सोलापूर - पंढरपूर विकास प्राधिकरणाची, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे गतीमानतेने व चांगल्या दर्जाची करावीत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पंढरपूर विकास प्राधिकरण, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पंढरपूर विकास आराखडा व कार्तिकी यात्रा तयारीबाबत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, पंढरपूरचे प्रांताधिकारी संजय तेली आदींची प्रमुख उपस्थिती होती.
   या बैठकीत जिल्हाधिकारी म्हणाले की, कार्तिकी यात्रेत मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शौचालयाचे व स्वच्छतेचे काम झाले पाहिजे यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे. तसेच या यात्रेनिमित्त चंद्रभागेत पाणी सोडण्याबाबतही संबंधित अधिका-यांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे नगरपरिषद, पोलीस विभाग, आरोग्य विभागाने तसेच बीएसएनएल विभागाने व विविध विभागाने करावयाच्या कामकाजाबाबत सूचना देण्यात आल्या.तसेच पंढरपूर विकास प्राधिकरण, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामाची ठेकेदाराने गती वाढविली पाहिजे असे आवाहन केले. त्याचप्रमाणे कामाबाबतच्या ठेकेदाराच्या अडचणी जाणून घेवून मार्गदर्शन केले. सदरची कामे गतीमानतेने होण्यासाठी सल्लागाराने पाठपुरावा करणेसाठी पुढाकार घ्यावा अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
या बैठकीत प्रामुख्याने नवीन शौचालये बांधणे, या शौचालयासाठी जागा उपलब्धता आदीबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच शहरातील विविध मठामध्ये शासनाच्या 100 टक्के अनुदानावर शौचालये बांधावयाची आहेत. यासाठी प्रांताधिकारी व नगरपालिकेचे सर्व मठाच्या मठाधिपतींची बैठक घेवून सदरचे मठ धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणीकृत असले पाहिजेत याबाबतची माहिती देवून आवश्यक कार्यवाही पूर्ण करुन घ्यावी अशा सूचनाही डॉ. गेडाम यांनी यावेळी दिल्या.
तसेच शहरातील विविध रस्त्याच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नवीन आराखड्यात आलेल्या रस्त्याच्या कामाची गती कमी आहे. सदरची कामे गतीमानतेने व चांगल्या दर्जाची करावीत. विहित मुदतीत कामे न झाल्यास दंड आकारला जाईल असा इशाराही जिल्हाधिका-यांनी बैठकीत दिला.
 
Top