बार्शी  (मल्लिकार्जुन धारुरकर) आजपर्यंत राज्यातील अनेक संस्थांनी त्यांच्या कार्यातून सांस्कृतिक वारसा जपला आणि संस्कृती टिकविण्याचा प्रयत्न करत समाजाला चांगले विचार दिले. सांस्कृतिक कार्यात नाट्यक्षेत्राचा विचार करता पुणे, बारामती पाठोपाठ उत्कृष्ठ नाट्यगृह, चांगली सेवा देणारे सांस्कृतिक सभागृह म्हणून बार्शीतील स्व.यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहाचा नावलौकीक झाला. पूर्वीच्या ऐतिहासिक भाजीमंडईची इमारत पाडून त्याजागी या सभागृहाची इमारत उभी करण्यात आली होती. या इमारतीची उभारणी करतांना नाट्यगृहाला आवश्यक असलेल्या तांत्रीक तसेच तार्कीकदृष्ट्या सुखसोयींचा अथवा त्रुटींची विचार आवश्यकतेप्रमाणे न केल्याने या सभागृहात प्रेक्षकांना ध्वनींची स्पष्टता ऐकू येत नसल्याच्या तक्रारी वाढल्या. मोठा खर्च करुन बनविण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे बरेचसे काम अर्धवट राहिले असतांना स्वत:चे नाव उद्घाटनाच्या फरशीवर येण्यासाठी आटापिटा करुन त्याचे उद्घाटन आटोपण्याचा प्रकार तत्कालिन राजकिय पुढार्‍यांनी केले. त्यानंतर तांत्रीकदृष्ट्या अर्धवट सभागृहाकडे नाट्य कलाकार आणि आयोजकांनी दुर्लक्ष केले. रिकामे पडलेल्या सभागृहातून उत्पन्नासाठी पालिकेने तात्पुरते सेल, विविध प्रकारचे विक्रेते यांना भाडेतत्वावर हे सभागृह उपलब्ध करुन दिले परंतु यातून सांस्कृतिक सभागृहाचा मुख्य उद्देश हा दूरच राहिला. पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर प्राधान्याने लाखो रुपये खर्चून सांस्कृतिक सभागृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. पुणे, बारामतीच्या बरोबरीने चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न करुन या सभागृहाचे काम पूर्ण करण्यात आले. तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सभागृहाचे लोकार्पण केले. या नाट्यगृहाची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती नगरपरिषदेला शक्य होणार नसल्याने खाजगी ठेकेदारामार्फत ही सेवा देण्याचे काम पालिकेने केले. सदरच्या ठेका देण्यावेळी पालिकेने नफा नुकसानीचा विचार करण्याऐवजी केवळ सांस्कृतिक वारसा जपणे, कलाकारांना चांगल्या सुविधा मिळवून देणे हा विचार केला आणि खाजगी ठेकेदाराला सभागृह चालविण्यास दिले. वेळोवेळी राज्यभरातून आलेल्या नाट्य कलाकारांनी बार्शीच्या सांस्कृतिक सभागृहातून मिळणार्‍या सुविधांचे तोंडभरुन कौतुक केले. परंतु बार्शी नगरपरिषदेच्या राजकिय कुरघोड्यातून खाजगी ठेकेदाराला मोठा नफा मिळतो आणि पालिकेला आर्थिक उत्पन्न मिळत नाही, खाजगी ठेकेदाराला अल्प दरात कसे काय मिळवून दिले, याची जाहीरात इतर ठिकाणच्या वृत्तपत्रात दिली, दाखविण्यात आलेला ठेकेदार आणि चालविणारे कोण?, ठेकेदारामार्फत वापरकर्त्यांना आकारणी करण्यात येणारी रक्कम आणि त्याच्याकडून मिळणारी रक्कम, इतर पूरक व्यवसायाची मुभा कशी मिळाली? त्रिसदस्यीय समितीमार्फत भाडेमूल्य का ठरविले नाही अशा प्रकारच्या तक्रारी झाल्यानंतर खाजगी ठेकेदाराला मुदतवाढ मिळाली नाही. पालिकेने त्रिसदस्यीय समितीने नेमलेल्या भाडेमुल्याप्रमाणे निवीदा प्रसिध्द केली परंतु तक्रारी करणारांकडून कोणताही ठेकेदार पालिकेला उपलब्ध झाला नाही. खाजगी ठेकेदारानंतर पालिकेने स्वत:च त्याची देखभाल दुरुस्ती करुन भाडेतत्वावर देण्यास सुरुवात केली परंतु त्यांना नियमित भाडे मिळत नसल्याने सद्यस्थितीत पुन्हा सेल हॉलचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यामुळे बार्शी नगरपरिषदेकडून मूळ तत्वालाच तिलांजली मिळाल्याचे दिसून येत आहे.

 
Top