बार्शी (मल्लिकार्जून धारूरकर)  रऊळगाव (ता.बार्शी) येथील रास्त भाव धान्य दुकान क्रमांक ११० चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांनी शिधापत्रिकाधारकांची गैरसोय व बेकायदेशीर मार्गाने शिधापत्रिका वितरीत केल्याप्रकरणी दुकानाचा परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले आहेत.
    भरत शहाजी वाघमोडे, विजयकांत भोसले, दत्तात्रय भोसले, सदानंद भोसले यांनी लोकशाही दिनामध्ये दुकानदार यांनी केलेल्या गैरवर्तनाबाबत लेखी तक्रार दिली होती.   तहसिलने विविध अधिकार्‍यांमार्फत वेळोवेळी तपासणी करुन दुकानदाराकडून होत असलेल्या गैरवर्तनाची माहिती घेऊन लेखी नोंद केली. सदरच्या दुकानदाराकडून ग्राहकनोंद रजिस्टरला जादा शिधापत्रिकांची नोंद करणे, परवानगी किंवा आदेश नसतांनाही बीपीएल कार्डधारकांना केशरी शिधापत्रिका व केशरी कार्डधारकांना बीपीएल शिधापत्रिका दिल्याचे दिसून आले. अनेक शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित ठेवण्यात आले. कामाच्या वेळा, सुट्टीचे दिवस, साठाफलक, धान्याच्या किमती, लोकसंख्या, युनिटस्, वितरण प्रमाण, तक्रार फलक, नोंदवही, वजनमापे पडताळणी प्रमाणपत्र, तक्रार निवारण क्रमांक, परवाना नूतनीकरण, धान्याचे नमुने, साठ्याखाली तळवट, १ तारखेपर्यंतची धान्य आवक, १ गॅस, २ गॅसची नोंद, पहिल्या व शेवटच्या पावतीवरील सही इत्यादी अनेक त्रुटी आढळल्याचे तपासणी अहवालात म्हटले आहे. सदरच्या तक्रारीबाबत दुकानदार यांनी केलेल्या खुलाशात वारेवादळात दुकान पत्र्याचे शेड उडाल्याचे उडवाउडवीचे उत्तर देऊन यापुढे काळजी घेण्याचे सांगून कारवाई टाळण्याची विनंती केली होती. तहसिलदार आणि पुरवठा निरीक्षक यांच्या अहवालाचे अनुलोकन करुन जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण यांनी शासनाच्या अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभागाच्‍या शासन नियमातील तरतूदीचा भंग केल्याप्रकरणी विविध कार्यकारी सेवा सोसायटी स्‍वस्‍त भाव धान्य दुकानदार रऊळगाव यांचा परवाना रद्द करुन त्यांची संपूर्ण अनामत रक्कम सरकार जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
 
Top