४ वर्षांनंतर संगणमताने पूर्वीच्या कर्जदाराचे जामीनदार दत्तात्रय चाबुकस्वार यांच्या जागेवर बोजा चढविण्यात आला व चाबुकस्वार यांची फसवणूक करण्यात आली. तसेच दत्तात्रय चाबुकस्वार हे अरुण देशमाने यांना जामीनदार होते तर मार्च २००४ साली त्यांचा मुलगा अनिल चाबुकस्वार यांना देण्यात आलेल्या कर्जासही तेच जामीनदार कसे काय घेण्यात आले. यामध्ये अर्ज दिलेल्या दिवशीच कर्जाचे प्रकरण मार्च २००४ साली कसे काय मंजूर केले व सदरच्या कर्जाची रक्कम काय केली?, ती संपूर्ण रक्कम कर्ज खात्यावर जमा करुन कशामुळे घेतली. सदरची बाब कायदेशीर नसतांना तसेच त्यांच्या कर्जाच्या व्याजाची जादा रक्कम बेकायदेशीरपणे का घेतली अशा अनेक प्रकारच्या तक्रारी चाबुकस्वार यांनी बँकेविरोधात केल्या आहेत. सदरच्या तक्रारीसाठी अनेक वर्षांपासून त्यांनी माहिती अधिकारात माहिती घेण्याचा प्रयत्नही केला आहे परंतु त्यांना अनेक वर्षे टाळाटाळ करुन त्यांची संगणमताने दिशाभूल करण्यात आली आहे. सहाय्यक निबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक यांनी चाबुकस्वार यांना मागीतलेली सर्व माहिती लेखी स्वरुपात देण्याचे आदेश देऊनही बँकेकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. तसेच बँकेकडून आठ वर्ष जुने रेकॉर्ड आम्ही ठेवत नसल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे.
 
Top