उस्मानाबाद,- टंचाईमुक्त राज्याचा संकल्प करुन सुरु करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाने उस्मानाबाद जिल्ह्याने चांगलाच वेग घेतला आहे. जिल्हा प्रशासनातील विविध यंत्रणांसह आता वाढू लागलेला लोकसहभाग हेही त्याचे मुख्य कारण आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या या अभियानात उस्मानाबाद जिल्हा अग्रेसर असून त्याची दखल मंत्रालयानेही घेतली आहे. राज्याच्या मुख्य सचिव स्वाधीय क्षत्रिय यांनीही जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना पत्र पाठवून जिल्ह्यात सुरु असलेल्या या अभियानाचे विशेष कौतुक केले आहे. 
जिल्ह्यात सध्या या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 3 हजार 512 कामे सुरु आहेत.  एकूण 217 गावात हे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी प्रथमपासूनच उस्मानाबाद जिल्ह्यातील दरवर्षी येणारी पाणीटंचाई पाहता या अभियानाला सर्वौच्च प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच या अभियानातील सहभागी यंत्रणांची वारंवार बैठक घेऊन कामांचा आढावा घेणे, प्रत्यक्ष कामांना भेटी, तेथील कामांचा दर्जा तपासणे, गाव आराखडा, तालुका आराखडा तयार करताना अगदी बारीक सारीक तपशीलासह चर्चा करणे यामुळे या अभियानातील कामांची अंमलबजावणी करतानाच ते निर्दोष आणि वेळेत होईल, यादृष्टीने जिल्ह्यातील यंत्रणांनी लक्ष देणे सुरु केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आणि या यंत्रणांच्या कामांच्या गतीमुळे या अभियानाची दखल मंत्रालय पातळीवर घेण्यात आली आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाने पत्र पाठवून जलयुक्त शिवार अभियानातील जिल्ह्याच्या कामगिरीचे कौतुक केले होते. आता खुद्द मुख्य सचिव श्री. क्षत्रिय यांनीच जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्ह्याच्या कामगिरीचे कौतुक केल्याने यापुढील काळात हे अभियान अधिक गती घेईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला आहे. त्यामुळेच अधिक लोकसहभाग वाढावा आणि लोकसहभागातून अधिकाधिक कामे व्हावीत, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, युवा मंडळांचे कार्यकर्ते यांनी आपापल्या गावात या अभियानाला गती द्यावी, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. 
विविध यंत्रणांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कामांना सुरुवात केली आहे. कृषी, पाटबंधारे, जिल्हा परिषद लघु पाटंबधारे, लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर), भूजल सर्वेक्षण, वन विभाग, सामाजिक वनीकरण अशा विविध यंत्रणांनी या अभियानांतर्गत कामे सुरु केली आहेत. ही कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी यापूर्वीच निर्देश दिले आहेत. त्याशिवाय, विविध  कामांना अचानक भेटी देऊन त्या कामांची तपासणी केल्यामुळे विविध यंत्रणांना काम करताना त्या कामाचा दर्जा राखणे अपरिहार्य झाले आहे. त्याचा फायदा या अभियानाला होत आहे. 
जिल्ह्यात या अभियानांतर्गत सध्या गाळ काढणे, कंपार्टमेट बंडिंग, अर्दन स्ट्रक्चर, लूज बोल्डर स्ट्रक्चर, शेततळे, पाझर तलाव दुरुस्ती, माती नाला बांध व त्याची दुरुस्ती, सिमेंट नाला बांध व त्याची दुरुस्ती, वृक्ष लागवड, विहीर- विंधन विहिर पुनर्भरण, नाला खोलीकरण व सरळीकरण, रोपवाटिका कामे, खोल सलग समतल चर, पाझर तलाव, ढाळीचे बांध, सिंचन विहिर, सीसीटी, पुनर्भरण चर, बांध बंधिस्ती, रिचार्ज शाफ्ट, ठिबक तुषार अशी विविध कामे या 217 गावांत सुरु करण्यात आली आहेत. अधिकाधिक लोकसहभाग वाढला तर ही कामे 10 हजारांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. विविध यंत्रणांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे अभियानाचा वाढलेला वेग टिकविण्याची जबाबदारी आता लोकसहभागावर अवलंबून आहे. त्यामुळेच टंचाईमुक्त जिल्ह्यासाठी या कामांमध्ये सतत वाढणारा लोकसहभाग आशादायी चित्र निर्माण करणारा ठरला आहे. त्याचीच दखल घेत मंत्रालय पातळीवर राज्य शासनाच्या प्रशासनातील सर्वौच्च अधिकाऱ्याने जिल्ह्यातील अभियानाचे कौतुक केले आहे. 

 
Top