Wednesday, 29 March 2023

सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पंडित यांची बदली, नागरिक व कर्मचारी झाले भावुक

 
काटी, दि.२९ : उमाजी गायकवाड 

मंगळवार दि. 28 रोजी  तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन अशोकराव पंडीत यांची बदली धाराशिव येथील सायबर सेल विभागामध्ये झालेबद्दल तामलवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत गावातील पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी, नागरिकांच्या वतीने आयोजित  निरोप समारंभ व त्यांच्या ठिकाणी नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिलकुमार चव्हाण यांचा स्वागत समारंभ मंगळवारी सायंकाळी तामलवाडी पोलीस ठाण्यात पार पडला. 


या निरोप व सत्कार समारंभात तामलवाडी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील 27 गावातील सर्वस्तरातील नागरिकांनी आपली उपस्थिती लावली होती. एखाद्या पोलिस अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर पोलीस पाटील,सर्वसामान्य जनता आणि कर्मचारी मिळून अशाप्रकारे  निरोप देण्याचा कार्यक्रम पहिल्यांदाच संपन्न झाला.  

मागील गेली दोन वर्षापुर्वी सपोनि सचिन पंडित  यांनी  तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी म्हणून चोखपणे  कारभार पहिला. 

तामलवाडीसह परिसरातील सर्वसामान्यांच्या समस्या व प्रश्नांची जाण ठेवण्या बरोबरच कार्यक्षेत्रातील गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच  कायदा सुव्यवस्था चोख हाताळली. याच त्यांच्या कार्य पद्धतीमुळे त्यांची अभ्यासू, दबंग, कर्तव्यदक्ष,  संवेदनशील पोलिस अधिकारी म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यांची नुकतीच धाराशिव येथे सायबर सेल विभागात बदली झाली. या निमित्ताने तामलवाडी पोलीस स्टेशनच्या ठाण्याच्या आवारात भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील व नागरिक भावुक झाले होते.  ‘पोलिस हाच जनतेचा खरा मित्र’ ही संकल्पना त्यांनी आपल्या कृतीतून राबविली. “आध्यत्मिक विचारसरणी” व “पोलिसातील माणूस” यामुळे नागरिकांबरोबरच सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्‍यांमध्ये ते लोकप्रिय ठरले. 


त्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा गुण गौरव करतांना अनेकांचा कंठ दाटून आला होता. नागरिकांनी त्यांच्या प्रति व्यक्त केलेले प्रेम म्हणजे त्यांनी केलेल्या  सेवेची पावतीच म्हणावी लागेल.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांचा निरोप तर  नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिलकुमार चव्हाण यांचा सत्कार सोहळ्याप्रसंगी तामलवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत 27 गावातील पोलीस पाटील, राजकीय पदाधिकारी, नागरिक, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य यशवंत अण्णा लोंढे, हनुमंत गवळी, डॉ. रविकांत गुरव, डॉ. रवीराज गायकवाड, सुनिल गवळी, पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले, तामलवाडीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर माळी,सुधीर पाटील, सावरगाव येथील माजी  सरपंच रामेश्वर तोडकरी,सावरगावचे माजी उपसरपंच आनंद बोबडे, रोहित पाटील, पांडुरंग माळी, बसवणप्पा मसुते, मसला येथील सरपंच वैद्य,नाना शिंदे,पोलीस मित्र सुरज ढेकणे, पोपट मोठे,गोपनीय ठाणे अंमलदार आकाश सुरनर, शिवाजी शिरसट आदी मान्यवरांसह तामलवाडी पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी,सर्व पोलीस पाटील,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 सन्माना प्रसंगी सपोनि सचिन पंडित म्हणाले की, आज जो माझा सन्मान होतोय त्यात माझे सहकारी,कर्मचारी,यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या सहकार्यामुळेचे मी चांगले व आदर्श काम करू शकलो. तसेच माणसांच्या जीवनात संघर्ष हा  जीवनाचा अविभाज्य घटक असून  संघर्षाला धिराने, आपुलकीने आणि एकमेकांवर प्रेम करत पुढे जावे हेच या सन्मान सोहळ्यानिमित्त सांगता येईल.
   

Labels:

Thursday, 23 March 2023

तुळजापूर : लाईफ केयर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा महंत तुकोजी बुवा यांच्या हस्ते शुभारंभ


तुळजापूर, दि. २३:उमाजी गायकवाड 

  गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुळजापूर येथे डॉ. रमेश लबडे, डॉ.संतोष गायकवाड, डॉ.शेख मॅडम व डॉ. संतोष गवते या चार तज्ञ डॉक्टरांनी एकत्र येत सुरु केलेल्या जनश्रु हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारा संचलित "लाईफ केयर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल" चा शानदार शुभारंभ बुधवार 22 मार्च रोजी तुळजाभवानीचे मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा महाराज यांच्या शुभहस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आला.

या चार डॉक्टरांनी एकत्र येऊन येथील येथील लातूर रोडवरील नवीन बसस्थानक जवळील कृष्णा लॉजच्या समोरील भव्य इमारतीमध्ये सुरु करण्यात आलेल्या या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे तुळजापूरसह परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांना सोलापूरला उपचारासाठी जाण्याची फारशी गरज पडणार नाही. सर्व सोयी सुविधा देण्यासाठी व सर्व आजारांवर एकाच छताखाली उपचार करण्याच्या उद्देशाने या चारही डॉक्टरांनी "लाईक केअर क्रिटीकल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल" सुरु केले असून सर्व रुग्णांना योग्य उपचार मिळणार आहेत. तसेच या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना 24 तास सेवा मिळणार असून ग्रामीण भागातील रुग्णांना परवडेल व त्यांच्या सोयीचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तुळजापूर शहरात सुरु झाल्याने रुग्णांचे मानसिक व आर्थिक नुकसान टळणार आहे.


हॉस्पिटलच्या वतीने 23 ते 25 मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ.रमेश लबडे, डॉ. संतोष गायकवाड, डॉ.शेख, डॉ. संतोष गवते यांनी दिली.

हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी विविध मान्यवरांनी भेटी देऊन हॉस्पिटलची पहाणी व चारही डॉक्टरांना पुढील वाटचालीसाठी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. अनेक उपस्थित मान्यवरांनी हॉस्पिटलविषयी समाधान व्यक्त केले. 


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी उपसभापती चित्तरंजन सरडे,  जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुकुंद डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

डॉ.शेख मॅडम, डॉ.संतोष गायकवाड,डॉ.संतोष गवते व डॉ रमेश लबडे यांनी एकत्र येत सर्व सोयीसुविधा व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून स्थापन केलेल्या लाईफ केयर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घघाटनप्रसंगी पत्रकार उमाजी गायकवाड , पत्रकार चांदसाहेब शेख,राहुल साठे,मंगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे गणेश पवार यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ, लोकप्रतिनिधी व मंगरूळ परिसरातील नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या कार्यक्रमासाठी शंकर लबडे, अजय पवार, प्रवीण माने, नारायण वडणे,अनिकेत गायकवाड,बालाजी पानढवळे, यशवंत धुरगुडे यांनी परिश्रम घेतले.

Labels: ,

Monday, 20 March 2023

काटी येथे काँग्रेसच्या हात से हात जोडो अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

काटी, दि.२०:उमाजी गायकवाड

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडी यात्रेच्या यशस्वी आयोजनानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हात से हात जोडो अभियानाची सुरुवात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.धीरज भैय्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथून करण्यात आली.


रविवार दिनांक 19 रोजी सायंकाळी सात वाजता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली हात से हात जोडो अभियानाच्या रथयात्रेचे तुळजापूर तालुक्यातील काटी येथे  महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याकडून फटाक्याच्या आतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. अभियानांतर्गत जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज (भैय्या) पाटील यांच्या समवेत पक्षाचे कार्यकर्ते सरपंच सुजित हंगरगेकर,माजी चेअरमन सयाजीराव देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, शिवसेनेचे राजेंद्र ढगे आदीं कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधत भारत जोडो यात्रेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचला. तसेच काँग्रेसने मोदी सरकार विरोधातील व केंद्र सरकारच्या त्रुटी सांगणारे व मोदी सरकारच्या ना करते पणाचे आठ वर्ष  हे आरोप पत्रही वाटण्यात आले. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्या सहीचे एक पत्रही वाटप करण्यात आले.


यावेळी बोलताना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड धिरज भैय्या पाटील म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारची धोरण म्हणजे स्वतःचा विकास करणे असून आठ वर्षापूर्वी त्यांनी दिलेली आठ वर्षांपूर्वी त्यांनी दिलेली बेरोजगारी महागाई काळा पैसा देशात आणणे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव देणे प्रत्येक बँक खात्यात 15 लाख जमा करणे माघारी रोखणे इंधन व जीवनाची वस्तूची भाव स्थिर ठेवणे यापैकी एकही आश्वासन पूर्ण केली नाही देशातील सार्वजनिक उद्योग विकास विकायला काढले आहेत या देशाचा भाजप सरकारने विकास केला नसून विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. केंद्रातील भाजप सरकार सध्या प्रायव्हटायजेशनकडे वाटचाल करत असून अनेक गोष्टी त्यांनी देशातील खाजगी धनाढ्यांच्या पदरी टाकायला सुरुवात केली आहे. विमानतळे, बंदरे यांचे खाजगीकरण होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. भाजपची चुकीचे धोरण सर्वसामान्य नागरिकांना घरोघरी जाऊन सांगण्यासाठी तोडफोडीचे सरकार उलथून टाकण्यासाठी काँग्रेसने हात से हात जोडो अभियान सुरु केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आगामी निवडणुकात भाजपचे सरकार उलथून महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज भैया पाटील, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, प्रदीप साळुंके, माजी सरपंच शामराव आगलावे, अभिमान बामणकर, जयाजी देशमुख प्रकाश गाटे, रामेश्वर लाडूळकर, बबन हेडे, चंद्रकांत काटे,अजय देशमुख, ग्रा.पं. सदस्य अमोल गावडे प्रकाश सोनवणे, भैरी काळे, तानाजी हजारे, शिवलिंग घाणे, आबा गाढवे सुनील गायकवाड कय्युम  कुरेशी, राजेंद्र ढगे, संताजी गायकवाड, सयाजी गायकवाड, अखिल पठाण आदींसह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels: ,

Friday, 10 March 2023

गटशिक्षण कार्यालय पंचायत समितीच्या वतीने तालुका स्तरीय महिला शिक्षीकांचा मेळावा

भूम,दि. १० : धनंजय गोफणे 


 गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती भुम याच्या वतीने तालुका स्तरीय महिला शिक्षीकांचा मेळावा  आयोजित  करण्यात आले होते.  गट शिक्षणाधिकारी  भट्टी  यांच्या संकल्पनेतुन मिळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षा  जेष्ठ शिक्षिका श्रीमती सौ शैलजा गायकवाड तर प्रमुख पाहूणे म्हणून विस्तार अधिकारी  जगदाळे ,  कोल्हे,  उपस्थित होते.  या मिळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. डॉ जगदाळे  विधिज्ञ श्रीमती तावरे  श्रीमती दराडे या उपस्थित होत्या.
 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती कोकाटे  श्रीमती पाटील  यांनी केले. तालुक्यातील महीला शिक्षकाना   गटशिक्षण कार्यालयाकडून महिलासाठी व्यासपीठ मिळल्याबद्दल  समाधान व्यक्त केले सर्व महिला भगिनींनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.

Labels: ,

Thursday, 9 March 2023

वात्सल्यचे सर्व समाजोपयोगी उपक्रम आदर्शवत- पोलीस अधीक्षक कुलकर्णी

मंगरूळ , दि. ०९

वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चालणारे सर्व उपक्रम हे आदर्शवत आहेत असे गौरवोद्गार धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांनी काढले. संस्थेच्या माध्यमातून श्रीगणेश मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा श्री.कुलकर्णी यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते.

प्रारंभी श्री.कुलकर्णी यांचे औक्षण करून,तुळशीची माळ घालून व दासबोध ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी संस्थेच्या माध्यमातून मंगरूळ ता. तुळजापूर  येथील केंद्रात दुर्मिळ वनौषधी,देशी वृक्ष यांची लागवड व संवर्धनाचे केलेले काम श्री.कुलकर्णी यांनी आस्थेवाईकपणाने पाहिले व या चळवळीत संस्थेच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.

श्री.कुलकर्णी हे जिल्हा पोलीस अधीक्षक ही जबाबदारी सक्षमपणे पेलण्यासोबत वृक्षप्रेमी, सेंद्रिय शेती त्यासोबतच समाजातील वंचित घटकांसाठी काम करणारे संवेदनशील मनाचे अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.

संस्थेच्या माध्यमातून चालणारी गोशाळा ,एकल भगिनी मधील काम,प्रशिक्षण केंद्रे,ॲम्ब्यूलन्स च्या माध्यमातून चालणारी आरोग्य सेवा यांची त्यांनी माहिती घेतली.समाजातील सुह्रदयी व्यक्तींच्या योगदानातून संस्थेच्या परिसरात श्रीगणेश मंदिर उभारले जात आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात संस्थेत येणाऱ्या घटकांना अध्यात्मिक शांती मिळावी हा या मागचा हेतू आहे.

याप्रसंगी तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.रमेश घुले,गुन्हे शाखेचे श्री.आकाश सुरणार,संस्थेचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

Labels: ,