उस्मानाबाद - आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांच्या वारसांना 100 टक्के अनुदानावर कडबा कुट्टी देण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि पदाधिकारी यांनी अभ्यास सहलीसाठी असलेल्या निधीचा खर्च टाळून हा निधी शेतकऱ्यांसाठी देऊन एक चांगला पायंडा पाडून आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले.

     तुळजापूर येथील पंचायत समितीच्या प्रांगणात पशुसंवर्धन व बांधकाम विभाग, जिल्हा परीषद,उस्मानाबादच्या संयुक्त विदयमाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना 100 टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्राचे वाटप व तुळजापूर येथील जिल्हा परीषदेतर्फे बांधण्यात आलेल्या विश्रामगृह वास्तूचे उदघाटन तसेच तुळजापूर तालुक्यातील आयएसओ प्रमाणपत्र मिळविणाऱ्या 11 ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. 
जिल्हा परीषदेचे अध्यक्ष . कुलदिप (धीरज) पाटील, आमदार मधुकरराव चव्हाण, जि.प. उपाध्यक्ष सुधाकर गुंड, कृषी व पशुसवंर्धन सभापती बाबुराव राठोड, अर्थ व बांधकाम सभापती दत्तात्रय मोहिते, महिला व बाल कल्याण सभापती श्रीमती लता पवार, तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश चव्हाण, जि.चे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. उबाळे, सुनिल चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे, जि.प.चे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उमरगा पं. स. सभापती श्रीमती अक्षराबाई सोनवणे आदि उपस्थित होते.
जिल्ह्यात गेल्या चार वर्षापासून अपुरा पर्जन्यमान, नापीकी आणि गारपीट अशा अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला. शेतकऱ्यांत नैराष्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब उघडयावर पडले. त्यांच्या कुटुंबाना मदत व सहाय्यासाठी जिल्हा परीषदेने धाडसी निर्णय घेवून आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या वारसांना मदतीचा हात दिल्याबदल मान्यवरांनी यावेळी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे कौतुक केले. आत्महत्या केलेल्या ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांकडे जनावरे आहेत त्यांना कडबा कुटटीचा लाभ होईल, परंतु ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे नाहीत, अशांना पशुसंवर्धन विभागाने दुभती जनावरे, शेळया मेंढया पुरवठा केल्यास त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, त्यादृष्टीनेही प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. 
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲड. पाटील म्हणाले की, सात लाख रुपये खर्च करुन खरेदी करुन कडबाकुट्टी यंत्रे खरेदी करुन ती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना 100 टक्के अनुदानावर देण्यात येत आहे. तसेच तुळजापूर येथील जिल्हा परीषदेतर्फे 67 लाख 42 हजार 990 रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या विश्रामगृह वास्तू उभारण्यात आली असून तुळजापूर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कार्य करुन आय एस ओ प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. जिल्हा परिषदेच्या दृष्टीने ही कौतुकाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. 
यावेळी आमदार श्री. चव्हाण म्हणाले की गावचा, तालुक्याचा व जिल्ह्याच्या विकास प्रक्रीयेमध्ये लोकप्रतिनीधीचा सहभाग आवश्यक आहे. ग्रामपंचायत कामात प्रशासकीय गतीमान आणण्यासाठी इतर ग्रामपंचायतीनी 11 ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा. पेयजल योजनेची अंमलबजावणी करावी. गाव हागणदारीमुक्त करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पशुसंवर्धन विभागातर्फे संकलित माहितीपत्रिकेचे व दिनदर्शिकेचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात झाले.
यावेळी तुळजापूर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीने आय.एस.ओ. हे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळवल्याबद्दल वाणेगाव येथील सावित्रीबाई देवकर, पी. एस. भोसले, देवसिंगा नळ येथील मल्काबी राज पठाण, एम. एम. तांबोळी, अलीयाबाद येथील ज्योती प्रकाश चव्हाण, डी. बी, मुसने, वडगाव (दे.) येथील अनिता गणपत पाटील, जी. पी, करदोरे, वडगाव लाख येथील वनीता करंडे, पी. जे. देडे, किलज येथील राजेंद्र राठोड, व्ही .एस. कांबळे, आरळी बु. येथील चंद्रहार नारायणकर, एस. बी, इंगळे, तामलवाडी येथील ज्ञानोबा राऊत, एस. ए. कोटे, देवकुरळी येथील भगीरथी कांबळे, व्ही. एस. ताटे, खुदावाडी येथील रेवणसिध्द स्वामी, एस. आर. घोगरे, आणि सावरगाव येथील प्रभावती मारडकर, एस. एल. माशाळकर यांचा सत्कार करण्यात आला.
तुळजापूर तालुक्यात सिंदफळ येथील रामचंद्र माके, वडगाव येथील उमेश पवार, कसई येथील मधुकर पाटील, वानेगाव येथील दत्तात्रय बचाटे, पिंपळा खु. येथील लखन नाना कदम यांना मान्यवरांच्या हस्ते कडबा कुट्टी यंत्राचे वाटप करण्यात आले.
श्री. गुंड गुरुजी म्हणाले की, तुळजापूर येथे जिल्हा परिषदेने लोकप्रतिनिधी व भाविकांसाठी विश्रामगृहामुळे राहण्याची सोय झाली असून उत्पन्न वाढीसाठी जि.प. ने मोकळया जागेवर दुकाने शॉपींग कॉम्पलेक्स बांधून उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उबाळे यांनी शासकीय योजना लोकाभिमुख करण्यासाठी सर्वांनी योगदान दयावे. तुळजापूर येथे बांधण्यात आलेल्या विश्रामगृह ना नफा ना तोटा या तत्वावर देण्यात येणार असल्याचे सांगितले.
डॉ. व्हटटे म्हणाले की ,जिल्हा परिषदेने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना दिलासा देताना सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे आवर्जून नमूद केले. कृषी व पशुवंवर्धन सभापती बाबुराव राठोड यांचे समयोचित भाषण झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक रमाकांत गायकवाड यांनी केले तर आभार उपअभियंता ओ. के. सय्यद यांनी केले.
 
Top