सांगोला :- सांगोला तालुक्यातील भीषण दुष्काळाची जाणीव प्रसारमाध्यमांकडून झाल्याने पुण्याच्या मैत्रियी महिला सांस्कृतिक मंचच्या पदाधिकार्‍यांनी सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे पाण्याचे टँकर व दोन ट्रक कडबा उपलब्ध करुन देवून माणूसकीचे दर्शन घडविले.
       सहकारनगर पुणे येथील नगरसेवक तथा महानगरपालिकेचे सभागृह नेते सुभाष जगताप यांनी तसेच मैत्रियी महिला सांस्कृतिक मंचच्या पदाधिकार्‍यांनी रविवारी वाटंबरे येथे येवून दोन महिने पाण्याचा टँकर तसेच दोन ट्रक कडबा देवून दुष्काळग्रस्तांना थोडाफार दिलासा दिला. मैत्रियी मंचच्या अध्यक्षा ऍड. शालिनी डबीर, धनश्री पुराणिक, रोहिणी महाजन, सुनिता वेदपाठक, माधवी कवठेकर, मंजूताई धूत, कमल नांगरे, मंगल एखंडे, राजश्री सातपुते आदी महिलांनी नगरसेवक सुभाष जगताप यांच्यासह वाटंबरे येथील राजे शिवाजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था संचलित जनावरांच्या छावणीला भेट दिली. रविवारी भर उन्हात त्यांनी दुष्काळग्रस्तांचे दु:ख वाटून घेतले. यावेळी बोलताना रोहिणी महाजन व शालिनी डबीर यांनी सांगितले की, महिला दिनाचा कार्यक्रम रद्द करुन त्यानिमित्त वाचलेल्या रक्कमेतून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय आम्ही महिलांनी घेतला व त्याची पूर्तता आज त्यानिमित्ताने होत आहे. आम्ही आणलेली ही मदत तुटपूंजी असली तरी कुठे तरी सामाजिक भावनेतून ही मदत केल्याचा आनंदही आम्हाला आज होत आहे. तुम्हा दुष्काळग्रस्तांचे जीवन आणि आम्हा शहरी माणसांचे जीवन यात खूप मोठा फरक आहे. आमच्याकडे नळाला चार-चार तास पाणी येते आणि तुमच्याकडे एका घागरीसाठी टँकरची वाट पहावी लागते. टँकर आले तरच पाणी मिळते ही गोष्टच मनाला चटका लावणारी आहे. यावेळी बोलताना नगरसेवक सुभाष जगताप म्हणाले, दुष्काळाने सांगोला तालुक्यातील जनता होरपळून निघत आहे. पडणार्‍या पावसाच्या पाण्याचे नियोजन परदेशाप्रमाणे केल्यासच दुष्काळ हटण्यास मदत होणार आहे. कमी पाण्यावरही चांगले पीक घेवून दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी प्रगती करीत आहेत परंतु गेल्या कांही वर्षात पाऊसच न पडल्याने शेतकर्‍यांचेही हाल होत आहेत. हे हाल थोड्या प्रमाणात का होईना कमी करण्यासाठी आम्ही दोन महिने पाण्यासाठी टँकर देत आहोत. यावेळी ज्येष्ठ नेते बाबूराव गायकवाड, तानाजीकाका पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ (बंडू) पवार यांनी केले. सुत्रसंचालन मनोज उकळे सर यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंदा माने, माजी नगरसेवक सोमनाथ लोखंडे, साखर कारखान्याचे संचालक चेतनसिंह केदार, महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सखुबाई वाघमारे, छावणीचे संचालक विजय पवार, पं.स.सदस्य बिरा गेजगे आदींसह शेतकरी व महिला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर नगरसेवक जगताप यांनी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांची भेट घेवून दुष्काळासंदर्भात चर्चा केली.
 
Top