Tuesday, 3 November 2026

अतिक्रमणांमुळे नळदुर्गकरांचा जीव टांगणीला; सकल हिंदू समाजाचे आज नगरपरिषदेसमोर उपोषण

अतिक्रमणांमुळे नळदुर्गकरांचा जीव टांगणीला; सकल हिंदू समाजाचे आज नगरपरिषदेसमोर उपोषण!
पाच महिन्यांपासून निवेदने देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष


नळदुर्ग ,दि.३ नोव्हेंबर :

 शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि बेशिस्त वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्यांना दररोज त्रास सहन करावा लागत असतानाही नगरपरिषद प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून तक्रारी, निवेदने देऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने सकल हिंदू समाजाच्या वतीने आज, मंगळवार (दि. ३) रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर शांततामय उपोषण करण्यात येणार आहे.

शहरातील अक्कलकोट रोड, बसस्थानकासमोरील परिसर आणि शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. मच्छी विक्रेते, फळ विक्रेते, हातगाड्या,  वाहने तसेच व्यापाऱ्यांचे रस्त्यावरील साहित्य यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच झाला आहे.

या कोंडीमुळे एसटी बस, रुग्णवाहिका आणि शालेय वाहनांनाही मार्ग काढताना अडचणी येतात. पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून जावे लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल हिंदू समाजाने २८ ऑक्टोंबर रोजी पोलीस ठाणे व नगरपरिषद प्रशासनासह संबंधिताना निवेदन दिले होते. 

अद्याप अतिक्रमण हटविण्याबाबत ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने पोलीस ठाण्यासमोरील नियोजित उपोषण रद्द करून आंदोलनाचे ठिकाण बदलण्यात आले आहे. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे.

अतिक्रमणे तातडीने हटवावीत, रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करावेत, बेकायदेशीर वाहनतळावर दंडात्मक कारवाई करावी तसेच बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू करून किमान दोन पोलीस कर्मचारी नियुक्त करावेत, अशा प्रमुख मागण्या सकल हिंदू समाजाने केल्या आहेत.


Labels:

Sunday, 1 November 2026

नोकरी मागणारे नव्हे, नोकरी देणारे बना- माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे तरुणांना आवाहन


नोकरी मागणारे नव्हे, नोकरी देणारे बना!
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे तरुणांना आवाहन; नळदुर्गमध्ये महावीर टिश्यू फॅक्टरी व कासार कन्स्ट्रक्शनचे उद्घाटन

नळदुर्ग, दि. १  सप्टेंबर : 

व्यवसायाच्या माध्यमातून केवळ आर्थिक प्रगतीच साधता येत नाही, तर बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणता येतो. त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय उभारून इतरांना रोजगार देण्याचा विचार करावा. उद्योग-व्यवसायात गुंतवणूक करून स्वावलंबी बनावे, असे आवाहन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
नळदुर्ग येथे महावीर टिश्यू फॅक्टरी व कासार कन्स्ट्रक्शन या व्यवसायांचा उद्घाटन सोहळा रविवारी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि दृष्टि उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी नळदुर्ग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बसवराज धरणे, उपनगराध्यक्ष नय्यर जहागिरदार , ज्येष्ठ नागरिक शिवाजीराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अशोक जगदाळे म्हणाले की, माजी नगराध्यक्ष नितीन कासार यांचे सुपुत्र सोहम कासार यांनी परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्याचा उपयोग ग्रामीण भागाच्या विकासासाठी करण्याच्या उद्देशाने टिश्यू पेपर निर्मितीचा कारखाना सुरू केला, ही कौतुकास्पद बाब आहे. नोकरी करणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे बनण्याचा त्यांचा दृष्टिकोन तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. आत्मविश्वास आणि उद्योजकतेच्या बळावर सोहम कासार भविष्यात यशाची नवी शिखरे गाठतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास प्रवीण कासार, सचिन कासार,
 सुभद्राताई मुळे, झिमाबाई राठोड, नगरसेवक तानाजी जाधव, मारुती खारवे, इमाम शेख, मुश्ताक कुरेशी, शफीभाई शेख, पिंटू मोरे, आकाश कुलकर्णी, इम्रान काझी, सुधीर पोतदार, स्वप्नील काळे, धिमाजी घुगे, सुधीर हजारे, बलदेव ठाकूर, अजहर जहागिरदार, गोपाळ देशपांडे,शरद बागल, अमृत पुदाले, सरदार ठाकूर, संतोष पुदाले, सुशांत भूमकर, किशोर नळदुर्गकर, दीपक काशीद, रमेश जाधव, पत्रकार विलास येडगे, प्रा. दीपक जगदाळे, सुहास येडगे, लतीफ शेख, भगवंत सुरवसे, अयुब शेख, अजित चव्हाण, उत्तम बनजगोळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी केले, तर सोहम कासार यांनी आभार मानले.

Labels:

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची पोहरादेवीला भेट; बंजारा विरासत संग्रहालयाची पाहणी; समाजाचा गौरवशाली इतिहास आणि सांस्कृतिक वारशाची घेतली माहिती

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची पोहरादेवीला भेट; बंजारा विरासत संग्रहालयाची पाहणी; समाजाचा गौरवशाली इतिहास आणि सांस्कृतिक वारशाची घेतली माहिती

पोहरादेवी, दि. १ सप्टेंबर : 

भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी रविवारी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे भेट देऊन बंजारा विरासत संग्रहालयाची पाहणी केली. यावेळी त्यांचे स्वागत राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.
यावेळी त्यांनी बंजारा समाजाचा समृद्ध इतिहास, सांस्कृतिक परंपरा आणि ऐतिहासिक वारशाची माहिती जाणून घेतल्याची माहिती बंजारा विरासतचे तथा मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड चे समर्थक सचिन राठोड यांनी दिली.

संग्रहालयातील बंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास, तांडा संस्कृती, लोककला, पारंपरिक वेशभूषा तसेच संत-महापुरुषांचे योगदान दर्शविणाऱ्या विविध दालनांची त्यांनी पाहणी केली. आधुनिक डिजिटल माध्यमातून सादर केलेली ऐतिहासिक माहिती, पारंपरिक वस्तू आणि सांस्कृतिक ठेव्याची आकर्षक मांडणी यांचीही त्यांनी माहिती घेतली.
बंजारा समाजाची समृद्ध परंपरा, संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जतन करून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने संग्रहालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.

या भेटीप्रसंगी न्यायमूर्ती अनिल किशोर, न्यायमूर्ती जोशी, न्यायाधीश प्रवीण पाटील, न्यायाधीश राज वाकोडे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, यवतमाळचे प्रधान जिल्हा न्यायाधीश आनंद यावलकर, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. जयंत जायभावे, उपाध्यक्ष ॲड. रंजना मोतले, ॲड. आशिष देशमुख, सौ. मोहिनीताई नाईक, ॲड. भारत जाधव, ॲड. दामिनी राठोड यांच्यासह पोहरादेवी येथील महंत आणि वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Labels: