बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : पाश्चिनात्‍य संस्‍कृती घराघरात येत आहे. त्‍याकरीता अभ्‍यासक व संशोधकांनी एकत्र आले पाहिजे. संत साहित्‍याचे अमूल्‍य विचार आपल्‍या संस्‍कृतीला महत्‍त्‍वाचे असल्‍याचे मत डॉ.यु.म. पठाण यांनी व्‍यक्‍त केले.
    डॉ. सुर्यकांत घुगरे यांच्‍या क्षितिज या काव्‍यसंग्रहाचे तसेच संतसाहित्‍य आणि बसवेश्‍वर वचनचिंतन या पुस्‍ताकंच्‍या प्रकाशन सोहळ्यानिमित्‍त प्रमुख पाहुणे म्‍हणून ते बोलत होते. यावेळी लातूर येथील साहित्यिक डॉ. राजशेखर सोलापुरे, ज्‍येष्‍ठ पत्रकार राजा माने, शिवाजी शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्‍यक्ष डॉ.बी.वाय. यादव, बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्‍या संचालिका सौ. वर्षाताई ठोंबरे, म.सा.प.चे पां.न.निपाणीकर, शब्‍बीरभाई मुलाणी, मुकूंदराज कुलकर्णी, कवि कालिदासच्‍या अध्‍यखा सौ. सुमन चंद्रशेखर आदी मान्‍यवर उपस्थित होते.
    पुढे बोलताना डॉ.यु.म.पठाण म्‍हणाले की, बाराव्‍या शतकात जे घडले, त्‍याचा वारकरी संप्रदाय व शैव संप्रदायावर प्रचंड प्रभाव पडलेला आहे. महात्‍मा बसवेश्‍वरांनी प्रखर विरोधाला तोंड देऊन ख-या अर्थाने विद्रोही साहित्‍याची पायाभरणी केली. संतांच्‍या चमत्‍काराचे आपण वेगळे अर्थ लावतो ते चुकीचे असतात, त्‍यांना वेगळे सांगायचे असते. संत व साहित्‍याकांचे जगाकडे पाहण्‍याचे दृष्‍टीकोन वेगळे असतात. बसवेश्‍वरांनी तत्‍कालीन कन्‍नड भाषेत वचने लिहिली. ज्ञानदेवांनी एकही ग्रंथ संस्‍कृतमध्‍ये लिहिला नाही. स्त्रियांना पहिल्‍यांदाच मानाचे स्‍थान देत महात्‍मा बसवेश्‍वरांनी समतेचा संदेश रूढ करीत धर्मस्‍वातंत्र्यही प्रदान केले.
    डॉ. राजशेखर सोलापूर बोलताना म्‍हणाले की, अश्रु, शाप अन् टाळ्या या साहित्यिकांना मिळत असतात. नजर टेकते, माणूस विसावतो, ते क्षितिज व क्षितिजावर असलेला सूर्य हा संधीप्रकाशातील भ्रमात दिसतो. डॉ. घुगरे यांच्‍या एकाही कवितेत निराशेचा सूर नाही. सूर्य, चंद्र, मशाल, आवाज आणि आत्‍मप्रकाश हे पाच प्रकाश असून संतसाहित्‍य हे आत्‍मप्रकाशाचे काम करते. अन्‍वयार्थ, भावार्थ व अनुभवार्थ लावण्‍याचे काम, संत साहित्‍यातील धागा जोडण्‍याचे अलौकिक काम डॉ. घुगरे यांनी केले असल्‍याचे सांगून संत साहित्‍यातून माणसाला सोन्‍यासारखी किंमत येते. तुमच्‍या आमच्‍या आयुष्‍याचे मोल गूंजेसारखे तोलले जाते, असेही त्‍यांनी यावेळी म्‍हटले.
    चि. शांभवी बेणे, सौ. विद्या घुगरे व सौ. अश्विनी बेणे यांनी गायलेल्‍या इशस्‍वतनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्‍येष्‍ठ पत्रकार राजा माने, डॉ. घुगरे, प्राचार्य शिवपुत्र धुत्‍तरगाव, डॉ. बी.वाय. यादव, दिपक दुधनगर यांनी विचार मांडले. औरंगाबाद येथील आर्किटेक्‍ट विश्‍वनाथ संगशेट्टी कळसूबाई शिखर पार केलेली चिमुकली गिर्यारोहक अनन्‍या शेटे आदींचा विशेष सत्‍कार करण्‍यात आला. प्रास्‍ताविक सुमन चंद्रशेखर यांनी केले. सूत्रसंचलन कवी मुकूंदराज कुलकर्णी यांनी तर आभार शब्‍बीरभाई मुलाणी यांनी केले.
 
Top