उस्मानाबाद - जिल्हा मध्यवर्ती बॅंकेस आर्थिक स्थिरता येण्यासाठी बडे थकबाकीदार आणि साखर कारखाने यांच्याकडील कर्जाची वसुली करावी तसेच संचालकांनी स्वताच्या ठेवी बॅंकेमध्ये ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बॅंकेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर पीक विमा तसेच विविध अनुदानापोटी जिल्हा प्रशासनाकडून येणारा निधी संबंधीत लाभार्थ्यांनाच मिळाला पाहिजे, अशी स्पष्ट सूचना त्यांनी केली.
जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, संचालक भारत डोलारे, शिवाजीराव भोईटे, सुग्रीव कोकाटे, बॅंकेचे मुख्याधिकारी श्री. चांडक आदींबरोबर बॅंकेच्या स्थितीबाबत चर्चा केली. यावेळी जिल्हा उपनिबंधक (सहकार) एस.पी बडे यांचीही उपस्थिती होती. 
बॅंकेची सद्यस्थिती, आर्थिक अडचण, वसुलीचे प्रमाण, निधी उपलब्धता आदींची माहिती डॉ. नारनवरे यांनी यावेळी घेतली. बॅंकेबाबत विश्वास वाटावयाचा असेल तर प्रथम संचालकांनी त्यांच्या ठेवी बॅंकेत ठेवाव्यात, जेणेकरुन सामान्य ठेवीदारांना विश्वास वाटेल. जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्याचबरोबर मोठे थकबाकीदार आहेत, त्यांच्याकडून वसुली करावी, शिक्षकांचे पगार पूर्ववत जिल्हा बॅंकेकडून व्हावेत यासाठी शिक्षक संघटनांशी चर्चा करुन त्यांना विश्वास द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.
जिल्ह्यातील शेतकऱयांची पीकविम्याची अनुदानाची 157 कोटी रुपये बॅकेत जमा होईल. ते संबंधीत लाभार्थ्यांनाच त्यांच्या खात्यावर तात्काळ दिले जावेत, याप्रकरणी कोणतीही अनियमितता चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. याशिवाय जिल्हा परिषदेचे 59 कोटी देणे तात्काळ देण्यासाठी वसुली वाढवावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाची असणारी ही बॅंक आर्थिकृष्ट्या स्थिर होण्यासाठी आर्थिक शिस्तीची गरज आहे. त्यादृष्टीनेच पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 


 
Top