Thursday, 30 October 2014

सैन्यदलात जिल्ह्यातील उमेदवारांना संधी

  उस्मानाबाद -  संघ लोकसेवा आयोग ( युपीएससी), नवी दिल्ली यांचे मार्फत दि.15 फेब्रुवारी,2015 रोजी घेण्यात येणा-या कम्बाईड डिफेंस सर्व्हिसेस (सीडीएस) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परीक्षेकरीता एम्लॉयमेंट न्युज (रोजगार समाचार) मध्ये दि.8 नोव्हेंबर,2014 रोजी जाहिरात प्रसिध्द होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 5 डिसेंबर,2014 असून कम्बाईड डिफेंस सर्व्हिसेस  या परीक्षेद्वारा कायमस्वरुपी व अल्पमुदतीचे कमीशनसाठी निवड करण्यात येत असते. जे उमेदवार पदवीधर असून सीडीएस परीक्षेचा अर्ज ऑनलाईन भरुन सादर करतील व रोजगार समाचार मध्ये दिलेल्या शैक्षणिक, शारीरीक आणि वयोगट पात्रतेनुसार पात्र आहेत अशाच उमेदवारांची निवड परीक्षापूर्व प्रशिक्षण तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे करण्यात आली आहे. सीडीएस परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरणेसाठी http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि) सुभाष सासने यांनी केले आहे.
     वयोमर्यादा : आय एम ए साठी : 2 जानेवारी 1992 ते  1 जानेवारी 1997 या दरम्यान जन्मलेले अविवाहीत भारतीय युवक. नाव्हेल ॲकेडमी: 2 जानेवारी 1992 ते 1 जानेवारी 1997 च्या दरम्यान जन्मलेले अविवाहीत भारतीय युवक. एअर फोर्स आकेडमी - 2 जानेवारी 1993 ते  1 जानेवारी 1997 या दरम्यान जन्मलेले अविवाहीत भारतीय युवक, ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकेडमी : 2 जानेवारी 1991 ते  1 जानेवारी 1997 या दरम्यान जन्मलेले विवाहीत व अविवाहीत भारतीय युवक. ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकेडमी ( महिलांकरीता) : 2 जानेवारी 1991 ते  1 जानेवारी 1997 या दरम्यान जन्मलेले अविवाहीत, मुलं नसलेल्या विधवा, पुन्हा विवाह न केलेल्या, मुलं नसलेल्या घटस्फोटीत भारतीय महिला, अशी राहील
    शैक्षणिक पात्रता : आय.एम.ए व ओ.टी.ए. साठी मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर अथवा समकक्ष, नेव्हल आकेडमी साठी : अभियांत्रिकी पदवीधर / बी.ई आणि एअर फोर्स ॲकेडमी साठी : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा ( भौतीक शास्त्र व गणित 10+2 स्तर विषयासह ) पदवीधर किंवा बी.ई. असा असावा.
    वरील पदांच्या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी दि.25 नोव्हेंबर2014 ते 7 फेब्रुवारी 2015 या कालावधीत प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांचे निवास व प्रशिक्षणाची सोय शासनामार्फत करण्यता आली आहे. भोजनासाठी दरदिवशी रु.60/- प्रमाणे अल्प दरात देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
    तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी मिळण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उस्मानाबाद येथे दि.12 नोव्हेंबर,2014 रोजी पदवी पर्यंतच्या सर्व मुळ प्रमाणपत्र व गुणपत्रिकेसह आणि ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट घेऊन मुलाखतीचे वेळेस दाखविल्याशिवाय उमेदवारांची निवड करण्यात येणार नाही. मुलाखतीचे वेळी वस्तूनिष्ठ पध्दतीने लेखी परीक्षा व तोंडी मुलाखत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे कडून घेण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
    अधिक माहिती करीता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दुरध्वनी क्रमांक 0253-2451031 व 2451032 येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क साधावा, असेही  आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि) सुभाष सासने यांनी केले आहे. 

Labels:

चौघांना गुडमॉर्निंग पथकाने पकडले

 उस्मानाबाद -  उस्मानाबाद तालुक्यातील निर्मल भारत अभियानांतर्गत कारवाई करण्यासाठी पथकाची स्थापना झाली होती. या पथकाकडून माहे एप्रिल -2014 पासून  आतापर्यंत अंबेहोळ, घाटंग्री, देवळाली, बेगडा, पोहनेर व जुनोनी या गावातील उघडयावर शौचालयास बसणा-यावर दंडात्मक कारवाई आली आहे. तसेच  जुनोनी येथील 16 व अंबेहोळ 4 व्यक्तींवर  गुडमॉर्निंग पथकाकडून दंडात्मक कारवाई  करण्यासाठी पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती सहायक गट विकास अधिकारी, पंचायत समिती, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.
    या पथकात पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी नंदकिशोर गुप्ता, विस्तार अधिकारी एन.एस.राठोड, एस.डी.तायडे, ग्रा.वि.अ. श्री.आडे, ग्रामसेवक श्री. राठोड, तानाजी घंटे, श्रीमती शेळके, श्री. मुंढे, एस.आर.पवार आणि वाहनचालक श्री. स्वामी यांच्यासह पोलीस कर्मचारी श्री.बिराजदार, अश्विनी जाधव व श्री. तोटावार यांचा समावेश होता.

Labels:

प्रतिबंधात्मक आदेश जारी

 उस्मानाबाद - जिल्ह्यात 30 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत मुंबई पोलीस अधीनियम 1951 च कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी हे आदेश जारी केले असून त्यानुसार शासकीय कर्तव्ये पार पाडणाऱ्या व्यक्तीखेरीज कोणत्याही व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर किंवा जवळपास कोणतीही शस्त्रे व तत्सम वस्तू, कोणतेही क्षार, द्रव्य पदार्थ, स्फोटके बाळगता येणार नाहीत.  आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नकला करता येणार नाहीत तसेच सभ्यता व नितीमत्तेस बाधा येईल, अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगता येणार नाही.  जाहीरपणे प्रक्षोभक व असभ्य वर्तणूक करता येणार नाही. याशिवाय एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्रित येण्यास  किंवा मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात आली आहे.  या कालावधीत मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार हे पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, मंडळ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना राहतील. शासकीय कामवरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासनाचे अधिकारी, कर्मचारी, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम यास हे आदेश लागू राहणार नाहीत.   दि. 30 रोजीच्या सकाळी 6 वाजेपासून ते 13 नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत हे आदेश लागू राहतील. 

Labels:

रविवारी राज्यस्तर प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती परीक्षा

   उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती परीक्षा ( राज्यस्तर) इयत्ता 10 वी साठी, रविवार, दि.2 नोव्हेंबर,2014 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातून चार केंद्रावरून घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी एकूण 604 विद्यार्थी बसले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.
    परीक्षेचे केंद्र पुढीलप्रमाणे आहेत.  श्रीपतराव भोसले हायस्कूल, उस्मानाबाद (उस्मानाबाद व तुळजापूर तालुके), भारत विद्यालय, उमरगा  (उमरगा व लोहारा), श्री गुरुदेव दत्त हायस्कुल, भुम (भुम व परांडा), सावित्रीबाई फुले विद्यालय,कळंब (कळंब व वाशी) ( कंसातील तालुके त्या त्या परीक्षा केंद्रात समाविष्ट आहेत.)
    ही परीक्षा रविवारी होणार असल्यामुळे प्रशालांनी परीक्षेची प्रवेशपत्र संबंधित केंद्र असलेल्या तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयातून प्राप्त करुन घेऊन विद्यार्थ्यांना विनाविलंब वाटप करण्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. 

Labels:

राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्याचे आवाहन

  उस्मानाबाद - सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती (31 ऑक्टोबर रोजी)  राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. रन फॉर युनीटी, सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य या विषयावर चर्चासत्र, पोलीस परेड आदींचे  यांचे  आयोजन करण्याबाबत विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
    सकाळी 7 वाजता रन फॉर युनीटी या दौडचे आयोजन करण्यात आले आहे. उस्मानाबाद नगरपालिकेला त्यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक स्वच्छता अभियान मोहिम, दौडच्या वेळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती, नगर परिषद शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी उपस्थित राहणे, या दौडच्या कालावधीत शासकीय यंत्रणेसोबत सामाजिक संघटना, एनसीसी, एनएसएस स्काऊट गाईड आणि नागरिकांचा सहभागाबात आवश्यक ते पावले उचलण्याबाबतसूचना देण्यात आल्या आहेत.  याशिवाय सार्वजनिक गणेश मंडळे, रमजान मंडळे, आंबेडकर जयंती मंडळे, शिवजयंती मंडळे, महिला बचत गट तसेच इतर सर्व संघटना  आदींनी सकाळी 6 वाजून 30 मिनीटांनी आयोजित स्थळी  उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड हे या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहात आहेत.
सकाळी  10 वाजता सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळी 5 वाजून 30 मिनीटांनी पोलीस यंत्रणेमार्फत पोलीस परेड, मानवी साखळीचे आयोजन यामध्ये शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांना वरील वेळी जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे उपस्थित रहावयाचे आहे.
वरील सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Labels:

जिल्हास्तरीय ग्रामीण खो-खो व कबड्डी निवड चाचणी स्पर्धा


उस्मानाबाद - जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद यांचे वतीने आयोजित राजीव गांधी खेल  अभियान अंतर्गत जिल्हास्तर ग्रामीण खो-खो व कबड्डी क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत, तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावर निवड झालेल्या संघ व खेळाडू यांनी याची नोंद घेऊन वेळापत्रकानुसार स्पर्धेसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
कबड्डी साठी वयोगट 16 वर्षाखालील मुले व मुली असा आहे. स्पर्धेचा दिनांक 10 नोव्हेंबर,2014 असून स्पर्धेचे स्थळ श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद असे राहील.  तर खो-खो साठी  वयोगट 16 वर्षाखालील मुले व मुली  असा आहे. स्पर्धेचा दिनांक 7 नोव्हेंबर,2014 असून स्पर्धेचे स्थळ गांधी विद्यालय,चिखली, ता.जि. उस्मानाबाद असे आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री. सत्येन जाधव (मोबाईल क्र. 9028095500) यांच्याशी संपर्क साधावा. 

Labels:

बोनसकरिता कामगारांचे आंदोलन

बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर) शासनाच्या बार्शी टेक्स्टाईल मिल या सूत गिरणीतील कामगारांनी १५ टक्के बोनस मिळण्यासाठी आंदोलन छेडले आहे. कामगारांच्या आंदोलनामुळे मागील सहा दिवसांपासून मिल बंद आहे. याबाबत पाच कामगारांनी आजपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. मिल सुरु असो अथवा बंद पडो आपण कामगार नेते कॉं.तानाजी ठोंबरे तसेच आंदोलनातील कामगारांशी कसलीही चर्चा करणार नाही अशी आडमुठी भूमिका मिलच्या अधिकार्‍यांनी घेतली आहे. यामुळे कामगारांचे आंदोलन आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.   
    सदरच्या मिलमध्ये सुमारे दोन ते अडीचशे कायम कर्मचारी तसेच अडीच ते तीनशे कंत्राटी कर्मचारी असून दररोज सुमारे चारशे कामगारांना मिलमध्ये रोजगार उपलब्ध होत असून या माध्यमातून दरमहा ५० लाखांचे वेतन कर्मचार्‍यांना देण्यात येत आहे. शासनाचे अशा प्रकारचे अनेक युनिट बंद पडले असून सद्यस्थितीत केवळ २२ युनिट सुरु आहेत त्यापैकी बार्शीतील एकमेव असलेल्या सूत गिरणीत कंत्राटी कामगारांचे अनेक प्रश्‍न मागील अनेक महिन्यांपासून रेंगाळल्याने वेळोवेळी कामगारांना आंदोलने करावी लागत आहेत. सदरच्या आंदोलनात सहभागी असलेली कामगार संघटना ही शासनमान्य संघटना नसल्याचे तोंडी सांगून इंटक संघटना आणि आयटक संलग्न बार्शी टेक्सटाईल मिल्स कामगार संघटना यांच्यात अधिकार्‍यांकडून शाब्दिक दुही माजवून कमी लेखण्याचा प्रयत्न होत आहे. एका संघटनेच्या बाबत वेगळी भूमिका तर दुसर्‍या संघटनेच्या बाबत वेगळी भूमिका घेऊन कामगारांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे. सदरच्या कामगार संघटनेबाबत खोटी माहिती सांगून त्यांच्याकडून महिलांना धमकावणे, कामगारांना धमकावणे, शिवीगाळ करणे, कामगार काम करत नाही अशा प्रकारच्या चर्चा तसेच अहवाल तयार करुन कामगारांची पिळवणूकही केली जात असल्याची माहिती कामगारांनी दिली आहे. यापूर्वीही कामगार संघटनेने किमान वेतन, महागाई भत्ता, प्राव्हीडंड फंड, बढती इत्यादी प्रश्‍नांसाठी आंदोलने केली आहेत. कामगार अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, सहा.केंद्रीय कामगार अधिकारी, केंद्रीय लेबर इन्फॉर्समेंट ऑफिसर, तहसिलदार, पोलिस निरीक्षक, जिल्हाधिकारी आदी विविध ठिकाणी कामगारांचे प्रश्‍न संघटनेने मांडले आहेत. कामगार संघटना ही कायदेशीर नोंदणीकृत असतांनाही मागील सहा दिवसांपासून सुरु केलेल्या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल अधिकार्‍यांकडून घेण्यात आली नाही. यापूर्वी मिलने दाखल केलेल्या दाव्याचा निकाल देतांना सदरची संघटना मान्यता प्राप्त नसली तरी त्यांचे म्हणणे मांडण्याचा त्यांना अधिकार आहे व त्यांच्याशी चर्चा करणे हे अधिकार्‍यांचे कर्तव्य असल्याचे सांगीतले होते. कामगारांच्या सहा दिवसांच्या आंदोलनानंतर मिलच्या अधिकार्‍यांनी ८.३३ टक्के बोनस देण्यात येणार असल्याचे नोटीस बोर्डवर लिहीले आहे. सदरच्या बोनसची माहिती लेखी स्वरुपात उपोषणकर्त्या संघटनेस देण्याचे मात्र अधिकार्‍यांनी टाळले असून आपण त्यांच्यासमोर झुकणार नाही व त्यांना कोणतेही काहीही लेखी देणार नाही अशी भूमिका घेत त्यांच्यामध्ये सामील झालेल्या कामगारांवरदेखिल आम्ही कारवाई करुन त्यांना कामावरुन काढून टाकू असे अधिकार्‍यांनी तोंडी सांगीतले आहे.

Labels:

बार्शीत डेंग्युसदृश्य रुग्णावर उपचार सुरु

बार्शी - येथील  सोन्या चांदीचे व्यापारी यांच्‍या  मुलास डेंग्युसदृश्य रोगाची लागण झाल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात डेंग्युसदृश्य रोगावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. बार्शीत अनेक महिन्‍यापासून डासांची संख्या मोठ्या प्रमाणात असून याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. अशा प्रकारचे अनेक रुग्ण एका मोठ्या खाजगी रुग्णालयात तपासणी करुन सोलापूर येथे उपचारासाठी गेले असल्याचेही समजते परंतु सदरच्या रुग्णालयात कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Labels:

फसवणूक प्रकरणी तोडकरी यांना अटकपूर्व जामीन

  बार्शी (मल्लिकार्जून धारूरकर) येथे नव्याने सुरु झालेल्या अतिरिक्त सत्र न्यायालयात आलेल्या प्रकरणातील व्यापार्‍याची फसवणूक प्रकरणी दिलेल्या आदेशात अनिल श्रीधर तोडकरी यांचा अटकपूर्व अर्ज मंजूर करुन अटकपूर्व जामीनही अंतिमरित्या मंजूर करण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एस.डी.अग्रवाल यांनी हा आदेश दिला आहे.
    येथील व्यापारी शब्बीर महंमद तांबोळी यांनी ९ जुलै ते २९ जुलै २०१४ या कालावधीत १ कोटी १९ लाख १० हजार सहाशे चोवीस रुपये २७ पैसे इतकी रक्कम बोगस टिपण दाखवून कमिशन देतो असे सांगून विश्वास संपादन केलेल्या श्रीकांत रंगनाथ फल्ले, आशिष श्रीकांत फल्ले, अनिल श्रीधर तोडकरी यांच्याविरोधात बार्शी पोलिसांत तक्रार केली होती. तक्रारीनुसार बार्शी पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. बार्शी न्यायालयाच्या कामकाजाची सुरुवात झाल्यानंतर पहिला अटकपूर्व अर्ज संशयित अनिल तोडकरी यांनी दाखल केला होता. अॅड .प्रशांत शेटे यांच्‍या मार्फत दाखल केलेल्या अर्जाची नोंद होऊन त्याची प्रथम सुणावणीही झाली. अर्जदाराच्या विधीज्ञांचे युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायाधिश एस.डी.अग्रवाल यांनी तोडकरी यांचा अटकपूर्व अर्ज मंजूर केला. तपास अधिकारी व सरकारी वकील यांनी त्यांचे म्हणणे सादर केले. दि.२७ ऑक्टोबर २०१४ रोजी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून अर्जदाराच्या विधीज्ञांचा युक्तीवाद न्यायालयाने मान्य करुन अर्ज अंतीमत: मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले. संशयित आरोपी यांचेतर्फे अॅड्.प्रशांत शेटे, अॅड्.शंकर ननवरे, अॅड्.केतन सरवदे, अॅड्.प्रणाली कोरे, अॅड्.झाडे, अॅड्.कापसे यांनी काम पाहिले.

Labels:

रास्तभाव दुकानाचा परवाना रद्द

   बार्शी (मल्लिकार्जून धारूरकर)  रऊळगाव (ता.बार्शी) येथील रास्त भाव धान्य दुकान क्रमांक ११० चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांनी शिधापत्रिकाधारकांची गैरसोय व बेकायदेशीर मार्गाने शिधापत्रिका वितरीत केल्याप्रकरणी दुकानाचा परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले आहेत.
    भरत शहाजी वाघमोडे, विजयकांत भोसले, दत्तात्रय भोसले, सदानंद भोसले यांनी लोकशाही दिनामध्ये दुकानदार यांनी केलेल्या गैरवर्तनाबाबत लेखी तक्रार दिली होती.   तहसिलने विविध अधिकार्‍यांमार्फत वेळोवेळी तपासणी करुन दुकानदाराकडून होत असलेल्या गैरवर्तनाची माहिती घेऊन लेखी नोंद केली. सदरच्या दुकानदाराकडून ग्राहकनोंद रजिस्टरला जादा शिधापत्रिकांची नोंद करणे, परवानगी किंवा आदेश नसतांनाही बीपीएल कार्डधारकांना केशरी शिधापत्रिका व केशरी कार्डधारकांना बीपीएल शिधापत्रिका दिल्याचे दिसून आले. अनेक शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित ठेवण्यात आले. कामाच्या वेळा, सुट्टीचे दिवस, साठाफलक, धान्याच्या किमती, लोकसंख्या, युनिटस्, वितरण प्रमाण, तक्रार फलक, नोंदवही, वजनमापे पडताळणी प्रमाणपत्र, तक्रार निवारण क्रमांक, परवाना नूतनीकरण, धान्याचे नमुने, साठ्याखाली तळवट, १ तारखेपर्यंतची धान्य आवक, १ गॅस, २ गॅसची नोंद, पहिल्या व शेवटच्या पावतीवरील सही इत्यादी अनेक त्रुटी आढळल्याचे तपासणी अहवालात म्हटले आहे. सदरच्या तक्रारीबाबत दुकानदार यांनी केलेल्या खुलाशात वारेवादळात दुकान पत्र्याचे शेड उडाल्याचे उडवाउडवीचे उत्तर देऊन यापुढे काळजी घेण्याचे सांगून कारवाई टाळण्याची विनंती केली होती. तहसिलदार आणि पुरवठा निरीक्षक यांच्या अहवालाचे अनुलोकन करुन जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण यांनी शासनाच्या अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभागाच्‍या शासन नियमातील तरतूदीचा भंग केल्याप्रकरणी विविध कार्यकारी सेवा सोसायटी स्‍वस्‍त भाव धान्य दुकानदार रऊळगाव यांचा परवाना रद्द करुन त्यांची संपूर्ण अनामत रक्कम सरकार जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

Labels:

Wednesday, 29 October 2014

पंढरपूर -विकास कामे दर्जेदार करण्‍याचे आवाहन

 सोलापूर - पंढरपूर विकास प्राधिकरणाची, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे गतीमानतेने व चांगल्या दर्जाची करावीत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पंढरपूर विकास प्राधिकरण, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पंढरपूर विकास आराखडा व कार्तिकी यात्रा तयारीबाबत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, पंढरपूरचे प्रांताधिकारी संजय तेली आदींची प्रमुख उपस्थिती होती.
   या बैठकीत जिल्हाधिकारी म्हणाले की, कार्तिकी यात्रेत मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शौचालयाचे व स्वच्छतेचे काम झाले पाहिजे यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे. तसेच या यात्रेनिमित्त चंद्रभागेत पाणी सोडण्याबाबतही संबंधित अधिका-यांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे नगरपरिषद, पोलीस विभाग, आरोग्य विभागाने तसेच बीएसएनएल विभागाने व विविध विभागाने करावयाच्या कामकाजाबाबत सूचना देण्यात आल्या.तसेच पंढरपूर विकास प्राधिकरण, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामाची ठेकेदाराने गती वाढविली पाहिजे असे आवाहन केले. त्याचप्रमाणे कामाबाबतच्या ठेकेदाराच्या अडचणी जाणून घेवून मार्गदर्शन केले. सदरची कामे गतीमानतेने होण्यासाठी सल्लागाराने पाठपुरावा करणेसाठी पुढाकार घ्यावा अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
या बैठकीत प्रामुख्याने नवीन शौचालये बांधणे, या शौचालयासाठी जागा उपलब्धता आदीबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच शहरातील विविध मठामध्ये शासनाच्या 100 टक्के अनुदानावर शौचालये बांधावयाची आहेत. यासाठी प्रांताधिकारी व नगरपालिकेचे सर्व मठाच्या मठाधिपतींची बैठक घेवून सदरचे मठ धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणीकृत असले पाहिजेत याबाबतची माहिती देवून आवश्यक कार्यवाही पूर्ण करुन घ्यावी अशा सूचनाही डॉ. गेडाम यांनी यावेळी दिल्या.
तसेच शहरातील विविध रस्त्याच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नवीन आराखड्यात आलेल्या रस्त्याच्या कामाची गती कमी आहे. सदरची कामे गतीमानतेने व चांगल्या दर्जाची करावीत. विहित मुदतीत कामे न झाल्यास दंड आकारला जाईल असा इशाराही जिल्हाधिका-यांनी बैठकीत दिला.

Labels:

बार्शी - बँकेसमोर आमरण उपोषण

बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर)  कायदेशीर मार्गाचा अवलंब करुनही सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या संबंधीतांकडून कोणतीही दाद न दिल्याने व आर्थिक फसवूणक करुन संगणमताने कागदपत्रांची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी दत्तात्रय भगवान चाबुकस्वार (वय ६९) हे बँकेसमोर आमरण उपोषणास बसले आहेत.     
    येथील सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँकेच्या बार्शी शाखेने देशमाने यांना सन १९९९ साली गजानन ऑईल मिल या व्यवसायासाठी तीन लाख रुपये कर्ज दिले होते. सदर कर्जास अशोक विश्वनाथ देशमाने हे जामीनदार क्र.१, दत्तात्रय भगवान चाबुकस्वार हे जामीनदार क्रमांक २ होते. सदरचे कर्जदार देशमाने यांनी वेळेत परतफेड न केल्याने कर्ज प्रकरण थकबाकीत गेले. मार्च २००४ साली बँकेने कर्जदार अरुण देशमाने यांची गजानन ऑईल मिल जागेसह इंगळे फुड कंपनी यांना विक्री केली. सदरच्या मिलची किंमत ही कर्ज रकमेच्या कित्येक पटीने जास्त होती या रकमेतून कर्ज, व्याज, दंडव्याज इत्यादी सर्व रक्कम जमा करुन रक्कम शिल्लक राहील इतक्या रकमेची प्रॉपर्टी विक्री लिलाव प्रकरणाची कसलीही कल्पना जामीनदार यांना देण्यात आली नाही. या कर्ज प्रकरणातील अशोक देशमाने जामीनदार क्र.१ यांची जागा परस्पर विक्री करण्यास संगनमताने परवानगी देण्यात आली. यानंतरही ज्यांना ऑईल मिल विकली गेली त्या इंगळे यांना बँकेने जामीनदारांच्या संमतीशिवाय मार्च २००४ सालीच बेकायदेशीरपणे ८ लाख रुपये कर्ज दिले व त्यानंतर ४ वर्षांनंतर संगणमताने पूर्वीच्या कर्जदाराचे जामीनदार दत्तात्रय चाबुकस्वार यांच्या जागेवर बोजा चढविण्यात आला व चाबुकस्वार यांची फसवणूक करण्यात आली. तसेच दत्तात्रय चाबुकस्वार हे अरुण देशमाने यांना जामीनदार होते तर मार्च २००४ साली त्यांचा मुलगा अनिल चाबुकस्वार यांना देण्यात आलेल्या कर्जासही तेच जामीनदार कसे काय घेण्यात आले. यामध्ये अर्ज दिलेल्या दिवशीच कर्जाचे प्रकरण मार्च २००४ साली कसे काय मंजूर केले व सदरच्या कर्जाची रक्कम काय केली?, ती संपूर्ण रक्कम कर्ज खात्यावर जमा करुन कशामुळे घेतली. सदरची बाब कायदेशीर नसतांना तसेच त्यांच्या कर्जाच्या व्याजाची जादा रक्कम बेकायदेशीरपणे का घेतली अशा अनेक प्रकारच्या तक्रारी चाबुकस्वार यांनी बँकेविरोधात केल्या आहेत. सदरच्या तक्रारीसाठी अनेक वर्षांपासून त्यांनी माहिती अधिकारात माहिती घेण्याचा प्रयत्नही केला आहे परंतु त्यांना अनेक वर्षे टाळाटाळ करुन त्यांची संगणमताने दिशाभूल करण्यात आली आहे. सहाय्यक निबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक यांनी चाबुकस्वार यांना मागीतलेली सर्व माहिती लेखी स्वरुपात देण्याचे आदेश देऊनही बँकेकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. तसेच बँकेकडून आठ वर्ष जुने रेकॉर्ड आम्ही ठेवत नसल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे.

Labels:

1 कोटी 65 लाख रुपयांचे कर्जवितरण

 उस्मानाबाद - विविध बॅंकांकडे प्रलंबित असणा-या प्रस्तावांबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्यानंतर मंगळवारी बॅंकामार्फत 1 कोटी 65 लाख रुपयांचे कर्जवितरण करण्यात आले. स्वयंसहायता गट, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज, विविध महामंडळांकडे व्यवसायासाठी आलेले बेरोजगार, व्यावसायिक यांना हे कर्जाचे वितरण करण्यात आले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी  हा कर्ज वितरण कार्यक्रम पार पडला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रुपाली सातपुते, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाचे डॉ. केशव सांगळे, अग्रणी बॅंक व्यवस्थापक भीमराव दुपारगुडे यांच्यासह विविध बॅंकांचे प्रतिनिधी, महामंडळाचे अधिकारी, लाभार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी कर्ज वितरण करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना सदर कर्जाची वेळेवर परतफेड करण्याचे आवाहन केले. कर्ज रकमेचा उपयोग व्यवसाय वृद्धीसाठी करावा आणि प्रगती साधावी, असे त्यांनी नमूद केले. याचबरोबर, बॅंकांनी याबाबतीत दाखवलेल्या सकारात्मकतेचेही त्यांनी कौतुक केले.
मात्र, ज्या बॅंकांकडे अद्यापपर्यंतही प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्यांनी एका आठवड्याच्या आत सदर प्रस्तावांवर काय कार्यवाही केली, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. स्वयंसहायता गटाच्या प्रतिनिधींनी अणदूर येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत खाते उघडण्याबाबत तसेच प्रस्ताव दाखल करुन घेण्याबाबत अनास्था दाखवली जात असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी येत्या 5 नोव्हेंबर रोजी या बॅंकेत खाते उघडण्यासंदर्भात विशेष मेळावा आयोजित करण्याच्या सूचना अग्रणी बॅंक व्यवस्थापकांना दिल्या. तुळजापूर गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.याशिवाय, आजच्या बैठकीला गैरहजर असणाऱ्या विविध महामंडळांच्या प्रतिनिधींची येत्या 5 नोव्हेंबर रोजी बैठक बोलावून त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट्य त्यांनी पूर्ण केले किंवा कसे, याचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी श्रीमती सातपुते यांना केल्या. येत्या 17 नोव्हेंबर रोजी पुन्हा प्रस्ताव मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना कर्जवितरण कार्यक्रम ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.  स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या वतीने सहा स्वयंसहायता बचत गट आणि 13 जणांना वैयक्तिक स्वरुपात कर्जपुरवठा केला. स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद शाखेने 16 स्वयंसहायता बचत गट आणि 5 जणांना वैयक्तिक स्वरुपात कर्जवितरण केले. एकूण 22 स्वयंसहायता गट आणि 24 जणांना हे अर्थसाह्य करण्यात आले. 

Labels:

जिल्हा प्रशासनाच्‍यावतीने रन फॉर युनिटीचे आयोजन

 उस्मानाबाद - भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबर रोजी साजरी होणारी जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी रन फॉर युनिटीचे आयोजन केले आहे. या आयोजनासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विविध सामाजिक संस्था, संघटना आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
  येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज ही बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शिल्पा करमरकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
    राष्ट्रीय एकता दिनानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम होणार असून यात सकाळी एकता दौड, सकाळी 10 वाजता जि.प. सभागृह येथे व्याख्यान आणि सायंकाळी पोलीस विभागाच्या वतीने संचलन असा कार्यक्रम होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग यात राहणार असून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवावा आणि राष्ट्रीय एकात्मतेप्रती असणारी बाधीलकी अधिक दृढ करावी, असे  आवाहन डॉ. नारनवरे यांनी उस्मानाबादकरांना केले आहे. विशेष म्हणजे, रन फॉर युनिटीनंतर सहभागी झालेले सर्वजण सामुदायिक स्वच्छता मोहिम राबविणार आहेत. तसेच सायंकाळच्या संचलनावेळी मानवी साखळी केली जाणार आहे.
    राज्य प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार 31 ऑक्टोबर रोजी या रन फॉर युनिटीचे आयोजन केले जाणार आहे. सकाळी 7 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरुवात होणार आहे. शहरातील विविध उत्सव मंडळे, असोसिएशन्स, सामाजिक संघटना, डॉक्टर्स, वकील, व्यापारी यांच्या संस्थांचे प्रतिनिधी, क्रीडा मंडळे यांचे प्रतिनिधी यांत सहभागी होणार आहेत. 

Labels:

Tuesday, 28 October 2014

नोकरीविषयक माहिती एसएमएस माजी सैनिकांनी अचूक मोबाईल क्रमांक नोंदविण्याचे आवाहन

उस्मानाबाद -  जिल्ह्यातील ज्या माजी सैनिकांनी नोकरी मिळणेसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात नांव नोंदणी केलेली आहे. अशा माजी सैनिकांना एसएमएस (SMS) द्वारे नोकरी विषयक माहिती देणेसाठी त्यांचा अचूक मोबाईल क्रंमाक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उस्मानाबाद येथे असणे आवश्यक आहे.
    तरी नोंदणीदार माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उस्मानाबाद येथे दुरध्वनी क्रमांक 02472-222557, ई-मेल zswo-osmanabad@ mahasainik.com (­- underscore) अथवा कार्यालयास प्रत्यक्ष संपर्क साधून आपला अचूक मोबाईल क्रंमांक नोदणी करावा. जेणेकरुन त्यांना नोकरी विषयक माहिती  एसएमएस (SMS) द्वारे देणे सोयीचे होईल, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि) सुभाष सासने यांनी केले आहे.

Labels:

पीक विमा हप्ता भरण्याची 31 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत

 उस्मानाबाद -  राष्‍ट्रीय पीक विमा योजना रब्बी हंगाम 2014-15 साठी भरण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यापूर्वी पीक विम्याच्या हप्ता भरणे आवश्यक आहे. पिक विमा ही योजना सर्व पिकांसाठी ऐच्छिक असून कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता चलनाद्वारे बँकेत भरणे आवश्यक आहे. यासाठी ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे ते पीक शेतात पेरल्या बद्दल तलाठयाचा पीक पेऱ्याचा दाखला, सातबारा आणि आठ अ च्या उताऱ्यासह नजिकच्या बँकेत हप्ता भरावा. या योजनेतंर्गत अतिअल्प व अल्प भूधारकांना विमा हप्त्याच्या 10  टक्के सुट विमा हप्ता भरावयाचा आहे.  तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विहित वेळेत पीक विम्याची रक्कम भरुन या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर यांनी केले आहे.
    रब्बी हंगाम 2014-15 करीता गहु (बा.), गहु (जि.), ज्वारी (बा.), ज्वारी (जि.) हरभरा, करडई, सुर्यफुल आणि रब्बी कांदा या पीकाच्या उंबरठा उतपादनाच्या किंमती पर्यंत व उंबरठा उत्पादनापेक्षा जादा किंमतीपर्यंत प्रति हेक्टरी दिलेल्या रक्कमवर पिक विमा दराप्रमाणे पीक विमा भरावयाचा आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Labels:

अण्णासाहेब पाटील आर्थीक मागास कर्ज योजना लाभ घेण्याचे आवाहन

उस्मानाबाद - अण्णासाहेब पाटील आर्थीक मागास विकास महामंडळा - मार्फत जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील किंवा ज्या प्रवर्गासाठी महाराष्ट्र शासनाने महामंडळ अतिस्तवता नाही अशा प्रवर्गातील आर्थीक मागास असलेल्या लाभार्थ्यांसाठी या महामंडळाची स्थापना झाली आहे. या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना 5 लाखाच्या प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरिता  कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. यामध्ये बँकेचा सहभाग 60 टक्के असून उमेदवार /लाभार्थ्यांचा सहभाग 05 टक्के व 35 टक्के रक्कम महामंडळाकडून बीज भांडवल म्हणून देण्यात येते. या 35 टक्के रक्कमेवर 4 टक्के दराने व्याजाची आकारणी करण्यात येऊन कर्ज परत फेडीचा कालावधी 5 वर्षाचा निर्धारित केला आहे. तरी जिल्ह्यातील ईच्छूक लाभार्थ्यांनी या कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा स्वरोजगार मार्गदर्शक केंद्राचे सहायक  संचालक रमेश पवार यांनी केले आहे.
    ही योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थीक मागास विकासमहामंडळाकडून www.mahaswayamrojar.maharashtra.gov.in या संकेत-स्थळाची  निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळावर सन 2014-15 चे उदिष्ट, प्रमख सुविधा, तसेच उमेदवार/लाभार्थ्यांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी हेल्पलाईन सुविधा  क्र. 022- 28342521 /2/3/4/5 देण्यात आली आहे.
    जिल्ह्यातील आर्थीकदृष्टया मागास बेरोजगार व त्यांचे पालकांनी या वेबपोर्टलवरील सेवांचा लाभ घेण्याचेही आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.            

Labels:

मल्टीफोन सेर्विसींगच्या प्रशिक्षणार्थींना निरोप

 उस्मानाबाद - स्टेट बॅक ग्रामीण रोजगार प्रशिक्षण संस्था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील 18 ते 35 वयोगटातील पुरुषांसाठी दि.18-09-2014 ते 17-10-2014 या 30 दिवसाच्या कालावधीसाठी मल्टीफोन सेर्विसींग या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा निरोप समासंभ नुकताच नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी चंद्रशेखर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी संस्थेचे स्टाफ आणि प्रशिक्षक श्री. गायकवाड यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे विकास गोफणे यांनी करुन प्रशिक्षण आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश सरवदे यांनी आभार गणेश कलशेट्टी यांनी मानले.   

Labels:

माजी सैनिक/विधवा यांच्या समस्या सोडविण्यासाठी अहमदनगर येथे कक्ष स्थापन

  उस्मानाबाद - ल्ह्यातील सर्व माजी सैनिक/विधवांसाठी मेकॅनाईजड रेकॉर्ड ऑफीस, अहमदनगर येथे मेजर राजीव डी, ई-मेल पत्ता recordsmirc@yahoo.co.in दुरध्वनी क्रमांक 0241-2330051 (मेल-3264/3266) या नावाने कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  तरी माजी सैनिक/ विधवा यांच्या काही समस्या असल्यास एक्समॅन सेल रेकॉर्ड ऑफीस, अहमदनगर येथील कक्षास संपर्क साधावा, असे ले.कर्नल अजयकुमार,ऑफिसेटींग ॲडज्यूटंट हेडक्वॉटर एम.आय.आर.सी, अहमदनगर यांनी कळविले असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि) सुभाष सासने यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.                  

Labels:

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

उस्‍मानाबाद - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रु/ मार्च-2015 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेत नियमीत प्रविष्ठ होणाऱ्या विदयार्थ्यांसाठी  ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विदयार्थ्यांनी  शाळा/कनिष्ठ महाविदयालयाकडे ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र सादर करावे, असे आवाहन सचिव, राज्य मंडळ, पुणे यांनी  एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
         नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदनपत्र दि.14 ते 21 ऑक्टोबर, बँकेत चलन सादर करण्याची तारीख 22 ते 30 ऑक्टोबर, विभागीय मंडळाकडे चलन व विदयार्थ्यांच्या यादया जमा कराण्‍याची तारीख 31 ऑक्टोंबरपर्यंत निधार्रित करण्यात आली आहे.  विलंब शुल्कासह बुधवार, दि. 22 ते 31 ऑक्टोबर,  बँकेत चलन सादर करण्याची तारीख 1 ते 5 नोंव्हेंबर, विभागीय मंडळाकडे चलन व विदयार्थ्यांच्या यादया जमा करण्‍याची तारीख 7 नोंव्हेंबर 2014 अशी आहे. तसेच आवेदनपत्र www.mahahsscboard.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर भरता येतील. आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विदयार्थ्यांनी आवेदनपत्र आपल्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविदयालयांशी संपर्क साधावा. ऑनलाईनने आवेदनपत्रे भरताना येणाऱ्या अडचणीबाबत प्राचार्य, मुख्याध्यापकांनी संबधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावयाचा आहे. मुख्याध्यापक / प्राचाऱ्यांनी  विदयार्थ्यांच्या यादया प्रचलित शुल्क प्रमाणे बँक ऑफ इंडिया चलनाची प्रत दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर करावे,असेही आवाहन करण्यात आले आहे

Labels:

दक्षता जनजागृतीसाठी भ्रष्टाचारनिर्मूलनाची शपथ

  उस्मानाबाद - सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून 27 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात येतो. त्याचा शुभारंभ आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय कार्यालयात करण्यात आला. भ्रष्टाचारनिर्मूलनाची शपथ आज विविध कार्यालयात घेण्यात आली तसेच राज्यपालांच्या संदेशाचेही यावेळी वाचन करण्यात आले.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सर्वांना भ्रष्टाचारनिर्मूलनाची शपथ देण्यात आली. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, उपजिल्हाधिकारी सर्वश्री अरविंद लाटकर आणि शिल्पा करमरकर, तहसीलदार शिवकुमार स्वामी  व राजश्री मोरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी श्रीमती करमरकर यांनी यावेळी शपथेचे वाचन केले. तहसीलदार स्वामी यांनी राज्यपालमहोदयांच्या संदेशाचे वाचन केले.
    विविध विभाग, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, संस्था, संघटना, बॅंका आदींनी या कालावधीत बॅनर्स, पोस्टर्सद्वारे जागृती करावी, वादविवाद स्पर्धा आयोजित कराव्यात, विद्यार्थी तसेच शाळांसाठी निबंधलेखन, व्याख्याने आयोजित करावीत. याशिवाय, सार्वजनिक क्षेत्र, स्थानिक संस्था यांनी भ्रष्टाचारविरोधी प्रतिज्ञा त्यांच्या कार्यालयात सर्व संबंधितांना द्याव्यात, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक अश्विनी भोसले यांनी केले आहे. 

Labels:

राष्ट्रीय एकात्मतेसाठी नागरिकांना सहभागाचे आवाहन

 उस्मानाबाद -  भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबर रोजी साजरी होणारी जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी रन फॉर युनिटीचे आयोजन केले आहे.  येथील जिल्हाधिकारी कार्यालयापासून सर्वधर्मीय प्रार्थनेने यास सुरुवात होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग यात राहणार असून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवावा आणि राष्ट्रीय एकात्मतेप्रती असणारी बाधीलकी अधिक दृढ करावी, असे  आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उस्मानाबादकरांना केले आहे. विशेष म्हणजे, रन फॉर युनिटीनंतर सहभागी झालेले सर्वजण सामुदायिक स्वच्छता मोहिम राबविणार आहेत.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज डॉ. नारनवरे यांनी यासंदर्भातील नियोजनासंदर्भात बैठक घेतली. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शिल्पा करमरकर, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) शिरीष बनसोडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा आदींसह विविध विभागांचे अधिकारी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री, रोटरीचे जिल्हाध्यक्ष नितीन तावडे आदींची यावेळी उपस्थिती होती.
    राज्य प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार 31 ऑक्टोबर रोजी या रन फॉर युनिटीचे आयोजन केले जाणार आहे. सकाळी 7 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरुवात होणार आहे. त्याच दिवशी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाबद्दल विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.  सायंकाळी पोलीस दलाच्या वतीने शहरात संचलन होणार आहे तसेच सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची मानवी साखळी करुन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जाणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यात असावा. त्यादृष्टीने समाजाच्या सर्व घटकांनी या रन फॉर युनिटीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
    सर्व घटकांचा यात समावेश असावा, या हेतूने मंगळवारी दुपारी 3 वाजता जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून शहरातील विविध उत्सव मंडळे, असोसिएशन्स, सामाजिक संघटना, डॉक्टर्स, वकील, व्यापारी यांच्या संस्थांचे प्रतिनिधी, क्रीडा मंडळे यांची नियोजनसाठी बैठक बोलावण्यात आली आहे. या उपक्रमात सदर संस्था कशाप्रकारे योगदान देऊ शकेल आणि त्यांचा सहभाग नोंदवू शकेल हे यावेळी जाणून घेण्यात येणार आहे. या रन फॉर युनिटीला अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक रुप यावे आणि सर्वांचा सहभाग असावा, हा यामागील उद्देश असल्याचे डॉ. नारनवरे यांनी सांगितले. कला महाविद्यालयांच्या परीक्षा सुरु असल्या तरी अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, औषधनिर्माण, डी.एड., बी.एड. महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Labels:

सभापती पवार यांचा सत्‍कार

उस्‍मानाबाद - जिल्‍हा परिषद महिला व बालकल्‍याण समिती सभापतीपदी लता अनिल पवार यांची निवड झाल्‍याबद्दल  शिवसेना महिला आघाडीच्‍या जिल्‍हा संघटक श्‍यामल वडणे यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी उपजिल्‍हा संघटक चंद्रकलादेवी लोमटे, तालुका संघटक शोभा तावेर, उपशहर संघटक कल्‍पना कांबळे, नंदा पवार उपस्थित होत्‍या. (छाया: राहुल कोर)

Labels:

Saturday, 25 October 2014

अन वंचित बालकांनी अनुभवली दिवाळी....!

बार्शी : नारळाचा एक तुकडा देवापुढे ठेवला की संपूर्ण नारळाला प्रसादाच रूप येत त्यानुसार आपल्याही जीवनाला प्रसादाच रूप येण्यासाठी प्रत्येकाने आपला वाटा मग तो पैशाच्या स्वरुपातला असो किंवा वस्तूच्या स्वरूपातला असो तो समाजातील दुर्लक्षिताच्या सेवेसाठी दिला पाहिजे. याच भावनेने बार्शीतील सहयोग स्थानिक त्राहीवशी मंडळाच्या वतीने अजित फाऊंडेशनच्या स्थलांतरित कामगारांच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या “भटक्यांच्या शाळेत” 70 मुलांना व त्यांच्या मातपित्यांना दीपावलीच्या निमित्ताने मोफत फराळ व फटाक्यांचे वाटप करण्यात आले.
      यावेळी उमरजचे तहसिलदार उमेश चव्हाण , विक्रीकर अधिकारी सचिन केदारलिंगे, मोहन चिखले, अविनाश सोलवट, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, पर्यावरणदूत मधुकर डोईफोडे, प्रकाश गव्हाने, सतीश गोडगे, विलास निंबाळकर, रामदास तिकटे,चंद्रकांत राऊत, राहुल बनसोडे, विलास जगदाळे, सुरेश वायकर, प्रताप जगदाळे, अ‍ॅड.बापू करंजकर, रमेश कास्वटे, जहांगीर बागवान, महेश निंबाळकर, पत्रकार राजा माने, शहाजी फुरडे-पाटील, चंद्रकांत करडे आदीजण उपस्थित होते.
      यावेळी बोलताना विलास जगदाळे म्हणाले की, समाजातील वंचित बालकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी आपण निमित्त व्हावं व अशा मुलांच्या चेहर्‍यावर हास्य फुलावे यामुळे आपल्या ही पराकोटीचा आनंद व आत्मिक समाधान मिळते. म्हणून स्थलांतरित बालकांच्या जीवनातील वेदना व दुख क्षणभर दूर सारून त्यांचे बालपण सुखद करण्यासाठी सहयोग मंडळाने एक पाऊल उचलले आहे. 
      अजित फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश निंबाळकर यांनी उपस्थिताना  संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली. बालकांनी एकत्रितपणे फटाके उडवून दिवाळीचा आनंद लुटला. यावेळी मुलांच्या व पालकांच्या चेहर्‍यावर दीपावलीचा आनंद झळकत होता. 
      कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंकर गव्हाने, विनया जाधव, प्रवीण शिंदे, समारा मुल्ला, अनीता शिंदे, सुलभा मिरगणे, यांनी परिश्रम घेतले. 

Labels:

गावात आरोग्य नांदण्यासाठी ग्रामस्वच्छता महत्वाची -अविनाश सोलवट

बार्शी : गावामध्ये आरोग्य नांदायचे असेल तर ग्रामस्वच्छता महत्वाची असून त्यासाठी समाजघटकातील प्रत्येकाने योगदान दयावे असे प्रतिपादन सनदी अधिकारी अविनाश सोलवट यांनी केले. तालुक्यातील आगळगांव येथे मातृभूमी प्रतिष्ठान व रोटरी क्लब, ग्रामपंचायत आगळगांव व ग्रामविकास संस्था आगळगांव यांच्या संयुक्त विदयमाने गावात राबविलेल्या विविध उपक्रमांचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
विठ्ठल मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव व्यंकटेश भट, पोलिस उपायुक्त डी.टी.शिंदे, पिंपरी चिंचवडचे तहसीलदार किरण काकडे, वृक्षमित्र मधुकर डोईफोडे, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे ,उपाध्यक्ष तथा रोटरी अध्यक्ष गौतम कांकरिया,सहसचिव मुरलीधर चव्हाण, सहकार विभागाचे उपसचिव संतोष पाटील, पद्माकर चवरे, वित्त व लेखा अधिकारी धनराज गरड, समाजकल्याण विभागाचे कक्ष अधिकारी सुनिल उकिरडे,संस्थाचालक किरण मोरे, पो़नि़ अजय गरड, शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे, सरपंच सुमन गरड, सचिव प्रताप जगदाळे, सुभाष जवळेकर, विजय शहा, अशोक हेड्डा, सयाजी गायकवाड ,अजित कुंकुलोळ ,विठ्ठल उकिरडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतिश पाठक, आदी उपस्थित होते.
अविनाश सोलवट म्हणाले, आपल्या जन्मभूमीसाठी आपण कांहीतरी देणे लागतो या भावनेतून विधायक कार्यासाठी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे.  प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकसहभाागातून सामाजिक विकास साधण्यावर भर देण्यात येत आहे. दूषित पाणी हेच बहुतांशी आजाराचे मूळ आहे. त्यातही ग्रामीण भागात हे  प्रमाण अधिक आहे. त्यामुळे याच प्रश्नाला प्रथम प्राधान्य देवून प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर 5 ठिकाणी जलशुध्दीकरण प्रकल्पाद्वारे ग्रामस्थांना शुध्द पाणी देण्याचा प्रयत्न आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीं व ग्रामस्थांकडून मागणी आल्यास त्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असे सांगितले. पणन मंडळाचे सहसचिव संतोष पाटील यांनी राज्यातील विविध गावांमधील दूषित पाण्यामुळे आजार होण्याचे प्रमाण पाहिल्यानंतर शुध्द पाणी योजना राबविण्याची संकल्पना सुचली व त्यातूनच ती प्रत्यक्षात आणल्याचे सांगितले. पोपट पवार यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या हिवरेबाजार ची यशोगाथा सांगून आदर्शवादाची कास धरा असा संदेश दिला. वृक्षमित्र मधुकर डोईफोडे यांनी पर्यावरणाच्या ºहासामुळेच दुष्काळी परिस्थितीला तोंड दयावे लागत असून वृक्षांचे संगोपनच आपल्याला वाचवेल असा संदेश दिला.धनराज गरड, किरण मोरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. 
यावेळी निवारा शेड, विदयार्थ्यांसाठी शाळेच्या आवारात बसविण्यात आलेल्या खेळणी, तसेच शुध्द पाण्याच्या प्लँटचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कृषी अधिकारी सयाजी गायकवाड यांच्या हस्ते केशर आंबा रोपांचे वाटप तसेच लहान मुलांना आरोग्य कार्डाचे वाटप करण्यात आले. वैयक्तिकरित्या 2 वनराई बंधारे तयार केल्याबद्दल लखन मडके याचा तसेच विविध स्पर्धेतील गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय थिटे, ज्ञानेश्वर पाटील, शिवलिंग जमदाटे, संतोष थिटे, रविंद्र विधाते, नागनाथ गटकळ, जयेश गरड, एस़डी़ गरड, रामेश्वर जाधव, यांनी परिश्रम घेतले़ प्रास्ताविक प्रताप जगदाळे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन उकिरडे यांनी केले़ तर आभार राणी कोकाटे यांनी मानले़.

Labels:

पाथर्डीतील दलित हत्याकांड विरोधात बार्शीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सोलापूर जिल्हा कौंन्सिल व आयटक च्या वतिने बार्शीत पाथर्डी येथील ३ दलितांच्या हत्या झाल्याच्या विरोधात शनिवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सुमारे ७०० कामगार व कार्यकर्ते सहभागी होते.
अहमदनगर जिल्हातील पाथर्डी तालूक्यातील जवखेडे येथे संजय जाधव यांचेसह त्याची पत्नी व मुलगा यांची निर्धुन हत्या करण्यात आली हे कुटुंब दलित समाजातील होते. यापूर्वीही अहमदनगर जिल्हातील दलित कुटूंबातील सदस्यांवर हल्याची घटना घडली होती. दलित कुटुंबीयांची हत्या करणारांना तात्काळ अटक करुन त्यांचेवर कडक कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. याप्रसंगी बोलतांन कॉ. तानाजी ठोंबरे म्हणाले देशात दलित, मुस्लीमांवर हल्ले होत आहेत. देश जातीयवादी व धर्मांधांच्या ताब्यात गेल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे आता पुढील काळात कामगार आणि दलितांनी एकत्र येवून आर्थीक व सामाजीक लढा सोबत लढला पाहिजेन्न यावेळी कॉ. प्रविण मस्तुद, कॉ. शौकत शेख, कॉ. राजेंद्र गोरे यांनी विचार व्यक्त केले.
 हा मोर्चाचे निवेदन निवासी नायब तहसिलदार उत्तम पावार, श्री कळढोणे यांनी स्विकारले. मोर्चा यशस्वीतेसाठी विनायक माळी, केतन शेळके, सम्राट अलाट, संतोष बनसोडे, ताई लोकरे, रंगनाथ शिराळ, धनंजय शिंदे, शारदा पंढरपुरे, वैजंती गोरे, बालाजी वाघमारे, संदीप गायकवाड, साधना वाघमारे, रमाबाई कुचेकर यांनी परिश्रम घेतले.

Labels:

पांगरी येथे रविवारी भव्‍य स्‍नेह मेळाव्‍याचे आयोजन

पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी पंचक्रोशी युवा मंचतर्फे रविवारी दि. 26 ऑक्‍टोबर रोजी सर्वोदय विद्या मंदिर प्रशाळेच्या प्रांगणात सकाळी 9 वाजता भव्य स्नेह मेळावा व मायभू सन्मान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्नेह मेळाव्यात पांगरी परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार केला जाणार आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, वृत वाहिनीचे वृतनिवेदक राजेंद्र हुंजे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उप-कुलसचिव डॉ.विलास एन.शिंदे आदि मान्यवर उपस्थित  रहाणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शशिकांत नारकर असणार आहेत.
  देशातील गावे आपले रूप पालटत असताना गावच्या सुपुत्राकडून मात्र आपल्या जीर्ण गावाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे गत वर्षीपासून पांगरी येथे परिसरातील कर्तुत्व संपन्न व्यक्तीतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणार्‍या व्यक्तीचा स्नेह मेळावा आयोजित केला जात आहे.पंचक्रोशीतील सुपुत्राचा एकमेकांना परिचय व्हावा व एकमेकांच्या सहकार्यातून प्रत्येकाच्या प्रगतीचा मार्ग खुला व्हावा हा  उद्देश आहे. गावात वैचारिक वारसा निर्माण करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सयोजकातर्फे करण्यात आले आहे.

Labels:

अंबेजवळगे प्रशालेच्‍या विद्यार्थ्‍यांची राज्‍यस्‍तरीय स्‍पर्धेसाठी निवड

पांगरी (गणेश गोडसे) :- शिक्षण सेवा मंडळ पांगरी संचलित न्यू इंग्लिश स्कूल अंबेजवळगे प्रशाळेच्या विद्यार्थ्यानी उस्मानाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या विभाग स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले असून प्रशाळेच्या विद्यार्थ्यांची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
    शालेय क्रीडा स्पर्धेत सुवर्णा कोळगे हिने सहाशे मीटर धावणे यात प्रथम क्रमांक,कु.प्रीयंका रोकडे हिने आठशे व 200 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.पायका क्रीडा स्पर्धेतही सुवर्णा कोळगे हिने 400 मीटर धावणे,अनीता जाधव हिने 1500 मीटर धावणे प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर प्रवेश मिळवला आहे.
   यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक जावेद बागवान,मुख्याध्यापक बालाजी कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले.यश मिळवल्याबदल संस्था अध्यक्ष बापू नारकर,सचिव शशिकांत नारकर,प्रतीक नारकर,तृप्ती नारकर,चेअरमन मनुकाका कुलकर्णी,विनया कुलकर्णी,सर्वोदय प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक मुंढे,क्रीडा शिक्षक रमेश मोहिते आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Labels:

Wednesday, 22 October 2014

तुळजाभवानी मंदिरात गुरुवारी भेंडोळी महोत्सव

तुळजापूर :-  महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये गुरुवार दि. २३ ऑक्‍टोबर रोजी भेंडोळी उत्सव साजरा होणार आहे.
    अमावस्येला गुरुवारी सायंकाळी आगीचा उत्सव भेंडोळी साजरा केला जाणार आहे. संपूर्ण भारतात तुळजापूर आणि काशी या दोनच तीर्थक्षेत्रांमध्ये आगीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. सायंकाळी काळभैरवनाथ मंदिरात भेंडोळीला सुरुवात होते. कमानवेशीजवळ डुल्या मारुती मंदिरात याचा समारोप होतो.

Labels:

पुणे, साता-यासाठी तुळजापुरातून जादा बस

तुळजापूर -: दिवाळीसाठी गावाकडे परतण्यासाठी तुळजापूर आगाराच्या वतीने पुणे, साता-यासाठी १४ अतिरिक्त बसची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय रोजच्या फे-याही सुरू राहणार आहेत, अशी माहिती आगारप्रमुख राजकुमार दिवटे यांनी दिली.
       दीपावलीसाठी मुंबई पुण्याच्या चाकरमान्यांना गावाकडे परतण्यासाठी तुळजापूर आगाराने जादा बस सोडल्या आहेत. पुण्यासाठी १३ तर साता-यासाठी एक बस धावणार आहे. दीपावलीनिमित्त मुक्कामी राहणा-या बाहेरगावच्या चालक वाहकांसाठी तुळजापूर आगारात गरम पाणी, विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच दीपावलीच्या फराळाचीही व्यवस्था कर्मचा-यांनी वर्गणीतून केली आहे.

Labels:

निवडणुकीत विरोधी कार्यकर्त्यांनीही दिली साथ : मधुकरराव चव्हाण यांचा गौप्यस्फोट

अणदूर :- माझा पराभव करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी जोर लावला होता. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. मतदारसंघातील विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही मला सहकार्य केले. त्यांचा रात्रभर माझ्याशी फोनवरून संपर्क होता. "साहेब आमच्या पक्षाच्या नेत्यांबरोबर प्रचारासाठी फिरत असलो तरी आम्ही तुमच्या बरोबरच आहेत, काळजी करू नका' असे कार्यकर्ते सांगत होते. त्यामुळे मताधिक्यासह विजयाची खात्री होती, असा गौप्यस्फोट आमदार मधुकरराव चव्हाण यांनी केला.
    विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांचा विजय झाल्याने अणदूर येथे राईस मिल मैदानावर त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, माझ्यावर अनेकांनी टीका केली. परंतु, मी कोणावरही टीका केली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुळजापूर येथे सभा झाल्या. मला पराभूत करण्यासाठी दिग्गजांनी हजेरी लावली. मात्र, त्याचा काहीही फरक पडला नाही. शरद पवार यांनी केलेल्या टीकेमुळे दु:ख झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. मला सोडून गेले, ते नंतर कधीच खुर्चीवर बसले नाहीत. जनतेच्या प्रेमामुळेच अटीतटीच्या लढतीत माझा विजय झाला.
आता वारसाला पुढे आणणार
आजतागायत मी लोकांसाठीच काम केले. घरासाठी काही केले नाही. यापुढे आता घरातील माणसांना राजकारणात पुढे आणण्याचा विचार करावा लागेल, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले. त्यानुसार पुत्र सुनील यांना राजकारणात सक्रीय करणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.

Labels:

Tuesday, 21 October 2014

27 ऑक्टोबरपासून दक्षता जनजागृती सप्ताह

उस्मानाबाद :- सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून 27 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक अश्विनी भोसले यांनी दिली आहे.
    विविध विभाग, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, संस्था, संघटना, बॅंका आदींनी या कालावधीत बॅनर्स, पोस्टर्सद्वारे जागृती करावी, वादविवाद स्पर्धा आयोजित कराव्यात, विद्यार्थी तसेच शाळांसाठी निबंधलेखन, व्याख्याने आयोजित करावीत. याशिवाय, सार्वजनिक क्षेत्र, स्थानिक संस्था यांनी भ्रष्टाचारविरोधी प्रतिज्ञा त्यांच्या कार्यालयात सर्व संबंधितांना द्याव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे.
      केंद्रीय दक्षता आयोगाने यासंदर्भात परिपत्रक जारी करुन सर्वांना या दक्षता सप्ताहाचा भाग  व्हावा, असे आवाहन केले आहे. तंत्रज्ञानाच्या साह्याने भ्रष्टाचाराशी लढा असे यावर्षीच्या दक्षता जनजागृती सप्ताहाचे घोषवाक्य आहे. भ्रष्टाचारविरोधी शपथही यावेळी घेतली जाणार आहे.      

Labels:

पोलीसांनी संयम, शिस्त ठेवून समाजाचे संरक्षण करावे : न्या.तावडे

उस्मानाबाद :- पोलीसांना कायदा व सुव्यवस्थेबरोबर गुंड, अतिरेकी, दहशतवादी  व समाजद्रोही  अशा लोकांचाही  सामना करावा लागतो. कर्तव्य पार पाडीत असताना  बऱ्याचवेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्राणास मुकावे लागते. तेंव्हा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना शिस्त व संयम ठेवून देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे संरक्षण करण्यास नेहमी तत्पर राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उस्मानाबादचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सुरेंद्र तावडे  यांनी केले. 
उस्‍मानाबाद येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित पोलीस अधिकारी व कर्मचा-याच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करताना प्रमुख न्यायाधिश तावडे बोलत होते. यावेळी शहीद झालेल्या शूरवीर शहीदांप्रती कृतज्ञता  म्हणून हुतात्मा स्मृतिस्तंभास न्या. तावडे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस अधिक्षक अभिषेक त्रिमुखे, अपर पोलीस अधिक्षक बी. यु. भांगे  आदिंनी पुष्पचक्र वाहून अभिवादन करुन मानवंदना दिली.
      एक सप्टेंबर 2013 ते 31 ऑगस्ट 2014 या कालावधीत देशातील 662 पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावताना हुतात्मा झाले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा शहीद दिन पाळण्यात येतो, असे जिल्हा पोलीस प्रमुख त्रिमुखे यांनी  सांगितले.
      परेड कर्मचारी रायफलच्या सहाय्याने बंदुकीच्या 3 फैरी फायर करुन सलामी दिली.  बिगूलवर शोकधुन वाजवण्यात आल्यानंतर  प्रमुख अतिथींना मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंबादास दानवे यांनी केले.
      उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे आणि विकास नाईक यांनी हुतात्म्यांच्या नावाचे वाचन केले. यावेळी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या  संख्येने उपस्थित होते. 

Labels:

विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत; निवडणूक यंत्रणेचे सुयोग्य नियोजन

उस्मानाबाद :- जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत निवडणूक यंत्रणेने प्रशासकीय पातळीवर केलेली तयारी, प्रचार कालावधी मतदान आणि मतमोजणी यासाठी केलेले नियोजन आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी साधलेला समन्वय यामुळे चारही विधासनभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली.
    जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे यांनी उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद आणि परंडा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी उत्कृष्ट समन्वय साधला. भारत निवडणूक आयोगाकडून आलेल्या सूचना, विधानसभा मतदार संघाबाबतीत करावयाची अंमलबजावणी विविध कक्षांकडून करुन घ्यावयाची कामे आदीबाबत त्यांनी तसेच निवडणूक यंत्रणेने उत्कृष्ट समन्वय दाखवला. त्याचा परिणाम म्हणजे निवडणूक कालावधीतील विविध कामे अगदी विहित वेळेत पार पडली.
    मतदनाच्या दिवशी दर दोन तासांनिहाय मतदानाची टक्केवारी संबंधित विधानसभा मतदारसंघातून प्राप्त करुन घेवून ती राज्य निवडणूक आयोगाला कळविणे, प्रसारमाध्यमांना देण्यासाठी मिडिया कक्षास तात्काळ उपलब्ध करुन देणे आदींमुळे माहिती  सहज व वेळेवर उपलब्ध झाली.
    मतदानाच्या दिवशीही चारही मतदार संघातील माहिती फेरीनिहाय ईमेलव्दारे उपलब्ध करुन देण्यात उपलब्ध करुन देण्यात आल्याने जिल्हास्तरीय प्रसारमाध्यमांसाठी ते सोईचे ठरले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट समन्वयातून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कामे चांगल्या पध्दतीने पार पाडली.
    चारही विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या मतदार संघात विविध कक्षाव्दारे निवडणूक प्रक्रिया सुनियोजितपणे राबविली त्यामुळे जिल्ह्यात कुठल्याही मतदारसंघात वाद विवाद न होता ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.       

Labels:

पांगरी ग्रा.पं. सरपंचपदी विजय गोडसे यांची बिनविरोध निवड

पांगरी (गणेश गोडसे) : पांगरी (ता. बार्शी) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजेंद्र राऊत गटाचे विजय गोडसे यांची पुनश्च बिनविरोध निवड करण्यात आली तर भारत वाकडे यांना उपसरपंचपदी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. रामभाऊ लाडे यांनी ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिक्त झाले होते. निवडणूक निर्णय अधिकार्‍यानी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पांगरी ग्रामपंचायत कार्यालयात पांगरीचे मंडल अधिकारी बेले यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.
    पांगरी ग्रामपंचायतिच्या पंधरा सदस्यापैकी तेरा सदस्य हे राऊत गटाचे असून सरपंच पद हे सर्वसाधारण गटातील पुरुष प्रवगासाठी खुले आहे.सरपंच पद विभागून घेण्याचे ठरल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.यावेळी माजी सरपंच रामा लाडे,जयंत पाटील,विशाल गरड,ग्रामपंचायत सदस्य सतीश जाधव,अकील बागवान,सौ.सुमन देशमुख,सौ.पद्मिन कोळी,सौ.शोभा जानराव,पांगरीचे तंटामुक्ती अध्यक्ष सुहास देशमुख,पांगरी ग्रामविकास अधिकारी वैभव माळकर,तलाठी राठोड,देशमुख,दिलीप जानराव,अनिल गरड,पप्पू देशमुख,चंद्रकांत गोडसे आदि उपस्थित होते. निवडिंनंतर गावात गुलाल न उधळता व फटाक्याची आतिषबाजी न करता कसलाही जल्लोष करण्यात आला नाही.

Labels:

बार्शीत कचराकुंडीत मयत स्त्री अर्भक सापडले

बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर) :- बार्शीत एक दिवसाचे स्त्री अर्भक मृत अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. स्त्री जन्माचे अपत्य गुप्तपणे विल्हेवाट लावणार्‍या अज्ञात व्यक्तीविरोधात बार्शी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   
     सोमवारी दि.२० रोजी सदरच्या प्रकारचा लक्षात आल्याने सोमेश्वर खलसे रा.सुलाखे हायस्कूल जवळ यांनी बार्शी पोलिसांना खबर दिली. सतत गजबलेला, रहदारीचा व मुख्य बाजारपेठेचा रस्ता म्हणून प्रसिध्द असलेल्या पांडे चौक परिसरात बेंगलोर अय्यंगार बेकरी जवळ असलेल्या कचराकुंडीत सदरचे अर्भक टाकण्यात आले होते. जनन दरातील असमतोल व स्त्री जन्मदरातील घटते प्रमाण लक्षात आल्यानंतर शासनाने गर्भलिंग तपासणी करण्यास प्रतिबंध घातला आहे. यानंतरही काही वर्षांपूर्वी बार्शीतील नामवंत डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टरांच्या धंद्यातील वास्तव समोर येऊन माणुसकीला काळीमा फासणार्‍या कुर्डूवाडी रोडवरील नामवंत डॉक्टरचा पर्दाफाश झाला होता. बीड येथील कुख्यात डॉक्टर सरस्वती मुंढे व डॉ.सुदाम मुंढे यांचा पर्दाफाश झाल्यानंतर बार्शीतील धन्वंतरी मेडिकल या दुकानातून व्हेक्रेडिल या गर्भपाताच्या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात बेकायदा विक्री झाल्याची बाबही समोर आली होती व बार्शीतील वैद्यकिय क्षेत्राचे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या डॉक्टरांशी लागेबंधे असल्याचे समोर आले होते. अनेक डॉक्टरांकडून मोठ्या रकमेसाठी सोनोग्राफी मशिनमध्ये केलेल्या गर्भलिंग तपासण्यांचे रेकॉर्ड समोर आल्यानंतर वैद्यकिय अधिकार्‍यांनी गुन्हे दाखल केले होते. बार्शीतील स्त्री जन्मदराचे अल्प प्रमाण हे वैद्यकिय क्षेत्रातील होत असलेल्या बाजारांचे द्योतक असून कठोर कायदेशीर मार्गाने कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

Labels:

मतदारानी विकासासाठी सोपलच अंतिम पर्याय असल्‍याचे दाखवून दिले : सुधीर सोपल

बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर) : बार्शी तालुक्यातील जनतेने तालुक्यातील शांततेसाठी आणि विकासासाठी दिलीप सोपलच अंतीम पर्याय असल्याचे निवडणूक निकालातून दाखवून देवून दहशतीला चोख उत्तर दिल्याची प्रतिक्रीया औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीरभाऊ सोपल यांनी दिली.
    ते पुढे म्हणाले की, तालुक्यातील जनता शांतता आणि विकासप्रिय आहे. दहशतीच्या, गंडगिरीच्या प्रवृत्तीला मतदारांनी मतदानातून चोख उत्तर दिलेले आहे. धनशक्तीच्या मार्गाला मतदारांनी झिडकारले आहे. तसेच भाजप च्या निमित्ताने सुशिक्षीत उमेदवार दिल्यामुळे मतविभागणीचा आम्हाला फटका बसला. लोकसभेच्या निवडणुकीवेळचा 55 हजाराचे मताधिक्य कमी करुन 5111 मतांनी इतका अल्पावधीत मिळालेला विजय सर्व विकासप्रिय जनतेचा विजय आहे असे मी मानतो.
    या तालुक्यात गुंडगिरी, दहशत चालू दिली जाणार नाही. कायदेशीर मार्गाने त्याचा बिमोड करुन प्रसंगी जशास तसे उत्तर देवू पण तालुक्यातील शांतता अबाधित ठेवूच असेही ते म्हणाले.

Labels:

Monday, 20 October 2014

तेरखेडा स्फोट प्रकरणी 29 व 30 ऑक्टोबरला जवाब नोंदविण्यास सुरुवात

उस्मानाबाद :- वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे 30 सप्टेंबर 2014 रोजी  दोन वेगवेगळया शोभेच्या दारु करण्याच्या कारखान्यावर अचानक वीज पडून झालेल्या स्फोटात दहा व्यक्ती मृत्यमुखी पडले. याबाबत दंडाधिकारीय चौकशी अधिकारी  म्हणून विभागीय अधिकारी, कळंब यांची नेमणूक करण्यात आली आहे.
    सदर घटनेत मयत तसेच जखमी व्यक्तीचे नातेवाईक, महसूल प्रशासानाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी व सदर दुर्घटना घडलेल्या शोभेच्या दारु करण्याच्या कारखान्याचे मालकानी चौकशी कामी व जवाब देण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, कळंब येथे संबंधितांनी दुपारी 12 ते सायंकाळी 6 च्या दरम्यान लेखी जवाबासह तसेच तोंडी जवाबासाठी उपस्थित रहावे.
सदर चौकशीच्यावेळी घटनेबाबत माहिती असणारे व आवश्यक व महत्वाची माहिती  सांगू  इच्छिणारे नागरीकही उपस्थित राहू शकतील.
    दि. 29 रोजी सर्व मयत व जखमी झालेल्या लोकांचे रक्त संबंधातील व इतर नातेवाईक, सदर दुर्घटना घडलेल्या शोभेच्या दारु करण्याच्या कारखान्याचे मालक यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.
    तसेच 30 ऑक्टोंबरला तहसीलदार वाशी, संबंधित मंडळ अधिकारी, संबंधित तलाठी,  संबंधित पोलीस पाटील, संबधित ग्रामसेवक, संबधित सरपंच व उपसरपंच व संबधित सर्व पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी उपस्थित राहून जवाब नोंदवावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, कळंब यांनी एका  प्रसिध्दीपत्रकाव्दरे केले आहे.

Labels:

..तरीही उमलले नाही कमळ

उस्मानाबाद :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्‍ट्राची कुलस्‍वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्‍या पावन नगरीत प्रचार सभा होऊनही उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात भाजपाचा एक उमेदवार विजयी झाला नाही. त्‍यामुळे मोंदीच्‍या सभेनंतरही जिल्‍ह्यात कमळ कोमजले. 
   विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील भाजप पदाधिका-यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. परंतु, जिल्ह्यात भाजपचे बळ नसल्याने निवडणुकीतील एकाही उमेदवारला यश मिळाले नाही. जिल्ह्यातील चारपैकी केवळ उस्मानाबाद मतदारसंघातील मतदारांनी बदल केला आहे. अन्य तिन्ही मतदारसंघात विद्यमान आमदारांच्याच गळ्यात पुन्हा विजयाची माळ घातली आहे. त्यानुसार तुळजापूर मतदारसंघातून मधुकरराव चव्हाण चौथ्यांदा, उमरगा-लोहारा मतदारसंघातून शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले दुस-यांदा तर भूम-परंडा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांनी सलग तिस-यांदा विजय पटकावला आहे. विशेष म्हणजे ५२ वर्षांच्या काळात परंडा मतदारसंघात एकाही उमेदवारला विजयाची हॅट्‌ट्रिक साधता आली नव्हती. राहुल मोटे यांनी विजयाची हॅट्‌ट्रिक साधत इतिहास चरला आहे. परंडा मतदारसंघात भाजप युतीमधील घटकपक्षा रासपला यश मिळेल, असे चित्र होते. मतदारांनी रासप उमेदवार बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांना नाकारले आहे. तसेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतलेल्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकराना पराभव पत्करावा लागला आहे. तसेच तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे संजय निंबाळकर यांचाही पराभव झाला आहे. शिवाय अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या उमरगा-लोहारा मतदारसंघात भाजपचे उमेदवार तथा जिल्हा परिषद सदस्य कैलास शिंदे पराभूत झाले आहेत.

Labels:

विकासकामांमुळेच जनतेने भरघोस मते दिली : आ. मधुकरराव चव्‍हाण

तुळजापूर -: गेल्या १५ वर्षांत केलेली विकासकामे, शेतक-साठी केलेली मदत आणि तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आणलेला भरघोस निधी या जोरावर जनतेने भरभरून मते दिल्याचे माजी मंत्री आमदार मधुकरराव चव्हाण यांनी सांगितले.
    अत्यंत अटीतटीच्या लढतीत विजयानंतर प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर आमदार चव्हाण पत्रकारांशी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील, भारत कदम आदी उपस्थित होते.
    आमदार चव्हाण म्हणाले की, आगामी कालावधीत तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच उजनीच्या पाण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
    मधुकररावचव्हाण यांच्या विजयानंतर शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. पंचायत समितीपासून वाजत-गाजत विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पुजारी मंडळ मंगल कार्यालयात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी शहरात प्रवेश करताच अामदार चव्हाण यांनी सर्वप्रथम कुलस्वामिनी तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी शहरात ठिकठिकाणी समर्थकांनी चव्हाणांचे स्वागत केले. शहरात सकाळपासूनच फटाके फोडून कुंकवाची उधळण करण्यात येत होती.

Labels:

Sunday, 19 October 2014

बार्शीतून राष्ट्रवादीचे दिलीप सोपल ५१११ मतांनी विजयी

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी विधानसभेच्या बहुचर्चित निवडणुकीत राष्ट्रवादीचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री दिलीप सोपल यांनी शिवसेनेच्या राजेंद्र राऊत यांचा ५१११ मतांनी पराभव केला. याप्रसंगी बोलतांना दिलीप सोपल म्हणाले, हा विजय माझा एकट्याचा नाही यासाठी अनेक मित्र, सहकारी व कार्यकर्ते झटले आहेत हा त्यांना अर्पण करतो. आजपर्यंत आलेल्या अनेक लाटांना तोंड देऊन त्यांनी लाटांची वाट लावून विजय खेचून आणला आहे. अनेक प्रकारचे प्रयोग करण्यात आले, काहींना फोनवरुन जास्त पळू नका, काहींना धमक्या अशा प्रकारचे विरोधकांचे रडीचे डाव खेळून झाले, लॅपटॉप वरुन मतांच्या अफवांचाही असाच प्रयोग होता जे लोक प्रतिकार करु शकत नाहीत त्यांना मारहाण करुन विरोधकांनी मर्दुमकी गाजवली आहे त्याला मतदारांनी उत्तरही दिले आहे. यापुढील काळात आपण जास्तीत जास्त समाजोपयोगी कामे करणार आहे. अपूर्ण राहिलेल्या विकासाच्या योजना पूर्णत्वास नेणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
    बार्शी विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : दिलीप गंगाधर सोपल (राष्ट्रवादी) ९७६५५, राजेंद्र सुखदेव मिरगणे (भाजपा) १६५०६, राजेंद्र विठ्ठल राऊत (शिवसेना) ९२५४४, गणेश सुरेश शिंदे (बसपा) १७५२, सुधीर विश्वंभर गाढवे (कॉंग्रेस आय) १६५४, इस्माईल मुसा पठाण (अपक्ष) २३०, अतुल बापूराव इटकर (अपक्ष) १५४, प्रविण विनायक गाढवे (अपक्ष) १८०, मोहन बाळासाहेब भोसले (अपक्ष) ३७७, जहॉंगीर याकुब बागवान-येडशीकर (अपक्ष) ४६४, सुवर्णा किशोर शिवपुरे (अपक्ष) ५३४, नोटा (नकार मते) १४४४.

Labels:

उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात राष्‍ट्रवादीचे दोन तर कॉंग्रेसचे व शिवसेनेचे एक उमेदवार विजयी

उस्मानाबाद :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2014 यामध्ये 240 (अ.जा.) उमरगा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार ज्ञानराज चौगुले, 241-तुळजापूर मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे उमेदवार मधुकरराव चव्हाण, 242- उस्मानाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटील आणि परंडा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार राहूल मोटे हे विजयी झाल्याचे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिका-यांनी जाहीर केले.
      उमरगा मतदारसंघातून चौगुले यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भारतीय राष्ट्रीय  कॉंग्रेसचे उमेदवार किसन कांबळे यांचा 20 हजार 442 मतांनी पराभव केला. तुळजापूर मतदारसंघातून श्री. चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार जीवनराव गोरे यांचा 29 हजार 610 मतानी पराभव केला. उस्मानाबाद मतदारसंघात राणा जगजीतसिंह पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा 10 हजार 806 मतांनी पराभव केला. परंडा मतदारसंघात राहुल मोटे यांनी शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांचा 12 हजार 389 मतांनी पराभव केला.
    आज सकाळी आठ वाजता चारही मतदारसंघात मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीला टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. दुसरीकडे ईव्हीएम यंत्रांद्वारे मतमोजणीस प्रारंभ झाला. साधारणता अर्ध्या तासातच पहिला फेरीचा कल हाती येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने काही वेळाच्या अंतराने फेरीनिहाय निकाल येण्यास सुरुवात झाली.
      उमरगा मतदारसंघात एकूण 13 उमेदवार रिंगणात होते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे किसन कांबळे यांना 363 टपाली मतांसह एकूण 44 हजार 736 मते मिळाली. शिवसेनेचे उमेदवार ज्ञानराज चौगुले हे 588 टपाली मतासह 65 हजार 178 मते मिळवून विजयी झाले.  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. संजय गायकवाड यांना  15 हजार 569, दत्ता गायकवाड (बसपा)-1675, प्रा. विजय क्षीरसागर (मनसे)-1459, कैलास शिंदे (भाजप)-30,521, चंद्रकांत थोरात (भारतीय नौजवान सेना /पक्ष)- 421 आणि विद्या वाघमारे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) यांना 183 मते मिळाली. उमरग्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र गुरव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
तुळजापूर मतदारसंघातून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष जीवनराव गोरे यांचा 29 हजार 610 मतांनी पराभव केला. तुळजापूर  मतदारसंघात एकूण 2 लाख 17 हजार 408 मतदारांनी मतदान केले.  त्यातील नोटाला 1314 मते मिळाली. 6 मते बाद झाली. श्री. चव्हाण यांनी 70 हजार 701 मते प्राप्त करुन विजय मिळवला. जीवनराव गोरे यांना 41 हजार 91, प्रेमानंद डोरनाळीकर (बसपा) यांना 2 हजार 405, देवानंद रोचकरी (मनसे) – 35, 895, संजय निंबाळकर (भाजप)- 36, 380, सुधीर पाटील (शिवसेना) – 24 हजार 991, सतीश कसबे (महाराष्ट्र विकास आघाडी)- 893 आणि राहुल नागनाथ जवान (हिंदुस्थान जनता पार्टी)-385 अशी मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी बी. ए. घुगे यांनी मधुकरराव चव्हाण विजयी झाल्याचे घोषित केले.
      उस्मानाबाद मतदारसंघात सर्वाधीक 20 उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राणा जगजीतसिंह पाटील यांनी 88 हजार 469 मते प्राप्त करुन विजय मिळवला.  त्यांनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर (शिवसेना- 77 हजार 663 मते) यांचा पराभव केला.  भाजपचे संजय पाटील दूधगावकर यांनी 26 हजार 81 मते मिळवली. बसपाचे जयराम घुले यांनी 2 हजार 531, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे विश्वास शिंदे यांनी 9 हजार 81, मनसेचे संजयकुमार यादव यांनी 644, ऑल इंडिया एमआयएम यांना 4 हजार 555, रिपब्लिकन बहुजन सेनेचे अनिल हजारे यांना 654, बहुजन मुक्ती पार्टीचे उमेश भालेराव यांना 223, धनंजय तरकसे  (हिंदुस्थान निर्माण दल)-148, मधुकर गायकवाड (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया)-283 आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रमेश बनसोडे यांनी 195 मते मिळविली. याशिवाय आठ अपक्षही निवडणूक रिंगणात होते. उस्मानाबाद मतदारसंघात 621 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.
     जिल्ह्यात सर्वांत प्रथम परंडा मतदारसंघाचा निकाल घोषित करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांनी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राहुल मोटे यांना विजयी झाल्याचे घोषित केले. परंडा मतदारसंघात केवळ 10 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.  राहुल मोटे यांना 78 हजार 548 मते मिळाली.  शिवसेनेचे  ज्ञानेश्वर पाटील यांना 66 हजार 159, बसपाच्या संगीचा आगवणे यांना 1 हजार 256, मनसेचे गणेश दत्तात्रय शेडगे यांना 2 हजार 426, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नुरुद्दीन चौधरी यांना 7 हजार 760 मते मिळाली. राष्ट्रीय समाज पक्षाचे बाळासाहेब पाटील यांना 37 हजार 324 मते मिळाली.  हिंदुस्थान जनता पार्टीचे त्रिंबक राजगुरु यांना 695 मते मिळाली.  एकूण 1 लाख 97 हजार 108 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.  

Labels:

तुळजापुरात मधुकरराव चव्‍हाण सलग चौथ्‍यांदा विजयी

तुळजापूर :- तुळजापूर मतदारसंघातून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष जीवनराव गोरे यांचा 29 हजार 610 मतांनी पराभव केला. तुळजापूर  मतदारसंघात एकूण 2 लाख 17 हजार 408 मतदारांनी मतदान केले.  त्यातील नोटाला 1314 मते मिळाली. 6 मते बाद झाली. श्री. चव्हाण यांनी 70 हजार 701 मते प्राप्त करुन विजय मिळवला. जीवनराव गोरे यांना 41 हजार 91, प्रेमानंद डोरनाळीकर (बसपा) यांना 2 हजार 405, देवानंद रोचकरी (मनसे) – 35, 895, संजय निंबाळकर (भाजप)- 36, 380, सुधीर पाटील (शिवसेना) – 24 हजार 991, सतीश कसबे (महाराष्ट्र विकास आघाडी)- 893 आणि राहुल नागनाथ जवान (हिंदुस्थान जनता पार्टी)-385 अशी मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी बी. ए. घुगे यांनी मधुकरराव चव्हाण विजयी झाल्याचे घोषित केले.

Labels:

माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या खाजगी बाजार समितीचे एन.ए.रद्द जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडाम यांचे आदेश

 बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर)  जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांची बदली झाल्यानंतर कागदोपत्री अर्धवट प्रक्रियेची बार्शीतील काही बेकायदा बिनशेती परवानगी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रविण गेडाम यांनी दिले आहेत. सदरच्या बिनशेतीमध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या लक्ष्मी सोपान ऍग्रो प्रोड्युस मार्केटिंग कंपनी या खाजगी कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी दाखविलेल्या एकूण ४५३१३.२० चौरस मीटर जागेची बिनशेती परवानगी बेकायदेशीर ठरविण्यात आली आहे. सदरच्या बिनशेती परवानगीसाठी देण्यात आलेल्या प्रस्तावाच्या प्रकरणांना बिनशेती परवाना देतांना कर्मचारी व अधिकार्‍यांनी दि.२४ जानेवारी २०१३ रोजी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. िऊद्यमान जिल्हाधिकारी रुजू झाल्यानंतर सात महिन्यांपेक्षा अधिक कालावधीमध्ये एकही प्रकरण झाले नाही. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल झालेल्या जवळपास सर्वच संचिकांवर नस्ती प्राप्त क्रमांक, दिनांक आणि निर्गती दिनांक असा शिक्का मारुन नोंद घेण्याची पध्दती आहे. मात्र नेमक्या याच प्रकरणांत ही पध्दत पाळण्यात आलेली नाही. या बिनशेती आदेशाच्या काही संचिका मागील तारखेत आवक करीत असतांना तारखेत खाडाखोड करुन बदलण्यात आली आहे. नेमक्या याच संचिकांच्या बाबतील जिल्हाधिकारी यांचेकडे संचिका देतांना आवकचा क्रमांक व दिनांक नमूद करण्यात आलेला नाही. सदरची प्रकरणे दैनंदिन कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असे भासविण्यात आले आहे. तसेच तिनही प्रकरणांमध्ये चलन भरल्याचा दिनांक २५/१/२०१३ नंतरचा आहे. या सर्व बाबींवरुन तत्कालिन जिल्हाधिकारी श्री गोकुळ मवारे यांनी कार्यभार सोडल्यानंतर संबंधीत अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मदतीने बिनशेती आदेशांना मान्यता दिलेली आहे. आदेश निर्गमित होतांना श्री गोकुळ मवारे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत नव्हते. या सर्व बाबींमुळे हे सर्व आदेश बेकायदेशीर व्हॉईड ऍब इनिओ आणि नॉन ईस्ट इन लॉ ठरतात असे नमूद करुन या सर्व कारणांमुळे वरील नमूद सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत. सदरच्या आदेशाच्या मूळ प्रति जिल्हाधिकारी कार्यालयात जमा कराव्यात, महाराष्ट्र महसूल व वनविभाग यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ यात आणखी सुधारणा करण्यासाठी सन २०१४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.१७ दिनांक २२ ऑगस्ट २०१४ नुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील प्रकरण ३ मधील सुधारणांनुसार या प्रकरणात बिनशेती आदेशाची आवश्यकता असल्यास तसा प्रस्ताव सक्षम प्राधिकार्‍याकडे दाखल करण्याची मुभा सामनेवाला यांना देण्यात आली आहे. तसा अर्ज आल्यास सर्व वस्तुस्थिती व कागदपत्रे तपासून त्यावर संबंधीत कायदे आणि नियमातील तरतूदींनुसार संबंधीत प्राधिकार्‍याने उचित कार्यवाही करावी. सदर तरतूदीनुसार बिनशेती परवानगीची गरज नसल्यास, होत असलेला वापर नियमानुसार आहे अशी सक्षम प्राधिकार्‍याची खात्री होईपर्यंत तथाकथित आदेशानुसार अकृषिक बापराबद्दलची स्थिती जैसे थे ठेवण्यात यावी असे आदेश करण्यात आले आहेत.

Labels:

Saturday, 18 October 2014

मतमोजणी निमित्त वाहतूकीत बदल

उस्मानाबाद -: 242- उस्मानाबाद विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय, तुळजापूर रोड, उस्मानाबाद येथे रविवार,दि.19  रोजी होणार आहे. निवडणूकीचा निकाल ऐकण्यासाठी मोठया प्रमाणात लोकांची गर्दी होणार असल्याचे गृहित धरुन आणि वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये, तसेच गैरसोय टाळण्यासाठी  जिल्हा पोलीस अधीक्षक  अभिषेक त्रिमुखे यांनी मुंबई पोलीस  अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ब), प्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये वाहतूक मार्गात बदल करीत असल्याचे आदेश जारी केले आहेत, हे आदेश दि.19 ऑक्टोबर,2014 रोजीच्या सकाळी 6 वाजेपासून ते दुपारी    2 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
     या आदेशानुसार, खालील मार्गावरुन खालील नमूद वाहना व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहनांना वहातुकीस बंद करण्यात आला आहे.
    औरंगाबाद ते सोलापूरकडे जाणाऱ्या  वाहनांसाठी या मार्गावरुन प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी सदर वाहने सांजा नाका टी पाईट ते सांजा गांव मार्गे तुळजापूरकडे जातील. सोलापूर कडून येणारी आणि औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही हा मार्ग बंद असेल. त्याऐवजी, बेंबळी टी पॉईट ते आंबेवाडी, सारोळा, सांजा गाव, सांजा टी पॉईट मार्गे औरंगाबाद या पर्यायी मार्गे ही वाहने जातील. उस्मानाबाद शहरातून तुळजापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही रस्ता बद असेल. त्याऐवजी हॉटेल सोनाई जवळून गावसुद मार्गे तुळजापूर कडे ही वाहने जातील. सर्व पोलीस वाहने, केंद्र व राज्याचे सरकारी वाहने, अग्नीशामक व रुग्णवाहिका या वाहनांना हे बंदी आदेश लागू राहणार नाहीत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.                 

Labels:

निकालाची अद्यावत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर मिळणार

उस्मानाबाद -: राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीची मतमोजणी रविवार, दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होत आहे. या निवडणूकीच्या निकालाबाबत नागरिकांना आता निवडणूक आयोगाच्या वेबसावर अद्यावत माहिती मिळणार आहे. त्यासाठी नागरिकांना www.eciresults.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे निवडणूक यंत्रणेने कळविले आहे.       

Labels:

बार्शीतील राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांची पदे अपात्र

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: नगरसेवकांच्या बेकायदा बांधकामाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे महेश जगताप व दिपक राऊत यांनी तक्रार केली होती. महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४४ (१) (ई) नुसार दिलेल्या तक्रारीवर जिल्हाधिकारी यांनी निकाल देतांना बार्शीतील दोन नगरसेवकांची पदे अनर्ह ठरवून पद रिकामे केल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडाम यांनी दिले आहेत.
    राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष दगडचंद लोढा व स्विकृत नगरसेवक नागेश हरिभाऊ अक्कलकोटे असे नगरसेवकपद रद्द झालेल्यांची नावे आहेत. याचप्रमाणे दिपक पांडूरंग राऊत रमेश दिगंबर पाटील, श्रीमती विजया ज्ञानेश्वर खोगरे, श्रीमती कमल नामदेव सातपुते, अंबादास तुकाराम शिंदे, विजय विठ्ठल राऊत यांच्या विरोधात असलेल्या अवैध बांधकामाबाबतच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांनी निकाली काढून तक्रारी अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
     महेश अशोक जगताप यांनी सुभाष लोढा यांच्याविरोधात तर दिपक पांडूरंग राऊत यांनी नागेश अक्कलकोटे यांच्या विरोधात तक्रार केली होती. तक्रारदारातर्फे ऍड्.करंजकर, ऍड्.मराठे यांनी काम पाहिले नगरपरिषदेतर्फे ऍड्.खंडेलवाल तसेच सामनेवाला यांचे तर्फे ऍड्.व्ही.के.जाधव, ऍड्.झालटे, ऍड्.रजपूत यांनी काम पाहिले.

Labels:

भारताने विंडीजविरुद्धची मालिका जिंकली

धरमशाला : चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर ५९ धावांनी विजय मिळविला. या विजयासह भारताने ही मालिका २-१ ने जिंकली. विजयासाठी भारताने विंडीजसमोर ३३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते परंतु, वेस्ट इंडिजचा डाव २७१ धावांवर संपुष्टात आला. दुसरीकडे मानधनाच्या मुद्यावरुन वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू आणि बोर्डात वाद झाल्याने वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने उर्वरित दौरा रद्द केला.
    नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने ६ बाद ३३० धावांपर्यंत मजल मारली. बर्‍याच महिन्यांपासून फॉर्मसाठी चाचपडणार्‍या विराट कोहलीने या सामन्यात १२७ धावा केल्या. भारताच्या ७० धावा झालेल्या असताना शिखर धवनच्या रुपात वेस्टइंडिजला पहिले यश मिळाले. अँड्रयू रसेलच्या गोलंदाजीवर धवन बाद झाला. त्याने ३५ चेंडूत ३५ धावा केल्या. त्यानंतर अजिंक्य रहाणे अर्धशतक झळकवून बाद झाला. त्याने ७९ चेंडूत ६८ धावा केल्या. अर्धशतकी खेळीत त्याने सात चौकार लगावले. बेनने त्याला पायचीत केले दुसर्‍या सामन्यातील आपल्या खेळीचा लय कायम राखत विराट कोहलीने १२७ धावा तडकावल्या. यात त्याने तीन षटकार आणि १३ चौकार लगावले. त्याला दुसर्‍या बाजूने सुरेश रैनानेही चांगली साथ दिली. रैनाने ५८ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली. त्यांच्या या मजबूत खेळीमुळे भारताने त्रिशतकी अकडा पार केला.भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करताना विडिंजचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. सॅम्युल्सची ११२ धावांची शतकी खेळी वाया गेली. अन्य फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहोम्मद शामी, अक्षर पटेल आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. मानधानाच्या मुद्द्यावरुन झालेल्या वादामुळे वेस्ट इंडिज संघाने भारत दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजचा भारत दौर्‍यातील आजचा सामना शेवटचा ठरला. या दौर्‍यातील नियोजित एक एकदिवसीय सामना, एक टी-२० आणि तीन कसोटी सामने होणार नाहीत.

Labels:

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 उद्या मतमोजणी प्रशासन सज्ज

उस्मानाबाद : जिल्ह्यातील 240-उमरगा, 241- तुळजापूर, 242-उस्मानाबाद आणि 243- परंडा विधानसभा मतदार संघातील मतमोजणी  रविवार दि. 19 ऑक्टोंबर, 2014 रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरुवात होणार आहे.
    उमरगा (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील मतमोजणी अंतुबळी पंतगे सभागृह, उमरगा येथे सकाळी 8 पासून होणार असून या मतदार संघात एकूण 13 उमेदवार आहेत. या मतमोजणी दरम्यान एकूण 21 फेऱ्या अपेक्षित असून त्यासाठी 14 टेबल व  पोस्टल मतमोजणीसाठी दोन स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एका उमेदवारांच्या दोन प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील.
    तुळजापूर विधानसभा मतदार संघातील मतमोजणी स्पोटर्स हॉल तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, तुळजापूर येथे सकाळी 8 पासून होणार असून या मतदार संघात एकूण 13 उमेदवार आहेत. या मतमोजणी दरम्यान एकूण 27 फेऱ्या अपेक्षित असून त्यासाठी 14 टेबल व  पोस्टल मतमोजणीसाठी एक स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एका उमेदवारांच्या दोन प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील.
    उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातील मतमोजणी शासकीय आयुर्वेदिक कॉलेज, उस्मानाबाद येथे सकाळी 8 पासून होणार असून या मतदार संघात एकूण 20 उमेदवार आहेत. या मतमोजणी दरम्यान एकूण 25 फेऱ्या अपेक्षित असून त्यासाठी 14 टेबल व पोस्टल मतमोजणीसाठी एक स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एका उमेदवारांच्या दोन प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील.
           परंडा विधानसभा मतदार संघातील मतमोजणी गर्व्हरमेंट रेसीडेंट स्कूल फॉर एस सी आणि नवबुध्दा स्टुडंन्ट भूम, परंडा रोड, गोलेगाव  येथे सकाळी 8 पासून होणार असून या मतदार संघात एकूण 10 उमेदवार आहेत. या मतमोजणी दरम्यान एकूण 25 फेऱ्या अपेक्षित असून त्यासाठी 14 टेबल व पोस्टल मतमोजणीसाठी एक स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एका उमेदवारांच्या दोन प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील.
    चारही विधानसभा  मतदार संघातील मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी संबंधित मतमोजणी केंद्र परिसरात 200 मीटर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये बंदी आदेश जारी केले आहेत.

Labels:

Friday, 17 October 2014

डिझेलचे दर कमी होण्‍याची शक्‍यता

नवी दिल्ली-  विधानसभा निवडणुकीचे निकालानंतर सोमवारी डिझेलच्या प्रति लिटर किमतीत किमान साडेतीन रुपयांची कपात जाहीर होण्याची शक्यता आहे. 
    पेट्रोलियम मंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्राने याबाबतचे सुतोवाच केले.दोन दिवसांपूर्वीच पेट्रोलच्या प्रति लिटर किमतीत एक रुपयांची कपात करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. निवडणूक आचारसंहिता उठल्यानंतर डिझेलच्या किमतीतही मोठी कपात करण्याचा निर्णय झालेला आहे. यामुळे वाहतूक खर्च कमी होऊन ऐन दिवाळीत जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही कपात होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, यंदाची दिवाळी खर्‍या अर्थाने भरभराट घेऊन येणार आहे.गेल्या चार महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे २० टक्क्‌यांनी घसरल्या आहेत.

Labels:

निवडणूक निकालाबाबत उत्‍सुकता

पांगरी (गणेश गोडसे) मतदान झाले असून आता सर्वच पक्षांच्या कार्यकर्तासह नेत्यांना वेध लागलेत ते 19 अक्टोंबरचे.गावो गावच्या पारावार कार्यकर्त्यांच्या गप्पा निकालावरून  चांगल्याच रंगू लागल्या आहेत.पैशाच्या पैजाही मोठमोठ्या लागू लागल्या आहेत.वेळ प्रसंगी आम्हीच गुलाल उधळणार असे म्हणत हमरी तुमरीवर येऊ लागले आहेत.या वेळेस लढती या बहुरंगी झाल्यामुळे व गत लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या गळ्यात गळे घालून काम केलेले कार्यकर्ते या विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले गेले होते.
      राजकीय पक्षांच्या युतीमध्‍ये बिघाडी झाल्यामुळे निवडणुकीत दुरावलेले मित्र आपापल्या उमेदवाराचे भवितव्य मतदान यंत्रात बंद केल्यानंतर पुन्हा आपापल्या गुत्यावर भेटू लागले असून 'तेरी मेरी यारी दुनियासे भारी'असे म्हणत मधल्या काळातील दुरावा, निवडणुकीतील नेत्यांनी दिलेल्या व शिल्लक  राहिलेल्या पैशातून मदिरेचे सेवन करतानाचे दृश्य ग्रामीण भागात दिसुन येत आहे.
   सध्या मात्र सगळीकडेच निवडून कोण येणार,कोण क्रमानं दोन वर रहाणार,कोणाची अनामत जप्त होणार,जनता कोणाला गुलालापासून दूर ठेवणार,अमक्याने उभे राहायला नको होते,तमक्याचा फटका नेमका कोणाला बसणार आदि विषयावरील चर्चा गावकट्यासाह चौका चौकात,चावडी,पानटपरी,यासह सगळीकडेच चविणे चर्चिली जात आहे.ज्या त्या पक्षाचा कार्यकर्ता आपलाच उमेदवार निवडून येणार असे ठणकावून सांगत आहेत.तेव्हा विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याचे तोंड बघण्यालायक झालेले पाहावयास मिळते.कांही वेळेस तेथून काढता पाय घेऊन बघू 19 असे म्हणत वेळ मारून नेली जात आहे.कधी एकदाचा निकाल लागून मोकळा होतोय आशेही कार्यकर्त्यांना वाटते.गावं चावडीवरील गप्पातून आता काहीही साध्य होणार नसले तरीही काही मतदारांना आता आपण उगीचच चुकीच्या उमेदवाराला मतदान केल्याचा साक्षात्कार होऊ लागला आहे॰विधानसभेत जाण्यासाठि उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असून 19 तारखेला काय होणार याकडेच त्यांचे डोळे लागून राहिले आहेत.निवडणूक खर्चाचा ताळमेळ व गाड्यांची भाडी तोडी देण्यात उमेदवाराचा चांगलाच वेळ जात आहे.
 पैशाच्या हिशेबावरून निघू लागली उणी दुनि:
आधुनिक काळातील चतुर कार्यकर्तेही मी त्यातला नसल्याचे दाखवण्याची संधि सोडत नसून आलेले रक्कम व वाटप केलेली रक्कम याचा योग्य ताळमेळ घालत आहे.मात्र हिशोब जरी जुळत असला तरी तू काय केलय मला म्हाईत हाय असे म्हणताच कार्यकर्‍याचा पार चढून एकमेकांची उणी दुनि काढू लागले आहेत.स्थानिक पातळीवर सुरू झालेली भांडणे अखेर उमेदवारांच्या दारावर धडक मारू लागली असून निकाल लागायच्या अगोदरच अशी स्थिति तयार होत आहे॰नेते व उमेदवार हे निवडणुकीसाठी किती कोट बदलावे लागले व याच्या बदल्यात आपल्याला किती मतदान मिळणार याचा ताळमेळ लावण्यात गुंग आहेत.आतून कोणी कोणाचे काम केले,बाहेरून कोणाचे दाखवले,शेवटी मतदानाच्या दिवशी जवळच्या नेत्याने विरोधी उमेदवाराचे कसे काम केले,खोक्याच्या बदल्यात कोणी आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकले,यावेळेस मदत करण्याच्या अटीवर पुढील निवडणुकीत कोणी आल्यासाठी बांधणी करून घेतली,निवडांनुकीपूरवी कोण कोणाला केव्हा,कधी कसे कोठे,भेटले होते हे आता बाहेर येऊ लागले असून कार्यकत्यांनाही तोंडात बोटे घालण्याची वेळ येत आहे.पैसा एका उमेदवाराचा मात्र मतदान दुसर्‍याच उमेदवाराला करण्याचे फर्मान देण्यात आल्याचेही उघड होऊ लागले आहे.

Labels:

पांगरी परिसरात वादळी वा-याचे थैमान

पांगरी (गणेश गोडसे)  पांगरी ता.बार्शी परिसरात बुधवारी रात्री आठ वाजता वादळी वार्‍याने थैमान घातल्यामुळे परिसरातील पांढरी, उककडगाव गावासाह पांगरीच्या उत्तर भागातील वस्त्यावरील शेकडो लोकांच्या घरावरील पत्रे उडून गेले.
      शेतकर्‍यांनी काढून ठेवलेल्या सोयाबीन उडून ,विखुरले गेल्यामुळे व  ऊस पडल्यामुळे व शेकडो फळाची व इतर झाडे उन्मळून पडल्यामुळे  मोठे  नुकसान झाले.वीज वितरण कंपनीच्या वीज वाहक तारा,पोल तुटून पडले असून त्यामुळे विदूत प्रवाह खंडित झाला आहे.गावातील रामफल,किंच आंबा आदि अनेक जुने वृक्ष तुटून पडले.पांढरी येथीलच तांबे वस्तीतील पन्नास घरावरील पत्रे उडून गेले.वादळाची गती एवढी होती की वादळामुळे उककडगाव येथून मतदान यंत्रे  घेऊन पांढरीकडे येत असलेली एस टी  बस समुद्रातील जहाजाप्रमाणे हेलकावे खत होती कोणत्याही क्षणी बस पलटी मारेल अशी स्थिती निर्माण झाली होती.चालकाने पुढील काही दिसत नसल्यामुळे  प्रसंगावधान  राखून बस उभी करून वेळ मारून नेली.वादळ शांत झाल्यानंतर बस पांगरीच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली.
    पांढरी ह्या डोंगरी भागात असलेल्या गावातील दत्ता घावटे,भानूदास घावटे,धर्मराज घावटे,बापू आप्पा घावटे,आबा घावटे,शाम शिकेतोड,आदींचे वाडाळच्या तडाख्यात मोठे नुकसान झाले आहे.मुळातच पांगरी भागात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे दुष्काळ सदृश्य  स्थिति आहे.अनेकांच्या विहिरीतील साठे संपत आलेले आहेत.तशातच अल्पश्या पावसावर कसेबसे जगवलेले नगदी सोयबीनचे पिक वादळामुळे वाया गेले आहे.
चौकट: आगोदरच पांगरी भागातील शेतकर्‍यांच्या मागे दृष्ट चकरचा फेरा लागलेला असताना कसेबसे आलेले सोयाबींनचे पीकही निसर्गाने आपल्या कवेत घेऊन नस्ठ केले आहे.त्यामुळे पांगरी भागातील शेतकर्‍यावर रडण्याची वेळ आली आहे.

Labels: