Sunday, 25 August 2013

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

उस्मानाबाद :-  दि. 25 ऑगस्ट 2013 रोजी राज्य महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरिक्षक स्पर्धो पुर्व परिक्षा 2013  ही  परिक्षा उस्मानाबाद येथील 7  केंद्रावर सकाळी 8.00 ते दुपारी 4 वाजेपर्येत  घेण्यात येणार आहे. या कालावधीत  या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. परिक्षा केंद्राच्या 100 मीटर  परिसरात हे आदेश लागू असल्याचे  अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड  यांनी कळविले आहे.
    या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात घोषणा देण्यास, परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानपट्टी, टायपींग सेंटर, एस.टी.डी.बुथ, ध्वनीक्षेपक, कॉम्पूटर सेंटर्स तसेच इंटरनेट कॅफे बंद राहतील. परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसारमाध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही वाहनास प्रतिबंध असेल.
      केवळ संबंधित परीक्षा केंद्रांवर नेमणूक केलेले अधिकारी/ कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी,  आणि उमेदवारांनाच परीक्षा केंद्रांवर प्रवेश असेल. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर आवारात 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. हे आदेश उपरोक्त कालावधीत   लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान कलम 188 नुसार फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Labels: