Wednesday, 30 September 2015

जातीवाचक शिवीगाळ करुन तलवारीने मारहाण; एक गंभीर, 16 जणांविरूध्‍द अॅट्रासिटी गुन्‍हा

नळदुर्ग :- किरकोळ कारणावरुन दलित युवकास जातीवाचक शिवीगाळ करुन काठ्या व तलवारीने केलेल्‍या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाल्‍याची घटना मंगळवार दि. 29 सप्‍टेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्‍याच्‍या दरम्‍यान इंदिरानगर नळदुर्ग येथे घडली. याप्रकरणी सोळा जणांविरुध्‍द बुधवारी उशिरा पोलिसांत अॅट्रासिटी कायद्यान्‍वये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. 
मो‍ईन इब्राहिम शेख, अशपाक चॉंद शेख, हाबू बाबुलाल शेख, इस्‍ताक जहागिरदार, फिरोज मलंग शेख, यजदानी सत्‍तार शेख, सद्दाम मैनोद्दीन शेख, सद्दाम बाबू शेख, जाफर शेख अहेमद शेख, बिलाल कुरेशी, अजमल महमदअली डोंगरे, मुजमल महमदअली डोंगरे, वसिम निजाम शेख, आदम जहागिरदार, अकबर शेख, मलंग दस्‍तगीर शेख (सर्व रा. इंदिरानगर, नळदुर्ग) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. यातील फिर्याद दयानंद बाबू गायकवाड (वय 24, धंदा मजूरी, रा. इंदिरानगर, नळदुर्ग) हा मंगळवार रोजी सायंकाळी कामावरुन घरी जात असताना इंदिरानगर येथील मारुती मंदिराजवळ त्‍याचा भाऊ रणजित गायकवाड, खंडू लक्ष्‍मण कोळी यांच्‍यासमवेत मलंग शेख, मुजमल महमदअली डोंगरे, वसीम निजाम शेख यांच्‍यात भांडण चालू होते. त्‍यांच्‍या हाता काठ्या होत्‍या. तलवारी घेऊन येवून जातीवाचक शिवीगाळ करुन तिघांस मारहाण केली. यावेळी फिरोज शेख याने त्‍याच्‍या हातातील तलवारीने दयानंद गायकवाड याच्‍या डोक्‍यास उजव्‍या बाजूस वार केला व इतर दोघास मारहाण करु लागले. यावेळी आरडाओरड ऐकून सोमनाथ महादेव म्‍हेत्रे, राहुल सुर्यकांत घोडके, राज मुरमे, अमित गायकवाड, बाबू गायकवाड यांनी सोडवासोडवी केली. दयानंद हा जखमी झाल्‍याने त्‍यास डॉ. व्‍यंकट मुळे यांच्‍या दवाखान्‍यात प्रथोमोपचार करुन पुढील उपचारासाठी सोलापूर रुग्‍णालयात दाखल केले, अशी तक्रार दयानंद बाबू गायकवाड यांनी नळदुर्ग पोलिसात दिल्‍याने वरील सोळा आरोपींविरुध्‍द बुधवार दि. 30 सप्‍टेंबर रोजी उशिरा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी खांडगे हे करीत आहेत.

Labels:

श्री तुळजाभवानी कारखान्‍याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्‍न

नळदुर्ग :- येथील श्री तुळजाभवानी साखर कारखाना 18 ते 25 वर्ष दीर्घ मुदतीवर सहयोग / भागिदारी तत्‍वावर देण्‍याचा ठराव बुधवार दि. 30 सप्‍टेंबर रोजी कारखान्‍याच्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्‍यात आला. ही वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्‍याचे चेअरमन नरेंद्र बोरगावकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली घेण्‍यात आली.
नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्‍याची 32 वी सन 2014-15 ची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्‍थळावर बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता संपन्‍न झाली.  यावेळी बोलताना बोरगावकर म्‍हणाले की, शेतकरी सभासद व कामगारांच्‍या हितासाठी श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना लवकरात लवकर सुरु करण्‍याच्‍या दृष्‍टीने उस्‍मानाबाद जिल्‍हा मध्‍यवर्ती बँक प्रशासनाशी चर्चा करुन निर्णय घेण्‍यात येणार आहे. साखर आयुक्‍त पुणे यांच्‍याकडे हा कारखाना दिर्घ मुदतीने सहयोग/भागिदारी तत्‍वावर देण्‍याचा प्रस्‍ताव पाठविण्‍यास मंजूरी दिल्‍याचे सांगितले. तुळजाभवानी कारखाना दिर्घ मुदतीत देण्‍याचे कारण की, शासकीय देणे, कामगार थकित वेतन व इतर देयक रक्‍कम, जिल्‍हा बँकेची एकरक्‍कमी कर्ज परतफेड करण्‍याकरीता हा कारखाना 18 ते 25 वर्षाच्‍या दीर्घ मुदतीवर देण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याचे सांगितले.
या सभेस श्री कुलस्‍वामिनी सहकारी सूत गिरणीचे चेअरमन सुनिल (मालक) चव्‍हाण, श्री तुळजाभवानी कारखान्‍याचे संचालक गोकुळ शिंदे, अशोक पाटील, अमर मगर, निवृत्‍ती माळी, खंडू उंबरे, नेताजी पाटील, प्रकाश चौगुले, महादेवाप्‍पा आलुरे, राजशेखर वडणे तर शेतकरी सभासद लिंबराज कोरेकर, नागनाथ पाटील, सुनिल भोसले, विनायक जाधव, अनिल हंगरगेकर यांच्‍यासह कारखान्‍याचे कर्मचारी विलास जाधव, गफुर धुरगुडे, शिवाजी डोंगरे, राजेंद्र सुतार, अप्‍पू स्‍वामी, सलाम मौजम, कुबेर भोसले, विवेक इंगळे, शिवाजी चव्‍हाण, तानाजी गंगणे, शंकर चंडके, अनिल केसकर, अजित चव्‍हाण, खंडू मुळे, जकिर मोकाशे यांच्‍यासह नागरीक उपस्थित होते. अहवाल वाचन व आभार प्रभारी कार्यकारी संचालक विकास भोसले मानले. 

Labels:

नळदुर्गच्‍या महाविद्यालयात राज्‍यस्‍तरीय कार्यशाळा संपन्‍न

नळदुर्ग :- येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मत्स्यशास्त्र विभागाच्या वतीने एक दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या निमीत्ताने मत्स्यप्रदर्शन तसेच मत्स्य व्यवसायीकांची सहविचार सभा, तज्ञांची व्याख्याने, प्रात्याक्षिके, व्यवसायातील यशस्वीतांची अनुभव कथन इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उदघाटन सत्रात आपल्या उद्घाटनपर मनोगतात मत्स्य महाविद्यालय उदगीर येथील प्रा. सोमनाथ यादव म्हणाले मत्स्य व्यवसाय हा शेती पुरक व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. हा व्यवसाय आलीकडच्या काळात भरभराटीस येत आहे. दाळींना पर्याय म्हणून आहारात माशांचा समावेश होत आहे. माशांपासुन प्रथीने जास्त प्रमाणात मिळतात. आलीकडच्या काळात शेततळयामध्ये ही मत्स्य पालन केले जात आहे. या व्यवसायात जास्तीत जास्त तरुणांनी यावे व आपले आयुष्य समृध्द करावे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुहास पेशवे होते प्रमुख उपस्थित उदगीर येथील मत्स्य महाविद्यालयातील प्रा. उमेश सुर्यवंशी हे होते.
या कार्यशाळेनिमित्‍त आयोजित केलेल्‍या मत्‍स्‍य प्रदर्शनाचे उदघाटन अंबेजोगाई येथील योगेश्‍वरी महाविद्यालयाचे प्राणीशास्‍त्र विभागप्रमुख डॉ. विश्‍वासराव साखरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या नंतरच्‍या तांत्रिक सत्रामध्‍ये प्रा. उमेश सुर्यवंशी यांचे व्‍याख्‍यान झाले. या सत्रात महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. सुरेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मत्‍स्‍य व्‍यावसायिकांच्‍या सहविचार सभेला प्रमुख वक्‍ते म्‍हणून तुळजापूर तालुक्‍यातील मत्‍स्‍यव्‍यावसायिक प्रविण व्‍हरकट यांनी आपले अनुभव कथन केले. यावेळी प्रा. डॉ. डी.एम. पठाण, प्रा.डॉ. नितीन पडवळ, प्रा. आर.एस. मादळे, प्रा. अशोक येवले यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेची सांगता समारोप समारोहाने झाली. प्रा.डॉ. विश्‍वास साखरे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत तसेच डॉ. मोहन बाबरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली व डॉ. महेश मोटे यांच्‍या आभार प्रदर्शनाने समारोप समारोह संपन्‍न झाला. संपूर्ण कार्यशाळेचे सुत्रसंचालन डॉ. शिवाजी जेटीथोर यांनी केले.
कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी डॉ. दिपक जगदाळे, प्रा. अनिरुध्‍द बाबरे, प्रा. एफ.जे. काझी, उमेश सर्जे, हमीद काझी, बाबा कांबळे, सुजित बिराजदार, भगवंत जाधव आदीनी परिश्रम केले.

Labels:

मोटारसायकल व स्‍कार्फिओच्‍या धडकेत दोन ठार

उस्मानाबाद : -  मोटारसायकल व स्‍कार्पिओची समोरासमोर धडक होऊन झालेल्‍या अपघात दोनजण जागीच मयत झाले. ही घटना उस्‍मानाबाद-वरुडा बायवास रस्‍त्‍यावर घडली.
     सतीश राजाराम मुंडे (42 वर्षे), माणिक उद्धव मुंडे (44 वर्षे) असे अपघातात मयत झालेल्‍यांचे नाव आहे.  सतीश व माणिक हे दोघेजण उस्मानाबादहुन पवारवाडीकडे बाजार करुन मोटारसायकल (क्र. एमएच 24 जी. 9884) वरुन जात असताना औरंगाबाद कडून तुळजापुरकडे भरधाव वेगाने जाणा-या स्कार्पिओ (क्रं. एमएच 24 व्‍ही. 4982) ची जोराची धडक बसली. यात दोघांचा जागीच मृत्‍यू झाला.

Labels:

बार्शी तालुक्‍यातील 93 ग्रामपंचायतीच्‍या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

पांगरी (गणेश गोडसे) :-  बार्शी तालुक्यातील दुसर्‍या टप्प्यातील 93 ग्रांमपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून लवकरच निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे॰बिगुल वाजल्यामुळे गावकारभा-यांना आपली पत दाखवण्यासाठी मोठी धडपड करावी लागणार आहे.बिनविरोध निवडणुकीचे वारे हळू हळू लुप्त होताना दिसत आहे. दाखवण्यासाठी तालुक्यात क्रमांक दोनची मोठी ग्रामपंचायत असलेल्या पांगरी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या गुप्त खलबताना गती आली असून ग्रांमपंचायत निवडणूक नको रे बाबा असे म्हणणारे अनेक हौशे गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
ओबिसी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदाची स्वप्ने अनेकांना दिवसा पडू लागली आहेत. सध्या पांगरी ग्रामपंचायतीवर माजी आ.राजेंद्र राऊत गटाचे वर्चस्व आहे.पंधरा सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमद्धे राऊत गटाचे तेरा सदस्य होते.होऊ घातलेल्या निवडणुका कांही ठिकाणी तिरंगी तर कांही गांवात चौरंगी होण्याची शक्यता दिसून येत आहे.मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच निवडणुका कश्या होणार हे कळणार आहे.एक मात्र नक्की की येणारी निवडणूक ही अनेकांच्या घरी दिवाळी घेऊन येणार असल्यामुळे अनेकांचे या निवडणुकीकडे डोळे लागले आहेत.अगोदरच सामोरी असलेली भीषण दुष्काळी स्थिती,कोरडा गेलेला पावसाळा,शेतीच्या सोडा पिण्याच्या पाण्याची निर्माण होऊ घातलेली भयावह स्थिती आदि विविध कारणामुळे सर्वसामान्य  जनतेचा जीव मेटाकुटीला आलेला असतानाच होत असलेली  ग्रांमपंचायतीच्या निवडणूका कांही काळापुरत्या तरी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.
  पांगरी परिसरातील पांगरी परिसरातील पांढरी, ऊक्क्ड्गांव, झांनपूर, ममदापूर, खांमगांव, चारे, वालवड, बोरगांव, कारी, गोरमाळे, चिखर्डे, आगळगांव, कोरेगांव, पिंपळगांव, घोळवेवाडी, कुसळंब, पाथरी, धानोरे, शिराळे आदी गावामधील ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मुदत संपल्यामुळे येथील निवडनुका पार पडणार आहेत.
    बार्शी तालुक्यात लक्षवेधी ठरण्याची शक्यता असलेल्या पांगरी ग्रामपंचायतीसाठी प्रभाग क्रमांक एक मध्ये सर्वसाधारण स्त्री एक,अनुसूचीत जाती स्त्री एक,अनुसूचीत जाती पुरुष एक,प्रभाग क्रमांक दोन मध्ये सर्वसाधारण स्त्री एक,नागरिकांचा मागास प्रवर्ग एक,प्रभाग क्रमांक तिन येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री एक,अनुसूचीत जाती स्त्री एक,अनुसूचीत जाती पुरुष एक,प्रभाग क्रमांक चार येथे सर्वसाधारण स्त्री एक,नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष एक,अनुसूचीत जाती पुरुष एक,प्रभाग पाच मध्ये सर्वसाधारण स्त्री एक,नागरिकामचा मागासवर्ग स्त्री एक,नागरिकाचा मागास प्रवर्ग पुरुष एक असे आरक्षण आहे.
 यावर्षी पावसाळा आला त्या मार्गे न बरसता परत गेला आहे.त्यामुळे समोर भिषण दुष्काळ दिसत आहे.त्याही परिस्थितीत चौदाव्या वित्त आयोगाचे गाजर सरकारने दाखवल्यामुळे पैश्यांचा पाऊस पदरात पाडून घेण्यासाठी जो तो तयारीला लागल्याचे चित्र सगळीकडेच दिसून येत आहे.कांहीही झाले तरी चालेल मात्र निवडणूक ही लढवायचीच असा पण अनेक नवख्या उमेदवारांनी केल्याची चर्चा होत आहे.आचारसंहिता लागू झाल्यामुळे लोकांची देणी घेणी उरकून जुनी घाण काढून टाकण्यात जुनी मंडळी गर्क असल्याचे निदर्शनास येत आहे.निवडणुकीचे तुणतुणे ऐन दिवाळीत वाजणार असल्यामुळे दिवाळी कोणाला साधणार व कोणाचे दिवाळे काढणार हे येणारा काळच दाखवणार आहे.

Labels:

डीसीपीएस धारकाच्‍या राज्‍य निमंत्रकपदी गरड यांची निवड

पांगरी (गणेश गोडसे) -: पांगरी (ता. बार्शी) येथील राहुल गरड यांची डिसीपीएस धारकांच्या राज्य अभ्यास गटाच्या राज्य निमंत्रकपदी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 अंतर्गत राज्यातील 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या ग्रामसेवकांना पेन्शन योजनेबाबत न्याय मिळवून देण्यासाठी नुकताच पुणे येथील जिल्हा परिषदेत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकने यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचे कोषध्यक्ष बापूसाहेब अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यभरातील डिसीपीएस धारकांचा मेळावा पार पडला होता. 
या मेळाव्यात विविध धोरणात्मक निर्णय घेण्यात आले होते. काल मर्यादित कार्यक्रम निश्चित करून डिसीपीएस धारकांना राज्य युनियन मार्गदर्शक म्हणून काम करणे, सदर प्रश्न सोडवण्यासाठी अभ्यास गट तयार करणे आदि विविध ठराव या मेळाव्यात घेण्यात आले होते.यावेळी जिल्हा पतसंस्थेचे संचालक दीपक गोरे,गणेश पाटील,पद्मराज जाधवर,किरण वाघमारे,राजेंद्र चौरे,नितिन शेलार,तात्या नाईकनवरे,संतोष लादे आदी उपस्थित होते.त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातून ग्राम विकास अधिकारी श्री.राहुल गरड यांची निवड करण्यात आली आहे.संघटनेचे अध्यक्ष श्री.ढाकने व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी नियुक्तीचे पत्र नुकतेच श्री.गरड यांना सुपूर्द केले. ते सध्या उपळाई (ठो) येथे कार्यरत असून निवडीबद्दल जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे उपाध्यक्ष अंकुश काटे,तालुकाध्यक्ष अनिल बारस्कर,सचिव तात्या साठे आदिसह यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Labels:

Monday, 28 September 2015

जलयुक्‍त शिवार आभियान कामाची मागणी

जळकोट - राज्‍यातील गावा-गावात शासनाने स्‍थापन केलेल्‍या कृषी विज्ञान मंडळामार्फत जलयुक्‍त शिवार आभियानची कामे व्‍हावीत. अशी मागणी एका लेखी निवेदनाव्‍दारे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे जळकोट ता. तुळजापूर येथील श्रीगण्‍ोश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालयाने केली आहे. 
    निवेदनात  पुढे म्‍हटले आहे की,  राज्‍यात भाजप. शिवसेना युतीचे सरकार सत्‍तारुढ झाल्‍यानंतर एक महत्‍वपुर्ण निर्णय घेण्‍यात आला. महाराष्‍ट्रातील दुष्‍काळ कायमस्‍वरूपी संपविण्‍यासाठी येत्‍या पाचवर्षात टप्‍या - टप्‍पयाने जलयुक्‍त शिवार अभियान गावा - गावात राबविले जाणार आहे. यात पहिल्‍या टप्‍प्‍यात महाराष्‍ट्रातील गावे या योजनेत समाविष्‍ट करुन विविध कामे केल्‍यानंतर यंदाचा पावसाळा झाला. या पावसात योजनेतुन झालेल्‍या कामात पावसाचे पाणी साचले आहे. याचा चांगला परिणाम दिसुन येत आहे. दुष्‍काळी भागात याचा अधिक परिणाम भविष्‍यात दिसणार आहे. 
जल युक्‍त शिवार आभियानची कामे विविध खाते एकत्र येवुन केली जातात. यात जि. प.  , ग्रा.पं. , पं. स., कृषी विभाग, वनविभाग आदि विभागाच्‍या माध्‍यमातुन शिवार आभियानची केली जात आहेत. सध्‍या शासनाच्‍या कृषी विभागाने स्‍थापन केलेल्‍या  कृषी विज्ञान मंडळे गावा- गावात कार्यरत आहेत. या कृषी विज्ञान मंडळाना कुठलेही आनुदान नाही. धर्मादाय कार्यालयात नोंदणी झालेल्‍या हजारो कृषी विज्ञान मंडळाना जलयुक्‍त शिवार आभियानची कामे देण्‍यात यावीत. हि योजना कृषी विज्ञान मंडळामार्फत राबवावी . गावातील शेती, भौगोलिक व सामाजिक या विज्ञान मंडळाकडे असते. याचा जलयुक्‍त शिवार आभियानासाठी चांगला होईल, अशी मागणी करण्‍यात आली आहे. या निवेदनावर श्रीगण्‍ोश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालयाचे अध्‍यक्ष मेघराज किलजे यांची स्‍वाक्षरी आहे. 

Labels:

श्रीगणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धेचे उदघाटन

  उस्मानाबाद - गणेशोत्सव अधिक लोकाभिमुख व्हावा, त्यातील ओंगळवाणेपणाला फाटा देत सामाजिक उपक्रमाची देवाणघेवाण व्हावी यासाठी पत्रकार संघाने राबविलेला उपक्रम महत्वपूर्ण आहे. मिरवणूक मार्गावर छोट्या बकेटमध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन करीत उस्मानाबादमधील गणेश मंडळांनी दिलेला संदेश पुढील काळात महाराष्ट्र नक्की अंगीकारेल, असे मत जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केले. 
    उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने यंदाही मुख्य मिरवणूक मार्गावर शिस्तबध्द श्रीगणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धीरज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित गणेशभक्तांना शुभेच्छा देताना डॉ. नारनवरे बोलत होते. मंचावर नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाडगे, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, सरचिटणीस विशाल सोनटक्के यांच्यासह स्पर्धेचे प्रायोजक आणि पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. 
    पत्रकार संघाच्यावतीने सुरू असलेल्या या स्पर्धांमुळे गणेश मंडळांमध्ये विधायक उपक्रम राबविण्याची स्पर्धा लागली आहे. उत्सवातून अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत. हा गणेश मंडळांनी स्वयंस्फूर्तीने सुरू केलेला पायंडा कौतूकास्पद आहे. स्वावलंबन गणेश मंडळाची संकल्पनाही अनेक गणेश मंडळांनी मोठ्या प्रमाणात राबविली असल्याचेही त्यांनी यावेळी व्यक्त केले. जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी उत्सव आनंदाने साजरा करण्याबरोबरच त्याला गालबोट लागणार नाही, याची काळजी सर्वच गणेश मंडळांनी घेतल्याबद्दल त्यांचे कौतूक केले. तर पत्रकार संघाच्या उपक्रमामुळे शांतता व सुव्यवस्था राखण्यात मोलाचे सहकार्य झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमूर्तीचे विसर्जन न करता पालिकेकडे मूर्ती दान केल्याबद्दल मंडळांचे आभार मानले.  
   भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी, राज्यातील जनतेला दुष्काळातून दिलासा मिळावा यासाठी भरपूर पाऊस पडू दे, अशी प्रार्थना यावेळी गणेशभक्तांच्या साक्षीने केली आणि दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर मंडळांनी उत्सवाला बघल देत शेतकर्‍यांच्या दुःखात सहभागी होत राबविलेल्या उपक्रमांचे कौतूक केले. यावेळी धीरज पाटील यांनीही उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. मुख्य मिरवणूक मार्गावरून यंदा २८ गणेश मंडळांनी लेझीम, ढोलताशे, झांज, अशा विविध पथकातून आपल्या कलांचे आकर्षक सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे निमंत्रक अनंत आडसूळ, देवीदास पाठक, रविंद्र केसकर आणि महेश पोतदार यांनी केले. या स्पर्धेसाठी प्रा. प्रशांत गुरव, प्रा. अशोक गोरे आणि प्रा. डॉ. मिलींद माने यांनी परिक्षक म्हणून कामगिरी पार पाडली. 
नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांचा सत्कार
   दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेच्यावतीने नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी शहरातील गणेश मंडळांना गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याऐवजी मूर्ती दान करावी, असे आवाहन केले होते. त्याला शहरातील गणेश मंडळांनी उत्स्फूर्तपणे मोठा प्रतिसाद दिला. तब्बल ४२ गणेश मंडळांनी आपल्या मूर्तीचे विसर्जन न करता त्या मूर्ती पालिकेला दान दिल्या आहेत. वर्षभर या मूतींचे नगरपालिकेच्यावतीने जतन केले जाणार असून या मूर्ती त्या-त्या मंडळांना पुढच्या वर्षी परत केल्या जाणार आहेत. अभूतपूर्व पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर गणेश मंडळांनी घेतलेला हा निर्णय पालिकेच्या पुढाकारामुळे अंमलात आला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांचा यावेळी उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

Labels:

चिखर्डे : तुफान मारहाणीत सहा गंभीर

  पांगरी (गणेश गोडसे ) सामाईक विहीरीवरील मोटारीचा फ्यूज काढल्याच्या व सामाईक बोअरचे पाणी हौदात सोड म्हणाल्याच्या किरकोळ कारणावरून कु-हाड,काठी,दगडांनी झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील सहाजण गंभीर जखमी झाल्याची घटना चिखर्डे ता.बार्शी येथील वस्तीजवळ घडली.
   दत्तात्रय उत्रेश्वर भंडारे वय 45,सौदागर भगवान भंडारे वय  55,कल्याण दतात्र्य भंडारे वय 22,नृसिंह विठ्ठल भंडारे वय 30,विठ्ठल भंडारे,सुमन विठ्ठल भंडारे सर्व रा.चिखर्डे अशी मारहाणीत जखमी झालेल्या दोन्ही गटातील जखमीची नांवे असून त्यांच्यावर बार्शीच्या खाजगी जगदाळे मामा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  दत्तात्रय उत्रेश्वर भंडारे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आरोपी विठ्ठल भगवान भंडारे,नृसिंह विठ्ठल भंडारे यांनी चुलत बंधु सौदागर भंडारे यांच्या सामाईक बांधाच्या व सामाईक विहीरीवरील पाण्याच्या मोटारीचा फ्यूज काढल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादिस डोक्यात हातावर कु-हाडीने मारून जखमी केले.तसेच जखमी सौदागर भंडारे व कल्याण भंडारे यांनाही शिवीगाळी दमदाटी करून मारहाण केली॰
   विरोधी नृसिंह विठ्ठल भंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आरोपी दशरथ सौदागर भंडारे यांना सामाईक हौदात पाणी सोडण्यास सांगितल असता आरोपी कल्याण दत्तात्रय भंडारे यांनी चिडून जावून हातात दगड घेऊन फिर्‍यादीच्या डोक्यात व डोळ्यांवर मारून जखमी केले.तसेच दोघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.तसेच सौदागर भंडारे यांनी त्यांच्या आईस ढकळून देऊन जखमी केले.परस्पर विरोधी फिर्यादीवरून पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार रवींद्र भडूरे हे करत आहेत.

Labels:

Saturday, 26 September 2015

संत दामाजी कारखान्‍याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्‍न

मंगळवेढा (समाधान फुगारे) :- आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार वर्षापासून दामाजी कारखाना हा इतर कारखान्याबरोबर सर्व शेतकर्‍यांना सोबत घेवून एफ.आर.पी प्रमाणे चांगला दर दिला आहे व पूर्वीच्या संचालकाने केलेले कर्ज निम्याने या कर्जाची परतफेड केले असल्याचे मत श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दि.२६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता कारखाना स्थलावर संपन्न झाली.यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन शशिकांत बुगडे होते.
यावेळी कार्यकारी संचालक अशोक नलवडे,संचालक समाधान आवताडे,अशोक सुरवसे,पांडुरंग चौगुले,धनंजय पाटील,परमेश्वर आवताडे,बळवंत पाटील,हर्षराज बिले,मारुती वाकडे, दादा गरंडे,सचिन नकाते,बाबसो बेलदार,ज्ञानेश्वर खांडेकर, शिवाजी काळुंगे,सुहास पवार,सुरेश कोळेकर,यादाप्पा माळी,दत्तात्रय कांबळे,बाबसो कांबळे,महादेव फराटे आदि संचालक उपस्थित होते.
सभेच्या सुरूवातीला कारखान्याचे संस्थापक स्व.कि.रा.मर्दा व रतनचंद शहा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सुरूवातीला प्रास्ताविक पांडुरंग चौगुले यांनी कारखान्याची आर्थिक परस्थिती व उस उत्पादन व साखर अशा विविध प्रकारची माहिती दिली व सभासदांनी मंजुरी दिली.
संचालक धनंजय पाटील यांनी कारखान्याचा वार्षिक आर्थिक लेखा जोखा सभेपुढे विषयाचे वाचन केले यावेळी कारखान्याचे संचालक समाधान आवताडे हे कार्यक्रमात स्टेजवरती न बसता त्यांनी खाली बसून सभेपुढील विषयी ऐकून घेतले यावेळी शेतकरी संघटनेचे सिद्धेश्वर हेंबाडे,प्रा.येताळा भगत ,शशिकांत चव्हाण ,राहुल घुले  यांनी प्रश्न मांडण्यासाठी माइकची मागणी केली असता माइक देण्यात आला नाही.
कारखान्यामधील २८ हजार सभासदांना बोलवण्यात आले नाही , काही ठराविक लोकांना बोलवले असून २०१३-१४ चे मुद्दे पुन्हा पुन्हा या वार्षिक अहवालामध्ये मांडण्यात आले आहेत असा आरोप सिद्धेश्वर हेंबाडे यांनी केला आहे.
लेखी आलेल्या प्रश्नाचे उत्तरे संचालक धनंजय पाटील यांनी  दिली. ही सभा अत्यंत वादळी न होता पोलिस बंदोबस्तामध्ये पार पडली. 
कार्यक्रमास सुरुवात होण्या अगोदर मिसाईल मॅन स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम व माजी गृहराज्यमंत्री स्व.आर.आर.पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

Labels:

भैरवनाथ शुगरचे मोळी पूजन

मंगळवेढा (समाधान फुगारे) :- सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची व ऊसाची फारच वाईट आहे. त्यामुळे मागील काळा मध्ये शेतकरी उस घेवून जावा म्हणून कारखानदाराकडे व शेती अधि-यांना भेटत होते पण आता उलट प्रवाह सुरू झाला असून सर्व शेती अधिका-यांनी शेतक-यांच्या घरापर्यंत जावून ऊसाची मागणी करून जास्तीत जास्त गाळप करण्याचे उद्दीष्ट पूर्ण करावे असे आवाहन भैरवनाथ शुगर वर्क्स लि. यूनिट ३ लवंगीचे व्हाईस चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांनी केले. ते लवंगी (ता. मंगळवेढा) येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. यूनिट ३ च्या द्वितीय मोळी पूजन समारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल (दादा) सावंत, सिद्धेश्वर अवताडे, जत नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते उमेश सावंत, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष संतोष पवार, प्रा. शिवाजी काळुंगे, माजी जि प अध्यक्ष रामचंद्र माने, पांडुरंग ताड, बंडोपंथ जाधव, चंद्रकांत देवकर, बाबूराव मोरे, अप्पासाहेब माने, प्रकाश सुरवसे,युवराज गडदे आदी उपस्थित होते, यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांचे हस्ते मोळी पूजन करण्यात आले व सत्यनारायन महापूजा श्री अनिल सावंत व त्यांच्या पत्नी शैलजा सावंत यांचे हस्ते करन्यात आले.
पुढे बोलताना सावंत म्हणाले की , शेतकर्‍यांच्या उसाला भविष्यात चांगला दर देवू सध्या एफ.आर.पी चा मुदा पूर्ण पणे गाजत असला तरी मागील हंगामा मध्ये या परिसरातील इतर कारखान्या पेक्षा जादा दर दिला असून गेल्या वर्षी 1 हजार 600 रुपये दर देवून ही एफ.आर.पी पेक्षा 100 रुपये जादा दर दिला आहे.
या कार्यक्रमास अनंत बावणे, राजेंद्रकुमार पाटील, सतेज पाटील, भगत साहेब, प्रमोद तोडकर, उमेश पेठकर, कृष्णदेव लोंढे, आंबादास कोरके, शिवाजी चव्हाण ,प्रमोद भोसले, देवानंद पासले, अभिजीत पवार, संजय राठोड, कुंडलिक कदम, इंद्रजीत पवार, सुरेश कुललोळी, अशोक निकम, बंडू पाटील, अनिल खंदारे, शिवाजी चव्हाण, शंकर पाटील,  गोपाल भोसले, विजयकुमार नागणे, राहुल झरे, सिद्धेश्वर गुंड, संतोष अवताडे,नवनाथ चव्हाण  यांच्या सह जत, कर्नाटक, मंगळवेढा, पंढरपूर या भागातील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते, प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल सावंत यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन तानाजी पवार यांनी केले तर आभार प्रमोद तोडकर यांनी मानले.

Labels:

उमाकांत मिटकर यांना राज्‍यस्‍तरीय सेवा पुरस्‍कार प्रदान

उमाकांत मिटकर
तुळजापूर :- भटके विमुक्‍तांच्‍या शिक्षण विषयातील महत्‍वपूर्ण योगदानाबद्दल पुणे येथील लक्ष प्रतिष्‍ठानचा राजस्‍तरीय लक्ष सेवा पुरस्‍कार भटके विमुक्‍त विकास परिषदेचे पुर्णवेळ कार्यकर्ते उमाकांत मिटकर यांना प्रदान करण्‍यात आला.
राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाच्‍या मार्गदर्शनाखाली चाललेल्‍या भटके विमुक्‍त विकास परिषदेचे उमाकांत मिटकर हे 2002 पासून पुर्णवेळ कार्यकर्ते आहेत. यापूर्वी त्‍यांनी मसनजोगी समाज उमरगा, किनवट येथे जिल्‍हा प्रचारक असताना केलेले गोंड, मारी, भिल्‍ल, कोलाम या समाजातील काम, यमगरवाडी प्रकल्‍प, पालावरची शाळा इत्‍यादी क्षेत्रातील काम हे दखल घेण्‍यायोग्‍य आहे.
सध्‍या त्‍यांच्‍याकडे पालावरची शाळा समन्‍वयक अशी जबाबदारी आहे. या शाळेचे वैशिष्‍टय म्‍हणजे मुलांच्‍या सोईनुसार सुरु होणारी बिना भिंतीची शाळा आहे. पाटी, पुस्‍तके, फळा यांच्‍या आधाराशिवाय ही शाळा चालते. दगड, गोटे, पाने, फुले ही शैक्षणिक सामुग्री असते. त्‍या त्‍या समाजाच्‍या बोलीभाषेप्रमाणे अभ्‍यासक्रम तयार करणे चालू आहे. सर्व शिक्षा अभियानाच्‍या जागतिक पथकानेही याची दखल घेतली आहे. तसेच युनोचा दक्षिण आशियाचा शिक्षण विषयातला पुरस्‍कारही या प्रयोगाला मिळाला आहे. एका शाळेपासून सुरु झालेला हा प्रयोग आता चार जिल्‍ह्यात 16 समाजामध्‍ये चालू आहे. संस्‍कारासोबतच बचतगट, आरोग्‍य, शासकीय कामे, व्‍यसनाधिता, स्‍वावलंबन या उपक्रमातून वस्‍तीच्‍या सर्वांगिण विकासाची अनेक केंद्रे उभी राहत आहेत.
लक्ष ही पुण्‍यातील संस्‍था असून महाराष्‍ट्रातील वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक संस्‍थांना प्रशिक्षणाचे काम करते. सदरील कार्यक्रम चिंचवड येथील रामकृष्‍ण मोरे सभागृहात संपन्‍न झाला. यावेळी भारत सरकारच्‍या कला व साहित्‍य मंडळाच्‍या डॉ. अपर्णा गोसावी, लक्ष संस्‍थेचे बालाजी जाधव आदी मान्‍यवर उपस्थित होते. मिटकर यांचे समाजातील विविध स्‍तरातुन अभिनंदन होत आहे.
उमाकांत मिटकर बोलताना म्‍हणाले की, हे काम करीत असताना एम.एड. झालो, आता लॉ ही करतोय. स्‍वार्थी भावनेने नौकरीच्‍या आशेने मी यमगरवाडीत आलो खरा, पण तो विचारही आता स्‍वप्‍नांत येत नाही. सामाजिक क्षेत्रातील काम हेच आता आयुष्‍याचे ध्‍येय झाले आहे. पण हे संघटनेच्‍या, रा.स्‍व. संघाच्‍या संस्‍काराशिवाय कदापिही शक्‍य झाले नसते. 

Labels:

विजय गणेश मंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर

उस्मानाबाद :- बेंबळी (ता. उस्‍मानाबाद) येथील विजय गणेश मंडळाच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबीर घेण्यात आले. गणेश मंडळाच्या रक्तदान शिबीर आयोजनाचे यंदाचे हे बारावे वर्ष आहे. 
रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी गावच्या सरपंच लताताई मधुकर रसाळ, उपसरपंच बालाजी गावडे, पांडूरंग पवार, बालाजी शिंदे, अनिल बागल, सुधीर गायकवाड, रामभाऊ मोटे, गोविंद नळेगावकर, नवनाथ सिरसट, अजय रोहिटे, बाळासाहेब लोहार आदी उपस्थित होते. या शिबीरात २० जणांनी रक्तदान केले. गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांमधून कौतूक होत आहे. 

Labels:

बावी गावास रुग्णवाहिका भेट

वाशी :- नुकत्याच झालेल्या बावी (ता.वाशी) ग्रामपंचायत निवडणूकीत गावातील मतदार व नागरीकांनी स्वाभिमानी पॅनलला निवडणून दिल्याबद्दल या पॅनलचे प्रमुख निखील कांदे-पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व ग्रामस्थांच्या सेवेसाठी अद्यावत यंत्र, सामुग्री असलेली अत्याधुनिक रुग्णवाहिका गावास समर्पित केली.
वाशी तालुक्यातील बावी ग्रामपंचायतची निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली. या निवडणूकीत सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक निखील कांदे - पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारावर मतदारांनी विश्वास दाखवून या पॅनलला निवडूण दिले. सरपंच व उपसरपंच पदाच्या काल झालेल्या निवडणूकीतही कांदे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे उमेदवारच निवडणून आले. गावातील नागरीक व मतदारांनी व्यक्त केलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाल्याचे सांगून एक कृतज्ञता म्हणून कांदे - पाटील यांनी अत्याधुनिक सुविधा असलेली रुग्णवाहिकाच गावासाठी समर्पित केली. रुग्णवाहिका समर्पित करण्याचा कार्यक्रम दिनांक २५ सप्टेंबर रोजी बावी येथे पार पडला. 
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना निखील कांदे-पाटील म्हणाले की, या गावातील मतदार व सामान्य नागरीकांनी माझ्या नेतृत्वाखाली पॅनल निवडणून देवून माझ्यावर जो विश्वास दाखविला त्या विश्वासास मी तडा जावू देणार नाही. या पुढील काळातही या गावासाठी जे कांही करता येईल ते करण्याचा माझा प्रयत्न राहिल असे सांगून दाखविलेल्या विश्वासाबद्दल कांदे पाटील यांनी गावक-यांचे आभार मानले.

Labels:

बावी ग्रामपंचायतीवर स्वाभिमानी पॅनलचे वर्चस्व

वाशी :- वाशी तालुक्यातील बावी ग्रामपंचायतीवर सत्ताधारी पक्षाच्या सत्तेला सुरुंग लावून निखील - कांदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच सोमनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील स्वाभिमानी ग्रामविकास पॅनलने आपला झेंडा फडकवला आहे. या ग्रामपंचायतच्या सरपंचपदी स्वाभिमानी पॅनलच्या सौ. शितल सुनिल शिंदे तर उपसरपंचपदी सौ. सत्यभामा संजय कवडे यांची निवड झाली आहे.
वाशी तालुक्यातील बावी येथील ग्रामपंचायतच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी पॅनलच्या विरोधात या निवडणूकीत प्रथमच निखील कांदे - पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी ग्रामविकास पॅनलने निवडणूक लढविली व या निवडणूकीत स्वाभिमानी ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी सत्ताधारी पक्षाला भुईसपाट करुन ग्रामपंचायतची सत्ता हस्तगत केली.
आज या ग्रामपंचायतच्या सरंपच व उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत स्वाभिमानी ग्रामविकास पॅनलकडून सरपंचपदासाठी सौ. शितल सुनिल शिंदे तर उपसरपंचपदासाठी सौ. सत्यभामा संजय कवडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सरपंच व उपसरपंच पदासाठी सत्ताधारी पॅनलच्या उमेदवारांचा सहा विरुध्द पाच मतांनी पराभव करुन सरपंचपदी सौ. शितल शिंदे तर उपसरपंचपदी सौ. सत्यभामा कवडे या विजयी झाल्या. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आशालता विक्रम शिंदे, अज्ञानबाई शेषेराव धावारे, दिबंगर सोपान माळी, भिमा मोहन शिंदे यांच्यासह वसंत बापू, धनाजी शिंदे, आप्पा शिंदे, रामेश्वर गळधर, त्रिबंक बप्पा, विष्णू शिंदे, अ‍ॅड. भोंडवे, शिवाजी बप्पा, शंकर शिंदे, बिभिषन शिंदे, संजय शिंदे, रामदास शिंदे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पॅनलचे नेते निखील कांदे - पाटील नुतन पदाधिकाNयांचा सत्कार केला.

Labels:

Thursday, 24 September 2015

राष्‍ट्रीय चर्मकार महासंघाच्‍यावतीने फळे वाटप

अणदूर :- तुळजापूर तालुक्‍यातील अणदूर येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रातील रुग्‍णांना राष्‍ट्रीय चर्मकार महासंघाच्‍या 20व्‍या वर्धापनादिनानिमित्‍त राष्‍ट्रीय चर्मकार संघ युवक आघाडी महासंघाच्‍यावतीने फळाचे वाटप करण्‍यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्‍य साहेबराव घुगे, ग्रा.प. सदस्‍या अनुराधा पापडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन यतनाळकर, प्रितम पाटील, नितीन कानडे, चर्मकार महासंघाचे युवक जिल्‍हाध्‍यक्ष सोमनाथ बनसोडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी संकेत मोहराळे, गणेश घुगे, आशिष राठोड, गंगाधर लंगडे, नितीन सुरवसे यांनी परिश्रम घेतले.

Labels:

मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

उस्मानाबाद -  जिल्ह्यात 1 जानेवारी 2016 या अर्हता दिनांकावर आधारित मतदान याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी, उस्मानाबाद यांनी दिली आहे. 
पुनरिक्षणातील टप्पे व कालावधी खालीलप्रमाणे आहेत.  प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी गुरुवार,दिनांक 8 ऑक्टोबर,2015. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी  गुरुवार,दि.8 ऑक्टोबर ते शनिवार, दि.07 ऑक्टोबर,2015पर्यंत. मतदार यादी मधील संबंधित भागाचे/सेक्शचे ग्रामसभा/स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्यूए सोबत बैठक इत्यादी आणि नावांची खातरजमा करणे बुधवार,दि.14 ऑक्टोबर,2015. विशेष मोहिमेचे दिनांक रविवार, दिनांक 11 ऑक्टोबर ते रविवार, दि.18 ऑक्टोबर,2015.दावे व हरकती निकालात काढणे सोमवार,दि.30 नोव्हेंबर,2015पर्यंत. डाटाबेसचे अद्यावतीकरण इत्यादी गुरुवार, दि.24 डिसेंबर,2015 पर्यंत. अंतिम मतदार यादी प्रसिध्दी शनिवार, दि. 16 जानेवारी,2016 अशी राहील,असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

Labels:

येणेगुर ग्रामस्‍थाची मदत

तुळजापूर - अंभी ता. भुम येथील मनीषा गटकाळ या महिलेने उपसामारीने अत्‍महात्‍या केल्‍याची बातमी प्रसारित होताच येणेगुर ता उमरगा  येथिल ग्रामस्‍थाच्‍यावतीने  आर्थिक मदत फेरी काढुन 31 हजार 111 रूपयाचा निधी पोलिस उपअधिक्षक अश्विनी भोसले यांच्‍याकडे सुपूर्द करण्‍यात आले. यावेळी सुधाकर घामशेटटी, शिवदर्शन पाटील, अय्युब जवळगे, अशोक दुधभाते, आरीफ येळीकर, यागीराज स्‍वामी याच्‍यासह इतर . 

Labels:

: शंभर कुटूंबांना पुण्यातील गणेश मंडळाची मदत

जिल्ह्यातील १०० कुटूंबांना पुण्यातील गणेश मंडळाची मदत

खचून जाऊ नका... 

नव्या स्वप्नांकडे पहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत 


उस्मानाबाद - समोर आलेले वाईट दिवस आयुष्यभर घर करून राहत नाहीत. संकटाच्या काळात खचून जाऊ नका. तुमच्या पाठीशी हजारो हात मदतीसाठी उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुःख, वेदना आणि मनातील आत्महत्यांचा विचार झुगारून नव्या स्वप्नांकडे पहायला सुरूवात करा आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा आश्‍वासक शब्दात पुणे येथील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा दिला. 
जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त, निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या १०० कुटूंबियांना पुणे येथील श्रीचिंतामणी ग्रुप आणि साईबाबा मंदीर मंडळाच्यावतीने गुरूवारी अन्नधान्य, किराणा सामान व ब्लँकेट तसेच जनावरांना चारा वाटप करण्यात आले. उस्मानाबादमधील भीषण दुष्काळाच्या अनेक बातम्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहचल्या. त्यामुळे यंदा गणेशोत्सवाच्या कार्यक्रमावर आगाऊ खर्च न करता त्या पैशातून १०० कुटूंबियांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून शंभर कुटूंबियांच्या किमान दुःखात सहभागी होता आल्याचे समाधानही पुण्याहून आलेल्या गणेश मंडळाच्या २५ कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले. या शंभर लाभार्थ्यांना १० किलो ज्वारीचे पीट, १० किलो तांदूळ, पाच किलो साखर, दोन किलो तूरदाळ, दोन किलो मसूर दाळ, पाच किलो बेसन, तेल, मीठ, तिखट, हळद याबरोबरच ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गुरूवारी सकाळी १० वाजता उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथे तेर, तावरजखेडा, कामेगाव, पानवाडी, म्होतरवाडी आणि सारोळा येथील ३८ लाभार्थ्यांना मदतीचा हात तर ६० पशुपालकांना चारा वाटप करण्यात आला. यावेळी सारोळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच कैलास पाटील, सरस भारत अकादमीचे सुनिल बडुरकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले. दुपारी २ वाजता रूईभर येथे जयप्रकाश विद्यालयाच्या प्रांगणात बेंबळी, रूईभर आणि उस्मानाबाद येथील ३२ लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू आणि १२ पशुपालकांना चारा वाटप करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे आणि सुभाष कोळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर लोहारा येथे स्थानिक पत्रकार संघाच्या मदतीने वडगाव, बेंडकाळ, धानुरी, सास्तूर आणि लोहारा येथील १९ लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते रमाकांत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. तुळजापूर तालुक्यातील दहिटणा येथील १३ गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. 

Labels:

वरवंठी ग्रामपंचायतवर भगवा..

   उस्‍मानाबाद - उस्‍मानाबाद तालुक्यातील वरवंठी ग्रामपंचायतवर सरपंच व उपसरपंचपदी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्यामुळे या ग्रामपंचायतवर शिवसेना भगवा फडकला आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणूकीत वरवंठी ग्रामपंचायतच्या
सर्वच्या सर्व म्हणजे सातही जागा शिवसेनेच्या उमेदवारांनी जिंकल्या होत्या. आज या ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी स्वाती शहाजी देशमुख तर उपसरपंच पदासाठी सौ. अर्चना विश्वनाथ कांबळे या दोघींचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वाती शहाजी देशमुख, उपसरपंचपदी सौ. अर्चना विश्वनाथ कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले.
ही निवड जाहीर होताच ग्रामपंचायतसमोर जमलेल्या गावातील नागरीक व शिवसैनिकांनी गुलालाची उधळन करीत हा विजयी जल्लोश साजरा केला. यानंतर शिवसेनेच्या वडगाव गटाच्या जि.प. सदस्या सुषमा अरुण देशमुख यांच्या हस्ते नुतन सरपंच स्वाती देशमुख व नुतन उपसरपंच अर्चना कांबळे यांच्यासह सर्व नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नुतन ग्रामपंचायत सदस्य रविप्रसाद देशमुख, कमलाकर सरवदे, संजय सगर, अलका सरपाळे, सखुबाई पवार यांच्यासह रामभाऊ देशमुख, शहाजी देशमुख, कालिदास देडे, संगप्पा बेद्रे, महेश बेद्रे,  उमाकांत पाटील, राजेंद्र सरवदे, रवी सरवदे, विठ्ठल कांबळे आदीसह गावातील नागरीक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या नुतन सरपंच व उपसरपंच यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

Labels:

प्रशिक्षणामुळेच योग्य व अचूक दिशा मिळते - लांडगे


       उस्मानाबाद - अलीकडच्या काळात अध्यापन पध्दतीत अमुलाग्र बदल झाला आहे. त्यामुळे आपला विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे राहू नये याकरिता शिक्षकांनी तत्पर रहायला हवे. प्रशिक्षणामुळे योग्य व अचूक दिशा मिळते आणि त्यातून मिळालेली ऊर्जा दैनंदिन कामकाजात उपयोगाला येते, असे मत मराठी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष वि. ना. लांडगे यांनी व्यक्त केले.
   
शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या भाई उध्दवराव पाटील सभागृहात इयत्ता नववी आणि दहावीच्या जिल्ह्यातील मराठी विषय शिकविणार्‍या शिक्षकांच्या जिल्हास्तरीय कृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद शिक्षण विभाग, मराठवाडा साहित्य परिषद, मुख्याध्यापक संघ आणि मराठी अध्यापक मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लांडगे बोलत होते. सत्कार्याला जात, धर्म, पंथ नसतो आणि सद्गुणाला वार्धक्य नसते. त्यामुळे सत्कार्याची कास सोडू नका आणि सद्गुण वाढविण्यासाठी मन लावून कष्ट करा. हे कृतीसत्र त्यासाठीच आयोजित केले असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी औदूंबर उकिरडे यांनी केले. शिक्षकांनी शाळांमधील वा ग्रंथालये अद्ययावत ठेवायला हवी. त्यातून वाचन संस्कृती वाढेल. विद्यार्थी विचारांचे अदान-प्रदान करू लागतील आणि त्यातून भाषाविषयक आकलन वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कवी तथा पत्रकार रविंद्र केसकर यांनी मराठी भाषा आणि वाचन याविषयी उपस्थितांशी संवाद साधला. छान वाचणारा माणूस घाबरत नाही. न घाबरणार्‍या माणसातच धाडस असते आणि धाडसी माणूसच तथ्य नसलेल्या परंपरांना विरोध करण्याचे सामर्थ्य बाळगतो. त्यासाठी वाचन एकमेव पर्याय असल्याचे केसकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ एम. डी. देशमुख यांनी यावेळी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. मराठी विषयाच्या शिक्षकाला चांगले बोलता, लिहिता आणि व्यक्त होता आलेच पाहिजे. बोललेले वाहून जाते, लिहिलेले टिकून राहते. त्यामुळे वाचेतून व्यक्त होण्याऐवजी लिखाणातून व्यक्त व्हायला सुरूवात करा. त्यामुळे अध्ययन देखील प्रभावी होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास जिल्हाभरातील नववी आणि दहावीचे २०० शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मसापचे सचिव बालाजी तांबे यांनी, प्रास्ताविक मराठी अध्यापक मंडळाचे बाळू घेवारे यांनी तर आभार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष एस. डी. कुंभार यांनी व्यक्त केले.

Labels:

दहिटणा :जय हनुमान गणेश मंडळाचा कार्य प्रेरणादयी


    नळदुर्ग - दहिटणा ता. तुळजापूर येथे गेल्‍या 14 वर्षापासुन एक गाव, एक गणपती, ही संकल्‍पना यशस्‍वीपणे राबवुन या मंडळाने राष्‍ट्रीय एकात्‍मता जोपासली आहे. येथिल जय हनुमान तरूण गणेश मंडळाच्‍या पदाधिकारीमध्‍ये हिंदुसह मुस्लिम समाजाचे युवक सह
भागी होवुन गणेशोत्‍सव शांततेत व उत्‍साहाने साजरा करून एक आदर्श या मंडळाने निर्माण केले.
   गणेशोत्‍सवाचे औचित्‍य साधुन गावात स्‍वच्‍छाता आभियान , व्‍यसनमुक्‍ती कार्यक्रम  व सांस्‍कृतीककार्यक्रम घेण्‍यात आले. शालेय विद्यार्थ्‍यासाठी विविध स्‍पर्धा घेवुन त्‍यांच्‍यातील कला गुणाना प्रोत्‍साहन दिले आहे.  दहिटणा येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी मोठया उत्‍साहाने गणरायाची प्रति‍ष्‍ठापणा करून एक गाव, एक गणपती ,ही संकल्‍पना यशस्‍वी करण्‍यात आली. ही पंरपरा सन 2000 पासुन आजतागायत निरंतर अखडंपणे दहिटणा ग्रामस्‍थानी जोपासत आहेत.  गणेशोत्‍सवानिमित्‍त मंडळाच्‍यावतीने आयोजित रांगोळी स्‍पर्धा, बादलीत चेंडु टाकणे, दोरी उडी, स्‍लो सायकल चालवणे, संगीत खुर्ची, यासह विविध स्‍पर्धेतील विजेत्‍याना पारितोषिक प्रमुख पाहुणे पत्रकार शिवाजी नाईक यांच्‍या हस्‍ते देण्‍यात आले.
    कु.सादिया अय्याज सय्यद, अहमद सुलेमान शेख , अंकिता बलभिम कदम, मयुरी अविनाश पाटील, चेतन भिम कुंभार, मिनाक्षी पाटील यासह इतर विजेत्‍याना यावेळी पारितोषिक देण्‍यात आले.    कार्यक्रमाच्‍या प्रांरभी श्री ची पुजा शिवाजी नाईक यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आली. मंडळाच्‍यावतीने शिवाजी नाईक , रविद्र नाईक यांचे सत्‍कार करण्‍यात आले .यावेळी मंडळाचे सल्‍लागार विजय पाटील, राजेद्र कुंभार, श्रीकांत पाटील, शंकर चव्‍हाण, रोहित नागरसे, सुनिल भोंडवे, मंडळाचे अध्‍यक्ष आमोल कुंभार, उपाध्‍यक्ष रोहित पाटील , सचिव विलास गुडडे , कोषाध्‍यक्ष ईलाही शेख यांच्‍यासह कार्यकर्ते , ग्रामस्‍थ उपस्थि होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार रोहित नागरसे यानी मानले.  या गणेश मंडळास नळदुर्ग पोलिस ठाण्‍याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यानी भेट देवुन मंडळानी राबविलेल्‍या उपक्रमाची माहिती घेतल्‍याचे विजय पाटील यांनी सांगितले. 

Labels:

आदर्श मुख्याध्यापक घाडगे याचा सत्कार

   गुळपोळी (भैरवनाथ चौधरी) बार्शी तालुक्यातील मालवंडी येथील आनंदराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक गोवर्धन घाडगे यांचा जिल्हा माध्यमिक व उच्च  माध्यमिक संघातर्फे आदर्श  मुख्याध्यापक या पुररकाराने सन्मानित करण्यात आले.
      या पुरस्काराचे वितरण सोलापूर येथील हुतात्मा स्मुति मंदिरामध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला होता  मालवंडी येथील आहिल्या कृषी केंद्र येथे ग्रा पं सदस्य बाबासाहेब काटे अमोल दहिवड विट्ठल खंडागळे वाजीद पठाण यांच्या हस्ते आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल घाडगे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी बाळासाहेब म्हत्रे संतोष सरवदे वसंत खटके भोसले आदी उपस्थित होते

Labels:

Wednesday, 23 September 2015

समतादुतांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

        उस्मानाबाद  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय  वसतिगृह. उस्मानाबाद येथे बार्टी पुणे यांच्या उस्मानाबाद जिल्हयातील सर्व समतदुतांना आमंत्रित करुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
                       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  वसतिगृह अधिक्षक नाईकनवरे बप्पा अर्जुन हे होते.    त्यांनी सर्व समतादुतांचे पुष्प देवून स्वागत करुन प्रास्ताविक केले. या कार्यक्रमातंर्गत विद्यार्थ्यांमध्ये जातीय सखोला, स्त्री-पुरुष समानता, अंधश्रध्दा निर्मुलन, सामाजिक बांधीलकी, बंधुता, समता, न्याय या मुल्यांची रुजवण व्हावी तथा त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास होऊन आदर्श समाज निर्मितीचा त्यांनी घटक व्हावे, यासाठी व्याख्यान, गाणी, पथनाटय इत्यादी उपक्रमाच्या सहाय्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना समतादुतांनी अत्यंत बहुमोल असे मार्गदर्शन केले. या समतादुतामध्ये मोटे गणेश अंकुश(भुम-परंडा), शिंदे शशिकांत बाबासाहेब(वाशी), नरवडे रमेश नानासाहेब    (उस्मानाबाद), रणदिवे अर्चना आण्णासाहेब ( कळंब ), फुलसुंदर नागनाथ बाबुराव ( लोहारा ), बनसोडे अक्षता प्रकाश  (उस्मानाबाद ) आणि गायकवाड कूलदिप नवनाथ (कळंब) यांचा समावेश होता. 
      या कार्यक्रमास वस्तिगृहाचे सर्व कर्मचारी, विद्यार्थी, उपस्थित होते व विद्यार्थ्यांचा अत्यंत चांगला प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे आभार कु.याशोदास गौतम जाधव यांनी मानले. हा कार्यक्रम मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला असल्याचेही अधिक्षक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर (मा.व.) मुलांचे, शासकीय वसतीगृह, उस्मानाबाद यांनी पत्रकात नमूद केले आहे. 

जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदीचा आदेश जारी

 उस्मानाबाद -  जिल्ह्यात  श्री गणेशोत्सव, मुस्लीमबांधवांचा बकरी ईद हे सण सर्वत्र साजरा होणार आहेत, मुस्लीम  समाजाला  आरक्षण मिळावे  तसेच गोवंश हत्याबंदी  कायदा रद्द  करावा,या मागणीसाठी  आंदोलनात्मक  कार्यक्रम होण्याची शक्यता आहे, विविध पक्ष  व संघटना  यांच्यावतीने  त्यांच्या विविध मागण्यासाठी (मुस्लीम आरक्षण , चारा टंचाई ,  पाणी टंचाई  या कारणामुळे ) अचानकपणे  आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची  शक्यता  नाकारता येत नसल्याने  अप्पर जिल्हादंडाधिकारी,उस्मानाबाद यांनी संपूर्ण जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी दि.23 सप्टेंबरचे 6 वाजेपासून ते 7 ऑक्टोबर चे मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) व 37 (3) अन्वये शस्त्रबंदी व जमावबंदीचा आदेश जारी केले आहेत. 
     या आदेशानुसार जिल्हयात नागरीकांना शस्त्र किंवा तत्सम वस्तु बाळगण्यास अथवा त्यांची वाहतूक करण्यास बंदी राहील. आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाही.  सभ्यतेस व नितिमत्तेस बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह आणि अशा अन्य वस्तु जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ति किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविता येणार नाही अथवा गाणी म्हणता येणार नाहीत. तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणा-यांविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.                              
                                                    

Labels:

चोरी प्रकरणी तुळजापूर मंदीर संस्थानचा खुलासा

      उस्मानाबाद -  श्री तुळजापूर मंदिरातील शिवकालीन भांडयाची चोरी या मथळयाखाली दि.20 सप्टेंबर रोजी विविध वर्तमानपत्रात व काही वृत्तवाहीन्यावर बातमी प्रसिध्द झालेली असून या बातमीत मंदिरातील शिवकालीन ऐतिहासिक अनमोल भांडी चोरीला गेल्याचे छापून आलेले आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने मंदिर प्रशासनाचे वतीने खुलासा प्रसिध्दीस देण्यात आला आहे. 
        ,श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत शारदीय नवरात्र  महोत्सव व शाकंभरी नवरात्र महोत्सवात ब्राम्हण भोजन व अन्नदानाचा कार्यक्रम मंदिराशेजारी असणारे भक्त निवासाजवळील सामल धर्मशाळेत आयोजित करण्यात येतो. शारदीय नवरात्र महोत्सव-2015 जवळ आल्याने व या महोत्सवात ब्राम्हण भोजन व अन्नदानाचा कार्यक्रम असल्याने पुर्वतयारीच्या दृष्टीने त्याठिकाणी ठेवण्यात आलेली स्वंयपाकाची भांडी धुण्यासाठी सबंधीत कर्मचारी त्याठिकाणी गेला असता त्याठिकाणी ठेवण्यात आलेल्या स्वयंपाकाच्या भांडयापैकी काही भांडी पितळी टोपले, भातवडया, पातेले, टोपले, परात, तांब्याची परात, स्टील बकेट ग्लास व वाटया कमी असल्याचे त्याचे निदर्शनास आले. कमी असलेली सदरील भांडी ही स्वयंपाकाची नित्य वापराची भांडी आहेत. सदरील बाब संबंधित कर्मचाऱ्यांने वरिष्ठांचे निदेर्शनास आणून दिलेली असून त्याने स्वयंपाकाची भांडी कमी असल्याबाबत कळविताक्षीच मंदीरप्रशासनामार्फत कारवाई करण्यात आलेली आहे. भांडी कमी असल्याबाबत विचारणा करणारी नोटीस संबंधित कर्मचाऱ्यास बजावण्यात आलेली आहे. 
         बातम्यात प्रसिध्दी केल्याप्रमाणे सामल धर्मशाळेत ठेवण्यांत आलेली भांडी ही शिवकालीन ऐतिहासीक नसून सदरील भांडी ही अन्नदान व ब्राम्हण भोजनाच्या कार्यक्रमाच्या स्वयंपाकासाठी वापरण्यात भांडी होती. मंदीरात असणाऱ्या ऐतिहासीक व पुरातन सोने, चांदी व इतर धातूच्या वस्तू या मंदीराचे खजिन्यात सुरक्षितरित्य ठेवण्यात आलेल्या असून सदर खजिना खोलीस पोलीस विभागामार्फत 1+3 हत्यारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या निगराणीत सुरक्षा व्यवस्था ठेवण्यांत आलेली आहे. मंदीरातील सर्व मौल्यवान वस्तूंची नोंद स्टॉल बुकमध्ये घेण्यात येवून वेळोवेळी त्याची तपासणी केली जाते. ज्याचप्रमाणे सर्व मौल्यवान वस्तू या पोलीस संरक्षणात सुरक्षित आहेत. 
         तपासणीच्या वेळी नवरात्र महोत्सवात होणाऱ्या अन्नदान व ब्राम्हणभोजनाचे स्वयंपाकासाठी असणारी पितळी 19, तांब्याची 2 व स्टीलची 34 भांडी कमी असल्याचे आढळून आले आहे. धर्मशाळेत ठेवण्यात आलेली भांडी सांभाळण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर निश्चीत करण्यात आलेली होती. कमीअसलेल्या भांडयाबाबत मंदीर प्रशासनामार्फत संबंधित कर्मचाऱ्यांवर नोटीस बजावण्यात आलेली असून कमी असलेल्या भांडयाबाबत त्यांचेकडून सविस्तर तपशील मागविलेला असून तपशील प्राप्त होताच संबंधितांवर आवश्यकतेनुसार योग्य ती प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
     परंतू कोणत्याही सबळ पुरावा नसताना ऐतिहासीक व शिवकालीन वस्तू असल्याचे तसेच या वस्तू छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे अगोदरचे संस्थानीकांनी दिल्याचे खोटे विधान छापून केवळ वैयक्तीक स्वार्थासाठी विश्वस्तांची बदनामी करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या बातम्या प्रसिध्द करुन भाविकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही या खुलाशात मंदीर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान, तुळजापूर यांनी म्हटले आहे.                                    

Labels:

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुण्यातील गणेश मंडळ सरसावले

   उस्मानाबाद  - गणेश मंडळाच्या वर्गणीतून वायफळ उत्सवी खर्च करण्यापेक्षा दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या आपल्या बांधवांना मदत करण्यासाठी पुण्यातील गणेश मंडळाचे तरूण कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. श्री चिंतामणी ग्रुप आणि श्री साईबाबा मंदीर मंडळ यांच्यावतीने जिल्ह्यातील निराधार, आत्महत्याग्रस्त १०० कुटूंबांना अन्नधान्याच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला जाणार आहे. 
उस्मानाबाद जिल्ह्यातील मागील चार वर्षांपासून दुष्काळाने मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि शेतीशी निगडीत असलेल्या इतर व्यावसायिकांची कोंडी झाली आहे. त्यातून मागील नऊ महिन्यात ११३ जणांचा कर्जबळी गेला आहे. एकीकडे दुष्काळाच्या झळा सोसत संकटात अडकलेला शेतकरी आणि दुसरीकडे उत्सवाच्या नावाखाली लाखो रूपयांची उधळपट्टी, असे विरोधाभासी चित्र असताना पुण्यातील गणेश मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत नवा आदर्श घालून दिला आहे. 
जिल्ह्यातील निराधार, आत्महत्याग्रस्त, शेतमजूर, विधवा, परित्यक्ता, अशा आर्थिक विवंचनेत अडकलेल्या १०० कुटूंबियांना या मंडळाच्यावतीने किमान दोन महिने पुरेल, एवढे अन्नधान्य आणि किराणा सामान त्याचबरोबर मायेची उब देण्यासाठी एक ब्लँकेट वाटप केले जाणार आहे. अन्नधान्याबरोबरच शेतकर्‍यांच्या दावणीला असलेल्या जनावरांची गैरसोय होऊ नये यासाठी या मंडळातील कार्यकर्ते चारा वाटप देखील करणार आहेत. गुरूवारी सकाळी १० वाजता सारोळा येथे तेर, तावरजखेडा, कामेगाव, पानवाडी, म्होतरवाडी या परिसरातील ३८ लाभार्थ्यांना मदतीचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर रूईभर येथे उस्मानाबाद, बेंबळी, केशेगाव परिसरातील ३२ लाभार्थ्यांना मदत दिली जाणार आहे. त्यानंतर लोहारा तालुक्यातील वडगाव, बेंडकाळ, धानुरी, सास्तूर आणि लोहारा परिसरातील गरजूंना लोहारा येथे मदतीचा हात दिला जाणार आहे. तुळजापूर तालुक्यातील दहिटणा येथील १३ लाभार्थ्यांनाही यावेळी मदत दिली जाणार आहे. गणेश मंडळाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी या तरूण कार्यकर्त्यांनी घेतलेला पुढाकार अनेक संस्था, संघटना आणि गणेश मंडळांना दिशादर्शक ठरेल, असा आहे.

Labels:

मंगळवेढा : भ्रष्टाचारास आळा घालण्‍याची मागणी

         मंगळवेढा  (समाधान फुगारे)  नगराध्यक्षांचा धनादेशावर सह्या करण्याचा अधिकार काढून घेतल्याने नगरपालिकेमधील भ्रष्टाचारास काही प्रमाणात आळा बसणार असल्याची प्रतिक्रिया कर्मचार्‍यांकडून व्यक्त होत आहे.
             नगराध्यक्षांना टक्केवारी दिल्याशिवाय ते धनादेशावर सहीच करत नसल्याची ओरड वारंवार होत होती. जिल्ह्यातील एकाच नगरपालिकेचे दोन नगराध्यक्ष धनादेशावर सह्या करण्यासाठी लाच घेताना रंगेहात पकडले गेले आहेत. असे असताना या निर्णयास विरोध करणारे केवळ आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत, असाही टोला कर्मचार्‍यांनी लगावला आहे.
         पंचायत समिती ,जिल्हा परिषद ,स्थानिक स्वराज्य संस्था आदि महत्वांच्या संस्थेमध्ये पदाधिकार्‍यांना धनादेशावर सह्या करण्याचे अधिकार नाहीत.मुख्याधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी ,गटविकास अधिकारी यांनाच आर्थिक अधिकार देण्यात आले आहेत. पदाधिकार्‍यांकडे धोरणात्मक निर्णयाचे अधिकारी आहेत. या निर्णयाचे पालन करण्याची जबाबदारी प्रशासन प्रमुखांवर आहे. त्यामुळे या संस्थांचा समतोल साधला जात आहे. 
नगरपालिकांमध्ये मात्र नगराध्यक्षांना धनादेशावर सह्याचे अधिकार असल्याने अनेकवेळा त्यांच्याकडून टक्केवारी साठी धनादेश अडवून ठेवले जात .त्यामुळे कंत्राटदारांची आर्थिक पिळवणूक होत असे .सुमार दर्जाची कामे करणार्‍या ठेकेदारांना त्यांचे वावडे नसले तरी प्रामाणिक ठेकेदारांवर मात्र अन्याय होत असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर एका ठेकेदाराने सांगितले.त्यातून काहीवेळा किरकोळ रकमेचे धनादेश नगराध्यक्षांनी अडविल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी होवून नगरध्यक्षांना गजाआड जावे लागल्याची अनेक प्रकरणे घडली आहे.,
  जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषदेत लागोपाठच्या दोन नगराध्यक्षांना टक्केवारीसाठी लाच घेताना रंगेहात पकडले गेले आहे. त्यामुळे हा भ्रष्टाचार वारंवार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
नगराध्यक्षांना सहयाचा अधिकार काढण्यात आलेला असला तरी धोरणात्मक अधिकार तसेच प्रशासनावरील नियंत्रणाच्या दृष्टीने नगराध्यक्षांना व्यापक अधिकार आहेत. त्यामुळे विकासकामांना अथवा दैनंदिन कामात कोणताही अडथळा येणार नाही .त्यामुळे या निर्णयास होत असलेला विरोध हा राजकीय आहे अशी प्रतिक्रिया कर्मचार्‍यांमधून व्यक्त होत आहे. 

Labels:

पत्रकार भवन व गृहनिर्माणचा प्रश्न मार्गी लावणार: ना. देशमुख

          पंढरपूर - अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पत्रकार भवन व गृहनिर्माणचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.

                              डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय बहुउद्देशीय सं
स्थेतर्फे पत्रकार अभिराज उबाळे यांनी पत्रकार पुरस्कार सोहळा आयोजित केला होता, यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार स्व. पांडुरंग (तात्या) घळसासी स्मृती विकास पत्रकारिता पुरस्कार श्रीकांत साबळे व विजयकुमार सोनवले, पत्रकार स्व. अमित ओव्हाळ स्मृती युवा प्रतिभा पुरस्कार समाधान फुगारे व सम्मेद शहा यांना प्रदान करण्यात आला.
  माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांनी पंढरपूरच्या पत्रकारांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर त्यांनी पंढरपूर पत्रकार भवनसाठी माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी खादी ग्रामोद्योगची जागा दिली आहे. काही कारणास्तव हे काम रखडले आहे; मात्र यापुढे या कामात लक्ष घालून पूर्ण करण्यात येईल, असे सुधाकरपंत परिचारक यांनी सांगितले.
            यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, आ. दत्तात्रय सावंत, पत्रकार सुधाकर काश्यप, जि.प. सदस्य धवलसिंह मोहिते-पाटील, नगराध्यक्षा साधना भोसले, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंकर वाघमारे, सुनील उंबरे, हरिभाऊ प्रक्षाळे, नवनाथ पोरे, अभय जोशी, संजय वाईकर, प्रशांत आराध्ये, संकेत कुलकर्णी, सचिन कसबे, नितीन शिंदे, शरद कारटकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 
फोटो ओळी - विश्‍वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्रीकांत साबळे, विजयकुमार सोनवले, समाधान फुगारे व सम्मेद शहा यांना पत्रकारिता पुरस्कार प्रदान करताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खा. डॉ. सुनील गायकवाड, सुधाकर काश्यप, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अभिराज उबाळे, जि.प. सदस्य धवलसिंह मोहिते पाटील आदी

Labels:

Tuesday, 22 September 2015

जिल्‍हयातील निवडणुका महायुती लढवणार - सुधीर पाटील

     उस्‍मानाबाद - या पुढील काळात जिल्ह्यात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका  महायुती म्हणूनच लढविण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्‍याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी सांगितले. 
     कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका जाहिर झाल्या असून या निवडणूका लढविण्या संदर्भात कळंब येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित शिवसेना, भाजपा व रिपाईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्‍याच्‍या बैठकीस मार्गदर्शन करताना पाटील हे बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सतिश देशमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित पिं
गळे, तालुकाप्रमुख रामलिंग आवाड व भाजपा तालुकाध्यक्ष अंकुश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. .
      सुधीर पाटील पुढे म्हणाले की, या पुढील काळात जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका या शिवसेना, भाजपा, रिपाईसह महायुती म्हणूनच लढविण्याचे आदेश आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले असून त्याची काटेकोर अमंलबजावनी होणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपले ख-या अर्थाने शत्रू असून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकी संदर्भात या पक्षाशी आपले कांहीही देणेघेणे नाही. अपवादात्मक स्थितीत गरज पडल्यास आपल्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी संबंधित पक्षाच्या पदाधिकारी किंवा नेत्याबरोबर चर्चा करावी. पण पुढील काळात महायुती म्हणूनच आपल्या बैठका होतील याची काळजी घ्यावी असे त्यांनी स्पष्ट केले.
कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची निवड करण्याचे अधिकार शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे व तालुकाप्रमुख रामलिंग आवाड यांना देण्यात आल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. आणि कोणत्याही परिस्थितीत या निवडणूकीत कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्‍यांनी  कामास लागावे असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचेही मार्गदर्शन झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महायुती म्हणून लढविण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून कार्यकत्र्यांनी जनतेच्या दृष्टीने जिव्हाळ्याची असणारी ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले. 
या बैठकीसाठी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष मिनाज शेख, शिवसेना उपतालुकाप्रमुख भारत सांगळे, शहर प्रमुख पांडूरंग कुंभार, विजय देशमुख, शिवाजी शेंडगे, बाबा मडके, बाळासाहेब शिनगारे, शितल चोंदे, बाळासाहेब समुद्रे, मंदार मुळीक आदी पदाधिका-यासह शिवसैनिक व महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाचे तालुकाध्यक्ष अंकुश पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Labels:

जळकोटात नुतन सरपंच व उपरपंच यांचा सत्‍कार


जळकोट - तुळजापूर तालुक्‍यातील जळकोट ग्रामपंचायतीच्‍या नुतन सरपंच , उपसरपंच, शालेय व्‍यवस्‍थापन कमिटीचे अध्‍यक्ष यांचा बोरमन (जळकोट )  तांडा येथे सत्‍कार करण्‍यात आला. 
          जळकोट ता. तुळजापूर येथील ग्रामपंचायतीच्‍या नुतन सरपंच सौ. कमलबाई राठोड, उपसंरप अर्जुन कदम-पाटील , बोरमन तांडा येथील जि. प. शाळेचे शालेय व्‍यवस्‍थापन कमिटी अध्‍यक्ष धनराज चव्‍हाण, उपाध्‍यक्ष अशोक राठोड यांचा  सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी माजी जि.प.सदस्‍य गणेश सोनटक्‍के, माजी उपसंरपच बंकट बेडगे, तंटामुक्‍त समितीचे अध्‍यक्ष यशवंत कदम, रिपाइं युवा आघाडीचे तालुकाध्‍यक्ष अरूण लोखडे, ग्रा.प. सदस्‍य अनिल  छत्रे, पत्रकार मेघराज किलजे, भरत पाटील, राहुल पाटील, निवृत्‍ती गंगणे, महादेव हसुरे, अनिल राठोड, महादेव राठोड , मुख्‍याध्‍यापक विलास राठेड, भिमराव राठोड, तानाजी राठोड, सुभाष चव्‍हाण सुधाकर राठोड आदिजण उपस्थित होते. 

Labels:

टंचाईच्या पार्श्वभूमीवर महिलांनी केली अनुभवाची देवाणघेवाण



उस्मानाबाद  - टंचाईच्या मुकाबला करण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची जोड हवी. हेच ओळखून जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना प्रतिसाद म्हणून स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील विविध गावात स्वयंसहायता महिला गटाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात महिलांच्या विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टंचाई परिस्थिती व एकंदरीतच आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी जल व्यवस्थापन, जमीन व्यवस्थापन, जंगल व्यवस्थापन, जनावर व्यवस्थापन, आणि जन व्यवस्थापन (लोकसहभाग/लोकचळवळ ) या पाच ‘ज’ कारांची उजळणी व्हायला हवी, असा सूर यावेळी निघाला.
निमित्त होते, स्वयं शिक्षण प्रयोग आयोजित दुष्काळ निर्मूलन अभियानाचे! जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, आत्माचे प्रकल्प संचालक व्ही.डी. लोखंडे, आत्माचे उपसंचालक श्री. चोले,  महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे समन्वयक डॉ. केशव सांगळे,  तुळजापूर कृषी विज्ञान केंद्राचे व्ही.डी. टाकणखार, स्वयं शिक्षण प्रयोगच्या नसीम शेख, विकास कांबळे, उपमन्यू पाटील, लक्ष्मीकांत माळवदकर, लीला सोमवंशी आणि किरण माने यांची यावेळी उपस्थिती होती.
स्वयम् शिक्षण प्रयोग 1993 च्या आपत्तीपासुन लातूर -उस्मानाबादसह महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातून काम करते. महिला व लोकसहभागातून काम करतांना टंचाईची चाहुल ओळखुन महिला सहभागातून 6 हजार महिला शेतकरी यांचा समुह तयार केला. यापैकी शंभरच्यावर  महिला स्वत:  प्रशिक्षकाची जबाबदारीही पार पाडतात. शेतीमध्ये काय करावे व काय नको याची माहिती व अनुभव एकमेकींना सहज देण्याचे काम त्या करतात. राज्य शासनाच्या विविध योजना प्रशासनाच्या सहकार्याने राबविण्यासाठी या संस्थेने पुढाकार घेतला आहे.
यावेळी येथे आलेल्या विविध महिलांनीही आपले अनुभव कथन केले. त्याचबरोबर प्रकल्प संचालक डॉ. सातपुते म्हणाल्या की, पूर्वीच्या काळी महिलाच शेती व गावगाडा सांभाळायच्या. पुरुष दुर्दैवाने आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारतात करतात. महिला आत्महत्या रोखतात. दुसर्यांना प्रेरणा देतात. अनेक यशकथा महिलांनी स्वताच्या हिंमतीवर रचल्या आहेत. इतरांच्या प्रगतीत हातभार  लावला आहे. पाच ज चा प्रसार  व प्रचार करा. कठीण समस्यावरही महिलांकडे सहज उपाय असतात. आता दुष्काळावर मात करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. झाडे लागवड वाढवली पाहिजे. आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान पुढाकार घेत आहे. एसएसपीचा यात मोलाचा वाटा आहे. आम्ही महिलांना गटवार खेळतं भांडवल देत आहोत. आपल्या जिल्ह्यात उमेद पशुपालन संघाची स्थापना करतोय. पारंपारिक बरोबर नविन व्यवसायही करा. योग्य माहिती व प्रशिक्षण असेल तरच कार्य यशस्वी होईल. दुष्काळाचे आव्हान यशस्वी परताऊन लावू, दुष्काळ हरेल आम्ही जिंकु असा आत्मविश्वास बाळगा. आपला हा जिल्हा ताठ मानेनं जगणारा जिल्हा आहे हे सिध्द करु, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्री. लोखंडे यांनी  शेतकऱ्यांच्या शाश्वत प्रगतीसाठी  महिलांची प्रगती आधी झाली पाहिजे, असे सांगितले. आत्माच्याव्दारे आम्ही अशा कामांना सर्व विभागांचे सहकार्य घेत कायम साथ देऊ. केव्हीके, एसएसपी, एमएसआरएलएमचे गटांनी यासाठी पुढाकार घ्यावा. अंडी उबवण्याची यंत्रे तुळजापूरला उपलब्ध करुन देऊ, महिलांनी याचा लाभ घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
श्री. चोले यांनी,  10 गुंठ्यात पॉलीहाऊस सारखी शेती करता येते, तीही फायदेशीरपणे असे सांगितले. त्याशिवाय, 10 गुंठ्याच्या शेडनेटमध्ये 4-5 लाखाचे उत्पन्न घेता येते. शेतीला बांधाने पाणी थांबवा. ठिबक व प्लास्टीकचे मल्चिंग करुन कमीत कमी पाण्यात शेती करा. यासाठी आत्मा योग्य सल्ला व मार्गदर्शन करेल. एसएसपीने पुढाकार घेऊन महिलांची कंपनी स्थापावी. आवश्यक ती सर्व मदत आत्मा करेल, असे त्यांनी नमूद केले.  श्री. टाकणखार यांनी, तलावाच्या गाळाचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन केले. ऊसाला पर्यायी पीक म्हणून बटाटा हा ऊसापेक्षा चारपट कमी पाण्यात येतो. व एकरी 2 लाखापेक्षा जास्त उत्पन्न येते, कांदाही तसाच घेता येतो. आपल्या भागात तूर चांगली आहे, तुरीला चांगला भाव आलाय. फक्त तुरीला फवारणी करुन चांगले पीक घेता येईल, असे मार्गदर्शन केले.
डॉ. सांगळे यांनी, पाणी व्यवस्थापन महत्वाचे असल्याचे नमूद केले. यावेळी विविध महिलांनी आपले मनोगत मांडले. त्यातून त्यांनी त्यांच्या यशकथा सांगितल्या.  परिस्थितीशी दोन हात करीत यश मिळवल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.


वैशाली घुगे यांनी, पाऊस नाही,पाणी नाही,चारा नाही, अशा परिस्थितीत ॲझोला निर्मिती प्रशिक्षण मिळाल्याचा लाभ झाल्याचे सांगितले. आता टंचाई परिस्थितीतही आम्ही 10 लिटर दुध मिळवतो.  ॲझोला निर्मितीसह हायड्रोपोनिक्सचोही प्रशिक्षण मिळाले. आठ दिवसात उत्तम चारा मिळतो. जनावरांसाठी फारच पोषक आहे. एकुण 10 जनावरे आहेत त्यापैकी 4 दुभती आहेत. या दोन्हीमुऴे चाऱ्याचा प्रश्न मिटला. सेन्द्रीय खत पण बनवते, असे त्यांनी सांगितले.
हिंगलजवाडीच्या कमलताई कुंभार यांनीही त्यांचे अनुभव सांगितले. शेती नव्हती. लिजवर 5 एकर घेतली.  शेवगा व सुबाभळ घेतली. पालेभाज्या, कुकुट पालन आदी केले. शेतीतील विंधन विहीरीचे पुर्नभरन केले. त्यामुळे  पाणी वाढले. सोबत, शेळीपालन केले. चारानिर्मितीसाठी ॲझोला व हायड्रोपोनिक्स केले. त्यामुळे स्वयंपूर्णतेचा अनुभव आल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले.
     काटगावच्या संजीवनी माळींनीही आपले अनुभव सांगितले. तळ्यातली माती  शेतात टाकल्याने पाऊस कमी असतांनाही चांगली पीकं आली. नापीक जमीन पिकाऊ झाली. शासनाच्या योजना चांगल्या पद्धतीने राबवल्याने फायदा दिसू लागला. बीज प्रक्रीया, सेंद्रीय शेतीमुळे दुष्काळ सुध्दा निष्फळ ठरतो. शासनापर्यंत आपण स्वत पोहोचा. त्यातूनच माळरानाची शेती आता पिकाऊ झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
अनसुर्ड्याच्या अर्चना माने यांनीही शेवग्याच्या शेतीची कहाणी सांगितली. बीजप्रक्रीया व सेंद्रीय शेती केली. फवारणी साठी पाल्यापासुन किटकनाशक बनवले. शेवगा चांगला आला, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
नीलेगावच्या निर्मला मोरे म्हणाल्या की, महिलांना पीकाबाबत मार्गदर्शन केलं. कारल्याचे पीक घेतले.  आमच्या शिवारात कमी पाणीखाऊ पीकं वाढवलेत. राशनची योजना लोकांना सांगीतली. आता सर्व दुकानात ही योजना चांगली राबवली गेली. आपण लोकांना लाभ देण्याच्या योजना पुढाकार घेऊन राबवून घ्यायच्या असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. कांबळे यांनी केले

Labels:

सरपंचपदी अंकिता मोरे , उपसरपंचपदी अतुल वाडकर यांची निवड


उस्‍मानाबाद -  उस्‍मानाबाद  तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या व सर्वाचे लक्ष वेधलेल्‍या  वडगाव सि. ग्रामपंचायतीवर अखेर शिवसेनेने आपला झेंडा फडकविला असून या ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अंकिता अंकुश मोरे तर उपसरपंचपदी अतुल रामेश्वर वाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
    दि. ४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत वडगाव सि. येथील गेल्या पंधरा वर्षापासून सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला धुळ चारुन अंकुश मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पॅनलने सर्वच्या सर्व म्हणजे ११ जागा व त्यासही २०० मताच्या परकारने जिंवूâन या ग्रामपंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकविला होता.
     
वडगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बोलावलेल्या नुतन ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत आज सरपंच पदासाठी अंकिता अंकुश मोरे तर उपसरपंच पदासाठी अतुल रामेश्वर वाडकर यांचेच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाNयांनी वडगाव सि. ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अंकिता अंकुश मोरे तर उपसरपंचपदी अतुल रामेश्वर वाडकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले.
ही निवड जाहिर होताच ग्रामपंचायत समोर जमलेल्या गावातील नागरिक, तरुण व शिवसैनिकांनी गुलालाची प्रचंड उधळण करीत व फटाक्याच्या आतीषबाजीत हा विजयी जल्लोष साजरा केला. नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देत व ढोल ताश्यांच्या गजरात सरपंच, उपसरपंच तसेच नुतन सदसस्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील प्रत्येक चौकात नागरिकांनी या मिरवणुकीचे स्वगात केले.

Labels:

पांगरी : दारूची वाहतुकप्रकरणी तिघांना अटक

    पांगरी (गणेश गोडसे) उच्च प्रतिच्या गाडीतून विविध कंपनीच्या देशी,विदेशी दारूची वाहतूक करणार्‍या उस्मानाबाद जिल्ह्यातील तिघांना, वाहनासह साडेसात लाख रुपयांच्या  मालासह अटक केल्याची घटना  दि.21 सोमवारी रात्री 9.45 वाजता पांगरी-बार्शी दरम्यान असलेल्या कुसळंब टोल नाक्यांवर नाकाबंदी दरम्यान घडली.
      गणेश दत्तात्रय उर्फ दिनानाथ शेंडगे रा.भूम,जि.उस्मानाबाद,प्रविण गणपत डोके रा.गोलेगांव हल्ली शिवाजीनगर भूम,व रामलिंग शेकु पौळ रा.कसबा ता.भूम अशी पांगरी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नांवे आहेत.
   जिल्हा पोलिस प्रमुखांच्या आदेशान्व्ये कुसळंब येथील टोल नाक्यालगत पांगरी पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली असून रात्री पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू असताना बार्शी येथून कुसळंब,येरमाळा मार्गे भूम कडे निघालेल्या एम.एच.25.आर.6056 या रेनोल्ड ड्स्टर या गाडीची तपासणी केली असता ऑफिसर्स चॉइस 240,व्हिस्की98,रॉयल स्ट्याग96,म्याकडॉल आदी विविध कंपन्यांचा देशी,विदेशी दारूचा साठा गाडीत मिळून आला.बेकायदा बिगर पासपरमिट आपल्या कब्जात दारूचा साठा बाळगल्याप्रकरणी तिघांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच गणेश शेंडगे यांच्यावर दारू पिऊन  गाडी भरधाव वेगात वेडी वाकडी चालवल्याप्रकरणी ड्रंक अँड ड्राईव्ह कलमाखालीही गुन्हा नोंद करण्यात आला आहे..आरोपी शिंगनापूर येथे दर्शन घेऊन बार्शी येथे आले होते.तेथे दारूची खरेदी करून येरमाळा येथे मित्राला सोडून भुमला जाणार होते.दरम्यान कुसळंब येथे ही पोलिस कारवाई झाली.  ही कारवाई पांगरी पोलिस ठाण्याचे स.पो.नि.सोमनाथ वाघ,पोलिस उपनिरीक्षक राजू राठोड,हवालदार अमोल अवघडे,मल्लिकार्जुन सोनकर,रवी लगदिवे,समिर शेख यांच्या पथकाने केली.अधिक तपास हवालदार सुधाकर ठाकर हे करत आहेत. 

Labels:

Monday, 21 September 2015

उस्‍मानाबाद जिल्‍हा विविध वर्त

स्वातंत्र्यसैनिक निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

उस्मानाबाद- जिल्ह्यातील राज्य स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतन ऑक्टोबर-2015 पासून उस्मानाबाद कोषागार कार्यालयामार्फत केले जाणार आहे.  जिल्ह्यातील ज्या स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांच्या वारसांनी निवृत्तीवेतन अथवा कुटुंबनिवृत्तीवेतनासाठी त्यांची ओळख पटविली नसेल त्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी कोषागार कार्यालयात येऊन  त्यांची ओळख पटविण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी विशाल पवार यांनी केले आहे.
या स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांच्या वारस पत्नी यांनी त्यांचेकडील मूळ दस्ताऐवजासह  (पीपीओ आदेश, सन्मानपत्र, ओळखपत्र आदी) सूचनापत्रासह कोषागार कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवृत्तीवेतन अथवा कुटुंबवेतन मिळण्यातील विलंब टाळण्यासाठी संबंधितांनी 30 सप्टेंबरपूर्वी कोणत्याही परिस्थितीत त्यांची ओळख पटविण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या कोषागार कार्यालयामार्फत आजपर्यंत 585 निवृत्तीवेतनधारकांची ओळख पटविण्याची कार्यवाही झाली असून  उर्वरित जवळपास 350 निवृत्तीवेतनधारकांनी त्यांची ओळख पटविण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्याबाबतचे आवाहन श्री. पवार यांनी केले आहे.                              
       भ्रष्टाचार  निर्मुलन समितीची  आज जिल्हास्तरीय बैठक

उस्मानाबाद-जिल्हास्तरीय  भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक दि. 22 सप्टेंबर 2015 रोजी दुपारी ठिक 3 वाजता  जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या  सभागृहात  ठेवण्यात आलेली आहे. सदर  दिवशी दुपारी 3 वाजल्यांनतर जनतेच्या तक्रारी किंवा अभिकथने पुराव्यासह ऐकूण  घेण्यात येतील. तरी सर्व कार्यालय प्रमुख तसेच अशासकीय सदस्य व जनतेने याची नोंद घ्यावी असे निवासी  उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे .

                                केरोसीनचे वेळेत वाटप करण्‍याचे आवाहन
         उस्मानाबाद,- :या जिल्ह्यास सप्टेंबर-2015 या महिन्यासाठी  केरोसीनचा कोटा प्राप्त झाला आहे. शिधापत्रिकाधक व परवानाधारकांना वेळेत केरोसीनचे वाटप करावेत व केरोसीन वितरणात कोणताही गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेऊन, विक्रेत्यांकडील शिल्लक साठयाची  माहिती दरमहा 27 तारखेपुर्वी न चुकता सादर करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. तहसीलदारांनी महिनाभरात कधीही दुकानात केरोसीन मिळेल, यादृष्टीने केरोसीन परवानाधारकांना कोटा उपलब्ध  करुन द्यावा. तसेच दरमहा तालुक्यातील संबधित गॅस एजन्सीकडून एक गॅसधारक/ दोन गॅसधारकांची यादी घेवून शिधापत्रिकेवर स्टॅंपिंग न करता किरकोळ परवानाधारकास कमी जास्ती नियतन देण्यात आल्यास त्यास सर्वस्वी तहसीलदार जबाबदार धरण्यात येईल.
            तसेच कंपनी एजटांनी तीन दिवसाच्या आत रक्कम अर्धघाऊक/किरकोळ परवानाधारकांकडून जमा करुन घेवून  केरोसीनचे वितरण करावे.  परवानाधारकांनी सदरची रक्कम कंपनी  एजंटाकडे  आदेश निघाल्यापासून तीन दिवसाच्या आत जमा करुन केरोसीनची मागणी करावी. केरोसीन कंपनी एजंटांनी कोटा तालुकानिहाय वाटप करीत असताना वाटपासाठी पाठविलेले टँकर प्रथम तहसील कार्यालयात  हजर करावे. टँकर ट्रकिंग सिस्टमनुसार तहसीलदार यांनी  निर्देश देतील त्याप्रमाणे तहसील कार्यालयाच्या प्रतिनिधी समक्ष केरोसीनचे वाटप करावे. केरोसीन वितरणाची कार्यवाही सायंकाळी 6 वाजेपर्यंत करावी. सुर्यास्तानंतर केरोसीनचे  वाटप करु नये. केरोसीन कंपनी, एजंट, अर्धघाऊक, किरकोळ विक्रेत्यांनी त्यांना देण्यात आलेला केरोसीन कोटा 25 तारखेपर्यंत 100 टक्के नियतन उचल करुन वाटपाची कार्यवाही पूर्ण करुन वाटपाचा पाक्षीक अहवाल दरमहा 17 व 27 ताररखेपुर्वी  सादर करावा. कोटा मुदतबाहय उचल केला जाणार नाही किंवा  व्यपगत होणार नाही, याची सर्व संबधितांनी दक्षता घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
 
       

 वाहन थांब्याबाबत  हरकती कळविण्याचे आवाहन

उस्मानाबाद, दि. 21:- पोलीस  अधिक्षक  उस्मानाबाद  यांच्या वतीने  कळविण्यात येते की , उस्मानाबाद व तुळजापूर  शहरामध्ये  लोकांच्या सोयीसाठी  व वाहतुक  सुरळीत  व्हावी यासाठी  विविध  ठिकाणी वाहन थांबे करण्यात येणार आहेत.  या थांब्याबाबत कोणास  काही सांगावयाचे  असल्यास त्यांनी 30 दिवसाच्या आत  शहर वाहतुक  शाखा  उस्मानाबाद  आणि पोलीस स्टेशन, तुळजापूर  येथे आपली  हरकत  नोंदवावी, असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
आसन क्षमता 3 + 1 असलेल्या ऑटोरिक्षांसाठी  रा.प.म. मध्यवर्ती  आगाराच्या डाव्या  बाजुला  10+ 10 रिक्षांसाठी जागा  निश्चित  करण्यात  आली आहे. आण्णाभाऊ साठे चौक  येथे दुधडेअरीला  लागून  असलेल्या मोकळ्या  जागेत  10 रिक्षांसाठी  जागा  निश्चित  करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयाच्या पाठभिंतीला मोकळया जागेत  10 रिक्षांसाठी,   बार्शी नाका (सिग्नल पाँईंट)  याठिकाणी 10 रिक्षांसाठी, उंबरे कोठा येथे पुर्वीच्या स्टँडसमोर  श्री राठोड  यांच्या घराशेजारी  5 रिक्षांसाठी, भाऊ उध्दवराव  पाटील शाळा, शाहुनगर, बार्शी रोडच्या जवळ मोकळया जागेत 5 रिक्षांसाठी, सेंट्रल बिल्डींग येथे रा.प.म.मध्यवर्ती  आगाराकडे जाताना  सिग्नलच्या  आधी डाव्या बाजुस 10 रिक्षांसाठी, समता नगर/ आनंद नगरच्या कॉर्नर  सोडून त्याच्या  बाजुला टी.व्ही. सेंटरच्या पाठभिंतीला जाणाऱ्या रोडवर 5 रिक्षांसाठी, शिवाजी चौक , तुळजापूरकडे जातांना 10 ऑटोरिक्षांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.
काळी पिवळी  जीप (5+1) आणि (6+1) ऑटोरिक्षा – सांजा रोड, दुरसंचार निगम  ऑफिसच्या समोर रोडला मोकळ्या जागेत  4 काळी पिवळी जीप  व 5 ऑटोरिक्षासाठी, बांधकाम  विभागाच्या मोकळया जागेत, शिवाजी चौक  येथे काळी पिवळीसाठी  स्टँड  निश्चित करता येऊ शकते, परंतु  यासाठी  सार्वजनिक  बांधकाम  विभागाने  सदर जागा  उपलब्ध  करुन देणे आवश्यक आहे,  औद्यौगिक  प्रशिक्षण संस्थेला लागून असलेल्या मोकळया जागेत 2 काळी पिवळी जीप व 4 ऑटोरिक्षा यांच्यासाठी, सेंट्रल बिल्डींगच्या डाव्या बाजुला  जिल्हा उद्योग  केंद्राच्या गेटसमोर  10 काळी पिवळी जीपसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.
  खाजगी व मालवाहतुक  वाहने पार्कींग- ज्या ठिकाणी  मालवाहतुक  वाहने थांबत  आहेत त्याठिकाणी  काळी पिवळी  जीप व 6+1 ऑटोरिक्षा  यांच्या थांब्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. मालवाहतुक  वाहनांसाठी  आठवडा  बाजार  येथे  पार्कींगसाठी जागा देता येईल  व ज्यादिवशी  बाजार असतो  त्यादिवशी सदर वाहने  जनावरांच्या  बाजारांच्या ठिकाणी  पार्कींग देता येईल, असे निश्चित करण्यात आली आहे.
तुळजापूर शहरातील  ऑटोरिक्षा व टॅक्सी  स्टॅड ठरविणे – 3+1 ऑटोरिक्षा – जुने बसस्टँडच्या प्रवेश  गेटजवळ 10 रिक्षा, जुन्या  बसस्टँडच्या बाहेर (आऊटगेटजवळ)  8 रिक्षा, मलबा  हॉस्पिटलजवळ  5 रिक्षा, घाटशिळ रोड-दिपक चौक 5 रिक्षांसाठी अशी जागा निश्चित करण्यात आली आहे.
6+1 ऑटोरिक्षा – सावरकर  चौक येथे 6+1 ऑटोरिक्षासाठी थांबा  देता येऊ शकतो, असे पोलीस विभागाने म्हटले आहे. याबाबतच्या हरकती 30 दिवसाच्या आत नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.  
                                                           
                     रेडीमेड गारमेंट व फॅशन डिझायनिंग   प्रशिक्षण

उस्मानाबाद,दि.21:- महाराष्ट्र ‌उद्योजकता विकास केंद्र, उस्मानाबाद आयोजित  विशेष घटक योजनेतील  सुशिक्षित बेरोजगार  महिला व  युवतीसाठी येथे मोफत रेडीमेड  गारमेंट ॲण्ड फॅशन डिझायनिंग  प्रशिक्षण दि.22 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर 2015 या कालावधीत अनाळा ता. परांडा व तामलवाडी ता. तुळजापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संपूर्ण रेडीमेड  गारमेंट  ॲण्ड फॅशन डिझायनिंग  व उद्योजकीय  अभ्यासक्रम या विषयी  11 ते 5 या वेळेत ‍तज्ञ  मार्गदर्शक व अधिकारी यांच्याद्वारे माहिती दिली जाणार आहे.  तरी इच्छुक महिला व युवतींनी अधिक माहिती व अर्जासाठी  दि. 21 सप्टेंबर 2015 पर्यंत कार्यक्रम समन्वयक संजय वैद्य भ्रमणध्वनी 9579362310 यांच्याशी  अनाळा, ग्रामपंचायत येथे संपर्क साधावा व प्रकाश पवार  कार्यक्रम समन्वयक तामलवाडी मोबाईल 8421664915 यांच्याशी ग्रामपंचायत  तामलवाडी  येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एमसीईडी द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्ये केले आहे.
                                         
                       अन्न धान्य  व फळ प्रक्रीयेवर आधारीत  प्रशिक्षण

उस्मानाबाद,- महाराष्ट्र ‌उद्योजकता विकास केंद्र, उस्मानाबाद आयोजित   विशेष घटक योजनेतील  सुशिक्षित बेरोजगार  युवक व  युवतीसाठी येथे मोफत अन्नधान्य  व फळ प्रक्रीयेवर आधारित उद्योजकता  विकास प्रशिक्षण दि.24 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर 2015 या कालावधीत उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संपूर्ण अन्नधान्य व फळ प्रक्रीयेवर आधारित  उद्योगांसंबंधी , टमाटा सॉस , जाम जेली , केचप , ज्युसचे विविध प्रकार  , मसाले प्रक्रीया  उद्योगसंबंधी , सोया प्रक्रीया , आवळा प्रक्रीया  लोणचे  , मंचुरियन  , व्हेज, विविध प्रकार , पिझ्झाचे  विविध प्रकार , इटालियन  पास्ता  व स्पॅगेटीचे  विविध प्रकार  , सुप  विविध प्रकार,  प्रात्याक्षिके  व थेअरी  मार्गदर्शन  , खरेदी  विक्री  यांचे तंत्र  , उद्योजकीय  व्यक्तीमत्व  विकास ,   विविध  महामंडळ  कर्ज व अनुदान  विषयी  योजनांची  माहिती  दाळ प्रक्रीया  , पापड  प्रक्रीया  उद्योगसंधी ,  प्रकल्प  अहवाल   विक्री  कौशल्य  उद्योग  नोंदणी प्रकल्प  भेटी , कर्ज  प्रस्ताव  दाखल करण्या विषयी  माहिती  ,  अन्न भेसळ  व औषधी  संबंधी  कार्यालयाची माहिती , उद्योगाला लागणारे परवाणे , लोगो परवाना ख्‍आसएसआय ट्रेउ मार्क  संबंधी माहिती ,  एमआयडीसीमधील  भुखंड  , एसवएसआय रजीस्ट्रेशन  बँक  संबंधी  माहिती  , सुक्ष्म , लघु व मध्यम मंत्रालय भारत सरकार  यांच्या योजना , जिल्हा उद्योग केंद्र  व खादी  ग्रामोद्योगाच्या विविध योजना  यशस्वी  उद्योजक तज्ञ  मार्गदर्शक व अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत . तरी इच्छुक युवक व युवतींनी अधिक माहिती व अर्जासाठी  दि. 22 सप्टेंबर 2015 पर्यंत कार्यक्रम समन्वयक सुशांत  गायकवाड  भ्रमणध्वनी  9403866242  व 9209636789 यांच्याशी  महाराष्ट्र ‌उद्योजकता विकास केंद्र, उस्मानाबाद  येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी एमसीईडी द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्ये केले आहे.

                    मेंढी व शेळीपालन प्रशिक्षण

             उस्मानाबाद,दि.18- मेंढी व शेळी  विकास  प्रक्षेत्र तीर्थ ता. तुळजापूर  जि. उस्मानाबाद  यांनी खाजगी  व्यवसाय  करणारे शेतकरी, सुशिक्षीत  बेरोजगार  यांना शेळी  पालन व्यवसाय  शेतीस  जोडधंदा  म्हणून  कसा करावा  व तो आजच्या परिस्थितीत  फायदेशीर  कसा ठरेल  या सर्व  विषयावर  मार्गदर्शन करण्याच्या हेतुने  मेंढी व शेळी विकास  प्रक्षेत्र तीर्थ  येथे तीन  दिवसाचे प्रशिक्षण शिबीर  आयोजीत केले आहे . या प्रशिक्षणामध्ये शेळी पालन  शेतीस  जोडधंदा शेळयांच्या पैदासी  करीत निवड , आहार , लक्ष ण व उपचार प्रतिबंधात्मक  उपाय , शेळी  पालन करतानाची  काळजी  , शेळयांची  निवड , जाती ,  करडाची निगा ,  मरतुकीची कारणे , विमा , विक्री व्यवस्थापन  इत्यादी विषयांवर  तज्ञांकडून मार्गदर्शन देण्यात येणार आहे व शेळीपालन प्रशिक्षणाचे  प्रमाणपत्र  देण्यात येईल , तेव्हा  या प्रशिक्षणात  भाग घेऊ  इच्छीणाऱ्यांनी  नाम मात्र  शुल्क  भरुन  आपले  पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी  विकास  प्रक्षेत्र  तीर्थ ता .तुळजापूर  फोन नं . 02472-2590266 येथे आपले  नाव नोंदवावे असे  लाखे  प्रक्षेत्र व्यवस्थापक  यांनी कळविले आहे.

अनुसुचित  जातीच्या  स्वयंसहायता  बचत गटांना 90 टक्केअनुदानावर  मिनी ट्रॅक्टर देण्याची योजना

उस्मानाबाद -महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या  दि. 6 डिसेंबर 2012 च्या शासन निर्णयानुसार अनुसुचित जाती  व नवबौध्द  घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर  मिनी ट्रॅक्टर  व त्यांची उपसाधने, कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर  इत्यादीचा  पुरवठा  करण्याची  योजना  कार्यान्वित झालेली आहे. सदर  योजनेसाठी अर्ज करणाऱ्या  स्वयंसहायता बचत  गटातील सर्व सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. एकूण सदस्यांपेैकी 80 टक्के सदस्य हे अनुसुचित  जातीचे  असणे आवश्यक आहे. सदर अटी पूर्ण  करणाऱ्या  स्वयंसहायता  बचत गटांना  मिनी ट्रॅक्टर  व इतर साहित्यासाठी  शासनाकडून  रु. 3 लाख 15 हजार  पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. उस्मानाबाद  जिल्ह्यासाठी शासनामार्फत  28 मिनी  ट्रॅक्टरचे  उद्दिष्ट ठरवून देण्यात  आलेले आहे. तेव्हा  सदर योजनेचा लाभ  घेण्यासाठी  उस्मानाबाद  जिल्हयातील अनुसुचित  जाती व नवबौध्द  घटकांच्या स्वंयंसहायता बचत गटांनी कार्यालयातील विहित नमुन्यातील अर्ज चेकलिस्ट प्रमाणे कागदपत्रांसह सादर करावेत . अर्जाची झेरॉक्स प्रत स्वीकारली जाणार नाही . अर्ज सादर  करण्याचा अंतिम दि. 25 सप्टेंबर 2015 पर्यंत राहील . योजनेच्या अधिक माहितीसाठी  कार्यालयास संपर्क साधावा  असे आवाहन  सहाय्यक आयुक्त  समाज कल्याण  उस्मानाबाद यांनी केले आहे.

            बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी आता आद्या आठवडी बाजार सुरु 

उस्मानाबाद- ग्रामीण  जीवन्नोनती  अभियानाअंतर्गत उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये महिला स्वयंसहायता समुहातील महिला काही वस्तुंचे उत्पादन करतात परंतु त्यांना फक्त प्रदर्शन महोत्सवामध्येच आपल्या उत्पादीत वस्तु विक्री  कराव्या लागतात.तसेच ग्रामीण भागात काही मेाजक्याच  ठिकाणी आठवडी बाजार भरतआहेत,त्यामुळे जी गावे बाजारावीना राहतात जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी  यांनी सुचवलेल्या नाविण्यापूर्ण उपक्रमामधून आठवडी  फिरता  बाजार हा उपक्रम जिल्हा ग्रामीण  विकास यंत्रणेमार्फत घेण्यात आला असून त्यासाठी जिल्ह्यात 56 ठिकाणी आद्या  आठवडी बाजार भरविण्याचे नियोजन करण्यात येत असून सध्या भूम तालुक्यातील जांब  या गावात  तसेच परांडा  तालुक्यातील शिराळा  या गावात  आठवडी बाजार भरविण्यात येत आहे . स्वयंसहायता  समुहाने जरी स्वत: उत्पादीत  केलेल्या  वस्तु विक्रीस  आणल्या नाहीत तरी त्या वस्तु ठोक बाजारातून  खरेदी  करुन आठवडी  बाजारात  विक्री करुन शकतात. आठवडी  बाजारात  विक्रीसाठी ठेवावयाच्या वस्तु, धान्य, भाजी ,फळे ,डाळी पापड , कपडा ,स्टेशनरी,खाद्य वस्तु इत्यादी असून या आठवडी  बाजारामुळे  महिला स्वयंसहायता समुहातील महिलांना त्यांनी उत्पादीत केलेल्या अथवा विकत घेउुन वस्तु विक्रीतनू  रोजगार  मिळू शकेल व महिलांना यामधुन  स्वयंसहायता समुहाच्या उत्पादीत  मालास बाजारपेठ  मिळून  महिलांना जाणे येणे  सोयीचे होऊ शकेल व महिलांचा वाहतुक खर्च  कमी होऊ शकतो व त्या  गावातील  लोकांना  गावातच  बाजारातील  वस्तु मिळाल्यामुळे त्यांचा  वेळ व आर्थिक बचत होऊ  शकते .  सध्या  शिराळा  व जांब या गावात भरत असलेल्या बाजारामुळे तेथील  महिलांना रोजगार उपलब्ध होऊ लागला  असून  जिल्ह्यातील  इतर गावामध्येही  लवकरच  बाजार  भरविण्याचे  नियेाजन करण्यात येत आहेत . तसेच आठवडी बाजरामध्ये स्वयंसहायता समुहाशिवाय इतर व्यापारीही येऊ शकतील त्यामुळे  स्वयंसहायता समुहाच्या वस्तु विक्रीमध्ये स्पर्धा राहील व वाजवी दर राहिल्यामुळे ग्रामस्थ  खरेदी  मोठया प्रमाणात  करतील , असे प्रकल्प संचालक  जिल्हा ग्रामीण  विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांनी कळविले आहे .
 
                       ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे आयोजन  

उस्मानाबाद - स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार  प्रशिक्षण  संस्था  व जिल्हा ग्रामीण  विकास यंत्रणा , उस्मानाबाद  यांच्या संयुक्त  विद्यमाने  ग्रामीण भागातील  दारिद्र्य रेषेखालील  18 ते 45 वयोगटातील  मुली व महिलांसाठी  दि. 22 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर 2015  या 30 दिवसांच्या कालावधीसाठी ब्युटी पार्लर या प्रशिक्षणाचे आयोजन  राजे कॉम्प्लेक्स , तिसरा मजला,औरंगाबाद रोड , उस्मानाबाद येथे करण्यात  आलेले आहे . सदर प्रशिक्षणाच्या  कालावधीत  स्टेशनरी, जेवणाची  व राहण्याची व्यवस्था संस्थेमार्फत  विनामुल्य  केलेली  असून कोर्स यशस्वीरित्या  पूर्ण  केल्यानंतर  तुमचा स्वत:चा व्यवसाय सुरु  होईल  व स्वत:च्या पायावर उभे राहाल . तरी इच्छुक  मुली व महिलांनी  या सुवर्ण  संधीचा लाभ घ्यावा व स्वयंरोजगाराची निर्मिती  करुन स्वावलंबी व्हावे, असे आवाहन  संस्थेचे  संचालक राजन चुंबळे यांनी केले आहे. प्रवेशासाठी ग्रामसेवकाचा दारिद्र्‌य रेषेखालीलअसल्याचा दाखला , रेशनकार्ड किंवा रहिवाशी दाखला,वय व शैक्षणिक  पात्रतेसाठी  शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट , मार्कलिस्ट, पाच फोटो इत्यादी कागदपत्रांसह  व्यक्तीश: भेटावे  तसेच मोबाईल क्रमांक 9763624998 / 7030320255/ 9923069923/ 9552858521 वर संपर्क साधण्याचेही आवाहन केले आहे .                          

Labels: