Wednesday, 29 June 2022

तेलंगणा राज्याचे मंत्र्यानी दिली तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ गावास भेट


काटी , दि. २९:  उमाजी गायकवाड 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंडामुळे आमदारांसह  आठ मंत्री गुवाहटीला गेले असल्याने व बंडानंतर  राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले असताना तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील अंगणवाडीस तेलंगणाच्या महिला व बालविकास मंत्री सविता इंद्रा रेड्डी व शालेय शिक्षण मंत्री सत्यवती राठोड यांनी सोमवारी  सदिच्छा भेट दिली.
    

 महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने अंगणवाडीच्या माध्यमातून  राबवण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या योजना व त्याची अंमलबजावणी त्यांनी जाणून घेतली  व गरोदर माता व स्तनदा यांच्याशी संवाद साधून त्यांना देण्यात येत  असलेल्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. इतर राज्यातील  महिला मंत्र्यांनी मंगरूळ सारख्या ग्रामीण भागातील अंगणवाडीस भेट दिल्याने जिल्हाभर या अंगणवाडीचे व येथील सेविका व त्यांच्या सहाय्यकाचे कौतुक केले जात आहे. 

 राज्यातील मंत्री बंडानंतर महाराष्ट्र राज्याबाहेर गुवाहाटीला गेले असताना अचानक  तेलंगणा राज्यातील  दोन महिला मंत्र्यांनी भेट दिल्याने व त्यांच्यासमवेत उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्याबद्दल मंगरूळ गावात  कुतूहलाचा विषय  झाला आहे. या तेलंगणाच्या महिला मंत्र्याना अंगणवाडीत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या योजना व त्यांची अंमलबजावणी याविषयी सविस्तर माहिती तुळजापूर पंचायत समितीमधील गट विकास अधिकारी प्रशांतसिंह  मरोड, ,सरपंच विजयालक्ष्मी महेश डोंगरे,उपसरपंच गिरीश डोंगरे ,ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांनी करून दिली यावेळी  गरोदर माता  व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

अणदूर येथे सेवानिवृत्तांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न जिल्हा परिषद कन्या शाळेचा उपक्रम


अणदूर , दि. २९: श्रीकांत अणदूरकर

शिक्षक हा,शरीराने सेवानिवृत्त होतो, मनाने नाही, सेवानिवृत्तीनंतर  शिक्षकाने,शक्य असेल तेवढे आपले पवित्र ज्ञान दानाचे कार्य चालू ठेवावे. त्यातूनच सुदृढ समाज निर्माण होतो."असे उदगार अणदूरचे सरपंच रामचंद्र आलूरे यांनी काढले.


तुळजापूर  तालुक्यातील  अणदुर  जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेच्या वतीने येथील मुख्याध्यापक यशवंत बाबुराव मोकाशे आणि सह शिक्षिका प्रतिभा जयपाल सगरे ( कंदले) यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार,कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून  रामचंद्र  आलुरे हे बोलत होते, शालेय व्यवस्थापन समिती आणि अणदूर केंद्राच्या विशेष पुढाकारातून हा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमातील सत्कारमूर्तींनी विविध ठिकाणी जि. प.प्रा. शाळेमध्ये ज्ञानदानाचे कार्य केले, त्याही ठिकाणच्या काही पालक व शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. 


प्रमुख पाहुणे म्हणून निलकंटेश्वर मठाचे मठाधिपती ष. ब्र. शिवयोगी शिवाचार्य महास्वामी यांच्या सान्निध्यात हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती देवी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. व त्यानंतर सत्कार मूर्ती यशवंत मोकाशे यांचा सपत्नीक तर प्रतिभा सगरे यांचा शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी, रामचंद्र आलूरे, बाबुराव  चव्हाण यांच्या हस्ते सहपतूनिक सत्कार करण्यात आला. 


यावेळी, पंचायत समिती सदस्या वैशाली मुळे, उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार, माजी सरपंच धनराज मुळे, बालाजी मोकाशे,चेअरमन सिद्राम शेटे, पं. स.गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, विस्तार अधिकारी तात्यासाहेब माळी, ज्येष्ठ समाज सेवक डॉ.सिद्रामप्पा खजुरे, जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उमाकांत चनशेट्टी, शिक्षणतज्ज्ञ भगीरथ कुलकर्णी,मार्गदर्शक महादेवप्पा नरे,श्रीमंत मुळे, केंद्र प्रमुख रमेश राठोड, बाबुराव मुळे यांच्यासह शिक्षण संघटनेचे पदाधिकारी  यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या वेळी बाबुराव चव्हाण, तात्यासाहेब माळी, डॉ.नागनाथ कुंभार, शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सहशिक्षिका संगीता पापडे, जळकोट येथील सेवानिवृत्त शिक्षक एस.टी.पोतदार, श्रीमती आवटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी के राठोड यांनी तर  सूत्रसंचालन प्रा प्रसन्न कंदले यांनी केले. शेवटी प्रभारी मुख्याध्यापिका संगीता देशमुख यांनी आभार मानले.

Labels:

राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत करुन नळदुर्ग येथे जाल्लोष


नळदुर्ग ,दि.२९:

औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर व उस्मानाबाद शहराचे नामकरण धाराशिव करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर नळदुर्ग येथील युवा सेनेचे माजी तालुका प्रमुख  ज्ञानेश्वर घोडके यांच्यासह शिवसेनेच्या व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात आनंदोत्सव साजरा करत भगव्या गुलालाची उधळण करत फटाके फोडून साखर वाटप करत महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. 


यावेळी युवा माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, भाजयुमोचे जिल्हा  सरचिटणिस श्रमिक पोतदार, भाजपा शहराध्यक्ष धिमाजी घुगे, सागर हजारी, सुनील गव्हाणे, जमन ठाकूर, अजय ठाकूर,  चंद्रकांत घोडके,  गणेश गायकवाड, आनंद  बताले , बाळासाहेब वाघमारे, संतोष पाटील आदिसह नागरिक उपस्थित होते.

Labels:

आंध्रप्रदेशातुन अपहृत 6 व्यक्तींची उस्मानाबाद पोलीसांकडून यशस्वी सुटका



“आंध्रप्रदेशातील अपहृत 6 व्यक्तींची उस्मानाबाद पोलीसांकडून यशस्वी सुटका.”

उस्मानाबाद , दि . २९ :

 वांगी (बु.), ता. भुम येथील सुभाष आण्णा पवार याने गांजा हा अंमली पदार्थ बाळगल्याने त्याच्याविरुध्द उस्मानाबाद व आंध्र्रप्रदेशात गुन्हे दाखल असुन तो सध्या जामीन मुक्त आहे. त्याने आंध्रप्रदेशातील एका कुटूंबातील पाच व्यक्तींचे व त्यांच्याच एका नातेवाईकाचे अपहरन करुन त्यांना अज्ञात ठिकाणी डांबून ठेवले होते. तसेच 2 मेट्रीक टन गांजा आणुन दिल्यावरच त्यांची सुटका करण्यात येईल अशी धमकी सुभाष पवार याने त्या अपहृतांच्या नातेवाईकांना दिली होती.


 या प्रकरणी आंध्रप्रदेशातील जीके विधी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 16/2022 हा भा.दं.सं. कलम- 341, 344, 347, 367, 506 सह एनडीपीएस कलम- 28 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

तपासादरम्यान आंध्रप्रदेश पोलीसांचे पथक दि. 26.06.2022 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात आले होते. त्यांना तपासादरम्यान भाषेची अडचण जाणवत होती. या पथकाने स्थानिक पोलीसांशी संपर्क साधून मदतीची मागणी केली होती. यावर  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांनी कळंब विभागाचे  साहय्यक  पोलीस अधीक्षक  एम. रमेश यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगीतले. यावर कळंब उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या पथकातील पोउपनि  पुजरवाड यांसह पोलीस अंमलदार- किरण अंबोरे, नवनाथ खांडेकर, महेश शिंदे यांच्यासह आंध्र पोलीसांच्या संयुक्त पथकाने दि. 26- 27 जून दरम्यानच्या रात्री आरोपी सुभाष पवार राहत असलेल्या वांगी (बु.), ता. भुम येथील परिसरात पाळत ठेवली.


 दरम्यान पोलीसांच्या लक्षात आले की, सुभाष याच्या घरात नमूद अपहृतांना डांबून ठेवले आहे. यावर पथकाने दि. 27 जून रोजी सकाळी सुभाष पवार यास ताब्यात घेतले. तात्काळ पथकाने त्याच्या घरात डांबून ठेवलेल्या पांगी कुटूंबीय गोवर्धन, धनलक्ष्मी, तरुण- वय 4 वर्षे, संदीप- वय 2 वर्षे, यशोदा- वय 14 वर्षे यांसह जेम्मीली नागेंद्र बाबू सर्व रा. एबुलम, जी.के. विधी मंडल, जि. अल्लुरी सितारामाराजु, राज्य- आंध्रप्रदेश यांची पथकाने यशस्वी सुटका केली.


 उस्मानाबाद पोलीसांनी दाखवलेल्या धाडस व सक्रीयतेबद्दल आंध्र पोलीसांच्या पथकाने उस्मानाबाद पोलीसांचे आभार व्यक्त करुन आरोपी सुभाष आण्णा पवार यासह नमूद सहा व्यक्तींना घेउन आंध्र पोलीस आंध्रप्रदेशकडे रवाना झाले.

Labels:

Saturday, 25 June 2022

हमखास नोकरीची संधी देणा-यातंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरु



   उस्मानाबाद,दि.२५ :

 दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तंत्रनिकेतन प्रथम वर्ष आणि बारावी, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी थेट व्दितीय वर्ष तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. ही प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. 



दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर हमखास यशाचा मार्ग म्हणजे तंत्रनिकेतन होय. त्यातून उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या आणि उद्योगाच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत, म्हणून विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घ्यावा, असे प्रतिपादन तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे.
     


दहावीच्या गुणांवर तंत्रनिकेतनमध्ये प्रथम वर्षास आणि बारावी, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट व्दितीय वर्षास प्रवेश दिला जातो. त्यामुळे कमी कालावधीमध्ये एक उत्तम करिअर निर्माण करण्याची  संधी विद्यार्थ्यांना मिळते. तंत्रनिकेतन मधील व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय सुरु करता येतो. रेल्वे, संरक्षण दले, आरटीओ, भेल, महावितरण, दूरसंचार विभाग, पाटबंधारे विभाग, तंत्रशिक्षण विभाग आदी सरकारी, निमसरकारी क्षेत्राबरोबरच वाढत्या औद्योगिकीकरणाच्या आधुनिक काळात तंत्रनिकेतनमधून उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना खाजगी उद्योगक्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. तसेच बी. टेक, बी.ई., बी. ऑर्कीटेक्चर, बी. एस्सी व्होकेशनल, बीबीए अशा आणि इतर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासही विद्यार्थी पात्र ठरतो. अंतिम वर्षात शिकणा-या विद्यार्थ्यांना परिसर मुलाखती मधून विविध नामांकित कंपन्यातर्फे नोकरीची संधी दिली जाते. मागील वर्षी मराठवाडयातील ग्रामीण आणि शहरी भागातील जवळपास 1130 विद्यार्थ्यांची निवड परिसर मुलाखती मार्फत झाली आहे. अशी माहिती  औरंगाबाद येथील तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक उमेश नागदेवे यांनी दिली आहे.
          

औरंगाबाद विभागात शासकीय आणि अशासकीय असे एकूण 57 तंत्रनिकेतने आहेत. त्यांची 15 हजार 40 विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा प्रामुख्याने ग्रामीण भागातील तसेच मराठी माध्यमातील असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा आणि अध्ययन अध्यापनासाठी मराठी माध्यमाचाही पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने यावर्षीपासून नियमात केलेल्या बदलानुसार कोणत्याही  शाखेतून आयटीआय उत्तीर्ण झालेला विद्यार्थी हा तंत्रनिकेतनमधील थेट द्वितीय वर्षाच्या सर्व शाखांसाठी पात्र राहील. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी तिस-या अतिरिक्त प्रवेश  फेरीचा अंतर्भाव या वर्षीपासून प्रवेश प्रक्रियेत करण्यात आला आहे. कोव्हिडमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले आई-वडील गमावले आहेत आणि ज्यांच्याकडे " पीएम केअर्स प्रमाणपत्र " आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दोन अतिरिक्त जागा अभ्यासक्रम निहाय राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.


     तंत्रनिकेतनमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळणा-या विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेता येईल. प्रवेशासाठी लागणा-या विविध कागदपत्रांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने तंत्रशिक्षणचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना पत्राव्दारे प्रवेशासाठी आवश्यक ती कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी विनंती केली आहे.
    

 या वर्षीची तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना ई-स्क्रुटीनी आणि प्रत्यक्ष स्क्रुटीनी पैंकी एका सुविधेचा पर्याय निवडून अर्ज भरता येईल. औरंगाबाद विभागात शहरी आणि ग्रामीण भागात 50 प्रवेश सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. त्याठिकाणी विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन तसेच नोंदणी अर्ज भरण्याची मोफत सुविधा करण्यात आली आहे. या सुविधांचा पालक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  उमेश नागदेवे यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर माहिती व प्रवेश नोंदणी अर्जासाठी https://poly22.dte.maharashtra.gov.in/diploma22/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक ०२४०२३३४२१६, २३३४७६९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Labels:

Friday, 24 June 2022

खडकी येथे अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापा, दोघाविरुध्द तामलवाडी पोलीसात गुन्हा दाखल


काटी , दि . २४: 

 तुळजापूर तालुक्यातील खडकी  तांडा येथे अवैध हातभट्टी अड्यावर तामलवाडी पोलीस ठाण्याचे साहय्यक  पोलीस निरीक्षक सचिन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी    तामलवाडी पोलीस पथकाने छापा टाकला. या कार्यवाहीत 70 हजार आठशे रुपयांचे अवैध दारु व रसायन नष्ट केले असून दोन आरोपितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

  तुळजापूर तालुक्यातील खडकी येथील लमाण तांडा शेत शिवार येथे अवैध गावठी दारू निर्मिती होत असल्याची माहिती तामलवाडी पोलीस पथकाला मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार तामलवाडी पोलीस ठाण्याचे  साहय्यक  पोलीस निरीक्षक सचिन पंडीत यांच्यासह  पोलीस अंमलदार आनंद  गायकवाड, आकाश सुरणर, करीम शेख, शिवाजी सिरसाट,नजीर बागवान,महीला पोलीस अंमलदार निचलकर या पोलीस पथकाने गुरुवारी  11 ते  2 वाजता राजु गुरप्पा राठोड व राजु धोंडीराम राठोड यांच्या शेताजवळील बांधाजवळ या दोन्ही ठिकाणी अचानक छापा मारला असाता 70 हजार 800 रुपये किंमतीचे हातभट्टी दारू व रसायन नष्ट केले. 


याप्रकरणी   पोलिसांनी हातभट्टी चालक चंद्रकांत भिमा चव्हाण रा. खडकी  तांडा ता. तुळजापूर आणि विजय मानसिंग चव्हाण रा. बक्षी हिप्परगा ता. उत्तर सोलापूर,  या दोघाविरुध्द  मुंबई दारुबंदी कायदा कलम 65(इ), 65(फ) नुसार तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक संजय राठोड हे करीत आहेत.

Labels:

Thursday, 23 June 2022

चिवरी येथील केळीचा गोडवा सातासमुद्रापार ; प्रगतशील शेतकरी पाटील यांची आदर्श शेती



चिवरी , दि . २३ : राजगुरु साखरे : 

कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी, अवकाळी ,पडलेलले बाजार भाव या निसर्गाच्या लहरीपणामुळे परिसरातील शेतकरी संकटाच्या मालिकेने त्रस्त आहेत, परंतु या संकटावर मात करीत तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील प्रगतशील शेतकरी पोपटराव दत्तात्रय पाटील यांनी केळी पिकांची परदेशात निर्यात करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत, त्यामुळे शेती पिकत नाही, शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चिवरीचे प्रगतशील शेतकरी तथा  निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी  पोपटराव  पाटील यांनी  चांगला आदर्श घालून दिला आहे.

 येथील शेतकरी  पाटील यांनी पाच एकर क्षेत्रावर एक वर्षापूर्वी जैन टिश्यू कल्चर या  जातीची निवड करून केळी लागवड केली , योग्य खत व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण, आवश्यकतेप्रमाणे विद्राव्य खते वापरून , घडाची गुणवत्ता सुधारण्यासाठी केळफुल निसवल्यानंतर आंतरप्रवाही कीडनाशकाचा वापर करून दर्जेदार औषधांचा वापर , खते मशागत यासह आदींची निगा राखल्याने चांगल्या प्रतीचे केळी उत्पादन निघू लागले आहे, 


आजघडीला  एकरी केळीचे ३५ टन गुणवत्तापूर्ण उत्पादन घेऊन  प्रति क्विंटल दोन हजार रुपये  दराने सौदी अरेबिया या देशात निर्यात होत आहे, साधारणता सरासरी एका घडाचे वजन चाळीस किलो  मिळत असून या अगोदरही पाटील यांनी द्राक्ष उत्पादनामध्ये अग्रेसर उत्पादन घेऊन विक्रम केला होता, त्यापाठोपाठ आता केळी उत्पादनामध्येही त्यांनी भरघोस उत्पादन घेत आहेत एकंदरीत श्री पाटील यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापन, करून उत्पादित केळी सातासमुद्रापार पाठवण्यात त्यांना यश आले आहे.

Labels:

गोंधळवाडी येथील जेष्ठ नागरिक आबाराव माने यांचे शंभराव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

काटी, दि . २३

 तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी येथील जेष्ठ नागरिक आबाराव सटवा माने वय  १०० वर्षे यांचे गुरुवार दि. (22) रोजी सायंकाळी 8 वाजता अल्पशा आजाराने  निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या शेतामध्ये  अंत्यसंस्कार करण्यात आले. ते सेवानिवृत्त शिक्षक बी.एस. माने व शिवाजी माने यांचे वडील होत.
        त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Labels:

बँक ऑफ महाराष्ट्रचे नुतन शाखाधिकारी कृष्णा भोजा यांचे स्वागत

काटी , दि .२३

 तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेतील नुतन शाखाधिकारी कृष्णा भोजा यांनी नुकताच तामलवाडी शाखेच्या शाखाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.


 त्याबद्दल येथील सामाजिक कार्यकर्ते हणमंत गवळी, धोत्रीचे राम मस्के, पांडागळे आदींच्या वतीने शाल, फेटा, पुष्पहार घालून सत्कार करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. नुतन शाखाधिकारी कृष्णा भोजा यांची साखर पेठ, सोलापूर येथून तामलवाडी शाखेच्या शाखाधिकारीपदी पदभार स्वीकारला आहे.
     

यावेळी पीक कर्ज आणि बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा लाभ कसा मिळेल याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सत्काराला उत्तर देताना नुतन शाखाधिकारी कृष्णा भोजा यांनी शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची अडवणूक होणार नाही याची काळजी घेतली जाणार असून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
      

Labels:

साहित्याचे वितरण; ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपकरणाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लोकार्पण

काटी , दि . २३ : उमाजी गायकवाड

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स कारखान्याच्या वतीने सि.एस.आर. फंडातुन शैक्षणिक साहीत्याचे वितरण व ऑक्सीजन कॉन्सस्टेटर मशीचा लोकार्पन सोहळा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांच्या हस्ते बुधवार दि. (22) रोजी संपन्न झाला. 


बालाजी अमाईन्स कारखान्याच्या आवारात आयोजित केलेल्या या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर होते तर मुख्य कार्यकारी राहूल गुप्ता बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी, राजेश्वर रेड्डी, तहसिलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांत सिह मरोड, सी.एस.आर.विभाग प्रमुख  एम. ए.बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.


कारखान्याच्या सी.एस.आर. फंडातुन 10 शाळांना शैक्षणिक साहीत्य व आरोग्य विभागास 12 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर  उपकरणाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक राम रेड्डी यांनी केले 
  

 यावेळी सरपंच मंगलताई गवळी, माजी सरपंच दत्तात्रय वडणे, गट शिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, मंडळ अधिकारी बाळासाहेब जगताप, तलाठी राजमाने, केन्द्र प्रमुख एल.आर. धोंगडे, बालाजी चुंगे, कारखान्याचे समन्वयक दत्तप्रसाद सांजेकर, सचिन राऊत, विनोद चुंगे, ज्ञानेश्वर घोटकर, मारुती सावंत, मुख्याध्यापक सुहास वडणे, राजाराम वाघमारे, महादेव वाघमारे, सोमदेव गोरे यांच्यासह तामलवाडी परिसरातील शाळेतील विद्यार्थी  उपस्थित होते.


या शाळांना झाली मदत 

बालाजी अमाइन्स कारखान्याने शिक्षण व आरोग्य विभागास मदत देण्यासाठी पुढाकार घेतला असून बुधवारी जि.प.शाळा तामलवाडी, जि.प. शाळा जळकोट,जि.प.शाळा केशेगाव, हंगरगेकर माध्यमिक विद्यालय तुळजापुर, माध्यमिक विद्यालय येवती, जि.प. शाळा खुदावाडी, जि.प. शाळा जळकोट, सिद्धेश्वर विद्यालय किलज,भारत विद्यालय उस्मानाबाद, जि.प.शाळा वागदरी, जि.प. शाळा वाल्हा, ता.भुम या शाळाना विविध साहीत्याचे वितरण उपस्थित मान्यवर अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

Labels:

स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


   मुरुम, ता. उमरगा, दि. २३ : 

भारत शिक्षण संस्था, उमरगा संचलित कला, वाणिज्य व विज्ञान स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, मुरूम येथे आयोजित बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुरुवारी (ता.२३) रोजी पार पडला.


या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या सहशिक्षिका डॉ. वंदना जाधव उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष त्र्यंबक बाबा इंगोले होते. यावेळी तानाजी भाऊ फुगटे, प्राचार्य दिलीप इंगोले, प्रा. विजया बेलकेरी आदींची उपस्थिती होती. 


यावेळी तिन्ही शाखेतून आलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकातील विज्ञान शाखेतून कु. माने अपर्णा प्रवीण, काळे शिवानी महावीर, इंगोले मेनका माधव, कला शाखेतून कु. भाकरे रत्नमाला शिवपुत्र, अचलेरे सुषमा संतोष, शिंदे प्रज्ञा राम तर वाणिज्य शाखेतून कु. सुर्यवंशी सुष्मिता रमाकांत, मडोळे ऐश्वर्या विश्वनाथ, इनामदार बुशरा सलीम आदी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, पालक व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Labels:

माध्यमिक शालान्त परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 मुरूम, ता. उमरगा, दि. २३ : 


येथील वनश्री बहुउद्देशीय संस्था, दस्तापूर संचलित ज्ञानदान विद्यालय, मुरूमच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विद्यालयात मंगळवारी (ता. २१) रोजी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. 


या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. डॉ. महेश मोटे होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त जिल्हा रेशीम उद्योग अधिकारी पी. जी. मदने होते. यावेळी डॉ. अमर गडदे, पत्रकार महेश निंबरगे, राम डोंगरे, योगेश पांचाळ, मुख्याध्यापक जी. एम. कुंभार, विजय इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ. महेश मोटे यांचा यथोचित विशेष सत्कार करण्यात आला. कुमारी शरयू बिरादार, ऋतुजा वागदरे, वेदांत इंगळे, हणमंत माने, आकाश डोंगरे, दिपक ठाकरे यांचा मान्यवरांच्या हस्ते फेटा, शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. 

यावेळी डॉ. महेश मोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यश प्राप्त करण्याकरिता कठोर परिश्रम घेऊन अभ्यास केला पाहिजे. वाचन, चिंतन व मनन या गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्या पाहिजेत. अध्यक्षीय समारोप प्रसंगी पी. जी. मदने यांनी विद्यालयाच्या सलग तीन वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा राखल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करुन अभिनंदन केले. सहशिक्षक सतिश बिराजदार, विजयकुमार फुगटे, विश्वनाथ जोशी, श्रीमती मंजुषा गायकवाड, प्रकाश रोडगे, विठ्ठल गुगे, प्रविण शिंदे, अंबादास मंडले आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरप्पा कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन सुधाकर म्हेत्रे तर आभार शिवानंद बोलदे यांनी मानले. यावेळी माता-पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी  उपस्थित होत्या.

Labels:

Wednesday, 22 June 2022

प्राचार्य सुभाष जाधव यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन


काटी , दि . २२ 

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील त्र्यंबकेश्वर बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुभाष खंडेराव जाधव तसेच पर्यवेक्षक गणेश त्र्यंबक हलकरे हे नुकतेच प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.या दोघांचाही सेवापूर्ती सत्कार समारंभ शनिवारी दि.25 रोजी सकाळी 11 वाजता सरस्वती मंगल कार्यालय, तामलवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.


या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे हे असून अध्यक्षपदी तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हे असणार आहेत.शिक्षणाधिकारी गजानन सुसर, गटशिक्षणाधिकारी अर्जून जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.असे त्र्यंबकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बसवणप्पा चंद्रकांत मसूते, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सचिव यशवंत लोंढे आणि नूतन मुख्याध्यापक सुहास दादाराव वडणे यांनी कळविले आहे.

Labels:

Tuesday, 21 June 2022

महाएनजीओ फेडरेशन वतीने योग दिन साजरा



तुळजापूर, दि, २१ 


महा एन जी ओ  फेडरेशन पुणे व संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्था देवसिगा  याच्या संयुक्त विदयामाने आरजु इग्लीश स्कुल केशेगाव येथे योगा करण्यात आले.


योग प्रशिक्षक तानाजी जाधव व बब्रुवान पारवे यानी १३० विद्यार्थीना योगा प्रशिक्षण दिले . योग उत्तम आरोग्यास प्रोत्साहन देतो. कारण ते खरोखर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकते.  योगामुळे तणाव कमी होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असे २०११ च्या इंटरनॅशनल जर्नल ऑफ योगामध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार योगाचे ९ फायदे:  योगामुळे शक्ती, संतुलन आणि लवचिकता सुधारते,  योगामुळे पाठदुखीपासून आराम मिळतो,  योगामुळे सांधेदुखीची लक्षणे कमी होतात, योगामुळे हृदयाच्या आरोग्याला फायदा होतो,  योगामुळे तुम्हाला आराम मिळतो, ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येते,  योगाचा अर्थ अधिक ऊर्जा आणि उजळ मूड असू शकतो,  योगामुळे तुम्हाला तणावाचे व्यवस्थापन करण्यास मदत होते,  योग तुम्हाला एका सहाय्यक समुदायाशी जोडतो, योग उत्तम स्व-काळजीला प्रोत्साहन देतो. 

आरजु इग्लीश स्कुलचे  सहभागी शिक्षक संस्थेचे अध्यक्ष अरूण कोळगे, ज्योती पाटील, आर्चना कोळगे, सुचिञा, कामठे राहुल अवधुत पुनम काकडे यानी सहभाग  नोदवला

Labels:

उद्या सह्याद्री वाहिनीवर व्यसनाधीनता या विषयावर डॉ. अतुल ढगे (काटीकर) यांच्याशी चर्चा

काटी, दि . २१

 तुळजापूर तालुक्यातील काटीचे सुपुत्र तथा  रत्नागिरीचे सुप्रसिद्ध मनोविकारतज्ञ, व्यसनमुक्तीतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ डॉ.अतुल ढगे हे सह्याद्री वाहिनीवर बुधवार दि.22 रोजी 12 ते 1 च्या दरम्यान व्यसनाधीनता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
      

व्यसनाधीनतेची समस्या वरचेवर वाढत चालली आहे. दारू, तंबाखू या नशेसोबतच आतां चरस गांजा  आदीमुळे संपूर्ण समाज या व्यसनाने पोखरत चालला आहे. किशोर वयीन मुले Whitener, Eraze-x या अशा गोष्टींची नशा करते तर तरूण पिढी चरस, गांजा सोबतच दारू, सिगारेट यात रमले आहे. त्यामुळे त्यांचे वैयकक्तित नुकसान तर होतच आहे, परंतु सोबतच त्यांचे कुटुंबाचे समाजाचे व पर्यायानी देशाचे नुकसान होत आहे. 


देश वाचवायचा असेल, तर तरूण पिढीला वाचवायला हवे त्यांना व्यसनापासून रोखायला हवे. त्यासाठी खुप मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज आहे. व्यसनाधीनता, तो आजार आहे त्यांचे परिणाम काय होतात, ते त्यापासून दुर कसे रहावे या सर्व गोष्टी विषयी किशोरवयीन मुलांना जागृत करणे, माहिती करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र सोबतच भारतातील विविध राज्यातील तब्बल 500 मनोविकारतज्ञ ‘गाव तिथे मानसोपचार’ च्या चौथ्या टप्यात ‘नशा मुक्त भारत, स्वस्थ भारत' या घोष वाक्यासह किशोरवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनतेच्या आजाराविषयी दि.26 जून ते 31 जुलै दरम्यान जनजागृती करणार आहेत. त्या कार्यक्रमाचा भाग म्हणून तसेच दुरदर्शनचे  प्रदिप दळवी व  सुहास विद्वांस यांच्या संकल्पनेतून 26 जुन च्या आंतराष्ट्रिय मादक पदार्थ विरोधी दिनाच्या औचित्याने हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 


दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘डॉक्टर स्पीक ईन आरोग्य सपंदा’ या कार्यक्रमा अंतर्गत ‘नशामुक्त भारत, स्वस्थ भारत’ याविषयी म्हणजेच व्यसनाधीनता व ड्रग्ज विषयी चर्चा केली जाणार आहे. सदर कार्यक्रमामध्ये तज्ञ म्हणून रत्नागिरीचे सुप्रसिद्ध मनोविकारतज्ञ, व्यसनमुक्तीतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ डॉ.अतुल ढगे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर दुरदर्शन मुंबईच्या सुचेता गरूडे याचे सुत्र-संचालन करणार आहेत. दि 22 जुन रोजी (बुधवारी) दुपारी 12 ते 1 दरम्यान या कार्यक्रमाचे दूरदर्शन च्या सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रक्षेपण होणार आहे.


   डॉ अतुल ढगे हे मूळचे उस्मानाबादमधील तुळजापूर तालुक्यातील काटी गावचे सुपुत्र आहेत. त्यांचे शिक्षण काटीच्या जिल्हा परिषद शाळेतून तसेच तुळजापूर च्या जवाहर नवोदय विद्यालय या शाळेतून झालेले आहे. एमबीबीएस नंतर त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध सायन हॉस्पिटल येथून मनोविकार तज्ञ म्हणून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनंतर त्यांनी प्रादेशिक मनोरूग्णालय रत्नागिरी येथे मनोविकारतज्ञ म्हणून सेवा केली तसेच स्वतःचे माइंडकेअर हॉस्पिटल चालू केले. 


 महराष्ट्रभरात प्रक्षेपण होणाऱ्या आकशवाणीच्या कार्यक्रमांमध्ये त्यांना तज्ञ म्हणून बोलावले गेले आहे. 

   काटी व तुळजापूरच्या ग्रामस्थांमधून त्यांचे कौतुक केले जात आहेत. त्यांच्याशी संपर्क केले असता थोड्याच दिवसात आपल्या भागातील लोकांना आपल्या ज्ञानाचा फायदा व्हावा यासाठी महिन्यातून एक वेळा सेवा देण्याचा मानस असल्याचे सांगितले.             
                    सर्वानी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच जर व्यसनाधीनतेविषयी काही प्रश्न विचारायचे असल्यास 022-24988050 किंवा 24908050 या नंबरवर कार्यक्रमादरम्यान प्रश्न विचारायचे आवाहन डॉ. अतुल ढगे यांनी केले आहे.

Labels:

तुळजाभवानी महाविद्यालच्या शैक्षणिक संकुलात जागतिक योग दिन उत्साहात संपन्न

तुळजापूर, दि.२१, 

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर, तुळजाभवानी शिक्षण शास्त्र महाविद्यालय तसेच विठ्ठल रामजी शिंदे विद्यालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात तुळजाभवानी महाविद्यालच्या प्रांगणात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. 

प्रचंड धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये मानवाचे शरीर निरोगी राहण्यासाठी आपल्या भारत देशाने संपूर्ण जगाला योगामृत प्रदान केले असल्याचे मत तुळजाभवानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांनी व्यक्त केले, यावेळी शिक्षणमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक आदटराव एल एल यांनी या योगदीनाचे योगा शिक्षक म्हणून नेतृत्व केले.


कार्यक्रमाप्रसंगी एन सी सी विभागप्रमुख डॉ मेजर वाय ए डोके, सुभेदार दिलीप शेंडगे, प्राचार्य दौंड, मुख्याध्यापक एलगुंडे, पर्यवेक्षक काशिद तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा व्ही एच चव्हाण,प्रा.डॉ.एम.आर आडे ,प्रा.आशपाक आतार यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विवेक कोरे यांनी केले, यावेळी तिन्ही संकुलातील विद्यार्थी विद्यार्थिनी   उपस्थित होते.

Labels:

पांगरदरवाडी शाळेत जागतिक योग दिन साजरा

                     
काटी  दि.२१:  

अंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी शाळेत सकाळी 7:15 ते 8:15 वा.पर्यंत योगासनांच्या प्रात्यक्षिकासह योगदिन  साजरा करण्यात आला.


यावेळी मुक्त शारीरिक हालचालीं सोबत उभ्या स्थितीतील आसने की ज्यामध्ये ताडासन, वृक्षासन,पादहस्तासन, अर्ध- चक्रासन, त्रिकोणासन त्यानंतर बैठ्या स्थितीतील आसने यामध्ये भद्रासन,वज्रासन,अर्ध उष्ट्रासन,उष्ट्रासन, पद्मासन व वक्रासन त्यानंतर पाठीवरील आसनांमध्ये सेतुबंधासन, पवनमुक्तासन तर पोटावर झोपून करावयाच्या आसनांमध्ये भुजंगासन, मकरासन, शलभासन इत्यादी आसने प्रात्यक्षिकासह घेण्यात आली. 

 त्यानंतर कपालभाती, भ्रामरी प्राणायाम व ध्यान घेऊन योगसाधनेची सांगता करण्यात आली.  
  वजनात घट, सशक्त व लवचिक शरीर,तजेलदार त्वचा, शांत व प्रसन्न मन, उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट हवी असते ती द्यायला योगा समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपुरतीच मर्यादित आहे, असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो. कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्या सहज लक्षात येतात; परंतु मन, श्वासोच्छवास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. मन,शरीर व श्‍वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी व सर्वार्थाने सफल होतो; असे योगासनाचे महत्व योग शिक्षक श्री शांताराम कुंभार यांनी विद्यार्थी, शिक्षक व उपस्थित तरूण यांना पटवून दिले.                   

यावेळी योग शिक्षक म्हणून शांताराम कुंभार,हर्षवर्धन माळी यांचे समवेत नानासाहेब कोळी, शहाजी कोळी,अनिता माने व कोरबू मँडम उपस्थित होते.शाळेतील इ.1ली ते 8 वी.पर्यंतची एकूण 174 विद्यार्थी व 12 तरुणांनी योगसाधनेत सहभाग नोंदविला.

Labels:

Monday, 20 June 2022

खुदावाडी सोसायटीच्या चेअरमन पदी नरवडे तर व्हाईस चेअरमन पदी कबाडे यांची निवड


अणदूर ,दि. २०

. तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नुतन चेअरमन पदी काँग्रेसचे आमोल नरवडे तर व्हाईस  चेअरमन पदी गुरुनाथ कबाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .



सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित जय हनुमान शेतकरी विकास पॅनल व शेतकरी विकास आघाडी या दोन पॅनल मध्ये सरळ सरळ निवडणूक लागली होती या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलला धूळ चारुन काँग्रेस प्रणित जय हनुमान पॅनलने १३ जागेवर विजय संपादन केले असल्याने सोसायटीवर काँग्रेसचा झेंडा फडकविला आहे .

राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस प्रणित जय हनुमान शेतकरी विकास पॅनलने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते जय हनुमान शेतकरी पॅनलचे पॅनल प्रमुख शरणाप्पा कबाडे , अमर नरवडे , बापु बोंगरगे यांनी विजय संपादन करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत .

रविवारी विविध कार्यकारी सेवा सोसायटी खुदावाडी  नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पार पडली . चेअरमन पदासाठी अमोल नरवडे तर व्हाईस चेअरमन पदासाठी गुरुनाथ कबाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद कुलकर्णी यांनी चेअरमन पदी अमोल नरवडे  तर व्हाईस चेअरमन पदी गुरुनाथ कबाडे  यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी बोलताना नूतन चेअरमन अमोल नरवडे म्हणाले की, खुदावाडी मधील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काम करूत,एक आदर्श सोसायटी निर्माण करण्याचा प्रयत्न नक्की करूत असा आशावाद बोलून दाखवला .या दोन्ही पदाच्या निवडी जाहीर होताच कार्यकर्त्यानी जल्लोष साजरा करून नतुन चेअरमन व्हाईस चेअरमन व नूतन संचालकांचे जंगी सत्कार करण्यात आले यावेळी नूतन संचालक  अहंकारी लक्ष्मण ,जाधव काशिनाथ,जवळगे शिवप्पा ,काटे भानुदास ,मोळगड्डे भीमराव , स्वामी नागनाथ, घोडके दत्तात्रय , कबाडे अंजिरबाई , कांचन सातलिंग स्वामी , कापसे श्रीदेवी  , सुनिता भालेराव  सोसायटीचे सचिव कदम आदीसह ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

Sunday, 19 June 2022

काटी येथील येडेश्वरी प्रशालेचा शंभर टक्के निकाल


काटी , दि . १९: उमाजी गायकवाड 

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी  ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. तुळजापूर  तालुक्यातील काटी  येथील मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर संचलित, येडेश्वरी कन्या प्रशालेने  यशाची परंपरा यंदाही कायम राखत प्रशालेचा 100 टक्के  निकाल आहे.  


प्रशालेतील यशस्वी  विद्यार्थी,  विद्यार्थीनींचे ग्रामस्थामधून कौतुक केले  जात आहे.  या प्रशालेतून एकूण 51 विद्यार्थी  परिक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 80 टक्क्यांपुढे 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये कु.वैष्णवी मानाजी भानवसे 91.20 टक्के,कु.शरयु सुरेश राऊत 91.20 या दोन्ही विद्यार्थीनींनी समान गुण मिळवून प्रशालेत पहिल्या क्रमांकाने येण्याचा मान मिळवला तर कु.रत्ना शिवाजी गाडेकर 90.60 टक्के, कु.प्रतिक्षा प्रकाश हंगरकर  90.40 टक्के या विद्यार्थ्यांनींनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावत प्रशालेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. प्रशालेचे 60 टक्के ते 80 टक्केच्या दरम्यान 23 विद्यार्थी  उत्तीर्ण  विशेष प्राविण्यात  उत्तीर्ण होऊन  विद्यार्थ्यांनी संस्था व येडेश्वरी प्रशालेच्या उज्ज्वल यशाच्या परंपरेत पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.


 संस्थेच्या वतीने संस्थापक मनोहर सपाटे, शालेय शिक्षण समितीचे चेअरमन मोहनराव गोरे,प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश रणदिवे, सहशिक्षक  सुनिल खेंदाड, सहशिक्षक दिगंबर कदम, किशोर बनसोडे, गणेश गुंगे, तुकाराम गवळी यांच्यासह ग्रामस्थांनी   यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थीनींचे   अभिनंदन केले.

Labels:

Saturday, 18 June 2022

रामलिंग पुराणे यांच्या सामाजिक योगदानाबद्ल त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

मुरूम, ता. उमरगा, दि. १९  : 

उमरगा तालुक्यातील समाजिक कार्यकर्ते तथा बसव प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल चेन्नई येथील ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने मानद डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क ही पदवी प्रदान करण्यात आली.


शनिवारी (ता.१८) रोजी चेन्नई येथील भारतीय विद्या भवनात विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभात कुलगुरू तथा पीपल फोरम ऑफ इंडिया भारत सेवक समाजचे चेअरमन डॉ. पी. मॅन्युएल, जीएचपीयूचे आंतरराष्ट्रीय संचालक तथा एचआयबीआय बिजनेस ग्रुप, दुबईचे संचालक डॉ. पिमए हक्कीम, तामिळनाडूचे माजी न्यायाधीश के. वेंकटेशन, अरबीट्रेटर एस. सिद्धारार्थन, तामिळनाडू राज्य सरकारचे माजी सचिव आयएएस अधिकारी संपतकुमार, माजी पोलीस आयुक्त एम. करुणांनीधी आदी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुराणे यांना सामाजिक कार्याबद्ल डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आले. 


यावेळी उपन्यायधीश डॉ. सी. आर. भास्करण, सन टी व्ही गुरू डॉ. जया महेश, कॅम्पटीफ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जयकुमार वासंते, इंडियन इंर्पोमेंट ट्रस्ट, दिल्लीचे डॉ. के. वलरमठी, एनकोर बिजनेस सिस्टमचे मॅनेजिंग डार्येक्टर डॉ. एन. वासुदेवन, कर्नाटक रिजनचे जॉईंट डायरेक्टर डॉ. रामचंद्रा, अकॅडमीक कौन्सिल विलीयट कोरिया आदींची प्रमुख उपस्थिती होती. बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे रामलिंग पुराणे यांना नुकताच ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटीची (जागतिक मानवी शांती विद्यापीठ) मानद "डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क" ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. पुराणे यांनी वयाच्या ४१ व्या वर्षी हे यश संपादित केले आहे. पुराणे हे एका सामान्य कुटूंबातून मुरूम शहरातील नेहरु नगर भागात राहणाऱ्या एका उच्च शिक्षीत व्यक्तिमत्वाने बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यातील विविध प्रश्नांना घेऊन विशेष करून होमगार्डच्या प्रश्नासाठी मुंबईत जनआंदोलन उभे करून त्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न असो वा उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागातील खेडोपाडी जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था पाहून या रस्त्याकरिता शासन-प्रशासन दरबारी अनेक निवेदने देणे, तो प्रश्न मार्गी लावेपर्यंत सनदशीर, लोकशाही पध्दतीने विविध आंदोलने उभी करणे, त्याचा सततचा पाठपुरावा करणे व ते अनुदान प्राप्त करून त्याची अंमलबजावणी होईपर्यंत लक्ष देणे. या त्यांच्या कार्य कुशलतेमुळेच त्यांना सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वदूर ओळखले जाते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना मानद "डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क" या पदवीने सन्मानित करण्यात आल्याची बातमी कळताच विविध सामाजिक संस्था, संघटना, पत्रकार मित्र, ग्रामस्थ, मित्र परिवारांनी त्यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे. यापूर्वीही त्यांना जननायक, समाजचिंतक, समाजभूषण, कोरोना योद्धा अशा विविध पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे.

 डॉ. रामलिंग पुराणे, समाजसेवक
मला मिळालेल्या डॉक्टरेट पदवीचा मी एकटा हक्कदार नसून माझ्या आई-वडीलासह,पत्नी,  सामाजातील विविध क्षेत्रातील मला मार्गदर्शन व सहकार्य करणारे समस्त शहरवाशीय नागरिक, प्रसार माध्यमे यांना मी हे पदवी समर्पित करतो. सदर पदवीमुळे मला निश्चितच प्रेरणा व ऊर्जा मिळाल्याने या पुढच्या काळात देखील याहीपेक्षा अधिक काम करण्याची उर्मी मिळाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 

Labels:

Thursday, 16 June 2022

शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा पूर्व तयारी मेळावा : पाठ्यपुस्तके वाटप करुन विद्यार्थ्यांची काढली गावातून मिरवणूक

वागदरी,  दि. १६ : एस.के.गायकवाड


 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी ता.तुळजापूर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात  शाळा पूर्व तयारी मेळावा घेऊन शालेय विद्यार्थ्यांना पाट्यपुस्काचे वाटप करून  व इयत्ता पहिलीच्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे गूलाब पुष्पाने स्वागत करून त्यांची गावातून चारचाकी  वाहानातुन मिरवणूक काढून शाळेचा पहिला दिवस विविध उपक्रमाने व आनंदाने साजरा करण्यात आला.
  

उन्हाळी सुट्टीच्या नंतर बुधवार दि.१५ जून २०२२ रोजी जि.प.प्राथमिक शाळा वागदरी येथे शाळा सुरू करण्यात आली. सुट्टी नंतर शाळेचा पहिला दिवस विविध उपक्रमांनी व आनंदी आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्मान व्हावी या उद्देशाने सर्व विद्यार्थी व पालकांचे स्वागत करून मुख्याध्यापिका महादेवी जते यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा पूर्व तयारी मेळावा घेऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पाट्यपुस्काचे वाटप करण्यात आले. इ.पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या प्रवेशित विद्यार्थ्यांची गावातून मोटार कारमधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. 

मध्यांन भोजनात गोडपदार्थ देण्यात आले.याप्रसंगी पहिलीच्या सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प,लेखन साहित्य, आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.यामुळे गावात आनंदी शैक्षणिक वातावरण निर्माण झाले.
  

 यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामसिंग परिहार, ग्रामपंचायत सदस्य दत्ता सुरवसे, पालक विश्वनाथ पाटील, शिवाजी पाटील, रामसिंग चव्हाण ,धुमाळ, भाग्यश्री बिराजदार, सविता पाटील, अंगणवाडी कार्यकर्ती पद्मीनी पवार, मदतनीस दिपाली जाधव,  मुख्याध्यापिका महादेवी जत्ते , सहशिक्षक किसन जावळे, तानाजी लोहारा,सशिक्षिका एम.एम. चौधरी,आर.पी.साखरे आदीसह विद्यार्थी पालक  उपस्थित होते.

Labels:

उस्मानाबाद : महिला स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेला माल उत्कृष्ट दर्जाचा: कौस्तुभ दिवेगावकर


 


उस्मानाबाद,दि. १६

महिला स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेला माल उत्कृष्ट व चांगल्या दर्जाचा आहे ,या महोत्सवात आलेल्या डाळी ,विविध प्रकारचे मसाले ,आवळा आधारित विविध पदार्थ, एल ई डी बल्ब तसेच पुणे येथील सेंद्रिय युक्त विविध प्रकारचे तांदूळ या सर्व उत्पादने कौतुकास्पद आहेत. तेंव्हा उस्मानाबादच्या नागरिकांनी या महोत्सवाचा लाभा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले.
              

 जिल्हा परिषदेच्या आवारात डाळ व तांदूळ महोत्सवाच्या उद्भाटन प्रसंगी श्री.दिवेगावकर बोलत होते. यावेळी जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी रहुल गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्राजल शिंदे, जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ. बालवीर मुंडे, संस्था व क्षमता बांधणीचे जिल्हा व्यवस्थापक अल्ताफ जीकरे, एम आय एस जिल्हा व्यवस्थापक अमोल सिरसट, सर्व तालुक्यातील तालुका अभियान व्यवस्थापक ,तालुका व्यवस्थापक ,प्रभाग समन्वयक तसेच स्वयं सहाय्यता गटातील महिला व गावपातळीवरील विविध प्रकारचे केडर उपस्थित होते .
         

 उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान , उस्मानाबाद जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष आणि पुणे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने डाळ आणि तांदूळ महोत्सव दि.16 व 17 जून 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे .या महोत्सवात उस्मानाबाद जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या डाळी ,मसाले, आवळा आधारित विविध पदार्थ तसेच पुणे येथील सेंद्रिय युक्त विविध प्रकारचा तांदूळ , एल ई डी बल्ब आणि इतर वस्तूंचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार जिल्हा व्यवस्थापक विपणन समाधान जोगदंड यांनी केले .

Labels:

पावसाळयातील आजार आणि घ्यावयाची काळजी

                                  
 

    उस्मानाबाद ,दि .१६
     
 जून महिन्यात सर्वात जास्त पाऊस असतो, कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात पडतो. त्यामुळे डासांना पोषक वातावरण तयार होऊन डासांची उत्पत्ती मोठया प्रमाणात होते. त्यामुळे किटकजन्य व जलजन्य आजार होतात. त्यासाठी पावसाळयात नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
              

पाणी हेच जीवन असे संबोधले जाते. मानवी जीवनात स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचे महत्त्व अन्यन साधारण आहे. असुरक्षित पिण्याचे पाणी व अस्वच्छ परिसर यामुळे समाजात आरोग्याच्या प्रमुख समस्या उद्गभवतात. पाण्याची गुणवत्ता हा सुरक्षित पाणी पुरवठयासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. गावातील परिसर व वैयक्तिक स्वच्छतेची स्थिती ही पाण्याच्या गुणवत्तेसाठी प्रामुख्याने जबाबदार असते. काही वेळा स्त्रोतामधून मिळणारे पाणी योग्य गुणवत्तेचे नसते, प्रथमतः स्त्रोताच्या पाण्याची गुणवत्ता समजून घेणे आणि त्यानंतर स्त्रोतापासून ते प्रत्यक्ष घटकांपर्यंत पाण्याचा प्रवास समजून घेवून ज्या-ज्या ठिकाणी पाणी दूषित होण्याची शक्यता असते तेथे प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक असते. (जसे लिकेज, व्हाल्व, गळती, नळ गळती नसणे, नळाचे खड्डे) पिण्याचे पाणी, जीवाणू व रासायनिक प्रदुषणापासून मुक्त हवे.


 जीवाणू प्रदुषणामुळे अतिसार, विषमज्वर, कावीळ, हागवण यासारखे आजार होतात. तर अमर्याद पाण्याचा उपसा, रासायनिक खतांचा वापर व औषधांची फवारणी, स्त्रोता भोवती उकिरडे इत्यादीमुळे नाइट्रेटचे प्रमाण वाढून लहान बालकांत ब्ल्यूबेवी सिंड्रोम (मिथॅहिमोग्लोबिनीया) या सारखे आजार होतो. यामध्ये लहान बालकांची ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते. तर पाण्यात फ्लोराइड प्रमाण वाढल्यास दंतविकार उद्भवतात यात दात वेडेवाकडे होणे, दात ठिसूळ होणे हाडांमध्ये बाक येतो. पाण्यात क्लोराइड व कॅल्शियमचे प्रमाण वाढल्यास मुतखडा, किडनीचे आजार कॅन्सर इत्यादी आजार होतात. 
                

स्वच्छता असेल तेथे आरोग्य नांदेल. आरोग्य नांदेल तर भरभराट होईल असे म्हणतात. आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते ते आपल्यापर्यंत दोन प्रकारच्या आवस्थाद्वारे पोहचते. एक भूपृष्ठावरील पाण्याचे स्त्रोताद्वारे म्हणजे नदी, नाले, तलाव, धरणे आदी माध्यमातून मिळते. तर दुसरा जमिनीखालील पाण्याचे स्त्रोत हातपंप, विद्युत पंप, विहीरी आदीच्या माध्यमातून मिळते. निसर्गातून मिळणारे पावसाचे पाणी शुध्द स्वरुपात असते, हे पाणी आकाशातून जमिनीवर येताना त्यात हवेतील वायू व धुलीकण मिसळतात तसेच जमिनीवरुन प्रवास करताना त्यामध्ये विविध घटक, भुगर्भातील विविध क्षार मिसळतात. नैसर्गिकरित्या पाणी काही प्रमाणात प्रदूषित होत असले तरी, मानवनिर्मित कारणाने पाण्याचे मोठया प्रमाणात प्रदूषण होते. पाण्यात फ्लोराईड, क्लोराईड, कॅल्शियम, अर्सेनिक, लोह, नायट्रेट, खते इत्यादीचा अंश पाण्यातच मिसळल्यामुळे रासानियक प्रदूषण होते.

जिल्हा सर्वेक्षण अधिकारी श्रीमती डॉ. आश्विनी चौधरी :
            
पाण्यामध्येच जीवजंतू, जिवाणू, विषाणू, परोपजिवी पेशी (अमिबा), कृमी इत्यादीचे अस्तित्व असल्यामुळे जैविक प्रदूषण होते. शिवाय कारखान्यातील सांडपाण्याद्वारे किरणोत्सारी पदार्थ मिसळून पाणी प्रदूषित होते.
            

 मानवनिर्मीत कारणामुळेही पाणी मोठया प्रमाणावर प्रदूषित होत असते. नदी, नाले, ओढे, झरे, तळे बांधांचे पाणी दूषित होण्याच्या कारणांमध्ये :

• पात्रात किंवा काठावर शौचास बसणे, अंघोळ करणे, पोहणे, कपडे धूणे, गुरे जनावरे, वाहने धुणे.
• कारखान्यातील टाकाऊ पदार्थ रासायनिक द्रव्य पाण्यात सोडणे. सांडपाणी, मलमूत्र, गटाराचे 
   पाणी  पात्रात सोडणे.
• मानव, पशूपक्षी यांचे मृतदेह पाण्यात सोडणे.
• धार्मिक विधी, मूर्ती विसर्जन, पूजेचे साहित्य (निर्माल्य) टाकणे, नदी काठावर जनावरांचे गोठे 
   बांधणे.
• हातपंपाभोवती उकीरडे असणे. शौचालयाचे सांडपाणी सोडणे, सिंमेटचा ओठा नसणे.
• पाईपलाईन गळती असणे, उघडया विहीरीमध्ये पालापाचोळा पडणे. उघडयावर शौचास बसणे.
अशा प्रकाराने दूषित झालेले पाणी पिल्याने होणाऱ्या आजारांत अतिसार, आमांश (डिसेंट्री), विषमज्वर, काविळ, लेप्टोईस्पायरोसिस इत्यादीं आजारांचा समावेश होतो.


जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हालकुडे :

1. *अतिसार :* शौचाला पातळ होणे किंवा पाण्यासारखे पातळ जुलाब होणे याला अतिसार म्हणतात. पावसाळयात दूषित पाण्यामुळे साथीच्या स्वरुपात होणाऱ्या आजारापैकी एक पाण्यात विविध प्रकारचे ई-कोलाय सारखे जिवाणू व विषाणू पाणी दूषित होवून असे दूषित झालेले पिल्यामुळे अतिसार होतो. यात जलसुष्कता होवून उपचार न मिळाल्यास मृत्यूही संभावतो.
2. *आमांश (डिसेंट्री) :* अमिबा या एकपेशीय जिवाणूमुळे पाणी दूषित होवून हा आजार होतो. यात पोटात कळ घालून शौचास होते. शौचातून चिकट आव (शेंम) पडते, कधी-कधी रक्तही पडते, कधी-कधी फेस पडतो. 
3. *कॉलरा :* व्हिब्रीओ कॉलरा या सुक्ष्म जिवाणूमुळे होणारा आजार. यात जुलाब हे अत्यंत पातळ म्हणजे भाताच्या पेजेसारखी होतात. तीव्र जलसुष्कता होते, त्यामुळे जीभ कोरडी पडते, डोळे खोल जातात, पोटावरील त्वचा ओढल्यास पुर्ववत होण्यास वेळ लागतो. वेळीच उपचार न मिळाल्यास तीव्र जलसुष्कता होवून मृत्यू संभावतो. जलसंजीवनी अथवा शिरेद्वारे सलाईन देवून जलसुष्कता कमी केली जाते. 
4. *कावीळ (यकृतदाह):* कावीळ हा विषाणूजन्य आजार आहे. हा दूषित पाण्याद्वारे होणारा आजार आहे. यात भूक मंदावते, अंगदुखी, पोटात दुखणे, अशक्तपणा जाणवतो, शरीराची त्वचा व डोळे पिवळे दिसतात. कावीळात योग्य आहार व विश्रांतीला महत्व आहे.

5. *विषमज्वर:*  दूषित पाण्याद्वारे प्रसारणारा आजार आहे. हा रोग सालमोनेला टायपी या सुक्ष्म जिवाणूमुळे होतो. विषमज्वरात सतत जास्त ताप असणे, डोकेदुखी, अंगदुखी, खूप थकवा, पोटदुखी इत्यादी लक्षणे असतात. उपचारात हलका पातळ आहार, पूर्ण विश्रांतीला महत्व आहे. यावर प्रतिजैविकांचा वापर करावा लागतो. पावसाळयात साठलेल्या पाण्यावर जसे- डबके, नाले, खड्डे इत्यादीच्या पाण्यात डासोत्पती होवून, डेंग्यू, हिवताप, फायलेरिया, चिकनगुनिया यासारखे किटकजन्य आजार होतात.
            
 *डेंग्यु* या आजाराचा प्रसार हा ऐडिस या डासामुळे होतो तर हिवताप हा ऐनाफिलीस या डासाच्या मादीमुळे होतो. डेंग्यु डासाचे आयुष्य 21 दिवसाचे असते. डेंग्यु तापाचा डास हा घरातील स्वच्छ परिसरातील असलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. डेंग्यु तापामध्ये तीव्र ताप येतो, डोकेदुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी, उलटया होणे, मळमळ होणे, अशक्तपणा, भूक मंदावते, जास्त तहान लागते व तोंडाला कोरड पडणे. तापामध्ये कमी-जास्त पुरळ येणे, रक्त मिश्रीत किंवा काळसर संडास होणे, पोटदुखणे इतर लक्षणे दिसतात. असे आढळून आल्यास आपल्या नजीकच्या आरोग्य संस्थेमध्ये जावून रक्ताची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावी. ही औषधे उपाशीपोटी घेवू नये तसेच मांत्रिक वैद्याचा सल्ला टाळावा. रक्ताच्या तपासणीकरिता शासकिय संस्थेत संपर्क साधावा. डासांची उगमस्थाने नष्ट करावी. निरोपयोगी विहीरीमध्ये गप्पी मासे सोडल्यास नियंत्रण ठेवल्यास प्रभावी साधन आहे, आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा (शनिवार), गावालगत साचलेले पाणी, डबके, नाल्या यामध्ये जळके ऑईल, रॉकेल इत्यादी टाकावे, टायर, नारळाच्या करवंट्या, फुलदाण्या, कुलर यामध्ये पाणी साचू देवू नये. शेवटी किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पांचाळ  यांनी आवाहन केले आहे.

Labels:

उमरगा तालुक्यातील बेळंब येथील सोसायटीची निवडणूक बिनविरोध

मुरूम , दि . १६ :

उमरगा तालुक्यातील बेळंब येथील  विविध कार्यकारी सेवा सहकारी  सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. 

 नवनिर्वाचित  चेअरमन निवड करण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून पी. सी . सुनापे ,विविध कार्यकारी सोसायटी सचिव पंडित राठोड यांच्या उपस्थित निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.

 ही निवडणूक  शिवसेना उपजिल्हा प्रमुख बसवराज वरनाळे याच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवडणूक करण्यात आली.  नवनिर्वाचित  चेअरमन म्हणून विजयकुमार मगी,व्हाईस चेअरमन प्रभाकर भंडारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीचे नवनिर्वाचित सदस्य म्हणून बसवराज वरनाळे, काशिनाथ बोकडे,अनाप्पा शेवाळकर,सुधाकर बाबशेट्टी,वीरभद्र वाडीकर,मल्लिनाथ रामशेट्टी, व्हनप्पा घोडके,पंडित गुरव,अमृत पाटील,श्रीमती कमळाबाई कारभारी,सौ विजयालक्ष्मी येलगुंदे यांचा बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी मावळते चेअरमन श्रीकांत कारभारी,व्हा. चेअरमन धुळप्पा पाटील,गावातील प्रतिष्ठित  नागरिक  कलेश्वर येलगुंदे,सूर्यकांत दूधभाते,शरण बाबुराव पाटील,माजी सरपंच अशोक कांबळे, मौलाली नदाफ,वसंत करके,शब्बीर नदाफ, भानुदास बंदीछोडे,श्रीकांत बाबशेट्टी,राजेंद्र फुलारी,आप्पासाहेब पाटील,सोसायटीचे सेल्समन हणमंत बाबशेट्टी व पदाधिकारी कार्यकरते उपस्थित होते.   या निवडीचे सूत्रसंचालन मारुती बोडरे,तर आभार राजेंद्र कारभारी यांनी मानले

Labels:

जागतिक मास रेसलिंग स्पर्धेकरिता वडगाव (काटी) च्या जयदेव म्हमाणे यांची निवड


काटी , दि . १६: उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील रहिवासी तथा पुणे येथे वास्तव्यास असलेले जागतिक किक बॉक्सिंग पट्टु जयदेव घनश्याम म्हमाणे यांची याकूत,  रशिया येथे 21 ते 27 जुन या कालावधीत होणाऱ्या  मास रेसलिंग वर्ल्ड चॅपियनशिप स्पर्धेसाठी  भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. 


या स्पर्धेत प्रामुख्याने  सहा खेळाडू 1 प्रशिक्षक व 1ऑफिशिअल, अशा  8 जनांची निवड झाली आहे. या मध्ये-७५ किलो गटात आदित्य बुकी. -८० किलो गटात हेमंत वर्मा कुमावत. -९० किलो गटात जयदेव म्हमाणे .-१०५  आब्दूल शेख.हे सहभागी होणार आहेत. आत्ता पर्यंत यांनी  आनेक जिल्ह, राज्य, व राष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळवली आहेत.आंतरराष्ट्रीय खेळाडू जयदेव घनःश्याम म्हमाणे यानी आतापर्यंत 3 वेळा या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे .सध्या पिंपरी चिंचवड ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन मध्ये या स्पर्धेसाठी सराव करीत आहेत. पुर्ण भारतातून 8 जनाचा संघ 19 जून रोजी मुंबई येथून रवाना होणार आहे तर 28 जुन रोजी मायदेशी परतणार आहे.

Labels:

Saturday, 11 June 2022

मनसे नेते बाळा नांदगांवकर यांचा श्री तुळजाभवानी दरबारात सन्मान

तुळजापूर ,दि. ११

 
  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा राज्याचे माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगांवकर यांनी  शनिवार  दि. ११ जून रोजी  तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीचे सहकुटुंब दर्शन घेतले .
    

यावेळी त्यांनी तुळजाभवानी देवीस  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेवर यशस्वी शस्त्रक्रिया होण्यासाठी व त्यांना उदंड व निरोगी दिर्घायुष्य लाभावे  असे साकडे घातले .
  

महाराष्ट्र नवनिर्माण सेना उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, उपजिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी तर तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने नागेश शितोळे यांनी बाळा नांदगांवकर यांचा सपत्नीक सन्मान केला .
   

यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, विनायक महिंद्रकर, जिल्हासंघटक अमर कदम, जिल्हाध्यक्ष आबा ढवळे, राजेंद्र गपाट, बाळासाहेब कोणावळे ,दादा कांबळे, पाशा शेख, अतुल जाधव, निलेश जाधव, मयुर गाढवे, राहुल बचाटे, धनाजी साठे, गणेश पाटील, आकाश पवार, प्रमोद कदम, वेदकुमार पेंदे, धनंजय मडोळे, अजय डांबरे, वैभव स्वामी, रुपेश स्वामी, किरण कांबळे,जयकुमार घोगरे, हेमंत बनसोडे या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते  उपस्थित होते .

Labels:

Friday, 10 June 2022

पुन्हा एकदा नळदुर्ग परिसरात मगर मगर आढळल्याने भितीचे वातावरण

नळदुर्ग , दि. १०

नळदुर्ग शिवारात शुक्रवारी दुपारी पुन्हा एकदा मगरीचे दर्शन झाल्याने शेतकरी व ग्रामस्थात खळबळ उडाली आहे.


मुर्टा  ता.तुळजापूर परिसरात   असलेल्या एका तलावात मगर आढळल्याने परिसरातील शेतकरी  व  नगरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  मुर्टा या शिवारात शुक्रवारी  अशोक जाधव रा. मैलारपूर ता. तुळजापूर  यानी शेतात   नांगर मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी   शेता लगत असलेल्या  तलावाच्या काठावर मगर आल्याचे दिसुन आले.   त्या ठिकाणी तो फिरत  गेला असताना त्याला ती मगर दिसली. ही मगर  अर्धा तासापेक्षा आधिक वेळ तलावाच्या काठावर निवांत पडल्याचे जाधव यानी सांगितले.

Labels:

प्रेषित मोहम्मद पैगंबरांवर आक्षेपार्ह विधान,आंदोलनाचे लोण काटीत; निषेध करीत केली अटकेची मागणी


काटी , दि . १०

 प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल  तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शुक्रवार दि. 10 रोजी    मुस्लिम बांधवानी दुपारची नमाज अदा करुन  येथील बसस्थानकावर एकत्रित येऊन  नुपूर शर्मां व नवीन जिंदालच्या विरोधात घोषणाबाजी करीत, आणि त्यांच्या प्रतिमेला जोडे मारुन  निदर्शने केली. 

या आंदोलनात काटीतील मुफ्ती इर्शाद बागवान, माजी ग्रामपंचायत सदस्य करीम बेग, जुबेर शेख, अहमद पठाण, माजीत इनामदार, अमिर पठाण, हाफीज अखिल इनामदार, नजीब काझी,  हमीद शेख, मौखिक काझी, इलाई कुरेशी, सद्दाम शेख, युसूफ शेख, शरीफ कुरेशी, गफार शेख यांच्यासह
अनेकजण सहभागी झाले होते.      

     
यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी नुपूर शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करा, अशी मागणी आंदोलकांकडून केली गेली. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत, तलाठी प्रशांत गुळवे यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी  मुस्लिम समाजाच्या वतीने   निवेदन देण्यात आले.

Labels:

दिपाली वाघमारेे हिचे बारावी परिक्षेत यश

वागदरी , दि . १० : 

वागदरी ता.तुळजापूर येथील दिपाली राजकुमार वाघमारे  याने इयत्ता १२ वी (वाणिज्य) बोर्ड परिक्षेत ८६ टक्के गुण मिळवून  यश संपादन केले आहे.
  

दिपाली वाघमारे ही आर.पी.काँलेज उस्मानाबाद येते वाणिज्य शाखेत इयत्ता १२ वी मध्ये शिकत होती.मार्च २०२२ मध्ये तिने इयत्ता १२ वी बोर्ड परिक्षा दिली होती. सदर परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्या परिक्षेत दिपाली वाघमारे यांनी ८६ टक्के गुण  मिळवून उत्तीर्ण झाली आहे. या यशाबद्दल रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड सह वागदरी येथील  ग्रामस्थानी त्यांचे आभिनंदन केले आहे.

Labels:

Thursday, 9 June 2022

बापूजींच्या विचारांची नवी पीढी निर्माण होणे काळाची गरज



तुळजापूर,दि.९ 

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक,संस्थापक आणि महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले ज्ञानतपस्वी शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांची १०४ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी मेजर डॉ.डोके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून सर्वप्रथम  अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ डोके यांनी  आपल्या मार्गदर्शनपर भाषणात  म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी स्वत:च्या तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही, त्यांच्या विचारांवर महात्मा गांधींच्या व्यक्तीत्वाचा प्रभाव दिसून येतो,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था नावाचे वटवृक्ष हे त्यागाच्या बिजातुन निर्माण झालेले आहे.

बापूजींनी बहुजन आणि शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना ज्ञानगंगेचे अमृत दिले,जात ,धर्म,पंथ कधीही त्यांच्या विचारांमध्ये डोकावत नाही, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही ते आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहुन या समाजासाठी स्वत:ला समर्पित करतात, भविष्यात असे अनमोल व्यक्तीत्व पुनः होणे नाही, आणि म्हणुनच आज प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या विचारांचा अंगीकार करणे आवश्यक असल्याचे मत शेवटी डॉ डोके यांनी व्यक्त केले.

सदर प्रसंगी प्रा जे बी क्षीरसागर यांनी ही उपस्थितांना बापूजीच्या जीवन व कार्य विषयक मार्गदर्शन केले.कार्यक्रमाप्रसंगी डॉ.
एस. एम.देशमुख,रासेयो प्रमुख प्रा व्ही एच चव्हाण,प्रा.ए.बी.वसेकर, गोवर्धन भोंडे,प्रा.जी.व्ही बाविस्कर, डॉ.सी आर दापके, डॉ.एफ.एम तांबोळी यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ एम.आर.आडे यांनी केले तर आभार प्रा अशपाक आतार यांनी मानले,सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपन्न झाला.

Labels:

Wednesday, 8 June 2022

महिलांनी व्यावसायिक कौशल्य आत्मसात स्वावलंबी बनावे - जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण

नळदुर्ग , दि . ०८

 महिलांनी स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी   स्वतःमधील कलागुणांना वाव देऊन व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्याची गरज आसल्याचे मत असे  जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांनी व्यक्त केले.


तुळजापूर तालुक्यातील  आलियाबाद ग्रामपंचायत आणि राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रकाश चव्हाण हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सरपंच सौ ज्योतीका चव्हाण या होत्या.


शासन महिलांच्या विकासासाठी विविध योजना राबवते. त्याचा फायदा ग्रामीण उद्योजकांनी घेतला पाहिजे आणि अपेक्षित असलेला बदल करून स्वतःचा व्यवसाय वाढवला पाहिजे असे  प्रबोधिनीचे राज्यस्तरीय प्रशिक्षक शिवाजीराव पवार यांनी  सांगितले .
 यावेळी ग्रामपंचायत सदस्य विलास राठोड , पोलीस पाटील शिवाजी चव्हाण,माजी सरपंच सुभाष नाईक, भील्लू राठोड, विश्वास चव्हाण, मनोज पवार,   हॅलो मेडिकलच्या  रिना चव्हाण, बचत गटाच्या सुरेखा चव्हाण, निर्मला राठोड, जयश्री चव्हाण,शांताबाई चव्हाण, रंजना राठोड, सुनीता चव्हाण, रेश्मा चव्हाण,चावळाबाई राठोड, आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील महिला मुली व बचत गटातील महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Labels:

Tuesday, 7 June 2022

एसबीआय फाउंडेशन तर्फे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

     
 नळदुर्ग ,दि.७

एस.बी.आय फाउंडेशन,मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद  यांच्या समन्वयातून ग्रामसेवा कार्यक्रमांतर्गत 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गायरान तांडा येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात फळे, फुले, वनीकरणाची झाडे लावण्यात आली आहे.
      

यावेळी येडोळाचे सरपंच पद्माकर पाटील, उपसरपंच लक्ष्मी जाधव, राजेंद्र जाधव, दिलासाचे प्रकल्प व्यवस्थापक विलास राठोड, भूषण पवार, गुरुदेव राठोड, अमोल पवार, अजित पवार, अविनाश पवार, सचिन पवार, राजकुमार राठोड, विठ्ठल जाधव, उमेश पवार शाळेतील लहान चिमुकली मुले व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Labels:

तुळजापूर तालुक्यातील येवती येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा.

               

 चिवरी , दि . ७

तुळजापूर तालुक्यातील येवती येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दि,६ जुन रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा   शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत गायन करून अभिवादन करण्यात आले, यावेळी सरपंच सौ. पूजा अमोल गवळी, उपसरपंच प्रीतम गायकवाड, तुळजापूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष समाधान ढोले, ग्रामपंचायत सदस्य राम शिंदे, यशवंत बडूरे, गोरख तांबे, काका शिंदे, भगवान बडूरे, समाधान कुंभार, लक्ष्मण शिंदे, बाळासाहेब शिंदे, विक्रम गवळी, अशोक गायकवाड, किरण शिंदे, सोनू तांबे, संकेत हजारे ,शुभम ढोले, आदीसह ग्रामस्थ शिवप्रेमी उपस्थित होत.

Labels:

काटी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ उत्साहात साजरा


काटी , दि . ७ 

तुळजापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायत कार्यालयात  श्रीमंतराजे छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जुन हा राज्यभिषेक दिन हा  “शिवस्वराज्य दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण  करुनअभिवादन करण्यात आले.
    

 यंदा प्रथमच राज्य शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायत समोर भगवी जरीचा पताका असलेला भगवा स्वराज्यध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन,जगदंब तलवार, शिवमुद्रा,वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत केलेली स्वराज्यगुढी उभा करून जय भवानी, जय शिवाजी या जयघोषात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
        

यावेळी सरपंच आदेश कोळी, प्रदीप साळुंके, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, तलाठी प्रशांत गुळवे, सुजित हंगरगेकर, मकरंद देशमुख, अनिल गुंड, अशोक जाधव, जितेंद्र गुंड, सतिश देशमुख, अनिल बनसोडे, संजय महापुरे, रामेश्वर लाडुळकर, अतुल सराफ, प्रकाश गाटे,श्रावण वाघमारे, संजय साळुंके, रामदास देवकर,  प्रशांत सुरवसे, दत्ता छबिले, अनिल गोविंद बनसोडे,  सुहास शिंदे आदीसह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

काटी ग्रामपंचायतचे वार्डनिहाय आरक्षण जाहीर


काटी , दि . ७ : उमाजी गायकवाड

 काटी ता. तुळजापूर येथिल  ग्रामपंचायतीचा  कार्यकाल येत्या ऑक्टोबर महिन्यात संपणार असून पुढील निवडणुकीसाठी सोमवार दि. 6 जून रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत वार्डनिहाय आरक्षण जाहीर झाले. 


 काटी ग्रामपंचायतमध्ये  एकूण 15 सदस्य संख्या असुन 5 हजार 347 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विविध निवडणुकीत या गावाने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयात  झालेल्या आरक्षण सोडतीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून महसूल विभागातर्फे मंडळ अधिकारी ए.आर. यादव व  सहाय्यक म्हणुन  तलाठी प्रशांत गुळवे,  ग्रामसेविक लक्ष्मीकांत सुरवसे हे होते. 
      

 काटी येथे वार्डरचनेत व सदस्य संख्येमध्ये कुठलाही बदल झालेला नसून यापूर्वीही पाच वार्ड आणि एकूण सदस्य संख्या 15 होती ती तशीच राहिली आहे.  एकूण 5,347 मतदार असून, वार्ड 1 मध्ये  आरक्षण सर्वसाधारण महिला 1 सर्वसाधारण 2, वार्ड 2 मध्ये एससी महीला 1, सर्वसाधारण महिला 1, सर्वसाधारण  1, वार्ड 3 मध्ये सर्वसाधारण स्त्री 2, सर्वसाधारण 1, वार्ड 4 मध्ये एससी महिला 1, सर्वसाधारण महिला 1, सर्वसाधारण 1,आणि वार्ड 5 मध्ये सर्वसाधारण महिला 1, एससी महिला 1, सर्वसाधारण 1,असे आरक्षण जाहीर झाले असून मंगळवारी यावर कोणाचा आक्षेप असेल तर आक्षेप नोंदवला जाऊ शकतो.       

      
आरक्षण सोडत प्रसंगी  सरपंच आदेश कोळी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, मंडळ अधिकारी ए.आर. यादव, तलाठी, प्रशांत गुळवे, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, प्रदीप साळुंके,माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, सुजित हंगरगेकर,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, अनिल गुंड, अतुल सराफ, करीम बेग, ग्रा.प. मकरंद देशमुख, बाळासाहेब भाले, जितेंद्र गुंड,  सदस्य अनिल बनसोडे, संजय महापुरे, सतिश देशमुख, रामेश्वर लाडुळकर, शिवसेनेचे सयाजीराव देशमुख,अहमद पठाण, अविनाश देशमुख, सिकंदर कुरेशी,यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Labels:

रसायनशास्त्र विभागाच्या वतीने व्हॅल्यू अड्डेड कोर्सेचे प्रमाणपत्र वितरण

 मुरूम, दि. ७  :

 येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने व्हॅल्यू अड्डेड कोर्सेच्या प्रमाणपत्राचे वितरण मंगळवारी (ता.७) रोजी करण्यात आले. 


रसायनशास्त्र विभागाकडून बीएस्सी तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी कॉम्पुटर अँप्लिकेशन्स इन केमिट्री हा कोर्स चालविला जातो. यंदाच्या शैक्षणिक वर्षात या कोर्से साठी २० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १९ विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या कोर्से पूर्ण केला. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यकारिणी सदस्य प्रा. किरण सगर,  आदर्श महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शौकत पटेल यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. राजकुमार रोहीकर, डॉ. महेश मोटे, डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ. रवि आळंगे  आदींची उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्रा. किरण सगर यांचा प्राचार्य अशोक सपाटे यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. 


या कोर्सेचे संयोजक म्हणून डॉ. सुशील मठपती यांनी संयोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन राजमाने यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. सुजित मठकरी यांनी मानले.

Labels:

Monday, 6 June 2022

अन्न सुरक्षा प्रत्येकाचा अधिकार (जागतिक अन्न सुरक्षा दिन विशेष - ७ जून २०२२)


अन्न सुरक्षा प्रत्येकाचा अधिकार
(जागतिक अन्न सुरक्षा दिन विशेष - ७ जून २०२२)


अन्न सुरक्षा हे आरोग्याचे प्रमुख निर्धारक आहे. त्याचा परिणाम व्यक्ती आणि अखेरीस समाजाच्या जगण्यावर, कल्याणावर, उपजीविकेवर आणि उत्पादकतेवर होतो. पुरेशा प्रमाणात सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळणे ही जीवन टिकवून ठेवण्यासाठी आणि चांगले आरोग्य वाढवण्याची गुरुकिल्ली आहे. 


उत्पादन ते कापणी, प्रक्रिया, साठवणूक, वितरण, तयारी आणि वापरापर्यंत अर्थात अन्न साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर अन्न सुरक्षित राहावे याची खातरजमा करण्यात अन्न सुरक्षेची महत्त्वाची भूमिका आहे. हानिकारक जीवाणू, विषाणू, परजीवी किंवा रासायनिक पदार्थ असलेल्या असुरक्षित अन्नामुळे अतिसारापासून कर्करोगापर्यंत २०० हून अधिक रोग होतात. हे रोग आणि कुपोषणाचे दुष्टचक्र देखील तयार करते, विशेषत: लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना प्रभावित करते. दूषित अन्न आणि पाण्याच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे जागतिक लक्ष वेधण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने ७ जून रोजी “जागतिक अन्न सुरक्षा दिवस” हा विशेष दिवस घोषित केला आहे. २०२२ या वर्षीची थीम 'सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य' ही आहे.


जगातील अविकसित देशांप्रमाणे भारतातही अशा लोकांची संख्या मोठी आहे ज्यांना जगण्यासाठी पुरेसे अन्न मिळत नाही. एवढेच नाही तर त्यांना मिळणाऱ्या अन्नातही पोषक तत्वांचा अभाव असतो. अन्नाची ही समस्या देशाच्या मोठ्या लोकसंख्येच्या गंभीर संकटाचे कारण बनलेली आहे. आजही लहान मुलांपासून वयोवृद्ध पर्यंत लोक भुकेने जीव गमावतांना आढळतात, अशी बातमी नेहमीच येत असते. अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) अहवालानुसार, भारतातील सुमारे १४.८ टक्के लोकसंख्या कुपोषित आहे. प्यू रिसर्च सेंटरने अहवाल दिला होता की, गेल्या एका वर्षात भारतात दिवसाला १५० रुपये (खरेदी शक्तीवर आधारित उत्पन्न) मिळवू न शकणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढली आहे. वर्षभरात अशा लोकांच्या संख्येत सहा कोटींनी वाढ झाली असून त्यामुळे गरिबांची एकूण संख्या आता १३.४ कोटींवर पोहोचली आहे. १९७४ नंतर प्रथमच देशातील गरिबांची संख्या तर वाढलीच पण ४५ वर्षांनंतर भारत पुन्हा मोठ्या प्रमाणात दारिद्र्य असलेला देश बनला आहे. नीति आयोगाने अलीकडेच बहु-आयामी गरीबी निर्देशांक (एमपीआई) जारी केला ज्यामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक चार भारतीयांपैकी एक बहुआयामी गरीब आहे.


जागतिक स्वास्थ संगठन च्या मते, अन्न सुरक्षा, पोषण आणि अन्न बचाव यांचा अतूट संबंध आहे. अंदाजे ६०० दशलक्ष अर्थात जगातील १० पैकी जवळजवळ १ माणूस दूषित अन्न खाल्ल्यानंतर आजारी होवून ४,२०,००० लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात, परिणामी ३३ दशलक्ष निरोगी जीवन वर्षे गमावतात. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये असुरक्षित अन्नामुळे उत्पादकता आणि वैद्यकीय खर्चामध्ये दरवर्षी ११० अब्ज गमावले जातात. ५ वर्षांखालील मुलांना अन्नजन्य रोगाचा ४०% भार सहन करावा लागतो, त्यामुळे दरवर्षी १,२५,००० मुलांचे जीव दगावतात. अन्नजन्य रोग आरोग्य सेवा प्रणालींवर ताण आणून आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्था, पर्यटन आणि व्यापाराला हानी पोहोचवून सामाजिक-आर्थिक विकासात अडथळा आणतात.



११६ देशांमधील ग्लोबल हंगर इंडेक्स २०२१ मध्ये, भारत २०२० च्या ९४ व्या स्थानावरून आता १०१ व्या स्थानावर घसरला आहे. भारत बहुतेक शेजारी देशांच्या मागे आहे. पाकिस्तान ९२, नेपाळ ७७, बांगलादेश ७६ आणि श्रीलंका ६५ व्या क्रमांकावर आहे. निर्देशांकानुसार, भारतापेक्षा फक्त १५ देश वाईट स्थितीत आहेत. २०१४ च्या क्रमवारीत भारत ५५ व्या स्थानावर होता. द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड २०१९ नुसार, अनेक दशकांच्या सतत घसरणीनंतर, २०१५ पासून जागतिक उपासमारी हळूहळू वाढत आहे. २०१८ मध्ये जगातील अंदाजे ८२१ दशलक्ष लोक उपासमारीने ग्रस्त होते. ऑक्सफॅम या गरिबी निर्मूलनासाठी काम करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे की, जगभरात भुकेने दर मिनिटाला ११ लोकांचा मृत्यू होतो. गेल्या एका वर्षात संपूर्ण जगात दुष्काळासारख्या परिस्थितीचा सामना करणाऱ्यांची संख्या सहा पटीने वाढली आहे. अहवालात म्हटले आहे की जगातील सुमारे १५५ दशलक्ष लोक अन्न असुरक्षिततेच्या तीव्र संकटाचा सामना करत आहेत आणि हा आकडा मागील वर्षाच्या आकडेवारीपेक्षा २० दशलक्ष अधिक आहे.


संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम च्या अन्न कचरा निर्देशांक अहवाल २०२१ प्रमाणे भारतात, घरगुती अन्न कचऱ्याचा अंदाज दरवर्षी ५० किलो आहे, किंवा देशभरातील वर्षाला एकूण ६८,७६०,१६३ टन इतका आहे. यूएनईपी च्या अहवालानुसार, २०१९ मध्ये अंदाजे ९३१ दशलक्ष टन अन्न वाया गेले. अहवालात नमूद केले आहे की, २०१९ मध्ये, ६९० दशलक्षाहून अधिक लोक उपासमारीने प्रभावित झाले. आपल्याकडे आणखी एक चिंताजनक गोष्ट आहे म्हणजे देश कमकुवत कोल्ड चेन पायाभूत सुविधेचा अभावामुळे आपल्या शेतातील उत्पादनाचा महत्त्वपूर्ण भाग दरवर्षी १६% फळे आणि भाज्या (शीतगृह सुविधा अभावी) वाया घालवतो. भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) गोदामांमध्ये दरवर्षी धान्याचे डोंगर सडत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ३८,००० मेट्रिक टन पेक्षा जास्त अन्नधान्याचे नुकसान झाल्याचे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने उघड केले आहे. भारताने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये आतापर्यंत ६१०.२२ अब्ज डॉलर किमतीच्या वस्तूंची आयात केली, जी त्याच्या मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ५४.७१ टक्क्यांनी वाढली आहे. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाच्या अहवालात सांगितले की सर्व अकाली मृत्यूंपैकी ८० टक्के मृत्यू दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतात. भारतातील अन्न भेसळ हे शेतातूनच सुरू होते जिथे खते आणि कीटकनाशकांचा अतिवापर होतो.


आज इतक्या मोठ्या प्रमाणावर गरिबी, महागाई, बेरोजगारी, आर्थिक असमानता वाढली असतांना प्रत्येक माणसाला पोषक आहार घेणे कितपत शक्य आहे, अन्न सुरक्षा तर दूर पण गरिबांना शुद्ध प्राणवायू किंवा शुद्ध पाणी सुध्दा मिळत नाही. मोठ्या कष्टाने दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था करण्यात गरिबांचे जीवन संपून जाते, तर पोषक तत्वाने भरपूर अन्न कुठून कमविणार. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक पोषक तत्वांची गरज असते, त्यांच्या कमतरतेमुळे आपण अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडू शकतो. कार्बोहायड्रेट, प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे हे पोषक घटक आहेत ज्यांची शरीराला सर्वात जास्त गरज असते.



अन्न सुरक्षेमुळे मानवांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होते. देशाचा विकासासाठी नागरिकांचे अन्न सुरक्षेसंबंधी नियोजन व अंमलबजावणी योग्यरीत्या हाताळणे खूप गरजेचे आहे. अन्न सुरक्षेचा दुष्परिणाम समाजाचा प्रत्येक घटकांवर होतो, समाजात असमतोलपणा वाढतो, कुपोषण, दारिद्र्यता, उपासमार, आजार, मुत्यूदर वाढतात. ह्या समस्या इतर समस्यांना जन्म देतात. देशाचा विकासात मोठा अडथळा निर्माण होतो, आर्थिक ताण वाढतो, मानवी जीवनाचा ह्रास होतो. देशाचा प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाने अन्न सुरक्षेच्या गॅरंटी सह युद्धस्तरावर कार्य करणे गरजेचे आहे. कुपोषण, गरिबी, महागाई, बेरोजगारी, आर्थिक असमानता, उपासमार, अन्नाची नासाडी सारख्या समस्यांवर नियंत्रण करणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्काचे पोषण आहार मिळू शकेल, त्यामुळे सर्वांना जीवनात विकासाचा संधी मिळतील, आयुष्यमान वाढेल, रोगराई कमी होईल, आजारावरील खर्च कमी होईल, आयात कमी होवून निर्यात वाढेल, देश आत्मनिर्भर होईल, देशाचे उत्पन्न वाढेल आणि देशाच्या सुखी समृद्धि होण्यास हातभार लागेल.

लेखक
डॉ. प्रितम भि. गेडाम
prit00786@gmail.com

Labels:

Saturday, 4 June 2022

वागदरी येथे सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा संपन्न


वागदरी , दि. ०४ एस.के. गायकवाड:


मल्लिकार्जुन गुरव समाज मंडळाच्या वतीने वागदरी ता.तुळजापूर येथे सामुदायिक  उपनयन संस्कार सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
  

वाढत्या महागाईच्या काळात ग्रामीण भागात वैयक्तिक पातळीवर एखाद्या  कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे मोठी आर्थिक ओढाताण करावी लागते.वाढत्या महागाईवर पर्याय म्हणून वागदरी ता.तुळजापूर येथील मल्लिकार्जुन गुरव समाज मंडळाच्या वतीने काळाची गरज ओळखून व समाजातील ऋणानूबंध वाढून सर्वांना वैदिक धर्माची जाणीव व्हावी, या उदात्त हेतूने वागदरी येथील जून्या हेमाडपंथी मल्लिकार्जुन महादेव मंदिरात सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.


  याप्रसंगी २४ मुलांवर उपनयन संस्कार (बटू) करण्यात आले. यानिमित्ताने होमहवनासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटी महप्रसादाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.
  

यावेळी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, ग्रा.प.सदस्य महादेव बिराजदार,बळीराम बिराजदार,प्रा.डॉ. गणेश बिराजदार,पोलीस पाटील बाबुराव बिरादार,बालाजी बिराजदार,कृषी परिवेक्षक धन्यकुमार बिराजदार,रामचंद्र बिराजदार,जितेंद्र बिराजदार(पाटील),राजेंद्र बिराजदारसह महिला,ग्रामस्थ  उपस्थित होते.

Labels:

शेतीपंपाच्या दुरुस्तीसाठीचे साहित्य वीज वितरण कंपनीकडून मिळावे - आमदार संवाद मंचाची मागणी


तुळजापूर , दि . ०४ 

 ग्रामीण भागात शेतीपंपासाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक दुरुस्तीसाठी लागणारे विविध साहित्य वीज वितरण कंपनीकडून मिळाले पाहिजे, याचा खर्च शेतकऱ्यांना  करण्यास भाग पाडू नये अशी मागणी आमदार संवाद मंच तुळजापूर  यांच्या वतीने करण्यात आली आहे.


आमदार संवाद मंच तुळजापूर यांच्यावतीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुळजापूर येथील उपकार्यकारी अधिकारी एस. व्ही. घोदे यांना वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या कामामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे आमदार संवाद मंच शिष्टमंडळाने या प्रश्नाच्या अनुषंगाने निवेदन दिले आहे. या प्रश्नावर सदस्य बबनराव जाधव यांनी विविध उदाहरणे देऊन शेतकऱ्यावर होणारा अन्याय अधिकाऱ्यांसोबत मांडला तेव्हा अधिकाऱ्यांनी या बाबी वास्तव्य असल्याची कबुली दिली आहे.

वीज ग्राहकांना चुकीचे बिल तात्काळ दुरुस्त करून मिळावे आणि तुळजापूर कार्यालयात रिक्त असणार्‍या पदावरील अभियंत्यांची भरती करण्यात यावी, या दोन मागण्या देखील या निवेदनात केलेल्या आहेत. वीज वितरण कंपनीच्या कामांमध्ये लाईनमन हा महत्त्वाचा घटक असताना लाईनमन यांची नियुक्तीच्या जागेवर दिलेले नाही त्यामुळे ग्राहकांना मोठा त्रास होतो आहे,या सर्व लाईनमन कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुत्तीच्या जागी राहण्यासाठी आदेश काढण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली . 

याशिवाय कंत्राटी लाईनमन तुळजापूर तालुक्यात शहरी आणि ग्रामीण भागात कार्यरत आहेत. त्यांच्याकडून ग्राहकांना पैसे मागण्याचे प्रकार समोर आले आहेत . ग्राहकांनी पैसे न दिल्यास हे लाईनमन आपण रजेवर असल्याचे कारण सांगतात . या प्रकारामुळे वीज वितरण कंपनीची बदनामी जनतेमध्ये होत आहे. लोकांना याचा त्रास होतो आहे.  याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. असा मुद्दा उपस्थित करून तात्काळ आपल्या कामामध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

तुळजापूर तालुक्यात कार्यरत असणारे लाईनमन आणि कंत्राटी लाईनमन यांची स्वतंत्र यादी गाव आणि नियुक्ती स्थानासह कार्यालयात प्रसिद्ध करावी,  जेणेकरून यामधील वास्तव जनतेसमोर येईल, त्याची प्रत आमदार संवाद मंचाला द्यावी असे निवेदनात म्हटले आहे. या सूचनांचे १५  दिवसात निराकरण न केल्यास आमदार संवाद मंच रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. 

आमदार संवाद मंचाचे अध्यक्ष डॉ. सतीश महामुनी, सदस्य व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्याम पवार,  सदस्य व माजी मंत्री मधुकराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक बबनराव जाधव, संपर्क संस्थेचे जिल्हा समन्वयक अनिल आगलावे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे यांच्यासह इतर सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

Labels: