Friday, 30 September 2022

गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी सावरगाव जिल्हा परिषद शाळेची यशस्वी वाटचाल - विलास जाधव


काटी , दि. ३० :उमाजी गायकवाड


 तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील इयत्ता आठवी मधील 22 पैकी 18 विद्यार्थ्यांनी एन.एम.एम.एस परिक्षेत सुयश संपादन करून शिक्षण क्षेत्रात "सावरगाव जिल्हा परिषद पॅटर्नचा "दबदबा असल्याचे परीक्षेतील सुयशाने अधोरेखित केले आहे. 


सन 2020-21 मध्ये घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस परीक्षेमध्ये सावरगाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील 22 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते त्यापैकी 18 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून या सर्व शिष्यवृती धारक विद्यार्थ्यांना प्रत्येकी बारावी पर्यंत प्रतिमाही एक हजार स्कॉलरशीप मिळणार आहे. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे व आदर्श शिक्षकांना गौरविण्यासाठी येथील ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांच्या हस्ते "गुणवंतांचा सत्कार सोहळा"या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या आवारात करण्यात आले होते. 


या दिमाखदार सत्कार सोहळ्यात NMMS परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेले परिक्षार्थी समर्थ गाबणे, कालिदास लिंगफोडे, अजिंक्य दरेकर, समर्थ डोके,समिक्षा मेंगले, हर्षदा मुळे, रिया फंड, आदित्य माळी, अभिनव काळदाते, सुदर्शन तानवडे, साक्षी डोके, वैष्णवी पवार, भाग्यश्री डोके, प्राची भडंगे, समर्थ मेंगले, प्राजक्ता भडंगे,विश्वराज सुरवसे, श्रेयस कांबळे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा तर शाळेचे आदर्श मुख्याध्यापक संदीप वाघ, आदर्श सहशिक्षक मोहन भोसले, राहुल सुरवसे, विशाल सुर्यवंशी, प्रकाश गोळसगाव, मोहन धोत्रे, रमाकांत गुरव, महादेवी कोरे आदींसह परिचारिका मंडोदरी माळी,जया काळे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हरि शेडुळे, श्रीमती अलकनंदा बिराजदार, श्रीमती नवल धाकपाडे, श्रीमती अनुराधा भोसले, श्रीमती स्मिता क्षिरसागर, अमोल मेलगिरी, अनिल दहिटनकर, जयश्री कुंभार, मनिषा पाटील आदींचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार   सोहळा पार पडला. 


या गौरव सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट तर शिक्षक व परिचारिकांना ट्रॉफी, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव म्हणाले की, येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देत या शाळेतील NMMS प्रतिक्षेत 18 विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याचे पाहून ही जिल्हा परिषदेची शाळा निश्चितच उल्लेखनीय काम करत असल्याचे सांगून या शाळेची गुणवत्ता शहरातील विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारी असल्याचे सांगत सावरगावची जिल्हा परिषद शाळा जिल्ह्यात एक वेगळे "मॉडेल" म्हणून ओळखली जाईल असे मत व्यक्त करुन शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समितीचे कौतुक केले. या सत्कार सोहळ्याचे बहारदार सुत्रसंचलन विशाल सुर्यवंशी तर आभार राहुल सुरवसे यांनी मानले.
 

 याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, केंद्रप्रमुख सोलंकर,जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील,सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम पाटील,शंकर शिंदे,सुधीर मगर,अमोल काळदाते, अंगणवाडी सुपरवायझर श्रीमती शिंदे, प्रा.कानिफनाथ माळी,रमेश चौगुले,चंद्रकांत गाबणे,शाळेचे मुख्याध्यापक संदीप वाघ, सहशिक्षक मोहन धोत्रे, रमाकांत गुरव, भास्कर मस्के,श्रीमती कोरे, महादेवी मॅडम, धनाजी चौरे, प्रकाश घोळसगाव ,नितीन गायकवाड गणपत होनमोटे, राहुल सुरवसे, मोहन भोसले,   विशाल सूर्यवंशी,पंडित सर, रामेश्वर साळुंके,श्रीमती काळे,श्रीमती घोडके आदी मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

उस्मानाबाद येथील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याकडून भाविकांना फराळाचे वाटप


उस्मानाबाद, दि.३० :राजगुरु साखरे :

 उस्मानाबाद येथील डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयातील सन २०२१-२२ तृतीय वर्षातील विद्यार्थ्याकडून नवरात्र महोत्सवामध्ये तुळजापुरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी सामाजिक बांधिलकी जपत दि,२९ रोजी शेकापूर रोड  शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय उस्मानाबाद येथे  शाबु खिचडी,केळी,फिरळ चिवडा, पिण्याची पाणी आदी फराळाच्या पदार्थाचे  वाटप करण्यात आले. 


या कार्यक्रमास विधी महाविद्यालयाचे डॉ. संजय आंबेकर, प्रा.शहा  यांनी सदिच्छा भेट दिली . यावेळी या कार्यक्रमास अतुल लगदिवे,  श्रीकृष्ण बाबरे, महावीर लोमटे, गणेश थोरात, रवींद्र कांबळे ,प्रवीण भालेराव डॉ. श्रीकृष्ण उंदरे - देशमुख, सचिन इंगळे, प्रशांत खोचरे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

Labels:

बसवंतवाडी येथे माता सुरक्षित अभियान संपन्न

तुळजापूर दि.३०

 तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" या अभियानाअंतर्गत 150 महिलांची तपासणी करण्यात आली. यावेळी तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.


शासनाच्या वतीने माता सुरक्षित असेल तर घर सुरक्षित राहू शकते, अशी संकल्पना राबविणारे माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान चालविण्यात येत आहे. तालुक्यातील बसवंतवाडी येथे या योजनेअंतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये महिलांचे आरोग्य ज्यामध्ये शुगर, बीपी, एचबी, वजन आणि उंची इत्यादींची तपासणी करण्यात आली.


 या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी भ्रष्टाचार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते नेताजी शिंदे ,संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष तानाजी जाधव, क्षीरसागर  लतिका, नेताजी शिंदे, आशा कार्यकर्ती उज्वला बनसोडे ,केदारनाथ ताटे यांची उपस्थिती होती. या शिबिरासाठी बसवंतवाडी येथील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

केंद्रीय पर्यटन स्थळाच्या यादीत तुळजापूरचा समावेशासाठी प्रयत्नशिल खासदार सुप्रिया सुळे

तुळजापूर, दि.२९ :

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या खासदार  सुप्रियाताई सुळे यांनी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या  चौथा माळी दिवशी श्री तुळजाभवानी मातेचे  दर्शन घेतले. 

यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भवानी मातेचे दर्शनानंतर मिळालेली ऊर्जा उपेक्षित गोरगरीब समाजाच्या उन्नतीसाठी आपण उपयोगात आणू असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचं तुळजापूर येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी  तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.   तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतिने त्यांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोकुळ  शिंदे व परिवहन एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवन गोरे,  तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, नळदुर्गचे  माजी नगराध्यक्ष  शफी शेख,  जिल्हा सचिव विजय सरडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका संघटक व प्रसिद्ध प्रमुख बबन गावडे,  खंडोजी जाधव, शहराध्यक्ष अमर  चोपदार,  गोरख पवार, दिलीप  मगर यांनी  पुष्पहार घालून तुळजापूर नगरीमध्ये त्यांचे स्वागत केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या निमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तुळजाभवानी मंदिरात उपस्थित होते.

उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष सुरेश  बिराजदार,  माजी आमदार  राहुल मोटे,  मराठवाडा विभागीय अध्यक्षा सौ.वैशाली मोटे, युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर,  प्रदेश उपाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, नंदकुमार गवारे,  युवक तालुका अध्यक्ष संदीप गंगणे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, शहराध्यक्ष नितीन रोचकरी, जन मंगल ग्रुप अध्यक्ष बाळासाहेब चिखलकर , विद्यार्थी  जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे ,रोहित चव्हाण, समर्थ पैलवान  शशी नवले,  ,राजाभाऊ शिंदे ,राजाभाऊ गायकवाड, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर  गंगणे, आप्पासाहेब पवार यांच्यासह तुळजापूर येथील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. 

  विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोकुळ शिंदे यांनी केंद्रीय पर्यटन स्थळाच्या यादीत तुळजापूरचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन दिले .


 खासदार सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी मंदिरामध्ये या दौऱ्यामध्ये दिसून आली

Labels:

तुळजापूर बस स्थानकामध्ये पिण्याच्या पाण्यासह प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी

तुळजापूर दि.३०: डॉ. सतीश महामुनी

तीर्थक्षेत्र असणाऱ्या तुळजापूर शहरांमध्ये दोन बस स्थानक असून दोन्ही बस स्थानकामध्ये भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची दुरावस्था आहे, बस स्थानकामधील किरकोळ सुविधा देखील देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असमर्थ ठरले आहे. 

तुळजापूर येथे दररोज हजारो भाविक आणि ग्रामीण भागातील प्रवासी येतात. जुने बस स्थानक अत्यंत मोक्याच्या जागेवर असल्यामुळे तेथील बस स्थानक अपुरे आहे. मात्र तेथील प्रवाशांची वाहतूक आणि यातायात अत्यंत जलद गतीने असल्यामुळे ही अडचण लक्षात येत नाही. परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने तसेच उस्मानाबाद विभागीय अधिकारी व तुळजापूर येथील आगार प्रमुख यांचे नागरिकांच्या सुविधाकडे संपूर्ण दुर्लक्ष होत  आहे. कोणतीही सुविधा नागरिकांना या बस स्थानकामध्ये मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक वर्षापासून नागरी सुविधांची दुरावस्था असून देखील तुळजापूर येथील कोणताही लोकप्रतिनिधी यासंदर्भात प्रयत्न करत नाहीत. उलट बस स्थानकाच्या परिसरात आपल्या समर्थकांचे अतिक्रमण करण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे. राज्य सरकारने नवीन बस स्थानक बांधून दिले.  मोठा खर्च करून बांधलेल्या बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर पंधरा-वीस  व्यवसाय करणाऱ्या लोकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण देखील परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना थांबवता आले नाही. याकडे त्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आज त्या ठिकाणी लोकांनी आपले व्यवसाय तंबू ठोकून सुरू केले आहेत. परिणामी अद्यावत आणि देखणे प्रवेशद्वार असणाऱ्या या बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा मधून बस स्थानकामध्ये प्रवेश करता येत नाही. तेथे मातीचे ढिगारे आणि अतिक्रमण झालेले आहे.

परिवहन महामंडळाचे अधिकारी केवळ तुळजापूर येथील बस मधून मिळणारे उत्पन्न पाहतात येथील भाविकांच्या पैशावर परिवहन महामंडळाचा कारभार चालतो. परंतु भाविकांना पिण्याचे पाणी, थांबण्यासाठी निवारा, बसण्यासाठी आसन  व्यवस्था याशिवाय इतर किरकोळ सुविधा देण्यात येत नाहीत. नागरिक या संदर्भात आपली नाराजी व्यक्त करतात, परंतु त्याचा कोणताही परिणाम या परिवहन महामंडळाच्या प्रशासनावर आजपर्यंत झालेला नाही.



 तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी तुळजापूर शहराला विकसित करण्याचे आश्वासन अनेक वेळा दिले. शहरामध्ये वैश्विक शैक्षणिक संकुल उभारणार असे आश्वासन दिले परंतु साधी वीट देखील आमदार महोदयांनी ठेवलेली नाही. बसस्थानकासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी देखील या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात.

जुन्या बसस्थानकामध्ये मागील तीन महिन्यापासून मातीचे ढिगारे आणि पाऊस पडल्यानंतर चिखल होत आहे. अनेक वेळेस याविषयी आवाज उठवून देखील परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने मुरूम टाकण्या पलीकडे काहीही केले नाही. सदरील मुरूम देखील अपूर्ण टाकला असून त्याची दबाई करण्यात आलेली नाही. बस स्थानकामधील स्वच्छतागृह दुर्गंधीयुक्त असून तेथे जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे नाईलाज असतो, लोकांना बाटलीचे विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. सभोवताली व्यवसाय करणारे लोक देखील या प्रकारामुळे हैराण झाले आहेत.

उस्मानाबाद विभागीय परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि तुळजापूर आगार प्रमुख यांनी तातडीने नवीन बस स्थानक आणि जुने बस स्थानक येथे अध्यायवत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी उपाययोजना करावी अशी प्रवाशांची मागणी आहे. महामंडळाच्या परिपत्रकानुसार ज्या सुविधा बस स्थानकामध्ये असणे अपेक्षित आहे त्या सर्व सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात. बस स्थानक परिसर अतिक्रमणमुक्त आणि अवैध वाहतूक मुक्त करण्यात यावा. जबाबदार अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमपणा स्पष्टपणे महामंडळाच्या कारभारात दिसतो आहे.

Labels:

Thursday, 29 September 2022

हजारो भाविकांनी घेतले तिसऱ्या दिवशी भवानी मातेचे दर्शन


तुळजापूर, दि. २९ 

 नवरात्र महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी हजारो भाविक भक्तांनी तुळजाभवानी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. देवीचे दही आणि दुधाचे अभिषेक मंगलमय वातावरणात संपन्न झाले, 

अभिषेकानंतर जांभळ्या रंगाचा तुळजाभवानी देवीला घातलेला शालू आणि केलेली सजावट अत्यंत देखणी आणि नेत्रदीपक असल्यामुळे भाविक भक्तांनी तुळजाभवानी देवीच्या सजावटीचे कौतुक केले.

लाल आणि सोनेरी रंगांमधील नेतृत्व दीपक मनमोहक फुलांची केलेली सजावट आणि तुळजाभवानीला घातलेले प्राचीन मौल्यवान अलंकार, अंगावर नेसवलेला जांभळ्या रंगाचा शालू आणि भवानी मातेच्या पुजाऱ्यांनी अत्यंत नाजूकपणे केलेली देवीची पूजा या अनेक वैशिष्ट्यामुळे तिसऱ्या दिवशी तुळजाभवानीचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना सुखद अनुभव आला. चांदीच्या सिंहासनावर करण्यात आलेली सजावट आणि सिंहासनाच्या पाठीमागे करण्यात आलेली सजावट यामुळे देवीचे वेगळे रूप पाहावयास मिळाले.


मंगळवारी रात्री दहा वाजता तुळजाभवानी देवीचा निघालेल्या छबिनामध्ये हजारो भाविकांची उपस्थिती होती. रात्रभर देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी कायम होती. मध्यरात्री दर्शन मंडपामध्ये भाविकांना सोडण्यात आले. त्यानंतर धर्मदर्शन आणि मुखदर्शन या रांगा सुरू झाल्या. सकाळी सात वाजता देवीचे दही आणि दुधाचे अभिषेक सुरू झाले. त्यानंतर देवीचे नित्य उपचार पूजा संपन्न झाली. आरती आणि नैवेद्य देवीला दाखवण्यात आला. 



शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या दिवशी मंदिर परिसर आणि गाभारा परिसर याची फुलांची सजावट करण्यात आली होती. दरम्यान पावसामुळे भाविकांना पावसाचा त्रास सहन करावा लागला. दिवसभर 90 हजार भाविकांनी दर्शन घेतल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Labels:

Wednesday, 28 September 2022

शारदीय नवरात्र महोत्सवातील तिसरी माळमंदिर परिसरात नेत्र दीपक फुलांची सजावट

तुळजापूर, दि. २८ डॉ सतीश महामुनी 

शारदीय नवरात्र महोत्सव तिसऱ्या माळेच्या निमित्ताने पुणे येथील तुळजाभवानीचे भक्त प्रवेश कैलास पेटकर यांनी केलेली मंदिर परिसरातील नेत्रदीपक फुलांची सजावट आणि हजारो भाविक भक्तांनी तुडुंब भरलेले दर्शन मंडप अशी वैशिष्ट्ये पाहावयास मिळाली .रात्री उशिरापासून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी कायम होती. सायंकाळी साडेनऊ नंतर ही गर्दी जास्त प्रमाणात वाढली गेली आणि दर्शन मंडपाचे चारही मजले भाविकांच्या गर्दीने तुडुंब भरलेले दिसून आले . 

आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो जयघोषात ग्रामीण भागांमधून आलेल्या भाविक भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. भवानी मातेच्या दर्शनाची आस या भाविकांना लागलेली स्पष्टपणे जाणवत होती . श्री तुळजाभवानी मंदिर कैलास पेठकर रा. पुणे यांनी शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त श्रीदेवीजींचा गाभाऱ्यात व मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक  उत्तम दर्जाचे उत्कृष्ट अशी सजावट केलेली आहे . फुलांची सजावट करण्यासाठी पुणे येथील 30 कुशल कला कलाकार मंदिरामध्ये फुलांचे काम केले आहे.


 देवीचे भक्त पेटकर परिवार यांनी तुळजाभवानी देवीची श्रद्धा पूर्वक ही फुलांची सजावट केल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान मंदिर संस्थांच्या वतीने या परिवाराचा सत्कार करण्यात आला.

यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबाचा मंदिर संस्थानच्या वतीने  व्यवस्थापक प्रशासन योगिता कोल्हे यांनी श्री देवीची प्रतिमा व साडी, फोटो, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  यावेळी सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक विश्वास कदम, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे,  मंदिर कर्मचारी  गणेश नाईकवाडी, संकेत वाघे व सुरक्षा रक्षक आदी उपस्थित होते . 

तुळजाभवानी देवीचा गाभारा सिंह गाभारा भवानी शंकर परिसर यमाई आणि इतर उपदेवतांची मंदिरे ओवरी होमकुंड निंबाळकर दरवाजा राजे शहाजी महाद्वार राजमाता जिजाऊ महाद्वार गोमुखतीर्थ अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही फुलांची अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आल्यामुळे  शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीचे हे आकर्षण ठरले

Labels:

काटी येथिल देशमुखाचा जुना वाडा कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही; टु व्हीलरचा चक्काचूर


काटी ,दि . २८ : उमाजी गायकवाड 

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील पाच एकर परिसरात असलेल्या व‌ पाच बुरुज असलेला दगडी तटबंदीचा जवळपास पाचशे वर्षांपूर्वीचा कै. रावसाहेब देशमुख व माजी चेअरमन सयाजीराव देशमुख यांच्या वाड्याच्या पाठीमागील बाजूची दगडी तटबंदीची भिंत बुधवार दि. 28 रोजी पहाटे पाचच्या सुमारास कोसळली. हि घटना पहाटे घडल्यामुळे सुदैवाने कुठलेही जीवितहानी झाली नाही. 


मात्र  भिंतीच्या बाजुला लावलेली प्रदीप साळुंके यांच्या होन्डा गाडीचा समोरील भाग चक्काचूर झाला.तर सुहास साळुंके यांच्या ट्रॅक्टरचे रोटर  ढासळलेल्या दगडाखाली अडकून पडले आहे. दगडी तटबंदीचा अर्धवट भाग कोसळल्याने धोका निर्माण झाला. संपुर्ण वाड्याच्या दगडी भिंतीला मोठमोठ्या भेगा पडल्याने व भिंतीवर मोठमोठे झाडे आल्याने दगडी तटबंदीच्या आजुबाजुच्या घरांना धोका निर्माण आहे.


काटी हे गाव अनेक पुरातन वास्तूमुळे प्रसिद्ध असणारे गाव म्हणून ओळखले जाते. निजामशाही काळात या  वाड्याचा आधार निजामाच्या अतिक्रमणावेळी गावातील लोक आश्रयासाठी घेत असल्याची आख्यायिका सांगितली जाते.  त्यामुळे या गावास ऐतिहासिक महत्व आहे. या वाड्याला असलेली भली मोठी तटबंदी भिंत व तटबंदी भिंतीच्या कडेला असलेले पाच मोठे बुरुज पुर्व वैभवाची साक्ष देत आहेत.


भिंतीवरील झाडे लवकर काढणार

दगडी तटबंदीच्या भिंतीवर आलेली झाडे लवकरात लवकर समुळ नष्ट करणार असून दगडी तटबंदीलगत असणाऱ्या कुटूंबियांनी सतर्क राहण्याचे आवाहन वाड्याचे मालक तथा माजी चेअरमन सयाजीराव देशमुख यांनी केले आहे.

Labels:

वागदरी शिवारात वीज पडून एका गायीचा मृत्यु

वागदरी ,दि. २८: एस.के.गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील वागदरी  शिवारात मंगळवारी  अचानक मेघगर्जना होवुन जोरदार पाऊस सुरु असतानाच वीज पडून गाय जागीच मरण पावली तर पावसामुळे शेतातील पिक काढणी करणा-या शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

दि.२७ सप्टेंबर  रोजी तुळजापूर तालुक्यातील वागदरी व परिसरात दुपारी ३.४५ वा.दरम्यान अचानक वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. यावेळी वागदरी शिवारात तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष फतेसिंग ठाकूर यांच्या शेतातील बांधावर  असलेल्या दुभत्या गायीवर वीज कोसळल्याने गायीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. 
 

 सरत्या पावसातील हस्त नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास वागदरी व परिसरात अचानक पावसाला सुरुवात झाली.काही मिनिटात पावसाने उग्र रूप धारण केले. विजेच्या कडकडाट सुरू झाला. शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली. उडीद काढून जमीनीवर टाकलेले भिजून गेले. शेतकऱ्यांना स्वतःला आसरा गाठने कठीण झाले. काहीनी आपापल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेतला. 
  

वागदरी येथील शेतकरी फतेसिंग ठाकूर व इतरांनी  शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेतला. पण शेडच्या जवळच अंतरावर असलेल्या बांधावरील लिंबाच्या झाडाखाली त्यांची गाय पावसाचे टपोरे थेंब अंगावर झेलत उभी होती. आचानक विजेचा जोरदार कडकडाट झाला आणि वीज  गायीच्या अंगावर कोसळली.त्यातच त्या गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला.गायीच्या दुर्दैवी मृत्यू बद्दल शेतकरी ग्रामस्थातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Labels:

Tuesday, 27 September 2022

श्री तुळजाभवानी मातेचे पहिल्याच दिवशी दिड लाख भाविकानी घेतले दर्शन


तुळजापूर, दि. २७ ,डॉ. सतीश महामुनी

 महाराष्ट्राची  कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला सोमवारी दुपारी बारा वाजता  घटस्थापना कार्यक्रमाने सुरुवात झाली आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री व सौ कौस्तुभ दिवेगावकर यांनी यजमान म्हणून घटस्थापना केली. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी सुमारे दीड लाख भाविकांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले .

श्री तुळजाभवानी देवीचे शारदीय नवरात्र महोत्सव घटस्थापना या पहिल्या धार्मिक कार्यक्रमाने सुरू झाले. तत्पूर्वी 17 सप्टेंबर रोजी तुळजाभवानी देवीची सुरू झालेली यात्रा मध्यरात्री एक वाजता पूर्ण झाली, आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो, अशा जयघोषात व मंगलमय वातावरणात मध्यरात्री तुळजाभवानी देवीची मूर्ती शेज घरामधून चांदीच्या मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली. हळद आणि मेन याच्या साह्याने चांदीची  सिंहासनावर मूर्ती स्थापित करण्यात आली. त्यानंतर देवीला दही आणि दुधाचे अभिषेक घालुन  नैवेद्य दाखविण्यात आले व भाविकांचे दर्शन सुरू करण्यात आले. पुन्हा सकाळी सात वाजता देवीला दही दुधाचे अभिषेक करण्यात आले आणि नित्योपचार पूजा संपन्न झाली. 


पाळीचे पुजारी शशिकांत पाटील आणि इतर सहकारी सचिन परमेश्वर, शशिकांत परमेश्वर, बब्बू  सोनजी, यांच्यासह इतर सहकारी या पूजा बांधणीसाठी उपस्थित होते.
सकाळी 11 वाजता घटाची मिरवणूक काढण्यात आली, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, महंत तुकोजी महाराज, महंत चिलोजी महाराज, जारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंखे, उपाध्यक्ष विपिन शिंदे, तुळजाभवानी भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, तुळजाभवानी उपाध्य मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, व्यवस्थापक सिद्धेश्वर इनतुले, दत्तात्रय कुलकर्णी, किशोर गंगणे, सुधीर परमेश्वर, सचिन परमेश्वर, शशिकांत पाटील अतुल पाटील, संजय पेंदे, गोविंद लोंढे, मकरंद प्रयाग, इंद्रजीत साळुंखे ,विकास  मलबा, कुमार इंगळे, गणेश रसाळ, विशाल रोचकरी, महेश चोपदार, संजय सोनजी ,जगदीश पाटील,  उदय कदम ,श्रीराम अपसिंगेकर, राजाभाऊ ओवरीकर, राजकुमार भोसले, प्रवीण अमृतराव यांच्यासह इतर पुजारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबळाचा कडकडाट आणि जय भवानी, जय शिवाजी, आई राजा उदो' उदो च्या जयघोषात  मिरवणुकीमध्ये कुंकवाची मुक्त  उधळण करत पहिल्यांदा सिंह गाभाऱ्यात तुळजाभवानी देवीचे घट बसवण्यात आले. 


यावेळी धान्य मानकरी प्रफुल्लकुमार शेटे यांची उपस्थिती होती. विधीवत काळी माती आणि इतर साहित्य धान्य याच्या साह्याने व धार्मिक परंपरेनुसार घटस्थापना संपन्न झाली. त्यानंतर यमाई मंदिर त्रिशूल मंदिर आणि आदिमाया आदिशक्ती येथे विधिवत घटस्थापना संपन्न झाली.

यावर्षी मोठ्या संख्येने शारदीय नवरात्र महोत्सवांमध्ये भाविकांची संख्या राहणार आहे. असा पूर्व अंदाज असल्यामुळे प्रशासनाने भाविकांच्या दर्शनाची सोय केली आहे. रात्रीपासून खूप मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दर्शनासाठी येत असताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जलद दर्शन करण्याच्या अनुषंगाने वेगवेगळे मार्ग निश्चित केले असून सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.  पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी  हे  यात्रेवर नियंत्रण करीत आहेत.

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी चांगला व्यापार होणार असल्याचा अंदाज व्यक्त करून आपल्या व्यवसायाची मोठी साधनसामग्री गोळा केली आहे. पाण्याच्या बाटल्या खूप मोठ्या संख्येने विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटण्यात आली आहेत. प्रासादिक भंडाराची दुकाने चार पटीने वाढली आहेत.  यावर्षी मंदिर संस्थान कडून चप्पल ठेवण्यासाठी भाविकांची केलेली व्यवस्था अपुरी असल्याचे दिसून येत आहे. चप्पल स्टैंडच्या कमतरतेमुळे भाविकांची तारांबळ उडत आहे


Labels:

तुळजापूर नगरपरिषदेसमोर रिपाइंचे निदर्शने , डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्याची मागणी

तुळजापूर , दि.२७ :

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने तुळजापूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांचा पुर्णाकॄती पुतळा बसविण्याच्या कामाचे भुमीपुजन ८ दिवसात करण्यात यावे, तसेच शिल्पकाराची थकीत देयक रक्कम अदा करण्यात यावी, या मागणीसाठी नगरपरिषदे समोर निदर्शने  करण्यात आले .
 

याप्रसंगी रिपाइं कार्यकर्त्यांनी नगरपरिषद  समोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने आंदोलन करून वरील मागणीचे निवेदन न.प. कार्यालय प्रमुख वैभव पाठक याना दिले. यावेळी रिपाइंचे आंनद पांडागळे,तानाजी कदम, अमोल कदम, विष्णु सोनवने, भास्कर पांडागळे,रवी वाघमारे,आप्पा कदम, अंकुश माने,ज्ञानदेव कदम,तानाजी डावरे,मेसा मडमे,दत्ता हावळे, सुरेश पांडागळे,साहील रोकड़े,धोंडीबा काळुंके सह कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी प्रशासनाने तातडीची पावले उचलली पाहिजेत. वेळेची बचत करून लवकरात लवकर पुतळा उभारावा अशी मागणी या निमित्ताने रिपाईचे   तानाजी कदम यांनी बोलून दाखवली.

Labels:

उमरगा येथे नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू


उमरगा,दि.२७:  लक्ष्मण पवार

नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी येथील तुळजाभवानी मित्र मंडळाच्यावतीने अंतुबळी सांस्कृतिक सभागृहासमोर सोमवारी मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले. 

या अन्नछत्राचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य संताजी चालुक्य, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे  माजी उपाध्यक्ष तथा अन्नछत्राचे प्रमुख कैलास शिंदे, अशोक जोशी महाराज, माजी नगरसेवक शरणप्पा घोडके, माजी नगरसेवक बाबुराव सगर यांच्या हस्ते करण्यात आले. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक पायी जात असतात. आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्याची सीमा संपल्यानंतर महाराष्ट्र राज्याची सीमा सुरू होते. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आंध्र व कर्नाटकातील हजारो भाविक या मार्गावरून दरवर्षी पायी जातात. पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी शहरातील तुळजाभवानी मित्र मंडळाच्यावतीने गेल्या २२ वर्षापासून मोफत अन्नछत्र सुरू करण्यात येते. अन्नछत्रात फराळा बरोबरच जेवणाची उत्तम सोय मंडळाच्यावतीने केली जाते. नवरात्र उत्सव काळात लाखोंच्यावर भाविक येथील अन्नछत्राचा लाभ घेतात. 

सोमवारी सुरू करण्यात आलेल्या अन्नछत्र कार्यक्रमाप्रसंगी शंतनु सगर, अशोक जोशी महाराज, गोपाळ घोडके, राजेश स्वामी, लक्ष्मण पवार, अनंत पाटील, मंगेश गायकवाड, कैलास स्वामी, संकेत नागणे, बसवराज घोडके, दिलीप माने, मल्लिणाथ कलशेट्टी, आदींची उपस्थिती होती.

Labels:

Monday, 26 September 2022

चिवरी येथील महालक्ष्मी देवीच्या नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने प्रारंभ


चिवरी,दि.२६:

 तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या  नवरात्र महोत्सवास  सोमवाार   दि.२६ रोजी  घटस्थापनेने प्रारंभ झाला आहे. 

घटस्थापनेच्या दिवशी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये पहाटे  देवीला महा अभिषेक ,महापूजा, महाआरती करण्यात आली.  यानंतर   मंदिराच्या गाभार्‍यात भक्तिमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली. यावेळी आई राजा उदो उदो च्या जयघोषानेे परिसर दुमदुमूूून गेला होता.  नवरात्रोत्सवामध्ये मंदिरात आरास बसणे, आराधी गीते, सुहासिनींना फराळाचेे वाटप करणे, आदी धार्मिक कार्यक्र केले जातात .

  
मागील दोन वर्षापासून कोरोना महामारी च्या पार्श्वभुमीवर मंदिर बंद असल्यामुळे नवरात्र  महोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यंदा माञ निर्बंध मुक्त उत्सव साजरा होत असल्याने  भाविकांमध्येेेे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे .

Labels:

श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

नळदुर्ग ,दि. २६ : शिवाजी नाईक 

शहरातील जगदंबादेवी (अंबाबाई) देवस्थान ट्रस्ट  संचालित श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र महोत्सवा निमित्त  विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी दिली.


नळदुर्ग शहर व परिसरातील भाविक भक्तासाठी नवरात्र महोत्सव श्री अंबाबाई मंदिर येथे  मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार असुन पुढीलप्रमाणे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

सोमवार दि २६ रोजी नवरात्रारंभ घटस्थापना , 
मंगळवार दि २७ रोजी सांयकाळी  संगीत खुर्ची (वय ६ ते १० वर्षांतील) मुले व मुलीकरिता , दि २८ रोजी  सायंकाळी ५ वाजता संत ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ , महिला भजनी मंडळ यांचा कार्यक्रम, दि २९ रोजी   कु. नम्रता शिवाजी नकाते (मुर्टा) हिचे  "आजची स्त्री"  या विषायावर सायंकाळी ५ वाजता व्याख्यान  होणार आहे, तर दि ३० रोजी कुंकुमर्जन  दुपारी ३ ते ४:३० वाजता,त्याचबरोबर  दि ०१ रोजी महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम  सायंकाळी  ५ ते ७ वाजता आयोजित करण्यात आले आहे. 

दि ०२ रोजी रांगोळी स्पर्धा सकाळी ११ वाजता, आराधी गीतांचा कार्यक्रम तुळजाभवानी आराधी ग्रुप, चिकुंद्रा (सायं ५ ते ७ पर्यंत), 
दि ०३ रोजी सचिव महा.रा.खादी उद्योग उस्मानाबादचे विद्या गोर्वधन डोईफोडे 
यांचे  "महिला लघु- उद्योग" या विषयावर  सायंकाळी ५ वाजता मार्गदर्शन  , कन्या पूजन (७ वर्षा खालील मुली) वेळ सायं.६ वाजता , दि ०४ रोजी होम- हवन व अजबळी, परडी भरणे कार्यक्रम (सायं ५वा), दि ०५ रोजी सीमोल्लंघन सोहळा सायंकाळी ५ वाजता देवीच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.


 नवरात्र कालावधीत दररोज पहाटे ५.३० वाजता आभिषेक , दररोज सायंकाळी ७ वाजता महाआरती  होणार आहे. त्याचबरोबर  मनिष हजारे , रत्नाकर कुलकर्णी , यशवंत बेले , संजय मोरे , भिमाशंकर बताले , बलदेवसिंह ठाकुर , मारुती ,घोडके , युगंधरा मैत्रीण ग्रुप, अक्षरवेल  महिला ग्रुप , राजकुमार खद्दे , शशिकांत पुदाले , दत्ताञ्य दासकर , बाबा कटके, विजयकुमार धरणे , नितीन कासार , बाबासाहेब पिचे आदीच्यावतीने फराळ व फळे वाटप करण्यात येणार आहे.


  ज्या भक्तांना प्रसाद वाटप करायचे असेल ईच्छुकानी  सायंकाळी ५ ते ७ वाजता वाटप करण्याचेआवाहन करुन भाविक भक्तांनी नळदुर्ग येथील श्री अंबाबाई मंदिर हे अतिशय प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. मागील वर्षापासून  मंदिर जीर्णद्धाराचे काम सुरू आहे. अनेक भाविक भक्तांनी सढळ हाताने मदत केलेली आहे. त्या सर्वांचे आभारी आहोत. जीर्णद्धाराचे काम सुरूच आहे. संरक्षण भिंत व खोली, भोजन हॉल बांधकाम यासाठी आपण देणगी स्वरूपात सहकार्य करण्याचेही आवाहन  श्री जगदंबादेवी (अंबाबाई) देवस्थान ट्रस्ट नळदुर्ग श्री अंबाबाई मंदिर जीर्णोद्धार समिती  व नवरात्र महोत्सव समिती यानी केले आहे.

मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई  तुळजाई स्पीकर्स व मंडप कॉन्ट्रॅक्टर नळदुर्ग तर्फे प्रवीण जाधव यानी तर प्रसिध्दी पञक राजेंद्र महाबोले यानी केले आहे.

Labels:

Sunday, 25 September 2022

विस्तार अधिकारीपदी पदोन्नती झालेबद्दल मुख्याध्यापक पठाण यांचा सत्कार

काटी, दि.२५


तुळजापूर  तालुक्यातील सावरगाव येथील मुख्याध्यापक रमजान पठाण यांची उमरगा तालुक्यातील माडज बीट अंतर्गत विस्तार अधिकारीपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल शनिवार 24  रोजी काटी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक अमिन शेख यांच्या हस्ते सावरगावचे मुख्याध्यापक रमजान पठाण यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
     


यावेळी सहशिक्षिक तानाजी  शेळके, इंद्रजित जंगले, राजेंद्र कापसे, सुधीर बोंदर,भारत कटकदोंड, गोविंद जोशी, श्रीमती सविता पवार, रेखा कोळी, विद्युलता आलाट,सुषमा माने आदी मान्यवर उपस्थित होते.

Labels:

जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत यमगरवाडीचा आनंद मुद्दे प्रथम

काटी, दि. २५

उस्मानाबाद जिल्हा अम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने  नुकत्याच पार पडलेल्या परंडा येथे खुल्या गटातील जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स  चॅम्पियनशिप स्पर्धेत तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील  एकलव्य विद्या संकूलमधील विद्यार्थी आनंद मुद्दे याने 3 कि.मी. स्टिपल चेस क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावित गोल्ड मिळवून घवघवीत यश संपादन केले. 


तसेच पुढील होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी उस्मानाबाद जिल्हा संघात निवड झाली. आनंद मुद्दे हा विद्यार्थी तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी विद्या संकूलात शिक्षण घेत असून तो मुख्याध्यापक अण्णा कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे,  क्रीडा मार्गदर्शक माऊली भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या स्पर्धेत 3 कि.मी. स्टिपल चेस क्रीडा प्रकारात आनंद मुद्दे याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाचे भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र वैदू, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, सचिव विवेक आयचित अशोक संकलेचा, सतीश कोळगे, तर डॉ.पुरी, शाळेचे मुख्याध्यापक अण्णा कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे यांच्यासह ग्रामस्थ,पालकांनी विशेष कौतुक केले आहे.

Labels:

श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास सोमवार पासुन प्रारंभ,


तुळजापूर दि २५ डॉ. सतीश महामुनी


नवरात्राच्या निमित्ताने महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या तीन राज्यांमधून खूप मोठ्या संख्येने भावीक श्री क्षेत्र  तुळजापुरात येणार असल्याने  भाविकांच्या सोयीकरिता  प्रशासनाने उपाय योजना केले आहेत.

 दुपारी बारा वाजता  नवरात्र महोत्सवाची यजमान श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी  डॉ. कौस्तुभ दिवेगावकर हे सपत्नीक घटस्थापना विधीला बसणार आहेत. परंपरागत पद्धतीने मंदिर संस्थांनच्या यजमानपदी उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असण्याची परंपरा आहे. 


दि.२६ सप्टेंबर रोजी पहाटे व सकाळी श्रीदेवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य व दुपारी १२  वाजता घटस्थापना तर सायंकाळी अभिषेक, पंचामृत, महापूजा, नैवेद्य, आरती व रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. या महोत्सवात दि.२६ सप्टेंबर ते दि.१० ऑक्टोबर  या कालावधीत शारदीय नवरात्र महोत्सवाचे धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.

  दि.२६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते व सर्व मानकरी, पुजारी व पाळेकरी यांच्या उपस्थितीत विधिवत घटस्थापना करण्यात येईल. तर मंगळवार दि.२७ सप्टेंबर रोजी सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळा श्री देवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, आरती व रात्री छबिना मिरविण्यात येणार आहे. तसेच बुधवार ‌दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळा श्री देवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा नैवेद्य आरती व रात्री छबिना काढण्यात येणार आहे. 

 गुरुवार दि.२९ सप्टेंबर रोजी श्रीदेवीची अभिषेक पंचामृत रथ अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती व सायंकाळी अभिषेक आरती व रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार दि.३० सप्टेंबर रोजी ललित पंचमी दिनी श्री देवीजींची पंचामृत मुरली अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती, सायंकाळी अभिषेक आरती व रात्रीचे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर शनिवार दि. १ ऑक्टोबर रोजी श्री देवीजींची अभिषेक पंचामृत शेषशाही अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती, सायंकाळी अभिषेक आरती व रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच रविवार दि.२ ऑक्टोबर रोजी श्री देवीजींची अभिषेक पंचामृत भवानी तलवार अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती, सायंकाळी अभिषेक आरती व रात्रीचे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.

 सोमवार दि.३ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी दिनी श्री देवीजींची अभिषेक पंचामृत महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा सकळी ११.३० वाजता वैदिक होमास व हवनास आरंभ तर दुपारी ४.४५ वजता पूर्ण होतील व रात्रीचे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच मंगळवार दि. ४ ऑक्टोबर रोजी महानवमी (खंडे नवमी) श्री देवीजींची नित्योपचार महापूजा, दुपारी १२.०० वाजता होमावर अजाबली आपली व घटोत्थापन (घट उठविणे) दिवसभर नैवेद्य, दर्शन व रात्री पलंग पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर बुधवार दि.५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) उष:काली श्री देवीजींची शिबिकारोहन, मंदिराभोवती मिरवणूक व मंचकी निद्रा विजयादशमी सार्वत्रिक सिमोल्लंघन तसेच रविवार दि.९ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा दिनी पहाटे श्री देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना नित्योपचार पूजा ,अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, आरती व रात्रीचा छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे 

 सोमवार दि.१० ऑक्टोबर रोजी मंदिर पौर्णिमा व सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळा श्री देवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, सोलापूर काठ्यासह आरती व रात्रीचे छविना मिरवणूक काढण्यात येणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिरात धार्मिक पूजा, विधी व सेवा आदी कार्यक्रम करण्यात येणार आहेत.

भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय

 तुळजाभवानीच्या ऑनलाईन दर्शनासाठी WWW.shrituljabhavani.in या संकेतस्थळावरुन दर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.

नवरात्र कालावधीमध्ये घाटशिरस रोड येथून भाविकांना दर्शनासाठी येणार आहे. 25 हजार भावीक उभे राहतील असा 250 बाय 200 1 आकाराचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे येथे पोलीस व्यवस्था पुरेशी तैनात करण्यात आली आहे. मदत केंद्र, चप्पल स्टैंड आणि इतर अत्यावश्यक सेवा येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

Labels:

प्रणिता मिटकर यांना शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान

 मंगरूळ, दि.२५

  प्रणिता उमाकांत मिटकर यांना महाराष्ट्र व छत्तीसगढ येथे कार्यरत असणाऱ्या धनेश्वरी शिक्षण समूहाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्रणिता मिटकर या एकलव्य प्राथमिक आश्रम शाळा मंगरुळ ता. तुळजापूर येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

शिक्षकी पेशात येण्याअगोदर त्यांनी स्वतःला भटके-विमुक्त विकास परिषदेच्या सामाजिक कार्याशी जोडून घेतले होते.संघटनेने सुरुवातीला त्यांना पालावरची शाळा (संस्कार केंद्र) या अभिनव उपक्रमात दोन वर्ष पूर्णवेळ काम करण्याची संधी दिली.या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांच्या सोयीनुसार सुरू होणारी, विना भिंतीची शाळा,पाटी-पुस्तक फळा यांच्या आधाराशिवाय ही शाळा चालते,दगड,गोटे,फुले,पाने ही शैक्षणिक सामग्री असते.

सर्व शिक्षा अभियानाच्या जागतिक पथकानेही या कार्याची दखल घेतली आहे.या क्षेत्रातील योगदान पाहून संस्थेने त्यांना एकलव्य प्राथमिक आश्रम शाळेत सहशिक्षिका म्हणून संधी दिली.त्यानंतर त्यांनी वंचित,दुर्लक्षित समाजाच्या मुलांसाठी अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग राबवले. त्यांचा एक विशेष प्रयोग म्हणजे “भाषा प्रयोगशाळा”यात भटक्या-विमुक्तांच्या भाषा मराठीत भाषांतरित करून त्यांनी नवीन पद्धत शिक्षणात आणल्याने शाळेतील गळतीचे प्रमाण कमी झाले तसेच मुलांना त्यांच्या शिक्षणात गोडी निर्माण झाली.

यासोबतच त्या अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या उस्मानाबाद जिल्हा महिला व बाल संस्कार प्रमुख म्हणून काम पाहतात,दासबोधाच्या अभ्यासिका म्हणून किशोरी विकास मेळावे व महिलांमध्ये जनजागृती करतात, त्याशिवाय वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी एकल महिलांमध्ये दखल घेण्या योग्य काम उभे केले आहे.

या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ती,महिला भूषण,नारी गौरव,आदर्श माता,आदर्श शिक्षिका इ.पुरस्कारांनी गौरविले आहे .

यासाठी जिल्ह्यातील वीस उपक्रमशील शिक्षकांची निवड केली होती.सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त कार्यकारी मुख्याधिकारी श्री.इंद्रजीत देशमुख, विभागीय कार्यालय लातूरचे शिक्षण उपसंचालक डॉ.गणपतराव मोरे.प्रमुख उपस्थिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद चे प्राचार्य.डॉ.दयानंद जटनूरे, शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.बाळकृष्ण तांबारे,राजश्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री.धनंजय पाटील,उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.चंद्रसेन देशमुख,जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.धनंजय रणदिवे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धनेश्वरी शिक्षण समूहाचे सर्वेसर्वा डॅा.प्रतापसिंह पाटील यांची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रम आर्यन फंक्शन हॉल,उस्मानाबाद येथे 25 सप्टेंबर 22 रोजी संपन्न झाला

Labels:

Saturday, 24 September 2022

आईच्या कष्टाचे केले चीज,युक्तानी मिळवले अभियांत्रिकी क्षेत्रात यश.

अणदूर , दि . २4

युक्ता जयंत जोशी ही अगदी चार वर्षाची असतांनाच वडीलांचं छत्र हरवलं,घरचा आधार गेला होता, अचानक वडील गेल्यामुळे घरं पोरकं झालं होतं, जगण्याचा आधार तुटला होता,अशा परिस्थितीत आईने दोन मुलींना पोटाशी धरून,भाऊ,आई वडीलांच्या आधाराने भरपूर शिकवण्याचा व वडीलांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व दुःखाला बाजूला सारुन जिद्दीने आई सिमा जोशी यांनी आपल्या दोन्ही मुलींना उच्च शिक्षण दिलं,मोठी मुलगी सि ए झाली,
युक्ता १ ली ४ थी पर्यंत अणदूर येथील जि प प्रा शाळेत शिक्षण घेऊन, सोलापूर येथील सुयश गुरुकुल, उच्च माध्यमिक शिक्षण लातुर येथे पुर्ण केले, 

अनंत अडचणींवर मात करीत युक्ताचे लक्ष केवळ अभ्यास हेच राहीले,घरच्या परिस्थितीशी सामोरे जाऊन कुटुंबास ऊर्जितावस्था देईल याची खात्री युक्ताला होती त्यामुळे तिने घवघवीत यश संपादित केले आहे,वडील डी सी सी बॅंकेत नोकरीला होते, वडीलांच्या निधनानंतर आईला बॅंकेत नोकरी मिळाली,पण पगार दहा हजार,तेवढ्या पगारीवर दोन्ही मुलींचे शिक्षण, कुटुंबातील अडीअडचणी सोडविण्यासाठी आईला तारेवरची कसरत करावी लागत होती, आपल्या भाच्चीची अभ्यासातील चुणूक पाहुन मामा मदतीसाठी पुढे धावायचा
युक्ताला अभियांत्रिकी क्षेत्रात यश संपादित करायचे होते,

पुणे येथील कमींन्स उमेन्स काॅलेज येथे युक्ताला प्रवेश मिळाला, नियमित, अभ्यास, जिद्द, चिकाटीने युक्ताला अभियांत्रिकी क्षेत्रात यश संपादित करता आले,
जगातील नंबर चौथी फायनान्स डेलोईटे कंपनीने युक्तास बारा लाखांचे पॅकेज दिले असुन,ख-या अर्थाने आईने केलेल्या कष्टाचे चिज झाले आहे,
सतत संघर्ष करत रहायचे आणि यश मिळवायचे हीच आईची शिकवण गिरवत युक्ता जिद्दीची प्रतिक ठरली


Labels:

Friday, 23 September 2022

श्रेया बिराजदार हिचा बसवराज पाटील यांच्या हस्ते सत्कार



मुरूम, ता. उमरगा, दि. २४ :  

येथील व शाहू महाविद्यालयातून १२ वी विज्ञान शाखेतील कुमारी श्रेया दिनकर बिराजदार हिने नुकत्याच पार पडलेल्या वैद्यकीय चाचणी परीक्षेत ६४२ गुण घेऊन वैद्यकीय प्रवेश परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते शाल, बुके देवून तिचा शुक्रवारी (ता. २३) रोजी विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. 


यावेळी बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, भविष्यात ही अशाच पद्धतीने आपण यश संपादन करून गावचे व परिसराचे नाव वैद्यकीय क्षेत्रामध्ये उज्वल करावे अशा सदिच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी पालक प्रा. दिनकर बिराजदार, आई अनिता बिराजदार, शंकर स्वामी गुरुजी, आप्पाराव हाल्लीसे, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, तोरंबा येथील व्यंकटेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धोंडीराम चव्हाण, ज्ञानेश्वर बिराजदार, दयानंद पाटील, माजी सरपंच राजेंद्र बिराजदार, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. महेश मोटे, डॉ. राम बजगिरे, डॉ. विनायक रासुरे, डॉ. मुकूंद धुळेकर, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. अविनाश मुळे, डॉ. भिलसिंग जाधव, प्रा. अशोक बावगे, मुख्य लिपिक राजू ढगे आदींची उपस्थित होती.                            

Labels:

काटी केंद्रातील शिक्षकांची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न


काटी,दि.२३

तुळजापूर तालुक्यातील काटी केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामधील इयत्ता पहिली ते आठवी वर्गास अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची शिक्षण परिषद शुक्रवारी (दि. 23) येडेश्वरी कन्या प्रशाला काटी येथे पार पडली.


शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मधील तिसऱ्या शिक्षण परिषदेमध्ये गुणाकार कार्यशाळा श्री ज्योतिर्लिंग क्षीरसागर, भागाकार कार्यशाळा श्री सोमनाथ जामगांवकर , अध्ययन स्तर निश्चिती गणित व भाषा इयत्ता 6 ते 8 श्री विठ्ठल निचळ  व मराठी वाचन श्री सोलनकर एस व्ही यांनी मार्गदर्शन केले.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही शिक्षण परिषद पार पडली.शिक्षण परिषदेसाठी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक काटी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सोलनकर एस व्ही यांनी केले तर आभार केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक श्री अमीन शेख यांनी मानले

Labels:

Thursday, 22 September 2022

काटी येथे रुक्मिणी फाऊंडेशनच्या वतीने मोफत लसीकरण

काटी, दि. २२

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दि.२१ रोजी रुक्मिणी फाऊंडेशनच्या वतीने मोफत पशु लम्पी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.


 जनावरांना  लम्पी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी पशुधन मृत्युमुखी पडत असल्याचे समजते.तसेच पशुपालकांना नुकसान सहन करावे लागत आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून अडचणीतील पशुपालक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन येथील रुक्मिणी फाऊंडेशनच्या वतीने काटी येथे आयोजित मोफत पशु लसीकरण शिबीरात डॉ.महेश दादासाहेब हंगरकर यांच्या पुढाकाराने जवळपास ८० पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनांचे लसीकरण करुन घेतले.
      


या प्रसंगी पशुपालक काकासाहेब रोडे, दत्तात्रय हंगरकर,किसनराव हंगरकर, संतोष गुंड,संताजी भापकर,सुरेश गुंड,सचिन सावंत,अजय चिवरे,भागवत लोहार,अनिल इंगळे, विष्णू हंगरकर आदी  उपस्थित होते.

Labels:

Wednesday, 21 September 2022

सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी चिंतेत, नवीन सोयाबीन हाती येण्याच्या आधीच पदरी निराशा


चिवरी , दि. २१ : राजगुरु साखरे

खरीप हंगामातील सोयाबीन पिक शेतकऱ्यांच्या हाती येण्याची वेळ जवळ आली आहे, त्यातच बाजारातील दरात मोठी घसरण सुरू आहे. सोयाबीनचे दर पाच हजारावर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 


यंदा उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये उशिरा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांची उशिरा पेरणी केली. प्रामुख्याने जिल्ह्यामध्ये अलीकडे सोयाबीन पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते, त्यामुळे सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे, त्यातच सोयाबीनवर सुरुवातीच्या काळात शंखी गोगल गायीचा प्रादुर्भाव, ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये अतिवृष्टी सततचा पाऊस , यलो मॅझक या कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे निसर्गाच्या संकटातून कसेबसे पीक वाचवुन चांगला भाव मिळेल. या आशेने शेतकरी बसला होता, मात्र  मागील महिन्यापासून दरात होत असलेली घसरण यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडला आहे.


गेल्यावर्षी सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले होते.  परंतु त्यावेळी शेतकऱ्याकडे सोयाबीन शिल्लक नव्हते. केवळ व्यापाऱ्याकडेच माल शिल्लक होते. मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांना कधी अतिवृष्टी कधी पावसाचा खंड, विविध कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे कंबरडे मोडले आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा खर्च  अधिक होत असल्याने दरवर्षी शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणीत भर पडत आहे. 


निसर्गाच्या लहरीपणाचा उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे. महागाईच्या तुलनेत सरासरी आठ ते नऊ हजार पर्यंत भाव   ठेवणे गरजेचे आहे असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. सोयाबीन काढणी पंधरा दिवसावर आल्याने अचानक भाव  गडगडल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. 
 
बालाजी गिराम, शेतकरी

सोयाबीनला चांगला भाव मिळेल या आशेने पेरणी केली, माञ सततचा पाऊस, किडरोगाचा प्रादुर्भाव यामुळें पिकांचे नुकसान झाले, यातच सोयाबीनचे दर घसरल्याने मोठी आथिर्क कोंडी झाली आहे.   

Labels:

नळदुर्ग : मोती संवर्धन प्रकल्पास बालाघाट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भेट

नळदुर्ग , दि. २१ : प्रा दिपक जगदाळे

महाविद्यालयीन  विद्यार्थाना नौकरीच्या मागे न लागता व्यवसायात देखील आपले करीयर करता यावे ,हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून नळदुर्ग  येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विज्ञान विभागातील मत्स्यशास्त्र ( Fishery Science ) या विषयातील विदयार्थ्यांच्या एकदिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.


 शहापूर ता तुळजापूर येथील प्रगतशील शेतकरी  संजय पवार यांनी यावर्षी आपल्या शेतातील एक एकर जागेमध्ये पर्ल कल्चर ( मोती संवर्धन ) ची शेती करण्यास सुरुवात केली आहे . या शेतीच्या उत्पादनातून त्यांना यावर्षी लाखो रुपयांचे उत्पादन मिळाले आहे .   


याप्रसंगी संजय पवार यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तरुणांनी नौकरीच्या मागे न लागता  व्यवसायातून देखील आर्थिक प्रगती साधली जाऊ शकते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


 या प्रसंगी महाविद्यालयातील  डॉ समीर पाटील , डॉ हंसराज जाधव ,  डॉ दिपक जगदाळे , डॉ महेश मोटे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

Labels:

Tuesday, 20 September 2022

शिवार फाऊंडेशनच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करावे - पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी

 
काटी,दि.२०

तुळजापूर तालुक्यातील कसई शिवारात शिवार फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने रविवार 17 सप्टेंबर रोजी पद्मश्री डॉ. के.एच.घरडा जेष्ठ शास्त्रज्ञ यांचे शेती क्षेत्रातील योगदान व यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी शिवार फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती करून आपली स्वतःची , आपल्या परिसराची व देशाची प्रगती साधून अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केले.


शिवार  फाउंडेशनच्या वतीने शेतीविषयक अभ्यास वर्ग , संशोधन, मार्गदर्शन शिबिर व विविध प्रात्येक्षिक जागेवर करून दाखवण्यात येणार आहेत. यासाठी जवळपास 300 स्वयंसेवक संस्थेच्या वतीने कायम कार्यरत राहणार असल्याचे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. यावेळी १७ एकर क्षेत्रावर 2000 विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
   


यावेळी तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद , सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे , शिवार फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक हेगाणा, भारतीय जनता पक्षाचे ओबीसी जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, अँड. एन.डी. चौगुले,  जेष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे,  आबासाहेब सरडे , धनराज धुरगुडे, पोलीस पाटील लक्ष्मण माळी-पाटील, गणेश सरडे,धुरगुडे, ज्ञानेश्वर सरडे पाटील यांच्यासह असंख्य शेतकरी, पोलीस कर्मचारी,पोलीस पाटील संघटना व शिवार फाऊंडेशनचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

ॲक्युपंक्चर प्रॅक्टिशनर असोसिएशन इंडियाच्या राष्ट्रीय सचिवपदी डॉ. रमेश लबडे यांची निवड


काटी,दि.१२:

तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील ओम साई हॉस्पिटल व व्यसन मुक्ती केंद्राचे डॉ.रमेश लबडे यांची औरंगाबाद येथील बैठकीत शनिवार  रोजी ॲक्युपंक्चर प्रॅक्टिशनर असोशियन इंडियाच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाली.राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे व डॉ. दीपक पन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली. 
      
कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल यापूर्वी त्यांना अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . याची दखल घेऊन या संघटनेने त्यांची राष्ट्रीय सचिवपदी निवड केली आहे. या निवडीबद्दल मंगरूळसह परिसरातून अभिनंदन केले जात आहे.

 यावेळी डॉ.शुभांगी रत्नपारखी, डॉ. संदीप राठोड,यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार मंडळी  उपस्थित होते.

Labels:

Sunday, 18 September 2022

काळेगाव येथे जनावराना मोफत लंपी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम

काळेगाव,दि.१८: 

 तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथे जनावराना मोफत लंपी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.


 लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणुन  काळेगाव येथे जनावराना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. डॉ. रेड्डी,डाॅ. खरोसे डॉ. दिवाने, डॉ. वागतकर,  परिचर  राठोड, मुंडे, शेख यांनी लसीकरण केले. यावेळी गावातील सर्व पशुपालकांनी आपापल्या जनावरांना घरी, शेतात लसीकरण करून घेतले, यावेळी गावातील उपसरपंच आनंदराव उंबरे पाटील, ग्रामसेविका शेख, ग्रामपंचायत शिपाई श्याम काटवटे, प्रकाश साखरे  आदीसह पशुपालक शेतकरी उपस्थित  होते.

Labels:

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यास गरज पडेल तेथे मी उभा राहीन. आ. राणाजगजितसिंह पाटील

कळंब, दि.१८

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सत्कारमूर्तींना गरज पडेल तेथे मी उभा राहीन, उस्मानाबाद  जिल्हा पुढे नेण्यासाठी सर्वांनी काम करावे, कळंब शेजारी 100 एकर नवीन एम. आय. डी. सी. निर्माण व्हावी. ज्यांना काही अडचणी येतील त्यांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा राहीन असा विश्वास  आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.



  जनकल्याण अर्बन बँकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमास  आमदार पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


कळंब येथे 1996 साली चेअरमन उमेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली  जनकल्याण अर्बन बँकेची स्थापना करण्यात आली. या बँकेचे हे पंचविसावे वर्ष असून रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या सत्कारांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला समर्थ अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन ॲड मिलिंद पाटील,  जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीन काळे, कळंब  तालुका अध्यक्ष अजित  पिंगळे हे प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते.


सुरुवातीला  चेअरमन उमेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमांमध्ये प्रवीण झोरी, उदयकुमार माळेगावकर, रंगरेज रफिक इसाक, धनश्री जाधव, मनीषा कळंबे शिंदे, अकिब पटेल, रमेश आंबिरकर, किरण टेकाळे, स्वप्निल मांडवकर, रवी नरहिरे ,ऋषिकेश कुपकर, अशोक काटे, उत्कर्ष संगवे, दत्तात्रेय कुलकर्णी, मोहन कुलकर्णी, निलेश होनराव, कल्याणी कोटुळे, गौरी देशमुख, नंदकिशोर मोरे, अशोक शिंदे, उन्मेश पाटील, विलास मुळीक, ॲड दत्तात्रेय पवार, डॉ. रामकृष्ण लोंढे, संजय चिंचकर, डॉ. धीरज मानकरी, डॉ विश्वास कुलकर्णी, डॉ. अनुजा कुलकर्णी यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .


यावेळी सत्कारमूर्तींपैकी रवी नहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲड मिलिंद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी उपस्थितांचे आभार  करसन पटेल यांनी मानले. यावेळी संस्थेचे संचालक राजेंद्र दीक्षित, शरणाप्पा मानकरी, विजयकुमार पाटील, सुधीर धोकटे, ॲड पांडुरंग पाटील, महेश जोशी, संदीप बावीकर, राजेश पारख ,अशोक शिंपले, अरुण जोशी,  वैशाली कुलकर्णी, योगिनी आवाड, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथ पेकमवार उपस्थित होते. 

Labels:

शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्याची मागणी


चिवरी, दि.१८: राजगुरू साखरे 

तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात जुलै महिन्यापासून पडत असलेला सततचा पाऊस, शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे, सोयाबीनसह खरीप पिकांचे  नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे चिञ आहे,



त्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देईल असे वाटत असतानाच अनुदानाच्या पहिल्या यादीत तुळजापूर तालुक्यातील फक्त   एका महसुल मंडळाचा समावेश करण्यात आला आहे, उर्वरित महसुल मंडळे वगळण्यात आली आहे.त्यामुळे शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन नळदुर्ग  मंडळातील  चिवरी  परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चिवरी येथील चेअरमन बालाजी शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुळजापूर तहसीलदार यांच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Labels:

श्री तुळजाभवानी मातेची ९ दिवसाच्या घोर निद्रेस प्रारंभ

तुळजापूर, दि.१८ डॉ. सतीश महामुनी 

शारदेव नवरात्र महोत्सवाच्या अगोदर होणारी तुळजाभवानी देवीची घोरनिद्रा शनिवारी रात्री सुरू झाली असून पुढील नऊ दिवस तुळजाभवानी देवी भाविक भक्तांना निद्रा रूपात दर्शन देणार आहे. परंपरागत पद्धतीने आणि आई राजा उदो उदो जयघोषात तुळजाभवानी देवीचा मंचकी निद्रा कार्यक्रम संपन्न झाला.


शारदीय नवरात्राच्या अनुषंगाने  कालाष्टमीच्या मुहुर्तावर महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजा भवानीच्या 9 दिवसीय मंचकी निद्रेस शनिवार सायंकाळी प्रारंभ झाला.सायं 6.30 वाजता अभिषेक घाट होऊन नित्यनेमाने देवीस पुजेसाठी हाक मारण्यात आली.सिंहासनावरील मेन भोपे पुजारी यांनी काढून  निर्माल्य विसर्जन केले.

सात वाजता भोपी पुजाऱ्यांनी पंचामृत व शुद्धजल स्नान घालुन मेण काढणे विधी करण्यात आला.यानंतर शासकीय आरती व मानाची आरती होऊन नैवेद्य दाखविण्यात आला. या विविध विधी नंतर सिंहासनावरून देवीच्या मुर्तीस उपस्थित भोपीपुजारी बांधवांनी निद्रेसाठी मंचकी आणले.यावेळी तहसिलदार योगिता कोल्हे.धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, नागेश शितोळे,सिद्धेश्वर इंतोले,देविचे महंत चिलोजीबुवा,तुकोजीबुवा,हमरोजीबुवा,भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम,सुधीर कदम,संजय कदम,अवि मलबा,सार्थक मलबा,
पाळीवाला भोपेपुजारी बाळकृष्ण कदम,समाधान कदम,सचिन कदम,अतुल मलबा,सचिन पाटिल,
दिनेश कदम,संजय सोंजी, सेवेकरी व कर्मचारी यांनी आई राजा उदो उदो चा जयघोष करीत भंडाऱ्याची उधळण केली व तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला. 


देवीच्या निद्रेनंतर शासकीय आरती व मानाच्या आरत्या धुपारती नैवेद्य हे विधी पार पडले.प्रक्षाळ पुजा ,नैवद्य हे विधी झाल्यानंतर शेजारती झाली.सेवेकरीपलंगे,पवेकर ,छत्रे ,चोपदार ,गोंधळी , इ.जणासह पोलिस-सुरक्षा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Labels:

मंगरुळ मंडळात शेतकऱ्यांना दिलासा; 11कोटी 92 लाख रुपये अनुदान मंजूर - विजय शिंगाडे

संग्रहीत छायाचिञ 

काटी, दि. १८

तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ मंडळातील  मंगरुळसह कसई, नांदुरी, कुंभारी, कदमवाडी परिसरात अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीनच्या उभ्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.

 अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक अक्षरशः पाण्यात गेले होते. शेतात जागोजागी पाणी साठल्याने खरीप पिकांची पुरती वाट लागली. आधीच शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नसल्याने व विविध संकटांचा सामना करावा लागत असताना अतिवृष्टीच्या या सुलतानी  संकटामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. या भागातील अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी भाजपचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कैफियत आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी तात्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

भाजपचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी आ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांना प्रत्यक्ष बांधावर घेऊन जाऊन नुकसानीचा पंचनामा केला. तहसीलदार सौदागर तांदळे यांनी नुकसानीची पाहणी करुन  अहवाल शासनाकडे पाठविला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, राज्याचे प्रधान सचिव डवले यांनीही नुकसानीची पाहणी केली होती.


महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची दखल घेऊन मंगरुळ मंडळास 11 कोटी 92 लाख रुपये अनुदान मंजूर झाले असून मंगरुळ मंडळातील गावातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.अनुदान मंजूर झालेबद्दल मंडळातील शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे भाजपचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी आभार व्यक्त केले असून अनुदान न मिळालेल्या मंडळासही अनुदान मिळवून देण्यासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील प्रयत्नशील असल्याचे विजय शिंगाडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Labels:

कळंब शहरात मराठा समाजाच्या आरक्षणसाठी मोर्चाचे आयोजन

कळंब,दि.१८  भिकाजी जाधव 

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासह अन्य प्रमुख मागण्यासाठी कळंब सकल मराठा समाजाच्या वतीने १ लाख मराठा बांधवाच्या उपस्थित उपविभागीय अधिकारी कार्यालयावर  १९ सप्टेंबर रोजी  हा मोर्चा काढण्यात येणार आहे.


मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने " एक मराठा,लाख मराठा" अशा घोषणा देत जनजागृती करण्यासाठी शनिवार (ता.१७) सकाळी अकरा वाजता भव्य अशी शिस्तबद्धरित्या समाजातील नागरिक,विद्यार्थ्यांची शहरातून रॅली काढण्यात आली." आरक्षण आमच्या हक्काचे,नाही कुणाच्या बापाचे" अशा घोषणांनी कळंब शहर दणाणून गेले होते.



मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आरक्षण नसल्याने मराठा विद्यार्थ्यावर अन्याय होत आहे.शासनाकडून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हालचाली दिसून येत नाही.शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ' एकच मिशन ओबीसीमधून मराठा आरक्षण ' अशा प्रकारच्या विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकऱ्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात येणार आहे.यासाठी आवश्यकती तयारी सकल मराठा समन्वयक समितीकडून करण्यात आली आहे.


शहरात स्वागत कमानी,भगवे झेंडे,वाहन पार्किंग,बाहेरगावून,ग्रामीण भागातून मोर्चासाठी येणाऱ्या समाज बांधवांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली काढण्यात आली.शहरातील मुख्य बाजार पेठेतून ही रॅली कथले चौक,मुंडे गल्ली, एसबीआय बँक,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली.राष्ट्रगीताने रॅली ची सांगता करण्यात आली. आयोजित रॅलीमध्ये व्यापारी, महिला,शेतकरी,विद्यार्थी,वकील,राजकीय पक्षातील कार्यकर्ते,नेते,पत्रकार बांधव, डॉक्टर,सामाजिक क्षेत्रात काम करणारे मराठा समाजातील नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

मोर्चाची आचासंहिता;

मोर्चा शांततेत, निश्चित केलेल्या मार्गानेच निघेल.कोणत्याही पक्ष, संघटना, व्यक्तींच्या विरोधात किवा समर्थन घोषणा दिल्या जाणार नाहीत.सभास्थळी आल्यावर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेता, कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी मिळणार नाही. सर्वांना रांगेमध्येच चालावे लागेल. प्रथम विद्यार्थिनी, तद्नंतर महिला, विद्यार्थी, सर्वसामान्य जनता व शेवटी राजकीय, संघटनेचे पदाधिकारी राहतील. प्रत्येकास पोलीस, समन्वयक व स्वयंसेवकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे लागेल. ठराविकच घोषणा, त्यापण केवळ स्वयंसेवक देतील त्यास सर्वांचा प्रतिसाद असेल.मोर्चा सीसीटीव्ही, ड्रोनच्या निगरानीखाली असेल, गैरवर्तन दिसल्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल.

Labels:

हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात शहीद बचित्तर सिंह या नावाने हा पुल ओळखला जाईल - इतिहासाचे अभ्यासक प्रा. सतिश कदम




नळदुर्ग , दि. १८ :

 हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात भारतीय सैन्याने विजय मिळवला. या लढ्यात महत्वाची भुमिका बजावणा-या नळदुर्ग येथिल  बोरी नदीवरील पुल वाचवणा-या शीख रेजिमेंटचे हवालदार बचित्तर सिंह यांचे नावाने हा पुल भविष्यात ओळखला जाईल असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक प्रा. सतिश कदम यांनी केले. 


अतिशय दिमाखदार सोहळ्यानिमित्त बोलताना मुक्ती संग्राम लढ्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहिद बचित्तर सिंह यांच्या वंशजांचा शोध घेऊन पुढील वर्षीच्या कार्यक्रमास त्यांना नळदुर्ग येथे बोलवणे व येथे स्वतंञ भारतातील पहिले अशोकचक्र मिळवणा-या बचित्तर सिंह यांचे स्मारक करण्याचा मानस श्री कदम यांनी  व्यक्त केला.



नळदुर्ग येथिल माजी नगरसेवक विनायक अहंकारी व मैलारपूर कट्टा मिञमंडळाच्या वतीने ऐतिहासिक आलियाबाद पुलाचे पुजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 

यावेळी शरीरावर रोमांच उभे करणारे , थेट मुक्ती संग्राम लढ्याच्या भुमीवर म्हणजे ऐतिहासिक पुलावर सर्वांना खिळवून ठेवणारी शैलीत प्रा. कदम यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मुक्ती संग्राम लढ्यात नळदुर्ग व ऐतिहासिक पुलाचे महत्व विषद केले.


 या कार्यक्रमास मुख्याधिकारी लक्ष्मण  कुंभार , माजी नगरसेवक संजय बताले , डाँ. सत्यजित डुकरे, माजी नगरसेवक विनायक अहंकारी ,    नय्यर जहागीरदार, शिवसेनेचे कमलाकर चव्हाण,
सरदारसिंग ठाकूर, भाजपचे जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष सुशांत भुमकर , श्रमिक पोतदार , भाजपचे शहराध्यक्ष   धिमाजी घुगे , माजी शहराध्यक्ष  पद्माकर घोडके,शिंदे गट शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख  ज्ञानेश्वर घोडके , माजी नगरसेवक बसवराज धरणे , नितीन कासार,  सामाजिक कार्यकर्ते  संजय जाधव , शिवसेनेचे नेताजी महाबोले ,नळदुर्ग शहर पञकार संघटनेचे अध्यक्ष  सुहास येडगे, पञकार विलास येडगे, शिवाजी नाईक  , भगवंत सुरवसे, उत्तम बणजगोळे, दादासाहेब बनसोडे,  तानाजी जाधव ,डाँ. दिपक जगदाळे ,अमर भाळे , पांडू पुदाले , महेद्र डुकरे , राजेंद्र महाबोले , बंडू कसेकर , शाम कनकधर , विजयकुमार यादगिरे , गुरुनाथ मुळे , उमेश नाईक , भिमाशंकर बताले, सुदर्शन पुराणिक आदीसह इतिहासप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.

पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नळदुर्गच्या ऐतिहासिक आलियाबाद पुलाच्या पूजनाच्या कार्यक्रम वेळी पुलावर मंडप मारण्यात येणार आहे.
याचा संपूर्ण खर्च  शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजीत डुकरे करणार  आसल्याचे  विनायक अहंकारी यानी सोशल मिडियावर जाहिर केले आहे.


Labels:

वागदरी येथे मराठवाड मुक्तीसंग्राम दिन विविध उपक्रमाने साजरा : ग्रामस्थानी घेतली ग्राम स्वच्छतेची शपथ


वागदरी, दि. १८ : एस.के.गायकवाड


तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालय येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने व विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला असून याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थानी केली ग्राम स्वच्छतेची प्रतिज्ञा.



  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी येथे ७४ व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका महादेवी जत्ते यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले. तर येथील ग्रामपंचायत कार्यालच्या प्रांगणात मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून  सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार यांच्या हस्ते  ध्वजारोहण करून शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ, महिला,विद्यार्थी, युवा कार्यकर्ते यांनी  ग्राम स्वच्छतेची शपथ घेतली.
  यावेळी उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे, ग्रा.प.सदस्य महादेव बिराजदार, दत्ता सुरवसे, बकुलाबाई भोसले, कमलबाई धुमाळ, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष फतेसिंग ठाकूर, ह.भ.प.राजकुमार पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामसिंग परिहार, सहशिक्षक किसन जावळे, तानाजी लोहार,सहशिक्षिका आरती साखरे,मनिषा चौधरी यासह ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते  उपस्थित  होते.

Labels:

Saturday, 17 September 2022

पशुपालकांनी लंपी रोगाला घाबरून न जाता जनावरांना लसीकरण करण्याचे आवाहन

अणदुर,दि.१७:

 पशुपालकांनी लंपी रोगाला घाबरून न जाता  संपूर्ण जनावरांना  लसीकरण करावे, त्याचबरोबर सर्व गोठे स्वच्छ ठेवून काही लक्षणे आढळल्यास तात्काळ संपर्क करण्याच्या सूचना यावेळी  अणदुर ता.तुळजापूर  येथील पशुधन विकास अधिकारी कृष्णदेव खाडे यांनी केल्या, 
 

ते आज अणदुर  येथील वत्सलानगर तांड्यावर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षा निमित्त व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औतिच्य साधून साहेबराव घुगे मित्र मंडळाच्या वतीने 500 मुक्या जनावरांना मोफत लंपी लसीकरण उपक्रमाचा  शुभारंभ प्रसंगी बोलत होते .याप्रसंगी ह भ प संतोष झंगे महाराज यांच्या हस्ते गोमातेचे पूजन व ओवाळणी करून मोफत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली .

           
पहिल्याच दिनी 100 मुक्या जनावरांना ही लस देण्यात आली. यावेळी ह भ प संतोष जंगे महाराज यांनी संस्कृत श्लोक पठण करीत पशुधनाचे महत्त्व विशद करून लसीकरण हा जनावरांचा बचाव असून साहेबराव घुगे मित्र मंडळ संकटाच्या वेळी उभारते हे परत एकदा या उपक्रमातून सिद्ध झाले. असल्याचे सांगुन कोरोना काळातील मित्र मंडळांनी 122 दिवस गरजू मंडळींना घरपोच जेवण अभियान राबवून चांगले कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. 
  यावेळी उपस्थित पशुपालकांना लंपी रोगाच्या विषयी जनजागृती पत्रक वाटण्यात आले. 
तसेच साहेबराव घुगे यांनी उपक्रमपर आपले मनोगत व्यक्त केले.


या कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ. एस एस धायगुडे , डॉ. बी एम खरोसे ,गुंडेषा गोवे, शाहूराज मोकाशे, म्हाळाप्पा घोडके, शिवानंद खुने, प्रसाद देशमुख, अनिल अणदुकर, बापू घुगे, अनिल राठोड, गणेश देवसिगकर, काशिनाथ घुगे, सुरेश चव्हाण, आनंद पवार, रमेश राठोड ,पिंटू चव्हाण, बंडू चव्हाण ,यांच्यासह  उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी ईश्वरी जोशी ,मयुरी  हंगरकर, गीता कदम, यांनी या लसीकरण मोहिमेत सहकार्य केले आहे.

Labels:

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा ऐतिहासिक लढा

काटी, दि.१७ :उमाजी गायकवाड

१७ सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर हैदराबाद  मुक्तिसंग्रामाची परिणती 1948 मध्ये भारत सरकारने निजाम संस्थानविरुद्ध पोलीस कारवाई करुन हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात सामावून घेतले. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. 


स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थानात जवळपास 600 लहानमोठी संस्थाने होती. संस्थानिकांना अंतर्गत कारभारात कमीअधिक स्वायत्तता होती. 1947 च्या स्वातंत्र्य कायद्यानुसार भारत स्वतंत्र होताच त्यांच्यावरील इंग्रजी सार्वभौमत्व संपुष्टात आले आणि तत्त्वतः त्यांना ब्रिटिश साम्राज्यात सामील होण्यापूर्वीचा त्यांचा दर्जा प्राप्त झाला. तथापि बदलत्या परिस्थितीत आपले स्वतंत्र अस्तित्व टिकविणे अशक्य आहे, याची जाणीव अनेक संस्थानिकांना होती. संस्थानांचे भारतात विलीनीकरण करून तेथे लोकशाही व्यवस्था निर्माण करण्यासाठी अनेक संस्थानांमध्ये जनतेची आंदोलने चालू होती. हैदराबाद संस्थानात तेथील हैदराबाद स्टेट काँग्रेसने भारतात विलीन होण्यासाठी आणि लोकनियुक्त शासन स्थापन करण्यासाठी शांततामय लढा उभारला होता. विलीनीकरणासंबंधीच्या वाटाघाटी लांबवून आपले स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा निजामाचा बेत होता. 


संस्थानात एकीकडे इत्तेहादुल् मुसलमिन या संघटनेने कासिम रझवीच्या नेतृत्वाखाली रझाकारांची सशस्त्र संघटना उभी करून हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरु केले होते. तेव्हा शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी भारत सरकारने तेथे सैन्य पाठवून ‘पोलीस कारवाई’ करण्याचा निर्णय घेतला. संस्थानातील जनतेने भारत सरकारच्या या अ‍ॅक्शनचे स्वागतच केले. पोलीस कारवाईला निजामाचा फारसा विरोध झाला नाही. परिणामी भारत सरकारने निजामाची शरणागती मिळविली व संस्थान खालसा केले.  तो दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांची राजवट संपली आणि भारतास स्वातंत्र्य मिळाले. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. 1 नोव्हेंबर 1956 सालात भाषावार प्रांत रचनेनंतर मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आला. 1 मे 1960 पासून मराठवाडा हा महाराष्ट्र राज्याचा भाग झाला. 


स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैदराबाद संस्थानचा भूभाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हैदराबाद मुक्तीसंग्राम लढला गेला. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ हे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे अर्ध्वयू होते. स्वामी रामानंद तीर्थ (व्यंकटेश भवानराव खेडगीकर) हे संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे मराठी चळवळकर्ते होते. स्वामी रामानंद तीर्थ यांचे समर्थक गोविंदभाई श्रॉफ यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत मोलाचे कार्य केले. मराठवाडा मुक्तिसंग्रामात ज्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना मानाचा मुजरा व सर्व मराठवाडावासीयांना हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 

Labels:

मुक्तिसंग्रामातील हुतात्मा काटीचे गणपतराव देशमुख


 भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना विविध मार्गाने सशस्त्र लढा दिल्यानंतर निजामाने शरणागती पत्करली आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान व मराठवाडा निजामी जोखडातून मुक्त झाला. 


स्वातंत्र्याचा खरा आनंद या दिवशी अनुभवला. 
या लढ्यामध्ये अनेकांनी लढ्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन, काहींनी भूमिगत राहून मुक्तीसंग्रामात योगदान दिले. अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातल्या काटी गावचे हुतात्मा गणपतराव देशमुख यांचे योगदान मोलाचे आहे. देशमुखी असल्यामुळे सुखात राहू शकणार्‍या गणपतरावांना निजाम राजवटीतील अत्याचार पाहवत नव्हते. रझाकारांचा हैदोस आणि सामान्य जनतेची, आबालवृद्धांची, महिलाभगिनींची होणारी छळवणूक त्यांना अस्वस्थ करत होती. याच दरम्यान देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशप्रेमाने पछाडलेल्या गणपतराव देशमुखांनी या मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात  हिरिरीने भाग घेऊन सोलापूर जिल्ह्यातील देगाव गाठले. त्या गावी पाटलाच्या वाड्यात स्वातंत्र्यदिन साजरा केला. त्यांच्या विचारांच्या प्रभावाने काटीतील बाबुराव साळुंके, हिराचंद विभुते, जनार्दन यशवंतराव पाटील देगाव, सोपान मारुती भोसले धामणगाव, दत्तु कृष्णात जाधव धामणगाव, चंद्रकांत तात्यासाहेब जाधव धामणगाव, किसन निवृत्ती भोसले राळेरास, आदी तरुणांना त्यांनी हैद्राबाद मुक्तीसंग्रामध्ये भाग घेण्यासाठी  मार्गदर्शन आणि भूमिगत क्रांतिकारकांना रसद पुरविण्याचे काम सुरू ठेवले.



काटी भागातील लेवी गणपतराव देशमुख यांच्या ताब्यात होती.त्या लेवीचा उपयोग  गणपतराव देशमुखांनी उपाशी पोटी असलेल्या जनतेला वाटण्यासाठी केला. ज्वारी अंबार खुले केले व गोरगरीब जनतेची उपासमार  थांबवण्यासाठी मदत केली. याचाही राग निजामाला होता. या सर्व गोष्टींचा परिणाम रझाकारांवर झाला व त्यांनी गणपतराव देशमुखांचा काटा काढण्याचे ठरविले. 1948 ला निजामाने अध्यादेश  काढून सर्वाची हत्यारे पोलीस स्टेशनला जमा करून घेतली. त्यावेळी  फक्त रझाकाराकडे हत्यारे होती. यामुळे ग्रामरक्षक दलाच्या बैठकीत  ठराव घेऊन हिंदूनाही हत्यारे बाळगण्यासाठीचा ठराव मांडण्यात आला. त्यामुळे  रझाकार गणपतराव  देशमुख  यांचेवर चिडून  होते. परंतु त्याकाळात देशप्रेमी मुस्लिमांनी धोका ओळखून त्यांना गाव सोडण्यास सांगितले. परंतु गावकर्‍यांना सोडून  जाण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. अशा कडव्या  स्वातंत्र्य  लढ्यातील लढवय्या स्वातंत्र्य  सैनिकाचा रजाकारानी घराच्या अंगणात झोपलेल्या  अवस्थेत 5 मे 1948 च्या रात्री त्यांची हत्या केली. 


दरम्यान, मातोळ्याचे क्रांतिकारक दत्तोबा भोसले यांना गणपतरावांचा घातपात होण्याची शक्यता असल्याची कल्पना देण्यात आलेली होती. दत्तोबा भोसले स्वतः मातोळ्याहून आपसिंगा मार्गे रझाकारांना गुंगारा देऊन काटीपर्यंत पोहचले होते. परंतु त्यांना येण्यास थोडा उशीर झाला आणि तोपर्यंत रझाकारांनी घात केल्याची आठवण गणपराव यांचे पुत्र जयसिंगराव देशमुख हे आवर्जुन सांगतात.


भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिकांची स्मारके बॅ. ए. आर. अंतुलेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात उभारली गेली. याच धर्तीवर   काटीचे सुपुत्र हुतात्मा कै. गणपतराव  देशमुख यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी येथील ग्रामस्थाची मागणी आहे. मुक्तिसंग्राम लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ही मागणी पूर्ण व्हावी ही अपेक्षा.

उमाजी गायकवाड
पत्रकार, काटी

Labels:

Friday, 16 September 2022

महात्मा फुले शारदीय नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ढगे तर उपाध्यक्षपदी काळे , चवळे यांची निवड


काटी, दि.१६

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील महात्मा फुले शारदीय नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बालाजी गणेश ढगे तर उपाध्यक्षपदी काशिनाथ हणमंत काळे व तात्यासाहेब नागनाथ चवळे यांची एकमताने निवड करण्यात आली.


 येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मंडळातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. 13 रोजी संध्याकाळी 9 वाजता झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. महात्मा फुले शारदीय नवरात्र उत्सव समितीचे यंदा हे 41 वे वर्ष आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर समितीच्या वतीने मागील दोन वर्ष कुठलेही सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम न घेता नवरात्र उत्सव पार पडला होता. परंतु यंदा निर्बंध मुक्त शारदीय नवरात्र महोत्सव पार पडणार असून महात्मा फुले तरुण मंडळ व शारदीय नवरात्र उत्सव समितीच्या  माध्यमातून करण्यात येणाऱ्या आराखड्याची माहिती व बैठकीतील विषयावर सविस्तर चर्चा करुन नवरात्र काळात स्त्री शक्तीचा जागर तसेच विविध धार्मिक कार्यक्रमासह प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मंडळाचे संस्थापक कार्याध्यक्ष निवृत्ती भोजने यांनी सांगितले. 


या निवड समितीच्या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या असून प्रत्येकाकडे शारदीय नवरात्र उत्सवाची जबाबदारी दिली आहे. तसेच नवरात्र उत्सव यशस्वी करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विद्यासागर ढगे, संस्थापक कार्याध्यक्ष निवृत्ती भोजने व उत्सव समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भाले यांनी केले आहे.
          


यावेळी संस्थापक कार्याध्यक्ष निवृत्ती भोजने,उत्सव समितीचे नुतन अध्यक्ष बालाजी ढगे, उपाध्यक्ष काशिनाथ काळे, तात्यासाहेब चवळे, बाळासाहेब भाले, सचिन भोजने, संतोष काळे, तानाजी हजारे, ज्योतिराम चवळे, अनिल ढगे, हर्षवर्धन ढगे,शाहिर लाडुळकर, प्रफुल्ल म्हैत्रे, संजय साळुंके,किसन ढगे, विष्णू ढगे, दादासाहेब काळे, प्रभाकर चवळे, गणेश काळे,सचिन घाणे, शाहू बनसोडे, गोकुळ शिंदे, पांडुरंग कवठे,अमोल वेडपाठक,यशवंत काळे, विशाल ढगे आदींसह मंडळातील सदस्य उपस्थित होते.

Labels:

अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे अनावरण; मंगरुळमध्ये मिठाई वाटून फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोष


काटी,दि.१६:

 रशियाकडून रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र आणि भारतातील दलित, वंचित वर्गातील व्यक्तीचा रशियासारख्या  बलाढ्य राष्ट्राकडून त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याबद्दल व भारतीय व्यक्तीचा सन्मान केल्याबद्दल आजचा हा दिवस आमच्यासाठी ऐतिहासिक असल्याची भावना व्यक्त करीत तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे गुरुवार दि. 15 रोजी मिठाई वाटून व फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. 
       

यावेळी मंगरुळचे पोलीस पाटील लक्ष्मण माळी-पाटील, अमोल डोंगरे, गुड्डू डोंगरे यांच्यासह मातंग बॉईज, ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

तुळजापूर : उपजिल्हा रुग्णालयास दिलासा संस्थेच्या वतीने मोफत औषधाचे किट


तुळजापूर ,दि.१६:

नवरात्र उत्सवात येणाऱ्या भाविकांची रुग्ण सेवा व्हावी या उद्देशाने Wallace Pharma, मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या सामाजिक दायित्व निधीतून उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे  20 हजार औषधे वाटप तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद  कंदले यांच्या हस्ते मोफत देण्यात आले. 


रुग्णालया तर्फे दिलासाचे प्रतिनिधी प्रणव उन्हाळे, विलास राठोड यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.                                                                                           यावेळी डॉ .हनुमंत होंनमाने,वैद्यकीय अधीक्षक,डॉ.श्रीधर जाधव,सर्व वैद्यकीय  कर्मचारी,मनोज चव्हाण,श्रीमंत राठोड,दिनेश राठोड,सुजित जमदाडे,चंदू जोगदंड  आदी उपस्थित होते.

Labels: