Tuesday, 31 March 2026

श्रीराम प्रतिष्ठानकडून वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीराम प्रतिष्ठानकडून वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

मुरूम, ता. उमरगा, दि. ३१ : 

येथील श्रीराम प्रतिष्ठानकडून इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन मंगळवारी (ता. ३१) रोजी करण्यात आले होते. इयत्ता ११ वी व १२ वी विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धेचा विषय सोशल मीडिया समाजाला जोडते का तोडते हा होता. 

या स्पर्धेत एकूण १२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून विषयाच्या दोन्ही बाजूंनी प्रभावी मते मांडली. स्पर्धकांनी सोशल मीडियाचे सकारात्मक व नकारात्मक पैलू स्पष्ट करून मुद्द्यांचे खंडन केले. इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचा विषय मोबाईलच्या दुनियेत हरवलेले बालपण असा होता. या स्पर्धेत ९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अति वापरामुळे बालपणावर होणारे परिणाम, बदलती जीवनशैली आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या यावर प्रभावी भाषणे सादर केली. प्रारंभी श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका सोनाली कलशेट्टी होत्या. स्पर्धेसाठी परीक्षक प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले, प्रा. उमाकांत महामुनी, केसरजवळगाचे शिक्षक भुरे यांनी केले. स्पर्धेचा निकाल वक्तृत्व स्पर्धा वर्षा अंबुसे (प्रथम), वैशाली नागने (द्वितीय), शहबाज नदाफ (तृतीय) तर वादविवाद स्पर्धा वैष्णवी रुपनूर व ज्ञानेश्वरी सुरवसे (प्रथम), सोनाली जाधव व साक्षी जाधव (द्वितीय), सीमा राठोड व तेजस्विनी खजुरे (तृतीय) या स्पर्धकांना महेश निंबरगे, विजयकुमार कलशेट्टी, योगेश कोलडंगरे, बाबुराव बेगमपुरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला व विचारशक्तीला वाव देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. अध्यक्ष समारोपप्रसंगी या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, विचारमंथनाची सवय आणि व्यक्त होण्याची कला विकसित होण्यास मोठी मदत होते.  आयोजक सिद्धलिंग हिरेमठ, राजकुमार हिरेमठ, प्रशांत सोमवंशी, विकास शिंदे, रोहित स्वामी, शोभा बेगमपुरे, अनिल चव्हाण, मोहन करके, व्यंकटेश हंचाटे आदींनी पुढाकार घेतला. स्पर्धेचे सूत्रसंचालन संतोष येवले तर आभार प्रा. सतीश रामपुरे यांनी मानले. 

 फोटो ओळ  : मुरूम, ता. उमरगा येथील कन्या प्रशालेच्या सभागृहात आयोजित स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देताना स्पर्धक व अन्य.

Labels:

सिद्धेश्वर (अण्णा) कोरे यांच्या नेतृत्वाखाली अर्थ व बांधकाम विभागामार्फत विकासाला नवी गती मिळेल- जि.प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील

सिद्धेश्वर (अण्णा) कोरे  यांच्या नेतृत्वाखाली अर्थ व बांधकाम विभागामार्फत विकासाला नवी गती मिळेल- जि.प.अध्यक्षा अर्चनाताई  पाटील

धाराशिव,दि.३१:

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापतीपदी  सिद्धेश्वर (अण्णा) कोरे यांची झालेली निवड हा सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मेहनतीचा आणि निष्ठेचा सन्मान करणारा असल्याचे गौरवोद्गार जि.प.अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी काढले.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि अर्चनाताई पाटील, मल्हार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदगाव जि.प.गटातुन महायुतीचे सिद्धेश्वर (अण्णा) कोरे हे दणदणीत विजय मिळविले. त्यांनतर त्यांची अर्थ व बांधकाम सभापतीपदी  निवड करण्यात आली. त्यांनी  आपल्या पदाचा पदभार नुकतेच जि.प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील व  नेतेमंडळीसह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीकारला. यावेळी त्यांना त्यांच्या दालनातील खुर्चीत बसवून सुशासन, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कारभारासाठी  शुभेच्छा दिल्या .

महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण  सोहळा पार पडला.

श्री. कोरे यांच्या नेतृत्वाखाली अर्थ व बांधकाम विभागामार्फत विकासाला नवी गती मिळेल, जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि पारदर्शक कारभाराचा आदर्श निर्माण होईल, असा ठाम विश्वास अर्चनाताई पाटील यांनी व्यक्त  केला आहे.

Labels:

Monday, 30 March 2026

उन्हाळ्यात तहानलेल्याची तृष्णा भागविण्यासाठी "जार" च्या थंडगार पाण्याची पाणपोईचा शुभारंभ; 8फार्मा ग्रुपचा स्तुत्य उपक्रम - नगराध्यक्ष बसवराज धरणे

उन्हाळ्यात तहानलेल्याची तृष्णा भागविण्यासाठी "जार" च्या थंडगार पाण्याची पाणपोईचा शुभारंभ; 8फार्मा ग्रुपचा स्तुत्य उपक्रम - नगराध्यक्ष बसवराज धरणे 

नळदुर्ग, दि.३०:

 पाणी म्हणजे जीवन असून, अशा या रखरखत्या उन्हात जनतेसाठी थंडगार जार चे पाणी देणे हा 8-फार्मा ग्रुपचा उपक्रम स्तुत्य असून अशा सामाजिक, उपक्रमाची समाजाला खूप गरज असल्याचे प्रतिपादन नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी केले.

नळदुर्ग शहरातील शिवतीर्थ काॅम्पलेक्स येथे संजीवन मेडिकल स्टोअर व  8-फार्मा ग्रुपच्या वतीने, युवक नेते सुनील चव्हाण यांच्या वाढ दिवसानिमित्त आयोजित पाणपोई उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष बसवराज धरणे हे बोलत होते. यावेळी डॉ.जितेंद्र पाटील, पाणीपुरवठा सभापती तानाजी जाधव, नगरसेवक रिझवान काझी, अभियंता स्वप्नील काळे,  शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, आदी मान्यवर उपस्थित होते.


 याच कार्यक्रमात नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाल्याबद्दल आरोही सातपुते या विद्यार्थिनीचा शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास माजी नगरसेवक सुधीर हजारे, भाजपचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, शहराध्यक्ष बबन चौधरी, पत्रकार उत्तम बणजगोळे, शिवाजी नाईक, दादा बनसोडे, अमर भाळे, उमेश जाधव, प्रमोद जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय जाधव, गोविंद शिंदे, अजय अणदूरकर, जीवन मोजगे, गुणवंत मुळे, राम जाधव आदीनी परिश्रम घेतले.

Labels:

अतिक्रमणे नियमित होणार; शासन निर्णय जारी; अतिक्रमणधारकांना दिलासा

अखेर श्रावणबाळ माता-पिता संघटनेच्या लढ्याला यश, नळदुर्ग शहरातील निवासी अतिक्रमणे नियमित होणार;  शासन निर्णय जारी ; अतिक्रमणधारकांना दिलासा 

नळदुर्ग,दि.३० :

नळदुर्ग शहरासह राज्यातील शासकीय जागेवर कब्जेवहीवटीनुसार राहणाऱ्या कुटूंबाचे निवासी अतिक्रमण नियमित होण्यासाठी गेल्या दशकापुर्वी पासुन   श्रावणबाळ माता-पिता संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, राज्य समन्वयक शिवाजी नाईक यांनी अनेकदा आंदोलने केले, प्रसंगी उच्च न्यायालयात लढा चालू असतानाच शासनाने राज्यातील अतिक्रमण नियमित करण्याबाबत शासन निर्णय जारी करत अतिक्रमण धारकांना दिलासा दिला आहे. त्याबद्दल श्रावणबाळ संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

  नळदुर्ग शहरातील वसंतनगर, दुर्गानगर (वडारवाडा) , इंदिरानगर, बौध्दनगर आदीसह अतिक्रमणधारक कुटुंबांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पर्यतची निवासी अतिक्रमणे नियमित केली जाणार असून यासंदर्भातील शासन निर्णय  नुकतेच दि.२५ मार्च २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.

राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर शासकीय व गायरान जमिनीवर अतिक्रमणे झाली आहेत. अनेक गरीब व गरजू कुटुंब या जागांवर वर्षानुवर्षे वास्तव्यास असून,त्यांचा निवासाचा प्रश्न गंभीर बनला होता. "सर्वांसाठी घरे" या धोरणाच्या अनुषंगाने तसेच सर्वसमावेशक विकास साध्य करण्याच्या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतला आहे.

अतिक्रमणधारकांना १ जानेवारी २०११ रोजी अतिक्रमण असल्याच्या पुराव्यासाठी मतदार यादीतील नाव, वीजबिल, मालमत्ता कराची पावती किंवा निवासी पुराव्यासाठीचे इतर शासकीय दस्तऐवज (शिधापत्रिका वगळून) सादर करावी लागणार आहेत.

आठ अ उतारा, शासकीय दस्तऐवजामध्ये ग्रामपंचायत अतिक्रमण सर्वेक्षण नोंदवही, झोपडपट्टी घोषणेची अधिसूचना, उपग्रह छायाचित्र आदी पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत.

३१ डिसेंबरपर्यंत मुदत

नदीपात्र, नाले, सार्वजनिक रस्ते, वने आणि धोकादायक क्षेत्रातील अतिक्रमणे नियमित होणार नाहीत. ५०० चौरस फुटापर्यंतची सर्व निवासी अतिक्रमणे विनामूल्य नियमित होणार आहेत. या पुढील क्षेत्रासाठी बाजारमूल्यानुसार येणाऱ्या किमतीच्या १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्जाची मुदत आहे.

किराणा दुकान, दळणाची चक्की नियमित होणार

अतिक्रमण असलेल्या वस्ती किंवा परिसरातील किराणा दुकान, मेडिकल, दळणाची चक्की, छोटेखानी दवाखाना इत्यादी अतिक्रमण घरासह स्वतःचे असल्यास घराचाच भाग समजून अपवादात्मक परिस्थितीत नियमित होणार आहे. व्यावसायिक अतिक्रमण या योजनेत नियमित होणार नाही.

पाच वर्षे विक्री होणार नाही

एका कुटुंबाला केवळ एकच अतिक्रमण नियमित करुन घेता येणार आहे. यासाठी शपथपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. नियमित केल्यानंतर पाच वर्षे ही जागा विकता येणार नाही.


राजेंद्र निंबाळकर, अध्यक्ष, श्रावणबाळ माता-पिता संघ

गेल्या १२ वर्षांपासून आम्ही अतिक्रमण धरकांसाठी न्यायालयात लढा देत आहोत. या निर्णयाने आमच्या संघर्षाला यश मिळाले. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करतो. सरकारने हा निर्णय वेळेत घेतला नव्हता, त्यामुळे सरकारविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. सदर याचिका अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र आता न्याय मिळाल्याने ही याचिका माघारी घेणार आहे.

शासन निर्णय दि.२५ मार्च २०२६


Labels:

Sunday, 29 March 2026

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत आलियाबाद येथे लोकसहभागातून श्रमदान

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत आलियाबाद येथे लोकसहभागातून श्रमदान

जळकोट,दि.२९:

तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन अंतर्गत अनगड दगडी बांध सामाजिक लोकसभागातून श्रमदान करण्यात आले.

 यावेळी वैयक्तिक लाभाचे घटक व नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन अंतर्गत विविध उपचार पद्धती याची माहिती ब्रम्हदेव माने एन आर एम समन्वयक यांनी दिली तर टप्पा - 2 बाबत  एस.आर .माने सहाय्यक कृषी अधिकारी यांनी माहिती दिली.

 यावेळी लोकसहभाग सामाजिक चळवळ व विविध उपचार पद्धती नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन, पर्यावरण संरक्षण व लोकसहभागातून शाश्वत विकास याविषयी माहिती घेताना ग्राम कृषी विकास समिती, बचत गटातील महिला सामाजिक क्षेत्रातील नागरिक इत्यादींनी श्रमदान केले . यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण ,सरपंच सुर्यकांत चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण,ग्रा.प.सदस्या शांताबाई माणिक राठोड, विनायक चव्हाण, शिवाजी चव्हाण, सुभाष नाईक, यशवंत राठोड, सिताराम राठोड,व्यंकट राठोड, गणेश चव्हाण, सुभाष चव्हाण, सचिन राठोड, विश्वनाथ चव्हाण, राहुल चव्हाण,ग्राम कृषी विकास समिती मधील सदस्य सविता राठोड, सुरेखा चव्हाण, वंदना चव्हाण, रेखा राठोड, मंगल चव्हाण, पार्वती चव्हाण, कांताबाई राठोड, उमाबाई राठोड अतिश राठोड, संदीप राठोड, मनोज पवार आदी उपस्थित होते.

Labels:

बालकांना सुरक्षित आरोग्यदायी वातावरण मिळाल्यास देशाचे भविष्य उज्ज्वल - माजी सरपंच प्रा. ज्योतीका चव्हाण

बालकांना सुरक्षित आरोग्यदायी वातावरण मिळाल्यास देशाचे भविष्य उज्ज्वल - माजी सरपंच प्रा. ज्योतीका चव्हाण

नळदुर्ग,दि.२९:


 आजची बालके हे देशाचे भवितव्य आहेत प्रत्येक बालकाला सुरक्षित आरोग्यदायी वातावरण मिळाल्यास देशाचे भविष्य उज्ज्वल राहील असे मत माजी सरपंच प्रा. ज्योतीका चव्हाण यांनी व्यक्त केले. 

तालुक्यातील मानेवाडी, हगलूर येथे हॅलो फाउंडेशन व बाल ग्राम संरक्षण समितीच्या वतीने बाल अत्याचार,बाल विवाह,बाल कामगार,बाल लैंगिक अत्याचार या विषयावर मार्गदर्शन प्रशिक्षण आयोजित केले होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून चव्हाण बोलत होत्या. 
पुढे बोलताना म्हणाल्या की बालकांना निकोप व योग्य संधी देण्यासाठी तसेच त्यांच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.त्यामुळे मुला-मुलीनां प्रोत्साहन मिळेल.

यावेळी ग्रामसेविका अरूणा कदम, बचत गटाच्या अध्यक्षा सिमा नागरगोजे, सीआरपी मैदाबी सय्यद,अ.कार्यकर्त मंदाकिनी जाधव, आशा कोंडाबाई राठोड, प्रेरक अनिल पवार, श्रीदेवी घुगे,हणमंत घुगे, ग्रा.प.सदस्य संजय पवार मानेवाडी येथील मा.सरपंच सुवर्णा सगट, सखुबाई माने,छाया लकडे, सुरेखा हावळे, श्रीदेवी माने,प्रेरिका  शुभांगी माने, राहुल हक्के, तानाजी गडदे,हॅलो फाऊंडेशनचे ज्ञानेश्वर जाधव, यांच्या सह गावातील विद्यार्थी , विद्यार्थिनी आदि उपस्थित होते.

Labels:

सर्वसामान्य जनतेच्या आर्शिवादामुळे सभापती पदी निवड; ग्रामीण विकासाला चालना देण्याकरिता प्रयत्नशिल - नुतन सभापती सिध्देश्वर कोरे

सर्वसामान्य जनतेच्या आर्शिवादामुळे सभापती पदी निवड;  ग्रामीण विकासाला चालना देण्याकरिता प्रयत्नशिल - नुतन सभापती सिध्देश्वर कोरे ,

नंदगाव येथे जंगी स्वागत करत जल्लोषात भव्य सत्कार 

नळदुर्ग,दि.२९ :


सर्वसामान्य जनतेनी माझ्यावर विश्वास दाखवुन मला सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळेच आमदार राणाजगजितसिंह पाटील, जि.प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील, युवक नेते मल्हार पाटीलसह जिल्ह्याचे नेतेमंडळीनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असुन पारदर्शी व जास्तीत जास्त विकासाला चालना देणार असल्याचे धाराशिव जिल्हा परिषदेचे नुतन सभापती सिध्देश्वर अण्णा कोरे यांनी नंदगाव या तुळजापूर येथे आयोजित सत्कारा प्रसंगी बोलताना सांगितले.

सिध्देश्वर अण्णा कोरे यांची धाराशिव जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या मुळ गावी नंदगाव ता . तुळजापूर येथे शनिवार रोजी ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच शशिकांत नगिले, ग्रामपंचायत सदस्य धनराज कलशेट्टी,  मल्लिनाथ गुड्डे, सतीश काटे, ग्रामपंचायत अधिकारी राहुल कांबळे,
माजी सरपंच भीमराव पिरेषा चिनगुंडे, माजी सरपंच श्रद्धानंद कलशेट्टी,  विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन धर्मराव तुपे, माजी उपसरपंच  दशरथ काटे गुरुजी,  प्रतिष्ठित नागरिक शिवानंद शरणार्थी, चिदानंद बशेट्टी, शिवशंकर वाले , संजय सूर्यकांत पाटील, इराण्णा वाले ,  भीमाशंकर करंडे गुरुजी, श्रीशैल कट्टे, देवेंद्र तळणे, सचिन कोरे , सागर चौगुले ,सुरज गुड्डे, प्रशांत येणेगुरे,  महेश सातलगावकर , अमोल स्वामी, आदीसह नागरिक , ग्रामपंचायतचे  कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार सरपंच शशिकांत सांगितले यांनी मानले.

 

Labels:

Saturday, 28 March 2026

सिध्देश्वर (अण्णा) कोरे यांची धाराशिव जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती पदी निवड झाल्याने सत्कार

सिध्देश्वर (अण्णा) कोरे यांची धाराशिव जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती पदी निवड झाल्याने सत्कार करुन दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 


नळदुर्ग,दि.२८:

भाजप महायुतीचे नंदगाव गटाचे (ता.तुळजापूर)  जिल्हा परिषद सदस्य सिध्देश्वर (अण्णा) कोरे यांची अर्थ व बांधकाम सभापती पदी निवड झाल्याने मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


भाजप नळदुर्ग शहराचे माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे, पत्रकार शिवाजी नाईक ,सुदर्शन पुराणिक यांच्या वतीने नुतन जिल्हा परिषद बांधकाम सभापती सिध्देश्वर (अण्णा) कोरे यांचा नंदगाव येथे त्यांच्या निवासस्थानी शनिवार रोजी शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी परमेश्वर भिमराव चिनगुंडे, गणेश नरे, अप्पाशा कोरे, ख्याम गुड्डे, ,शरद येणेगुरे, परमेश्वर दमाचे, कैलास वाघमारे, तानाजी गुड्डे, शिवानंद कलशेट्टी, अविनाश कुलकर्णी आदींसह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


Labels:

Friday, 27 March 2026

भाजप महायुतीचे जि.प.सदस्य सिध्देश्वर (अण्णा) कोरे यांची अर्थ व बांधकाम सभापती पदी निवड

जि.प.सदस्य सिध्देश्वर (अण्णा)  कोरे यांची अर्थ व बांधकाम सभापती पदी निवड

नळदुर्ग,दि.२७ :

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते, तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषदेचे  भाजप महायुतीचे नुतन धाराशिव जि.प.सदस्य सिध्देश्वर (अण्णा)  कोरे यांची अर्थ व बांधकाम सभापती पदी निवड करण्यात आली आहे.हे वृत्त समजताच समाज माध्यमांवर त्यांच्या समर्थकांतुन अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

सिद्धेश्व्र कोरे हे नंदगाव ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षापासून सरपंच , उपसरपंच, सदस्य म्हणून जनतेची सेवा केल्याचे सर्वश्रुत आहे. गावातीलच नव्हे तर परिसरातील सर्वसामान्य व्यक्तीस काही अडचण आली, गंभीर प्रसंग ओढावला कि ते मदतीसाठी धावून जातात. तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष ,उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर आज झालेल्या विशेष सभेत चार महत्त्वाच्या सभापती पदांची निवड जाहीर करण्यात आली. त्यामध्ये समाजकल्याण सभापतीपदी विश्वास कोकणे (भाजप), कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी भाऊसाहेब खराडे (राष्ट्रवादी), महिला व बालकल्याण सभापतीपदी पूजा शिंदे (शिवसेना) आणि अर्थ व बांधकाम सभापतीपदी सिद्धेश्वर कोरे (भाजप) यांची निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


Labels:

Thursday, 26 March 2026

नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यासाठी सव्वा सात कोटी संवर्धन कामांना मंजुरी : ऐतिहासिक किल्ल्याचे रुप पालटणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील

नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यासाठी सव्वा सात कोटी संवर्धन कामांना मंजुरी : ऐतिहासिक किल्ल्याचे रुप पालटणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील 

नळदुर्ग,दि.२६:

राज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला अशी ख्याती असलेल्या आणि मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नळदुर्ग किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 'नळदुर्ग किल्ला संवर्धन आणि स्थळ व्यवस्थापन आराखडा' या आराखड्यानंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामांसाठी तब्बल ७ कोटी १८ लाख ९१ हजार ७९१ रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. कामाची निविदा प्रक्रियाही नुकतीच सुरू झाली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाचा मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याचे रुप आता पालटणार आहे.अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयामार्फत हे काम पूर्ण केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे दुर्लक्षित राहिलेल्या नळदुर्ग किल्ल्याला पुन्हा एकदा गतवैभव लाभणार आहे. नळदुर्ग किल्ल्याच्या या पहिल्या टप्प्यातील कामात अनेक महत्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने तटबंदीचे संवर्धन हाती घेण्यात येणार आहे. किल्ल्याची ऐतिहासिक तटबंदी अनेक ठिकाणी कमकुवत झाली आहे, त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन केले जाणार आहे. किल्ल्यातील झुडपे आणि राडारोडाही हटविण्यात येणार आहे. किल्ल्याच्या परिसरात आणि तटबंदीवर वाढलेली अनावश्यक झुडपे तसेच साचलेला राडारोडा पूर्णपणे साफ करण्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

 देशभरातून तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणारे लाखो भाविक आवर्जून या भुईकोट किल्ल्याला भेट देतात. आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यातून शिर्डीला दर्शनासाठी जाणारे भाविक आणि पर्यटकही अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने किल्ला पाहण्यासाठी येत आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी आणि किल्ल्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी स्थळ व्यवस्थापन आराखड्याची अंमलबजावणी पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आली आहे. 

पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न...

कामाचा दर्जा राखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या नियमांनुसार आणि तज्ज्ञ वास्तुविशारदांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्याचे कंत्राटदाराला बंधनकारक असणार आहे. त्यामुळे पुढील दीड वर्षाच्या आत पर्यटकांना नळदर्ग किल्ल्याचे पालटलेले रूप पाहायला मिळणार आहे. या संवर्धन प्रकल्पामुळे नळदुर्ग किल्ला पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे येईल आणि स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी आपण सुरू केलेल्या प्रयत्नांना या कामामुळे आणखी दिलासा मिळणार आहे.असेही त्यांनी सांगितले.


Labels:

कोणत्याही परिस्थितीत महिलांना आर्थिक सक्षम करण्यावर भर देणार - जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील

कोणत्याही परिस्थितीत महिलांना आर्थिक सक्षम करण्यावर भर देणार - जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील

धाराशिव दि.२६ :

शहरातील प्रत्येक वार्डातून पाच प्रभागातून दहा महिलांना स्वयंरोजगारासाठी स्वावलंबी करण्यासाठी प्रधानमंत्री, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून अर्थसहाय्य मिळवून देऊ. तर महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी मदत करण्यात येईल. तसेच शहरातील कचरा संकलनासाठी वीस घंटागाड्या देण्यासह हातलाई तलावावर म्युझिकल फाऊंटन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा करण्यावर भर देणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी दि.२४ मार्च रोजी दिले आहे.

धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात धाराशिव नगर परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. यावेळी धाराशिवच्या नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे, कळंबच्या नगराध्यक्ष सुनंदा शिवाजी कापसे, धाराशिव पंचायत समितीच्या सभापती गोकर्णा गोपाळ कदम, मुख्याधिकारी नीता अंधारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या ३० महिलांचा सन्मान चिन्ह, मोगऱ्याचे रोप व शाल देऊन पाटील यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला बाल कल्याण उपसभापती दिपाली पाटील यांनी तर सूत्रसंचालन वैशाली सोनवणे यांनी आणि उपस्थितांचे आभार वैशाली सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महिला व बाल कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी, सर्व नगरसेवक यांनी परिश्रम घेतले. यावेळी महिला व नगर परिषदेचे कर्मचारी  उपस्थित होते.

Labels:

नळदुर्ग : भव्य श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठया जल्लोषाने साजरा ; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते महाआरती, श्री रामतीर्थ देवस्थान जीर्णोद्धारचेही श्री विष्णू महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन.

नळदुर्ग : भव्य श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठया जल्लोषाने साजरा ; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते महाआरती, श्री रामतीर्थ देवस्थान जीर्णोद्धारचेही  श्री विष्णू महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन.

नळदुर्ग,दि.२६ :

भव्य श्रीराम जन्मोत्सव सोहळा तिर्थक्षेत्र  रामतीर्थ मंदिरात गुरुवारी मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांने साजरा करण्यात आला.यावेळी भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली . तत्पुर्वी  रामनवमीनिमित्त नळदुर्ग शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे.यावेळी रामभक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
श्री राम मंदिर देवस्थानचे महंत श्री विष्णू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राम जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आले होते. "श्री" स अभिषेक करून शृंगारने सजविण्यात आले . अणदूर व नळदुर्ग येथील पालखीचे आगमन झाले. त्यांनतर महाआरती करून उपस्थित भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्री रामतीर्थ देवस्थान जीर्णोद्धारचेही भूमिपूजन श्री विष्णू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
 
यावेळी भाजप महायुतीचे  नगराध्यक्ष बसवराज धरणे, भाजपचे नेते सुशांत भूमकर, माजी जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण,माजी सरपंच अशोक पाटील, उद्योगपती मनिष  हजारे, नगरसेवक तानाजी जाधव, दत्तात्रय दासकर, पांडुरंग पुदाले, प्रविण गायकवाड,  नगरसेविका श्रीमती मिनाक्षी  काळे, श्रीमती सुमन ठाकूर, राणी सुरवसे, साहेबराव धुगे , धिमाजी घुगे,किशोर नळदुर्गकर, श्रमिक पोतदार, पद‌्माकर घोडके, बलभीम मुळे, माजी नगरसेवक सचिन डुकरे,  प्रभाकर घोडके, श्रीकांत पोतदार, बाबु राठोड ,बलदेवसिंग ठाकुर, संदिप गायकवाड, बबन चौधरी, विनिल जांभळे ,अमोल मेंडके ,माजी नगरसेवक विनायक अहंकारी,सुनिल उकरंडे,  शिवाजी व-हाडे गुरुजी, स्वप्नील काळे, भिमाशंकर बताले, उमेश नाईक, अजय देशपांडे, सुदर्शन पुराणिक, गणेश मोरडे, किरण दुस्सा, सागर हजारे,अजय भास्कर, अक्षय भोई,  सुप्रीया काळे, माधुरी जांभळे ,राखी दुबे, पुजा गायकवाड, सुप्रीया पुराणीक,  कार्तिकी दुस्सा आदीसह परिसरातील विविध गावातील राम भक्त उपस्थित होते. 

आमदार राणाजगजितसिंह पाटील 
प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामतीर्थ, नळदुर्ग येथे भेट देऊन दर्शन घेतले.
समृद्ध धार्मिक वारसा लाभलेले हे निसर्गरम्य ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत असल्याचा विशेष आनंद वाटतो. दरवर्षी हजारो भाविक येथे श्रद्धेने येतात. त्यांच्या सोयीसुविधा अधिक सक्षम करण्यासाठी स्थानिक विकास निधी तसेच पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास निधीतून टप्प्याटप्प्याने विकासकामे सुरू आहेत. सर्वांच्या सहकार्याने या पवित्र स्थळाचा सर्वांगीण विकास निश्चितपणे साध्य करू.

 रामनवमी निमित्त नळदुर्ग येथील संविधान चौकात  शिवसेना उबाठाच्यावतीने  श्री. प्रभू रामचंद्राच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी  महाविकास आघाडीचे नगरसेवक  मारुती खारवे निवृत्त शिक्षक दत्तात्रय वाघमारे, लष्करे , शिवसेना उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकुर, शहर प्रमुख संतोष पुदाले, उपशहरप्रमुख शाम कनकधर, सोमनाथ म्हेत्रे , चंद्र सगरे, भिमा कोळी, मालू होनाळे, आदी उपस्थित होते. तसेच अणदूर येथून श्री प्रभू रामचंद्राच्या पालखीची  मिरवणूक संविधान चौकात आल्यानंतर प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची पूजा करण्यात आली.

Labels:

तलमोड ता. उमरगा येथे श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

 
तलमोड ता. उमरगा येथे श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून  विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तलमोड,दि.२६: संजय मोरे 

 प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी श्री. हनुमान जयंतीचे औचित्य साधून तलमोड ता.उमरगा जि. धाराशिव येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे दि. २६ मार्च २०२६ ते १ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे औचित्य साधून श्रीधाम वृंदावन हिंदू महासभा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य व कृष्ण जन्मभूमी मथुरा संघर्ष न्यास महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भागवत कथाकार श्री. सोपानदेव महाराज यांच्या सुंदर भागवत कथेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास तलमोड व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून भागवत सप्ताहाची शोभा वाढवावी असे आवाहन तलमोड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

या श्री हनुमान यात्रा कालावधीत पहाटे चार ते सहा काकड आरती, सहा ते सात श्री ची पूजा व अभिषेक, सात ते साडे अकरा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, बारा ते एक भोजन, दुपारी दोन ते संध्याकाळी सहा वाजे पर्यंत श्रीमद् भागवत कथा, सहा ते सात हरिपाठ, रात्री सात ते आठ भोजन, रात्री नऊ ते अकरा हरी किर्तन, रात्री अकरा ते पहाटे चार पर्यंत हरिजागर असा दैनदिन कार्यक्रम संपन्न होणार आहे. या दरम्यान दि. २६ मार्च रोजी किर्तनकार हभप राजेश पाटील महाराज ( गुंजरगा ) दि. २७ मार्च रोजी हभप सुधाकर महाराज इंगळे ( सोलापूर ) दि. २८ मार्च हभप सोपान महाराज ( अर्विकर ) दि.२९ मार्च हभप कांचनताई शेळके, दि. ३० मार्च हभप गोपीनाथ महाराज जरांगे पाटील, दि. ३१ हभप हरि गुरुजी लवटे ( श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान ) दि. १ एप्रिल रोजी हभप दिनकर महाराज निकम ( मोगरगा ) यांचे किर्तन होणार आहे. त्याचप्रमाणे दि. २ एप्रिल रोजी सकाळी श्री श्री जन्म व गुलाल वहाणे व हनुमान चालीसा भजन , महारुद्राभिषेक व महाप्रसाद कार्यक्रम , पालखी मिरवणूक व भारुडाचा कार्यक्रम, दि. ३ एप्रिल रोजी श्री चा अभिषेक, महाप्रसाद , हभप विश्वनाथ मोरे ( मळगीकर )पुणेकर यांचे गोपाळ काल्याचे किर्तन , संघ्याकाळी पाच वाजता गोपाळ काला व रात्री नऊ वाजता सुप्रसिद्ध वाख्याते श्री अविनाश भारती यांचे तरुणांचे प्रबोधन या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तलमोड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Labels:

Tuesday, 24 March 2026

नळदुर्ग नगरपालिकेस वार्षिक टेंडर प्रक्रियेतून मिळाले लाखाचे उत्पन्न ; वार्षिक टेंडरसाठी १३६ अर्जाच्या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद

नळदुर्ग नगरपालिकेस  वार्षिक टेंडर  प्रक्रियेतून  मिळाले लाखाचे उत्पन्न ;  वार्षिक टेंडरसाठी १३६ अर्जाच्या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद

नळदुर्ग, दि.२४ : 

 येथील नगरपालिकेच्या  वार्षिक टेंडर अर्ज विक्री प्रक्रियेतून नगरपालिकेच्या तिजोरीत सुमारे ९५ हजार रुपयांची  इतिहासात पहिल्यांदाच भर पडली. वार्षिक टेंडरसाठी १३६ अर्ज प्राप्त झाले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. 

वार्षिक कामासाठी एकूण  तीस प्रकाराच्या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. यापैकी कार्यालयीन कामासाठी छपाई- दोन, विद्युत विभागाच्या दिवाबत्तीसाठी एक व विद्युत विभागाच्या हायमास्ट साठी शून्य अशा तीन कामासाठी थंड प्रतिसाद मिळाला तर पाणीपुरवठा विभागाच्या ब्लिचिंग पुरवठा व तुरटी पुरवठा करणे या कामासाठी  प्रत्येकी १४ जणांनी निविदा भरली आहे. त्या खालोखाल आठवडे बाजारात व दैनंदिन वसुलीसाठीच्या कामासाठी १२ जणांनी निविदा भरली आहे. वाढलेल्या स्पर्धेमुळे पालिकेला चांगले उत्पन्न मिळाले आहे.

नळदुर्ग नगरपालिका वार्षिक टेंडर 

1. कार्यालयीन कामासाठी स्टेशनरी साहित्य पुरवठा करणे  03 निविदा प्राप्त.

2. कार्यालयीन कामासाठी छपाई - 02

3. संगणक खरेदी दुरुस्ती तत्सम साहित्य- 03

4. सी.सी. टिव्ही कॅमेरा पुरवठा- 03

5. झेरॉक्स- 04

6. चहा, नाष्टा, अल्प उपहार - 03

7. फुल, हार, श्रीफळ- 04

8. फोटो, व्हिडिओ शुटींग डॅमेरा पुरवठा- 04

9. मंडप, स्पीकर, बॅरेकेटिंग, स्टेज- 03

10. जे.सी.बी. पोकलेन- 03

11. खडी, मुरूम पुरवठा करणे -07

12. कुशल कामगार- 05

13. रिक्षा आलाऊसिंग- 03

14. विद्युत साहित्य खरेदी -05

15. विद्युत विभाग दिवाबत्ती-01

16. विद्युत विभाग हायमास्ट- 02

17. स्वच्छता विभाग साहित्य पुरवठा करणे - 05

18. जंतूनाशके व फिनेल- 04

19. जॅकवेल मोटार दुरुस्ती- 04

20. पाणी पुरवठा विभाग साहित्य- 03

21. पाणी पुरवठा विभाग जलवाहिनी-  00

22. कप्पी पुरवठा  विंधन विहीर- 03

23 टॅकर पुरवठा - 03

24. ट्रैक्टर दुरुस्ती व बॅटरी व प्रहरी/ सर्व्हिसिंग-6

 25. पत्र्याचे शेड मारणे-04

26. ब्लिचिंग पुरवठा करणे -14

27 तुरटी पुरवठा करणे - 14

28. किल्ला गेट पार्किंग -06

आठवडी बाजार दैनंदिन  वसूली- 12

30. डंपिंग ग्राउंड मशनरी दुरुस्ती- 03,
इत्यादी प्रमाणे एकुण 136 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

Labels:

पत्रकार शिवशंकर तिरगुळे यांचे निधन ; सामुदायिक श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन

पत्रकार शिवशंकर  तिरगुळे यांचे निधन ; सामुदायिक श्रध्दांजली  कार्यक्रमाचे आयोजन

अणदुर,दि.२४: 

अणदुर ता.तुळजापूर  येथिल जय मल्हार पत्रकार संघाचे सदस्य , निर्भीड व झुंजार पत्रकार, तसेच चन्नबसव सामाजिक संस्थेचे संस्थापक कै. शिवशंकर तिपण्णप्पा तिरगुळे यांचे दि.२३ मार्च रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने  दुःखद निधन झाले. बुधवार दि. २५ मार्च २०२६ रोजी सामुदायिक  श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले आहे.

तिरगुळे यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सर्वसामान्यांचा आवाज बुलंद केला. अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लिहिणारा, समाजातील वंचित घटकांसाठी झटणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा एक संवेदनशील पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

त्यांच्या पवित्र स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी बुधवार दि. २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता हुतात्मा स्मारक सभागृह, अणदूर ता तुळजापूर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी उपस्थित राहून कै. शिवशंकर तिरगुळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Labels:

धाराशिव जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभापतीपदी सिद्धेश्वर (आण्णा ) कोरे यांची वर्णी लावण्याची नागरिकांसह सर्मथकांची मागणी

धाराशिव जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभापतीपदी सिद्धेश्वर (आण्णा ) कोरे यांची वर्णी लावण्याची नागरिकांसह सर्मथकांची मागणी


नंदगाव, दि.२४ :

नंदगाव जि.प. गटातून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निष्ठावंत  कार्यकर्ते सिद्धेश्वर (आण्णा) बाजीराव कोरे यांनी दणदणीत विजयी मिळविले  असुन  त्यांची जिल्हा परिषदेच्या  कृषी सभापतीपदी निवड करण्याची मागणी नंदगाव गटातील व परिसरातील नागरिकातुन  केली जात आहे .

तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गटातून भाजपचे विजयी झालेले जिल्हा परिषद सदस्य सिद्धेश्वर (अण्णा) कोरे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून कृषी विषयी त्यांना जाण आहे.त्याचबरोबर नंदगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून विविध समस्या, अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असल्याचे सर्वश्रुत आहे.
  सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीची त्यांना जाणीव आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. 

त्यांनी यापूर्वी तुळजापूर पंचायत समिती सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यांना जिल्हा परिषद कृषी विभाग सभापती म्हणून संधी दिली तर चांगल्या प्रकारे शेतकरी, शेतमजूरासह सर्वसामान्य जनतेची कामे करतील आणि त्याचा फायदा भविष्यात भाजप पक्षाला होणार आशी नागरिकांची धारणा आहे.तेंव्हा भाजपचा निस्वार्थी, निष्ठावंत कार्यकर्ता सिद्धेश्वर (अण्णा ) कोरे यांना जिल्हा परिषदेचे कृषी सभापतीपदी निवड करून काम करण्याची संधी द्यावी अशी मतदार संघातून कार्यकर्त्यासह त्यांच्या समर्थकांतुन मागणी होत आहे.

Labels:

Monday, 23 March 2026

ऊसाचे थकित बील देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखानदारांच्या विरोधात शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा

ऊसाचे थकित  बील देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखानदारांच्या विरोधात शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा 

नळदुर्ग ,दि.२३:

वारंवार विनंत्या अर्ज करुनही शेतकऱ्यांचे
ऊसाचे थकित  बील देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखानदारांच्या विरोधात नळदुर्ग येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बुधवार दि.२५ मार्च रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे सोलापूर जिल्हाधिका-याना देण्यात आला आहे.

 निवेदनात पुढे म्हटले आहे की, नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथील आम्ही शेतकरी  सोमनाथ कसेकर,  सुनिल चौधरी,  अबेदतुल्ला इनामदार व मीनाक्षी तानाजी काळे असे आम्ही चौघे धोत्री येथील गोकुळ शुगर या साखर कारखान्यास सन २०२४-२०२५ व २०२६ या वर्षाचे ऊस बील थकीत आहे. तरी बील देण्याबाबत तुळजापूर तालुक्यातील अनेक  शेतकऱ्यानी ऊस गाळपासाठी दिला होता. तरी त्यांचे ऊसाचे बील यापूर्वी दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप बील मिळाले नाही. सातत्याने त्यांच्याशी पत्रव्यवहार व फोनवर संपर्क करुन कारखानदार व संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करुन देखील अद्याप बील मिळाले नाही.  दवाखाना, लग्न कार्ये व अनेक अडचणी व समस्या असल्यामुळे शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती  आहे. तरी  थकीत बील  त्वरित देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावे अन्यथा ऊस बील न मिळाल्यास सर्व शेतकऱ्यांच्यावतीने  सोमनाथ गुरुलिंगप्पा कसेकर , सुनिल सुरेश चौधरी  स्वप्निल तानाजी काळे , अबेदतुल्ला इनामदार असे आम्ही शेतकरी दि. २५.३.२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे सांगितले आहे. यांची एक प्रत  माहितीस्तव , आमदार राणाजगजितसिंह पाटील, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय महसुल साहाय्यक, गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लि. धोत्री, जि. सोलापूर, साखर आयुक्त कार्यालय, सोलापूर, जिल्हा पोलीस अधिक्षक आदींना देण्यात आले आहे.

 


Labels:

Sunday, 22 March 2026

मुरुम रोटरीकडून बाजारकरुसाठी रस्त्यावर खास शुद्ध व थंडगार पाण्याची सोय; आठवडी बाजाराकरिता येणाऱ्या अबालवृद्धांकडून समाधान

मुरुम रोटरीकडून बाजारकरुसाठी रस्त्यावर खास शुद्ध व थंडगार पाण्याची सोय; आठवडी बाजाराकरिता येणाऱ्या अबालवृद्धांकडून समाधान

मुरुम ,दि.२२: 

 येथील रोटरी क्लब मुरूम सिटीकडून सध्या मोठ्या प्रमाणात हवेतील तापमान वाढल्याने नागरिकांना शुद्ध थंडगार पाणी मिळावे. या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी मुख्य रस्त्यावर खास रविवारी (ता. २२) रोजी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणपोईची सोय करण्यात आली.

 या परिसरातील विविध गावातून बाजाराकरिता येणाऱ्या वाड्या-वस्तीवरील बाळ-गोपाळ, अबालवृद्ध व नागरिकांना तात्काळ पाणी मिळावे या हेतूने या सामाजिक उपक्रमाचा तथा पाणपोईचा शुभारंभ महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे संचालक अमृत वरनाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, प्रा. डॉ. महेश मोटे, उपप्राचार्य कल्लय्या स्वामी, रोटरीचे सचिव कल्लाप्पा पाटील, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, संतोष कांबळे, खुणे गुरुजी आदींसह नागरिक उपस्थित होते. यावेळी बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना रोटरी सदस्यांकडून पाणी वाटप करण्यात आले. सदर उपक्रमाची सोय मार्च-मे या तीन महिन्याच्या आठवडी बाजारादिवशी करण्यात येणार असल्याचे रोटरीचे सदस्य प्रकाश रोडगे यांनी यावेळी सांगितले. रोटरीकडून पाणपोई या सेवाभावी उपक्रमाचे नागरिकांमधून मोठे कौतुक होत आहे.
 फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील बाजार रस्त्यावर रोटरीकडून पाणपोईचे उद्घाटन अमृत वरनाळे करताना नितीन डागा, महेश मोटे, प्रकाश रोडगे व अन्य.

Labels:

प्रभू श्रीराम जयंती निमित्त आयोजित भव्य शोभायात्रेत नागरिकांनी सहभागी होण्याचे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे आवाहन

प्रभू श्रीराम जयंती निमित्त आयोजित भव्य शोभायात्रेत नागरिकांनी सहभागी होण्याचे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे आवाहन 


धाराशिव,दि.२२:

भारतीय जनता पार्टी, जिल्हा धाराशिवच्या वतीने आमदार राणाजगजीतसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर  यांच्या नेतृत्वामध्ये येत्या २६ तारखेला प्रभू श्रीरामांची जयंती जिल्ह्यामध्ये सर्वत्र भव्य शोभायात्रा आयोजित करून साजरी केली जाणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना या शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन धाराशिव भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केले आहे.

प्रभू श्रीराम नवमी निमित्त धाराशिव शहर व जिल्ह्यातील अनेक सामाजिक व धार्मिक संस्था, भजनी मंडळे, वारकरी संप्रदाय तसेच डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यापारी, उद्योजक, युवक मंडळे, महिला मंडळे, सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्था व विविध अध्यात्मिक संघटना यांनाही या पत्राद्वारे आवाहन करण्यात येते की, आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

सदर शोभायात्रा सकाळी १० वाजता त्या त्या शहरातील प्रमुख चौकातून निघून त्या भागातील प्रभू श्रीराम मंदिरात किंवा तेथील प्रमुख मंदिरामध्ये विसर्जित होईल.
या शोभायात्रेमध्ये जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन धाराशिव भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केले आहे.

                      
                   
 

Labels:

बोरी नदीच्या तिरावर उभारणार भव्य ध्यान मंदिर ; नळदुर्ग,अणदूर परिवाराच्या वतीने समर्थ प्रकट दीन उत्साहात साजरा

बोरी नदीच्या तिरावर उभारणार भव्य ध्यान मंदिर ; नळदुर्ग,अणदूर परिवाराच्या वतीने समर्थ प्रकट दीन उत्साहात साजरा

अणदूर,दि २२ :

 समर्थ नगरी प्रतिष्ठान अक्कलकोट, नळदुर्ग, अणदूर परिवाराच्या वतीने नळदुर्ग येथे अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकट दीन नामस्मरण व ध्यानसाधना करून मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोरी नदीच्या काठावर भव्य ध्यानमंदिर उभारण्यात येणार असल्याची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सैदप्पा इंगळे यांनी केली. स्वामी समर्थ प्रकटदिनी नळदुर्ग येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.

नळदुर्ग येथील नदीच्या तीरावर सीमा जोशी, गायत्री कुलकर्णी आणि मंजुषा जेवरीकर यांनी या ध्यान मंदिरासाठी जागा दिली असून,त्याच्या बाजूला समर्थ नगरी प्रतिष्ठाननेही जागा घेतली आहे..त्या जागेत हे ध्यान मंदिर उभारण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला नळदुर्ग आणि अणदूर परिसरातून अनेक स्वामी भक्तांनी हजेरी लावली होती, त्यात महिलांची संख्या मोठी होती,त्या ठिकाणी स्वामी समर्थांचे वस्त्र आणि प्रतिमा ठेवण्यात आलेली होती.

महिलांनी,भजन,तारकमंत्र,ध्यान,नामजप करून स्वामी महाराजांचा प्रकटदिन साजरा केला,राज्यभरामध्ये श्रीवटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान चेअरमन महेश इंगळे व स्वामीभक्त चोळप्पा महारांचे वंशज वे.शा.सं.अण्णू महाराज यांच्या,मार्गदर्शनाखाली,स्वामीभक्त भाविक स्वामीनामप्रसाराचे कार्य करत असतात.
या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष सैदप्पा इंगळे यांच्यासोबत अक्कलकोट येथून गणेश पाठक,सौ.सुखदा ग्रामोपाध्ये, राहुल वटकर , कावेरी धरणे यांच्यासह पत्रकार संजय जेवरीकर,कल्याण कुलकर्णी,राहुल कुलकर्णी, जागा मालक शरद देशमुख हे उपस्थित होते.

Labels:

"आपलं घर"च्या अनाथ बालकांना साखरेचे हार वाटप करून राजेंद्र महाबोले यांनी केला गुढीपाडवा साजरा

 "आपलं घर"च्या अनाथ बालकांना साखरेचे हार वाटप करून राजेंद्र महाबोले यांनी केला गुढीपाडवा साजरा 

नळदुर्ग,दि.२२:

नळदुर्ग येथील नाभिक समाजाचे नेते व व्यापारी राजेंद्र महाबोले यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गुढीपाडव्याच्या निमित्ताने नळदुर्ग येथील "आपलं घरं " या निवासी शाळेतील मुलांना साखरेचे हार वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करतात.
 यावर्षीही हा कार्यक्रम अत्यंत सुंदर पद्धतीने पार पाडला.. राजेंद्र महाबोले यांच्या मातोश्री श्रीमती सरुबाई महाबोले यांच्या हस्ते व नळदुर्ग नगरपालिकेचे पाणी पुरवठा सभापती तानाजी जाधव व नगरसेविका सौ. राणीताई शिवाजी सुरवसे यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी आपलं घरं येथील मुलांनी स्वागत गीत गायले. याप्रसंगी नगरसेवक तानाजी जाधव व माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी मनोगतातून या कार्यक्रमाचे कौतुक केले.

यावेळी विकास सोसायटीचे सदस्य रघुनाथ नागणे.. निवृत्त शिक्षक सुभाष महाबोले, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव,दिशा नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक उमेश जाधव, ओंकार महाबोले,आकाश सुरवसे,लखन महाबोले,विशाल सुरवसे आदी उपस्थित होते..

Labels:

Saturday, 21 March 2026

नळदुर्ग पोलीसांनी 10 कोटी 38 लाख 20 हजार रुपये किंमतीचे हशीम ऑईल केले जप्त ; दोघा अनोळखी इसमावर गुन्हा दाखल

प्रतिकात्मक चित्र 

 नळदुर्ग पोलीसांनी 10 कोटी 38 लाख 20 हजार रुपये किंमतीचे हशीम ऑईल केले जप्त

नळदुर्ग,दि.२१:

नळदुर्ग पोलीसांनी 10 कोटी 38 लाख 20 हजार रुपये किंमतीचे हशीम ऑईल केले जप्त ; दोघा अनोळखी इसमावर गुन्हा दाखल 

 दि.19.03.2026 रोजी सहा पोलीस निरीक्षक- श्री. सोळुंके, पोलीस उप निरीक्षक  गिते हे पोलीस स्टाफ सह उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग ते तुळजापूर कडे जाणारे रोडवर नाकांबदी व कोबिंग ऑपरेशन करत असताना पोलीस पथकास एक संशयास्पद कार क्र एमएच 12 जीव्ही 1517 दिसून आल्याने त्यास थांबण्याचा ईशारा केला असता ती पळून जात असताना पोलीस पथकाने सदर गाडीचा पाठलाग करत होते. दरम्यान गाडीतील एका इसमानी रोडचे कडेला एक बॅग फेकुन दिल्याने पथकाने सदर बॅगची पाहणी केली असता  बॅगमध्ये दहा प्लॅस्‌टीकच्या पिशव्यामध्ये हिरवट काळपट अवस्थेतील हशीम ऑईल सदृश्य अंमली पदार्थ वजन 10.382 कि. ग्रॅ एकुण 10,38,20,000₹ किंमतीचा हशीम ऑईल अमंली पदार्थ माल मिळून आल्याने सदर माल त्याचा सविस्तर पंचनामा करुन माल जप्त केले.


 हशीम ऑईल सदृश्य अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या दोन अनोळखी इसमावर(क्र एमएच 12 जीव्ही 1517)  यांचेविरुध्द गुंगीकारक औषधीद्रव आणि मनोव्यावारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम 8(सी),20(B)(ii)(C), 25, 29 अन्वये गुरंन 114/2026 असा गुन्हा नळदुर्ग पो.ठा. येथे 20.03.2026 रोजी नोंदवला आहे.

            सदरची कामगीरी ही  पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक  श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली  उपविभागीय पोलीस अधिकारी  निलेश देशमुख, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी परि.सहा.सपोअ मेघना आय एन, सपोनि  सोळुंके, आनंद कांगुने, पोउपनि-  गिते, आदीसह नळदुर्ग पोलीस ठाण्याचे  पोलीस पथकाने केली

Labels:

Thursday, 19 March 2026

मारुती बनसोडे यांची शासनाच्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी निवड

मारुती बनसोडे यांची महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी निवड

नळदुर्ग,दि.१९:एस.के. गायकवाड :

 महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत दिला जाणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी  राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी नळदुर्गच्या परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे.

   मारुती बनसोडे यानी सन १९९o -९१ मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म शताब्दी वर्षात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी १०१ व्याख्यानाचा संकल्प केला व तो संकल्प त्यानी पूर्ण ही केला.त्यानंतर चिवरीच्या पशुहत्या विरोधी आंदोलनातील ते सक्रिय सहभागी झाले होते. दि. ०४ ऑगस्ट १९९६ ला तुळजापूर येथे त्यानी पुढाकार घेवून मराठवाडा पातळीवरील पोतराज प्रथा निर्मूलन निर्धार परिषद घेतली. अंधश्रध्दा निर्मल समितीचे संस्थापक कार्याध्याक्ष  कै.डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत त्यानी दहा वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. त्यानंतर परिवर्तन सामाजिक संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातूनही धाराशिव जिल्ह्यात  त्यांनी विविध विषयावर काम केले आहे. 

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा संघटक म्हणून  ते गेली तीन-चार वर्षे काम करीत आहेत. सन २०२३ - २४ या कालावधीत व्यसनमुक्तीसाठी धाराशिव जिल्हयात  काम केल्यामुळे राज्य शासनाने त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार - २o२३ - २४ साठी निवड करण्यात आली आहे.सदर निवडी संर्भात दि.१८ मार्च २o२६ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने एक जीआर काढलेला असून त्यामध्ये त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.धाराशिव जिल्ह्यातून  एकमेव त्यांची या पुरस्कारासाठी निवडीबद्दल परिसरातून अनेकांनी त्यांना शुभेच्छा देवून आभिनंदन केले आहे.

Labels:

Friday, 13 March 2026

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील तर उपाध्यक्षपदी उषाताई गायकवाड यांची निवड

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील तर उपाध्यक्षपदी उषाताई गायकवाड यांची निवड 


धाराशिव, दि.१३ : 

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महायुतीच्या सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील आणि उपाध्यक्षपदी सौ. उषाताई रवींद्र गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
 जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवार दि.१३ मार्च रोजी झालेल्या निवड प्रक्रियेत ५५ पैकी तब्बल ४५ मते महायुतीला मिळाली. या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.
सौ. अर्चनाताई पाटील यांच्या रुपाने इतिहासात प्रथमच धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपला मिळाले आहे. ही बाब ऐतिहासिक, अभिमानास्पद आहे. हा विजय महायुतीच्या भक्कम एकजुटीचा, विकासाभिमुख विचारसरणीचा आणि धाराशिव जिल्ह्यातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

 जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा सौ. अर्चना पाटील व उपाध्यक्षा सौ. उषाताई रवींद्र गायकवाड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले, शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होईल, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे निर्णय अधिक वेगाने पुढे जातील, असा विश्वास आहे.

महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अधिक बळ मिळत असून, धाराशिव जिल्ह्याच्या प्रगतीला नवी दिशा आणि नवे बळ मिळेल, याची खात्री त्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख  राजन साळवी, माजी आमदार  सुजितसिंह ठाकूर, माजी खा. रविंद्र गायकवाड, माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले तसेच, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, अँड नितीन काळे, यासह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.



Labels:

Wednesday, 11 March 2026

प्रशासकीय कालावधीतील अनेक विकासकामे दिर्घ काळापासुन रखडत पडल्याने मोठा गैरप्रकार झाल्याचा संशय ; नळदुर्ग नगरपालिकेची एस आय टी मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

प्रशासकीय कालावधीतील  अनेक विकासकामे  दिर्घ काळापासुन रखडत पडल्याने मोठा गैरप्रकार झाल्याचा संशय ; नळदुर्ग नगरपालिकेची एस आय टी मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी 


नळदुर्ग,दि.११:

नगरपालिका अतंर्गत करण्यात येणारे अनेक विकासकामे दिर्घकाळ पासुन रखडत पडलेली असल्याचे दिसून येत आहे.तर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून न.प.चे लेखा परिक्षण झाले नसल्याचे उघडकीस आले असुन प्रशासकीय कालावधीत मोठा अनागोंदी कारभार झाल्याने विशेष बाब म्हणून नळदुर्ग न.प.ची प्रशासकीय कालावधीतील संपूर्ण कामकाजाची एस आय टी मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

नळदुर्ग नगरपालिकेच्या विविध योजनेतून असंख्य कामे मागील दोन वर्षांपासून रखडली आहेत. यामध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते, नाली, ओपन स्पेस विकसित करणे व सभागृह आदी विकास कामांचा समावेश आहे. धक्कादायक बाब ऐवढी कामे रखडलेली असताना, जागा उपलब्ध नसल्याने किंवा वाद उद्भवल्याने प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नसताना पालिका प्रशासनाकडून नवीन कामांचा घाट घातला जात आहे. रखडलेली ही सर्व कामे प्रशासन काळातील आहेत. मात्र आता लोकप्रतिनिधी आल्यानंतर मागील कामे पूर्ण करणे अपेक्षित असताना निधी परत जाण्याच्या भीतीपोटी आठ महिन्यापूर्वी टेंडर प्रक्रिया झालेली कामे सुरू करण्याची तयारी केली जात आहे मात्र दोन वर्षांपूर्वीच्या कामाचे काय असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे अक्कलकोट रोडचे शॉपिंग कॉम्प्लेक्स, माऊली नगर येथील ओपन स्पेस जागा, अपर तहसील कार्यालय येथील पाणी टाकी, शास्त्री चौक येथील सिमेंट रस्ता इंदिरानगर येथील सिमेंट रस्ता अशी असंख्य मंजूर कामे रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.
रखडलेल्या कामांमध्ये व्यंकटेश नगर ,  आण्णाप्पा नगर, माऊली नगर येथील ओपन स्पेस विकसित करणे या कामांचा समावेश असून बहुतांशी कामाचा कार्यारंभ आदेश १२ मार्च २०२४ रोजी देण्यात आला. या कामाची मुदत १८० दिवसाची होती मात्र वर्षभरानंतरही फक्त संरक्षक भिंतीचे काम दिसत आहे तेही अपूर्ण अवस्थेत करण्यात आहे. यातील बहुतांशी कामाच्या ठिकाणी कामाची माहिती असलेला फलक  लावण्यात आलेला नाही. तसेच मुस्लिम समाजासाठी असलेला शादीखाना, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक स्मारक, इंदिरानगर येथील रस्ते व नाली, भवानी नगर येथील बाळकृष्ण मंदिर जवळील सभागृह, चर्मकार समाजाचे सभागृह, बुद्ध विहार सभागृह, मारुती मंदिर इंदिरानगर सभागृह, विविध प्रभागातील रस्ते व नाली कामेही रखडलेली आहेत.

Labels:

Tuesday, 10 March 2026

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नाला अखेर यश ,नळदुर्ग ते अक्कलकोट दरम्यानच्या १४.१७ किमी उर्वरित कामाचा मार्ग मोकळा, १०५ कोटी मंजूर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नाला अखेर यश ,नळदुर्ग ते अक्कलकोट दरम्यानच्या १४.१७ किमी उर्वरित कामाचा मार्ग मोकळा, १०५ कोटी मंजूर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय ;  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मानले आभार 

तुळजापूर,दि.१०:

मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६५२ वरील नळदुर्ग ते अक्कलकोट या विभागाच्या पुनर्वसन आणि सुधारणेच्या कामाला अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पांतर्गत उर्वरित १४.१७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी आता १०५ कोटी १३ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे हा महत्त्वाचा रस्ता आता दोन पदरी होणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नाला यश आले असून विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नळदुर्ग येथील जाहीर सभेत जाहीर केल्याप्रमाणे या मार्गासाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, हा प्रकल्प 'ईपीसी' (EPC) मोडवर राबवला जाणार असून यामध्ये बांधकामासाठी १०३ कोटी ४२ लाख रुपये आणि पुढील दहा वर्षांच्या देखभालीसाठी साधारण १७ कोटी १ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. एकूण १०५ कोटी १३ लाख रुपयांच्या या निधीला राष्ट्रपतींच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे. 

 कामात पारदर्शकता आणि गुणवत्ता राखण्यासाठी मंत्रालयाने कडक अटी घातल्या आहेत. काम सुरू होण्यापूर्वी, कामादरम्यान आणि काम पूर्ण झाल्यावर 'नेटवर्क सर्व्हे व्हेईकल' (NSV) द्वारे रस्त्याची तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 

कार्यकारी अभियंता यांना या कामाचा त्रैमासिक प्रगती अहवाल केंद्र सरकारकडे सादर करावा लागणार आहे. या निर्णयामुळे धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार असून अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत नळदुर्ग येथे जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी शब्द दिला होता. आपण स्वतः त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. आपल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांनी जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला बळ देणाऱ्या या मार्गाच्या निधीला मंजुरी दिल्याबद्दल जिल्हा वासियांच्या वतीने धन्यवाद.

जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला मिळणार बूस्ट 

या महत्त्वाच्या मार्गामुळे अक्कलकोट-नळदुर्ग आणि तुळजापूरसह प्राचीन तेर येथील पर्यटन व्यवसायाला मोठा बूस्ट मिळणार आहे. पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी आपण सुरू केलेल्या प्रयत्नांना या निर्णयामुळे मोठे बळ मिळणार आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आरखड्याला गती मिळाली आहे, संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे त्याचबरोबर नळदुर्ग येथील अनेक विकास कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या नवीन मार्गामुळे ही चारही पर्यटन स्थळे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्यात दाखल होतील त्यातून आपल्याला अपेक्षित रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट पूर्ण होणार आहे.असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

Labels:

नळदुर्ग शहर भाजप कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा गौरव

नळदुर्ग शहर भाजप कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त  महिलांचा गौरव

नळदुर्ग,दि.१०:

नळदुर्ग  शहर भाजप कार्यालयात  जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा  गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. स्वाती पाटील, डॉ. माधुरी बाबरे, यास्मिन शेख, धानम्मा कट्टे, अंजुम शेख, अनुषा चव्हाण आणि कोमल देवकर यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. स्वाती पाटील व डॉ. माधुरी बाबरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाजपचे बबन चौधरी यांनी पुढाकार घेतले असून याप्रसंगी भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस श्रमिक पोतदार, भाजपचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके,  अबुअलहसन रजवी, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.

Labels:

प्रोफेसर ​डॉ. महेश मोटे यांना ‘मानद डॉक्टरेट’ उपाधीने गौरव

प्रोफेसर ​डॉ. महेश मोटे यांना ‘मानद डॉक्टरेट’ उपाधीने गौरव 

 मुरूम, ता. उमरगा, दि. १० : 

शैक्षणिक, संशोधन आणि ज्ञानवर्धन क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेऊन स्टार्टअप शिक्षा फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्या वतीने मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर व संशोधन केंद्रातील समन्वयक प्रोफेसर डॉ. महेशकुमार नारायण मोटे यांना ‘मानद डॉक्टरेट’ या उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे.

​डॉ. मोटे हे शैक्षणिक क्षेत्रात गेल्या ३० वर्षापासून राज्यशास्त्र विषयाचे अध्यापक म्हणून  अविरतपणे कार्यरत असून ते एक व्यासंगी व नामांकित व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. सध्या छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संशोधन समितीचे सदस्य, राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. ते पीएच. डी. चे संशोधन मार्गदर्शक म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली १० विद्यार्थ्यांना पीएच. डी. अवॉर्ड झाली असून सध्या ६ विद्यार्थी पीएच. डी. संशोधनाचे कार्य  करीत आहेत. त्यांच्या नावे ९ संदर्भ ग्रंथ व ७ स्पर्धा परीक्षेची पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग, पेपर वाचन करून त्यांचे ८० पेक्षा अधिक संशोधन लेख नामांकित जर्नल्स मध्ये प्रकाशित झाले आहेत. भारत सरकार डाक विभागाने माय स्टॅम्प मालिके अंतर्गत त्यांच्या नावे ६ टपाल तिकिटे प्रकाशित केली आहेत.  त्यांनी सन २०१२ मध्ये थायलंड देशातील बँकॉक या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत रिसर्च पेपर सादर करून थर्ड बेस्ट पेपर अवॉर्ड प्राप्त केले होते. त्यांनी आजवर ७५ च्या वर नामांकित संस्था, संघटनांकडून पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यांना ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी, अमेरिका या नामांकित विद्यापीठाकडून कल्याण, मुंबई येथे डी. लीट. पदवी तर इतिहास एवं पुरातत्व शोध संस्थान, संग्रहालय, बालाघाट (मध्यप्रदेश) या नामांकित पुरातत्त्व शोध संस्थेकडून सन २०२५ मध्ये विद्या सागर ची मानद उपाधी (डी. लीट.) पदवी ने सन्मानित झाले. त्यांच्या दीर्घकालीन शैक्षणिक अनुभवाचा आणि समाजाप्रती असलेल्या सामाजिक योगदानाचा विचार करून दिल्ली येथील फाउंडेशनच्या मूल्यांकन व संचालक मंडळाने या उच्च सन्मानासाठी त्यांची दि.९ मार्च २०२६ रोजी अधिकृतरीत्या दखल घेऊन त्यांना तसे प्रमाणपत्र पाठविण्यात आले आहे. 
​या मानद पदवीमुळे डॉ. मोटे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून शैक्षणिक, पत्रकारिता, सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सहकारी, विद्यार्थी, नातेवाईक,  मित्रपरिवारांकडून विशेष कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.

Labels:

Sunday, 8 March 2026

तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा गौरव

तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा गौरव 

तुळजापूर, दि.०८:

महिला केवळ घर सांभाळत नसुन देश घडविण्याचे सामर्थ्य त्यांच्या मध्ये आहे.त्यामुळे महिलांनी सक्षमपणे पुढे यायला पाहिजे  व सर्व क्षेत्रात कार्यरत राहिले पाहिजे असे मत माजी सरपंच प्रा.ज्योतीका चव्हाण यांनी केले 
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच ज्योतीका प्रकाश चव्हाण तर प्रमुख पाहुण्या म्हणून माजी प.स.सदस्या रेखा चव्हाण धानाबाई राठोड, राजश्री चव्हाण उपस्थित होत्या . यावेळी ते बोलत होत्या.
 यावेळी फुलाबाई लक्ष्मण  राठोड (सरपंच) रामतीर्थ शांताबाई राठोड ग्रा.प.सदस्य , कांताबाई पवार ग्रा.प.सदस्य जयश्री चव्हाण सी.आर.पी, सुरेखा चव्हाण हॅलो फाऊंडेशन प्रेरक,रेखा राठोड स्वयं शिक्षण प्रयोग संस्था, सविता राठोड सक्षम महिला बचत गट,वंदना चव्हाण ,गुणाबाई राठोड, शानुबाई चव्हाण, या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे सत्कार करण्यात आले.

 या कार्यक्रमासाठी शांताबाई चव्हाण, सुनिता चव्हाण,मंगल चव्हाण, पार्वती चव्हाण, शांताबाई राठोड, सुनिता सुनिल चव्हाण,रिना चव्हाण, ज्योती चव्हाण, उपस्थित होत्या.यावेळी सुत्रसंचलन गणेश चव्हाण यांनी केले शेवटी राष्ट्रगानने सांगता करण्यात आली.

Labels:

घनवन वृक्ष लागवड योजनेत गैरप्रकार झाल्याचा काँग्रेस नगरसेवकांचा आरोप ; दोषींवर कारवाईसाठी जिल्हाधिका-याकडे धाव

नळदुर्ग: घनवन वृक्ष लागवड योजनेत गैरप्रकार झाल्याचा काँग्रेस नगरसेवकांचा आरोप ; दोषींवर कारवाईसाठी जिल्हाधिका-याकडे धाव

नळदुर्ग,दि.०८:

हरित धाराशिव अभियान २०२५ अंतर्गत नळदुर्ग येथील घनवन वृक्ष लागवड योजनेत गैरप्रकार व अनियमित्ता झाल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला आहे. या योजनेत संबंधित कंत्राटदार, तत्कालीन मुख्याधिकारी , विभाग प्रमुख , व लेखापाल यांचे त्वरित निलंबन करून गुन्हे नोंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. काँग्रेसचे गटनेते मारुती खारवे, नगरसेवक आकाश कुलकर्णी व सुधीर पोतदार यांनी कारवाईची मागणी केली आहे. 

नळदुर्ग नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर २३६/७ क्षेत्र १०० आर मध्ये २३ लाख १८ हजार ९८० रुपये खर्चून विविध जातीचे ३० हजार वृक्ष लागवड करण्यात आले. या कामाची जाहिरात एका दैनिकात ९ जून २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र टेंडर ऑनलाईन न करता ऑफलाईन करण्यात आले. या कामाची तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता याचा उल्लेख नाही, टेंडर कालावधी कमी असल्यामुळे सर्व कामे एकाच टेंडरमध्ये दाखवण्यात आली, नर्सरी चालक हाच कामाचा ठेकेदार व साहित्य पुरवठादार आहे, सदर प्रक्रिया संशयास्पद आहे. कंत्राटदाराने कागदपत्रे देताना फसवणूक केल्याचे दिसत आहे, या कामाचे आलेले टेंडर एकाच कुटुंबातील तिघांनी भरले आहे.  रोपे शासकीय नर्सरीतील मोफत घेणे अपेक्षित असताना रोपे विकत घेतली आहेत, काम करत असताना वापरलेले ट्रॅक्टर व ट्रॉलीचा मेळ लागत नाही, वृक्ष लागवडीसाठी असलेल्या मजुरांची यादी बोगस आहे. वृक्ष लागवडीसाठी पालिकेने आवाहन करत विद्यार्थी, बचत गटाच्या महिला व नागरिकांना बोलावले होते मात्र मजुरांचा खर्चही दाखवण्यात आला आहे. तसेच माती टाकते, शेणखत, वृक्षारोपणासाठी लागणारे इतर साहित्य याच्यामध्ये शंकास्पद बाबी आढळून येत असल्याचा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे.

Labels:

Friday, 6 March 2026

कु. सृष्टी धनंजय पाटील हिने मिळविले वाणिज्य शाखेतील सर्वोच्च सी. ए.ची पदवी

कु. सृष्टी धनंजय पाटील हिने मिळविले वाणिज्य शाखेतील सर्वोच्च सी. ए.ची पदवी 

नळदुर्ग,दि.०६: डॉ. दिपक जगदाळे

 
 कु. सृष्टी धनंजय पाटील हिने वाणिज्य शाखेतील सर्वोच्च सी. ए.ची पदवी प्राप्त केल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील यांची ती  कन्या आहे.


सृष्टी पाटील हिचे प्राथमिक शिक्षण तुळजामाता इंग्लिश स्कूल तुळजापूर येथे झाले असून अकरावी व बारावीचे शिक्षण तिने शाहू महाविद्यालय लातूर येथे पूर्ण केले आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षण पुणे येथे घेतले असून सद्या ती मास्टर कार्ड या अमेरीकन कंपनीत नोकरी करत आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर कोणतेही लक्ष सहज संपादन करता येते असे यश प्राप्त करण्यासाठी संयम, सचोटी, अभ्यासातील सातत्य,आणि प्रचंड आत्मविश्वास अंगी असणे आवश्यक आहे. हे सृष्टीने दाखवून दिले आहे. तिच्या या यशाबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण सचिव उल्हास बोरगांवकर कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे संचालक बाबुराव चव्हाण   प्राचार्य डॉ सुभाष राठोड ,उपप्राचार्य डॉ अशोक कदम, नॅक कोर्डिनेटर डॉ. शिवाजी घोडके डॉ. एन.बी. जाधव यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Labels:

Thursday, 5 March 2026

रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ अशोक कदम यांची बालाघाट महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी नियुक्ती

रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ अशोक कदम यांची बालाघाट महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी नियुक्ती 


नळदुर्ग ,दि.०५: डॉ.दिपक जगदाळे

 कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ अशोक कदम यांची महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे. 

डॉ अशोक कदम यांनी ३२ वर्ष महाविद्यालयीन सेवेत केलेल्या कामाची दखल घेऊन संस्थेने त्यांची या पदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण सचिव उल्हास बोरगांवकर, कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे ,सदस्य बाबुराव चव्हाण यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड, कार्यालय अधिक्षक धनंजय पाटील, नॅक को अर्डिनेटर डॉ शिवाजी घोडके, गणित विभाग प्रमुख डॉ एन.बी.जाधव, पर्यवेक्षक प्रा. मोतीराम पवार यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Labels:

बंजारा समाजातील पारंपारिक होळीचा सणभाजपचे नेते नितीन काळे, नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा

 बंजारा समाजातील पारंपारिक होळीचा सण
भाजपचे नेते नितीन काळे, नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत  उत्साहात साजरा 

नळदुर्ग, दि.०५ मार्च 

 तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे बंजारा समाजातील पारंपारिक होळीचा सण विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

होळी सण म्हणटले की बंजारा समाजाची एक पारंपारिक पद्धतीने आगळी वेगळी प्रथा आहे.. होळी आली की बंजारा बांधव वीस ते पंधरा दिवसांपासून एकत्रित येऊन मंदिरा समोर नाचत,गाणे म्हणत "लेंगी" म्हणतात. आणि ज्यांच्या घरी लहान मुल जन्माला येते त्याच्या घरी धुंड (बारसा) आयोजित केला जातो.

  आलियाबाद येथे संदीप धनाजी राठोड यांच्या मुलाचे धुंड (बारसा) करण्यात आला.येथील पाच बंजारा महिला व भाजपचे प्रदेश सदस्य नितीन काळे, नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के, श्रीनिवास पाटील, यांच्या हस्ते हंड्याचे पुजन करण्यात आले.

यावेळी बंजारा होळी व धुंड विषयी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण यांनी माहिती दिली.यानतंर नाच , गाण्यात मदमस्त होऊन महिला, पुरुषानी लेंगी गीते सादर केले.. यावेळी पुरुष मंडळींनी तेथील हंडा काढण्याचा प्रयत्न करतात पण महिलांनी पुरूषांना खुप लाकडाने मारहाण करतात..अशी वेगळी होळी व धुंड बंजारा समाजाची‌ संस्कृती परंपरा आजही चालू आहे.

या कार्यक्रमासाठी उपसरपंच अमृता चव्हाण, माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, शिवाजी राठोड, विनायक चव्हाण, पांडुरंग चव्हाण ,नेमिनाथ चव्हाण,डॉ गणेश राठोड, विलास राठोड शिवाजी चव्हाण, सुभाष नाईक, लक्ष्मण राठोड, दामाजी राठोड,बाबु नाईक, माणिक राठोड, गणेश चव्हाण,सिद्राम पवार, सुभाष चव्हाण, व्यंकट राठोड, हरीदास राठोड, यशवंत राठोड, गणपती राठोड,बाबु जाधव, हरिदास चव्हाण, मोतीराम राठोड,अरूण चव्हाण, बाबुराव चव्हाण , गुरूदेव राठोड ,हरी राठोड, संतोष चव्हाण, यशवंत चव्हाण, राजाराम पवार, देविदास चव्हाण , माजी सरपंच ज्योतीका चव्हाण, रेखा चव्हाण,चावळाबाई राठोड,मिठूबाई राठोड, सविता राठोड यांच्या सह आलियाबाद रामतीर्थ, येथील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

Monday, 2 March 2026

नळदुर्ग महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. मधु मनिषसिंह हजारी विज्ञान प्रज्ञा शोध परिक्षेत राज्यात प्रथम

नळदुर्ग महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. मधु मनिषसिंह हजारी विज्ञान प्रज्ञा शोध परिक्षेत राज्यात प्रथम

नळदुर्ग,दि. ०२:डॉ. दिपक जगदाळे 

 येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु मधू मनिषसिंह हजारी हिने बलभिम महाविदयालय बीड येथे आयोजीत १४ व्या विज्ञान  प्रज्ञा शोध  परिक्षेत १०० पैकी ९२ गूण घेऊ प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

बीड येथील बलभीम महाविद्यालयाच्या वतीने  राज्यस्तरीय विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

 दि. २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या विभागांतील २८ 
महाविद्यालयाने सहभाग नोंदविलेला होता.
दि. २८फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान   डॉ ए पी जे अब्दुल कलाम लिखित अग्रिपंख पुस्तकाच्या लेखिका  माधुरी शानबाग (बेळगाव) यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
 नळदुर्ग महाविद्यालयांमधून एकूण 71 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती त्यापैकी ५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी एकूण १८ विद्यार्थी प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले असून कु मधु हजारी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेसाठी  वनस्पतीशास्त्राचे विभाग प्रमुख प्रा डॉ उद्धव भाले यांनी समन्वयक म्हणून मोलाचे मार्गदर्शन करून संबंधित अभ्यास स्रोत उपलब्ध करून दिला त्यामुळेच हे यश महाविद्यालयाच्या पदरात पडले आहे. ही परीक्षा केवळ स्पर्धा नसून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक क्षमतेला चालना देणारा आणि भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार करणारा एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम आहे. डॉ. उद्धव भाले हे नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबाबतची जनजागृती करून त्यांना प्रेरणा  देत असल्यामुळेच सदरिल विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.

 या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण सचिव उल्हास बोरगांवकर, कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे ,बाबुराव चव्हाण,यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड, उपप्राचार्य डॉ. अशोक कदम,वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ उद्धव भाले,नॅक समन्वयक डॉ शिवाजी घोडके कार्यालय अधिक्षक धनंजय पाटील  सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Labels:

किशोरवयीन मुलांमध्ये वाढत्या मानसिक आरोग्य समस्येत पालकांची भूमिका (जागतिक किशोर मानसिक आरोग्य दिन विशेष, ०२ मार्च २०२६) लेखक - डॉ. प्रीतम भी. गेडाम

 किशोरवयीन मुलांमध्ये वाढत्या मानसिक आरोग्य समस्येत पालकांची भूमिका 
(जागतिक किशोर मानसिक आरोग्य दिन विशेष, ०२ मार्च २०२६) 
लेखक - डॉ. प्रीतम भी. गेडाम 


 आजच्या आधुनिक युगात, मानव जितके प्रगत समजतात तितकेच, ते स्वतःला समस्यांनी वेढलेले आढळत आहेत, विशेषतः मानसिक आरोग्य समस्यांनी. सर्व वयोगटातील लोकांना कधी ना कधी मानसिक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते किंवा तोंड द्यावे लागले असेल. आयुष्यात आनंद, सुख-समाधान आणि शांती फक्त नावापुरतीच असल्याचे दिसते. असे वाटते की प्रत्येकजण स्पर्धेत भाग घेण्यासाठी जगत आहे. अगदी किशोरवयीन मुलांमध्येही आजकाल, मानसिक आरोग्य समस्यांचा प्रश्न खूप गंभीर पातळीवर पोहोचला आहे. किशोरवयीन मुलांमध्ये सातत्याने वाढणारे गुन्हेगारीचे प्रमाण ही देखील एक गंभीर समस्या आहे. या वयातील मुलांमध्ये राग, चिडचिडेपणा, ताणतणाव, द्वेष, सहनशीलतेचा अभाव, सोशल मीडियाचे व्यसन आणि अंमली पदार्थांचे सेवन यासारख्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. किशोरवयीन मुलांनी केलेल्या घटना आणि कृतींबद्दल जाणून घेतल्यावर आपल्याला अनेकदा धक्का बसतो.  पालकांनी त्यांना फक्त फटकारले तर ते आत्महत्या किंवा स्वतःला हानी पोहोचवणे, घरातून पळून जाणे किंवा अनुचित पावले उचलणे आणि गंभीर गुन्हे करण्यासाठी मोठ्या गुन्हेगारांसारख्या टोळ्या तयार करणे असे गुन्हे करतात. किशोरवयीन मुले चोरी, दरोडा, तस्करी, बलात्कार, खून आणि खून करण्याचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याच्या घटना देखील सातत्याने घडत असतात. शाळकरी मुलांद्वारे त्यांच्या शिक्षकांवरही हल्ला करण्याच्या घटना सुद्धा अनेकदा नोंदवल्या जातात. लहान वयात गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असण्याचा ट्रेंड, सोशल मीडिया, ऑनलाइन गेमिंग, ड्रग्जचे व्यसन, खोटा देखावा, खोटे बोलणे, संस्कारांचा अभाव, नैतिकतेचा अभाव, चारित्र्याचा अभाव आणि अश्लीलता यांनी समाजाला विषारी बनवले आहे. अनेक तरुणांनी लोकांना आकर्षित करण्यासाठी सर्व सीमा ओलांडून निर्लज्जपणाचे कळस गाठून आपले जीवन उद्ध्वस्त केले आहे.

दुसरीकडे, पालकांचा मुलांवर नियंत्रणाचा अभाव, मुलांवर आंधळा विश्वास, वाईट संगत, मुले आयुष्यातील वाईट गोष्टी किंवा घडत असलेल्या घटनांना विरोध करण्यास घाबरतात, काही भीतीच्या सावलीत जगतात, पालकांनी मुलांना वेळ न देणे, संगोपनाचे सकारात्मक वातावरण निर्माण न करून देणे, मुलांकडून पालकांनी जास्त अपेक्षा ठेवणे, स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे, मुलांवर दबाव आणणे किंवा आपल्या इच्छा त्यांच्यावर लादणे आणि पालकांना त्यांच्या मुलांच्या भावना समजून घेण्यास असमर्थता ही देखील आजकाल किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण करणारी कारणे आहेत. किशोरवयीन मुलांमध्ये वाढत्या मानसिक आरोग्य समस्येबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २ मार्च रोजी "जागतिक किशोर मानसिक आरोग्य दिन" साजरा केला जातो. हा दिवस जागरूकता वाढवणे, कलंक कमी करणे, चिंता, ताण आणि नैराश्यासारख्या किशोरवयीन आरोग्य आव्हानांबद्दल खुल्या संभाषणांना प्रोत्साहन देणे तसेच स्वतःची काळजी घेण्याच्या धोरणांवर लक्ष केंद्रित करणे यावर भर दिला जातो. २०२६ ची थीम "किशोरवयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये निरोगी आणि कल्याणकारी उपक्रमांचे नेतृत्व करण्यास सक्षम करणे" आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, किशोरवयीन मुले शारीरिक, भावनिक आणि सामाजिक बदलांमुळे मानसिक आरोग्य समस्यांना बळी पडतात, ज्यात गरिबी, गैरवापर किंवा हिंसाचार यांचा समावेश आहे. त्यांना या समस्यांपासून वाचवणे आणि चांगल्या जीवनासाठी आवश्यक असलेले आल्हाददायक संगोपनाचे वातावरण निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असा अंदाज आहे की, जगभरात, १०-१९ वयोगटातील सातपैकी एका मुलाला मानसिक आरोग्य समस्या आहे. हे सर्व जागतिक आजारांपैकी १५ टक्के आहे, तरीही या समस्या मोठ्या प्रमाणात ओळखल्या जात नाहीत आणि त्यांच्यावर उपचार केले जात नाहीत. आयुष्यभर होणाऱ्या मानसिक आजारांपैकी अर्धे आजार वयाच्या १४ व्या वर्षी सुरू होतात. मानसिक आरोग्य समस्या असलेल्या मुलांना सामाजिक बहिष्कार, भेदभाव, कलंक, शैक्षणिक अडचणी, जोखीम पत्करण्याचे वर्तन, शारीरिक आजार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन यांचा सामना करावा लागतो. वर्तणुकीशी संबंधित मानसिक विकार हे मोठ्या वयाच्या किशोरवयीन मुलांपेक्षा तरुण किशोरवयीन मुलांमध्ये अधिक सामान्य आहेत. नैराश्य, चिंता आणि वर्तणुकीशी संबंधित विकार हे किशोरवयीन मुलांमध्ये आजार आणि अपंगत्वाची प्रमुख कारणे आहेत. १५-२९ वयोगटातील मुलांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे. आवश्यक आरोग्यसेवेची उपलब्धता नसल्याने, मुले मोठी होताना समाजात आणि कुटुंबात योग्य स्थान मिळवू शकत नाहीत, ज्यामुळे जीवनात अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागते. अटेंशन डेफिसिट हाइपरएक्टिविटी डिसऑर्डर, अतिक्रियाशीलता विकार आणि वर्तणुकीशी संबंधित विकार किशोरवयीन मुलांच्या शिक्षणावर परिणाम करू शकतात आणि गुन्हेगारी वर्तनाचा धोका वाढवू शकतात, जो संपूर्ण मानवी समाजासाठी चिंतेचा विषय आहे.

आजच्या किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी पालक हे सर्वात मोठे दोषी आहेत. मुले ही पालकांची जबाबदारी आहेत आणि पालक हे विसरतात. केवळ मुलांचे लाड करून किंवा त्यांच्या मागण्या पूर्ण करून जबाबदाऱ्या पूर्ण होत नाहीत. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या आवश्यक गरजा समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलांना काय हवे आहे आणि ते कशाचा आग्रह धरतात यातील फरक समजून घेणे महत्वाचे. पालक अनेकदा म्हणतात की ते त्यांच्या मुलांसाठी पैसे कमवण्यात व्यस्त आहेत. पण पैशाने जगातील प्रत्येक गरज खरेदी करता येत नाही किंवा पूर्ण करता येत नाही. मुलांना योग्य वेळी आधार देणे महत्वाचे आहे, त्यांच्यासोबत मित्र म्हणून वेळ घालवणे देखील महत्वाचे आहे. फक्त आपली मुले आहेत म्हणून त्यांच्या चुका झाकणे किंवा ते हट्टी आहेत म्हणून त्यांच्या बेकायदेशीर मागण्या पूर्ण करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. आज आपण जगभरात आणि समाजात जे गुन्हेगार पाहतो, कदाचित जर त्यांच्या पालकांनी त्यांना योग्य वेळी चांगले संगोपन, मूल्ये आणि पोषक वातावरण दिले असते, तर ते आज समाजासाठी एक भयंकर त्रास बनले नसते. दररोज निरोगी झोप घेणे, नियमित व्यायाम करणे, शारीरिक आणि मानसिक चेतना वाढविणारे खेळ खेळणे, समस्या सोडविण्यासाठी परस्पर कौशल्ये विकसित करणे आणि भावनांचे व्यवस्थापन कसे करावे हे शिकणे आवश्यक आहे. घर, कुटुंब, शाळा आणि व्यापक समुदायामध्ये संरक्षणात्मक आणि आल्हाददायक सहाय्यक वातावरण अत्यंत महत्वाचे आहे.

अभ्यासात असे आढळून आले की शाळकरी मुलांपैकी २३.३३ टक्के मुलांना मानसिक आरोग्य समस्या आहेत. अभ्यासाचा ताण, सोशल मीडियाचा अति वापर आणि कुटुंबातील बिघाड यामुळे ताणतणाव वाढतो, यातील ४३ टक्के विद्यार्थ्यांनी मूड स्विंगची तक्रार केली तर ११ टक्के विद्यार्थ्यांनी चिंता संदर्भात समस्या व्यक्त केली. १० टक्क्यांपेक्षा कमी तरुण भारतीयांना औपचारिक मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. बहुतेक किशोरवयीन मुले मानसिक आरोग्य विकारांसाठी मदत घेण्यास कचरतात. सायबरबुलिंग, सामाजिक तुलना आणि इंटरनेट व्यसन वाढत आहे आणि १५-१९ वयोगटातील मुलांमध्ये अल्कोहोलचा वापर जास्त आहे. १३-१७ वयोगटातील अंदाजे ७ टक्के किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक आरोग्य विकार आहेत आणि तरुणांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. पालकांनी त्यांच्या मुलांसोबत वेळ घालवणे महत्वाचे आहे जेणेकरून त्यांना भावनिकदृष्ट्या बळकटी मिळेल आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण होईल. शारीरिक हालचाली आणि मानसिक आरोग्य यांच्यात सकारात्मक संबंध आहे. खेळांमुळे ताण कमी होतो. म्हणून, पालकांनी आपल्या मुलांना सायकलिंग, स्केटिंग, पोहणे, हायकिंग किंवा इतर कोणत्याही बाह्य खेळासाठी बाहेर घेऊन जावे. मुलांना स्वयंसेवक म्हणून सामाजिक कार्यात सहभागी होण्यास प्रोत्साहित करणे, जेवण आणि नाश्ता एकत्र करणे, दिवसाच्या क्रियाकलापांवर चर्चा करणे, व्यायाम आणि योगाचे महत्त्व समजावून सांगणे, चांगले छंद जोपासायला शिकवणे, चांगले मूल्ये रुजवणे, लोकांमधील भेदभाव दुर्लक्षित करून सगळीकडे मानवतेचा संदेश पसरवणे आणि निसर्ग व राष्ट्रसेवेला प्राधान्य देणे ह्या गोष्टी मुलांमध्ये रुजविण्याची प्राथमिक कर्तव्ये पालक आणि शिक्षकांची आहेत. मुलांच्या कलागुणांना किंवा कमतरतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका; त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन देणे महत्वाचे आहे. अशा प्रकारे, मुले शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत होतील आणि वाईट सवयींपासून दूर राहतील, ज्यामुळे मानसिक आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता टाळता येईल.

लेखक - डॉ. प्रीतम भी. गेडाम 

ई-मेल prit00786@gmail.com

Labels: