Saturday, 31 May 2014

सोमवारपासून 'खास महिलांसाठी' प्राणायाम योग साधना शिबीर

उस्‍मानाबाद :- येथील पतंजली योग समितीच्‍यावतीने यंदा प्रथमच 'खास महिलांसाठी' प्राणायाम योग साधना शिबीराचे आयोजन दि. 2 ते 8 जून या कालावधीत पहाटे पाच ते साडे सहा यावेळेत शहरातील अभिनव इंग्लिश स्‍कूल, भानू नगर येथे आयोजित करण्‍यात आले आहे.
    योग ऋषी स्‍वामी रामदेव महाराज यांच्‍या प्राणायाम योग साधनेमुळे लाखो लोक रोगमुक्‍त जीवन जगत आहेत. प्राणायाम व योगाची गरज सर्वात जास्‍त महिलांना आहे. मात्र कौटुंबिक जबाबदारी, मुलांची शाळा, यामुळे महिला स्‍वतःसाठी वेळे देऊ शकत नाहीत. त्‍यामुळे उन्‍हाळ्याच्‍या सुट्टीत 'खास महिलांसाठी' प्राणायाम योग साधना शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे. या शिबीरात महिला मार्गदर्शकांच्‍यावतीनेच प्राणायाम व योग साधना शिबीर घेण्‍यात येणार आहे.
प्राणायाम योग साधना शिबीरासाठी महिला केंद्रीय तथा राज्‍य प्रभारी सुधाताई अळ्ळीमोरे, महामंत्री छायाताई पवार, शारदाताई ढेरे, सरलाताई उपाध्‍याय या उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शिबीर यशस्‍वी करण्‍यासाठी महिला पतंजली योग समितीच्‍या जिल्‍हा प्रभारी उषाताई राठोड, सविता मगर, साधना तावडे, वैजयंती दंडनाईक, सुशिला गिलबिले, उल्‍का पवार, उल्‍का मायभाटे, अमरजा सस्‍ते, चित्रा कामढणकर विशेष प्रयत्‍न करीत आहेत.   
उस्‍मानाबाद येथील पतंजली योग समितीच्‍यावतीने आयोजित 'खास महिलांसाठी' प्राणयाम योग साधना शिबीराला शहरासह परिसरातील जास्‍तीत जास्‍त महिलांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन पतंजली योग समिती संचलित किसान पंचायतीचे राज्‍य प्रभारी नितीन तावडे, पतंजली योग समितीचे जिल्‍हा प्रभारी एस.आर. पाटील, भारत स्‍वाभिमान न्‍यासचे जिल्‍हा संयोजक रणजित दुरुगकर यांनी केले आहे.

Labels:

क्रीडा संघटनाचे अध्यक्ष-सचिवांची 4 जून रोजी बैठक

उस्मानाबाद -: जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाकरिता तसेच जिल्ह्यातील खेळाडूचा दर्जा सुधारणे, शालेय-ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धेमधील खेळांडूचा सहभाग वाढविणे याकरिता आवश्यक उपायोजना करण्यासाठी सर्व क्रीडा संघटनाचे अध्यक्ष / सचिव यांची बैठक 4 जून,2014 रोजी सकाळी 11 वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
     तरी या बैठकीस जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटनाच्या अध्यक्ष/सचिवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजीव कुलकर्णी यांनी केले आहे.      

Labels:

परंडा येथे ब्युटी पार्लर प्रशिक्षण

उस्मानाबाद -: जिल्हा उद्योग केंद्र,उस्मानाबाद पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित विशेष घटक योजनेतील सुशिक्षीत बेरोजगार युवती व महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण दिनांक 9 जून ते 8 जुलै या कालावधीत परंडा येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संपूर्ण ब्युटी पार्लर व उद्योजकीय अभ्यासक्रम या विषयी दररोज 12 ते 5 या वेळेत तज्ञ मार्गदर्शक व अधिकारी यांच्याद्वारे माहिती दिली जाणार आहे.
    तरी इच्छूक युवती व महिलांनी प्रवेश अर्ज भरणेसाठी व अधिक माहितीसाठी 8 जून,2014 पर्यंत संपर्क साधावा. तसेच 7 जून रोजी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अधिक माहिती व अर्जासाठी कार्यक्रम समन्वयक विजय काटवटे प्रणिती कॉम्प्युटर सेंटर, परंडा भ्रमणध्वनी क्र. 9423343246 यांच्याशी संपर्क साधावा,असे एम.सी.ई.डी चे कनिष्ठ प्रकल्प अधिकारी व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे.                                        

Labels:

येडशी येथे पशुपालन व दुग्धव्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण

उस्मानाबाद  -:  जिल्हा उद्योग केंद्र,उस्मानाबाद पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित सर्वसाधारण घटक योजनेतील सुशिक्षीत बेरोजगार युवक व युवतींसाठी मोफत पशुपालन व दुग्धव्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण दि.10 जून ते 9 जून,2014 या कालावधीत  येडशी ता.जि.उस्मानाबाद येथे आयोजित केला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संपूर्ण पशुपालन व दुग्धव्यवसाय व्यवस्थापन तसेच उद्योजकीय अभ्यासक्रम या विषयी दररोज 12 ते 5 या वेळेत तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शक व वैद्यकीय अधिकारी यांच्याद्वारे माहिती दिली जाणार आहे.
        तरी इच्छूक युवक व युवतींनी प्रवेश अर्ज भरणेसाठी व अधिक माहितीसाठी 8 जून,2014 पर्यंत संपर्क साधावा. तसेच 9 जून रोजी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अधिक माहिती व अर्जासाठी कार्यक्रम समन्वयक श्री.सस्ते महादेव  ग्रामपंचायत, येडशी भ्रमणध्वनी क्र. 8275272895/9420201195 यांच्याशी संपर्क साधावा,असे एम.सी.ई.डी चे कनिष्ठ प्रकल्प अधिकारी व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे                      

Labels:

डी.टी.एड प्रवेशपत्रिका वेळापत्रक जाहीर

उस्मानाबाद :- सन 2014-15 साठी संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे-30 यांच्या डी.टी.एड प्रवेशपत्रिका वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 
          पत्रद्वारा प्रशिक्षण (डी.टी.एड.) आवेदन पत्र व माहिती पुस्तिकाची विक्री, उमेदवारांनी भरलेले आवेदन पत्र शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे आवश्यक कागदपत्रासह सांक्षाकित प्रतिसह 5 जून पर्यंत (कार्यालयीन वेळेत व सार्वजनिक सुट्टी सोडून) सादर करणे.
    तरी जिल्ह्यातील विजाभजच्या आश्रमशाळेतील अप्रशिक्षित शिक्षकांनी ज्यांची नियुक्ती दिनांक 17 सप्टेंबर,2001 पूर्वी असून ते 17 सप्टेंबर,2011 रोजी रुजू झालेले आहेत. संबंधित अप्रशिक्षित शिक्षकांनी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) यांच्याशी संपर्क साधावा. आवेदन पत्र रुपये 200/- प्रमाणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे विक्रीस ठेवण्यात आलेले आहे, असे आवाहन लातूर येथील प्रादेशिक उपायुक्त (समाजकल्याण) माधवराव वैद्य यांनी केले आहे.

Labels:

महाराणा प्रताप यांना अभिवादन

उस्मानाबाद :- महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांना अभिवादन करण्यात आले. महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, तहसीलदार श्रीमती मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.

Labels:

पोलीसांवर गुन्हे दाखल करण्याचे आर.आर.पाटील यांचे आदेश

उस्मानाबाद : राज्यात अवैध दारू व अवैध धंद्याच्या तक्रारी कमी आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र या तक्रारी वाढलेल्या दिसतात. हे अवैध धंदे व दारू बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागांना संयुक्त मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिक पातळीवर त्यांनी कारवाई न केल्यास बाहेरच्या जिल्ह्यातील पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
    कनगरा येथे आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना विविध प्रश्न विचारले असता ते म्हणाले, कनगरा प्रकरणात वरिष्ठांनी गंभीर चुका केल्या आहेत. म्हणूनच त्यांच्यावर कारवाई होईल. यातून पोलिसांना एक संदेश जाईल व अधिकार, कायदे यामध्ये निरपराधांना मारणे बसत नाही हे लक्षात येईल. पोलिस स्टेशनला माहिती देऊनही कारवाई होत नाही हे चुकीचेच आहे. मात्र त्यासोबतच जनतेलाही पोलिसांवर हल्ला करण्याचा अधिकार नाही. राज्यात अवैध दारूच्या तक्रारी फार कमी आहेत. या जिल्ह्यात अवैध दारूमुळे हा गंभिर प्रकार घडला. जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी संयुक्तपणे एक मोहिम राबवून हे अवैध दारू धंदे व इतर धंदे बंद करावेत अशा सुचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही या अवैध धंद्यासंदर्भात पुढे येऊन तक्रार करायला हवी. स्थानिक पोलिसांकडून अवैध धंदेवाल्यांवर कारवाई न झाल्यास गृहविभागाकडे तक्रार करा. बाहेरच्या पोलिसांमार्फत त्या अवैध धंद्याविरूद्ध कारवाई केली जाईल आणि त्यानंतर मात्र जेथे कारवाई केली तो भाग ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहेत त्या ठाण्याच्या प्रमुखाला कठोर शासन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
    गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्‍यांच्या केलेल्या हत्येसंदर्भात गृहमंत्री म्हणाले, गडचिरोली नक्षलवाद्यांविरूद्ध एक लढाई सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने केलेल्या कारवाईत अनेक नक्षलवादी मारले गेले. त्यांचेच नक्षली प्रयत्न हाणून पाडले गेले. त्या वैफल्यातुन नक्षलवादी हल्ले करत आहेत. परंतू त्यांच्या विरूद्ध शासनाने एक ऑपरेशन सुरू केले आहे. त्यामुळेच नक्षलवाद आटोक्यात आला आहे. गडचिरोलीत झालेल्या या प्रयत्नाचे मॉडेल म्हणून देशपातळीवर कौतुक होत आहे ते म्हणाले.
    गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज कनगरा भेटीत पोलिस महा-निरिक्षकांना वरिष्ठापासून कनिष्ठापर्यंत मारहाण करणा-या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी घराची दारे तोडून घरात घुसून मुले, महिला, वृद्धांसह सर्वांना झोडपले. अनेक जण कायमचे जायबंदी झाले. ५४ जण जखमी झाले. एकाच्या गुडघ्याची वाटी फुटली. यावरून घराची दारे तोडणे दरोड्याचा प्रयत्न, दारे तोडून घरात घुसून मारणे अवयव निकामी होईल एवढी गंभीर इजा करणे म्हणजे खुनाचा प्रयत्न, सामूहिक हल्ला करणे अशा गंभीर प्रकरणाचे गुन्हे पोलिसांवर दाखल होऊ शकतात. याचा अर्थ पोलिसांनी सामान्य कनगरा वासीयांवर जी कलमे लावली ती ३०७, ३९५, ३२३, ३२४, ३३२, ३३३ ही कलमे आता पोलिसांच्या राशीला येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Labels:

बार्शीत बसस्थानक आगारातून चालतात नादुरुस्त वाहने

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- बार्शी शहराचा भौगोलिक विकास, लोकसंख्या, दरडोई उत्पन्न, पाण्यासह इतर सोयी सुविधांचा दर्जा सुमार असला तरी बार्शी आगाराच्या बस वाहनांतून प्रवास करतांना मात्र प्रवाशांना दर्जाहिन वाहनांचा अनुभव अनेक वेळा मिळतो. विभागातील प्रथम क्रमांकाचे उत्पन्न मिळविलेल्या बार्शी बस आगाराचे कौतुक झाले असले तरी प्रवाशांना देण्यात येणार्‍या सुविधा, स्वच्छता, वाहनाची दुरावस्था, बसस्थानकांतील अनेक गैरप्रकार यातून बार्शी बस आगार व्यवस्थेची मान खाली जाते. 
        या दैनंदिन फेरीच्या वाहनाच्या काही काचा अनेक वर्षांपासून फुटलेल्या आहेत. ग्रामस्थांना आपल्या गावाला जाण्यासाठी या वाहनाशिवाय पर्याय नसल्याने नाईलाजास्तव ठरलेली तिकीटांची रक्कम भरुन प्रवास करावा लागतो. या वाहनातून प्रवास करणारे प्रवाशी कारीहून बार्शीकडे येत होते यावेळी वादळ वारे व पावसामुळे त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. प्रवाशी काय वाहन चालकाच्या समोरची देखिल काच नसल्याने वाहन चालकाला अत्यंत सावकास वाहन चालविणे भाग पडले. केवळ २० कि.मी.पर्यंत प्रवास असलेल्या वाहनास कमी वेगाने यावे लागल्याने सव्वादोन तासांचा अवधी लागल्याचे प्रवाश्यांनी सांगीतले. संपूर्ण प्रवासात प्रवाशी आणि वाहक चालक यांच्यात शब्द सुमणांचे संभाषण झाले. बार्शीत आल्याबरोबर प्रवाश्यांनी आगार व्यवस्थापकांकडे येऊन मोठा गोंधळ केला. यावेळी व्यवस्थापकांनी हात जोडून प्रवाशांची माफी मागून यापुढे वाहन दुरुस्तीपर्यंत ते वाहन बंद ठेवण्यात येईल असा विश्वास दिला. याबाबत प्र.आगार व्यवस्थापक श्री कदम यांचेशी चर्चा केली असता सदरचे वाहने हे जुन्या मॉडेलचे आहे त्याच्या चार पाच काचा फुटलेल्या आहेत, त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही त्या प्रकारच्या काचांची मागणी केली आहे. अशा प्रकारची चार पाच वाहने आगारात आहेत. अचानक आलेल्या वादळ पावसाने प्रवाशी व लहान मुलांना त्रास झाला त्याबद्दल आपण दिलगीर आहोत. या सर्व वाहनांची ताबडतोड दुरुस्ती करण्यात येईल व प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात येईल असेही सांगीतले.

Labels:

Friday, 30 May 2014

जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश जारी


उस्मानाबाद :- जिल्ह्यात महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदार संघाची द्वैवार्षीक निवडणूक प्रक्रिया, पोलीस भरती, शिवराज्यभिषेक सोहळा, वटसावित्री पोर्णिमा हे कार्यक्रम लक्षात घेता जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड  यांनी  मुंबई पोलीस  अधिनियम 1951 चे कलम 37 (1)  (3) अन्वये  संपुर्ण जिल्हयात 31 मे ते 14 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केले आहेत.
       त्यानुसार, शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्तीखेरीज अन्य कोणत्याही व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी किंवा सडकेवर किंवा जवळपास शस्त्र, लाठया काठया, बंदुका, तलवारी, चाकू, रिव्हॉल्व्हर आदि जवळ बाळगता येणार नाही. शारिरीक इजा करणा-या वस्तु जवळ बाळगता येणार नाही. कोणतेही क्षार, द्रव्य पदार्थ, स्फोटके जवळ बाळगता येणार नाही. दगड, क्षेपणास्त्रे आदि जवळ बाळगता व वाहून नेता येणार नाही. आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नकला करता येणार नाही. सभ्यता किंवा नितीमत्तेस बाधा येईल अशी किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलके, चिन्हे किंवा कोणतीही वस्तु जवळ  बाळगता येणार नाही, व्यक्ती किंवा त्यांच्या प्रतिकृतीचे / प्रतिमांचे प्रदर्शन करता येणार नाही. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उदेशाने वादय वाजवता येणार नाही किंवा  गाणी म्हणता येणार नाहीत. जाहीरपणे प्रक्षोभक किंवा असभ्य वर्तवणूक करता येणार नाही.
      कोणत्याही सडकेवर किंवा सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्रित येण्यास किंवा सभा घेण्यास, मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकीय कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी  किंवा शासनाचे अधिकारी,  कर्मचारी, अत्यंयात्रा, धार्मिक कार्यक्रम यास हे आदेश लागू राहणार नाहीत.  वरील कालावधीत मिरवणूकींना /सभांना परवानगी देण्याचे अधिकारी पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी व संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षकांना राहतील. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. हे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

Labels:

व्यायामशाळेसाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

उस्मानाबाद :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांचे मार्फत व्यायामशाळा विकास योजनेंतर्गत यापुर्वी प्रस्ताव सादर केलेल्या संस्थांना कळविण्यात येते की, या योजनेबाबत 22 जानेवारी रोजी नवीन शासन निर्णय निर्गमित झाल्यामुळे सुधारित शासन निर्णयानुसार सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा कार्यालय, श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडीयम, उस्मानाबाद येथे 20 जून, 2014 पर्यंत पुन्हा प्रस्ताव सादर करावेत. 
        इच्छुक संस्थांनी प्रस्ताव वेळेत दाखल करुन वरील योजनांचा लाभ घ्यावा. प्राप्त झालेले परीपुर्ण प्रस्ताव प्रतिक्षा यादीनुसार उपलब्ध तरतूदीच्या अधिन राहुन मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहेत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  संजीव कुलकर्णी यांनी केले आहे.                    

Labels:

डी.टी.एड प्रवेशासाठी 2 जून पासून अर्ज विक्री व स्वीकृती

उस्मानाबाद :- शैक्षणिक वर्ष 2014-15 साठी अध्यापक शिक्षण पदविका, डी.टी.एड. प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातून दि.2 ते 16 जून, 2014 या कालावधीत आवेदन पत्राची विक्री तर दि. 2 ते 17 जून, 2014 या कालावधीत आवेदन पत्राची स्वीकृती  होणार आहे. आवेदन पत्राची विक्री व स्विकृती त्या त्या जिल्हयाच्या प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी निश्चीत केलेल्या केंद्रावर तसेच प्रत्येक जिल्ह्यातील शासनमान्य अध्यापक विद्यालयात होणार आहे. विक्री व स्विकृती सकाळी 10 ते संध्या. 5 या वेळेत सुट्टीच्या दिवशीही सुरु राहील. आवेदनपत्राची  आणि नियमावलीची किंमत खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी रु.200 तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी रु.100 आहे. मागासवर्गीय उमेदवाराने आवेदनपत्र घेताना जात प्रमाणपत्राची  प्रत सादर करावी. उमेदवाराने प्रत्येक माध्यमासाठी स्वतंत्र आवेदनपत्र सादर करावे. शासनमान्य अध्यापक विद्यालयाची यादी www.mscert.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
    एकुण प्रवेश क्षमतेपैकी विभागस्तरावरुन 70 टक्के प्रवेश तर राज्यस्तरावरुन 30 टक्के प्रवेश मिळतील. प्रवेशास इच्छुक असणारे कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम.सी.व्ही.सी. शाखेतील पात्र उमेदवार इयत्ता 12 वी मध्ये खुल्या प्रवर्गासाठी किमान 49.5 टक्के गुणांसह उत्तीर्ण तर मागासावर्गीय् उमेदवार किमान 44.5 टक्के गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, असे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे.                       

Labels:

वाशी शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी आवाहन

उस्मानाबाद -: वाशी तालुक्यातील मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात प्रवेश घेऊ इच्छीणा-या विद्यार्थीनींना कळविण्यात येते की, सन 2014-15 या शैक्षणिक वर्षापासून शासकीय वसतीगृहाचे प्रवेश ऑनलाईन होणार आहेत.
    इयत्ता 10 वी च्या आतील विद्यार्थीनींसाठी मॅन्युअली अर्जाचे वाटप सुरु आहे. विद्यार्थीनींनी वसतीगृहातून विनामुल्य अर्ज घेऊन अर्ज परिपुर्ण भरुन आवश्यक त्या कागदपत्रांसह आपला अर्ज वसतीगृहात सादर करावा.
    इयत्ता 10 वी च्या पुढील विद्यार्थीनींनी  http://mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा. प्रवेशाबाबतची मेरीट लिस्ट याच वेबसाईटवर प्रसिध्द होणार आहे, असे गृहपाल, मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह वाशी यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.                               

Labels:

महिलांसाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे आयोजन

उस्मानाबाद -: स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील 18 ते 35 वयोगटातील महिलांसाठी दि.3 जून ते 02 जुलै,2014 या 30 दिवसाच्या कालावधीत राजे कॉम्प्लेक्स,3 रा मजला, औरंगाबाद रोड, उस्मानाबाद येथे ब्युटीपार्लर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात ब्युटीपार्लर बाबत निष्णात प्रशिक्षकामार्फत थेअरी व प्रॅक्टीकल प्रोजेक्टरद्वारे शिकवली जाणार आहेत. प्रशिक्षणाच्या कालावधीत स्टेशनरी, भोजन राहण्याची सोय संस्थेमार्फत विनामुल्य केले जाणार आहे. तरी ईच्छूक महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संचालक युवराज गवळी यांनी केले आहे.
    प्रवेशासाठी ग्रामसेवकाचा दारिद्रय रेषेखालील असल्याचा दाखला, रेशन कार्ड किंवा रहिवाशी दाखला, वय व शैक्षणिक पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट/मार्कलिस्ट, आयडेटीटी साईज 4 फोटो आदि कागदपत्रासह व्यक्तीश: भेटावे अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 7875443799 वर संपर्क साधवा, असेही आवाहन एका पत्रकान्वये केले आहे.

Labels:

बावीच्या सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी तालुक्यातील बावी (आ.) येथील ग्रामपंचायत सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर केल्याने राजकिय वातावरण गरम झाले आहे. गजेंद्र माधव काकडे असे सरपंचाचे नांव असून दि. ७ मे २०१४ रोजी ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला . यानंतर तहसिलदार बालाजी सोमवंशी यांच्या उपस्थितीत दि. २९ मे रोजी पडताळणी करण्यात आली यावेळी सरपंचाविरुध्द ठरावास ८ सदस्यांनी मतदान करुन ८ विरुध्द १ अशा बहुमताने ठराव संमत करण्यात आला.
    सदस्‍य सुर्यकांत आगलावे, लहू आगलावे, फन्‍नुदीन शेख, सोपान काळे, गणेश निर्मळ, संगीता पाटील, ज्‍योती ठाकरे, सुवर्णा बरडे हे सदस्‍य उपस्थित होते. तर सरपंच गजेंद्र काकडे व सुरेखा आगलावे हे गैरहजर होते. तहसिलदार यांनी ज्‍यांना अविश्‍वास ठरावाच्‍या बाजूने मतदान करावयाचे आहे त्‍यांनी हात उंचावून मत नोंदवावे, असे म्‍हटल्‍याबरोबर आठ विरुध्‍द एक असे मतदान होऊन अविश्‍वास ठराव संमत करण्‍यात आला. अविश्‍वास ठराव मंजूर होताच माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सदस्‍यांचे अभिनंदन केले. लवकरच नवीन सरपंचाची नियुक्‍ती करण्‍यात येईल, असे यावेळी सांगण्‍यात आले.

Labels:

वैराग भागातील ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत

वैराग (महेश पन्‍हाळे) -: वैराग (ता. बार्शी) भागात गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत केले. या पावसाचा जोरदार फटका पिंपरी, साकत, घाणेगाव, हिंगणी या गावांना बसला. यामध्ये पिंपरीचे हिंगे कुटुंबिय जखमी झाले असून बेघर होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
         गुरुवारी रात्री आठ वाजता सुसाट्याचा वारा सुटून विजांचा प्रचंड गडगडाट झाला. यावेळी दीड तास कोसळलेल्या जोरदार पावसाने लोकांची धावपळ उडाली. या वादळी पावसाने वैराग, मानेगाव, ढोराळे, तडवळे, राळेरास, सासुरे, इर्ले- इर्लेवाडी, यावली, कोळगाव, पानगाव, साकत, पिंपरी, हिंगणी, घाणेगाव, नांदणी, सर्जापूर, लाडोळे आदी गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. पिंपरी गावामध्ये पावसाचे उग्ररुप पहायला मिळाले. इथल्या दत्तु हिंगे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. यावेळी दत्ततू हिंगे व त्यांच्या पत्नी पार्वती हिंगे हे दोघे जखमी झाले. या वादळी पावसाची तीव्रता इतकी अधिक होती की, शेतातील पत्र्यांची वस्ती उडून तरी गेलीच पण गावामधील घरावरीलही पत्रे उडाले. कुमकुवत बनलेल्या घरांच्या भिंती कोसळल्या तर काही ठिकाणी मोठमोठी झाडे ही उन्मळून पडली. रात्री आठ वाजता चालू झालेल्या पावसामुळे अनेक गावातील विद्युतपुरवठा खंडीत ठेवण्यात आला. रात्री अनेक गावामधून पाऊस झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत वित्तहानी वा जिवितहानीचा सविस्तर वृत्त हाती आले नाही. पण रात्रीच्या पावसाने शेतातील जनावरे गावाकडे आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली तर सगळीकडेच पाणी पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

Labels:

बारावीचा निकाल 2 जूनला

मुंबई -: राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक बोर्डाकून मार्च 2014 मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या बारावी परीक्षेचा निकाल दि. 2 जून रोजी जाहीर करण्‍यात येणार आहे. त्‍याच दिवशी दुपारी एक वाजल्‍यापासून बारावीचा निकाल विद्यार्थ्‍यांना ऑनलाईन पाहता येणार असल्‍याची माहिती राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षक मंडळाच्‍यावतीने देण्‍यात आली.
      पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्‍हापूर, मुंबई, लातूर, अमरावती व कोकण नऊ विभागांचा निकाल एकाचवेळी जाहीर करण्‍यात येणार आहे. कनिष्‍ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्‍यांच्‍या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शवणारे शालेय अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळाच्‍यावतीने 10 जून रोजी सकाळी अकरा वाजता करण्‍यात येईल. त्‍याचदिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्‍यांना गुणपत्रिकांचे वाटप महाविद्यालयात करण्‍यात येईल.
 या संकेतस्‍थावर निकाल पाहता येईल :

www.maharesult.nic.in

www.maharashtraeduction.com

www.hscresult.mkcl.org

www.rediff.com/exams
 
     

Labels:

राज्‍यातील शाळांना 5 वी, 8 वीचे वर्ग जोडण्‍यास मान्‍यता

पांगरी (गणेश गोडसे) -: राज्यातील जिल्हा परिषद शाळांना पाचवी व आठवीचा वर्ग जोडण्‍यासंदर्भात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला यश आले असुन राज्यातील शाळांना 5 वी व 8 वीचे वर्ग जोडण्‍यास मान्यता मिळाल्याची माहिती महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीचे अध्यक्ष प्रसाद पाटील व सोलापुर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा निमंत्रक विवेकानंद जगदाळे यांनी प्रसिदध्‍दी पत्रकाद्वारे दिली आहे. राज्यातील 20657 प्राथमिक शाळांना पाचवीचा वर्ग व 6959 उच्च प्राथमिक शाळांना आठवीचे वर्ग जोडण्‍यास मान्यता देण्‍यात आली आहे.
    बालकांचा मोफत शक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 अन्वये सहा ते चौदा वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे देण्‍याची जबाबदारी आहे. या कायद्यानुसार इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत प्राथमिक सहावी ते आठवीपर्यंत उच्च प्राथमिक असा आकृतीबंध ठरवण्‍यात आलेला असताना शाळांनी प्राथमिक शाळांना पाचवीचा व आठवीचा वर्ग न जोडता 13 डिसेंबर 2013 च्या शासन निर्णयानुसार आर.टी.ई. नुसार शिक्षक निश्‍चिती करण्‍याचे निर्देश दिलेले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात 10 ते 20 टक्यांपर्यंत शिक्षक अतिरीक्त ठरू लागले होते. तसेच 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद करून तेथील विद्यार्थी जवळच्या शाळांना जोडण्‍याचा घाट शासनाने घातलेला होता. परिणामी ग्रामिण भागातील वाडया, वस्त्या वरील शाळा बंद होऊन तेथील विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होणार होते. तसेच विद्यार्थ्‍यांची गळतीही वाढणार होती.

Labels:

बार्शी पोलिस ठाण्यासमोर कुटूंबासह आमरण उपोषण सुरु

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील पारधी कँप परिसरातील गोपीनाथ पवार यांच्या कुटूंबाने मारहाण करणार्‍या आरोपींना अटक करुन न्याय मिळण्यासाठी बार्शी पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 2 मे 2014 रोजी पारधी कँप परिसरात सायंकाळी सात वाजण्‍याच्‍या सुमारास गोपानीथ पवार यांचा मुलगा सिकंदन व महादेव यांच्‍यावर 8 ते 9 जणांनी लाकडी दांडगे, तलवार, ब्‍लेड, दगड आदी हत्‍यारांसह हल्‍ला करून मारहाण केली. त्‍यानंतर घरात घुसुन रोख 28 हजार रुपये पळवून नेले. त्‍यांना जखमी अवस्‍थेत पोलीस ठाण्‍यात आणल्‍यावर उपचारासाठी शासकीय रुग्‍णालयात पाठविण्‍यात आले. तेथून प्रथमोपचार करुन सोलापूर येथे जाण्‍यास सांगण्‍यात आले. सोलापूर येथेही उपचार न करता तात्‍पुरती मलमपट्टी करुन परत पाठविण्‍यात आल्‍यानंतर काही समाजसेवकांच्‍या मदतीने त्‍यांना खासगी रुग्‍णालयात उपचार घेतले असल्‍याचे तसेच यानंतरही जीवे मारण्‍याची धमकी आरोपींनी दिल्‍याचे तक्रारदार गोपीनाथ पवार यांचे कुटुंबीय सांगत आहे.
    यातील आरोपी साखरबाई काळे, रामा काळे, नागु काळे, भगवान काळे, धनाजी काळे, जांबा काळे, नाना काळे (सर्व रा. पारधी कँप) यांना अटक करण्‍याची मागणी बार्शी पोलीसात केली असता त्‍यांना समाधान न करता पाठविल्‍याने पोलीस अधिक्षकांना दिलेल्‍या निवेदनानुसार बार्शी पोलीस ठाण्‍यासमोर आई-वडिलांसह दोन मुलांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

Labels:

Thursday, 29 May 2014

भोगावतीच्या लिलावास खंडपीठाची स्थगिती

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी तालुक्यातील सहकारी तत्वावरील असलेल्या एकमेव भोगावती (संतनाथ) सह. साखर कारखाना विक्री करु नये याकरिता संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर दि.२७ मे २०१४ रोजी झालेल्या सुनावणीत शासन व एमएससी बँकेस नोटीस काढल्या व विक्री टेंडरला स्थगीती देण्यात आल्याची माहिती भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली.
    भोगावती सह.साखर कारखाना हा चांगल्या स्थितीत असतांना बंद पाडून संगणमताने विक्रीचे टेंडर काढण्यात आले, यामुळे साडेचारशे कामगार, ८ तालुक्यातील १६ हजार शेतकरी अडचणीत सापडले होते. सदरचा कारखाना वाचविण्यासाठी कोणत्याही राजकिय नेत्याने अथवा धनदांडग्यांनी प्रयत्न केले नाहीत. शेतकर्‍यांच्या भवितव्याचा विचार करुन राजकिय आकसापोटी बंद पाडलेला कारखाना आम्ही चांगल्या पध्दतीने चालवू शकतो असे म्हणत शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे डुरे पाटील, डॉ.पंके, डॉ.जगताप, काका कोरके, गोविंदराव पंके यांच्या वतीने औरंगाबाद हायकोर्टात धाव रिट पिटीशन दाखल करुन विक्रीस स्टे घेण्यात आला होता. त्यांनतर एमएससी बँकेने नियमानुसार ६ वर्षांचे टेंड काढणे गरजेचे असतांना कागदोपत्री प्रोसेस करुन सन २०१३ साली फक्त एक वर्षांचे टेंडर काढले . यामध्ये कोणीही टेंडर भरु नये व कारखाना विक्री करु असे प्रयत्न करण्यात आले होती तरीही भाऊसाहेब आंधळकर यांनी टेंपलरोज कंपनीच्या माध्यमातून टेंडरची प्रक्रिया पूर्ण केली. परंतु त्यांना पंचनामा करुन कारखाना ताब्यात दिला नाही. २०१४ मध्ये टेक्निमली टेंडर उघडून ७ कोटी ९० लाख भरलेले असतांनाही तात्काळ ५ कोटी २७ लाखांची मागणी करण्यात आली. कंपनीने रक्कम भरण्याची तयारी दाखविली असतांनाही अमान्य करुन कारखाना विक्रीच्या स्टेला केराची टोपली दाखवून पुन्हा विक्री करण्याची प्रक्रिया केली. १ मे २०१४ पासून कारखाना विकत घेण्यासाठी अनेक व्यक्ती व कंपनीमार्फत पाहणी केली. सदरची बाब लक्षात आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संभाजीनगर (औरंगाबाद) हायकोर्ट यंथे अवमान याचिका दाखल केली. यामध्ये डुरे पाटील, डॉ.पंके, डॉ.जगताप, काका कोरके, गोविंदराव पंके, भाऊसाहेब आंधळकर, विश्वासराव पाटील, नामदेवराव शिंदे यांनी ऍड.आनंद देवकते यंाचेमार्फत न्या.जाधव साहेब यांचे कोर्टात रिटपिटीशन दाखल केले. त्यावर शासनासह एमएससी बँकेसही नोटीस काढण्यात आली आहे. यामध्ये कारखाना विक्रीस स्थगिती दिल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Labels:

क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: काटेगांव (ता.बार्शी) येथील टिपू सुलतान यंग ग्रुपच्या वतीने आयोजीत केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन शिवसेना शहर प्रमुख दिपक (भैया) अंाधळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
     यावेळी विविध संघाचे खेळाडु उपस्थित होते. सुरुवातीस धावपट्टीवरील स्टंपचे पुजन व नाणेङ्गेेक करून सामन्याची सुरूवात करण्यात आली. यावेळी दिपक अंधळकर यांनीही क्रिकेटचा आनंद घेतला. या स्पर्धेसाठी शहर व ग्रामीण क्रिकेट प्रेमीनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अतीक पटेल मो. ९६०४०५९४४० यांचेशी संपर्क साधावा.

Labels:

बार्शीत सूतगिरणी कामगारांचा तहसिलवर मोर्चा

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी टेक्सटाईल मिलमध्ये कंत्राटी काम करणार्‍या कामगार केतन शेळके याचे काम बंद केल्याच्या निषेधार्थ कामगार संघटनेच्या वतीने बार्शी तहसिलवर मोर्चा काढण्यात आला.
       केतन याचे नातेवाईक मयत झाल्याने रजेचा अर्ज देऊन अंत्यविधीसाठी गेल्याने त्याचे काम बंद केल्याचे शेळके याने म्हटले आहे. मिल्सचे जनरल मॅनेजर यांच्याकडून कामगारांवर दबाव, दमबाजी, दहशत होत असल्याचे काम बंद केलेल्या कामगाराचे मत आहे. बार्शी टेक्सटाईल मिल्स कामगार संघटनेच्या वतीने सुरु केलेल्या आंदोलनात या मोर्चाचे आयेाजन करण्यात आले होते. यानंतर ४ जून रोजी जेलभरो आणि दि.९ जून पासून कामगारांचे आमरण उपोषण सुरु करण्यात येईल अशी माहिती संघटनेने दिली आहे.
    शौकत शेख, प्रविण मस्तूद, धनंजय शिंदे, केतन शेळके, कृष्णा नूवरे, महेश मिठे, विजय वाघ, रंगनाथ शिराळ, मैमूना मुलाणी, संदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदविला.

Labels:

मोदी शपथविधीनंतर जळकोटात लाडू वाटप

नळदुर्ग :- भारत देशाचे पंधरावे पंतप्रधान म्‍हणून नरेंद्र मोदी यांचा शपथविधी संपन्‍न होताच भाजपाचे जिल्‍हा चिटणीस भिमाशंकर हासुरे यांच्‍या तर्फे जळकोट गावात अकरा हजार लाडूंचे वाटप करण्‍यात आले.
    जळकोट (ता. तुळजापूर) येथील विद्याधन या भाजप कार्यालयापासून नरेंद्र मोदी यांची निवड झाल्‍याबद्दल हलग्‍याच्‍या आवाजात व फटाक्‍यांची आतिषबाजी करत विजय मिरवणूक काढण्‍यात आली. राष्‍ट्रीय महामार्ग, शिवाजी चौक, नवी पेठ, केदारलिंग नगर, हनुमान मंदीर, बसवेश्‍वर चौक, प्रेमनाथ चौक आदी भागातून ही मिरवणूक निघाली. यावेळी कार्यकर्त्‍यांनी अकरा हजार लाडुंचे वाटप करुन विजय उत्‍सव वाजत गाजत साजरा करण्‍यात आला. मंगळवारी सकाळी बसवेश्‍वर चौकात हजारो नागरिकांना फराळ व चहाचे वाटप करण्‍यात आले. या मिरवणुकीत शिवसेनेचे तालुकाउपप्रमुख कृष्‍णात मोरे, माजी तंटामुक्‍ती अध्‍यक्ष गोविंद चुंगे, ग्रामपंचायत सदस्‍य शिवराज स्‍वामी, अनिल छत्रे, शाबुद्दीन शेख, माजी उपसरपंच बसवराज माळगे, तुकाराम हासुरे, सदाशिव हासुरे, गुंडाप्‍पा कुंभार, मेघराज किलजे, अॅड. भिमाशंकर स्‍वामी, बालाजी पाटील, रोहित कदम, विकास चुंगे, मल्‍हारी लोखंडे यांच्‍यासह भाजपा, शिवसेना, आरपीआयचे असंख्‍य कार्यकर्ते व बहुसंख्‍य नागरिक सहभागी झाले होते. या मिरवणुकीचा समारोप शिवाजी चौकात करण्‍यात आला. यावेळी भाजपाचे जिल्‍हा चिटणीस भिमाशंकर हासुरे, कृष्‍णात मोरे, अॅड. नागनाथ कदम, शिवाजीराव कदम, मल्‍हारी लोखंडे यांची भाषणे झाली.

Labels:

Wednesday, 28 May 2014

बार्शी तालुक्‍यातील 138 गावात सोयाबीन पेरणी यंत्रे करणार वितरित

पांगरी (गणेश गोडसे) :- बार्शी तालुक्यात सोयाबीन ऊत्पादनात होत असलेली वाढ लक्षात घेता सुधारीत तंत्रज्ञान विकसित करून शेतकरी आर्थिकदृष्टया सुदृढ करण्‍याकडे शासनाचा कल असुन होऊ घातलेल्या खरीप हंगामातील सोयाबिन पेरणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे बार्शी तालुक्यातील 138 गावात पन्नास हजार रूपये किंमतीची प्रत्येकी दोन याप्रमाणे सत्तर लाख रूपये किंमतीची सोयाबीन पेरणी यंत्रे अनुदानावर वितरीत करण्‍यात येणार आहेत.
    सर्वसाधारण गटातील लाभार्थांना पंधरा हजार तर मागासवर्गीय लाभार्थांना 4500 रूपये कृषी खात्याकडे जमा करावे लागणार आहेत तर उर्वरीत रक्कम ही कृषी खात्यातर्फे दिली जाणार आहे. बाजारपेठेत नामांकित कंपन्यांचे सोयाबिन बियाणे उपलब्ध नसल्यामुळे शेतक-यांनी धान्य म्हणुन घरी शिल्लक ठेवलेले सोयाबिन रोगप्रतिकारक औषधे लावुन पेरणीसाठी वापरूण पैशाची बचत करूण ते पैसै रासायनिक खातासाठी वापरावे, असे आवाहन पांगरीचे कृषी सहाय्यक राजाभाऊ देशमुख यांनी एका लेखी प्रसिदधीपत्रकाद्वारे केले आहे.
    मंडल अधिकारी कार्यालयातर्फे प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जुन्या पारंपारिक शेती व पीक पध्‍दतीत शेतक-यांनी बदल करून आधुनिक शेतीची कास धरणे गरजेचे होत असुन सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी यावर्षीपासुन पेरणी पध्‍दतीत बदल करून शासनमान्य बि.बि.एफ.पध्‍दतीच्या यंत्रचलित व बैलावर चालणा-या यंत्राद्वारे वाफा व रूंद सरी पध्‍दतीने पेरणी करावी, त्यामुळे खर्चात मोठी कपात होऊन ऊत्पादनातही मोठी वाढ होण्‍यास मदत होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अभियांत्रिकी विभागातील तज्ञ शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या या पेरणी यंत्राद्वारे एकाच वेळेस पेरणी, खत, कुळवणी, वाफे व सरी पाडणे अशा सर्वच कामगती एकाच वेळेत पुर्ण होणार असुन पेरणीपासुनच शेतक-यांच्या खर्चात मोठी बचत होण्‍यास मदत होणार आहे. तसेच या यंत्राद्वारे वाफा व सरी तयार होणार आहेत. त्यामुळे कमी पाऊस पडला तर पडलेले पाणी पिकास मिळणार आहे तर जास्त पाऊस झाल्यास सरीने पिकाबाहेर पडण्‍यास मदत होणार आहे.
   तरी शेतक-यांनी कंपन्यांच्या बियाणांच्या मागे न लागत घरगुतीच बियाणे पेरणीसाठी वापरून सुरूवातीपासुनच खर्चात बचत करून जास्तीत जास्त पैसै शिल्लक राहतील, असे नियोजन करावे असे अवाहनही पांगरीचे मंडल कृषी अधिकारी नकाते यांनी केले आहे.

Labels:

दुय्यम निबंधक कार्यालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

वैराग (महेश पन्‍हाळे) -: सुमारे चाळीस लाख रुपये खर्चून नव्याने बांधण्यात आलेले वैराग (ता. बार्शी) येथील दुय्यम निबंधक श्रेणी १ कार्यालय तब्बल एका वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असून संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे खरेदी – विक्री व्यवहार करण्यासाठी येणा-या नागरिकांना नाहक त्रास सहन करवा लागत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून लवकरात लवकर या नवीन इमारतीत स्थलांतर करावे अशी मागणी होत आहे .
   याबाबत माहिती अशी कि, बार्शी तालुक्‍यातील वैरागसह आसपासच्या ६१ गावातील खरेदी – विक्री – गहाणखत आदी कायदेशीर व्यवहार करण्यासाठी वैराग येथे स्वातंत्र्या पूर्वी म्हणजे १९०५ च्या सुमारास सुरु करण्यात आले आहे. हे कार्यालय सध्या ग्रामपंचायतच्या जागेत सुरु आहे. याठिकाणी वैराग, मालवंडी, सुर्डी, इरले, शेळगाव, गौडगाव, उपळे, जवळगाव आदी वैराग भागातील प्रमुख गावासह सुमारे ६१ गावांतील जमीन – जागा खरेदी विक्री सह विविध व्यवहारातील गहाणखत व्यवहार होतात .ज्याठिकाणी सध्या कार्यालयाची इमारत आहे ती  इमारत जीर्ण झाली असून पावसाळ्यात पावसाचे पाणी जीरपून आत येते. त्यामुळे कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे भिजून नष्ट होण्याचा थोका निर्माण झाला म्हणून सोलापूर रोड लगत छत्रपती संभाजी महाराज चौकात सुमारे चाळीस लाख रुपये खर्चून दुय्यम निंबधक श्रेणी १ कार्यालय बांधण्यात आले आहे. शासनाचे लाखो रुपये या बाधकामावर खर्च झाले आहेत. सध्या ज्याठिकाणी कार्यालय आहे ती जागा अपुरी असून प्रशस्त इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून सुध्दा नवीन इमारतीत कार्यालय सुरु करण्यात आलेले नाही. एकीकडे शासकीय कार्यालयांना इमारतीच नाहीत .याठिकाणी इमारत व बांधकाम पूर्ण असताना वापर नाही अशी अवस्था झाली आहे.
      सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेली सदर इमारत सोलापूर जिल्ह्यात प्रशासनाच्या दृष्टीने एकमेव असून वैराग येथे बांधण्यात आलेल्या इमारती सारखी दुसरी इमारत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात नाही. असे असताना केवळ प्रमुख पाहुणा मिळत नाही म्हणून तब्बल वर्षा पासून नवीन इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे .तरी लवकरात लवकर या नवीन इमारतीचे उद्घाटन करून दुय्यम निबंधक कार्यालय छत्रपती संभाजी चौकात सुरु करावे अशी मागणी होत आहे. 

Labels:

Tuesday, 27 May 2014

दारू बंदी करणा-या महिलांनाच पोलिसांनी केली बेदम मारहाण

उस्‍मानाबाद :- उस्मानाबाद जवळील कनगर येथे दारूबंदीची मागणी करणा-या बचतगटांच्‍या महिलाना व गावातील लोकाना पोलीसांनी जबर मारहाण केली. तसेच अवैध दारू साठा पकडून दिलेल्या गावातील लोकांच्या पत्नीनाही पोलिसांचा शिविगाळ केली. ही घटना सोमवार रोजी रात्री रात्री घडली.
    कनगर येथील महिला बचत गटांनी अवैध दारु विक्रीची बातमी उस्‍मानाबाद पोलिसांना दिली. पोलिसांसह महिला त्या दारु विक्रेत्याच्या दुकानावर दाखल झाले. त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी दारु विक्रेत्याला पळ काढण्याची संधी पोलिसांनीच दिली. शिवाय जप्त केलेली दारू ओतून पुरावेही पोलिसांनी नष्ट केले.
    महिलांसमोर सुरु असलेल्या पोलिसांची मोगलाई पाहून गावकरीही महिलांच्या मदतीला धावले. बाचाबाची झाली आणि त्यानंतर एखाद्या देशावर हल्ला करावा अशा रितीने दोनशे पोलिसांच्या तुकडीनं गावावर हल्ला चढवला.
    घरं दारं तोडून बाया बापड्या, म्हाता-या कोता-यांना सोलवटून काढलं. त्यात 50 जण जखमी झाले. काहींची डोकी फुटली, काहींच्या वाट्या सरकल्या, काहींची चामडी लोळली. इतकं झाल्यानंतरही पोलिसांनी गावक-यावरच गुन्हे दाखल केले आहेत.

Labels:

बार्शीच्‍या पाणीपुरवठा योजनेसाठी 1038 लाखांच्‍या अनुदानास मंजुरी

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- महाराष्‍ट्र सुजल व निर्मल अभियानांतर्गत बार्शी नगरपरिषदेच्‍या योजनेसाठी नागरी पाणीपुरवठा, मलनिःसारण, शौचालय बांधकाम, घनकचरा व्‍यवस्‍थापनासंदर्भात पर्याप्‍त, गुणवत्‍तापूर्ण सेवा, किफायतशीर सेवा शुल्‍कामध्‍ये उपलब्‍ध करुन देणे, विविध तांत्रिक, आर्थिक व व्‍यवस्‍थापकीय सुधारणांच्‍या उद्देशाने महाराष्‍ट्र सुजल व निर्मल अभियान राबविण्‍यात येते. सर्व नागरिकांसाठी पाणीपुरवठा व मलनिःसारणासाठी सर्वव्‍यापक सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी ही योजना राबविण्‍यात येते. राज्‍य शासनाकडून 80 टक्‍के, न.पा. हिस्‍सा 10 टक्‍के व कर्ज 10 टक्‍के अशा प्रमाणात ही योजना कार्यान्वित आहे.
    स्‍थानिक संस्‍थांनी भरलेल्‍या स्‍वहिश्‍याच्‍या प्रमाणात अनुज्ञेय अनुदान वितरीत करण्‍यात येते. बार्शी न.पा.ने स्‍वहिश्‍यापैकी 259 लक्ष इतकी रक्‍कम भरणा केली होती. त्‍या प्रमाणात 1038.12 लक्ष अनुदान वितरित करण्‍याचे राज्‍य शासनाच्‍या विचाराधीन असलेल्‍या योजनेस मंजूरी देण्‍यात आली आहे. बार्शी शहराच्‍या योजनेची एकूण अंदाजे किंमत रु. 5330 लक्ष असून त्‍याप्रमाणात योजनेच्‍या 80 टक्‍के राज्‍य शासनाकडून रु. 4263.67 लक्ष रुपये, नागरी संस्‍थेचे दहा टक्‍के 532 लक्ष, न.पा. कर्ज हिस्‍सा दहा टक्‍के रु. 532 लक्ष अशी योजना असून त्‍यापैकी भरणा करण्‍यात आलेल्‍या स्‍वहिश्‍याच्‍या रक्‍कमेनुसार वितरीत करण्‍यास प्रशासकीय मंजूरी देण्‍यात आली आहे.

Labels:

कोल्हापुरचा माऊली जमदाडे आरएसएम केसरीचा मानकरी

बार्शी -: आरएसएम समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य राज्यस्तरीय आरएसएमकेसरीचा मानकरी खुल्या गटातील कोल्हापूरचा माऊली जमदाडे झाला. माऊली जमदाडेने भगवंत मैदानावर हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरच्या श्रीकृष्ण तालीमचा मल्ल विलास डोईफोडेला नाकपट्टी डावावर चिटपट केले.
      सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख विश्‍वनाथ नेरुरकर,जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील,उत्सव मुर्ती राजेंद्र मिरगणे, माजी जिल्हा प्रमुख अनिल खोचरे,जिल्हा परिषद गटनेते दत्तात्रय साळुंखे,जेष्ठ कुस्तीगीर रावसाहेब मगर,अस्लमकाझी,दादासाहेब पवार,प्रा.संगमेश्‍वर भडुळे, विजय गावडे, महाराष्ट्र चॅम्पीयन आप्पा काशीद,गणेश डमरे,युवासेना जिल्हा उपप्रमुख किरण गायकवाडयांच्या हस्ते माऊली जमदाडेला सव्वाकिलो वजनाची चांदीची गदा व रोख पंच्याहत्तर हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली.तर उपविजेता विलास डोईफोडे याला दुसर्‍या क्रमांकाचे अर्धा किलो चांदीचे कडे व रोख रक्कमएक्कावन्न हजार रुपये व चषक देण्यात आला.तर तिसर्‍या क्रमांकाचा मानकरी योगेश बोंबाळेने पाव किलो चांदीचे कडे व ३१ हजार रुपये रोख व चषक पटकावला.४६ किलो वजन गटामध्ये रमेश मुरकुटे,शिर्डी याने ११ हजार रुपये रोख व ट्रॉफी तर दुसरा क्रमांकाचे किशोर भोसले,बार्शी ७ हजार रुपये व ट्रॉफी, दिनेश मुळे,कोल्हापुर,तृतीय क्रमांकाचे बक्षीस ५ हजार रुपये व ट्रॉफी यांनी मिळवले.५६ किलो वजन गटात प्रथमक्रमांक शरद पवार पुणे याला २१ हजार रोख आणि ट्रॉफी तर दुसरा क्रमांक हनुमंत शिंदे,ढवळस,याला ११ हजार व ट्रॉफी , तृतीय क्रमांकाचे बक्षीस बालाजी बुरंगे,सोलापूर,याला ९ हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देण्यात आली.६६ किलो वजन गटात प्रथमक्रमांक महादेव कुसमूडे,पंढरपुर याला २५ हजार रुपये रोख व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक अरुण खेंगळे पुणे,याला १५ हजार रुपये रोख आणि ट्रॉफी,तृतीय क्रमांक दादा फराटे,पुणे,याला ११ हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देण्यात आली.७६ किलो वजन गटात विश्‍वभंर खैरे शिर्डी,याला प्रथमक्रमांकाचे ३१ हजार रुपये रोख व ट्रॉफी,द्वितिय क्रमांकाचे बक्षीस सद्दामजमादार ,लिमेवाडी,याला रुपये २१ हजार व ट्रॉफी मिळवली,तृतीय क्रमांकाचे बक्षीस नितीन भगत ,पुणे याला १५ हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देण्यात आली.८६ किलो वजन गटात प्रथमक्रमांकाचे किसन कोकाटे,कोल्हापुर,याला रुपये ४१ हजार रोख आणि ट्रॉफी व द्वितिय क्रमांकाचे दत्ता मगर,पुणे,याला ३१ हजार रोख व ट्रॉफी देण्यात आली,तृतीय क्रमांकासाठी सुनील शेवतकर,कोल्हापूर याला २१ हजार रुपये रोख व ट्रॉफी देण्यात आली. फटाक्यांच्या नेत्रदिपक आतीषबाजीमध्ये संयोजकांनी राजेंद्र मिरगणे यांचा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख विश्‍वनाथ नेरुरकर यांच्या हस्ते भव्य पुष्पहार घालुन व केक कापून जंगी सत्कार केला. कुस्तीला प्रोत्साहन दिल्या बद्दल राजेंद्र मिरगणे यांचा रावसाहेब मगर यांनी मानाचा फेटा बांधुन सत्कार केला. यावेळी प्रास्ताविकामध्ये विलास मिरगणे यांनी स्पर्धा संयोजनाचा हेतू सांगितला.यावेळी शुभेच्छापर मनोगतामध्ये नेरुरकरांनी राजेंद्र मिरगणे यांच्या बरोबर आपले जुने संबंध आहेत त्यांचे कार्य चांगले आहे. त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण व्हावेत असे सांगितले.तर जिल्हा प्रमुख ठोंगे पाटील यांनी बार्शी विधान सभेवर भगवा फडकवा असे अवाहन केले.सत्काराला उत्तर देताना मिरगणे यांनी या अगोदर राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धा घेतल्या होत्या.युवकांनी निरोगी निकोप शरीर घडवावे. त्यांचा राजकारणासाठी गैरवापर होऊ नये,त्यांच्या शक्तीला योग्य वळण द्यावे यासाठी कुस्ती स्पर्धा आयोजनाला प्रोत्साहन दिले असे सांगितले.यावेळी प्रा.संगमेश्‍वर भडुळे यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी राजेंद्र मिरगणे यांनी स्पर्धेची परंपरा कायमजोपासत पुढच्या वर्षी २ लाख रुपये रोख व २ किलो चांदीची गदा हे पहीले बक्षीस जाहिर केले.यावेळी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेणारे वस्ताद रामभाऊ बेणे, बिभीषण पाटील,भगत नैयकल सर,प्रा.प्रमोद माळी,बाबासाहेब आवारे,सुत्र संचालक शंकर पुजारी, राजाभाऊ देवकते,अशोक धोत्रे, हलगी वादक राजू आवळे,दिनेश गवळी, बापुसाहेब मोहिते.व्यंकटेश पवार,दिनेश अनपट,राजाभाऊ घोलप,लक्ष्मण पवार जयपाल राऊत,भिमराव घोलप,भाऊ केाळी,विष्णु बांरगुळे,सचिन धस,धंनजय बावणे, यांचा राजेंद्र मिरगणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्पर्धेच्या संयोजनासाठी मदन गव्हाणे,शिरीष घळके,शिवाजी पवार,सुनिल चौगुले, बाळासाहेब पवार डॉ.विलास लाडे,अविनाश शिंदे,धिरज पाटील,संभाजी आगलावे,संतोष काटे,पंडित मिरगणे,प्रदिप बोराडे यांनी परिश्रमघेतले.विनय सारंग यांनी आभार मानले.

Labels:

मोदींच्या शपथविधीनिमित्त बार्शीत लाडूचे वाटप

बार्शी :- नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी बार्शीतील भारतीय जनता पक्षाच्या वतीने बस स्थानक चौकात लाडूचे वाटप करण्यात आले.
    याप्रसंगी शहराध्यक्ष अनिल जाधव, व्यापारी संघाचे मुरजीभाई भानुशाली, शहर सरचिटणीस रमेश माने, खजिनदार आण्णा कुलकर्णी, प्राणीमित्र धन्यकुमार पटवा, सोमनाथ दिवटे आदी उपस्थित होते.
    मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त शहरातील विविध ठिकाणी शुभेच्छा संदेश देणारे डिजीटल फलक लावण्यात आले होते.

Labels:

मुलींच्या निवासी शाळा प्रवेशासाठी आवाहन

उस्मानाबाद :- येथील शासकीय निवासी शाळा, दर्गा रोड, उस्मानाबाद येथे  सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसुचित जातीच्या मुलींसाठी निवासी शाळा चालविली जाते. इयत्ता 5 वी ते 10 वर्गातील प्रत्येक वर्गात किमान 40 विद्यार्थीनींना प्रवेश दिला जातो.  सन 2014-15 या शैक्षणिक वर्षासाठी गुणवत्तेनुसार प्रवेश घेऊ इछिणा-या विद्यार्थीनींनी प्रवेश घेण्यासाठी शासकीय निवासी शाळेमध्ये रितसर अर्ज गुणपत्रकेसह सादर करण्याचे आवाहन गृहपाल, अनसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा यांनी केले आहे. प्रवेश घेतेवेळी मागील वर्षी उत्तीर्ण असल्याचा दाखला, उमेदवार हा अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग व अपंग प्रवर्गातील  असावा, पालकाचे वार्षी क उत्पन्न  अनुसूचित जातींसाठी 2 लाख तर इतर प्रवर्गासाठी 1 लाख असे असावे, नियमानुसार भोजन व राहण्याची सुविधा,शैक्षणिक साहित्य,पुस्तके व गणवेश उपलब्ध करुन दिले जातात.     प्रवेशासाठी अर्ज विनामुल्य दिले जातात. तरी विद्यार्थींनी आपले अर्ज 31 ऑक्टोबर,2014  भरावेत असेही आवाहन करण्यात आले आहे.

Labels:

लोहारा येथे मोफत आरोग्य शिबीर

उस्मानाबाद -: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत दि. 29 मे रोजी सकाळी 10 ते 4 या कालावधीत ग्रामीण रुग्णालय, लोहारा येथे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये स्त्रीरोग, बालरोग, कान, नाक, घसा, शल्य चिकित्सा तज्ञ सहभागी होणार असून उपस्थितीतांची तपासणी मोफत करणार आहेत. तसेच तपासणीतून आवश्यकता भासल्यास रुग्णांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया किंवा उपचारासाठी संदर्भित केले जाणार आहे.  तरी परिसरातील पिवळे, केशरी, अंत्योदय व अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद व वैद्यकीय अधिक्षक गा्रमीण रुग्णालय, लोहारा यांनी केले आहे.    

Labels:

कापूस बियाणे खरेदीसाठी शेतक-यांना आवाहन

उस्मानाबाद -: खरीप हंगाम 2014-15 साठी जिल्हयाला महिको कंपनीचे (बी.टी.कापूस) एम. आर. सी. -7351 (कणक) या वाणाचे 18 हजार 84 पाकिटे व अजित सिडस कंपनीचे अजीत-155 या वाणाचे 4 हजार 300 पाकिटे प्राप्त झाली असून कळंब, भूम, वाशी, परंडा, उस्मानाबाद  तालुक्यातील एकूण 115 कृषि सेवा केंद्रामार्फत या बियाण्याची विक्री किंमत 930 रुपये प्रति पाकीट करण्याबाबत संबंधितांना सूचना दण्यात आल्या आहेत. प्रत्येक शेतक-यास दोन किंवा तीन पाकीटे कृषी कर्मचाऱ्यांसमक्ष विक्री करण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
    तरी शेतक-यांनी सदरील बियाणे 930 रुपये  या दराने रितसर पक्की पावती घेऊन व पाकिटे सिलबंद असल्याची खात्री करुनच खरेदी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मदनलाल मिणीयार यांनी केले आहे.

Labels:

वैराग मध्ये रंगणार बॅन्ड मुकाबला

वैराग (महेश पन्‍हाळे) :  हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत खाजा हिंदलशहा वली रहिमतमुल्ला यांच्या उरुसानिमित्त वैरागमध्ये बॅन्ड मुकाबला होत आहे. यासह विविध कार्यक्रमाचेही आयोजन ३१ मे रोजी करण्यात आले आहे.
            संदल आणि उरुस मुबारक कार्यक्रम गुरुवारी सायं. ७ वाजता मोठय़ा उत्साहात साजरा होत आहे. तर शनिवारी सकाळी आठ वाजता जारियतचे आयोजन केले आहे. दुपारी दोन वाजता आण्णा धोंगडे यांच्या घरातून चादर निघणार असून, रात्री दहा वाजेपर्यंत दर्गाह शरीफवर पोहचणार आहे. यावेळी मिरवणुकीसमोर राज्यातील नामांकित व प्रसिध्द जळगावचे रफी मास्टर यांचे जी नबी ब्रास बॅन्ड आणि बारामतीच्या शकीलभाई यांच्या अमर ब्रास बॅन्ड यांच्यात मुकाबला होणार आहे. या विविध कार्यक्रमाचे आयोजन युवा फ्रेंडस् क्लब, हजरत हिंदलशहा वली उरुस कमिटी यांनी केले आहे.

Labels:

वैराग जिकडे विजय तिकडे

वैराग (महेश पन्‍हाळे) -: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र गायकवाड यांना मिळालेल्या मताधिक्यामध्ये वैराग भागाचा मोलाचा वाटा आहे. शिवसेनेला सुमारे वीस हजार ७७१ मतांचे मताधिक्य मिळाले आहे . वैराग भागातील ५६ गावांपैकी ६ गावे वगळता शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांना मताधिक्य मिळाले आहे .
       उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात जिकडे बार्शी  तिकडे सरशी असे म्हटले जाते. पण याच मतदारसंघात वैराग जिकडे विजय तिकडे असी स्थिती असते. त्यामुळे विधानसभा असो व लोकसभा वैराग भागाला अधिक महत्व निर्माण झाले आहे. वैराग भागात राष्ट्वादीचे  चांगले बस्तान असताना शिवसेनेने बाजी मारल्याने मोदी लाट काय असते हे वैराग भागातील जनतेने जवळून पहिले आहे. वैराग भागातून एकूण ५३ हजार ८७५ इतके मतदान राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षासाठी झाले होते. यात शिवसेनेला ३७,१२३ मतदान झाले, तर राष्ट्रवादी पक्षाला १६,३५२ इतके मतदान झाले. यात शिवसेनेला वैराग भागातून २० हजार ७७१ इतके मताधिक्य मिळाले .
                वैराग भागातील वैराग २६६२, पानगाव १५५२, कोरफळे ९0९, सुर्डी ७८९, तडवळे ६५५, सासुरे ८५३, रातंजण ६९२, उपळे (दु) ८३१, शेळगाव ८६२ आदी मोठय़ा गावातून शिवसेनेला मताधिक्य मिळाले आहे. तर  हळदुगे ५५, पिंपरी ९८, बोरगाव 0३, गौडगाव १५, आंबेगाव १0 अशा पाच गावांतून राष्ट्रवादीला अत्यल्प पण मताधिक्य मिळाले आहे.
            यामुळे वैराग भागात राष्टवादीचे व कांग्रेस चे वर्चस्व असून देखील शिवसेनेला मताधिक्य मिळाले. त्यात कांग्रेसचे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी शिवसेनेला पाठिबा दिल्याने शिवसेनेला बळ मिळाले. त्यातच रवी सरना मोदी लाटेचा हि फायदा झाला. त्यात वैराग भागात शिवसेनेचे अस्तित्व नसताना त्यांना मिळालेल्या लीड मुळे शिवसेनीकात उत्साह वाढला आहे.

Labels: , ,

नरेंद्र मोदी आज स्वीकारणार पंतप्रधानपदाचा कार्यभार

नवी दिल्ली -: 'अबकी बार मोदी सरकार' ही घोषणा देऊन देशाचं स्पष्ट बहुमत मिळवणारे नरेंद्र मोदी आज पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कामकाजाचा पहिला दिवस असल्याने सा-यांचं लक्ष त्यांच्या कार्यक्रमांवर असणार आहे.
    नरेंद्र मोदी सकाळी आठ वाजता पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारतील. त्यांच्यासोबतच टीम मोदीही पदभार स्वीकारणार आहे. याशिवाय संध्याकाळी 6.30 वाजता मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे.
    दरम्यान जगभरातील अनेक देशांच्या प्रमुखांसह देशातील दिग्गज नेत्यांनीही मोदींच्या शपथविधीला हजेरी लावल्याने हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक ठरला.
    पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मोदी सार्क अनेक देशांच्या प्रमुखांची औपचारिक भेट घेतील. सकाळी साडेनऊपासून हा भेटींचा सिलसिला सुरू होणार आहे, ज्यामध्ये ते सार्क देशातील सर्वच नेत्यांची भेट घेणार आहेत.

Labels:

Monday, 26 May 2014

घरगुती गॅसचा वापर करणा-या व्यावसायिक आस्थापनांविरुद्ध होणार कारवाई

उस्मानाबाद :- व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅसचा वापर करणा-या दुकानदार आणि आस्थापनांविरोधात कडक कारवाई करण्याची भूमिका जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी घेतली आहे. व्यावसायिक आस्थापनांची तपासणी मोहिम पुरवठा विभागाच्या साह्याने हाती घेण्यात येणार असून असे प्रकार आढळण्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, गॅस एजन्सीजनी ग्राहकांना गॅस सिलींडर घरपोच देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. 
       येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्ह्यातील गॅस एजन्सीधारकांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी घेतली. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे, वजन व मापे निरीक्षक यांच्यासह गॅस एजन्सीधारक उपस्थित होते.
       जिल्ह्यात अनेक व्यापारी आस्थापना दैनंदिन वापरासाठी व्यावसायिक गॅस सिलींडरऐवजी घरगुती वापराच्या गॅस सिलींडरचा वापर करीत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे घरगुती गॅसधारकांना त्याचा तुटवडा भासू शकतो. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात अशा आस्थापनांची तपासणी मोहिम राबविण्याचे निर्देश त्यांनी पुरवठा विभागाला दिले. अशा प्रकारे घरगुती गॅस वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिला.
       याशिवाय, शहरी भागातील गॅस एजन्सीधारक ग्राहकांना घरपोच गॅस सिलींडर देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. गॅस सिलिंडर सुरक्षितरित्या घरपोच देण्याची संबंधित गॅस एजन्सीजची जबाबदारी आहे. त्याबाबत टाळाटाळ होत असेल तर ग्राहकांकडून गॅस सिलींडर हाताळणी व वाहतूक करताना दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे घरपोच गॅस सिलींडर देण्याबाबत टाळाटाळ करणाऱ्या एजन्सीजविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही डॉ. नारनवरे यांनी दिला.
        सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता महत्वाची आहे. त्यामुळे असुरक्षित गॅस सिलींडर वाहतूक टाळावी. ग्रामीण भागातील गॅस एजन्सीजनेही नागरिकांना घरपोच सेवा देण्याचे निर्देश डॉ. नारनवरे यांनी दिले.
      अपर जिल्हाधिकारी पाटील यांनी गॅस एजन्सीधारकांचे म्हणणे ऐकून घेतले. गॅस एजन्सीधारकांनी गॅस सिलिंडर नोंदणी व वापराबाबत जागरुकता निर्माण करावी. व्यावसायिक गॅस सिलिंडरधारकांची बैठक घेऊन त्यांना व्यावसायिक गॅस सिलिंडर वापराबाबत सूचना द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
    बैठकीला नळदुर्ग, कळंब, उमरगा, भूम, तुळजापूर, सास्तुर, उस्मानाबाद, वाशी, येरमाळा येथील गॅस एजन्सीधारक उपस्थित होते.

Labels:

वर्‍हाडाचा ट्रक खड्डय़ात गेल्याने 14 जखमी

नळदुर्ग :- टमटम व बोलेरो जीपला वाचविण्याच्या प्रयत्‍नात वर्‍हाडींना घेऊन निघालेला ट्रक खड्डय़ात गेल्याने 14 जण किरकोळ जखमी झाल्‍याची घटना रविवार दि. 25 मे रोजी दुपारी साडे बारा वाजण्‍याच्‍या दरम्‍यान नळदुर्ग-अणदूर मार्गावर गोलाईनजीक घडली.
    शहराजोद्दीन उस्मान शेख, भारताबाई राठोड, चांदुबा राठोड, सुलताबाई राठोड, भीमाबाई राठोड, अंजना राठोड, सुरेश राठोड, राजेंद्र राठोड, सुशीला राठोड, अतुल राठोड (सर्व रा. रामतीर्थ तांडा, ता. तुळजापूर) असे जखमी झालेल्‍यांचे नावे आहेत. रामतीर्थ तांडा येथील वर्‍हाडी फुलवाडी येथे लग्नासाठी ट्रक (एमएच 25 यू 613) मधून निघाले होते. हा ट्रक 12.30 वाजेच्या सुमारास गोलाईजवळ पोहोचला असता, समोरून येणारा ट्रक (एपी 04 सी 6079) व वर्‍हाडाच्या ट्रकमध्ये अचानक टमटम (एमएच 25 एम 1265) घुसल्याचे कळते. याचवेळी रस्त्याच्या कडेला बोलेरो जीप थांबली होती. या दोन्ही वाहनांना वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक रस्ता सोडून खड्डय़ात गेला. या अपघात वरील 14 जण किरकोळ जखमी झाले. जखमींवर नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

Labels:

तीन दिवसीय प्रथोमपचार शिबीराचा समारोप

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- इंडियन रेड क्रॉस सोसायटी, राज्य शाखा मुंबई च्यावतीने बार्शी रेड क्रॉस येथे भरविण्यात आलेल्या ३ दिवसीय प्रथोमपचार शिबीरामध्ये सहभाग घेतलेल्या ३५ प्रशिक्षणार्थीना बार्शी रेड क्रॉस चे उपाध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव व उद्योगपती प्रितेश मेहता यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी उद्योगपती गौतम कांकरिया उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ सह सचिव सुभाष जवळेकर प्रा.दिलीप कराड,कल्याण घळके,अशोक ढाळे प्रतापराव जगदाळे मुंबई वरुन खास प्रशिक्षण देण्यासाठी आलेले .भरत जोईल व डॉ.विकास कुरणे आदि उपस्थित होते.
    या वेळी डॉ.यादव म्हणाले की एखादी दूर्घटना घडल्यानंतर जखमीना लगेचच प्रथोमचार न मिळाल्याने अनेक जखमीना आपला जीव व अवयव गमवावा लागतो.. त्यासाठी त्यांना अपघाताच्या ठिकाणी प्रथमोपचाराची गरज असते.अशा वेळी त्या ठिकाणी प्रथोमपचार प्रशिक्षक असतील तर कमी नुकसान होते. भविष्यात अशा प्रकारच्या शिबीराची आवश्यकता असून यात मोठ्या प्रमाणात प्रथोमपचार प्रशिक्षक तयार होण्याची गरज आहे.या पूढील काळात आपल्या समोर एखादी दूर्घटना घडल्यास आपल्यातील माणूसपण जागे होऊन आणि प्रशिक्षणाच्या जोरावर योग्य तो प्रथोमचार मिळाल्याने जखमीचा जीव वाचल्याने आपल्या चेहर्‍यावर एक वेगळेच आनंद मिळतो. असे सांगत रेड क्रॉस च्या वतीने शहरात व ग्रामीण भागात देखील अनेक प्रथोपचार शिबीरे घेण्याचा मानस आहे.
    या शिबीरामध्ये प्रशिक्षणार्थींचे लेखी,तोंडी व प्रात्यक्षिक अशी परीक्षा घेतली गेली.याचा निकालावर दिल्ली मुख्यालाय यांच्या संपूर्ण अहवाल पाठवून त्या मध्ये यशस्वी प्रशिक्षणार्थीना प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
    या वेळी प्रितेश मेहता यांनी आपल्या ३९ व्या वाढदिवसानिमीत्त गरजू रुग्णांना ३९ रक्ताच्या पिशव्या मोफत देण्याची तसेच रुपये २७ हजारांची देणगी देण्याची घोषणा त्यानी केली. तसेच या प्रसंगी प्रशिक्षणार्थी मधूनही स्नेहल कुंकूलोळ,अश्‍विनी गुंड,दिपक डमरे व पूजा कुंकूलोळ यांनी या शिबीरातील अनुभव सांगत आपले मनोगत व्यक्त केले.
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अजित कुंकूलोळ यांनी केले तर आभार डॉ.भरत गायकवाड यानी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत बुडूख,रुपाली सूत्रे, आदिनी परिश्रम घेतले.

Labels:

Sunday, 25 May 2014

पोलीस कर्मचा-यांच्‍या दोन वर्षाला करण्‍याच्‍या प्रक्रियेला स्‍थगिती

पांगरी (गणेश गोडसे) :- महाराष्ट्र शासन व आस्थापना विभागाने पोलिस कर्मचा-यांच्या दोन वर्षाला बदल्या करण्‍याच्या प्रकियेला संमती देऊन त्याची अंमलबजावणी करण्‍याची प्रक्रिया अंतिम टप्यात आली असतानाच पुन्हा महाराष्ट्राच्या आस्थापना विभागाने सुधारीत आदेश काढुन पोलिस कर्मचा-यांच्या दोन वर्षात बदली प्रक्रियेला स्थगिती आदेश दिला असल्यामुळे पोलिसांच्या बदल्या पुर्वीप्रमाणेच सहा वर्षाला होणार आहेत. नियोजित बदली प्रकियेच्या अध्यादेशात कांही सुधारणा करण्‍याचे शासनाच्या विचाराधीन असल्याच्या मुद्यावरून आस्थापना विभागाचे महाराष्ट्राचे अतिरीक्त पोलिस महासंचालक यांनी सुधारीत अध्यादेशान्वये कर्मचा-यांच्या बदल्या हया पुर्वीच्याच धोरणानुसार अस्तित्वात असलेल्या नियम तरतुदी व कार्यपध्‍दतीनुसार कराव्यात, असा सुधारीत अध्यादेश काढला आहे.
    बदल्यांची टांगती तलवार असलेल्या कर्मचा-यांमधुन बदली प्रकियेला जैसै थे आदेश मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात असुन सुटलो बाबा अजुन कांही वर्ष असा सुर ऐकण्‍यास मिळत आहे. या प्रकियेचा फटका बसणा-या घटकामधुन या निर्णयासंदर्भात उलटसुलट चर्चिले जाऊ लागले होते. दोन वर्षाला बदलीच्या आदेशात बदल होऊन कालावधी वाढवुन मिळावा, अशी महाराष्ट्रातील पोलिस कर्मचा-यांची मागणीही होती. नागपुर येथील पोलिस कर्मचा-याने शासनाच्या दोन वर्षात बदली करण्‍याच्या निर्णयाविरोधात न्यायालयाचेही दरवाजे ठोठवले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या राज्यमंत्री फौजिया खान यांच्या अध्यक्षतेखाली बदल्यांच्या कायदयात बदल करण्‍यासंदर्भात 11 सदस्यीय समितीची स्थापनाही केली होती. एकमेव 'तुळजापूर लाईव्‍ह' ई-पेपरने पोलिस कर्मचा-यांच्या दोन वर्षात बदल्या झाल्यास त्यांच्या जनजीवनावर त्याचा कसा परिणाम होणार आहे याबाबत 24 एप्रिल रोजी पोलिसांच्या बदल्या कोणाच्या सोईसाठी अशा ठळक मथळयाखाली सविस्तर वृत्त प्रसिध्‍द करून पोलीस कर्मचा-यांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली होती. कर्मचा-यांनी त्या वृत्ताचे स्वागत करून बदली आदेशात सुधारणा होईल, अशी आशा बाळगण्‍यास सुरूवात केली होती.
     एकंदर बदली प्रकियेमुळे प्रतिवर्षी शासनाच्या तिजोरीवर कोटयावधी रूपयांचा बोजा पडणार होता. दोन वर्षाला पोलीस कर्मचा-यांच्या बदल्या करण्‍यामागे शासनाचा नेमका उद्देश काय, असाही एक मतप्रवाह निर्माण होऊ लागला होता. पोलीस कर्मचा-यांच्या दोन वर्षात बदल्या करण्‍याच्या निर्णयामागे शासन प्रशासनाचा नेमका हेतु काय, यावरही कर्मचा-यांधुन विचारमंधन होऊ लागले हाते. आस्थापना विभागाचे अप्पर पोलिस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाकडुन दि. 7 एप्रिलला सुधारित अध्यादेश काढुन पोलिस कर्मचा-यांच्या बदल्याबाबत धोरण व मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. त्यानुसार पोलिस कर्मचा-यांची एका पोलीस ठाण्यात सहा वर्षांचा असलेला कालावधी कमी करून तो दोन वर्षांचा करण्‍याची तरतुद करण्‍यात आली होती. त्या अध्यादेशानुसार प्रत्येक वर्षांसह दर दोन वर्षाला पोलिस कर्मचा-यांना आपल्या पिशव्या उचलुन पोलिस ठाणे सोडुन दुस-या पोलिस ठाण्यात जाण्‍याची वेळ नजीक येऊन ठेपली होती. शासनाने पोलिसींगचा उद्देश समोर ठेऊन हा निर्णय घेतला असला तरी राज्यातील पोलिस कर्मचा-यांवर या निर्णयाचा काय परिणाम होईल? का याचा विचार मात्र शासनाने केलेला नसल्याचे पोलिस कर्मचा-यांमधुन उघड बोलले जात होत होते. पोलिसांमधुनही या निर्णयासंदर्भात तीव्र असंतोष खदखदत होता.
    निर्णयाची अंमलबजावणी झाली असती तर जास्तीच्या डयुटीमुळे तणावाखाली वावरत असलेल्या पोलिस कर्मचा-यांच्याही समस्यांमध्ये मोठी वाढ होऊन अनेक गोष्‍टींना त्यांना तोंड दयावे लागणार होते. या निर्णयाचा पोलीस कर्मचा-यांच्या दैनंदिन व्यवहार व इतर घरगुती प्रश्‍नांवर परिणाम जाणवला असता. पोलिस कर्मचा-यांच्या पाल्यांच्या शालेय शिक्षणाचा प्रश्‍न अथवा त्यांच्या निवास आई वडिलांच्या वृध्‍दापकाळाच्या गरजा आदी बाबींचा बाबींचा सामना कर्मचा-यांना करावा लागला असता. तसेच बदली झाल्यानंतर त्या कर्मचा-याला पुन्हा अनेक कि.मी. अंतरावर बंदोबस्ताच्या नावावर जावे लागते. दुस-यांच्या सुरक्षेच्या कारणावरून नवीन ठिकाणी त्यांना आपले कुटुंब रामभरोसे ठेऊन जावे लागणार होते. शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून एका पोलिस ठाण्यात सहा वर्षांची कालमर्यादा पुन्हा पुर्ववत करण्‍याचा निर्णय घेतल्यामुळे पोलिस कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Labels:

तेरखेडा येथे डॉ. नारनवरे यांनी राबविली स्वच्छता मोहीम

उस्मानाबाद :- वेळ सकाळी सातची.  ग्रामस्थांची सकाळची कामे उरकण्याची लगबग सुरु असते. एवढ्यात, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे पोहोचतात. थेट ग्रामपंचायत कार्यालयात. तेथून ग्रामस्थ आणि अधिका-यांसह गावातील गल्लीबोळांतून सुरु होते, ती प्रभातफेरी. उत्सुकतेने बघणारे तरुण, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक एकेक करीत मागे येत राहतात. एका ठिकाणी कच-याचा ढीग पाहून जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे थबकतात. हातात झाडू घेतात आणि स्वच्छता मोहिमेला सुरुवात होते. आपणच आपले गाव स्वच्छ ठेवले पाहिजे असा संदेश देत साफसफाई सुरु होते. मग अधिका-यांसह ग्रामस्थांच्या हातीही झाडू येतो आणि ही मोहिम गती घेते.
       शनिवारी सकाळी असणारे वाशी तालुक्यातील तेरखेडा गावचे हे चित्र! डॉ. नारनवरे यांनी जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही मोहीम राबविण्यात आली. त्याचबरोबर सोयाबीन बियाणे पूर्वनियोजन आणि खरीप पूर्वनियोजनाबाबतही ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जि.प. चे कृषि विकास अधिकारी मदनलाल, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शीतलकुमार मुकणे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. तांगडे, तहसीलदार श्री. गोरे, तालुका कृषी अधिकारी गोपाळ शेरखाने यांच्यासह सरपंच जितेंद्र सरवदे, उपसरपंच घोलप, अण्णासाहेब खामकर आदी यावेळी त्यांच्या समवेत होते.
      सकाळीच जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी वाठवडा, ता. कळंब येथील मुक्काम आटोपून तेरखेडा येथे जाण्याचा निर्णय घेतला. तेरखेडा आल्यानंतर त्यांनी त्यांनी ग्रामस्थांसह परिसराची संपूर्ण पाहणी केली. ठिकठिकाणी दिसणारे कच-याचे ढीग, अस्वच्छ गटारी याबद्दल त्यांनी ग्रामस्थांना चांगलेच बोल सुनावले. जे नागरिक कचरा टाकून परिसर अस्वच्छ करतील, त्यांना ग्रामपंचायतींनी दंड ठोठवावा, असे निर्देश त्यांनी दिले. निर्मल भारत अभियान, तंटामुक्ती, पर्यावरणसंतुलित समृद्ध गाव अशा योजना राबवल्या तर गावविकास होईल. त्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.
       गावच्या योजना मार्गी लागत नसतील किंवा लोकांचा सहभाग मिळत नसेल तर त्याबाबत वेगळा विचार करावा लागेल, असे त्यांनी सुनावले.
      त्यानंतर त्यांनी खरीप हंगामाबाबतची तयारी, कृषी विभाग करीत असलेले प्रयत्न याची माहिती दिली. ग्रामस्थांच्या तक्रारी जाणून घेतल्या. 
श्री. तोटावार आणि श्री. मिणीयार यांनी ग्रामस्थांना सोयाबीन बीजप्रक्रियेची तपशीलवार माहिती दिली. डॉ. मुकणे यांनी पावसाळ्यात जनावरांच्या घ्यावयाच्या काळजीबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी श्री. शेरखाने यांनी खरीप हंगाम पूर्वतयारीबाबत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेला कृषी रथ सर्व गावात फिरवणार असल्याचे सांगितले.

Labels:

लहान शेतक-यांच्या उन्नत्ती साठी रेशीम उद्योग एक वरदान

उस्मानाबाद :- रेशीम उद्योग करुन लहान शेतक-यास आर्थिक उन्नत्ती साधता येते . तुती लागवड करुन रेशीम कोष उत्पादीत करून जिल्ह्यातील शेतक-यांनी स्वताची उन्नती साधावी, असे आवाहन सहकार व वस्ञोद्योग विभागाचे सहसचिव सुधीर कुरसंगे यांनी कळंब तालुक्यातील निपाणी  येथिल शेतकरी मेळाव्यात केले.
     जिल्हा रेशीम कार्यालय उस्मानाबादच्या वतीने शुक्रवारी निपाणी येथे रेशीम उत्पादक शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. कुरसुंगे बोलत होते. प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे सहायक संचालक श्री दिलीप हाके, रेशीम विकास अधिकारी पी. एस. गणाचार्य आदी उपस्थित होते.
         यावेळी कुरसुंगे म्हणाले की, जास्तीत जास्त अल्पभुधारक शेतक-यांनी रेशीम उद्योगाकरीता नोंदणी करुन प्रती एकरी कमी खर्चात हमखास जास्त उत्पन्न मिळवुन देणारा रेशीम उद्योग करुन आपली आर्थिक उन्नत्ती साधावी व जीवनमान उंचवावे. रेशीम उद्योग करणा-या शेतक-यांना जास्तीत जास्त फायदा करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तुती लागवडीपासुन उत्पादीत रेशीम कोष विक्री शेतकरी करतात. यापुढे उत्पादीत कोषापासुन छोटया रीलींग युनिटद्वारे रेशीम धागा निर्मिती करुन धाग्याची विक्री केल्यानंतर आपणास जास्त फायदा घेता येईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत.
      हाके यांनी, उस्मानाबाद जिल्हयातील शेतक-यांच्या कोषाला चांगल्या प्रतीमुळे देशात उच्चतम दर मिळाल्याचे सांगुन शेतक-यांचे व कार्यालयाचे अभिनंदन केले. तसेच रेशीम विकास अधिकारी गणाचार्य यांनी शेतक-यांचे दरमहा चर्चासत्र आयोजित करुन मार्गदर्शन व रेशीम तंत्रज्ञानाची  देवाण-घेवाण करुन उच्चप्रतीचे जास्तीत जास्त कोष उत्पादन केल्याबद्दल त्यांचे व कार्यालयाचे श्री इप्पर, डिगूळे, पानसरे, जोजन, माने यांचे अभिनंदन केले.
        यापुढे 25 एकर तुती लागवडी साठी एक सुक्ष्म बाल कीटक संगोपन केंद्र स्थापनेस शासन मंजुरी देणार आहे. शेतक-यांनी दर्जेदार पाला उत्पादनासाठी तुती बागेस शेणखत व गांडुळ खत देण्यावर भर दयावा. लातुर येथिल रू 3.50 कोटी खर्च करुन बांधलेले रेशीम संकुल महीनाभरात ताब्यात घेवुन तेथे सर्व उपक्रम सुरु करण्यात येणार आहेत असेही त्यांनी सांगितले.
      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणाचार्य यांनी केले. त्यात त्यांनी शासन व रेशीम उद्योजक यांनी प्रत्येकांनी आपली कर्तव्य पार पाडुन रेशीम वाढवुन त्याद्वारे दिनदुबळया शेतक-यांची आर्थिक उन्नत्ती कशी साधता येईल ते एका गोष्टी रुपाने  शेतक-यांना समजावून सांगितले.
       या कार्यक्रमात आत्मा योजनेंर्तगत सन 2013-14 मध्ये 100 अंडीपुजास सरासरी जास्त कोष उत्पादन व सर्वात जास्त कोष उत्पादन घेणारे जिल्हयातील शेतकरी बापु माळी रा. माणकेश्वर, श्रीहरी जाधवर रा. ताडगाव, बापु बनगर व दादा इंगळे,  रा. माणकेश्वर तसेच माहे मार्च 2014 मध्ये  100 अंडीपुंजास सरासरी जास्त उत्पन्न घेणा-या सौ कस्तुरबाई गुंड रा. निपाणी या सर्व शेतक-यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात  रेशीम उद्योगात महत्वाची भुमिका बजावणा-या  महिलांची उपस्थिती उल्लेखनिय होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाबासाहेब निपाणीकर यांनी केले तर आभार वाठवडा येथिल शेतकरी शरद पवार यांनी मानले.

Labels:

जिल्‍हाधिका-यांचा वाठवडा गावात मुक्‍काम

उस्मानाबाद :- येत्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन गावक-यांना घरगुती बियाणे योग्य बीजप्रक्रियेसह वापरण्याबाबत स्वत: जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह वरिष्ठ कृषी अधिका-यांनी प्रत्यक्ष गावात मुक्काम करुन  मार्गदर्शन केले. केवळ कृषी विषयकच नाही तर सर्व शासकीय यंत्रणांशी असलेल्या ग्रामस्थांच्या तक्रारी त्यांनी जाणून घेतल्या. कळंब तालुक्यातील वाठवडा या गावात डॉ. नारनवरे यांच्यासह या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चक्क मुक्काम ठोकला आणि ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. प्रशासनाचा प्रमुखच गावात आल्याने ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त केला.
       जिल्हा प्रशासन सध्या खरीप हंगाम पूर्वतयारी करीत आहे. विविध बियाणे, खते, कीटकनाशके यांचा आढावा वेळोवेळी घेतला जात आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे मोठे पेरणीक्षेत्र आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक बियाण्यांचा तुटवडा लक्षात घेऊन शेतक-यांमध्ये घरगुती बियाणे योग्य त्या बीजप्रक्रियेसह वापरण्याबाबत जागरुकता केली जात आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जि.प. चे कृषि विकास अधिकारी मदनलाल मिणीयार हे अधिकारीही उपस्थित होते. याशिवाय, जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) टी.के. नवले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शीतलकुमार मुकणे, अग्रणी बॅंक व्यवस्थापक श्री. दुपारगुडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कार्यकारी व्यवस्थापक हनुमंत भुसारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. तांगडे, तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. जाधव, तालुका कृषी अधिकारी महारुद्र मोरे, कृषी सहायक आदी यावेळी त्यांच्या समवेत होते.
      शुक्रवारी रात्री ठीक 9-30 वाजता जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांचे गावात आगमन झाले. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच विद्याताई जनक पुंड यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अण्णासाहेब टेकाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी येणार याची उत्सुकता गावकऱ्यांमध्ये होती. त्यामुळे रात्रीही ज्येष्ठ नागरिक , तरुण आणि  महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. डॉ. नारनवरे यांच्या उपस्थितीतच सर्वांना सोयाबीनचे घरगुती बियाणे कशा पद्धतीने वापरायचे, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे कृषी अधिका-यांनी प्रात्यक्षिकांसह दाखविले. ग्रामस्थांच्या याबाबतच्या शंकांचेही यावेळी निरसन करण्यात आले.
         त्यानंतर डॉ. नारनवरे यांनी थेट ग्रामस्थांशी संवाद साधला. गावक-यांची एकी हे गावच्या विकासाचे मुख्य कारण आहे. त्यामुळे विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.शासनाच्या विविध विकासाच्या योजना राबविण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा सहभाग अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने गावनियोजन करा. आपले गाव निर्मल असले पाहिजे, तंटामुक्त, पर्यावरण संतुलित असले पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विविध योजनांचा एकत्रित लाभ घेण्याच्या दृष्टीने गावक-यांनी नियोजन केले तर विविध यंत्रणांच्या माध्यमातून गाव स्वयंस्फूर्त होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
    गावात स्वच्छता अभियान राबवा, असे निर्देश त्यांनी दिले. मागील वर्षी दुष्काळ आणि त्यानंतर गारपीटीने जिल्ह्याला तडाखा बसला. त्यासाठी शासनाची आलेली मदत वाटप करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी स्वताहून आधुनिक शेतीकडे वळावे, गटशेती सारखे उपक्रम राबवावेत, शेतीपूरक जोडधंदे करावेत, असे त्यांनी सुचविले.
        विविध शासकीय यंत्रणांविषयी काही तक्रारी असतील तर थेटपणे सांगा अथवा लिखीत स्वरुपात द्या, असे आवाहन डॉ. नारनवरे यांनी केले. ग्रामस्थांच्या अडचणी त्यांनी समजावून घेतल्या. काहींना लेखी तक्रार देण्यास सांगितले. तुमच्या अडचणी निश्चितपणे सोडविल्या जातील, असा विश्वास दिला. ग्रामस्थांनी यास टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
       रात्री डॉ. नारनवरे यांनी बैठक संपल्यानंतर ग्रामस्थाबरोबरच पिठलं-भाकरी आणि ठेचा असा ग्रामीण जेवणाचा आस्वाद घेतला. त्यांच्या या साधेपणामुळे गावकरीही आनंदले. ख-या अर्थाने प्रशासन जनतेच्या दारी उपक्रम यशस्वी झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
   दरम्यान सुरुवातीला मिणीयार, तोटावार, श्रीमती सातपुते यांनी कृषी तसेच निर्मल भारत अभियानाविषयी माहिती दिली.    

Labels:

लोहारा येथील शासकीय वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन

उस्मानाबाद :- लोहारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतीगृहाची  सन 2014-15 मधील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. या वसतीगृहात प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने http://mahaeshol.maharashtra,gov.in या वेबसाईटवर आपले प्रवेश अर्ज भरावेत.
    इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी वसतीगृहाच्या कार्यालयातच जमा करावेत. त्यांना हे अर्ज वसतीगृहातच मिळतील. विद्यार्थ्यांची मेरीट लिस्ट http://mahaeshol.maharashtra,gov.in या वेबसाईटवर लावण्यात येणार आहे. या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे सुविधा विनामुल्य पुरविल्या जातात. अधिक माहितीसाठी विद्यार्थी व पालकांनी वसतीगृहाचे गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा.   

Labels:

उमरगा येथील मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी आवाहन

उस्मानाबाद -: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व विशेष सहाय विभागा मार्फत सहायक आयुक्त समाजकल्याण, उस्मानाबाद यांचे अधिनस्त चालविण्यात येत असलेले उमरगा येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात सन 2014-15 या शैक्षणीक वर्षासाठीची प्रवेश  प्रक्रीया सुरु आहे.
    शालेय विभागाच्या विद्यार्थिनीने 15 मे, 2014 पुर्वी किंवा निकाल लागल्यापासून 15 दिवसाचे आत प्रवेश अर्ज प्राप्त करुन घेऊन परिपुर्ण अर्ज भरुन वसतीगृहात कार्यालयीन वेळेत सादर करावेत. यासाठीची प्रवेश पात्रता पुढील प्रमाणे आहे. शालेय विभागासाठी इयत्ता 7 वी उत्तीर्ण व महाविद्यालय विभागासाठी इयत्ता 10 वी, इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र  राज्याचा अधिकृत रहिवासी असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती/जमरती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग किंवा आर्थिकदृष्टया मागासलेल्या प्रवर्गातील असावा. अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी पालकाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख व इतर प्रवर्गासाठी रु. 1 लाख पर्यंत असावे.   

Labels:

बस अपघातात ३६ जखमी

उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील एम. आय. डी. सी. परिसरात असलेल्या गाव दर्शक फलकास नांदेड-सोलापूर ही बस धडकून अपघात झाला. या अपघातात ३६ जण जखमी झाले असुन जखमींना शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
    दि. २४ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास नांदेड-सोलापूर (क्र. एम. एच. ४० एन- ९१७१) ही बस नांदेडहून सोलापूरकडे जात असताना उस्मानाबाद शहरातील एम. आय. डी. सी. परिसरात आली. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी गाव दर्शक फलकास जाऊन धडकली.
    या अपघातात बसमधील ३६ प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.
    याबाबत शहर पोलिस ठाण्यात रामचंद्र ज्ञानोबा शिंदे (वय ४२) रा. मोळंबी ता. नायगाव जि. नांदेड यांनी बस चालक सुधाकर हरीभाऊ देवकर रा. मुरूड जि. लातूर यांच्या विरोधात फिर्यादी दिली असुन बस चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पी. एस. आय. शहाणे हे करीत आहेत.

Labels:

बार्शीत सूतगिरणीसमोर कामगार संघटनेची निदर्शने

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी टेक्सटाईल मिलमध्ये कंत्राटी काम करणार्‍या कामगार केतन शेळके याचे काम बंद केल्याच्या निषेधार्थ कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवार व शनिवारी दोन दिवस निदर्शने करण्यात आले.
    केतन याचे नातेवाईक मयत झाल्याने रजेचा अर्ज देऊन अंत्यविधीसाठी गेल्याने त्याचे काम बंद केल्याचे शेळके याने म्हटले आहे. मिल्सचे जनरल मॅनेजर यांच्याकडून कामगारांवर दबाव, दमबाजी, दहशत होत असल्याचे काम बंद केलेल्या कामगाराचे मत आहे. कामगार नेते कॉं.तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांनी आंदोलन सुरु केले आहे. दि.२८ रोजी तहसिलवर मोर्चा तसेच ४ जून रोजी जेलभरो आणि दि.९ जून पासून कामगारांचे आमरण उपोषण सुरु करण्यात येईल असे लेखी निवेदन कामगार संघटनेने दिले आहे.
    आंदोलन सुरु असतांना मॅनेजर यांच्याकडून आंदोलनात चिथावणी देण्यासाठी समोर येऊन थांबणे व बघत राहण्याचे प्रकार होत असल्याचे ठोंबरे यांनी म्हटले आहे. यावेळी शौकत शेख, धनंजय शिंदे, रंगनाथ शिराळ, कृष्णा खंडागळे, केतन शेळके, विजय वाघ, बालाजी वाघमारे, महेस मिठे व आयटकचे पदाधिकारी उपस्थित होते.

Labels:

वक्तृत्व स्पर्धामधून विचारमंथन व्हावे : मिरगणे

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: वक्तृत्व स्पर्धामधून विविध विषयांवर दर्जेदार विचारमंथन होवून सार्वजनिक जीवनातील महत्वाच्या समस्यांवर प्रबोधन व्हावे अशी अपेक्षा आरएसएमसमाजसेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी व्यक्त केली. मिरगणे यांच्या वाढदिवसानिमित्त व्यासपीठ प्रतिष्ठानच्यावतीने   
       आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. धाराशिव शिवसेना जिल्हापरिषद गटनेते दत्तात्रय सांळुके, संयोजक शिवाजी पवार, नानासाहेब कदम, अजित कुकूंलोळ, परिक्षक रामचंद्र इकारे, पत्रकार सचिन वायकुळे, वसिमशेख, किशोर मांजरे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मिरगणे म्हणाले सार्वजनिक जीवनात कोणत्याही क्षेत्रांमध्ये नेतृत्व करणार्‍या व्यक्तीला सभा धीटपणा आणि वक्तृत्व कला अवगत असणे गरजेचे आहे. या स्पर्धामधून अनेक चांगले वक्ते उदयास येतील मित्र परिवाराचा हा स्तुत्य उपक्रमआहे. सावळे सभागृहामध्ये झालेल्या या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्तमप्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा निकाल असा - अङ्गसर शेख (अह.नगर,प्रथम क्रमांक ११,००० रु.), अश्‍विनी वडगावे, रोहीत देशमुख (औरंगाबाद, द्वितीय विभागून, ७०००रु.),काजल बोरस्ते (नाशिक, तृतीय क्रमांक ५०००रु.). उत्तेजनार्थ - मनस्वी गादेकर (बार्शी, प्रथम क्र. २०००रु.), आनंद मसलखांब (द्वितीय, २०००रु.) व पंकज पवार (बार्शी, तृतीय, २००० रु.).

Labels:

मेघदूत पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील कवि कालिदास मंडळाच्या वतीने देण्यात येणार्‍या मेघदूत पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा सौ.सुमन चंद्रशेखर यांनी केले आहे.
    शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, रोख २ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कै.दगडू बळी मस्तूद यांच्या स्मरणार्थ डॉ.कृष्णा मस्तूद यांच्या वतीने व डॉ.सूर्यकांत घुगरे यांच्या वतीने असे दोन पुरस्कार देण्यात येणार आहे.
    मागील २१ वर्षांपासून या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. काव्य क्षेत्रासाठी सातत्याने कार्य करत कवितांना प्रोत्साहन देणारे महाराष्ट्रातील हे एकमेव मंडळ असून २९ जून रोजी यंदाच्या २२ व्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Labels:

Saturday, 24 May 2014

संग्राम योजनेसाठी बार्शी तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायतींची निवड

पांगरी (गणेश गोडसे) :- आर्थिकदृष्टया डबघाईला येऊ लागलेल्या ग्रामपंचायतींना उत्पन्नाचा स्त्रोत्र निर्माण करूण ग्रामस्थांच्या सहभागातुन ग्रामपंचायतींना सधन करण्‍यासाठी सुरू करण्‍यात आलेल्या संग्राम योजनेसाठी पांगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील पांगरी व कारी या दोन ग्रामपंचायतींसह बार्शी तालुक्यातुन बेलगांव, चुंब व खांडवी या पाच ग्रामपंचायतींची निवड करण्‍यात आली असुन भविष्यात विविध योजना व सुविधा राबवल्याच्या बदल्यात या ग्रामपंचायतींना प्रति महिना हजारो रूपयांचे सेवा शुल्क मिळणार असुन जनतेलाही असंख्य सेवा व योजना एकाच छताखाली म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयातच उपलब्ध होणार असल्यामुळे ग्रामस्थांमधुनही या योजनेचे स्वागत होत आहे. शासनाचा वेगवेगळया माध्यमातुन दैनंदीन सुविधांचे विकेंद्रीकरण करण्‍याचा प्रयत्न सुरू असुन ग्रामपंचायत कार्यालयातील लोकांची दैनंदिन रेलचेल लक्षात घेऊन ग्रामपंचायत कार्यालयातच नित्याच्या गरजा पुर्ण करण्‍यासाठी शासनाने खाटाटोप सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणुन ग्रमपंचायत कार्यालयालाच मिनी बँक बनवुन सुविधा दिली जाणार आहे.
    लोकांच्या दैनंदिन गरजेच्या बाबी झालेल्या दुरचित्रवाणी संच रिचार्ज, भ्रमनध्वनी रिचार्ज, बँकेतील पैसै काढणे, भरणे, रेल्वे आरक्षण तिकिट काढणे, अल्प कर्ज मंजुर करणे, वाटप करणे, झिरो बॅलन्स, खाते उघडणे, एस.टी.बस आरक्षण टिकिट, विविध विमा कंपन्याचे हप्ते भरणे, टॉप अप व्हाऊचर रिचार्ज, लाईट बील भरणे, फोन बिल भरणे, उतारे दाखले आदी एकोणिस प्रकारच्या विविध गरजेच्या सेवा ग्रामपंचायतीच्या एकाच छत्राखाली पुरवल्या जाणार आहेत. ग्रामपंचायत कार्यालयांतुन पुरवल्या जाणा-या या सुविधा एका बँकेकडुन सुविधा केंद्राच्या नावाखाली पुरवल्या जाणार आहेत.
    ग्रामपंचायती सक्षम होणारः
    संग्राम सुविधा केंद्र चालवणा-या ग्रामपंचायतींना या केंद्रामुळे आर्थिक उत्पादनाचे साधन तयार होणार आहे. या केंद्रात चालणा-या दैनंदिन व्यवहारांवर संबंधीत ग्रामपंचायतींना आर्थिक प्राप्ती होणार आहे. ज्या ग्रामपंचायत कार्यालयातील केंद्रातुन जास्त टॅन्झेक्शन अथवा इतर उलाढाली पार पडतील त्या ग्रामपंचायतींना महिन्याला हजारो रूपये कमिशनस्वरूपात मिळणार आहेत. 

Labels:

कानिफनाथंची यात्रा पशुबळीविना उत्‍साहात संपन्‍न

पांगरी (गणेश गोडसे) :- गाताचीवाडी (ता. बार्शी) येथील कानिफनाथांची यात्रा यावर्षी कोणत्या पशुबळीविना उत्साहात व शांततेत पार पडली. प्रतिवर्षीप्रमाणेच कानिफनाथ व मच्छिंद्रनाथ यात्रा महोत्सवानिमित्त मंदिरात व गावात पहाटेपासुनच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावर्षी मात्र यात्रेनिमित पशुबळीवर बंदी घालण्‍याचा निर्णय गाताचीवाडी ग्रामस्थ व यात्रा कमिटीने घेतला होता. मंदिर परिसरात कोणीही पशुबळी देऊन त्याचा नैवैद्य मंदिरात नेऊ नये, असे आवाहन यात्रा कमिटीतर्फे प्रसिध्‍दी पत्रकाद्वारे करण्‍यात आला होता.
    गाताचीवाडी गावाजवळील बाहयवळन मार्गालगत असलेल्या कानिफनाथ मंदिरात गुरूवारी पहाटे चार वाजता काकडा आरती करण्‍यात आली. तसेच सकाळी 9 वाजता उपस्थित भाविकांना यात्रा कमिटीतर्फे महाप्रसादाचे वाटप करण्‍यात आले. त्यानंतर चार वाजता शेरणी व नंतर कानिफनाथांना पुरणपोळीचा नैवैद्य दाखवण्‍यात आला. नऊ नाथापैकीच एक असलेल्या कानिफनाथांच्या यात्रेनिमित्त बार्शी तालुक्यासह सोलापुर, उस्मानाबाद जिल्हयातुन हजारो भाविक हजेरी लावत असतात. गाताचीवाडी ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या नाथांच्या यात्रेला ग्रामस्थ एकजुटीने विविध कार्यक्रम पार पाडतात. यावर्षी मात्र यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी पारंपारीक प्रथेला व श्रध्‍देला फाटा देत, निर्णय घेत पशुबळीच्या प्रचलीत प्रथेला बंदी घातल्यामुळे या निर्णयाचे समाजातील कांही वर्गातुन स्वागत होत आहे. यात्रा महोत्सव यशस्वीरीत्या पार पाडन्यासाठी यात्रा कमिटीचे पदाधिकारी मधुकर गात भाऊ गात बाबा घाडगे सरपंच विट्टल घाडगे माजी सरपंच भाऊसाहेब घाडगे, मायबा गात यांच्यासह गाताचीवाडी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Labels:

बार्शीत लहान मुलांवरुन मोठ्यांत भांडणे; तिघे जखमी

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- येथील चोरमुले प्लॉट येथे लहान मुलांच्या भांडणाचे मोठ्या माणसांत भाडणाचे रुपांतर झाले. सदरच्या प्रकरणात तिघेजण जखमी झाले असून ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमीने दिलेल्या फिर्यादिवरुन बार्शी पोलिसांत नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय नागनाथ सदाफुले (वय ५४), सीताबाई सदाफुले (वय ४८) , गणेश देशमुख (वय २५) सर्वजण रा.चोरमुले प्लॉट, बार्शी असे यातील जखमींची नावे असून विजय यांच्या डाव्या हाताच्या पंजावर तसेच तिघांना मुक्कामार लागला आहे.
    दत्ता वाघमारे, अनिल फपाळ, लाला बारंगुळे, बापू बारंगुळे, दशरथ फपाळ, अमोल बारंगुळे, दत्ता बारंगुळे, अजित फपाळ यांचे वडिल, पाटील यांचा धाकटा भाऊ असे फिर्यादित नमूद आरोपींची नावे असून झालेल्या भांडणात तलवार, लाकडी दांडके हातात घेऊन मारहाण केली तसेच जवळ असलेल्या पिकअप वाहनाची काच फोडून नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदाराच्या जबाबानुसार गुन्हा दाखल झाला असला तरी झालेल्या भांडणाचे नेमके कारण काय, यामध्ये सांगीतलेली हत्यारे खरोखर अस्तित्वात होती काय, भांडणातील सर्वजण घटनास्थळी हजर होते काय याचा शोध पोलिस घेत आहेत. बार्शी पोलिसांत नऊजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोस हे करीत आहेत.

Labels: