काटी परिसरातील रुग्णांचा देवदूत डॉ. युसुफ मुजावर यांचे निधन - Tuljapurlive.com

Tuljapurlive.com

तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, 2 September 2022

काटी परिसरातील रुग्णांचा देवदूत डॉ. युसुफ मुजावर यांचे निधन


काटी परिसरातील रुग्णांचा देवदूत डॉ. युसुफ मुजावर यांचे निधन
अर्ध्यावरती डाव मोडला.... हॉस्पिटलच्या स्वप्नांची अधुरीच राहिली कहाणी!

उमाजी गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील काटीसह परिसरात मागील तीस वर्षांपासून  अविरत वैद्यकीय सेवा देणारे या भागातील प्रसिद्ध डॉ. युसुफ मुजावर यांचे गुरुवार दि.1 रोजी पहाटे दिड वाजता  उपचारा दरम्यान  निधन झाले.त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी  केलेला जीवनातील संघर्ष पाहून आणि त्यांच्या निधनाची बातमी काटीसह परिसरातील नागरिकांसाठी जीवाला चटका लावणारी आहे. 
        

सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या अक्कलकोट तालुक्यातील पान मंगरुळ येथील रहिवासी असलेले कै. युसूफ मुजावर यांचे लग्न काटीतील वतनदार घरातील मतीन काझी यांची कन्या नाझनीन यांच्याशी झाला. लग्नानंतर काही दिवसांनी ते काटी येथे स्थायिक झाले. बंद असलेल्या अंगणवाडीच्या जागेत त्यांनी आपले छोटेसे क्लिनिक सुरु केले. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाने काटी परिसराला आपलेसे करुन घेतले. गरीबीची जाण असल्याने त्यांनी पेशंटकडे कधीही जादा पैशांची मागणी केली नाही. रुग्ण जेवढे पैसे देईल तेवढेच पैसे घ्यायचे असा त्यांचा स्वभाव होता. छोटे खानी क्लिनिक पाहून त्यांना नेहमी वाटायचे की, आपलेही या ठिकाणी मोठे हॉस्पिटल असावे. त्या दृष्टीकोनातून जिद्दीने आपल्या संसाराचा गाडा ओढून  आपल्या मुलांना डॉ.अनिस मुजावर व  डॉ.आसिफ मुजावर हे दोघेजण  बी.एच.एम.एस,डॉ.अरशद मुजावर व मुलगी डॉ.सिमरन मुजावर हे दोघेजण बी.ए.एम.एस. झाले असून या चारही भावंडाना वैद्यकीय शिक्षण देऊन योग्य संस्कारासह चांगले शिक्षण देऊन  डॉक्टर बनवले. मुलांनीही आई वडिलांच्या कष्टाचे चिज करीत वैद्यकीय शिक्षण पुर्ण केले. 

विशेष म्हणजे त्यांच्या दोन सुनाही डॉक्टर आहेत. हे त्यांच्या आयुष्यात चांगले घडत असताना कोणाची तर दृष्ट लागावी अशी घटना त्यांच्या आयुष्यात घडली. आर्थिक परिस्थितीवर मात करीत मुलांचे भविष्य घडवित असताना अर्ध्यावर साथ सोडून पत्नी नाझनीन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तीन वर्षांपूर्वी निधन झाले. पत्नीच्या अकाली जाण्याने ते पुरते हतबल झाले होते. मुलांना चांगल्या संस्कारासह चांगले शिक्षण दिले. परंतु मुलांचे यश पहाण्यासाठी संसाराचा गाडा हाकणारी अर्धांगिनी समजली जाणारी पत्नी नाझनीन नाही हे शल्य त्यांना नेहमी सतावत होते. मुलांना घडविण्यात माझ्या पत्नीचा सिंहांचा वाटा आहे हे सांगायला ते कधीही विसरले नाहीत.



एकीकडे आर्थिक परिस्थितीवर मात करीत मुलांचे भविष्य घडविण्याचे समाधान तर दुसरीकडे संसाराचा गाडा अर्ध्यावरच सोडून पत्नी गेल्याचे दुःख त्यांच्या मनात कायम घर करून होते. पत्नीच्या निधनामुळे अर्ध्यावरती डाव मोडला...असे त्यांना नेहमी वाटायचे.परंतु मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल म्हणून चेहऱ्यावर पुसटशीही छटा न येवू देता पत्नीच्या निधनानंतर आई व वडिलांची भूमिका निभावत कुटूंबाची जबाबदारी योग्यरित्या पार पाडत असताना व गावात आपले स्वत:चे एक हॉस्पिटल व्हावे ही इच्छा मनाशी बाळगून त्यांची वाटचाल सुरु असताना आणखी एकदा कोणाची तरी दृष्ट  लागावी अशी घटना त्यांच्या आयुष्यात घडली.त्यांना वर्षभरापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला. त्यांचेवर बायपास सर्जरी करण्यात आली. ते आता मात्र पुरते खचून गेले होते. प्रकृती उपचाराला साथ देत नव्हती. चारही भावंडे वडिलांच्या उपचारासाठी कमी पडत नव्हते. परंतु गुरुवार दि. 1 रोजी पहाटे दिड वाजता सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी चार वाजता येथील बसस्थानक शेजारील मुस्लिम कब्रस्तानात  शोकाकुल वातावरणात विधीवत दफनविधी करण्यात आला. यावेळी काटीसह पंचक्रोशीतील नागरिक त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. यावेळी प्रत्येकजण हळहळ व्यक्त करीत होता.अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. एकीकडे हॉस्पिटलचे बांधकाम प्रगतीपथावर असताना व मुलांचे आयुष्य घडविण्यासह आपली कुटूंबासह असलेली जबाबदारी योग्यरित्या पेलणारा हा बाप समाजासमोर एक वेगळा आदर्श होते. त्यांच्या मृत्यूने अर्ध्यावरती डाव मोडला....अधुरी राहिली हॉस्पिटलची कहाणी! असेच म्हणावे लागेल.


सर्वसामान्य ग्रामीण भागात डॉक्टरांना देवदूत मानले जाते. त्याच प्रमाणे काटी येथील कै. युसूफ मुजावर यांच्या जाण्याने काटीसह परिसरात फार मोठी पोकळी निर्माण झाली असून ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून निस्वार्थीपणे ग्रामीण भागात त्यांनी  केलेली योग्य वैद्यकीय रुग्णसेवा कायम स्मरणात राहील.
                अहमद पठाण
               ग्रामस्थ काटी
----------------------------------
डॉ . युसूफ याच्यां रुपाने 'देवमाणूस ' हरपला . 
 काटीतील माझे मित्र डॉ.युसूफ मुजावर याचें माझ्या कुटुंबाशी मागील पंचवीस वर्षांपासून घनिष्ठ संबंध होते. गुरुवारी सकाळी त्यांचे आकस्मिक निधन झाल्याची बातमी मनला धक्का देणारी होती. त्यांनी संबंध आयुष्यभर पैशाचा विचार न करता अविरत ,अखंडपणे रुग्णसेवा केली.ग्रामीण भागात त्यांनी रात्री-अपरात्री तत्परतेने रुग्णसेवा केली. त्यांच्या जाण्याने निश्चितच वैद्यकीय सेवेची उणीव भासणार आहे.
              जयाजी देशमुख
               ग्रामस्थ काटी

डॉ. युसुफ मुजावर यांच्या जाण्यामुळे गावात तात्काळ व योग्य उपचार करणारे डॉक्टर गेल्याने अती दु:ख झाले त्यांनी केलेली वैद्यकीय सेवा लोक कधीही विसरू शकणार नाहीत.
              सौ. नंदा श्रीहरी ढगे
               काटी,ता.तुळजापूर

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages