Thursday, 31 October 2013

शिक्षक संघाचे नूतन जिल्‍हाध्‍यक्ष पडवळ यांचा सत्‍कार

कळंब (बालाजी जाधव) : महाराष्‍ट्र राज्‍य प्राथमिक शिक्षक संघाचे नूतन जिल्‍हाध्‍यक्ष एल.बी. पडवळ, जिल्‍हा पतसंस्‍थेच्‍या नूतन चेअरमन कस्‍तुरी कराड यांचा कळंब तालुका शाखेच्‍यावतीने शिक्षक भवन येथे जाहीर सत्‍कार करण्‍यात आला.
    महाराष्‍ट्र राज्‍य प्राथमिक शिक्षक संघाचे माजी जिल्‍हाध्‍यक्ष बालाजी तांबारे यांच्‍या कार्याची दखल घेऊन त्‍यांची महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या कार्याध्‍यक्षपदी निवड झाली असल्‍याने जिल्‍हाध्‍यक्ष पद रिक्‍त होते. त्‍यामुळे एल.बी. पडवळ यांची नूतन जिल्‍हाध्‍यक्षपदी निवड करण्‍यात आली. याच निमित्‍ताने त्‍यांचा कळंब तालुका संघाच्‍यावतीने शिक्षक भवन येथे जाहीर सत्‍काराचे आयोजन करण्‍यात आले होते. याप्रसंगी कार्याध्‍यक्ष राजेंद्र तांबारे व प्रदेश उपाध्‍यक्ष भक्‍तराज दिवाणे यांच्‍या हस्‍ते एल.बी. पडवळ यांचा सत्‍कार करण्‍यात आला. याप्रसंगी जिल्‍हा पतसंस्‍थेच्‍या नूतन चेअरमन कस्‍तुरी कराडे व राष्‍ट्रीय पुरस्‍कार प्राप्‍त दत्‍तात्रय मंडलिक यांचाही यावेळी गौरव करण्‍यात आला. या कार्यक्रमास जिल्‍हा सरचिटणीस संतोष देशपांडे, राजेंद्र बिक्‍कडे, रामकृष्‍ण मते, बाळासाहेब जमाले, तालुका पतसंस्‍थेचे माजी चेअरमन आर.जी. शिंदे आदीजण उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक तालुका शाखेचे अध्‍यक्ष दत्‍तात्रय पवार यांनी तर सुत्रसंचालन अविनाश यांनी केले. नवनाथ तुंदारे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी महिला तालुका शाखाध्‍यक्ष वैशाली क्षिरसागर, भुषण नान्‍नजकर, रविंद्र शिनगारे, भास्‍कर चव्‍हाण, प्रशांत निन्‍हाळ, मुंकूंद नांगरे, सोमनाथ वारे, नागेंद्र होसाळे, नागेश टोणगे, प्रदिप रोटे, गणेश कोठावळे, शिवराज मेनकुदळे, पांडुरंग टेळे आदींनी परिश्रम घेतले.

Labels:

14 नोव्हेबर रोजी सर्व प्रकारची मद्य विक्री बंद

उस्मानाबाद :- जिल्ह्यातील सर्व प्रकारची दारु विक्री दुकाने दि.14 नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॅा. के.एम. नागरगोजे यांनी दिले आहेत. दि. 14 रोजी साजरा होणाऱ्या मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. यादिवशी जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी, एफएलबीआर-2, परवाना कक्ष, ताडी विक्री केंद्र बंद राहतील.

Labels:

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील 50 जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील संशोधन अधिकारी/सांख्यिकी अधिकारी/आस्थापना अधिकारी/सांख्यिकी अधिकारी-निरीक्षण/जिल्हा सांख्यिकी अधिकारी (50 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2013 आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

Labels:

पालकमंत्री मधुकरराव चव्हाण जिल्हा दौ-यावर

उस्‍मानाबाद -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर येत असून  त्यांच्या कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
       शुक्रवार, दि. 1 नोव्हेंबर  रोजी सकाळी 8-30 वाजता सोलापूरहून अणदूर (ता. तुळजापूर) येथे आगमन, राखीव, मुक्काम.  शनिवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 8-45 वाजता अणदूर येथून शासकीय विश्रामगृह, उस्मानाबादकडे प्रयाण. सकाळी 9-45 वाजता शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता मौजे इर्ला, ता. जि. उस्मानाबाद येथील सांस्कृतिक सभागृहाचा उदघाटन समारंभास उपस्थिती. सकाळी 11 वाजता मौजे दाऊतपूर येथे पक्ष कार्यक्रमास उपस्थिती व त्यानंतर सोईनुसार उस्मानाबादहून अणदूरकडे प्रयाण.
        रविवार, दि. ३ नोव्‍हेंबर रोजी स.9-45 वा. अणदूर येथून शासकीय विश्रामगृह, उस्मानाबादकडे प्रयाण. स.10-45 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. स. 11 वा. डॅा. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट को-आपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी व एटीएम मेगा बॅंकिंग उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. दु. 12-10 वाजता उस्मानाबादहून लातूरकडे प्रयाण. लातूर जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपून सोईनुसार अणदूरकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. सोमवार. दि. 4 रोजी अणदूर येथे राखीव व मुक्काम.  मंगळवार, दि. 5 रोजी सायंकाळी 6 वा. अणदूरहून हागलूर ता. तुळजापूरकडे प्रयाण. सायंकाळी 6-30 वाजता आण्णा दराडे लिखीत भिरुड या कादंबरी प्रकाशनास उपस्थिती. रात्री 8 वाजता अणदूरहून सोलापूरकडे प्रयाण.

Labels:

सरदार पटेल यांना आदरांजली

उस्मानाबाद :- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांना अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे, तहसीलदार राजश्री मोरे यांनी यावेळी सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
            यावेळी विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Labels:

सहकारी संस्थांनी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

उस्मानाबाद :- सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या संस्थांना राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक संस्थांनी त्यासाठी सविस्तर प्रस्ताव करुन ते जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, उस्मानाबाद अथवा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, लातूर कार्यालयात 15 नोव्हेंबर, 2013 पर्यंत सादर करण्याचे  आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) एस. पी. बडे यांनी केले आह. शासन निर्णय दिनांक 11 आक्टोबर, 2013 नुसार यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार असून अधिक माहितीसाठी उपरोक्त दोन्ही कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Labels:

कल्याण संघटकाचा दौरा

उस्मानाबाद :- जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबियांच्या अडचणी सोडविण्यासाठी येथील जिल्हा सैनिक कार्यालयातील कल्याण संघटक 7 नोव्हेंबर रोजी परंडा, 8 रोजी तुळजापूर, 22 रोजी उमरगा, आणि 29 नोव्हेंबर रोजी लोहारा येथील तहसील कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5-45 या वेळेत उपस्थित राहणार आहेत. तसेच 12 डिसेंबर रोजी कळंब, 19 डिसेंबर रोजी वाशी आणि 26 डिसेंबर रोजी भूम याठिकाणच्या तहसील कार्यालयात उपरोक्त वेळेत कल्याण संघटक उपस्थित राहतील. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.   

Labels:

पदवीधर मतदार नोंदणी दावे व हरकती स्वीकारण्यास मुदतवाढ

उस्मानाबाद :-  दिनांक 1 नोव्हेंबर, 2013 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदार संघात मतदार नोंदणी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने दि. 15 नोव्हेंबर, 2013 पर्यंत वाढविण्यात आला असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, उस्मानाबाद यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.                    

Labels:

व्यक्ति, परिस्थिती, प्रकृतीशी युध्दाऐवजी मिळते जुळेते घेतल्यास सुखाची प्राप्ती - ब्र.कु.संतोषबहनजी

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : व्यक्ति, परिस्थिती, प्रकृतीशी युध्दाऐवजी मिळते जुळेते घेतल्यास सुखाची प्राप्ती होते. संतुष्टता ही सर्व गुणांचा राजा आहे. इतरांना देण्याऐवजी घेण्याच्या अपेक्षेमुळे संतुष्टता हरवत चालली आहे. इतरांकडून सन्‍मान व स्नेहाची अपेक्षा करतांना ते इतरांना दिले पाहिजे, असे मत ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या क्षेत्रसंचालिका संतोषबहनजी यांनी व्यक्त केले.
    बार्शी येथील प्रजापिता ब्र.कु.सेवाकेंद्रातील मंगळवारी सायंकाळी आयोजित स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सोमप्रभाबहनजी, संगीताबहनजी,  माजी आमदार विनायकराव पाटील, युवक कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष विजय (नाना) राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
    पुढे बोलताना संतोषबहनजी म्‍हणाल्‍या, वेळ ही परिवर्तनशील आहे. दुःखाचे दिवस संपणारे व सुखाचे येणारे असल्‍याची खात्री पटते. आत्‍मचिंतनाने प्रभुचिंतन होते, त्‍यामुळेच जीवनात सुखशांती प्राप्‍त होते. स्‍वचिंतनाने सकारात्‍मक विचरांची निर्मिती होते. भटकणा-या बुध्‍दीला स्थिर करण्‍यासाठी याचा उपयोग होतो. कलियुग हे समस्‍येचे युग असले तरी त्‍या परिस्थितीत प्रेमाने त्‍याचा स्विकार करुन समाधानात परिवर्तन करता येते. समस्‍या ह्या मनोरंजनासाठी असल्‍याचे समजून घेतल्‍यास भिती नष्‍ट होईल. इंटरनेटसारख्‍या प्रभावी माध्यमाचा वापर करुन मनुष्‍य परदेशातील व्‍यक्‍तींशी विचारांची देवाणघेवाण करत असल्‍याचे दिसून येतांनाच आपल्‍या घरातील व्‍यक्‍तींशी सक्षमपणे बोलत नसल्‍याचेही दिसून येते. एकमेकांच्‍या ह्दयातील वाढलेले अंतर दूर करण्‍याचे सामर्थ्‍य अध्‍यात्‍मकातच आहे. इतरांना सुखी, समाधानी, संतुष्‍ट करण्‍याचा विचार केल्‍याशिवाय स्‍वतःला ते प्राप्‍त होत नाही. भौतिकवादी मनुष्‍याला सुखसुविधेची साधने उपलब्‍ध असतानाही त्‍याचा अनुभव करता येत नाही, कारण शांतीचे मूळ असलेल्‍या परमात्‍माला संतुष्‍टता व असंतुष्‍टेचे कारण आहे. सुष्‍टीच्‍या रंगमंचावर कधीही न संपणारे नाटक सुरु आहे. यामध्‍ये प्रत्‍येक आत्‍मा हा आपापली भूमिका पार करत असल्‍याचे दिसून येते.

Labels:

सार्वजनिक आस्थापना व खाजगी उद्योजकांना आवाहन

सोलापूर -: सार्वजनिक क्षेत्रातील सर्व आस्थापना तसेच 25 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार कार्यरत असलेले खाजगी क्षेत्रातील उद्योजक यांनी ई आर 1 व ई आर 2 विवरणपत्र भरावे. तसेच प्रत्येक तीन महिन्यानंतर ते संबधीत कार्यालयास पाठवावे.
    उद्योजकांनी आपला ईमेल, दुरध्वनी क्रमांक, मेलींग अड्रेस अद्यावत करावेत. तसेच www.maharojgar.gov.in  या वेबसाईटवर अधिक माहिती घ्यावी. मनुष्यबळ विवरणपत्र न     पाठविणा-यावर आस्थापना - सक्तीने अधिसुचीत कायदा 1959 मधील नियम भाग 5 (1) आणि (2) मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र (दुरध्वनी क्र. 0217-2622113) सोलापूर या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Labels:

सांगोला तालुक्यातील बचत गटांनी केरोसिन परवान्यासाठी अर्ज करावेत

सोलापूर :- महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडील शासन निर्णय क्रमांक साविव्य/1005/प्र.क्र.2075/ना.पु.28, दिनांक 3 नोव्हेंबर 2007 अन्वये सध्याची रास्त भाव दुकाने/ किरकोळ केरोसीन परवाना तसाच ठेवून, आजमितीस रद्द असलेली व यापुढे रद्द होणारी, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची तसेच विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाची रास्त भाव धान्य दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने स्वयंसहाय्यता गटांना देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जेथे स्वयंसहाय्यता गट उपलब्ध होणार नाहीत अशा ठिकाणी सध्याच्या प्राथम्य सुचीनुसार रास्त भाव धान्य दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने मंजूर करण्यात यावेत असाही निर्णय शासनाने घेतला आहे.
    त्यानुसार सांगोला तालुक्यातील मौजे राजापूर, महुद बु., निजामपूर, लिगाडेवाडी, लक्ष्मीनगर, कराडवाडी आणि ठोबरेवाडी (अचकदाणी) आदी गावात किरकोळ केरोसीन परवाना चालविण्याची इच्छा असेल अशा बचत गटांनी संबंधित तहसिल कार्यालयात दिनांक 1 ते 15 नोव्हेंबर 2013 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. अर्ज कार्यालयीन  वेळेत स्विकारले जातील. अर्जदाराने अर्ज स्वत: सादर करावेत. अर्जाचे विहित नमुन्यातील कोरे फॉर्म सांगोला तहसिल कार्यालयात रक्कम रु. 5/- च्या चलनाने सरकारी खजिन्यात जमा करुन घेवून दिले जातील.
    बचत गटांना परवाने देण्याबाबतच्या अटी, नियम तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात अधिक माहिती संबंधित तहसिल कार्यालयात मिळेल. रास्त भाव दुकान मंजुरीसाठी बचत गटाची गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. मुदतीनंतर व अपु-या कागदपत्रासह आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

Labels:

सुरक्षा रक्षकाबाबत आवाहन

सोलापूर -: राज्य शासनाने सातारा, सांगली व सोलापूर जिल्हयाकरीता महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक मंडळ गठीत केले असून ते  सांगली जिल्हा सुरक्षा मंडळ (सांगली) या नावाने कार्यरत आहे.
    वरील तीन जिल्हयात कारखानदार, व्यावसायीक तथा दुकानदार यांनी खाजगी सुरक्षा रक्षक पुरविणा-या एजन्सीकडून सुरक्षा रक्षक कर्मचा-यांची नेमणुक न करता ही नेमणुक सांगली जिल्हा सुरक्षा मंडळाकडूनच (सांगली) करुन घ्यावी.
अनोंदीत सुरक्षा रक्षकांची नेमणुक करणे हा गुन्हा असून अशा विरुध्द नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 व त्या अंतर्गत तरतुदीनुसार संबधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल. तरी संबधितांनी आपली आस्थापना या मंडळात नोंद करुन घ्यावी व त्यानुसार सुरक्षा रक्षकांची मागणी करावी. असे आवाहन एन. पी. पाटणकर, सहाय्यक कामगार आयुक्त व अध्यक्ष सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Labels:

भटकंती करणा-या कलकारांचे भविष्‍य अंधकारमय

पांगरी (गणेश गोडसे) -: भटकंती करून आपली उपजिविका करणा-या बालकलाकारांचे भविष्य अंधकारमय आहे. आमच्याकडे दिवाळी पाडवा कुठला, आमच्यासमोर तर रोचच अंधार आहे, अशी अवस्था कलाकारांची झाली असल्याचे दिसत आहे. ज्या वयात बालकांनी खेळायला बागडायला पाहिजे, त्या वयातच या बालकांना बालकलाकार म्हणुन समाजाला सामोरे जावुन पैशासाठी भिक मागण्‍याची येते. कला सादर करून लांकांचे मानोरंजन करून जरी लोकांकडे हात पुढे केले जात असले तरी समाज मात्र या कलाकारांकडे एका वेगळयाच तुच्छ नजरेने पहातो. शासन प्रशासन आम्ही समाजातील अशा घटकांसाठी खुप कांही करत असल्याचे, यांच्यावरील योजनांसाठी कोटयावधी रूपयांचा चुराडा करत असल्याचे दाखवत असले तरी प्रत्यक्षात अशा तळागाळातील समाजातील लोकांपर्यंत या योजना पोहचतात का हाच संशोधनाचा विषय ठरू पहात आहे. दिखावुपणा करून समाज घडत नसतो, त्यासाठी मोठया चळवळीची गरज असते.
    ना घर, ना दार जाईल तिथं पाल टाकायचं, पालाची व्यवस्था नसेल तर त्या त्या गावातील सरकारी शाळेचा आसरा घेऊन तिथच उघडयावर रात्र काढायची शाळोचे मैदान हेच या कलाकारांचे घर आकाश हेच पांघरून धरती हीच त्यांची माता असे मानले जाते. गावात दोन चार ठिकाणी आपले कलेचे कार्यकम करून येथे येऊन आसरा घ्यायचा तिथच दोन दगड मांडुन पोटाची आग विझवण्‍यासाठी कांहीतरी करून पोटात ढकलायच. ऊन, वारा, पाऊस याची तमा नाही अशीच कांहीशी अवस्था या फिरत्या कलाकार कुटूंबांची असल्याचे निदर्शनास येतो.
    यासंदर्भात संबंधीत कलाकारांकडे चौकशी केली असता, आम्हाला इलक्शनच भुषान काय बी नाय. आमच्याकडं इलक्शान कार्डच नाय. आन म्हत्वाच म्हंजी आमाला निवडणुकीच काय देना घेना नाय. कारण रोजच्या करमणुकीच्या कार्यक्रमातून प्रेक्षकांकडुन मिळणारा प्रतिसाद व प्रेक्षक म्हंजीच आमच मायबाप व आमच सरकार हाय. आमच्या सोयी सविधाकडं कुणाचचं ध्यान नाय. रेशनकार्ड नाय, त्यामुळे गावाकडं गेल तर रेशनदुकानदार यादीत नाव नसल्यामुळं धान देतच नाय. शासन कायच देत नाय. आला दिस कसा काढायचा हाच मोठा प्रश्‍न आमच्यासमोर दरदिवशी असतो. बाकी गोष्ठीकडं ध्यान देयाला आमाला येळच राहात नाही. अशा अनेक प्रश्‍नांनी या फिरत्या कलाकार कुटुंबांना घेरले असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
    नऊ महिने जिवापाड जपलेला पोटचा गोळा बालपणातच आम्हाला आधार बनुन जातो. आम्हीही दोन-तिन वर्षांच्या बालकांना आधार देऊन त्याच्याकडुन कसरती करून घेऊन व त्यांचा जिव धोक्यात घालुन पोटासाठी त्यांचा जिव टांगनीला लावतो. माणसांच्या आतडयाला दोनदाच ताण पडतो, एकदा खळखळुन हसल्यावर व दुस-यांदा आतडयांना ताण देऊन कसरतीचे प्रयोग करून दाखवताना. येथे मात्र दुसरा प्रकार कलाकारांच्या वाटयाला येतो. शेवटी मरण्‍यापेक्षा करमणुक करत करत जगता जगता मेलेल बर, म्हणुनशान जिव टांगनीला लावुन करमणुकीचे कार्यक्रम करतो, असेही त्‍यांनी सांगितले.

Labels:

पुन्‍हा चड्डी पिवळी


Labels:

तिसरा मोर्चा


Labels:

तडा


Labels:

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दक्षता सप्ताहानिमित्त जनजागृती रॅली

उस्मानाबाद -: दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथून या रॅलीस सुरुवात झाली. ही रॅली शासकीय रुग्णालय, मारवाड गल्ली, सावरकर चौक, पोस्ट आफीस, पोलीस ठाणेसमोरुन आंबेडकर चौक, शिवाजी चौक बस स्थानकमार्गे श्री तुळजाभवानी स्टेडियमला विसर्जित करण्यात आली. रॅलीमध्ये दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक नईम हाश्मी, पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले व एफ.सी. राठोड, सहायक पोलीस हवालदार सी.एन. देशमुख, हेडकॅान्स्टेबल डी.एस.भगत, पोलीस नाईक सुधीर डोरले, पोलीस कॅान्स्टेबल नितीन तुपे, नितीन सुरवसे व बालाजी  तोडकर यांनी सहभाग  घेतला.  तसेच जनजागृती सप्ताहानिमित्त बस स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय व बार्शी नाका चौकात पथनाट्य संचाने वेगवेगळे पथनाट्य सादर करुन जनजागृती केली.  

Labels:

दिवाळीनिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातून पुणे, सांगली, पिंपरी-चिंचवडसाठी जादा बसेस

उस्मानाबाद -: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाच्या वतीने पुणे, सांगली, मुंबईसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. उस्मानाबाद, तेर, उमरगा, भूम, तुळजापूर, कळंब आणि परंडा येथील  आगारातून पुणे जाणाऱ्या प्रवाशांसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय भूमहून सांगलीसाठी, तुळजापूरहून मुंबईसाठी बसेस सोडण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक प्रदीप खोबरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

शालेय विद्यार्थ्‍याचे अपहरण

उमरगा -: मौजे एकुरगावाडी (ता. उमरगा) येथील मतीमंद शाळेतील रतन हाके हा १४ वर्षे वयाचा मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची फिर्याद पोलीस स्टेशन, उमरगा येथे दाखल करण्यात आल्याचे संबंधित पोलीस ठाण्याच्या वतीने पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
    सदर मुलगा वर्णाने काळा, उंची ४ फूट ४ इंच, वजन २५ किलो, अंगावर काळी जीन्स आणि काळ्या पांढऱ्या रंगाचा शर्ट, अंगाने सडपातळ आणि डोक्यास जखमेचा व्रण अशा वर्णनाचा असून कोणास माहिती असल्यास त्यांनी उमरगा पोलीस ठाणे येथे संपर्क साधण्याचे आवाहन तपासी अंमलदार, उमरगा पोलीस ठाणे यांनी केले आहे.

Labels:

रेशनदुकानदारास दोन दिवसाची पोलीस कोठडी

पांगरी :- बनावट शिधापत्रिका जवळ बाळगुन व इतर माध्यमातुन शासनाची पन्नास हजार रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी जिवनावश्यक वस्तु कायदा कलमान्वये अटक करण्‍यात आलेल्या वाणेवाडी (ता. बार्शी) येथील स्वस्त धान्य दुकानदारास न्यायमुर्ती व्ही.बी.मुल्ला यांच्या न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती पांगरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली.
    हनुमंत नारायण यादव असे दोन दिवसाची पोलिस कोठडी ठोठावण्‍यात आलेल्या आरोपीचे नांव आहे. त्यांनी मे ते ऑक्टोंबर या सहा महिन्यात अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्‍यात आला आहे. बार्शी तहसिल कार्यालयाकडे ग्राहकांच्या आलेल्या तक्रारी अर्जावरून तालुका पुरवठा निरीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी पथकांसह वाणेवाडी येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 116 चे चालक हुनमंत यादव यांच्या दुकानावर व घरावर अचानक छापे टाकुन तेथुन 28 बनावट शिधापत्रिका व स्‍वस्त धान्य दुकानासंदर्भातील सर्व दप्तर ताब्यात घेऊन चालक यादव यांनाही अटक केली होती. चौकशीत शासकीय गोडावुन मधुन शासनाच्या विविध योजनांमधील धान्य उचलण्‍यात आला असला तरी तो ग्राहकांना वाटप न करता बाजारपेठेत चढया दराने विकुन शासनाची फसवणुक केल्याचा निष्कर्ष पुरवठा विभागाने काढुन तसा सदर स्वस्त धान्य दुकानदाराने पन्नास हजार रूपयांचा अपहार केल्याबाबत पांगरी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. सापडलेल्या बोगस रेशनकार्डच्या अनुषंगाने तपास करण्‍यासाठी पांगरी पोलिसांनी पोलिस कोठडी मागितली होती. तालुका पुरवठा विभागाने अचानक धाडशी कारवाई केल्यामुळे बार्शी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमधुन खळबळ उडाली असुन प्रत्येकजण आपली तक्रार मामलेदार ऑफिसकडे जाणार नाही याची काळजी करताना दिसत आहेत. ऐन दिवाळीत झालेल्या या कारवाईमुळे आपले दप्तर अद्यावत करून घेन्यात दुकानदार व्यस्त झाले आहेत. अधिक तपास शरद मेमाणे हे करत आहेत.

Labels:

गंठण पळविल्याची उशीराने तक्रार दाखल

बार्शी : येथील त्रिमूर्ती हौसिंग सोसायटीमध्ये राहणार्‍या रेखा शरद मस्के या महिलेच्या गळ्यातील २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण अज्ञान चोरट्यांनी पळवून नेल्याची तक्रार बार्शी पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
    यातील तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार दि. १५ ऑगस्ट रोजी कुर्डूवाडी रोड येथील देशमुख हॉस्पिटलसमोर सकाळी साडेनऊच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी गंठन पळवले आहे. सदरची फिर्याद बार्शी पोलिसांत बुधवारी दि. ३० ऑक्‍टोबर रोजी उशीराने दाखल झाली आहे.  यातील चोरट्यांनी काळ्या रंगाच्या नंबर नसलेल्या पल्सर या वाहनाचा वापर केल्याचे व जबरदस्तीने गंठण हिसकाऊन घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदरच्या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकम हे करीत आहेत.

Labels:

Wednesday, 30 October 2013

पोटाची काळजी कशाला, आभाळ पांघरु, दगड उशाला

पांगरी (गणेश गोडसे) : कशासाठी पैशासाठी, कशासाठी पोटासाठी असाच कांहिसा पण पहाणा-यांच्या अंगावर थरार आणुन अनेकांना तोंडात बोटे घालायला लावणारे चित्तथरारक असे प्रकार सर्रास विविध ठिकाणी बाजारपेठा, बसस्थानकावर पहावयास मिळतात. आपल्या रोजीरोटीच्या प्रश्‍नामुळे व पोटाची खळगी भरण्‍यासाठी गावोगांव भटकुन लोकांना मनोरंजनाचे कार्यक्रम दाखवुन त्यातुन मिळणा-या पैशातुन अर्थाजन करणा-या बाल कलाकारांची कहाणी. आपल्या जिवावर बेतणारे प्रयोग करून लोंकांची करमणुक करत पोटातील दुःख लपवत चेह-यावर हास्य उमटवुन प्रेक्षकांची वाहवा मिळवणा-या बालकलाकारांसह या भटक्या लोकांच्या प्रश्‍नाचे काय? अशा भेदक पण अनेकांच्या हदयाला पिळ टाकणा-या या प्रश्‍नाची उकल कोण करणार?
     'ढमाढम ढोल रं, झमाझम झांजरी नाचतो डोंबारी, रं नाचतो डोंबारी. उदयाच्या पोटाची काळजी कशाला, आभाळ पांघरू, दगड उशाला, गाळुणी घाम, असा मागुया भाकरी, नाचतो डोंबारी' या काव्यपंक्तीप्रमाणेच खरोखरच या कलाकार समाजाची दैनंदिनी आहे. दोरीवर आपल्या शरिराचा समतोल राखत बाटलीवर चालुन दाखवण्‍याच्या मन अचंबित करणारे व जिवाशी खेळणारे प्रयेग करून जगण्‍यासाठी त्यांना समाजापुढे हात पसरावे लागतात. राज्यभर विखुरला गेलेला असल्याच्या या कलाकरांच्या समाजाचेही सर्व प्रश्‍नही त्यांच्याप्रमाणेच अस्ताव्यस्त होऊन विखुरलेल्या अवस्थेत पडलेले आहेत. परंपरागत वास्तव कला अंगात घेऊनच जन्माला येणा-या या कलाकारांच्या विविध प्रश्‍नांकडे कोण गांर्भियाने पाहणार हाच मोठा गांर्भियाचा प्रश्‍न आहे. एरव्ही मतासाठी समाजाच्या मागण्‍यांची पुर्तता करण्‍यासाठी प्रयत्न करू असे म्हणणारे राजकरणीही या असंघटीत कलाकारांसाठी कांही बोलण्‍यास तयार नाहीत. ज्यांच्याकडुन परतावा मिळतो त्यांच्यासाठीच कांहीतरी करणं ही समाजाची माणसिकताच बनलेली असल्यामुळे शासन प्रशासनासह राजकारण्‍यांच्या मदतीची खरी गरज असलेल्या या कलाकारांच्या प्रश्‍नाकडे सर्वांकडुनच सोईस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.
      शिक्षणप्रवाहापासुन कोसो दुर असलेल्या व अक्षरांचीही साधी ओळख होऊ न शकलेल्या या कलाकारांना व त्यांच्या पाल्यांना शिक्षण प्रवाहात आणुन त्यांना शिक्षणाचे डोस पाजणे नितांत गरजेचे आहे. कारण शिक्षण म्हणजे वाघिनीचे दुध आहे असे म्हटले जाते. जेव्हा या समाजाला शिक्षण प्रवाहात आणुन त्यांना वाघिनीच दुध पाजण्‍यासाठी प्रयत्न केले जातील तेव्हाच हा समाज ख-या अर्थाने समाजाच्या मुख्य प्रवाहात येणार आहे. सतत समाजातच वावरणा-या मात्र समाजातील सोई सुविधापासुन कित्येक मैल दुरवर असलेल्या या समाजासाठी शिक्षण हा खुप मोठा आधार बनणार आहे.

Labels:

उस्‍मानाबाद येथे राज्‍यस्‍तरीय बौध्द साहित्य संमेलनाचे आयोजन


उस्मानाबाद - दुसरे राज्‍यस्‍तरीय बौध्द साहित्य संमेलन उस्‍मानाबाद ये‍थे रविवार दि.10 नोव्‍हेबंर रोजी होत असुन त्‍यानिमित्‍त विविध क्षेत्रातील मान्‍यवरांचा यावेळी पुरस्‍कारने  गैरव करण्‍यात येणार आहे .. .
शिक्षण क्षेत्रातील डॉ.विद्याभूषण पुरस्कार - प्रा.योगीराज वाघमारे,सोलापूर, संशोधन क्षेत्रातील पंडित राहूल सांस्कृत्यान पुरस्कार - वसंत धावारे,मुंबई, अनुवाद क्षेत्रातील डॉ.भदन्तं आनंद कौसल्यान पुरस्कार - डॉ.विमल किर्ती, नागपूर, कला क्षेत्रातील अजिंठा पुरस्कार - सिध्दार्थ शिंगाडे,मुंबई, सामाजिक कार्य क्षेत्रातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार - पी.आर.ढाले,माजी न्यायाधीश,औरंगाबाद, विशेष सामाजिक कार्य पुरस्कार - डॉ.अशोक शिलवंत,पुणे, विशेष संशोधन पुरस्कार - डॉ.बबन जोगदंड,यशदा,पुणे, उत्कृष्ट विकास प्रशासक पुरस्कार - वंदना निकुंभ,तहसिलदार,परंडा, गुणवंत विद्यार्थी विजय सिरसाटे (सुवर्ण पदक प्राप्त),क्रिडा पुरस्कार युवराज पवार, प्रशिक्षक पुरस्कार - प्रा.सुनील ढगे यांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.या संमेलनाबाबतची बैठक संयोजक यशपाल सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.यावेळी स्वागताध्यक्ष धनंजय शिंगाडे, माणिक बनसोडे, पृथ्वीराज चिलवंत, एम.डी.जानराव, अंगुलभाऊ बनसोडे, श्रीकांत माळाळे इत्‍यादी  उपस्थित होते.

Labels:

Tuesday, 29 October 2013

खोट्या तक्रारी देणार्‍यांना मी पुरुन उरेन : मिरगणे

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : आयकर विभागाचे अधिकार्‍यांनी केलेले सर्वेक्षण हे केवळ कागदपत्रांची तपासणी होती परंतु काही जणांनी लक्षात न आल्याने धाडी, छापे, रेड इत्यादी प्रकारच्या बातम्या प्रसिध्द केल्या ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे तसेच राजकिय द्वेषापोटी ज्यांनी माझ्या खोट्या तक्रारी दिल्या त्यांना मी १० जन्‍म पुरुन उरेन, असे बांधकाम व्यावसायिक राजेंद्र मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.
पुढे बोलताना मिरगणे म्‍हणाले, उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मी सक्षङ्क उमेदवार असल्याने माझ्या आव्हानाला घाबरुन राजकीय सूडबुध्दीने खोट्या तक्रारी दिल्या. त्यामुळेच आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी माझ्या कार्यालयात कसून सर्वेक्षण केले. यामध्ये कोणत्याही प्रकारचे गैर आढळले नाही. माझा संपूर्ण व्यवहार हा चेकद्वारे असल्याने माझ्याकडे सर्व व्यवहारांचा जमा खर्चाचा पूर्णपणे हिशोब होता. या तीन दिवस तीन रात्रींच्या तपासणीत मला आणि माझ्या कर्मचार्‍यांना प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. माझ्या फपाळवाडी, कासारवाडी, देवळाली इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा असल्याची माहिती तक्रारीत असल्याचे जाणवले. सदरच्या प्रकारानंतर मी माझे खरे रुप दाखवणार असून आजपर्यंत केवळ बचावाची भूमिका घेत होतो, यापुढे मी आक्रमण करणार आहे. माझ्यासारख्या प्रशासनातील अनुभवी व्यक्तीला ज्यांनी मला त्रास दिला त्यांना त्रास देणे मला खूप सोपे आहे. ज्यांनी तक्रारी दिल्या त्यांचे उत्पन्न तर सावकारी व्याजबट्‌ट्याचे असेल यापुढील काळात त्याचे परिणाम दिसून येतील व त्यांचेही काळेबेरे बाहेर काढू असेही राजेंद्र मिरगणे यांनी सांगितले.

Labels:

शिवतीर्थाच्या दिशेने बार्शीतील तीन शिवसैनिकांचा पायी प्रवास सुरु

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्‍मृती वर्षभर जागृत ठेवत बार्शीतील तीन कट्टर शिवसैनिक व शिवराज्य सेनेचे कार्यकर्ते शिवतीर्थाच्या दिशेने पायी चालत निघाले आहेत. दि. १७ नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुखांचा महानिर्वान दिनादिवशी शिवतीर्थावर दर्शन घेण्याचा निश्‍चय करुन या तिघांनी सोमवार दि.२८ ऑक्टोबर रोजीपासून वाटचाल सुरु केली आहे.
बापू बेलसरे कुलकर्णी, राम बेळे, शैलेश माने असे या तिघांची नावे आहेत. बार्शी येथील बेदराई चौकातील शिवाई या शिवराज्य सेनेच्या कार्यालयापासून शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांचा पायी प्रवास सुरु झाला. यावेळी जिल्हा युवा उपप्रमुख किरण गायकवाड, हर्षवर्धन पाटील, प्रितम मोरे, युवराज ढगे, दिनेश सुतार, महेंद्र देवकर, निलेश पवार, उमश काळे, संभाजी राऊत, सचिन मुकटे, सतीश उबाळे, सागर मोरे, स्वप्नील पवार, अभिजीत यादव, शुभम कदम, किरण हिंगमिरे आदी उपस्थित होते. यावेळी शिवराज्य सेनेतर्फे त्यांना बार्शीचा भगवा झेंडा, अत्यावश्यक प्रसंगी लागणारी औषधे देण्यात आले आहे.

Labels:

स्वखर्चातून ३० शौचालयाच्या कामांचा शुभारंभ

बार्शी : येथील राऊत चाळ परिसरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये सार्वजनिक ३० शौचालयांच्या कामाचा शुभारंभ माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक विजय राऊत, अमोल चव्हाण, रेखा नाळे, सिताबाई पवार, आण्णा शिंदे, अभियंता शेळके आदी उपस्थित होते.
सदरच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात विस्थापित गिरणी कामगारांची कुटूंबे वास्तव्य करीत असून त्यांना देण्यात आलेल्या घरकुलाची जागा अत्यंत तोकडी आहे. सदरच्या जागी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शौचालयाच्या प्रश्‍नासाठी नगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करुनही केवळ विरोधकांचा प्रभाग म्हणून कोणत्याही प्रकाराची मदत नगरपरिषदेकडून झाली नाही. आपण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमदवार उभे करतांना सर्वसामान्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे त्यामुळेच स्वखर्चातून हे काम सुरु केले आहे. येत्या दिड महिन्यात सदरचे काम पूर्ण करण्यात येत असून चांगली सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. सत्ताधार्‍यांनी शहरातील मुतार्‍यांची संख्या कमी केली, महिलांची तर कोणतीही सोय नसून बार्शी शहरातील पाणीपुरवठ्याच्या व स्वच्छतेच्या अनेक समस्या असतांना पाणीपुरवठा व स्वच्छता मत्री यांच्याबाबत तीव्र नाराजी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.

Labels:

हस्‍तक


Labels:

महिला व युवतींच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी नावनोंदणीची बुधवारी अंतिम तारीख

उस्मानाबाद : ग्रामीण भागातील 18 वर्षावरील युवती व महिलांसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचा नमुना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण), जि. प. उस्मानाबाद, बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय व गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी सदर अर्ज प्राप्त करुन ते संबंधित तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयात दिनांक ३० आक्टोबरपर्यंत भरुन द्यावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. उस्मानाबाद आणि सभापती, महिला व बालकल्याण समिती, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.

Labels:

'हमारी बेटी अभियान' ची कळंब मध्ये स्वाक्षरी मोहीम

कळंब (बालाजी जाधव) : महाराष्ट्र राज्य व पर्याय संस्था कळंब यांच्यावतीने 'हमारी बेटी अभियान' ची स्‍वाक्षरी मोहीम सोमवार रोजी कळंब बसस्थानक परिसरात राबवण्यात आली, 
      शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयात होणारे महिलांचे शोषण थांबावे, गर्भलिंग निदानाला विरोध करणेसाठी व पी. सी. पी. एन. डी. टी कायदा सक्तीने लागू करावा याकरिता प्रत्येक महिला पुरुषांनी आपला पाठींबा नोंदवण्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात  महविद्यालयीन युवक युवतींसह, शाळकरी विध्यार्थी आणि नागरिकांनी स्वाक्षरी करून आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन क्षीरसागर, पर्याय संस्थेचे कार्यकर्ते विलास गोडगे, श्रीमती सुनंदा खराटे, भिकाजी जाधव, बालाजी शेंडगे, असेफ मुलानी यांनी परिश्रम घेतले.

Labels:

रेशन दुकानदाराकडुन पन्नास हजाराचा अपहार

पांगरी (गणेश गोडसे) : वानेवाडी (ता. बार्शी) येथील स्वस्त धान्य दुकानदाराने गत सहा महिन्यात धान्य वाटपात पन्नास हजार रूपयांचा अपहार करून शासनाची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली असुन सोमवार दि. 28 ऑक्‍टोबर रोजी महसुल खात्याचे कर्मचारी व पांगरी पोलिस यांनी संयुक्तपणे छापा टाकुन बनावट शिधापत्रिका व इतर कागदपत्रांसह स्वस्त धान्य दुकानचालकास अटक केली आहे.
    हनुमंत नारायण यादव (वय 63, रा. वाणेवाडी, ता.बार्शी) असे अटक करण्‍यात आलेल्याचे नाव आहे. ऐन दिवाळी सनाच्या तोंडावर बार्शी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानाचा घोटाळा उघडकीस आल्यामुळे अनेकांचे धाबे दनानले असुन दुकानचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रकाश पांडुरंग कुलकर्णी (रा.ज्ञानेश्‍वर नगर बँक कॉलनी सोलापुर, पुरवठा निरीक्षक बार्शी तहसिल कार्यालय) यांनी याबाबत पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्‍याची प्रक्रिया सुरू होती.
    बार्शी तहसिल कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, वाणेवाडी येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 116 चे चालक हणुमंत नारायण यादव यांच्या स्वस्त धान्य दुकानासंदर्भात 20 ऑक्टोंबर रोजी तहसिलदारांकडे ग्राहकांनी व ग्रामस्थांनी तक्रारी अर्ज दिला होता. तहसिलदारांनी ग्रामस्थांच्या तक्रारी अर्जावर कार्यवाही करण्‍यासाठी पुरवठा निरीक्षकांना आदेश दिले होते. बार्शी तहसिल कार्यालयाच्या महसुल व पुरवठा विभागाच्या पथकाने पांगरी पोलिसांसह काल वाणेवाडी येथील स्वस्त धान्य दुकानी अचानक छापा टाकुन दुकानाची पाहणी केली असता दुकानात माल निदर्शनास आला नाही. पथकाच्या सदस्यांनी नंतर दुकानचालक यादव यांच्या घराची तपासणी करून घरातुन स्टॉक रजिस्टर पावती पुस्तक, ग्राहक नोंद रजिस्टर, विक्री रजिस्टर व ग्राहकांच्या नावावर असलेल्या व स्वताःजवळ बाळगलेल्या अट्टावीस विविध प्रकारच्या शिधापत्रिका ताब्यात घेतल्या आहेत.
     मे 2013 ते ऑक्टोंबर 2013 या सहा महिन्यांच्या कालावधीत स्वस्त धान्य दुकान चालक हनुमंत यादव यांनी वेळोवेळी सरकारी योजनेतील स्वस्त धान्य सरकारी नियमाप्रमाणे शासकीय गोदाम बार्शी येथुन उचलुन वाणेवाडी गावातील शिधापत्रिकाधारकांना वाटप करणे आवश्यक असताना सदर धान्य शिधापत्रिकाधारकांना वाटप न करता ते धान्य शिधापत्रिकाधारकांना वितरीत केल्याच्या बनावट पावत्या व बनावट रेशनकार्ड तयार करून व त्यामध्ये खाडाखोड करून ते रेशनकार्ड स्वताःजवळ बाळगुन सरकारी स्वस्त धान्य स्वताःच्या आर्थिक फायदयाकरीता काळया बाजारात अधिक चढया दराने विक्री करून सुमारे पन्नास हजाराचा शासकीय रकमेचा अपहार केला आहे. प्रकाश कुलकर्णी यांच्या फिर्यादिवरून हनुमंत यादव या दुकानचालकांविरूदध फसवणुक व जिवनावश्यक वस्तु कायदयान्वये सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्‍यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद मेमाणे हे करीत आहेत.

Labels:

फेसबुक व व्‍हॉटस् अँपचे फॅड; तरुणाईस स्‍मार्टफोनची भुरळ

फेसबुक व व्‍हॉटस् अँपची भुरळ तरुणाईस पडली आहे. यंदा दिवाळी सणाच्‍या निमित्‍ताने या दोन्‍ही सोशल मीडियांचा समावेश असणारा स्‍मार्टफोन खरेदी करण्‍यासाठी तरुणाईचा अधिक कल दिसून येत आहे. स्‍मार्टफोनला मागणी असल्‍याने अनेक वितरकांनी विविध स्किम सुरु केल्‍या आहेत.
    सॅमसंग मोबाईल महाग असला तरी खरेदीसाठी प्रथम प्राधान्‍य यास देण्‍यात येत आहे. त्‍यानंतर खिशाला परवडेल, अशी सुविधा देणा-या दोन कंपनीच्‍या मोबाईल खरेदीस तरुणाचा कल दिसून येत आहे. इंटरनेटच्‍या दुनियेत मोबाईलवर सफर करण्‍यासाठी दहावीपासून ते उच्‍च शिक्षण घेणा-या युवकास स्‍मार्टफोनने भुरळ घातल्‍याचे दिसते. ग्रामीण भागातही स्‍मार्टफोनचे फॅड पोहोचले असून महागडे कपडे घेण्‍यापेक्षा स्‍मार्टफोन घेण्‍याचा आग्रह मुले पालकांकडे करीत असल्‍याचे दिसून येते.
    स्‍मार्टफोन कॅमे-याच्‍या माध्‍यमातून जीवनातील प्रत्‍येक जल्‍लोष मित्रांमध्‍ये शेअर करण्‍याची उत्‍सुकता बहुतांश तरुणात दिसून येत आहे. फेसबुक व व्‍हॉटस् अँपच्‍या माध्‍यमातून नवे मित्र व मैत्रिणी जोडून त्‍यांच्‍याशी प्रत्‍येक शब्‍द व इमेद शेअर करण्‍यासाठी तरुणांच्‍या पाठोपाठ     मुलांचाही अधिक कल दिसून येतो.
    दिवाळी सणाच्‍यानिमित्‍ताने प्रत्‍येक गल्‍लीत, सोसायटीत व कॉलनीत जमणा-या तरुणाईच्‍या मैफिलीत सर्वाधिक वेळ चर्चा स्‍मार्टफोनवरच होत असल्‍याचे चित्र पहावयास मिळत आहे. स्‍मार्टफोन खरेदी केलेल्‍या मित्राचे फोन पाहून आपणही असाच फोन खरेदी करायचा असा चंगच प्रत्‍येक युवक बाळगत असल्‍याचे दिसून येते.

Labels:

कॉम्‍प्‍युटरचे प्रथमोपचार कीट

संगणक व्‍यवस्थित चालावा, यासाठी त्‍याची नियमित काळजी घ्‍यावी लागते. तसेच तो थोडा 'आजारी' वाटला तर त्‍यावर प्रथमोपचार करावे लागतात. यासाठी आवश्‍यक असतात ट्रबलशूटींग सॉफ्टवेअर्स.
 
* क्‍लॅम विन 
क्‍लॅम विन अँटी व्‍हायरसचे पोर्टेबल व्‍हर्जन तुमच्‍या पीसीतील व्‍हायरस स्‍कॅन करण्‍यासाठी वापरता येते. हे डिव्‍हाईस अतिशय उपयुक्‍त आहे, कारण काही वेळा मालवेअरमुळे तुमच्‍या संगणकावर इन्‍स्‍टॉल केलेले अँटी व्‍हायरस डिस उबल करु शकते. क्‍लॅम विनच्‍या मदतीने तुमच्‍या फ्लॅश ड्राईव्‍हवर तुम्‍ही इन्‍फेक्‍शन्‍स शोधून ती काढून टाकू शकता. स्‍वायवेअर आणि अँडवेअरही काढून टाकण्‍यात याचा चांगला उपयोग होतो.

* सीक्लिनर  
एखादे डॉक्‍युमेंट ओपन करताना किंवा ब्राउजिंग करताना तुमचा कॉम्‍प्‍युटर स्‍लो झाला असेल तर हे कदाचित त्‍यावर साचलेल्‍या टेम्‍पररी फाईल्‍समुळे असू शकते. त्‍या काढून टाकण्‍यासाठी सीक्लिनरचा चांगला वापर होतो. सीक्लिनरच्‍या डॉट झिप फाईलमधील माहिती तुमच्‍या पेन ड्राईववरील त्‍याच नावाच्‍या फोल्‍डरमध्‍ये काढून घ्‍या. आता हे सॉफ्टवेअर डॉट इक्‍सइ फाईलवर डबल क्लिक करुन लॉंच करा आणि तुमचा संगणक स्‍वच्‍छ करायला सुरुवात करा.

* रिकुवा 
 
तुमच्‍या पीसीवरुन कायमस्‍वरुपी डीलीट झालेल्‍या फाईल्‍स परत मिळवण्‍यासाठी याचा उपयोग होतो. डीप स्‍कॅनमुळे डीलीट केलेल्‍या फाईल्‍सची यादी आपल्‍याला मिळते. त्‍यातून तुम्‍हाला आवश्‍यक असलेल्‍या फाईल परत घेता येऊ शकतात; पण या डिव्‍हाईसमुळे डीलीट केलेल्‍या फाईल्‍स परत मिळतीलच याची खात्री देता येत नाही. एखादी महत्‍त्‍वाची फाईल पर मिळवायची असल्‍यास हे काम तज्‍ज्ञ व्‍यावसायिकाकडून करुन घेतलेले चांगले.
    अशा काही सॉफ्टवेअरमुळे तुम्‍हाला तुमचा कॉम्‍प्‍युटर तंदुरुस्‍त ठेवता येऊ शकतो. अनेकदा छोट्या-छोट्या गोष्‍टींकडे दुर्लक्ष झाल्‍याने मोठा     फटका बसण्‍याची शक्‍यता असते. या उपयांमुळे हा फटका बसण्‍याची वेळ येत नाही.

Labels:

नाशिक कुंभमेळ्याच्‍या धर्तीवर पंढरपूरचा विकास करणार

सोलापूर : नाशिकमध्‍ये होणा-या कुंभमेळ्याच्‍या नियोजनाप्रमाणे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करुन पंढरपूरचा विकास करण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळविण्‍याचेही प्रयत्‍न होत असल्‍याची माहिती सोलापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. दिलीपराव सोपल यांनी दिली.
    जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात सोमवारी पालकमंत्री सोपल यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पंढरपूर विकास प्राधिकरणाची बैठक घेण्‍यात आली. यावेळी जिल्‍हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, आ. भारत भालके, आ. बबनदादा शिंदे, कल्‍याणराव काळे, अप्‍पर पोलीस अधिक्षक तुषार जोशी, पंढरपूरच्‍या नगराध्‍यक्षा सुनीता भालेराव, जि.प.चे मुख्‍यकार्यकारी अधिकारी तुकाराम कासार यांच्‍यासह विविध खात्‍यांचे खातेप्रमुख व वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
    बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ना. सोपल म्‍हणाले, पंढरपुरात येणा-या प्रत्‍येक भाविकास सर्वोत्‍तम सुविधा मिळाव्‍यात यासाठी प्राधिकरणाच्‍या माध्‍यमातून प्रयत्‍न करण्‍यात येत आहेत. शहराबाहेरील दहा किलोमीटर अंतरचे नियोजन व विकास आराखडा त्‍यादृष्‍टीने करण्‍यात येत आहे. नियोजित सुविधेसाठी लागणा-या जागे संदर्भातचे नकाशे व इतर आराखडा तयार करण्‍याचे काम अंतिम टप्‍प्‍यात आले असून येत्‍या महिन्‍याभरात हे काम संपणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.
        नदीशुध्‍दीकरणासाठी नदी पात्राच्‍या दोन्‍ही बाजूस शुध्‍दीकरणाचे उपाययोजना करण्‍यात येत आहेत. एकात्मिक सुविधेसाठी आवश्‍ययक असणा-या जागेसंदर्भातही राज्‍य शासनाकडे पाठपुरावा करण्‍यात येणार आहे. नाशिक, हरिद्वार, उज्‍जैन, नांदेड आदी तीर्थक्षेत्रांप्रमाणे पंढरपूर शहराचा विकास आराखडा तयार करुन यासाठी निधी मिळविण्‍यात येणार असल्‍याचे सोपल यांनी सांगितले.

Labels:

हायअलर्ट


Labels:

उस्‍मानाबादेत आजपासून वादविवाद स्‍पर्धा

प्रमोद महाजन
उस्‍मानाबाद : तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट (येवती) संचलित व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने दिवंगत खासदार प्रमोदजी महाजनल आंतर महाविद्यालयीन भव्‍य राष्‍ट्रीय वादविवाद स्‍पर्धेस मंगळवार दि. 29 ऑक्‍टोबर रोजीपासून प्रांरभ होत आहे. या स्‍पर्धेचे उदघाटन मंगळवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे. समारोप कार्यक्रमासाठी बुधवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांची उपस्थिती राहणार आहे.
    मंगळवारी सकाळी रेखाताई महाजन, यमगरवाडी सेवालयाचे प्रमुख डॉ. अभय शहापूरकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. बुधवारी दुपारी 1 वाजता लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात पारितोषिक वितरण करण्यात येणार असून, या कार्यक्रमासाठी खासदार पियुष गोयल, मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अँड. आशिष शेलार, भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा पंकजा पालवे-मुंडे, ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी, सुनील चावके, रेखाताई महाजन, संस्थेच्या अध्यक्षा पूनम महाजन-राव यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव अँड. मिलिंद पाटील, प्राचार्या डॉ.अनार साळुंके यांनी केले आहे.

Labels:

विहिरीत बुडून 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

उस्‍मानाबाद -: विहिरीत उतरलेल्या 16 वर्षीय मुलाचा पाण्यात बूडून मृत्यू झाल्‍याची दुर्दैवी घटना तुगाव (ता. उस्‍मानाबाद) येथे सोमवार रोजी उघडकीस आली.
    किरण देवानंद पौळ (वय 16 वर्षे) असे पाण्‍यात बुडून मृत्‍यू झालेल्‍या मुलाचे नाव आहे. यातील किरण पौळ नेहमीप्रमाणे रविवार रोजी चारण्यास तेरणा तलावानजीकच्या श्रीमंत विश्वनाथ शेंडगे यांच्या शेतात गेला होता. त्याने शेंडगे यांच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत पोहोण्याकरिता उडी घेतली. पाण्यावर कपडे व चपला तरंगू लागल्याने तुगाव परिसरात चर्चा होताच मोठय़ा प्रमाणात विहिरीशेजारी गर्दी जमली झाली. रात्रभर ढोकी पोलिस प्रशासन व तुगावचे सरपंच अनिल भुतेकर व ग्रामस्थांनी विहिरीत बुडालेल्या किरणला काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ढोकी पोलिस ठाण्याचे शौकत पठाण व भागवत शेंडगे यांनी व गावातील काही युवकांनी विहिरीत उड्या मारून तब्बल 22 तासांनी किरणचा मृतदेह बाहेर काढला.

Labels:

एक हजार रुपयांची लाच घेणारा सरकारी वकील गजाआड

लोहारा -:  आरोपींना शिक्षा होईल, अशी सक्षम बाजू मांडण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या लोहारा येथील सरकारी वकिलासह अन्य एका वकिलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी दि. 28 ऑक्‍टोबर  लोहारा येथे करण्यात आली.
    अँड. शिवाजी बिराजदार, अ‍ॅड. जाधव असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्‍या वकिलांचे नाव आहे. तक्रारदार विठ्ठल कोकरे (रा. मार्डी, ता. लोहारा) यांचा शेतीच्या कारणावरून शेजारी असणार्‍यांबरोबर वाद झाला होता. याप्रकरणी त्यांना कुर्‍हाड व काठीने मारहाण झाली होती. याप्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येऊन तपास अधिकार्‍यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणाची दिनांक 28 रोजी साक्ष असल्याने याबाबत कोर्टाचे समन्स तक्रारदारास मिळाले होते. त्यानुसार तक्रारदार कोकरे या प्रकरणातील साहाय्यक सरकारी वकील अँड. शिवाजी बिराजदार यांना भेटले. या वेळी अँड.बिराजदार यांनी आरोपींना शिक्षा होईल अशी बाजू मांडण्यासाठी 1500 रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती एक हजार रुपये देण्याचे ठरले व सदरील रक्कम आणून देण्यास सांगितले. याबाबत कोकरे यांनी उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. सदरील रक्कम लोहारा येथील वकील दगडू जाधव यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार कोकरे यांनी सदरील रक्कम अँड. जाधव यांच्याकडे दिली. त्यानंतर सदरची रक्कम अँड. बिराजदार यांनी अँड. जाधव यांच्यामार्फत लोहारा कोर्टातील कार्यालयात स्वीकारल्यानंतर दोघानांही पकडण्यात आले. दोघांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती. हा सापळा पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, साहाय्यक फौजदार चंद्रकांत देशमुख, पोलिस हवालदार स्वामी, पोलिस नाईक सुधीर डोरले, कॉन्स्टेबल राहुल नाईकवाडी, स्नेहा गुरव, चालक पोलिस नाईक राजाराम चिखलीकर यांनी यशस्वी केली.

Labels:

Monday, 28 October 2013

मधुकर नरके यांच्‍या स्‍मरणार्थ ५५ बाटल्‍यांचे संकलन

बार्शी : आझाद गणेश मंडळाच्यावतीने मधुकर नरके यांच्‍या स्‍मरणार्थ आयोजित केलेल्या रक्तदान व आधार कार्ड नोंदणी शिबीरात ५५ रक्त बाटल्‍यांचे संकलन झाले. १५४ व्यक्तींची आधार कार्ड नोंदणी करण्यात आली.
         यावेळी शिबीरामध्‍ये तहसिलदार बालाजी सोमवंशी यांच्‍या हस्ते श्री आजोबा गणपतीला प्रथम पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरवात करण्‍यात आली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक वाळके, डॉ. काका सामंनगावकर, पृथ्वीराज रजपूत, माजी आमदार आण्णा नरके, संजय बरीदे हे उपस्थित होते. मागील १४ वर्षांपासून आझाद गणेश मंडळाच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मंडळातील कार्यकर्त्‍यांमुळेच दरवर्षी या सामाजिक कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे तर यावर्षी नागरिकांची गरज लक्षात घेता उस्‍मानाबादचे मोरे यांच्‍यातर्फे आधार कार्ड नाव नोंदणी शिबीराचे आयोजन केले आहे. या सामाजिक कार्याचे तहसीलदार सोमवंशी यांनी कौतुक केले तर भविष्‍यातही असे उपक्रम राबिवण्‍याचे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.
    कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी मंडळातील रुपेश सदावर्ते, राहूल शिराळ, कुणाल नरके, सचिन गायकवाड, लखन रजपूत, संदिप शिराळ, मयुर गलांडे, संतोष खोगरे, रामचंद्र ढोले, सोमनाथ गाभणे, रामगलांडे आदींनी परिश्रम घेतले. नागेश गाभणे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

Labels:

कर्ज घेणारे, देणारे, बुडविणारे एकच : सदाभाऊ खोत

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सहकारी साखर कारखाना बंद पाडणारे तेच, स्वत:चा खाजगी साखर कारखाना काढणारे तेच, जिल्हा मध्यवर्ती बँकेतून स्वत: संचालक असतांना कर्ज घेणारे तेच, आणि कारखान्याचे कर्ज बुडविण्यासाठी कारखान्याची विक्री करण्याचा डाव करणारे हेच आणि त्यांनाच पुन्हा मंत्रीपदही दिले जाते ही फार मोठी शोकांतिका असल्याची टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली.
    सोमवारी सकाळी शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बार्शी तहसिलवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांतिक सदस्य सुभाष आण्णा डुरे पाटील, संजय पाटील घाटणेकर, मराठवाडा विभागाचे सत्तारभाई पटेल, शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत पंके, डॉ. गौतम जगताप, वैराग शाखाध्यक्ष काकासाहेब कोरके, उपाध्यक्ष गोविंदराव पंके, सचिव विद्याधर गव्हाणे, नानासाहेब पाटील, प्रकाश गुंड, अरुण कुलकर्णी, काकासाहेब पाटील व शेतकरी उपस्थित होते.
      पुढे बोलतांना सदाभाऊ खोत म्हणाले, सर्व आमदार, खासदार, मंत्री यांना येरवडा जेलमध्ये घालून त्यांची नार्को चाचणी करा आणि पहा भारत देशात सोन्याचा धुर निघेल. वालचंद साखर कारखान्यासारख्या खाजगी कारखान्याला सहकारी करणारे कुठे आणि सहकारी कारखाने बंद पाडून खाजगी करणारे कुणीकडे. उजनी धरण बांधण्यापूर्वी चंद्रभागेत हाताची ओंजळ करुन पांडूरंगा मला माफ कर असे म्हणणारे यशवंतराव कुणीकडे आणि त्यांच्याच विचारानं राजकारण करतो म्हणत उभ्याने धारची भाषा वापरणारे कुणीकडे आहेत. वीजेचा प्रश्‍न, पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न, उसाच्या दराचा प्रश्‍न, शेती मालाच्या हमीभावाचा प्रश्‍न असे अनेक प्रश्‍न आहेत. सहकार चळवळ उध्वस्त करुन सहकारी साखर कारखाने बंद पाडले आहेत व स्वत:चे खाजगी साखर कारखाने उभे केलेत त्यांना जाब विचारला पाहिजे. शेतकर्‍यांनी कष्टाने ऊस जगवला आणि या साखर कारखानदारांना दिला परंतु कोणी दोनशे, कोणी पाचशे रुपये दर कमी देऊन खिसा कापला. एकीकडे हेच कारखानदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कोट्यावधी रुपये कर्ज घेत आहेत व त्यामुळे शेतकर्‍यांना कर्जपुरवठा होत नाही. बंद पडलेला भोगावती सहकारी साखर कारखाना आम्ही चालविण्यास तयार आहोत त्यापूर्वी संचालकांची घरंदारं लिलावात काढा आणि पूर्णपणे कर्जमुक्त करा, अशी मागणी आमची राहील असेही त्यांनी यावेळी म्हटले.
     तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात आर्यन व इंद्रेश्वर साखर कारखान्याने शासनाच्या हमीभावाप्रमाणे रक्कम मिळावी, बार्शी फळ व भाजीपाला मार्केटध्ये १० टक्के आडत घेतली जाते ती बंद करावी, वीज मंडळाकडून होणारे भारनियमन बंद करावे, उजनीचे पाणी मिळावे, नदीवर बंधारे बांधले त्यात पाणी सोडावे, आजारी साखर कारखाने सुरु करावे, विविध घोटाळ्यांची चौकशी व्हावी, दुष्काळी पॅकेजचे सहाय्य मिळावे, ठिबक सिंचन व स्प्रिंकलर सेट देण्यात यावे, वृध्द शेतकर्‍यांना मासिक पेन्शन, निराधार लाभार्थ्यांची शासनाची सहाय्यता निधी बंद असल्याने त्याची चौकशी करावी, जिल्हा मध्यवर्तीकडून शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करावा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Labels:

डेंग्यू - उपाय व बचाव

मुंबईत 11 जणांना डेंग्यूची लागण, पंढरपूरात डेंग्यूने 5 जण त्रस्त्त अशा हेडलाईन कांही वृत्तपत्रात झळकल्या. दि. 10 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत पंढरपूरात कार्तिकी यात्रा भरत आहे. लाखो वैष्णवजणांच्या या मेळाव्यात भाविकांना याची लागण न व्हावी याची दक्षता प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.
    जनतेने केवळ प्रशासनावरच अवलंबुन न राहता डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी त्यात सक्रीय सहभाग नोंदविण्याची आवयकता आहे. डेंग्यू बाबत जनतेने सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. डेंगी म्हणजे काय ?  तो कशापासून होतो  ? त्याची लक्षणे कोणती ?  त्यावर करायचे उपाय आदी बाबींचा केलेला हा उहापोह....
        डेंग्यू ताप हा आजार विशिष्ठ विषाणूंमूळे होतो. डेंग्यूचा प्रसार एडीस एजिप्टाय या नावाच्या डासापासून होतो. या डासाची उत्पत्ती साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होते. यामध्ये प्रामुख्याने इमारतीच्या टाक्यातील पाणी, सिमेंटच्या टाक्यातील पाणी, रांजणातील पाणी तसेच प्लास्टिकच्या बादल्या, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंटया, घरातील शोभेच्या कुंडया, फुलदाण्या, निरोपयोगी टायर्स, कुलर आदी मध्ये साठलेल्या पाण्यावर या डासाची उत्पत्ती होते. जनतेने कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त दिवस साठवुन ठेऊ नये. अन्यथा त्यामध्ये डास अंडी घालतात व त्या अंड्याचे रुपांतर पुन्हा डासात होते हे रुपांतर होऊ नये यासाठी पाणी आठ दिवसापेक्षा जास्त दिवस साठवु न देता याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
       ठिकठिकाणी पाणी साठविण्याची लोकांची वृत्ती दिसून येते. या वृत्तीमूळे अशा साठविलेल्या पाण्यात हे डास अंडी घालून डासोत्पत्ती करतात. या डासांची उत्पत्ती कमी करणे अथवा नियंत्रित करणे यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय या आजाराचे नियंत्रण शक्य नाही. हा आजार झाल्यानंतर रुग्णामध्ये प्रामुख्याने पुढील लक्षणे आढळतात : - तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखी, सांधे दुखी, उलट्या होणे, डोळयांच्या आतील बाजुस दुखणे, अंगावर पुरळ, भुक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, अशक्तपणा, रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होणे आदी लक्षणे दिसतात.
रक्तस्त्रावयुक्त डेंग्यू तापाची लक्षणे - रक्ताची उलटी होणे, पोट दुखणे, काळसर रंगाची शौचास होणे, त्वचेखाली नाकातून रक्तस्त्राव होणे, रक्तजलाचे प्रमाण कमी होऊन रुग्ण अस्वस्थ होणे, बेशुध्द होणे या गंभीर बेशुध्द अवस्थेला डेंग्यू शॉक सेंड्रोम असे म्हणतात. यामध्ये कदाचित रुग्णाचा मृत्यु होऊ शकतो. इतर कोणत्याही उपचारापेक्षा डेंग्यू शॉक सेंड्रोम व डेंग्यू हिमोरेजिक फिवर  (रक्तस्त्रावासह डेंग्यू ताप)  या रुग्णांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे आवश्यक आहे.
डासोत्पत्ती कमी करणे :- या डासांची पैदास प्रामुख्याने अस्वच्छ घरामध्ये व भोवताली साठलेल्या व साठविलेल्या पाण्यातच होत असल्याकारणाने वरील परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. घरातील कुलर वापरात नसेल तर त्यातील पाणी काढून नीट सुकवून ठेवावा. पाण्याची भांडी दर आठवड्यातून किमान  एकवेळ  रिकामी  करुन  घासुन - पुसुन  कोरडी  करुन पुन्हा वापरावीत. भरलेली भांडी झाकुन ठेवावीत. गप्पी मासे हे डासांच्या आळ्या खातात त्यामूळे घरातील हौदात, पडीक विहिर तसेच कारंजे यामध्ये सोडावेत. जेणेकरून डासाचे प्रमाण कमी होईल. डासांना पळविणारे क्रीम, मच्छरछाप अगरबत्त्या, तेल तसेच अंग झाकणारे कपडे वापरावेत. घराच्या खिडक्यांना व संडासच्या व्हेंट पाईपना जाळ्या बसवाव्यात तसेच रुग्णांनी स्वत:च्या मनाने औषध सेवन न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या डेंग्यू बाधित रुग्णांसाठी  शासकीय रुग्णालयात उपचारांची सोय करण्यात येते.
      एखाद्या गोष्टीच्या यशस्वीतेसाठी लोक सहभागाशिवाय आवश्यक आहे. लोकसहभागाशिवाय कोणतीही योजना, राष्ट्रीय कार्यक्रम, मिशन अथवा अभियान यशस्वी होत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोलीओ मुक्त भारत.  पोलीओ  निर्मुलनासाठी देशातील जनतेने आपला सक्रीय सहभाग दिल्याने या आजाराचे समुळ उच्चाटन करणे शक्य झाले आहे. आज जवळपास संपूर्ण देश पोलीओ मुक्तीच्या दिशेने वाटचाल करतो आहे. जनतेचा सहभाग व शासकीय यंत्रणांनी एकमेकांच्या हातात हात घालुन काम केल्यास या रोगापासून मुक्ती दूर नाही. लक्षात घ्या, "एडीस एजिप्टाय " या डासाची निर्मिती होऊ न देणे हाच डेंग्यू वरील सर्वात प्रभावी व उत्तम बचाव होऊ शकतो.

फारुक र. बागवान
माहिती सहाय्यक
उप माहिती कार्यालय, पंढरपूर

                               

Labels:

चारचाकी वाहनधारकांना नांव नोंदणीबाबत आवाहन

सोलापूर : चारचाकी वाहनाच्या नवीन नोंदणीसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 13 बीएन ही मालिका आज दि. 29 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनासाठी नोंदणी क्रमांक राखीव ठेवायचा आहे. अशा वाहनधारकांनी कार्यालयाने विहित केलेल्या शुल्काची रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे आजच (29 ऑक्टोबर) सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत कार्यालयीन मुख्य लिपिक श्री. व्हटकर यांचयाकडे जमा करावी.
    एखाद्या विशेष क्रमांकासाठी एका पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लिलाव पध्दतीने क्रमांकाचे वाटप करण्यात येईल. अर्जदाराने आपला डिमांड ड्राफ्ट राष्ट्रीयकृत अथवा शेड्युल्ड बँकेतुन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  ( Dy. RTO Solapur) या नांवे काढावा.
    तसेच ब्रेकींग सिस्टिम न बसविलेल्या अग्रीकल्चर ट्रेलरची नोंदणी बंद करण्यात आली होती. मात्र 17 ऑक्टोबर 2013 च्या अधिसूचनेनुसार सदर बंदी उठविण्यात आली असून अशा प्रकारची ब्रेकींग यंत्रणा नसलेल्या अग्रीकल्चर ट्रेलर्सच्या नवीन नोंदणी 31 ऑगस्ट 2014 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, दिपक पाटील यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.

Labels:

दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारकांसाठी 6955 क्विंटल साखर मंजुर

सोलापूर -: सोलापूर जिल्ह्यातील (ग्रामीण) दारिद्रय रेषेखालील पिवळ्या कार्डधारकांसाठी 6955 क्विंटल नियंत्रीत साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. ही साखर नोव्हेंबर 2013 या महिन्यात उचलावी व याच महिन्यात पात्र शिधापत्रीकाधारकांना प्रती व्यक्ती 500 ग्रॅम साखर वितरीत करण्यात यावी. माहे नोव्हेंबर 2013 करीत साखर कारखाना निहाय प्राप्त एकत्रीत नियतनाचा तपशील पुढीलप्रमाणे. 1) सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सह. साखर कारखाना (अकलुज) 1757 क्विंटल, 2) भैरवनाथ शुगर वर्क्स, विहाळ, ता. करमाळा 880 क्विंटल, 3) भिमा सहकारी साखर कारखाना, टाकळी सिकंदर, ता. मोहोळ 774 क्विंटल, 4) लोकनेते बाबुराव पाटील सह. सा. कारखाना अनगर, ता. मोहोळ 2368 क्विंटल, 5) सासवड माळी शुगर फॅक्टरी, माळीनगर, ता. माळशिरस 873 क्विंटल, 6) संत दामाजी सह. साखर कारखाना, मंगळवेढा 7 क्विंटल व 7) विठ्ठल शुगर मॅन्युफॅक्चरिंग, म्हैसगाव ता. माढा 336 क्विंटल.
     तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे उत्तर सोलापूर 269क्विंटल, दक्षिण सोलापूर 703 क्विंटल, अक्कलकोट 877 क्विंटल, बार्शी 1107 क्विंटल, मोहोळ 523 क्विंटल, माढा 560 क्विंटल, करमाळा 651 क्विंटल, पंढरपूर 438 क्विंटल, माळशिरस 760 क्विंटल, सांगोला 620 क्विंटल व मंगळवेढा 447 क्विंटल इतकी साखर देण्यात येणार आहे.
वरीलप्रमाणे मंजुर नियंत्रीत साखर दिनांक 31 ऑक्टोबर 2013 अखेर मुदत आहे. तथापी कार्डधारकांना वेळेवर साखर उपलब्ध व्हावी यासाठी सदरची साखर 31 ऑक्टोबर तारखेपूर्वी उचल करावी. जे साखर कारखाने केंद्र शासनाने मंजुर केलेले साखरेचे नियतन उपलब्ध करुन देणार नाहीत त्यांच्या विरुध्द जीवनावश्यक वस्तु कायदा 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करुन गोदामातील साखर जप्त करुन तहसिलदारांनी संबंधित तालुक्याला वितरीत करावी असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
     त्याचबरोबर सर्व तहसीलदारांनी अपात्र शिधापत्रीकाधारक, बोगस शिधापत्रीका किंवा त्याच शिधापत्रीकेवर दुबार किंवा त्यापेक्षा जादा वेळा साखर दिली जाणार नाही व साखरेचा अपहार व गैर मार्गाने विल्हेवाट लावली जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

Labels:

दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ

उस्मानाबाद -: दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात  सर्व विभाग व कार्यालय प्रमुखांना प्रतिज्ञेचे वाचन करुन शपथ दिली.  कार्यक्षेत्रात सचोटी व पारदर्शकता आणण्याची, भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करण्याची, आपले कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडण्याची आणि भय व पक्षपाताविना कार्य करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी सर्वश्री बी.एस. चाकूरकर, के. ए. तडवी, शिल्पा करमरकर, राम मिराशे, तहसीलदार सुभाष काकडे, नगरपालिका प्रशासनाचे प्रकल्प अधिकारी श्री. कुर्वलकर, तहसीलदार राजश्री मोरे यांच्यासह विविध खात्याचे कार्यालय प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. 

Labels:

स्त्रीशक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

उस्मानाबाद :- अनाथ, निराधार, निराश्रित बालके, अत्याचार पिडीत महिला यांच्यासाठी कार्य करणा-या महिला, स्वयंसहायता गट, कृषी आणि ग्रामीण रोजगार, पर्यावरण संरक्षण, महिला सशक्तीकरण, महिलांचे आरोग्य, कला व सांस्कृतिक कार्य, चेतना विकास आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांना केंद्र शासनाच्या वतीने स्त्री शक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तीन लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
    देवी अहिल्याबाई होळकर, कण्णगी, माता जिजाऊ, राणी गैंदील्यु जेलीयांग, राणी लक्ष्मीबाई आणि राणी रुद्रम्मा देवी यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्कारासाठी संबंधित क्षेत्रातील मागील ५ वर्षांचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल.
    इच्छुक पात्रताधारक महिलांनी त्यांचे अलिकडील पासपोर्ट साईज फोटो, आवश्यक कागदपत्रे यासह चार प्रतीत प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयाकडे दिनांक 10 नोव्हेंबरपर्यत सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वैभव सूर्यवंशी यांनी केले आहे. संबंधितांनी त्यांचे प्रस्ताव  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, गाळा क्रमांक 15, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद येथे पाठवावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.

Labels:

खाजगी अनुदानीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सूचना

उस्मानाबाद :-  खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे माहे नोव्हेंबरचे देय डिसेंबर 2013 चे मासीक वेतन देयक शालार्थ योजनेतून करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. तरी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी याची नोंद घेऊन शाळा निहाय/कर्मचारी निहाय माहिती  अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय, उस्मानाबाद येथे 5 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत दाखल करावी, असे  शिक्षणाधिकारी (मा.) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
     संबंधितांनी वेळेत माहिती सादर न केल्यास विलंबाची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापक व प्राचार्यावर राहील, याची संबधितांनी नोंद घ्यावी.  याबाबत मार्गदर्शक सूचना अधीक्षक वेतन व निधी पथक कार्यालय, उस्मानाबाद येथे सूचना फलकावर डकविण्यात आल्या आहेत.

Labels:

रब्बी ज्वारी व हरभरा पिकासाठी पीक विमा योजनेस मुदतवाढ

उस्मानाबाद :- हवामानावर आधारीत पथदर्शक पिक विमा योजना जिल्ह्यासाठी रब्बी करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत रब्बी हंगाम 2013-14 मधील रब्बी ज्वारी व हरभरा पिकासाठी विमा प्रस्ताव बँकेत भरण्यासाठी शेतक-यांना दि. 31 ऑक्टोबर,2013 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  या योजनेतून अवेळी पाऊस, तापमान (कमी/ जास्त) व आर्द्रता या घटकापासून समाविष्ट पिकांना होणा-या नुकसानीसाठी संरक्षण मिळणार आहे. शेतक-यांनी विमा हप्ता म्हणून भरावयाची रक्कम रब्बी ज्वारी व हरभरा या पिकासाठी  रक्कम बँकेत भरुन पिक संरक्षित करावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या  योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक लातूर विभाग, लातूर यांनी केले आहे.     

Labels:

श्रीगुरु रामचंद्र बोधले महाराज सेवा पुरस्काराचे वितरण

कळंब (बालाजी जाधव)  : डिकसळ (ता. कळंब) येथील श्रीगुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थानच्या वतीने सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात आले.
    यावेळी या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संत पीठाचार्य गुरुवर्य ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, युवा नेते अक्षय मुंदडा, ह.भ.प. चैतन्य महाराज देगलुरकर, हनुमंतराव आवाड, ह.भ.प. रामकृष्ण रंधवे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीमती गजराबाई बोधले यांचा अमृत महोत्सवानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला.
     पत्रकार उन्मेष पाटील यांना विशेष पत्रकारीता सेवा पुरस्कार त्याचबरोबर सुभाषराव काकडे, अनंतराव जगताप, चंद्रकांत साबळे यांना सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याचबरोबर अन्नदान सेवा पुरस्काराने बंडोपंत दशरथ, प्रभाकर  शिंदे यांना तर भजनसेवा पुरस्काराने ह.भ.प.भगवान इंगळे, अनंतराव वाघ, गोवर्धन पाटील, अशोक ठोंबरे, नारायण भिसे यांचा सन्मान केला.
    सन्मान सेवा पुरस्काराने मधुकर काळे, बलभिम धाकतोडे, सुनिताताई आडसुळ, सुशीलाताई देशमुख, सिंधूबाई देशमुख, श्रीमती छायाताई बोंदर, अंकुश मुंडे, सुदाम पाटील यांना गौरविण्यात आले.
    यावेळी श्रीगुरु रामचंद्र बोधले महाराजांच्या समाधीवर फुले उधळून पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वेदपाठक सर यांनी केले तर आभार संस्थानचे उत्तराधिकारी ह.भ.प.परमेश्वर महाराज बोधले यांनी मानले.

Labels:

बॉम्‍ब पेरणी


Labels:

मुंबई-दिल्‍ली विशेष रेल्‍वे

नवी दिल्‍ली : मुंबई ते दिल्‍ली मार्गावरील प्रवाशांच्‍या वाढत्‍या गर्दीवर मात करण्‍यासाठी भारतीय रेल्‍वेने या मार्गावर विशेष रेल्‍वेगाडी सोडण्‍याचे ठरविले आहे. वातानुकूलित असणा-या या गाडयांसाठी तिकीटभाडे जास्‍त असणार आहे. प्रवाशांची सोय होण्‍याबरोबरच रेल्‍वेचा तोटा कमी करण्‍याचा उपाय म्‍हणूनही या योजनेकडे रेल्‍वे मंत्रालय पाहत आहे. केवळ मुंबई-दिल्‍लीच नव्‍हे तर दिल्‍ली-कोलकाता मार्गावरही अशी रेल्‍वेगाडी चालविण्‍यात येणार आहे. वातानुकूलीत श्रेणी 2 व वातानुकूलीत श्रेणी 3 हे विशेष रेल्‍वेगाडीला असतील. विमानाच्‍या तिकीट दराचा विचार करुन मुंबई-दिल्‍ली व दिल्‍ली-कोलकाता मार्गावरील या विशेष रेल्‍वेगाडीचे तिकीटभाडे ठरविण्‍यात येणार असल्‍याचे रेल्‍वे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. सुरुवातीला दोन मार्गावर राबविण्‍यात येणारी ही योजना यशस्‍वी ठरली तर देशातील गर्दीच्‍या अन्‍य मार्गावरही सदर योजनेचा कित्‍ता गिरविला जाणार आहे.

Labels:

प्रेमात पडलेला माणूस होतो संथ

सिएटल : मानवी सहजीवनामध्‍ये प्रेमाला अनन्‍यसाधारण असे महत्‍त्‍वाचे स्‍थान आहे. प्रेमाशिवाय जीवनाची कल्‍पनाही करता येणे शक्‍य नाही. एखादा माणूस जेंव्‍हा प्रेमात पडतो तेंव्‍हा त्‍याच्‍यामध्‍ये जसे काही मानसशास्‍त्रीय बदल होतात तसे भौतिक आणि शारीरिकदृष्‍टयाही तो आमुलाग्र बदलतो. हे आता वैज्ञानिक प्रयोगातून देखील स्‍पष्‍ट झाले आहे.
    आपल्‍या प्रेयसीसोबत फिरत असताना प्रियकराची चालण्‍याची गती ही सात टक्‍क्‍याने कमी होत असल्‍याचे संशोधनातून स्‍पष्‍ट झाले आहे. 'सिएटल पॅसिफीक' विद्यापीठात काम करणा-या कारा वॉल श्‍केफलर आणि त्‍यांच्‍या सहका-यांनी केलेल्‍या संशोधनातून ही अनोखी बाब समोर आली आहे. यासाठी संशोधकांनी आपल्‍या प्रेयसीसोबत बागेत फिरणा-या असंख्‍य प्रियकरांच्‍या चालण्‍याच्‍या गबतीचा अभ्‍यास केला होता. एरव्‍ही आपल्‍या मित्रासोबत चालताना मात्र अगदी गोगलगाय होऊन जातात. यामागे विविध मानसशासत्रीय कारणे असल्‍याचेदिसून आले आहे. याआधीही ब्रिटनमधील संशोधकांनी असेच संशोधन केले होते. तेंव्‍हा मात्र त्‍यातून फारसे समाधानकारक निष्‍कर्ष हाती आले नव्‍हते. या नव्‍या संशोधनामुळे मात्र प्रेमाचा 'सायकोलॉजिकल लोचा' संशोधकांना समजला आहे. तसेच त्‍याचे व्‍यक्‍तीच्‍या शरीराव देखील परिणाम होत असल्‍याचे सिध्‍द झाले आहे.

Labels:

Sunday, 27 October 2013

'फेसबुक' च्‍या झुकेरबर्गला जगातील सर्वाधिक पगार

न्‍यूयॉर्क : 'फेसबुक' चा संस्‍थापक मार्क झुकेरबर्ग याला जगातील सर्वाधिक पगार मिळतो. कंपनीने 2012 साली त्‍याला 2.3 अब्‍ज डॉलर्स एवढा पगार दिला आहे.
    'जीएमआय रेटिंग' या सर्वेक्षण कंपनीने अमेरिकेत सर्वाधिक पगार, भत्‍ते आणि इतर लाभ घेणा-या मुख्‍य कार्यकारी अधिका-यांची (सीईओ) यादी जाहिर केली आहे. 'जीएमआय रेटिंग' ने ही आकडेवारी या सीईओंना 2012 या एका वर्षात त्‍यांच्‍या कंपनीकडून मिळालेल्‍या उत्‍पन्‍नावरुन बनविण्‍यात आली आहे. 'जीएमआय रेटिंग' ने 2 हजार 200 सीईओबाबत माहिती घेतली असून त्‍यांची क्रमवारी निश्चित केली आहे. यामध्‍ये झुकरबर्ग अमेरिकेतील सर्वाधिक पगार घेणार मुख्‍य कार्यकारी अधिकारी ठरला आहे. अमेरिकेतील सीईओंनी 2012 या वर्षात एकत्रितपणे 4.7 अब्‍ज डॉलर्स रुपये आपल्‍या घरी नेले आहे. हे त्‍यांचं अधिकृत उत्‍पन्‍न आहे.

Labels:

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पांगरी -: एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवार दि. 27 ऑक्‍टोबर रोजी ताडसौदणे (ता. बार्शी) येथे घडली. आत्‍महत्‍या करण्‍याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
    सौ.सविता गंगाधर सातपुते (वय 33 रा.ताडसौदणे, ता. बार्शी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहीतेचे नांव आहे. बालाजी भास्कर कोचाळे यांनी पोलिसात खबर दिल्‍यावरुन पांगरी पोलिसात आकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्‍यात आली आहे.अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.

Labels:

उक्‍कडगाव येथे महाविद्यालयाच्‍या वास्‍तुचे थाटात उदघाटन

पांगरी (गणेश गोडसे)  :  रविवार दि. 27 ऑक्‍टोबर रोजी बार्शी तालुक्‍यातील उक्कडगांव येथे संकल्प बहुउद्देशिय सेवा संस्था लातुर संचलित डॉ. चंद्रभानु सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय उक्कडगांव येथील महाविद्यालयाच्या वास्तुचे उदघाटन व अभासी वर्गाच्या इमारतीच्या पायाभरणी सोहळयाच्या कार्यक्रम पार पडला. 
         यावेळी कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे होते. तर पंशुवर्धन, दुग्धविकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री ना. मधुकररावजी चव्हाण, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सोलापुरचे पालकमंत्री ना. दिलीपराव सोपल, शिक्षक आमदार विक्रम काळे, संस्थाध्यक्ष संजीव सोनवणे, सचिव अविनाश मोरे, कार्यकारी अध्यक्ष मोईज शेख, डॉ.विष्णुपंत गोरे, शरद निलंगेकर, बसवेश्‍वर भुसे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेरमन एस. आर. देशमुख, प्राचार्य विशाल जमाले, तेरणाचे अध्यक्ष लक्ष्मण मोरे, भागवत धस, सुरेश बिराजदार, विक्रमसिंह चव्हाण, रामदास पवार, सतिश पाटील, सहाय्यक पोलीस शरद मेमाणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
      सोलापुरचे पालकमंत्री दिलीप सोपल यावेळी बोलताना म्हणाले की, या संस्थेने जागेची निवड अतिशय नियोजनबध्‍द पदधतीने केली असुन यापुढे ग्रामीण भागातुन व या डोंगरद-यांमधुन डॉक्टर, इंजीनियर यासह समाज घडवणारे शिक्षक तयार होऊन त्याचा समाजाच्या विकासाला मोठा हातभार लागुन विदयार्थी तयार होणार आहेत. तसेच हे संकुल हे जिवन शिक्षण देणारे शैक्षणिक संकुल ठरेल असे म्हणुन त्यांनी आपल्या शालेय जिवनातील आठवणींना उजाळा दिला.
    उस्मानाबादचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यावेळी म्हणाले की, पुर्वीच्या काळात गुरूकुल पदधतीची सोय असायची. गुरूकुल शिक्षणपदधतीमधुन अनेक विदयार्थी तयार होत असत. त्याच धर्तीवर डोंगराच्या कुशित शाळेची निर्मिती करून विदयार्थांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्याची शारिरीक वैयक्तिक प्रगतीही साधन्याचे प्रयत्न होत असल्याबदल समाधान व्यक्त करून संस्थेला आवश्यक ती मदत करण्‍याचे आश्‍वासन दिले.
    आपल्‍या अध्‍यक्षीय भाषणात बोलताना दिलीपराव देशमुख म्‍हणाले की,  चांगले झाड येण्‍यासाठी जसे आपण चांगल्या रोपवाटीकेतील रोपे निवडतो तेव्हाच भविष्यात चांगली फळे, फुले मिळू शकतात. त्यासाठी अगोदर निवड महत्वाची ठरते. म्हणुन निवडताना चांगलेच निवडणे गरजेचे असते व खेळासह शिक्षणाची सांगड घालुन विद्यार्थी घडवण्‍याची जबाबदारी चांगल्या पध्‍दतीने पार पाडली जात असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.
    यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे यांचेही समायोचित भाषण झाले. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती व डॉ.चंद्रभानु सोनवणे यांच्या प्रतिमा पुजनाने करण्‍यात आली. संस्थाध्यक्ष संजीव सोनवणे यांनी विद्यालयासंदर्भात माहिती देऊन भविष्यात काय करण्‍यात येणार आहे याविषयी विवेचन केले. कार्यक्रम यश्स्वी करण्‍यासाठी प्रा.विशाल गरड यांच्यासह संस्थेतील इतर प्राध्यापक शिक्षक कर्मच-यांनी परिश्रम घेतले. आभार संस्थेचे सचिव अविनाश मोरे यांनी मानले.

Labels:

मांडवल्यामुळे दलित चळवळ बदनाम : मच्छिंद्र सकटे

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : दलित चळवळीतील कार्यकर्ते केवळ पैशासाठी आंबेडकरी विचारांची मोडतोड करीत आहेत. दलितांच्या न्याय हक्काच्या प्रश्‍नावर कार्यकर्ते मांडवल्या करीत असल्याने आंबेडकरी चळवळ बदनाम होत आहे व ही गोष्ट दलित समाजाला मुळीच परवडणारी नाही त्यामुळे विचारी, प्रामाणिक अन् स्वाभिमानी कार्यकर्त्यांची आज गरज आहे, असे मत दलित महासंघाचे संस्थापक मच्छिंद्र सकटे यांनी व्यक्त केले.
    बार्शी येथील शासकिय विश्रामगृहावर पत्रकारांशी वार्तालाप करतांना ते बोलत होते. यावेळी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल अवघडे, शहराध्यक्ष सुनिल झोंबाडे, तालुकाध्यक्ष निलेश खुडे, संपर्क प्रमुख अजय चव्हाण, पिंटू सरवदे, राजन मेटके, अंकुश सरवदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
      पुढे बोलतांना सकटे म्‍हणाले, पश्‍चिम महाराष्ट्रातील दलितांची सर्वात मोठी सामाजिक संघटना आहे. फुले, शाहू, आंबेडकर, आण्णाभाऊ यांचा विचार हा या संघटनेचा पाया आहे. दलित महासंघामध्ये अनेक जातींचे लोक आहेत. यात धनगर, माळी, रामोशी, होलार, चर्मकार, नाभीक, मराठा, भटके यासह विविध जातींचे लोक आहेत. मातंग हा या संघटनेचा आधार आहे. सन १९८९-९० मध्ये दलित पँथरच्या बरखास्तीनंतर दलित समाजात संघटनात्‍मक पोकळी निर्माण झाली होती. ती या संघटनेच्या माध्यमातून भरुन काढण्याचे काम केले. आज या संघटनेला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. जो समाज कधी चळवळीत उतरला नाही अशा समाजातील हजारो तरुण कार्यकर्ते आज राज्यभर रस्त्यावर येऊन न्याय हक्कासाठी लढाई करत आहे. परंतु आज परिस्थिती खूपच बदलली आहे. सर्वत्र सुरु असलेल्या चळवळीत पैशालाचा जास्त महत्व आले आहे. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढून पुन्हा एकदा दलितांच्या न्याय हक्काची लढाई तीव्र करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने दलित महासंघ प्रयत्नशील आहे. आगामी लोकसभा निवडणुकांबाबत पण मला फार भिती वाटू लागली आहे कारण ४ वर्षे ११ महिने माझ्यासोबत काम करणारे कार्यकर्ते या १ महिन्यात गुलाल तिकडे चांगभले म्हणतांना दिसत असल्याने निवडणुका आल्या म्हटले की त्याची भिती वाटते. या पार्श्‍वभूमीवर मी म्हणेल लोकशाहीमध्ये मत हे केवळ मूळच नाही तर शस्त्र आहे. या शस्त्राची किंमत हजार पाचशे केली जाते, ती चुकीची प्रथा आहे. दलित समाजाला माझे आवाहन आहे की मताचा लिलाव करु नका, मत हे शस्त्र आहे अन्याय करणा-यांविरुध्द व जबाबदारीने वापरले पाहिजे, असेही ते शेवटी म्‍हणाले.

Labels:

अन् विरेशमुळे मिळाले सापाला जीवदान ...

पांगरी (गणेश गोडसे) : वेळ भर दुपारी बाराची. रस्त्यांवर दोन-तिनशे लोकांचा धीरगंभिर, माणसांचा जमाव, हातात काठया दगड घेऊन तयारीत उभा. आता काय करायचे हया एकाच विवंचनेत सर्व जमाव. एरव्ही एखादया घटनेची माहिती मिळाल्यानंतरही घटनास्थळावर उशिरा पोचणारा अशी  पोलिसांची समाजातात ओळख निर्माण होत असताना पांगरी (ता.बार्शी) येथील एका घटनेत पोलिसाने आपल्या कार्यतत्परतेची एक वेगळीच चुणूक दाखवुन अनेकांना आश्‍चर्य केल्‍याची घटना पांगरीत घडली. पोलिसही मदतीला तात्काळ धावुन जाणारीच यंत्रणा असल्याचे यावरुन सिध्‍द होत आहे.
   पांगरी पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या व मुळ अक्कलकोट येथील रहिवाशी असलेल्या विरेश कलशेट्टी या धाडसी पोलिस कर्मचा-याने उपस्थित दोन-तिनशेच्या जमावातुन मार्ग काढुन पुढे जावुन पहाण्‍याच्या प्रयत्न केला. तर एकाच्या घरात साप घुसल्याचे त्यांना समजले. कलशेट्टी या कर्मचा-याने आपल्या जिवाची बाजी लावुन साप असलेल्या घरात सरळ प्रवेश करून सापाच्या शेपटीला धरून त्याला खेळवत ते घराबाहेर घेऊन आले व नंतर तो साप त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात सोडुन दिला.
    दुपारी अचानक एकाच्या घरात साप घुसला. घरातील महिला पुरूष व लहान बालकांनी एकच गलका करत साप साप पळा पळा असे म्हणत घरातुन काढता पाय घेतला. कांही काळाने साप घराबाहेर निघेल अशी अशी अपेक्षा धरून ते घराबाहेर उभे राहीले. मात्र साप कांही बाहेर येण्‍याचे नांव घेत नव्हता. घरासमोर तरूणांचा मोठा जमाव, हातात दगड काठया व इतर साहित्य घेऊन सापाला मारण्‍यासाठी उभा होता. पण साप कपाटाखाली जावुन बसलेला असल्यामुळे पुढे जाण्‍यास कोणीही धजावत नव्हते. तशातच एकाने येऊन हा साप देवाचा असल्यामुळे मारणे महापाप ठरेल असे सांगितल्यामुळे उपस्थितांनी आपल्या काठया म्यान केल्या. मात्र आता प्रश्‍न होता की साप घराबाहेर काढायचा कसा. मात्र दरम्यान कलशेट्टी या धाडसी पोलीस तरूणाने आपल्या जिवाची पर्वा न करता लोकांकडुन घटनेची माहिती घेऊन कपाटाखालील साप घराबाहेर काढुन निसर्गाच्या सानिध्यात सोडुन दिला व घरमालकांने सुटकेचा निश्‍वास सोडला. आपल्या जिवावर उदार होऊन व प्राणाची बाजी लावुन साप घराबाहेर काढल्याबदल कलशेटी यांचे सर्वस्तरांमधुन अभिनंदन होत आहे. तसेच त्यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेबदल घरमालकांनी त्यांचे आभार मानले.

Labels:

(अप) प्रचार


Labels:

सोलापूर-मुंबई एक्सप्रेसचा रेल्वेमंत्र्याच्‍या हस्ते शुभारंभ

सोलापूर -: सोलापूर-मुंबई एक्सप्रेस  सुरु करण्याबाबत 35 वर्षापासूनची प्रवाशांची मागणी होती. केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नामुळे सुरु होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जून खरगे यांनी केले.
    सोलापूर-मुंबई एक्सप्रेस या रेल्वेचा शुभारंभ
रेल्वेमंत्री मल्लिकार्जून खरगे यांच्‍या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी आ. दिलीप माने, आ. प्रणिती शिंदे, महापौर श्रीमती अलका राठोड, माजी मंत्री सिध्दराम म्हेत्रे, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक बी. पी. खरे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलतांना खरगे म्हणाले की, या 12 डब्याच्या गाडीसाठी सुमारे 22 कोटी रुपये खर्च आला आहे. सुशिलकुमार शिंदे साहेबांनी ही सोलापूरकरांना दिलेली भेट असल्याचे सांगितले. सोलापूर- यशवंतपूर या रेल्वे गाडीचा यापूर्वीच शुभारंभ करण्यात आला. ती गाडी आठवड्यातुन 3 दिवस होती ती आता दररोज धावत आहे व ही गाडी चांगली चालत आहे. त्याप्रमाणे सोलापूर मुंबई गाडीही चांगली चालेल प्रवाशांना सोईबरोबरच रेल्वे विभागासही फायदा होईल असा विश्वास खरगे यांनी व्यक्त केला.
    रेल्वे ही भारतामध्ये सर्वांना जोडणारी आहे. कन्याकुमारी ते कश्मिर रेल्वे सेवा सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचेही श्री खरगे यांनी सांगितले. रेल्वेने दररोज 2 कोटी 25 लाख लोक प्रवास करतात. अशा या रेल्वेची सुरक्षा करणेही आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगितले.
    विजापूर - मंगळवेढा रेल्वे मार्गाचे लवकरच सर्वेक्षणाचे काम केले जाईल. सोलापूर रेल्वे स्टेशनचा मास्टर प्लॅन व रेल्वे विभागाच्या विविध मागण्यांकडे विशेष लक्ष देऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही श्री. खरगे यांनी दिली.
    याप्रसंगी बोलतांना केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, दिवाळीपूर्वी सोलापूर-मुंबई ही गाडी सुरु करुन सोलापूरकरांना दिवाळी भेट देण्याची इच्छा होती ती रेल्वे मंत्री खरगे यांच्यामुळे आज पूर्ण होत आहे. 30 वर्षापूर्वी सुरु झालेल्या सिध्देश्वर एक्सप्रेसला आरक्षण मिळत नव्हते त्यामुळे अन्य गाड्यांनी प्रवास करावा लागत असे. सिध्देश्वरचे डबे व प्रथम श्रेणी वाढविली पण गर्दी कमी होत नव्हती. त्यामुळे या नवीन रेल्वेची रेल्वे मंत्र्यांकडे बजेटच्या वेळी मागणी केली होती. त्यानुसार ही गाडी जाहीर झाली व. खरगे यांनी लक्ष दिल्यामुळे ही गाडी आज सुरु होत असल्याचे सांगितले.
    सोलापूर-अजमेर या मार्गावर ही गाडी लवकर सुरु करण्यात यावी. तसेच सोलापूर-नागपूर व सोलापूर-जळगाव या मार्गावरही रेल्वे सुरु व्हावी अशी मागणी केली. तसेच पंढरपूर-मंगळवेढा-विजापूर रेल्वे मार्गाचे लवकर सर्वेक्षण व्हावे. मध्य रेल्वे विभागाचे सोलापूर येथे चांगले स्टेशन व्हावे अशी मागणी गृहमंत्री शिंदे यांनी केली.
    सोलापूरला नवीन 200 बसेस आले पाहिजेत यासाठी पाठपुरावा सुरु आहे. तसेच वातानुकुलीत व्हाल्वोच्या 20 बसेसही मिळाल्या आहेत. रस्तेही चांगले होत आहेत. त्याचप्रमाणे पंढरपूरचाही नवीन आराखडा करण्यात येत असल्याचे गृहमंत्री शिंदे यांनी सांगितले.
    प्रारंभी रेल्वेचे महाप्रबंधक खरे यांनी ब-याच वर्षापासूनची सोलापूरकरांची मागणी असलेली ही नवीन रेल्वे आज सुरु होत आहे. आठवड्यातून सहा दिवस ही रेल्वे धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा चांगला लाभ होईल. तसेच या मार्गावरील दुपदरी करणाचे कामही दोन वर्षात पूर्ण होईल असे सांगितले.
    याप्रसंगी महापौर अलका राठोड यांचे समयोचित भाषण झाले.

Labels: