उस्मानाबाद- शेतक-यांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन  आणि बाजारपेठेची गरज लक्षात घेऊ शेती करावी. गटशेतीच्या माध्यमातून शेती करणा-यां शेतक-यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची प्रशासनाची भूमिका आहे. यातूनच उस्मानाबादचे कृषीविषयक सकारात्मक चित्र आपण तयार करु शकू, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केला. तसेच अडचणीच्या काळात संकटाला न घाबरता त्याचा मुकाबला करा, प्रशासन तुमच्या पाठिशी आहे, असा दिलासाही त्यांनी दिला. याशिवाय, जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांकडून सामाजिक दायीत्वासाठी (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) मिळणारा निधी हा टंचाई निर्मूलन कार्यक्रमासाठी वापरण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
    वाशी येथे कृषी व पणन विभागाच्या वतीने आणि आत्मा अंतर्गत शेतकरी गट प्रमुखांचे प्रशिक्षण आणि सध्याच्या टंचाई परिस्थितीत शेतकऱ्यांमध्ये उमेद जागविणे असा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी उपस्थितांना मार्गर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माचे प्रकल्प संचालक विजय लोखंडे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता डॉ. अरुण गुट्टे, तुळजापूर कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. विलास टाकणखार, उपविभागीय कृषी अधिकारी, भूम आर.टी. जाधव, तहसीलदार रामहरी गोरे, शेडनेट व पॉलीहाउसमधील प्रगत शेती तंत्रज्ञानाची माहिती देणारे शेतकरी मंगेश पाटील, आत्माचे प्रकल्प उपसंचालक सुभाष चोले, तालुका कृषी अधिकारी गोपाळ शेरखाने आदींची यावेळी उपस्थिती होती.
    यावेळी डॉ. नारनवरे यांनी उपस्थित शेतकरी गटांच्या प्रमुखांशी मनमोकळा संवाद साधला.  वातावरणातील हवामानबदल, त्याचा स्थानिक पर्यावरणवर होणारा परिणाम, पारंपरिक शेती, अनुदानावर आधारित वेळापत्रक, शेती योजनांच्या अंमलबजावणीबाबतची स्थिती आदींबाबत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.  अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील पीक परिस्थिती आणि शेतकरी अडचणीत आल्याची परिस्थिती असली तरी त्यांच्या पाठिशी प्रशासन ठामपणे उभे आहे.
जिल्ह्यात एकात्मिक कृषी विकासासाठी केले जात आहेत. आत्माच्या माध्यमातून शेतकरी गटांची बांधणी करुन त्या गटासाठी आवश्यक योजना दिल्या जात आहेत. कृषी विभागाच्या योजना पुष्कळ आहेत, मात्र त्याचा त्या-त्या गटासाठी व्यवहार्य वापर आणि उपयोग करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या संकल्पनांची, अनुभवाची देवाणघेवाण करावी, यासाठी अधिकाधिक प्रमाणात असे कार्यक्रम आत्माच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतील, असे डॉ. नारनवरे यांनी नमूद केले.
शेतीगटाची स्थापना, त्यांचे बॅंकेशी लिंकेज, कृषी योजनांचा त्यांना लाभ देणे अशा माध्यमातून आता काम केले जात आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात प्रयोगशील आणि व्यवहार्यता लक्षात घेऊन तरुण शेतीकडे येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. जिल्ह्यातील सारोळा, पाडोळी, अपशिंगा, कामठा, तामलवाडी यासह अनेक गावात सध्या तरुणांनी गटशेतीच्या माध्यमातून विकास साधला आहे. त्याचपद्धतीने बाजारपेठेची गरज ओळखून शेती करणे आवश्यक बनल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यात पाणी हेच भांडवल आहे. त्यामुळे कमीत कमी पाण्यात  शेती करणे, हे प्राधान्य असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.  याशिवाय, एकात्मिक पाणलोट विकास अभियानांतर्गत अधिकाधिक जलसंधारणाची कामे हाती घेतली पाहिजे आणि गावविकासासाठीच्या कोणत्याही योजनेत सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, असे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी नमूद केले.
जिल्ह्यात विविध औद्योगिक आस्थापना आहेत. अशा आस्थापनांना त्यांच्या भांडवलापैकी काही निधी हा सामाजिक दायीत्वासाठी वापरावा लागतो. या सामाजिक दायीत्व निधीचा वापर कायमस्वरुपी टंचाई निर्मूलन कामासाठी करणार असल्याचे डॉ. नारनवरे यांनी नमूद केले.  खऱ्या अर्थाने कमीत कमी पाण्यात बारमाही शाश्वत शेती करता येईल का, याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या हस्ते वाशी तालुक्यातील शेतकरी गट प्रमुखांना प्रातिनिधीक स्वरुपात गटशेती स्थापण प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच तालुक्यातील कोणताही शेतकरी आत्महत्‌या करणार नाही, कुणाला आम्ही आत्महत्या करु देणार नाही, अशी शपथ यावेळी शेतकरी गटप्रमुखांनी घेतली. 
यावेळी या शेतकरी गटप्रमुखांना मार्गदर्शन करताना जिल्हा अधीक्षक श्री. तोटावार यांनी, सध्या गटशेतीला केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात उत्तेजन दिले जात असल्याचे आवर्जून सांगितले. पॉलीहाऊस, शेडनेट, ठिबक सिंचनच्या माध्यमातून नवीन चांगले प्रयोग जिल्ह्यातील शेतकरी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, आत्मा अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या भागातील शेती पाहण्यासाठी आणि त्यांनी त्याप्रकारे जिल्ह्यातही शेती करावी, यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे श्री. तोटावार यांनी नमूद केले.
जलयुक्त शिवाय अभियानांतर्गत आता प्रत्येक गावाने त्यांच्या भागातील वाहून जाणारे पाणी गावातच अडवावे, अशी संकल्पना पुढे आली आहे. शेतकऱ्यांनी याबाबत पुढाकार घेतला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री. चोले यांनी यावेळी गटशेतीचे फायदे समजावून सांगितले. एकट्याने शेती करताना येणाऱ्या अडचणी शेती गट स्थापन करुन केल्यास कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले.  गटाच्या माध्यमातून शेती केल्यास ती परवडणारी होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
औरंगाबाद येथील श्री. पाटील यांनी पॉलीहाऊस आणि शेडनेटमधील शेती तसेच तंत्रज्ञानाचा योग्य वापर यावर मार्गदर्शन केले.  बिगर हंगामी उत्पादन आणि बाजारपेठेची गरज या गोष्टी लक्षात घेऊन शेती करायला हवी, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
श्री. टाकणखार यांनी  जमिनीचे आरोग्य आणि सुपीकता या विषयावर तर डॉ. गुट्टे यांनी टंचाई परिस्थितीत रब्बी पिकांची उपयुक्त तंत्रज्ञान आदींबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तालुका कृषी अधिकारी शेरखाने यांनी केले.
 
Top