मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात की, एक विचार संपविण्याचा झालेला हा प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा असून तो सहन केला जाणार नाही. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवून अनिष्ट चालीरिती बंद करणे, हा एक मोठा सामाजिक लढा आहे आणि या लढाईत आपण तेव्हाच जिंकू, जेव्हा या मोहिमेला कायद्याचे अधिष्ठान लाभेल, असे डॉ.दाभोळकरांनी अतिशय कणखरपणे वारंवार मांडले. जादूटोणा आणि अनिष्ट चालीरिती विरोधी कायद्याचा मसुदा तयार करण्यात त्यांनी जे परिश्रम घेतले, त्याबद्दल निश्चितच त्यांच्या विषयी कृतज्ञतेची भावना आहे आणि पुढेही राहील.
हा कायदा प्रत्यक्षात अंमलात यावा म्हणून डॉ.दाभोळकर यांच्याशी माझी, त्याचप्रमाणे माझ्या सहकाऱ्यांशी अनेकदा चर्चा झाली. या कायद्याची आवश्यकता आणि परिणामकारकता यावर ते अतिशय मुद्देसुद आणि अभ्यासपूर्वक विवेचन करीत. प्रत्येक चर्चेच्या वेळी या मसुद्यामध्ये वेळोवेळी आवश्यक त्या सुधारणा होत होत्या. या कायद्याच्या अनुषंगाने समाजातील विविध पक्ष, संघटना, लोक यांच्याशी शासनाची सातत्याने चर्चा सुरु होती. ही सगळी प्रक्रिया सुरु असतांनाच डॉ.दाभोळकर यांच्यासारखा या कायद्याचा प्रणेता अचानक आमच्यातून निघून गेला हे अतिशय दु:खदायक आहे. डॉ.दाभोळकर यांच्या निर्घृण हत्येच्या मागे कोण आहेत त्यांचा पुरेपुर छडा लावण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आहेत, असे श्री.चव्हाण यांनी म्हटले आहे.