Wednesday, 30 April 2025

नळदुर्ग महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थीनीची विद्यापीठाच्या सॉफ्टबॉल संघात निवड

नळदुर्ग महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थीनीची विद्यापीठाच्या सॉफ्टबॉल संघात निवड 

 नळदुर्ग ,दि.३०: डॉ. दिपक जगदाळे 

येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील कु.मानसी राजेंद्र राठोड, कु.सुप्रिया विनोद राठोड , कु.वैष्णवी मोतीराम राठोड या तीन मुलींची विक्रमा सिंहपुरी विद्यापीठ नेल्लोर, (आंध्रप्रदेश) येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

त्यांच्या या यशाबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण सचिव उल्हासदादा बोरगांवकर संस्थेचे सर्व संचालक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष राठोड, नॅक समन्वयक डॉ. शिवाजी घोडके, वनस्पती विभाग प्रमुख डॉ.विजय सावंत,कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.मोतीराम पवार कार्यालयीन अधीक्षक श्री.धनंजय पाटील,प्रा.डॉ. दिपक जगदाळे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक डॉ.कपिल सोनटक्के, डॉ.अशोक कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Labels:

Monday, 28 April 2025

महात्मा बसवेश्वर पतसंस्थेकडून स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सन्मान

महात्मा बसवेश्वर पतसंस्थेकडून स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सन्मान


 मुरूम, ता. उमरगा, दि.२७ 

महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था व महात्मा बसवेश्वर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित स्पर्धा परीक्षेतील यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान सोहळा रविवारी (ता. २७) रोजी बसव सहकार भवनच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब मुरूम सिटी चे कमलाकर मोटे होते. प्रमुख अतिथी अणदूर येथील जवाहर महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख  प्रा. डॉ. अनिता मुदकन्ना, मुरूमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दत्ता इंगळे, माजी नगरसेवक चंद्रशेखर मुदकन्ना, बसवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी  महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यशस्वी विद्यार्थी  संध्या उटगे, विष्णू जाधव, राहुल देशपांडे, प्रवीण गायकवाड, तेजस्विनी मुदकन्ना, शुभम गायकवाड, वैशाली माने, वैभव सातलगे, शंकर मडोळे, निकिता जाधव आदींचा मान्यवरांच्या हस्ते फेटा, शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. लखन भोंडवे, तेजस्विनी मुदकन्ना यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. दत्ता इंगळे यांनी या परिसरातील बसवेश्वर पतसंस्था म्हणजे एक सामाजिक उपक्रमशील संस्था म्हणून नावलौकिकास पात्र ठरत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तबदारीचे व संघर्षाचे कौतुक करत त्यांना सदिच्छा दिल्या. डॉ. अनिता मुदकन्ना म्हणाल्या की, यश मिळवण्यासाठी प्रामाणिक परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्य, योग्य दिशा आणि मनोबल ठेवल्यास यश हमखास मिळते. अपयश आले तरी त्यातून शिकत पुढे जाणे हेच खरे शिक्षण आहे. 

आजचा सत्कार हा विद्यार्थ्यांसाठी नव्या प्रेरणेचा स्त्रोत ठरेल. अध्यक्षीय  समारोपप्रसंगी कमलाकर मोटे यांनी विद्यार्थ्यांना  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशरण वरनाळे यांनी केले. सूत्रसंचालन मोहन जाधव तर आभार अशोक जाधव यांनी मानले. यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे संचालक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.                                         
फोटो ओळ :  मुरूम, ता. उमरगा येथील बसवेश्वर पतसंस्थेकडून स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या    विद्यार्थ्यांचा सत्कार करताना अनिता मुदकन्ना, कमलाकर मोटे, दत्ता इंगळे, शिवशरण वरनाळे व अन्य.

Labels:

प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांना अमेरिका विद्यापीठाची डिलीट


 प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांना अमेरिका विद्यापीठाची डिलीट

मुरुम,दि.२८ :  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख  डॉ. जयसिंग देशमुख यांना सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका या विद्यापीठाची डिलीट ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
    
प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान खूपच मोठे आहे. प्रशासन क्षेत्रातील आदर्श प्रशासक आणि शिस्तप्रिय प्रशासक म्हणून ते सुपरिचित आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका विद्यापीठाने त्यांना डिलीट ही मानद पदवी नुकतीच बहाल केली आहे .

  यापूर्वी प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या विद्यापीठाच्या विविध महत्त्वपूर्ण समित्यांवर भरीव अशी कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ. संभाजीनगर परिसर धाराशिवचे संचालक,  धाराशिव जिल्ह्याच्या प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष, करिअर कट्टा प्राचार्य प्रवर्तक,तर विद्यापीठाच्या अनेक महत्त्वपूर्ण समित्यांवर प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. 
सध्या ते धाराशिव शहरातील नामांकित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख , अजीव सेवक आणि  जनता सहकारी बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे सदस्य म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत.
   
शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्राबरोबरच संशोधन क्षेत्रात देखील त्यांनी भरीव योगदान दिले आहे. बहुजन समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक संधी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे. महाविद्यालयामध्ये विविध विषयांचे पदव्युत्तर वर्ग व पीएच.डी.साठीची विविध विषयांची संशोधन केंद्र सुरू केली आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी माती परीक्षण केंद्र देखील महाविद्यालयात प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट पद्धतीने चालवले जाते.
     
या गौरवा बद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे,सचिव सौ शुभांगी गावडे,मुख्यकार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे , यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
      

Labels:

Sunday, 27 April 2025

आतंकवाद्यानी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ, अणदूर येथे भव्य निषेध रॅली व कडकडीत बंद

आतंकवाद्यानी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ, अणदूर येथे भव्य निषेध रॅली व कडकडीत बंद

अणदूर दि.२७:  चंद्रकांत हगलगुंडे

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अण्णा चौकातून मुख्य रस्त्यावरून महादेव मंदिरापर्यंत भव्य निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, अखंड हिंदुस्तानचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी व्यापाऱ्यानी कडकडीत व्यवहार बंद ठेवून निषेध रॅलीला पाठिंबा दिला.

काश्मीर मधील पहलगाम येथे नुकताच पाकिस्तानी आतंकवाद्यानी हिंदू पर्यटकावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आता गावागावातून हिंदूंनी हिंदू साठी एकोप्याने व्यवहार करण्याची गरज असून पाक व्याप्त काश्मीर ही ताब्यात घेण्याची संधी निर्माण झाली आहे. देशात व राज्यात आता तर गावागावात हिंदूनी नीच प्रवृत्तीच्या दहशतवादी विचारसरणी ठेचून काढली गरज असून यासाठी प्रत्येकाने सतर्क राहण्याची काळाची गरज असून राज्यात व केंद्रात सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन धाराशिव जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस अड. दीपक दादा आलूरे यांनी केले. यावेळी राजकुमार गाढवे, योगेश जाधव, साहेबराव घुगे, राजेंद्र स्वामी, अरविंद घोडके यांनी या निषेध सभेत पाकच्या धोरणावर कडकडून टीका केली.
या निषेध सभेत दीपक घुगे, महावीर कंदले, माणिक निर्मळे, अण्णासाहेब आलूरे, प्रकाश मुळे, गुणवंत मुळे, लक्ष्मण लंगडे, मनोज काळे, महादेव उर्फ छोटू घुगे, विक्रम आलूरे, प्रवीण घोडके, मनोज मुळे, मकरंद भालकरे, आकाश आळंगे, लक्ष्मण बोंगरगे  सह असंख्य तरुण सहभागी झाले होते. शेवटी आतंकवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Labels:

Saturday, 26 April 2025

महामंडळ स्थापन झाले हे समाजाचे श्रेय,समाजाच्या पाठिंब्यामुळेच संघर्ष करण्याची प्रेरणा- दिपक रणनवरे

महामंडळ स्थापन झाले हे समाजाचे श्रेय,समाजाच्या पाठिंब्यामुळेच संघर्ष करण्याची प्रेरणा- दिपक रणनवरे

नळदुर्ग,दि.२६

 भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाबाबत सविस्तर मार्गदर्शन कार्यक्रम नळदुर्ग शहरातील मल्लिकार्जुन मंदिर येथे आयोजित केला होता, कार्यक्रमाच्या सुरुवातीस काश्मीर (पहलगाम) येथे झालेल्या दहशतवादी हल्यात मृत्नायुमुखी पडलेल्या 
 नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

भगवान परशुराम,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात केली,या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून महामंडळ स्थापन होण्यासाठी अन्नत्याग करणारे उपोषणकर्ते व पेशवा युवा संघटनेचे संस्थापक दिपक भाऊ रणनवरे हे उपस्थित होते,या निमित्त त्यांचा ब्राह्मण समाजाच्या वतीने भव्य असा सत्कार करण्यात आला,या कार्यक्रमात समाज बांधवाना दिपक भाऊंनी महामंडळा बाबत सविस्तर मार्गदर्शन केले व याचा गरजुनी लाभ घ्यावा असे आवाहन केले,यावेळी पेशवा युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी,ब्राह्मण समाज संघटनेचे अध्यक्ष विनायक अहंकारी,सचिव मुकुंद नाईक यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ रामदासी यांनी केले व आभार मनोज कुलकर्णी यांनी मानले,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  अजय अणदूरकर,प्रदीप ग्रामोपाध्ये,उमेश नाईक,महेश अंबुलगे,अजय देशपांडे,सचिन भूमकर, संदीप वैद्य,प्रसन्न कुलकर्णी,सचिन होर्टीकर,नितीन कुलकर्णी,राजू वैद्य,सनी भूमकर,ज्ञानेश्वर केसकर,मयूर जोशी,सुदर्शन पुराणिक,आनंद कमठाणकर,संतोष नाईक यांच्यासह ब्राह्मण समाज संघटना,पेशवा युवा संघटना,परशुराम प्रतिष्ठान,मध्व मंडळ,उपाध्ये मंडळाचे सदस्य यांनी प्रयत्न केले,यावेळी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Labels:

शिष्यवृत्ती परीक्षेत अणदूरच्या वत्सलानगर जिल्हा परिषदेचे १५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक... अभिनंदनाचा वर्षाव

 शिष्यवृत्ती परीक्षेत अणदूरच्या वत्सलानगर जिल्हा परिषदेचे १५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक... अभिनंदनाचा वर्षाव

अणदूर दि.26. चंद्रकांत हगलगुंडे

शिक्षण क्षेत्रात मराठवाड्यात अव्वल असलेल्या स्वर्गीय सि .ना . आलूरे गुरुजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जवाहर पॅटर्न मराठवाड्यात अग्रेसर असून आता यात भर म्हणून जिल्हा परिषद शाळाही या शैक्षणिक क्षेत्रात नावारूपास येत असून गेल्या सहा वर्षा पासून जिल्ह्यात वत्सला नगर जिल्हा परिषद शाळेने मानाचा तुरा रोवला आहे. यंदा तब्बल 15 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गरुड झेप घेतल्याने पालकासह ग्रामस्थातून अभिनंदनचा वर्षाव होताना पाहावयास मिळत आहे.

गेल्या सहा वर्षापासून शैक्षणिक गुणवत्ता व विविध उपक्रमात अग्रेसर ठरून उपक्रमशील शाळा म्हणून खास ओळख निर्माण केले आहे हे विशेष.सध्याच्या या शैक्षणिक स्पर्धेच्या युगात कितीही पैसे गेले तरी चालेल मात्र यशस्वी ठरला पाहिजे हे पाडल्यांच्या अपेक्षा असते, निव्वळ विद्यार्थी हेच केंद्रबिंदू मानून शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक वृंद अतोनात परिश्रम घेऊन अशक्य ते शक्य करण्याची किमया केल्याने संपूर्ण जिल्ह्यात शाळेचा विशेषतः गुरुजनांचा सर्व थरातून अभिनंदन केले जात आहे.

या परीक्षेत सृष्टी कांबळे, आदित्य गाढवे, राम कदम, कृष्णाई झंगे, समृद्धी कांबळे, समर्थ निर्मळे, अपेक्षा कबाडे, रुद्रा गिरी, उज्वल पवार, अमित सुरवसे, समृद्धी बनसोडे, समर्थ गोवे, निकत नदाफ, कार्तिक मुळे, पारस पवार हे 15 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा दराडे, बळीराम पांचाळ, भीमराव घोडके, एम बी स्वामी, व्ही व्ही आदम, व्ही आर खलटे, एस डी भागवत, डी जी आदरवाडा, एस डी गिरी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे व शिक्षकांच्या सचोटीबद्ध मार्गदर्शनाचे यश असून नवोदय विद्यालयात प्रवेश मिळणे सहजासहजी अशक्य असून मेहनत तयारी व मार्गदर्शन यांचे खऱ्या अर्थाने फलित असल्याची भावना सुरेखा दराडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

या यशाबद्दल सरपंच रामचंद्र  आलूरे, उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार, डॉ. विवेक बिराजदार, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अँड.दीपक आलुरे, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष कल्याणी मुळे, अविनाश मोकाशे, प्रबुद्ध कांबळे जय मल्हार पत्रकार संघाचे श्रीकांत अणदूरकर, दयानंद काळुंखे, चंद्रकांत गुड्ड्, शिवशंकर तिरगुळे, सचिन तोगी, शिवाजी कांबळे, चंद्रकांत  हगलगुंडे यांनी अभिनंदन केले केले.

Labels:

डॉ.रामलिंग पुराणे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरवपूरस्कार जाहीर

डॉ.रामलिंग पुराणे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरवपूरस्कार जाहीर

मुरूम ता.२६, येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष डॉ.रामलिंग काशिनाथ पुराणे यांना  ए.डी. फौंडेशन, महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार २०२५ निमित्त सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

दि.२५मे वार रविवार रोजी सोलापूर येथील निर्मिती लॉन्स येथे फौंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राज्यातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष अशोक गोरड यांनी पत्राद्वारे कळविले आहे. डॉ.रामलिंग पुराणे यांचा संघटनात्मक धोरण, सामाजिक कार्य, पत्रकारिता वर पकड मजबूत असून, समाजासाठी उन्नतीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आणि सातत्य असतो, त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर पन्नास हुन अधिक यशस्वी आंदोलने झाले आहेत. डॉ.पुराणे यांचे जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी पन्नासहून अधिक यशस्वी आंदोलने झाले आहेत.


राज्यातील धाराशिव,पुणे,वर्धा,मुंबई येथील आझाद मैदान, दिल्ली येथील जंतरमंतर मैदानात त्यांचे यशस्वी आंदोलने झाले आहेत. बेरोजगार, कष्टकरी, शेतकरी, आरोग्यविषयक सह समाजातील सर्व घटकातील नागरिकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे संघर्ष कायम चालू असते. उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागातील मुरूम याठिकाणी एका सामान्य भूमिहीन शेतमजूर यांच्या घरी त्यांचा जन्म जरी झाला असून तळागाळातील सामान्य नागरिकांचे समस्यांचे त्यांना जाण आहे आणि त्याचेच रूपांतर एका आंदोलनकारी संघर्षात झाला. उमरगा तालुक्यातील शकेडो नागरिकांना रेशन कार्ड असून धान्य मिळत नव्हते, अनेक नागरिकाजवळ रेशनकार्ड नव्हते अशा जनसामान्यां नागरिकांसाठी त्यांनी लढा उभा करून त्यांना स्वखर्चाने शासन दरबारी पाठपुरावा करून धान्य व रेशन कार्ड मिळवून दिले. राज्यातील होमगार्ड समस्या विषयीचे त्यांचे आंदोलन राज्यात आणि दिल्ली येथे गाजले आहेत आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून जीवन बिमा, त्यांची पदे, अपात्र होमगार्डना पूर्वरत कामावर रुजू करून घेतले असून त्यांचा ब्रिटिश कालीन कायद्यात बदल होण्यासाठी दिल्ली आणि मुंबई सरकार कडे पाठपुरावा चालू आहे. डॉ.पुराणे यांना आतापर्यंत सामाजिक कार्यातील डॉक्टरेट,समाजभूषण, कोरोना योद्धा, जननायक ,समाजचिंतक, लोकतंत्र के प्रहरी,शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ अशा विविध पुरस्कराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ए डी फौंडेशनच्या वतीने त्यांना २०२५ चा "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  गौरव पुरस्कार २०२५" जाहीर करण्यात आला आहे.

Labels:

नळदुर्ग : रस्त्याचे अर्धवट कामामुळे नागरिकांची हाल, बालिका जखमी; संतप्त नागरिकांचा पालिकेस समोर बेमुदत उपोषणाचा इशारा

  नळदुर्ग : रस्त्याचे अर्धवट कामामुळे नागरिकांची हाल, बालिका जखमी; संतप्त नागरिकांचा पालिकेस समोर बेमुदत उपोषणाचा इशारा 

 नळदुर्ग,दि.२६ :

नळदुर्ग शहरातील रणे प्लॉटींग येथील रस्त्याचे काम अर्धवट ठेवल्याने नागरिकासह लहान मुले रस्त्यावर पडुन जखमी होत असुन तात्काळ रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी निवेदनाद्वारे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे नागरिकांनी केली आहे.
 
 नळदुर्ग शहरातील रणे प्लॉटींग मधील ख्वाजा नगर येथे गेल्या सात वर्षा पुर्वीपासुन रस्त्या अभावी याभागातील नारीकांची प्रचंड हाल होत होती. येथील नागरीक वेळोवेळी घरपट्टी, नळपट्टी भरणा केली आहे. रस्त्याप्रकरणी वारंवार लेखी अर्ज, आंदोलन केल्याने रस्त्याचे काम  

2018 मध्ये करण्यात आला. मात्र इमरान कुरेशी यांच्या घरासमोर 40 ते 50 मिटरचे काम अर्धवट ठेवण्यात आले. त्यामुळे गटराचे व नळाचे पाणी रस्त्यावर येऊन थांबते. पाण्याचे डबके झाल्याने प्रचंड डास होत आहेत. याच रस्त्यावर शाळकरी मुले, वयोवृद्ध महिला, पुरूष पाण्याच्या डबक्यात पडुन अनेकदा जखमी झाल्याची घटना घडली आहे. तीन दिवसापुर्वी कु.सिद्रा अजिजूर कुरेशी हि शाळकरी मुलगी रस्त्यावर पडुन जखमी झाल्याने तिला गंभीर दुखपत झालेली आहे. 
अर्धवट रस्त्याचे काम पुर्ण करावे म्हणुन लेखी व तोंडी अनेकदा सांगुनही न.प.प्रशासनाने याविषयी काहीच कारवाई केलेली नाही. न.प.प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका नाहाकच नारिकांना सहन करावा लागत आहे. या प्रकरणी गांभीर्याने वरीष्ठ् पातळीवरुन लक्ष घालुन नारिकांच्या हितासाठी येत्या आठ दिवसात अर्धवट रस्स्याचे कामपुर्ण करावे, त्याचबरोबर अर्धवट काम ठेवणाऱ्या गुत्तेदार व त्यांना बिल अदा करणाऱ्या न.प. कर्मचारी , अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अन्यथा येत्या दि. ५ मे रोजी सकाळी अकरा वाजता नगरपरिषद कार्यालया समोर नारीकांच्या वतीने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.  निवेदनाची प्रत आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी, पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.

 निवेदनावर कुरेशी अजीज, राहुल माने , वाहेद कुरेशी , सय्यद सिराजोद्दीन, सय्यद मुजोबीन,मुजिब मौजन, सय्यद रेहान ,मुजबिल मौजन,वाहेद नदाफ, सुरेश गवळी, कल्या कोळी,रमेश कोळी, भिमा कोळी, लक्ष्मण कोळी आदीसह इतर नागरिकांच्या सह्या आहेत .                                 

Labels: