Thursday, 30 September 2021

तुळजाभवानीचा गळीत हंगाम विनाविलंब व विनातक्रार सुरू होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार ?

नळदुर्ग, दि . ३० : 


 श्री  तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना १५ वर्षाच्या दिर्घ मुदतीवर  भाडेतत्वावर चालविण्यास दिल्यामुळे  येणारा गळीत हंगाम विनाविलंब व विनातक्रार सुरू होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल अशी आपेक्षा व्यक्त केली जात आहे..


उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक व कामगार भविष्य निर्वाह निधी विभागाने येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यास हिरवा कंदील दाखविल्याने हा कारखाना  सोलापूर जिल्ह्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीजला 15 वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्यासाठीचा प्रोसिडींग  मान्यतेसाठी सहकार मंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे.


तुळजाभवानी साखर कारखान्याचे  10024 सभासद संख्या असलेला व 11 हजार हेक्टर वर जवळपास 8 लाख टन ऊस उपलब्ध असलेला हा कारखाना सन 2012 - 13 गळीत हंगामापासून बंद आहे. हा कारखाना बॅंक कर्ज व कामगार भविष्य निर्वाह निधीच्या देणी रक्कमेमुळे भाडेतत्त्वावर देता येत नव्हता. भविष्य निर्वाह निधी विभागाने सदर कारखान्याला कुलूप ठोकले आहे. तर कारखान्यावर मार्च 2018 पासून अवसायक नियुक्त आहे. दरम्यान शासनाने हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी परवानगी दिल्याने कारखान्याने प्रसिद्ध केलेल्या निविदा नोटीस प्रमाणे आठ इच्छुकांनी अर्ज खरेदी केले होते. 


धोत्री ता. दक्षिण सोलापूर येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमीटेड यांनी निवीदा भरल्या होत्या. सदर निविदा  साखर आयुक्त कार्यालयात खुल्या केल्या असता गोकुळ शुगर इंडस्ट्रीजने जादा दराने निविदा भरल्याने ती मंजूर करण्यात आली आहे. 


तुळजाभवानी साखर कारखाना भाडेतत्त्वावर दिल्यामुळे कारखान्यास तीन कोटी ठेव शिवाय वार्षिक स्थिर भाडे एक कोटी व गाळपानुसार मिळणारे अंदाजे 2.5 कोटी मिळणार आहेत. शिवाय असवानी (डिस्टलरी) प्रकल्पापासून दरवर्षी 50 लाख भाडे व प्रती लिटर स्पिरीट करीता दोन रूपये मिळणार आहेत. डिस्टलीरीची क्षमता प्रतीदिन 30 हजार लिटर तर कारखान्याची गाळप क्षमता प्रतीदिन 12 हजार 500 मेट्रिक टन इतकी आहे.


सदर कारखाना भाडेतत्त्वावर दिल्यामुळे संपूर्ण भाडे व प्रतीदीन  गाळपानुसार मिळणारी रक्कम बॅंकेला कर्जा पोटी परस्पर दिली जाणार आहे.
तीन कोटी ठेव रक्कमेतून जवळपास अडीच कोटी रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधी कडे वर्ग केले जाणार आहे सदर रक्कम मिळाल्या नंतरच कामगार भविष्य निर्वाह निधी विभाग कुलूप काढणार आहे. असवानी प्रकल्पाच्या भाड्यातून व स्पिरीट डिस्टलीरी नुसार मिळालेल्या रकमेतून  कामगारांच्या थकलेल्या पगारी, भत्ते यावर 5 कोटी तर शासकीय देणी करीता 5 कोटी खर्च करून उरलेली रक्कम पुन्हा बॅंक कर्जाकडे वळती केली जाणार आहे.
भाडेतत्त्वावर कारखाना घेऊन अर्ध्यात करार मोडीत काढण्याच्या प्रकारामुळे या कारखान्याला घरघर लागली होती. सदर कारखाना दिर्घ मुदतीच्या म्हणजे 15 वर्षाच्या काळाकरीता भाडेतत्त्वावर दिल्यामुळे पुन्हा तुळजापूर तालुक्यातील सहकार क्षेत्राला बळकटी मिळणार आहे.


Labels:

तुळजापूर तालुक्यातील नंदगावच्या शिलवंती तलावाचे जलपुजन

नंदगाव ,दि .३० 

तुळजापुर तालुक्यात मागील दोन- तीन दिवसापासुन चालु असलेल्या सततच्या पावसामुळे नंदगाव गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या शिलंवती  तलाव शंभर  टक्के भरले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरीसह नागरिकातुन समाधान व्यक्त होत आहे. 

मंगळवारी नंदगावचे   सामाजिक  कार्यकर्ते वैभव पाटील  ,सागर चोगुले ,मंगेश कलशेट्टी ,कल्याण कुंभार ,इरण्णा वाले ,अप्पु करंडे, रहिम शेख यांच्या हस्ते धरण परिसरात जलपूजन करण्यात आले.

Labels:

रस्त्याचे काम नगरपालिकेने सुरु न केल्याने शिवशाही मंडळाच्या वतीने नगपालिकेवर बोंब ठोको मोर्चा


नळदुर्ग, दि .३० : सुहास येडगे 

 शहरातील  मराठा गल्लीतील रस्त्याचे  काम     नगरपालिकेने आदयाप ही सुरु न  केल्याने शिवशाही मंडळाच्या वतीने नगपालिकेवर बोंब ठोको मोर्चा शुक्रवार दि .१ आॕक्टोंबर रोजी सकाळी  ११ वाजता काढण्यात येणार आहे.

 
निवेदनात पुढे नमुद केले आहे की,  गेल्या तीन वर्षा पासून मराठा गल्लीतील रस्ता पूर्ण पणे उखडून गेला आहे, दरम्यान पॉचपिर चौकापासून मराठा गल्ली पर्यंतचा रस्ता जाणीवपूर्वक पालिकेने न करता तो तसचा ठेवला आहे, याचाच परिणाम पावसाळयामध्ये या रस्त्याने चालताना नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, मोठया प्रमाणात रस्त्यावरील खडी उघडी पडल्याने या रस्त्यावरुन चालता ही येत नाही किंवा मोटार सायकल ही चालविता येत नाही. शिवाय वयस्कर माणसे या रस्त्यावरुन चालताना पडल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. तर ज्ञानेश्वरी पारायणा मध्ये पालखी घेवून ही या रस्त्यावरुन पडले आहेत. 

गेल्या ५० वर्षाच्या इतिहासात पालखी कधी पडली नव्हती. त्याच बरोबर पारायण कटटयासमोर ही मोठया प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मुरुम टाकून रडक्याचे डोळे पुसल्यागत प्रकार पालिकेकडून गेल्या दोन वर्षापूर्वी करण्यात आला होता. त्यामुळे या प्रभागाचे नगरसेवक ही जाणीवपूर्वक डोळे झाक करीत आहेत. 


या प्रभागाच्या नगरसेवकाच्या शब्दाला पालिकेतील कर्मचारी किंवा पदाधिकारी, सत्ताधारी हे किंमत देत नसल्यानेच मराठा गल्लीतील नागरीकांना अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे. त्याच बरोबर गटारीवर कोणत्याच प्रकारे जंतूनाशकाची फवारणी केली जात नाही. त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढले आहे. म्हणून मराठा गल्लीतील नागरीकांचा जो रस्त्याचा प्रश्न आहे तो तात्काळ पालिकेने सोडवावा अन्यथा शुक्रवार दि. ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी  मराठा गल्ली येथून पालिकेवर बोंब ठोको मोर्चा काढण्यात येणार आहे. 

यामध्ये पालिकेच्या सर्वच नगरसेवकांच्या आणि मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या नावाने बोंब मारुन निषेध व्यक्त करण्यात येणार आहे, तरी आपण याची दखल घेवून तात्काळ मराठा गल्लीतील रस्ता तयार करण्याची मागणी केली होती.
                                   
या निवेदनावर शिवशाही तरुण मंडळाचे अध्यक्ष पंकज धिरुसिंह हजारे, पदाधिकारी  निखील येडगे, उपाध्यक्ष श्रीकांत सावंत, उपाध्यक्ष संतोष मुळे, कोषाध्यक्ष सहदेव जगताप, सचिव आकाश काळे, सहसचिव  युवराज जगताप,  सुधिर हजारे,  कुरुक्षेत्र किल्लेदार,  तानाजी सावंत, पांडुरंग गायकवाड,  सुहास येडगे,  तानाजी जाधव, शिवाजी सुरवसे आदीच्या सह्या आहेत.

Labels:

केशेगाव ग्रामस्थांच्या वतीने सेवानिवृत्त निमित्त काशिनाथ देडे यांचा सन्मान


इटकळ , दि .३० : 

तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथील मुख्याध्यापक काशिनाथ देडे यांनी ३६ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त केशेगाव ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच रेश्मा घंटे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी डॉ वाय के चव्हाण, इटकळ बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी तात्याराव माळी, नळदुर्ग केंद्राचे केंद्र प्रमुख दत्तात्रय आलुरे,माजी सरपंच कल्याणराव पाटू, उपसरपंच जाकीर शेख,धनगरवाडीचे उपसरपंच राम कदम, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा अश्वीनी जळकोटे, मुख्याध्यापक शिवशंकर जळकोटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रदिप हुकीरे, शिवाजी चव्हाण, पोलिस पाटील सुजाता स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागत गीत व सांस्कृतिक कार्यक्रमा नंतर साखरे गुरुजी प्रतिष्ठान,शिवा बिराजदार मित्रमंडळ,शालेय व्यवस्थापन समिती, इटकळ बिट,चव्हाणवाडी ग्रामस्थ व केशेगाव ग्रामस्थांच्या वतीने सपत्नीक काशिनाथ देडे यांचा  सन्मान करण्यात आला.
सत्कारानंतर शैक्षणिक, राजकीय, क्षेत्रात  शिक्षक, विद्यार्थी, प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशिनाथ भालके यांनी , सुत्रसंचलन स्वामी यांनी तर आभार विजय सदाफुले यांनी मानले. यावेळी अणदूर, इटकळ, केंद्रातील मुख्याध्यापक,शिक्षक, नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

पिंपळा ते तामलवाडी रस्त्यासाठी गांधी जयंतीदिनी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने उपोषणाचा इशारा


काटी ,दि .३०

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पिंपळा (बु) ते तामलवाडी रस्त्याला मंजुरी असताना प्रत्यक्ष कामाला मुहुर्त मिळालेला नाही. या मार्गावर प्रवाशांचे हाल कायम आहेत. याबाबत निवेदने देऊनही रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली नाही.  गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसाने पूरस्थिती निर्माण झाली, तरीही रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तुुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष शिवाजी रामकृष्ण सावंत यांनी तामलवाडी येथे महात्मा गांधी जयंतीदिनी 2 ऑक्टोंबर रोजी उपोषण  करण्याचा इशारा दिला आहे. राज्यात सत्तेमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यावर उपोषणाची वेळ आल्यामुळे परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.


 तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बुद्रुक) ते तामलवाडी या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतन मंजूर झालेले आहे. या रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्यामुळे शेतकरी, शाळकरी मुले तसेच गरोदर महिला यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे शिवाजी सावंत यांनी 7 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिक्षक अभियंत्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर पुन्हा 28 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांसह खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती  यांना निवेदन देऊन पिंपळा (बु.) ते तामलवाडी रस्त्याअभावी होणारे ग्रामस्थांचे हाल निदर्शनास आणून दिले आहेत. मात्र दखल घेतली जात नसल्यामुळे महात्मा  गांधी जयंतीदिनी 2 ऑक्टोंबर रोजी तामलवाडी येथे शिवाजी सावंत यांनी आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे. 


पिंपळा ते तामलवाडी या  38 लाख 32 हजार 112 रुपये  रस्त्याच्या कामाला उद्या 1ऑक्टोबर रोजी प्रत्येक्ष कामास सुरुवात करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले असून उद्या पासून कामाला सुरुवात होईल.
अभियंता काळे 
जिल्हा परिषद, उस्मानाबाद


कामास सुरुवात झाल्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी होणारे  नियोजित आमरण उपोषण मागे घेणार

   सामाजिक कार्यकर्ते
    शिवाजी सावंत  , तामलवाडी

Labels:

काटी येथे पोषण माहनिमित्त व पाककृती स्पर्धा व अन्नधान्य, भाजीपाला, कडधान्य प्रदर्शन संपन्न


काटी , दि . ३० : 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार  रोजी  माळुंब्रा बीट अंतर्गत येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदीरात बालविकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती घोडके, सरपंच आदेश कोळी, उपसरपंच शामल हंगरकर,सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत साजरा होत असलेल्या पोषण माह व पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या. 


या कार्यक्रमात पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या तसेच अन्नधान्य, भाजीपाला, कडधान्य प्रदर्शन भरविण्यात आले होते.  रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून पोषण आहाराचे व "बेटी बचाव बेटी पडाव" याचे महत्त्व पटवून देण्यात आले. या कार्यक्रमावेळी उपस्थित सर्व महिलांना सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत यांनी स्वच्छतेविषयी व नियमित  शौचालय वापरासंबधी शपथ दिली.


          
या कार्यक्रमात अंगणवाडी पर्यवेक्षिका घोडके, तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या श्रीमती मारवाळेकर यांनी  मार्गदर्शन केले. यावेळी गरोदर माता, स्तनदा माता, किशोरी मुली, 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मातांना मार्गदर्शन करताना अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती घोडके म्हणाल्या की, आपल्या देशात वेग-वेगळ्या पद्धतींनी  शिशुला अतिरिक्त खाऊ घातले जाते. त्यात नवजात शिशुच्या योग्य वाढीसाठी लागणारी पोषक तत्वाची कमतरता असते. मग आपण नवजात शिशुच्या योग्य वाढीसाठी लागणारी पोषक तत्वाची पूर्ती करण्याचे निश्चित कसे करू शकतो? शिशुच्या योग्य वाढी साठी लागणारी पोषक तत्वाची गरज पूर्ती करण्यासारख्या खाऊ पदारर्थ तयार करणे हे योग्य उपाय असल्याचे सांगून बालकांचे संपूर्ण कुपोषण निर्मूलन व बाळाच्या ऐन वाढीचा काळ 1000 दिवसांपर्यंत असून गर्भावस्थेपासून ते बाळ पहिले 3 वर्षाचे होईपर्यंत घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

        
यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत, सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सौ.शामल हंगरगेकर, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती घोडके, तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या श्रीमती वर्षा मारवाळेकर,उमेदचे सोनवणे,   ग्रा.पं. सदस्य भैरी काळे, सुहास साळुंके, पर्यवेक्षिका राठोड, पोलीस पाटील श्रीमती म्हेत्रे, सीएचओ राठोड, अंगणवाडी सेविका,मदतनीस, महिला बचतगटातील सदस्या, महिला भजनी मंडळ आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Labels:

श्री .क्षेञ तुळजापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अश्वारुढ

 
  तुळजापूर,  दि . ३० : 

    
तुळजापूर शहराचे वैभव असलेले छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या पुतळ्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन  रोचकरी, युवा नेते विनोद  गंगणे,  मुख्याधिकारी लक्ष्मण  राठोड, सर्व नगरसेवक  , कर्मचारी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील  छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा  चबुतऱ्यावर  बसविण्यात  आले.
 दि . १९ जानेवारी २०१९ रोजी पुतळ्याचे रंग काम करणे तसेच  नवीन चबुतरा  बांधून सदरील परिसर  सुशोभिकरण करणे, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काढून औरंगाबाद येथे रंग काम देण्यासाठी पाठवण्यात आला होता. 

 सदरील काम मजबूत व कायदेशीर बाबी पूर्ण करून लवकर करण्यासाठी तुळजापूर  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदचे नगराध्यक्ष सचिन  रोचकरी सर्व नगरसेवक, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन आज गुरुवार दि. ३० सप्टेंबर २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळा नियोजित जागेवर  बसवण्यात आला आहे .

  
याबद्दल तुळजापूर शहरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 शारदीय नवरात्र महोत्सव सुरू होण्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित जागेवर उभा करण्याबाबत नगराध्यक्ष   रोचकरी व सर्व नगरसेवक यांनी जनतेस आश्वासन दिले होते. ते त्यांनी आज पूर्ण केले आहे. याबद्दल  शहरवासीयांच्या वतीने त्यांचे अभिनंदन  होत आहे.

Labels:

सहकार चळवळ जीवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी खंबीरपणे विठ्ठलसाईच्या पाठीशी उभे राहावे ;बसवराज पाटील

                       

मुरुम,  दि. ३० : 

या सहकारी तत्वावरील साखर कारखान्यामुळे परिसरातील हजारो लोकांच्या हाताला काम मिळाले. त्यामुळे त्यावर अवलंबून असणाऱ्या अनेकांचे संसार उभे राहिले. त्यामुळे हा सहकारी तत्वावरील साखर कारखाना लोकांच्या मालकीचा असल्याने तो टिकलाच पाहिजे आणि सहकार चळवळ ज्या उद्देशाने  यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांनी निर्माण केली ती सहकारी चळवळ जीवंत ठेवण्यासाठी सर्वांची सामुदायिक जबाबदारी असून शेतकऱ्यांनी खंबीरपणे साथ देवून विठ्ठलसाईच्या पाठीशी उभे राहावे असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी गुरूवारी (ता. ३०) रोजी मुरुम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरुन बोलताना व्यक्त केले. 




प्रारंभी दिवंगत माधवराव पाटील  यांच्या प्रतिमेस  मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादिकमियाँ काझी, उमरगा जनता बँकेचे चेअरमन रामकृष्णपंत खरोसेकर, विराट कल्याणी, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश आष्टे, संचालक शरणाप्पा पत्रिके, विठ्ठल पाटील, केशव पवार, माणिक राठोड, संगमेश्वर घाळे, विठ्ठल बदोले, अँड. विलास राजोळे, शिवलिंग माळी, दिलीप भालेराव, राजीव हेबळे, अँड. व्ही. एस. आळंगे, प्राचार्य डॉ. दिलीप गरड, विकास हाराळकर, मदन पाटील आदींची उपस्थिती होती.   


 पुढे बोलताना पाटील म्हणाले की, या भागातील शेती हा मुख्य व्यवसाय असून ऊस हे नगदी पीक व हमीभाव देणारे पीक असल्याने शेतकऱ्यांनी यंदा मोठया प्रमाणात लागवड केली आहे. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. साखर कारखानदारी हे खऱ्या अर्थाने निसर्गावर अवलंबून आहे. पण या कारखानदारीला दरवर्षी विविध समस्यांना तोंड दयावे लागत आहे. ही साखर कारखानदारी टिकविणे हीच सर्वांची मोठी जबाबदारी आहे. सध्या कारखानदारी चालविणे हे मोठे आव्हान असल्याने या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विठ्ठलसाईला साह्य करावे.  यंदा कारखान्याने पाच लाखापेक्षा अधिकचे उद्यिष्टये ठेवून गळीत हंगामासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. आपल्या कारखान्याला नुकतीच डिस्टीलरी प्रकल्पाची मान्यता मिळाली आहे. या परिसरातील एकाही शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाही आणि शेतकऱ्यांच्या उसाला योग्य तो भाव दिला जाईल. विठ्ठलसाईचे नाव राज्यभर करुन सहकार्य करण्याचे आवाहन शेवटी त्यांनी यावेळी केले. सुरुवातीला कार्यकारी संचालक एम. बी. अथणी यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला व त्यानंतर अहवाल वाचन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजु पाटील यांनी तर आभार संचालक विठ्ठलराव बदोले यांनी मानले. यावेळी कारखान्याचे संचालक, सभासद, शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Labels:

श्री तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस बुधवार रोजीपासुन प्रारंभ

 तुळजापूर ,दि . 30 

महाराष्ट्राची कुलस्वमीनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवा पूर्वीच्या मंचकी निद्रेस बुधवारी दि.२९ रोजी सायंकाळी सुरूवात झाली आहे. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी देवी शेजगृहातील पलंगावर विसावली.   देवीजीं मंचकी  निंद्रा विधी परंपरागत स्वरूपात संपन्न झाला.



त्यापुर्वी सेवेकरी पलंगे कुटुंबीयांनी मंचकी निद्रेसाठी पलंग  स्वच्छ धुऊन घेतले, तर आराधी महिलांनी गाद्यांचा कापूस पिंजला, दरम्यान ८ दिवसांची मंचकी निद्रा पुर्ण झाल्यावर म्हणजे येत्या गुरूवार दि.  ७ ऑक्टोबर रोजी  घटस्थापने दिवशी ‍ पहाटे तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान होणार आहे.श्री तुळजाभवानी देवीच्या नवरात्रास घटस्थापनेने दि. ७ ऑक्टोबर रोजी पासून सुरूवात होत आहे.  बुधवारी रोजी सकाळपासूनच सेवेकरी पलंगे यांनी देवीचा चांदीचा पलंग  स्वच्छ धुऊन घेतला. त्यानंतर पलंगावर नवीन नवार पट्ट्या बांधून घेतल्या.  यावेळी मोजक्याच आराधी महिलांच्या उपस्थितीत गाद्यांचा कापूस पिंजून घेवुन नवीन गाद्या पलंगावर ठेवले. मंचकी निद्रेसाठी पलंग सज्ज ठेवण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मोजक्याच पुजारी, सेवेकरी आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत सर्व विधी परंपरेप्रमाणे पार पडले.


 देवीजीच्या मंचकी निद्रेसाठी गाद्यांचा कापूस पिंजण्याचा मान मुस्लिम समाजाला आहे. शम्मू  पिंजारी यांच्याकडे परंपरागतपणे हा मान चालत आलेला आहे. शम्मू पिंजारी यांनी गाद्यांचा कापूस पिंजला. त्यांना त्यांच्या पत्नीने साहाय्य केले.
 सायंकाळच्या अभिषेकनंतर खंडोबाचे पुजारी वाघे यांनी आणलेला भंडारा देवीच्या मूर्तीला लावून “आई राजा उदो उदो’च्या जयघोषात देवीची मूर्ती सिंहासनावरून हलवून पलंगावर ठेवण्यात आली. तत्पूर्वी गाभाऱ्यात धार्मिक विधी उरकण्यात आले. त्यानंतर पलंगावरच प्रक्षाळ पूजा करण्यात आली.


   देवीजी वर्षभरात तीन वेळा एकूण २१ दिवस मंचकी निद्रा घेते. यामध्ये शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी ८ दिवस, सीमोल्लंघनानंतर ५ दिवस व शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी ८ दिवस देवी पलंगावर मंचकी निद्रा घेत असते.
देवीची सर्व नित्योपचार पूजा पलंगावर ,
तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रे दरम्यान सकाळच्या चरणतीर्थ पूजेपासून सायंकाळचा प्रक्षाळ पूजेपर्यंत सर्व नित्योपचार पूजा पलंगावर करण्यात येतात. 

Labels:

जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेत येडोळा येथील जिल्हा परिषद शाळेचे यश

इटकळ , दि .३० 

 दि. ११ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेत  येडोळा ता . तुळजापूर  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे यश.

 तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी  कुमार मधुसुदन एकनाथ नैताम या विद्यार्थ्याची जवाहर नवोदयसाठी निवड झाल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वतीने मधुसूदन एकनाथ नैताम याचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. सदरील विद्यार्थ्यांस शाळेचे मुख्याध्यापक  राहुल जाधव, श्रीमती.प्रतिभा स्वामी,  भरत महाबोले व आप्पाराव बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले. मधुसूदन नैताम यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक राहुल जाधव ;  नळदुर्ग बिटच्या विस्तार अधिकारी श्रीमती शोभा राऊत, शहापूर केंद्राचे केंद्र प्रमुख  बळवंत सुरवसे यांनी मधूसुदन नैतामचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. गांव परिसरातून ही मधुसूदन वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Labels:

नळदुर्ग : रहीमनगर येथे रस्त्याचे काम सुरु करावे अन्यथा दि. ४ ऑक्टोबर रोजी पासून नगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण


नळदुर्ग, दि .३० :  सुहास येडगे, 

 नळदुर्ग येथील रहीमनगर कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम व गटारीचे काम दि. २७ सप्टेबर २०२१ पर्यंत चालू करण्याचे लेखी आश्वासन नगपालिकेने दिले होते. मात्र  प्रत्यक्षात या रस्त्याचे काम चालू करण्यात आले नसल्याने या रस्त्याचे काम सुरु करावे अन्यथा दि. ४ ऑक्टोबर रोजी पासून नगरपालिके समोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आसल्याचा इशारा रहीम नगर मधील नागरीकांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. 


दरम्यान नगरपालिकेत कार्यालयीन अधिक्षक व मुख्याधिकारी उपस्थित  नसल्याने रहीमनगरच्या नागरीकांनी मुख्याधिकारी यांच्या खूर्चीला निवेदन दिले आहे.

या निवेदनात रहीम नगरमधील नागरीकांनी म्हटले आहे की, नगरपालिकेने दिलेली तारीख संपून गेली असून आदयाप ही कायमस्वरुपी कामाची सुरुवात झालेली नाही, यावरुन आम्हास असे निदर्शनास दिसून येत आहे की, आम्ही वारंवार निवेदन देवून व उपोषण करुनही रहीमनगरवाशियांना दुय्यम दर्जाची व सापत्न वागणूक नगरपालिका देत आहे. वास्तविक पाहता नगरपालिका हे काम करण्यासाठी दि. २७ सप्टेबर २०२१ रोजीची तारीख देवूनही या कामा विषयी पालिकेमध्ये आजूनही कोणत्याच हालचाली होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात रहीम नगरच्या रस्त्याचे व गटारीच्या कायमस्वरुपी कामास प्रारंभ नाही झाला, तर येत्या चार ऑक्टोबर पासून नगरपालिका कार्यालयासमोर रहीमनगरमधील नागरीक बेमुदत उपोषणास बसणार आसल्याचे या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे सध्या नगरपालिकेला शहरातील नागरीकांच्या मागणीनुसार विकास कामे न करण्याचा कलंक लागला आहे की काय अशी शंका नागरीकांना येत आहे. 

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी उस्मानाबाद, तहसीलदार तुळजापूर, सहाय्यक पोलिस निरीक्षक नळदुर्ग यांना देण्यात आलेल्या आहेत. या निवेदनावर अजीम कुरेशी, युसुफ नजीर कुरेशी, सईद हकीम कुरेशी, मुजाहिद बाडेवाले यांच्यासह अनेक नागरीकांच्या स्वाक्षरी आहेत.

Labels:

Wednesday, 29 September 2021

तुळजापूर : नवरात्र पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षकांची तुळजापूर येथे भेट


उस्मानाबाद , दि .२९ : 

   

दि .७  ऑक्टोबर पासून महाराष्ट्र राज्यातील प्रार्थनास्थळे जनतेस खुली होत असून याच दिवशी नवरात्रोत्सव प्रारंभ होत आहे. त्यास अनुसरुन श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थान विश्वस्त व्यवस्था अंतर्गत तुळजाभवानी मंदीराशी संबंधीत पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक  के.एम. प्रसन्ना यांनी आज बुधवार दि. 29 सप्टेंबर रोजी तुळजापूर मंदीरास भेट दिली. 


या प्रसंगी मंदीर संस्थानच्या मुख्य प्रशासकीय ईमारतीच्या बैठक कक्षात त्यांनी पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन, अपर पोलीस अधीक्षक  नवनित कॉवत, पोलीस उपअधीक्षक श्रीमती अंजुम शेख, मंदीर संस्थानच्या मुख्य व्यवस्थापक तहसीलदार श्रीमती कोल्हे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.

            


तुळजापूर नवरात्रोत्सवा दरम्यान अवैध व्यवसाय, रस्त्यावरील अतिक्रमने, फेरीवाले यांविरुध्द कठोर कारवाई करण्याचे तसेच रुग्णवाहीका, अग्निशमन, आपत्ती निवारण, विद्युत पुरवठा, सार्वजनिक स्वछता, महामार्गावरील वाहतुक वळविणे इत्यांदी संबंधी इतर प्रशासकीय विभागांशी समन्वय साधून प्रभावी कार्य करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी पोलीस अधीक्षकांना दिले. मंदीर संस्थान प्रशासनाने कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांचे पालन करुन तसेच भाविकांच्या मंदीर प्रवेशा संबंधीचे नियोजन करुन भाविकांना नियंत्रीत संख्येने मंदीर आवारात व मंदीरात प्रवेश द्यावा अशा सुचना त्यांनी मंदीर प्रशासनास केल्या आहेत.

Labels:

श्री तुळजाभवानी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया पुर्ण ; गोकुळ शुगर इंडस्ट्रीजला कारखाना डिस्लरीसह भाडेतत्वावर देण्याबाबत अखेर शिक्का मोर्तब

 

श्री तुळजाभवानी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया पुर्ण ; गोकुळ शुगर इंडस्ट्रीजला कारखाना डिस्लरीसह भाडेतत्वावर देण्याबाबत अखेरशिक्का मोर्तब  


नळदुर्ग, दि. २९ : शिवाजी नाईक 


नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी  शेतकरी सहकारी साखर कारखाना सन 2012 - 13 यावर्षीच्या गळीत हंगामापासून बंद आहे. त्यामुळे हा कारखाना कर्जाच्या खाईत लोटला गेला. कामगार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय निर्माण होऊन प्रचंड हाल झाले. हा कारखाना दिर्घ कालावधीसाठी( १५ वर्ष )  भाडेतत्वावर देण्याबाबत दि. 14 सप्टेंबर 2021 रोजी तुळजाभवानी कारखान्याचे आवसायक एस.पी. रोडगे यांनी जाहिरात प्रसिध्द केली. त्यानुसार के.डी. सोनवणे कंन्सट्रक्शन भोर पुणे, गोकुळ शुगर इंडस्ट्रिज धोत्री, कंचेश्वर शुगर लि. मंगरुळ, युवा कलेक्शन फर्म सोलापूर असे 4 टेंडर आले. बुधवार दि. 29 सप्‍टेंबर रोजी पुणे खेथील साखर आयुक्त कार्यालयात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यापुढे टेंडर उघडण्यात आले. 

यावेळी आयुक्त कार्यालयातील संचालक (प्रशासन) इंदलकर, सोलापूर आर.जे.डी. दराडे यांनी प्रक्रिया पुर्ण केली. यावेळी  साखर आयुक्त यांनी निविदा धारकांनी जास्तीत जास्त दर भरलेल्या संस्थेस गोकुळ शुगर यांना भाडेतत्वार चालविण्याबद्दल सुचना केली. व पुढे मंजुरीस्तव हा अहवाल सहकार मंत्री मुंबई यांच्याकडे पाठविले आहे. या प्रसंगी उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेचे प्रतिनिधी म्हणुन नाईकवाडे व जाधव हे अधिकारी उपस्थित होते. 
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर , जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार आवसायक एस.पी रोडगे, आर.जे.डी. सोलापूर दराडे यांच्यासह साखर आयुक्त यांचा पाठपुरावा व प्रयत्नांमुळे अखेर तुळजाभवानी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया बुधवारी पुर्ण होऊन हा कारखाना लवकरच सुरु होणार असल्याचे प्रभारी कार्यकारी संचालक विकास भोसले यांनी तुळजापूर लाईव्हशी बोलताना सांगितले. 


दरम्यान श्री  तुळजाभवानी कारखान्याचे फिटर असलेले कर्मचारी विठ्ठल माने यांनी बोलताना आनंद व्यक्त करुन सांगितले कारखाना बंद पडल्यामुळे कामगार व त्यांच्या कुटूंबियांची प्रचंड हाल झाली असून कारखाना भाडेतत्वावर दिल्याने लवकरच कारखाना सुरू होणार आहे. व कामगारांच्या हाताला परत काम मिळावे  एवढीच अपेक्षा आहे. 


ऊस उत्पादक शेतकरी संजय दशरथ जाधव या निर्णयाचे स्वागत केले आहे. ऊस गाळपासाठी आपला हक्काचा कारखाना सुरु होणार आहे.त्यामुळे  शेतकऱ्यांना ससेहोलपट आता थांबणार आहे.

Labels:

शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या, पीककर्जाची वसुली थांबवा , पालकमंत्र्यांची गाडी रोखून निवेदन , शेतकऱ्यांशी चर्चा; मदतीचे दिले आश्वासन


उस्मानाबाद ,दि .२९ : 

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन पाण्यात गेले असून हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. तातडीने नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्जाची जाचक वसुली सुरू असून ती थांबविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे शेतकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी पालकमंत्री गडाख हे दाऊतपूर, ईला गावाकडे जात असताना सारोळा गावात बुधवारी (दि.२९) त्यांचा ताफा थांबविण्यात आला. यावेळी पालकमंत्री गडाख यांनी निवेदन स्विकारून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. ग्रामपंचायत सदस्य बाकले यांनी पालकमंत्र्यांकडे शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी. चार दिवसांपासून अतिवृष्टी झाली आहे. सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जनावरांचे गोठे, शेतातील माती, घरांची मोठी पडझड झाली आहे. अतिवृष्टीने पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर मदतीचे वितरण करावे. तसेच पीक कर्जाची वसुली थांबविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली. यावेळी पालकमंत्री गडाख यांनी मदत देण्यासह बँंकांच्या पीककर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश देण्यात येतील, असे आश्वासन दिले. 

यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास घाडगे-पाटील, दिलीप जावळे, वैभव पाटील, सुधाकर मसे, सुरेश रणदिवे, प्रितम कुदळे, रवि नाडे, नितीन पाटील, राजेश मसे, नामदेव खरे, काका पाटील, महादेव कोळगे, रामेश्वर मिटकरी, बाळासाहेब स्वामी, पंडीत देवकर, सौदागर बाकले, प्रदीप कोल्हे, महेश जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

Labels:

मुरूम मधील अंगणवाडी एक येथे लसीकरण मोहीम


मुरूम , दि . २९ : 


मुरूम शहरातील यशवंत नगर भागातील अंगणवाडी क्रमांक एक याठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि मुरूम ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी कोविड १९ प्रतिबंध लसीकरण मोहीम घेण्यात आली.


 यावेळी प्रभागातील महिलाना  कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात लसीकरण मोहीम राबवण्यात आले
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सत्यजित डुकरे,आरोग्य कर्मचारी वर्षा गायकवाड, राजेश लोखंडे, अंगणवाडी सेविका मनीषा माने,मराठा सेवा संघाचे संजय सावंत,गौतम गायकवाड तसेच नगर परिषदचे कर्मचारी उपस्थित होते

Labels:

मुसळधार पावसामुळे साठवण तलावाचा सांडवा फूटला,साठवण तलाव फुटण्याच्या शक्यतेने नागरिकांत भीती



काटी , दि .२९ 

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील साठवण तलावाचा सांडवा पावसामुळे फुटल्याने तलाव फुटण्याच्या शक्यतेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेआहे. 

गेल्या चार दिवसांपासून तामलवाडी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिसरातील सर्वच तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. 
तामलवाडी, सुरतगाव, पिंपळा बु., पिंपळा खु. आदी गावातील शेतकर्‍यांच्या शेतीसाठी व परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने माजी पशुसंवर्धन मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी पाटबंधारे मंत्री पद्सिंह पाटील यांनी या तलावाची निर्मिती केली होती. या तलावातील पाण्याचा फायदा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसह आजू-बाजूच्या कारखान्यांना होत आहे. गेल्या 2 वर्षांपासून या तलावाच्या  पाणलोट  क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने हा तलाव ओसंडून वाहत आहे. वरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने गतवर्षी तर तलावाच्या वरून पाणी वाहून गेले होते. यामुळे गतवर्षीही नागरिकांनी या तलावाच्या डागडुजीसाठी पाटबंधारे विभागाकडे मागणी केली होती. 


गतवर्षी दुर्लक्ष केल्याने आणि यावर्षीही मोठा पाऊस झाल्याने चक्क साठवण तलावाचा सांडवाच फुटून गेला आहे. याबाबत सांडवा फुटल्याचा व्हिडिओही तालुका, जिल्ह्यात व्हायरल झाला आहे. जास्तीचा पाऊस पडल्यावर याचा काही धोका तर होणार नाही ना? याची भीती गावकऱ्यांमधून व्यक्त  केली जात आहे. यामुळे आता जिल्हाधिकांऱ्यानी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे

Labels:

शरण पाटील यांच्या हस्ते बेनितुरा तलावाचे जल पूजन संपन्न...

मुरूम दि.२९, 

येथील बेनितुरा तलाव शंभर टक्के भरून पाणी वाहत आहे, मुरूम शहराची जलवाहिनी असणारे तलाव १००% भरल्याने मुरूम शहराचे पिण्याचे पाण्याचे प्रश्न मिठला आहे, दि.२९ वार बुधवार रोजी उस्मानाबाद जिल्हा विरोधीपक्षनेते शरण बसवराज पाटील,नगराध्यक्षा अनिता अंबर,उपनगराध्यक्ष सहदेव गायकवाड, उमरगा पंचायत समिती सभापती सचिन पाटील, काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव व सर्व नगरसेवक यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात संपन्न झाले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, नगरसेवक रशीद शेख, आयुब मासुलदार, अंबुसेताई, प्रमोदआबा कुलकर्णी, नाईकनगर (सु) सरपंच योगेश राठोड, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, काँग्रेस कमिटी तालुका उपाध्यक्ष राहुल वाघ, सुधीर चव्हाण, राम डोंगरे, नगरसेवक कर्मचारी कार्यालयीन अधीक्षक उमाकांत देशपांडे, पाणी पुरवठा अधिकारी कदम आदी उपस्थित होते.

Labels:

श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

                        
मुरूम,  दि. २९  : 

येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची  सन २०२०-२१ ची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी . रोजी कोरोना नियमांचे पालन करून नुतन बसव सहकार भवनात पार पडली. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य दत्तात्र्य इंगळे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, सहशिक्षक विजयकुमार देशमाने, डॉ. नितीन डागा, संस्थेचे उपाध्यक्ष शरणप्पा मुदकण्णा, सचिव कमलाकर जाधव, संचालक आनंदराव बिराजदार, पत्रकार राजेंद्र कारभारी आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्राचार्य दत्तात्र्य इंगळे यांनी संस्थेच्या वाटचालीमध्ये संचालक व सभासद यांचे विश्वासाचे नातेसंबंध असून केवळ ग्राहकांच्या सहकार्यामुळेच पतसंस्थेची वाटचाल प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

 या सभेचे प्रास्ताविक व अहवाल वाचन करताना वरनाळे म्हणाले की, या पतसंस्थेला उत्कृष्ट संस्था चालविल्याबद्ल महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनकडून विभागीय पातळीवर सलग तिसऱ्या वर्षी देखील पतसंस्थेला पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात या पतसंस्थेस ४२ लाखाचा निव्वळ नफा झाल्याचे सांगून या पतसंस्थेकडे यंदा ९८ लाख ४१ हजार ६५० रुपयाचे वसुल भाग भांडवल, ७ कोटी १३ लाख ६१ हजार ५३३ रुपयाच्या ठेवी, संस्थेने ६ कोटी २८ लाख ९० हजार ६३२ रुपयाचे कर्ज वाटप केले. संस्थेची गुंतवणूक २ कोटी ९० लाख ७५ हजार ६२६ रुपये असून या संस्थेचे ३४७० सभासद, ऑडीट वर्ग 'अ' दर्जा प्राप्त, संपूर्ण संगणकीकृत, आयएफसी कोड, इंटरनेट बँकींग सुविधा उपलब्ध असणारी सेवाभावी पतसंस्था असून ठेवीवरील आकर्षक व्याजदर योजना यामध्ये महालक्ष्मी लखपती योजना, गणेश युवा मंगल योजना, स्वप्नपुर्ती योजना, सरस्वती मासिक प्राप्ती ठेव योजना, महावितरण कंपनीचे वीज बील भरणा केंद्र (मुरुम व उमरगा), सोने तारण कर्ज तर इतर तारण कर्ज आदी ग्राहकांच्या फायदयासाठी संस्थेकडून पुरविल्या जात आहेत. या पतसंस्थेचे कार्यक्षेत्र उस्मानाबाद जिल्हा करण्यात येणार असून अल्पावधीत संस्थेच्यावतीने सार्वजनिक वाचनालय व्यवस्था सुरू करण्यात येणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. या पतसंस्थेचे संचालक अशोक जाधव, श्रीकांत कारभारी, मुख्याध्यापक अब्दुल बागवान, अमृत वरनाळे, कॅशिअर चिदानंद स्वामी, प्रशांत काशेट्टी, विनायक मुदकण्णा, अमर बाबशेट्टी,  युवराज शिंदे, खंडाप्पा धुम्मा, सुरज सुर्यवंशी, महांतय्या स्वामी आदींसह कर्मचारीवृंद व सभासद आदींनी पुढाकार घेतला. पतसंस्थेचे शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे यांनी सभे पुढील विषय वाचन केले. सदर सभेचे ऑनलाईनद्वारे प्रेक्षपण करण्यात आले. सूत्रसंचालन मोहन जाधव तर आभार मनोज बोंदर यांनी मानले.            फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील महात्मा बसवेश्वर पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना शिवशरण वरनाळे, दत्तात्रय इंगळे, महेश मोटे, शरणप्पा मुदकण्णा, विजयकुमार देशमाने, कमलाकर जाधव, अशोक जाधव आदी.

Labels:

अतिवृष्टीमुळे नळदुर्ग वागदरी व परिसरातील सोयाबीन काढणीला खिळ : शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका

वागदरी , दि .२९ :एस.के.गायकवाड :

गेल्या चारपाच दिवसापासून सतत संततधार पावसाने अतिवृष्टी होऊन नळदुर्ग, वागदरी व परिसरातील काढणीला आलेले सोयाबीन पिकांच्या फडात पाणी साचल्याने पिक काढणीला खिळ बसली असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाआहे.


  एक तर सोयाबीन पिकांची वाढ व फुले, शेंगा लागून दाणे भरणाच्या मोसमात पावसाने जवळपास दीड महीना दडी मारल्याने पिकांचे पोषण म्हणावे तसे झाले नाही. परिणामी सोयाबीनचे दाणे कुपोषित होऊन बारीक झाले.यामुळे आगोदर मोठे नुकसान झाले आहे.त्यात अधुनमधून पावसाने हजेरी लावल्याने कसे बसे जमिनीवर तग धरलेल्या सोयाबीनचे पिक काढणीला आले आहे. सोयाबीन काढणीला मोठा वेग आला होता.परंतु गेल्या चारपाच दिवसात सततच्या संततधार पावसाने अतिवृष्टी होऊन सोयाबीनच्या पिकात पाणी थांबल्याने पिक काढणी थाबली आहे.



अनेकांच्या शेतात सोयाबीनला कोंब फुटले आहेत. सोयाबीन पिक काळे पडून खराब झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पिक वाया जावून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून विनाअट सरसकट नुकसान भरपाई व विमाची रक्कम द्यावी. यापूर्वी अग्रीम करण्यात आलेली २५%विमा रक्कमेचे त्वरित वाटप करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

Labels:

अक्कलकोट : सांगवी गावाचे पूनर्वसन करा , गावकऱ्यांची लोकप्रिनिधी व प्रशासनासमोर आर्त हाक


सांगवी गावाचे पूनर्वसन करा , गावकऱ्यांची लोकप्रिनिधी व प्रशासनासमोर आर्तहाक

गतवर्षीच्या पुराची पुनरावृत्ती, पुराच्या भीतीने अनेक घरे रातोरात हलवली

हस्त नक्षत्राच्या पावसाने तालुक्यात नदीकाठी महापूर

अनेक वरिष्ठ अधिकारी, लोकप्रिनिधीनी केली सांगवी जलाशय व पुरसदृश्य भागाची पाहणी

अक्कलकोट दि.२९
        
हस्त नक्षत्राच्या सोमवारी रात्री उशिरापर्यंत अक्कलकोट तालुक्यासह उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या तुफानी पावसामुळे कुरनुर धरणांची धोक्याची पातळी गाठली होती. यामुळे पाटबंधारे विभागाने पहाटे तीन हजार क्यूसेक्स इतक्या विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे नदीकाठच्या सर्व घरे ताबडतोब रिकामी करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. 

        
हरणा नदीला पूर आल्याने बोरी नदी व हरणा नदीचा संगम  काळेगाव या ठिकाणी होत असल्याने दोन्ही बाजूच्या नदीचे पाणी तुंबून सांगवी बु व काळेगावचा संपर्क तुटला. दरम्यान, सांगवी बु , रामपूर, आंदेवाडी या सर्व गावांची  पुरसदृश्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी   मनीषा आव्हाळे, प्रांताधिकारी सुप्रिया डांगे, तहसीलदार बाळासाहेब सिरसट , आमदार सचिन कळ्यांणशेट्टी, सी ई ओ दिलीप स्वामी, वागदरी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, अप्पू बिराजदार, यासह अनेक आधिकारी व लोकप्रनिधींनी या पुरसदृश्य परिस्थिती पाहणी केली व नागरिकांचे म्हणणे ही ऐकून घेत त्यांना सूचना ही दिल्या.

 दरम्यान सांगवी बु गावचे सरपंच वर्षा भोसले यांनी गतवर्षीच्या पुराची पुनरावृत्ती झाली असून, आम्ही रातोरात नदीकाठच्या सर्व घरांना स्थलांतरित केले. जनावरे, कोंबड्या, अन्न धान्य जीवनावश्यक वस्तू हलविताना दमछाक झाली होती. यावर सर्व प्रशासनाला आम्ही गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो की, आमचे सांगवी बु हे गाव तत्काळ पूनर्वसन करावे, गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री दत्ता भरणे, आमदार प्रणिती शिंदे, यासह अनेक दिगग्ज नेत्यांनी सांगवी बु जलाशय व गावात पाणी घुसलेल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली, त्यावेळी, तत्कालीन सरपंच अबूबकर शेख यांनी मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन देऊन गाव पूनर्वसनाची मागणी केली होती. पण प्रशासनाने तो फक्त देखावाच  केला असून, या अशा वारंवार पूर येऊन सांगवी गावाला धोका निर्माण होत असून, याबाबतीत जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
शेतातील  पिके वाहून गेली, आणि कित्येक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांचे तत्काळ पंचनामे व्हावे,आणि गाव पुनर्वसनाची मागणी सरपंच वर्षा भोसले यांनी यावेळी, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना केली.
     
 
यावेळी, सर्कल एम कांबळे, तलाठी एस आय शेख, ग्रामसेवक शैलजा पोमाजी, पोलीस पाटील शुभांगी बाबर , कोतवाल जाकीर कागदे, जावेद मुल्ला, राजू खरात , यातीराज भोसले, वसीम शेख, अबूबकर शेख, विष्णू भोसले, अंकुश घाटगे, इरफान शेख, आशाबाई आवटे, निलाबाई शिंदे, यासह  नागरिक उपस्थित होते.


 सांगवी हे गाव धोक्याच्या स्थितीत असून, गतवर्षी पासून पुराचा धोका बसत असून, सांगवी बु हे गाव पुनर्वसन होणे गरजेचे आहे. गाव पुनर्वसनासाठी मी माझी स्वतःची ११ एकर जमीन अधिग्रहणसाठी देण्यास तयार आहे.

 मेजर बाळासाहेब भोसले, सांगवी बु

Labels:

तुळजापूर तालुक्यातील खरिपाची पिके सततच्या संततधार पावसाने धोक्यात, काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाला फुटले कोंब , शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात

      


चिवरी , दि. २९ : राजगुरू साखरे 

तुळजापूर तालुक्यातील सर्वच मंडळातील गावांमध्ये   मागील चार दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसाने या परिसरातील हजारो हेक्टर खरीपाची पिके मुख्यता नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीनचे पीक धोक्‍यात आले आहे. 

यंदा तालुक्यात मृग नक्षत्रात वेळेवर पाऊस झाल्यामुळे सोयाबीनची पेरणी शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणावर केले होती,सोयाबीनचे पीकही  चांगले बहरली होती, त्यातच मध्यंतरीच्या काळात जवळपास एक महिना पावसाने उघडीप दिली होती त्यामुळे काही ठिकाणचे सोयाबीन करपून गेले होते, शेतकऱ्यांनी कशीबशी तुषार सिंचननानी पाणी देऊन पिकांना तळहाताच्या फोडासारखे जपले होते, परंतु मागील चार दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे उभ्या सोयाबीन पिकाला शेतात पाणी साचल्यामुळे कोंब फुटु लागले आहेत., आ

ता शेतातील पाणी  ओसरणार कधी व सोयाबीन हातात लागेल किती हे सांगणे अवघड झाले आहे , त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Labels:

खासबाब म्हणून येडोळा येथील नदीवर नवीन पुलाचे बांधकाम त्वरित सुरू करावे : रिपाइंची मागणी


वागदरी , दि .२९ :  एस.के.गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथील बोरी नदीवर शासनाने खाशबाब म्हणून नवीन पुलाचे बांधकाम त्वरीत सुरू करून येथील ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न  कायम स्वरूपी मिटवावा अशी मागणी  रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले)च्या वतीने करण्यात येत आहे.


  रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार नामदार रामदास आठवले यांनी या संदर्भात संबंधित उस्मानाबाद जिल्ह्यधिकारी याना दिलेले सूचना पत्र रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांनी रिपाइंच्या शिष्ठमंडळासह उस्मानाबाद जिल्हाधिकारी याना दिले आहे. 


याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओहाळ म्हणाले की,येडोळा येथील बोरी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यास प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून नदीला पुर येवून जर येथे जीवीत हाणी किंवा वित्त हाणी झाली तर याबाबत संबंधित आधिकाऱ्याना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे.

  यावेळी रिपाइंचे जिल्हा संघट सोमनाथ गायकवाड, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष भालचंद्र कठारे,तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के, तालुका उपाध्यक्ष रामचंद्र लोंढे, संघटक सुरेश लोंढे, येडोळा शाखा अध्यक्ष देवानंद लोंढे, शाखा उपाध्यक्ष मारुती लोंढे,भाजपचे तालुका उपाध्यक्ष नवनाथ आबा जाधव सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

आधुनिक जीवनशैली आणि वाढते हृदयविकार(जागतिक हृदय दिन विशेष - २९ सप्टेंबर २०२१)


आधुनिक जीवनशैली आणि वाढते हृदयविकार

(जागतिक हृदय दिन विशेष - २९ सप्टेंबर २०२१)


आजच्या आधुनिक जीवनशैली मुळे माणसाचे जीवनचक्र बिघडले आहे. ज्याचे गंभीर परिणाम मानवी आरोग्यावर होत आहेत. निद्रानाश, जंक फूड, धूम्रपान, अल्कोहोल, तणाव, पदार्थांमध्ये पोषक घटकांची कमतरता, यांत्रिक संसाधनांचा अति वापर, निसर्गापासून अंतर, प्रदूषण, वाढते वजन, आळस यासारख्या गोष्टी माणसाला कमकुवत करत आहेत. 


मानवी शरीर आणि मनावर ताण सतत दबाव निर्माण करत आहे. ज्यामुळे रोगांचे जाळे वाढत आहे. पूर्वी आजार वयानुसार लोकांमध्ये दिसून यायचे पण आता जीवनशैलीतील बदलामुळे कोणताही गंभीर आजार कोणत्याही वयात होऊ लागला आहे. हृदयरोग हा अशाच प्रमुख आजारांपैकी एक आहे, ज्यामुळे जगभरात झपाट्याने अकाली मृत्यू होत आहेत. संपूर्ण शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचवण्यासाठी हृदय सतत रक्त पंप करते. परंतु काम करताना कोणताही असामान्य हस्तक्षेप होतो, जे हृदयाच्या स्नायूवर आणि रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर परिणाम करते, तेव्हा त्याला हृदयरोग म्हणता येईल. 50 टक्के हृदयविकाराचे रुग्ण रुग्णालयात जाण्यापूर्वीच जीव गमावतात. कोरोनरी धमनी रोग, कार्डिओमायोपॅथी, एथेरोस्क्लेरोसिस, हृदय संसर्ग, जन्मजात हृदयरोग हे सर्व हृदयाशी संबंधित आजार आहेत.


 नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) ची आकडेवारी सांगते की, भारतात 2014 पासून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची संख्या वाढली आहे. 2016 मध्ये, हृदयविकारामुळे 21,914 लोकांनी आपला जीव गमावला, 2017 मध्ये मृतांची संख्या 23,249 होती, 2018 मध्ये 25,764 आणि 2019 मध्ये 28,005 लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 

आपल्या देशात हृदयविकाराच्या मृत्यूची बहुतेक प्रकरणे घरी होवून कुटुंबातील सदस्य योग्य कारणासह नोंदणी करत नाहीत, म्हणूनच मृतांचा आकडा प्रत्यक्षात आणखीही खूप जास्त असू शकतात. भारतात आता आजारांमुळे होणाऱ्या प्रत्येक 04  मृत्यू पैकी एक मृत्यू हृदयविकारामुळे होतो. एनसीआरबीचा अहवाल म्हणतो की, हा रोग आता प्रत्येक 14-18, 18-30, 30-34 वयोगटात देखील वाढत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे की, जगातील आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (कार्डियोवास्कुलर डिजीज) मृत्यूचा सर्वात मोठा वाटा आहे. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या मते, दरवर्षी 17.9 दशलक्ष लोक मरतात. युनायटेड स्टेट्स मध्ये, दर 36 सेकंदात एक व्यक्ती हृदयरोगामुळे मरतो. दरवर्षी सुमारे 6,55,000 अमेरिकन हृदयरोगामुळे आपला जीव गमावतात. भारतातही, गेल्या दशकात, या रोगाच्या बळींमध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. इंडियन हार्ट असोसिएशनच्या मते, भारतातील 50 टक्के हृदयविकाराचे 50 वयाखालील लोकांमध्ये आणि 40 वर्षांखालील लोकांमध्ये 25 टक्के होतात. छातीत दुखणे, श्वास लागणे, दम गुदमरणे, मळमळ, पोटात दुखणे, घाम येणे, अनियमित हृदयाचा ठोका, अस्वस्थ संवेदना, सुजलेल्या घोट्या, थकवा, जबडा पाठ किंवा हाता-पायात वेदना, यासारखी लक्षणे हृदयविकाराचा झटका दर्शवू शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार हृदयरोगाशी (कार्डियोवैस्कुलर डिजीज) संबंधित मुख्य तथ्ये

       हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (सीव्हीडी) हे जागतिक स्तरावर मृत्यूचे प्रमुख कारण आहेत. 2019 मध्ये अंदाजे 17.9 दशलक्ष लोक सीव्हीडीमुळे मरण पावले, जे सर्व जागतिक मृत्यूंपैकी 32 टक्के आहे, यापैकी 85% मृत्यू हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकमुळे होतो. सीव्हीडी मृत्यूंपैकी तीन चतुर्थांश मृत्यू कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. 2019 मध्ये असंसर्गजन्य रोगांमुळे 17 दशलक्ष अकाली मृत्यू (70 वर्षांपेक्षा कमी) मृत्यूंपैकी 38 टक्के सीव्हीडीमुळे झाले. हृदयविकाराचा लवकर शोध घेणे आवश्यक आहे जेणेकरून योग्य सल्ला आणि औषधांनी उपचार सुरु करता येतील. तंबाखूचा वापर, अस्वास्थ्यकर आहार, लठ्ठपणा, आळस आणि अल्कोहोलचा हानिकारक वापर सारख्या जोखीम घटकांच्या जागरूकतेमुळे बहुतेक हृदयरोग टाळता येईल.

आरोग्य विभागाचा पुढाकार

भारत सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या वतीने, रोग, प्रथमोपचार, निर्देशिका सेवा, आरोग्य कार्यक्रम, धोरणे, कायदे आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या विविध समस्यांमधून संबंधित प्रश्नांची पूर्तता करण्यासाठी आरोग्याशी संबंधित माहिती प्रदान करण्यासाठी व्हॉइस पोर्टल तयार केले आहे, वापरकर्त्यांना टोल फ्री नंबर (1800-180-1104) डायल करून शोधत असलेल्या माहितीबद्दल बोलावे लागेल - उदाहरणार्थ, रोगाचे नाव वगैरे. ही प्रगत प्रणाली वापरकर्त्याचा इनपुट आवाज ओळखण्यास सक्षम आहे. सध्या माहिती इंग्रजी, हिंदी, तमिळ, बांगला आणि गुजराती या 5 भाषांमध्ये उपलब्ध आहे, पण भविष्यात आणखी भारतीय भाषांचा समावेश केला जाईल.

तयारी आणि जागरूकता आवश्यक

बऱ्याचदा, बेशुद्ध रुग्णाला ताबडतोब कार्डियो पल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) देणे आवश्यक असते. ही एक आपत्कालीन वैद्यकीय प्रक्रिया आहे, जे रुग्णाच्या शरीरावर वापरले जाते, ज्यामुळे शरीरात थांबलेल्या रक्त वाहिन्यात पुन्हा रक्त सक्रिय होऊन फिरू लागते ज्याद्वारे एखाद्याचे प्राण वाचवणे शक्य होते. हृदयविकाराच्या झटक्यानंतर अनेक वेळा लोक असहाय असतात आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध होईपर्यंत काय करावे हे त्यांना कळत नाही. अशा परिस्थितीत, सीपीआरमध्ये जाणकार व्यक्ती, प्रथमोपचार म्हणून जागरूक असून, सीपीआरद्वारे एखाद्याचे जीवन वाचविण्यात मदत करण्यासाठी अधिक सक्षम असल्याचे सिद्ध होऊ शकते. रुग्णवाहिकेसाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक 112 किंवा 102 वर कॉल करा अन्यथा आपण जवळच्या हॉस्पिटलला कॉल करू शकता.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग प्रतिबंधक धोरण आखणे गरजेचे

आरोग्य शिक्षण आणि हृदयरोगाबद्दल जागरूकता वाढवणे, धूम्रपान आणि तंबाखू सेवनापासून परावृत्त करणे आणि पौष्टिक अन्न आणि व्यायामाचा दिनक्रम स्वीकारल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहते. मीठ कमी वापरावे, अन्नामध्ये तेलाचा वापर देखील कमी केला पाहिजे. उच्च चरबीयुक्त डेअरी, कार्बोहायड्रेट्स, संतृप्त चरबी कमी करणे आणि फळे, हिरव्या भाज्या यांचे दैनंदिन सेवन वाढल्याने एकूण आरोग्य सुधारेल. उच्च रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवावे. चालणे, योग आणि ध्यान यासारख्या व्यायामाच्या क्रियाकलापांना नियमितपणे प्रोत्साहन देऊन हृदयरोगाच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी हे निश्चितपणे मदत करेल, म्हणजेच, निरोगी जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित शारीरिक व्यायाम लहानपणापासूनच सुरू करायला हवा. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांनी आजारपणात जागतिक बोजाच्या सुमारे 80 टक्के भार उचलला आहे. आशियाई भारतीयांमध्ये हृदयरोगाशी संबंधित मृत्यू दर इतर लोकसंख्येच्या तुलनेत 20-50 टक्के जास्त आहे. म्हणूनच, जोखीम घटकांची भूमिका स्पष्टपणे समजून आणि त्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी सर्व प्रयत्न सक्रियपणे करणे आवश्यक आहे.


अन्न भेसळ ही आजकाल एक सामान्य बाब झाली आहे, असे वाटते. सणांच्या काळात ही समस्या अधिकच वाढते. अन्नपदार्थांमध्ये घातक रसायनांचा वापर केला जातो, अस्वच्छ, शिळे आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकले जातात. बरेचदा बाहेर मिळणारे खाद्यपदार्थ मीठ, तेल, मसाले, साखर, चरबीने परिपूर्ण असून आरोग्यासाठी हानिकारक असतात, जे केवळ जिभेला चव देऊन आरोग्याला हानी पोहोचवतात, कारण यात आवश्यक पोषक तत्वांचा प्रचंड अभाव असतो. अन्नपदार्थ, तेलात तळल्यानंतर उरलेल्या तेलाचा वारंवार वापर आरोग्यासाठी अत्यंत घातक असतो  आणि अशा तेलापासून बनवलेले पदार्थ विकणे देखील कायद्याने गुन्हा आहे, ज्यावर प्रशासनाच्या अन्न विभागाकडून कारवाई केली जाते, कारण हे तेल थेट हृदयरोगासह कर्करोगासारख्या अनेक घातक आजारांना वाढवते. हा नियम विशेषतः अन्न विक्रेत्यांनी काटेकोरपणे पाळला पाहिजे. चविष्ट पदार्थांच्या मोहामुळे आपली जीभ आपल्यासाठी सर्वात घातक आहे, आरोग्यानुसार आहारातील पदार्थ निवडा, जिभेच्या चवीनुसार नाही. नेहमी तणावमुक्त जीवनाचा निर्धार करा, पौष्टिक खा, निरोगी रहा.

डॉ. प्रितम भि. गेडाम

(prit00786@gmail.com

Labels:

कोरोनामुळे तुळजापूरात शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होणारी यात्रा रद्द, पण भाविकांना दर्शन घेता येणार


तुळजापूर,  दि. २८ :

राज्य शासनाने मंदिर उघडण्याच्या अनुषंगाने निर्देश दिल्यामुळे तुळजापूर येथे श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्व तयारी सुरु करण्यात आली आहे. 
त्यानिमित्ताने मंदिर संस्थानचे प्रतिनिधी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी  येथे पार पडली. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होणारी तीन दिवसीय यात्रा यावर्षी भरवण्यात येणार नाही. पण यानिमित्ताने सर्व पूजा आणि विधी होणार असून भावीकांना कोरोनाचे नियम पाळून दर्शन घेता येणार आहे,अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक नीवा जैन, तुळजापूरचे तहसीलदार तथा विश्वस्त सदस्य सौदागर तांदळे, तहसीलदार तथा व्यवस्थापक मंदिर संस्थान योगिता कोल्हे, पोलिस अधिकारी काशीद, वाय.एम.बागुल,  सिध्देश्वर इंतुले, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड , तालुका आरोग्य अधिकारी सुहास पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंचला बोडके, राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक विजय चिंचाळकर, एस.टी.चे विभागीय नियंत्रक अमृता ताम्हणकर, अश्वजीत जानराव, जिल्हा पुरवठा विभागातील सचिन काळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस.व्ही.घोडके, कर्नाटक एस.टी. महामंडळाचे आर.बी.जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेल्लोरे, महामार्ग 52 चे देवेंद्रसिंग, राष्ट्रीय महामार्गाचे अनिल विपत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एम.डी. बोडके,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के. पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन यावर्षी शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्य शासनाने कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून मंदिर उघडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शारदीय नवरात्र महोत्सवातील सर्व पूजा, विधी सर्व प्रकारचे पावित्र्य राखण्यात येईल. भक्तांना दर्शनाची सोयही कोरोनाचे नियम पाळून करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुळजापूर शहरात कोरोना लसीकरणाचे विशेष शिबीर घेण्यात येत आहेत. प्रामुख्याने पुजारी, सेवेकरी आणि मानकऱ्यांबरोबरच संबंधित प्रशासकीय अधिकारी, मंदिर संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्यांचे आणि नागरिकांचे लसीकरण करण्यास भर देण्यात येत आहे. 

नवरात्र महोत्सव काळातील यात्रा बंदी असली तरी पुजारी, सेवेकरी आणि मानकऱ्यांकडून करण्यात येणारी पूजा आणि इतर विधी कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात येणार आहे, असे सांगून यानिमित्त आवश्यक त्या सर्व प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने वाहतुकीचे व्यवस्थापन, बॅरिकेटींग, सुरक्षा, आरोग्य विषयी बाबींवर अधिक भर देण्यात येणार आहे. असेही ते म्हणाले.

या महोत्सवानिमित्त सुरक्षेच्या अनुषंगाने मंदिरातील सी.सी.टी.व्ही.कॅमेऱ्यांचे काम व्यवस्थीत सुरु असल्याची खात्री करुन घेण्यात आली आहे.तसेच नगरपालिकेने बसविलेले काही ठिकाणचे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे सुरु करण्याची गरज असेल तर तेही काही मंदिर संस्थानतर्फे करण्यात येणार आहे, असे सांगून श्री.दिवेगावकर यांनी समाज विघातक आणि समाज कंटकाच्या हद्दपारीची कार्यवाही पोलिसांनी तातडीने करावी. तसेच समाज माध्यमातून जनतेत भितीचे वातारण पसरवणाऱ्यांचाही बंदोबस्त करावा. अवैध दारु आणि अंमली पदार्थावर बारीक नजर ठेवण्यात यावी. याबाबत राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांनी स्वत: लक्ष घालावे. या नवरात्र महोत्सवानिमित्त ज्याकडे जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत त्यांची नावे, फोन नंबर 29 सप्टेंबर 2021 च्या दुपारपर्यंत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास संबंधित कार्यालय प्रमुखाने कळवावी, असेही ते म्हणाले.

या महोत्सवानिमित्त वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशांचे आणि सूचनांचे संबंधित अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंर्तगत कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री.दिवेगावकर  यांनी सांगितले. 

यावेळी आमदार पाटील यांनीही विविध सूचना करत हा महोत्सव यशस्वी करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी श्रीमती कोल्हे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे या महोत्सवातील विविध विभागांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती दिली.

Labels:

पाटील यांचा लातूरच्या अष्टविनायक मंदिर ट्रस्टकडून सत्कार

मुरूम,  दि . २८ : 

 उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील यांची श्री क्षेत्र श्रीशैलम जगद्गुरु पिठाच्या संचालकपदी निवडीबद्दल लातूर येथील अष्टविनायक मंदिर ट्रस्टकडून मंगळवारी (ता.२८) रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत बापूराव पाटील यांचा लातूरच्या अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रदिप राठी यांच्या हस्ते फेटा, शाल, श्रीगणेशाची प्रतिमा भेट देऊन  सत्कार करण्यात आला. 


यावेळी उस्मानाबाद जिल्हा परिषद विरोधीपक्षनेते शरण पाटील, अर्बन बँकेचे उपाध्यक्ष आदिनाथ सांगावे, संचालक शरणप्पा कलमले, व्यंकटराव गर्जे, रमेशचंद्र भुतडा, उद्योजक उदय लातुरे, विवेक रेड्डी, विजयकुमार चितकोटे आदींची उपस्थिती होती. यावेळी अष्टविनायक मंदिर ट्रस्ट, लातूरच्या वतीने श्रीशैलम येथे भाविकांसाठी भक्तनिवास व अन्नछत्र बांधण्याचा मानस असल्याचे प्रदीपकुमार राठी यांनी सांगितले. संचालक पाटील यांच्याकडे तसे पत्र देऊन आपले मागणी सादर केले.

Labels:

सुरतगाव येथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने म्हैस ठार; शेतकऱ्याचे नुकसान


काटी , दि .२९ : 

तुळजापुर तालुक्यातील सुरतगाव शिवारात सोमवारी रात्री झालेल्या पावसाने ओढ्याला आलेल्या पुरात एक म्हैस वाहून जावुन ती बंधाऱ्यात अडकुन मरण पावल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली तर म्हशी राखणारा 17 वर्षीय गुराखी यातुन बालंबाल बचावला आहे.


तुळजापूर तालुक्यातील  सांगवी (काटी ) शिवारातील दोन मोठे तलाव तुडूंब भरून वाहू लागल्याने ते पाणी  सुरतगाव दिशेने जात आहे. त्यामुळे सुरतगावच्या ओढ्याला मोठा पुर आला . मंगळवारी दुपारी म्हशी राखणारा जयदीप आण्णासाहेब गुंड हा ओढ्या शेजारी शेतालगत म्हशी राखत असताना एक म्हैस पुराच्या पाण्यात उतरली ती वाहत जावुन बंधाऱ्यात अडकली तिचे शिंगे लोखंडी  ॲंगलमध्ये अडकल्याने तिला पाण्यामध्ये वाहत जाता आले नाही. ती जागीच मरण पावली तर गुराखी जयदिप गुंड वय 17 वर्ष  हा म्हशीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना तो पुराच्या पाण्यातुन बचावला  पुराच्या पाण्यात म्हैस मरण पावल्याने पशुपालक आण्णासाहेब धोंडीबा गुंड रा. सुरतगांव यांचे  नुकसान झाले आहे. पुराचे पाणी कमी झाल्यानंतर पंचनाम्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

Labels:

सावरगाव येथील साठवण तलावाच्या भरावास समांतर भेगा ; संबंधित विभागाने तातडीने उपाय-योजना करण्याची गरज

काटी , दि . २९

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील साठवण तलाव  धोकादायक झाला असून साठवण  तलावाच्या भरावाच्या लांबीस  वरच्या बाजूला समांतर भेगा पडल्याचे तलावा शेजारील शेतकरी नेताजी कदम यांच्या निदर्शनास आले. ही बाब अनेकांच्या निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


साठवण तलावाच्या भरावाच्या दोन्ही बाजूंनी बाबळीसह अन्य झाडाझुडुपांनी भरावर झाडांची गर्दी दिसून येत आहे.  संबंधित विभागाने या विषयाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मागील आठवडाभरा पासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावरगाव येथील साठवण तलाव पुर्ण क्षमतेने भरला असून सांडवा ओसंडून वाहू लागला आहे. 1999 साली पाटबंधारे विभागाअंतर्गत या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. तेंव्हापासून या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याच्या प्रश्न काही अंशी मिटला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा तलाव पूर्ण क्षमतेने भरत असल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, तलावाच्या भरावाच्या मध्यभागातून उभे समांतर तडे गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तलावाच्या भरावावर मोठ-मोठे झाडे आल्यामुळे झाडा झुडूपांनी भराव वेढल्याचे दिसून येत आहे. झाडांची दाटी वाढल्याने वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. 
सध्या पावसाळ्याचे दिवस असून तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे तलावाच्या पाळूला दाब निर्माण झाला आहे. तलावावरील पाळूचे तडे प्रकर्षाने जाणवत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संभाव्य धोका ओळखून याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.


दोन-तीन दिवसांपासून सांडवा वाहत आहे. माझी शेती तलावाशेजारीच आहे. तळ्याच्या भरावाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. झाडांची गर्दी झाल्याने डुकरांचा त्रास वाढला आहे.

नेताजी कदम, शेतकरी -सावरगाव


काल गावातील नागरिकांनी तलावाच्या पाण्याची पूजा केल्याचे फोटो पहिले होते. मात्र, तलावाच्या पाळूला तडे गेल्याचे कोणी सांगितले नाही. किंवा कोणी तक्रार केलेली नाही. मी सावरगावला जाऊन प्रत्यक्ष तलावाची पाहणी करणार आहे. संभाव्य धोका लक्षात घेता तात्काळ उपाय-योजना केल्या जातील.

जे.डी.गुरव, उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग - तुळजापूर

Labels:

शासन निर्णयाचे मनसेच्या वतीने उपहासात्मक वर्धापन दिन साजरा, निर्णयाची २३ वर्षात अंमलबजावणी न झाल्याने केला निषेध

 

नळदुर्ग , दि .२८

शासकीय जागेवरील निवासी तसेच वाणिज्य प्रयोजनासाठीची अतिक्रमणे नियमानुकुल करण्याचा महत्त्व पूर्ण निर्णय  आजच्याच दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर १९९९ ला युती सरकारच्या काळात झाला. माञ या शासन निर्णयाची २३ वर्षात अंमलबजावणी न झाल्याने या
शासन निर्णयाचे मनसेच्या वतीने उपहासात्मक  वर्धापन दिन साजरा करुन  निषेध केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी व या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी  उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष  प्रशांत नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली   नळदुर्ग  येथिल लोकमंगल बँकेच्या जवळ मंगळवार दि. २८ सप्टेंबर रोजी  शासन निर्णयाच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन २३ वा वर्धापनदिन साजराकेला.

१९९९ साली युती सरकारच्या या शासन  निर्णयानंतर अवघ्या एक महिन्यात विधानसभा भंग होऊन मुदतपूर्व निवडणूक झाली. यात युती सरकारचा पराभव होऊन काँग्रेस राष्ट्रवादी सरकार अस्तिवात आले त्यानंतर ही  या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने हा शासन निर्णय अडगळीत पडला . ४ एप्रिल २००२ रोजी तत्कालीन  मुख्यमंत्री  विलासराव देशमुख यांनी या शासन निर्णयाचे पुनर्जीवन केले.  एक जानेवारी १९८५  ऐवजी  १ जानेवारी १९९५ पूर्वीची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेतला. पण हाही शासन निर्णय अडगळीत पडला . या निर्णयाच्या अंमलबजावणी साठी  दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने २३ जून २०१५  रोजी  या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देऊनही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही . 


१ जानेवारी १९९५ पूर्वीची सरकारी जागेवरील अतिक्रमने नियमित करण्याची तरतूद या शासन निर्णयात आहे .  झोपडपट्टी धारकांना अतिक्रमण झालेल्या दिवशीच्या बाजार भावा एवढी , झोपडपट्टी व्यतिरिक्त अतिक्रमण धारकांना अडीचपट , अतिक्रमण वाणिज्य प्रयोजनासाठी असलेल्या अतिक्रमित धारकांकडून पाचपट रक्कम आकारून  अशीअतिक्रमणे नियमित करण्याची तरतूद आहे. या जागांचे ले- आऊट करण्यासाठी ग्रामीण भागात तहसीलदार तर शहरी भागात महापालिका आयुक्त,मुख्याधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन  करण्याचे आदेश या निर्णयात आहेत. 

या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास झोपडपट्टी धारक जागेचा खऱ्या अर्थाने  मालक होईल.व नळदुर्ग शहरातील जवळपास ७००-८००गोर-गरीबाना हक्काचे घर व न्याय  मिळेल म्हणून  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासनाचे लक्ष्य वेधन्यासाठी व या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष  प्रशांत नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल बँकच्या जवळ  सकाळी -१० वाजता, सदर निर्णयाच्या पत्रकास (जी.आर.)हार घालत २३ वा वर्धापन दिन साजरा करून शासनाचा निषेध केला,यावेळी जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड,मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, शहर सचिव आवेज इनामदार, दिलीप राठोड,संदीप वैद्य, अहमद तांबोळी , रोहित नागरसे अदिसह नागरिक उपस्थित होते.

Labels:

उस्मानाबाद : पालकमंत्री शंकरराव गडाख बुधवारी पूरग्रस्त भागाची करणार पाहणी


उस्मानाबाद,दि .२८ 

पालकमंत्री तथा राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे उद्या दि .29 सप्टेंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत .ते अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाची , नुकसानीची पाहणी करणार आहेत . त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे .    सकाळी ११.०० वाजता उस्मानाबाद तालुक्यातील  दाऊतपूर  येथे आगमन झाल्यानंतर  पूरग्रस्त भागाची पाहणी करतील . त्यानंतर  सकाळी ११.२० वाजता  इर्ला त्यांचे  येथे आगमन होईल , तेथे ते  नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करतील . सकाळी  ११.४० वाजता ईर्ला येथून तेर ( ता. जि. उस्मानाबाद ) कडे प्रयाण करतील .                           

दुपारी  १२.०० वाजता तेर येथे आगमन झाल्यानंतर  अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांची पाहणी करतील . तेर येथील  ग्रामीण रुग्णालय  येथे भेट देतील त्यानंतर  नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करतील . दुपारी १२.२५ वाजता तेर येथून वाकडी (इस्थळ), (ता. कळंब ) कडे प्रयाणकरतील . 
दुपारी १.२५ वाजता वाकडी (इस्थळ) (  ता. कळंब ) येथे आगमन आणि  पुरग्रस्त भागाची पाहणी करतील .दुपारी१.४० वाजता वाकडी (इस्थळ) येथून सौंदना (आंबा), ( ता. कळंब ) कडे प्रयाण करतील . दुपारी १.४५ वाजता सौंदना (आंबा) येथे आगमन आणि  पुरग्रस्त भागाची पाहणी करतील . सोईनुसार सौंदना (आंबा) येथून अहमदनगरकडे प्रयाण करतील 
            

Labels:

उस्मानाबाद जिल्ह्यात पुरात अडकलेल्या 459 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात प्रशासनास यश , एन.डी.आर.एफ.च्या टीमकडून 16 जणांचे बचाव कार्य यशस्वी


 

   उस्मानाबाद,दि.२८ 


जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या 136.78 टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील बारा मंडळात अतिवृष्टी झाली तर तेरणा आणि मांजरा ही धरणं शंभर टक्के भरल्याने नदीपात्रात पाणी सोडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. परिणामी नदीतीरावरच्या गावांत पाणी शिरले. काही गावांत ग्रामस्थ अडकून पडले. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने ग्रामस्थांच्या बचावाचे कार्य सुरु केले. त्याच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने एन.डी.आर.एफ.च्या टीमची मागणी केली. त्याही टीमने पूरग्रस्तांच्या बचावाचे काम करुन 16 जणांचा बचाव करुन सुरक्षित स्थळी हलविले तर जिल्ह्यातील 459 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले.


मांजरा धरणाच्या धरण क्षेत्रामध्ये सतत झालेल्या पावसामुळे मांजरा धरणाचे सर्व दरवाजे दि.27 सप्टेंबर 2021 रोजी उघण्यात आले. त्यामुळे धरणाखालील गावामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कळंब तालुक्यातील वाकडीवाडी येथे तीन कुटुंबातील एकूण 20 व्यक्ती शेतातील घरामध्ये अडकली होती. जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने त्या सर्वांची सुटका केली आहे. तेरणा नदीकाठी असलेल्या तेर,रामवाडी, इर्ला आणि दाऊतपूर या गावामध्ये पाणी शिरल्यामुळे तेथील लोकांना शाळेमध्ये आणि इतर सुरक्षित ठिकाणी प्रशासनामार्फत हलवले आहे.

          

जिल्हा प्रशासनातर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे हेलिकॉप्टर पाठविण्याची मागणी केल्यानुसार हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दाऊतपूर येथील शेतामध्ये अडकून पडलेल्या सहा व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यात चार मोठ्या माणसांचा तर दोन बालकांचा समावेश होता. तसेच कळंब तालुक्यातील सौंदणा येथील पुरामुळे अडकलेल्या 10 व्यक्तींना जिल्हा आपत्ती प्राधिकरणाची टीम आणि एक बोट तसेच एन.डी.आर.एफ. (NDRF) ची टीम तसेच तीन बोटीच्या माध्यमातून व हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुटका करण्यात आली आहे.

          


उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथील अंदाजे 125 लोक, इर्ला येथील अंदाजे 114 लोक, तेर येथील अंदाजे 35 लोक, दाऊतपूर येथील अंदाजे 90 लोक, बोरखेडा येथीलअंदाजे 35 लोक, कामेगाव येथील अंदाजे 40 व्यक्तींना आणि वाकडीवाडी येथील 20 जणांसह अशाप्रकारे एकूण 439 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

          


जिल्ह्यात आज उस्मानाबाद तालुक्यातील सहा, तुळजापूर तालुक्यातील दोन, कळंब तालुक्यातील तीन तर उमरगा तालुक्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली. उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी 66.3,पाडोळी-81, केशेगाव-71, ढोकी-139.5, जागजी-123.8 तर तेर मंडळात 127.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तुळजापूर तालुक्यातील सलगरा-65.5, इटकळ-83.3, कळंब तालुक्यातील मोहा-66.3,शिराढोण-171, गोविंदपूर-107.5 तर उमरगा तालुक्यातील नारंगवाडी मंडळात 69 मिलीमीटर पावसाची म्हणजे अतिवृष्टीची नोंद झाली.

         


 जिल्ह्यात 27 आणि 28 सप्टेंबरच्या रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील इर्ला येथील 30 वर्षीय बालाजी वसंत कांबळे हे भंडारवाडी येथील पूलावरुन तोल जाऊन वाहून गेले आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. जिल्ह्यात या अतिवृष्टीत 20 लहान आणि 17 मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला. तर 180 झोपड्या-घरांची अंशत: पडझड झाली आहे.

          

जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व महसूल यंत्रणा सतर्क आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या प्रयत्नाने एन.डी.आर.एफ.ची टीम जिल्ह्यात वेळेत पोहचली. प्रथम एन.डी.आर.एफ.च्या 20 जवानांचे एक पथक वाहनाद्वारे आणि तीन बोटी घेऊन दाखल झाले. त्यांनतर हेलिकॉप्टरने आणखी एक टीम दाखल झाली. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार आणि पट्टीच्या पोहणाऱ्या नागरिकांनी महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, मांजरा आणि तेरणा पात्रालगतच्या सर्व गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

Labels:

Tuesday, 28 September 2021

३१ वर्षात पाचव्यांदा जवळगाव प्रकल्प भरला, तुळजापूर तालुक्यातील काटीसह सव्वीस गावांचा पाणीप्रश्न मिटला

काटी , दि .२८ : उमाजी गायकवाड


तुळजापूर तालुक्यातील काटी पासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावरील  बार्शी तालुक्यातील सव्वीस गावांसाठी जवळगाव मध्यम प्रकल्प वरदान ठरला आहे. दरम्यान पावसाचे घटते प्रमाण आणि धरण पाणीअधिग्रहण क्षेत्रात झालेले लहानमोठे प्रकल्प यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरणे अपवादच बनले आहे. 


मात्र यंदा पाऊसाचे प्रमाण चांगले राहील्याने गेल्या एकतीस वर्षात पाचव्यांदा धरण भरुन वाहू लागले आहे,त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थ आनंदात आहेत. बार्शी तालुक्यात तीन मध्यम प्रकल्प आहेत. मात्र पावसाच्या अनिश्चिततेमुळे दरवर्षी पाण्यासाठी जनतेला तरसावे लागते. त्यातल्या त्यात जवळगाव मध्यम प्रकल्पाची अवस्था सर्वात जास्त बिकट असून दरवर्षी हे धरण भरण्यास अनेक अडचणी येतात. नागझरी नदीवर उभारण्यात आलेले हे धरण भौगोलिकदृष्टया अत्यंत महत्वाचे आहे. 


मात्र लागून असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात पाटबंधारे विभागाची कामे मोठया प्रमाणावर झाली आहेत. त्यामुळे नागझरी नदीवर ठिकठिकाणी पाणी अडवण्यात आले आहे. परीणामी जवळगाव मध्यम प्रकल्पात पाणी पोहचू शकत नाही, त्यात पावसाचेही प्रमाण घटल्याने हे धरण निर्माण झाल्यापासून आत्तापर्यतच्या काळात फक्त पाच वेळाच भरले आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने धरण भरण्याबाबत हे धरण विश्वासू नाही. यंदा मात्र परतीच्या पावसापेक्षा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाने जवळगाव धरणाच्या अधिग्रहण क्षेत्रातच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले आहे. 1972-1973  साली जवळगाव मध्यम प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. पण प्रत्यक्षात 1989 साली पाणी अडवण्यात आले. त्यानंतर चक्क एकोणीस वर्षानंतर 2008 साली पूर्ण क्षमतेने हे धरण भरले. नंतर 2010  साली देखील भरले, पण त्यानंतर पुन्हा सहा वर्षाच्या प्रदीर्घ काळ न भरताच ओलांडला. त्या नंतर 2016 साली भरले. पुन्हा चार वर्ष अनेक कारणांनी धरण भरले नाही, पुन्हा 2020  मध्ये धरण भरले आणि या वर्षी ही भरून वाहत आहे. 

त्यामुळे जवळगाव व तुळजापूर तालुक्यातील काटीसह आसपासची सव्वीस गावे आनंदीत आहेत. या धरणामुळे 5340 हेक्टर क्षेत्रावरील जमिनओलीताखाली आली आहे. या धरणाची क्षमता 1233 दशलक्ष घनफूट पाणी साठवण्याची असून 931  दशलक्ष घनफूट पाणी उपयूक्त आहे. या धरणामुळे ज्योतीबाची वाडी, अंबाबाईची वाडी, सारोळे, भांडेगाव, कासारी, भालगाव, मिर्झनपूर, गौडगांव, रुई, आंबेगाव,हत्तीज, हिंगणी, धामणगाव, राळेरास, कौठाळीसह तुळजापूर तालुक्यातील काटी या गावांना अधिक फायदा झाला आहे. गेल्या सव्वीस वर्षात केवळ पाच वेळा भरलेल्या या धरणाने दरवर्षी शेतकऱ्यांना नाराज केले असले तरी या वर्षी चांगलेच खुश केले आहे. यंदाच्या सरासरीप्रमाणे झालेल्या पावसामुळे हे धरण ओसंडून वाहत आहे. या जलाशयावरून तेरा गावे आणि कालव्यावरून तेरा गावे अशी सव्वीस गावे सिंचनाखाली आली आहेत. त्यामुळे यंदा खऱ्या अर्थाने जवळगाव मध्यम प्रकल्प वरदान ठरत आहे. धरण भरल्यामुळे उन्हाळ्यातील सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून शेतातील उत्पादन वाढीस मदत होणार असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.


Labels:

उमरगा : महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार वितरण

उमरगा ,  दि .२८  : 


 महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला राज्यस्तरीय नवरत्न पुरस्काराचा वितरण सोहळा गणपतीपुळे, जि. रत्नागिरी येथे नुकताच उत्साहात पार पडला. डॉ. राजू शेंडगे यांचे ज्येष्ठ बंधू दिवंगत डॉ. के. डी. शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासोबत सन २००१ पासून उमरगा येथे वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला.


 त्यांच्या बंधुंनी या परिसरातील महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश या तीन राज्यातील सीमावर्ती भागातील अनेक रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा-सुविधा पुरवून या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. याच गोष्टीचा डॉ. आर. डी. शेंडगे यांना फायदा झाला. त्यांच्या वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवाचा व त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा जोपासत या परिसरात त्यांनी देखील बंधू प्रमाणेच या परिसरात अद्यावत सेवा पुरविण्याचा वसा घेतला आहे. 


आज शेंडगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिले अद्यावत रिसर्च सेंटर, १०० बेडची क्षमता असलेले, जिल्ह्यातील पहिले एन. ए. बी. एच., शासकीय व खाजगी कॅशलेस हॉस्पिटल, आयुर्वेदिक क्लिनिक सेवा उपलब्ध करून देऊन या परिसरात नावलौकिक मिळवित आहेत. या हॉस्पिटलच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या मागास, गोरगरीब कुटुंबीयांना कमी खर्चामध्ये सेवा पुरविण्याचा ध्यास त्यांनी आयुष्यभर घेतला आहे. कोरोना महामारीच्या काळात तर त्यांनी कुंटूबाची आणि जीवाची पर्वा न करता या परिसरामधील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना जीवनदान देवून अहोरात्र सेवा पुरविली. तसेच उपाध्यक्ष, अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ, उमरगा, उपाध्यक्ष, शेंडगे चॅरीटेबल ट्रस्ट, उमरगा, अध्यक्ष, जयमल्हार बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उमरगा या विविध संस्थांवर काम करत असताना सेवाभावीवृती डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गोरगरीब जनतेला सतत मदत करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कार्याला त्यांची पत्नी डॉ. कुमुदिनी शेंडगे या देखील रेडीओलॉजिस्ट (सोनोग्राफी तज्ञ) म्हणून त्याही साहेबांच्या कार्याला साह्य करीत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. आर. डी. शेंडगे यांना या पुरस्काराने रविवारी (ता. २६) रोजी गणपतीपुळे येथील दर्यासारंग पँलेस येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र पत्रकार संघाच्या १७ व्या वर्धादिनाच्या सोहळ्यात आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, कृषी, उद्योग अशा विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन महाराष्ट्रातील निवडक नवरत्नांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. यशपाल भिंगे, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांच्या हस्ते डॉ. आर. डी. शेंडगे यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सागर पाटील होते. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, अहमदनगर जिल्हयाचे अध्यक्ष संजय नवले, राज्य संघटक प्रकाश वांजळे, दिपक पोतदार, ईगल न्युज  चँनेलच्या संपादिका शालन कोळेकर, सुप्रसिद्ध वक्ते माधव आंकलगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Labels:

Monday, 27 September 2021

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे केंद्र सरकारच्या विरोधात काळ्या फीत लावून घोषणा देत केले निषेध


जळकोट , दि . २७ : 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारच्या विरोधात काळ्या फीत लावून घोषणा देत निषेध नोंदविण्यात आला.


कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला जळकोट येथे जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.व तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे अशी जोरदार मागणी केली.


यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य  प्रकाश चव्हाण, सरपंच अशोक पाटील,कृष्णात मोरे, महेश कदम, गजेंद्र ‌पाटील, राजु पाटील,बबन मोरे, बसवराज कवठे,शंकर वाडीकर, पिन्टु चुंगे,जीवन कुंभार, प्रभाकर कदम, सुनील कलशेट्टी,विजय यादगौडा, वसंत चव्हाण,लोकु राठोड, वसंत करदुरे,नसीर इनामदार, लक्ष्मण जाधव,पिन्टु कार्लै, भिमाशंकर हत्ते,आर.बी.टेलर रघुनाथ कागे‌ तसेच गावातील पुरुष महिला शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

तुळजापूर महालोक अदालतीमध्ये १९२ प्रकरणात तडजोड झाली आहे.


तुळजापूर, दि .२७ : 

  येथील महालोक अदालती मध्ये 192 प्रकरणात  शनिवारी  दि . २५  सप्टेंबर रोजी तडजोड झाली आहे. 
       

तुळजापूर येथील न्यायालयात राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तालुका  विधी सेवा समितीच्या वतीने महालोक अदालत घेण्यात आली. यामध्ये 3 हजार 800 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 192 प्रकरणांमध्ये तडजोड झाली आहे. प्रलंबित प्रकरणांपैकी 47 दिवाणी , 120 फौजदारी प्रकरणात तडजोड झाली. बॅक वसूलीचे एक प्रकरण मिटले. तसेच धनादेश अनादर प्रकरणी फिर्यादी पक्षाला 17 लाख 44 हजार 583 रूपयांची वसूली झाली. तसेच महालोक अदालतीमध्ये बॅक वसूली प्रकरणामध्ये 4 लाख 42 हजार 39 रूपये वसूली झाली. दावापूर्व प्रकरणामध्ये बॅकेची 10 लाख 18 हजार 170 रूपयांची वसूली झाली आहे. 20 वर्षापूर्वीचे एक प्रकरण तसेच 10 वर्षा पूर्वीचे 3 प्रकरणे आणि पाच वर्षापूर्वीची 11 प्रकरणे अशी एकूण 15 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. 

किरकोळ फौजदारी स्वरूपाच्या प्रकरणामध्ये आरोपींना दंडात्मक शिक्षा होऊन 94 हजार 50 रूपयांचा दंड करण्यात आला. महालोक अदालतीचे उद्घाटन तालुका  विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश  व्ही.ए. अवघडे यांच्या हस्ते झाले. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश एम.पी.जसवंत, सह दिवाणी न्यायाधीश आर.बी.खंदारे, गटविकासाधिकारी प्रशांतसिंह मरोड, जगदीश  राऊत, तहसीलदार सौदागर तांदळे,  सरकारी वकील अमोलसिद्ध कोरे, तुळजापूर विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड जयंत इंगळे, पोलीस निरीक्षक आदिनाथ काशीद, तामलवाडी येथिल सहपोलीस निरीक्षक एस.ए.पंडीत, नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड आदी उपस्थित होते. कोरोना आजाराच्या पाश्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेण्यात आली. तसेच सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व न्यायालयीन कम॔चारी,  विधी सेवा समितीचे कम॔चारी, वकील संघाचे सर्व सदस्य, न्यायालयात नेमणूक असलेले सर्व पोलीस कम॔चारी यांनी महालोक अदालत यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला. 
  

Labels:

सिना कोळेगाव धरणातील पाण्याचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते जलपुजन


परंडा,  दि.  २७ : 

सिना कोळेगाव धरणातील पाण्याचे माजी आमदार राहुल  मोटे यांच्या हस्ते सोमवार दि २७ रोजी  जलपुजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष  जाकीर सौदागर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित  होते .

  
परंडा तालुक्यातील सर्वात मोठा असलेला सिना कोळेगाव धरण भरत आला आहे . या धरणातील पाण्याचे पुजन माजी आमदार मोटे यांच्या हस्ते करण्यात आले . यंदा तालुक्यात भरपुर पाऊस पडल्याने तालुक्यातील सर्व धरणे भरली आहेत . सीना कोळेगाव धरण ९२ टक्के  भरले आहे. येत्या दोन दिवसात धरण शंभर टक्के भरले जाईल असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले .  
      

परंडा तालुक्यात चांगल्या प्रकारची जलसिंचनाची सोय व्हावी या उदात्त हेतूने निर्माण केलेला हा प्रकल्प आज मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे . त्यामुळे तालुक्यात जलसिंचनाचे क्षेत्र वाढले आहे  असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे . जल पूजनाच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष  ॲड संदीप खोसे पाटील, ,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे,  युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, पंकज  पाटील, भारत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अमोल पाटील, डीसीसी बँकेचे संचालक हनुमंत कोलते पाटील, बाणगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब खरसडे, भाऊसाहेब नलवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य धनंजय मोरे, रवी  मोरे, अॕड हरिचंद्र सूर्यवंशी,  जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक बापूसाहेब मिस्कीन, नगरसेवक संजय घाडगे, मलिक सय्यद, शरीफ तांबोळी,    धर्मराज गटकुळ, अमीर शेख , सोमनाथ साबळे, मीडिया सेल तालुकाध्यक्ष मयूर जाधव, घनश्याम शिंदे, अजय बनसोडे, आदी उपस्थित होते.

Labels:

परंडा: दोन सदस्य प्रभाग रचनेमुळे " कंही खुशी कंही गम " नगरपालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी

परंडा, दि . २७ : फारूक शेख

  नगरपालिका निवडणुकीसाठी दोन सदस्य प्रभाग रचनेमुळे " कंही खुशी कंही गम " अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत . या रचनेमुळे कोणाचा फायदा कोणाचा तोटा तर काहींची होणार गोची आशी चर्चा राजकिय वर्तुळात होत आहे .

 आगामी होणाऱ्या नगरपालिका   निवडणुकीसाठी दोन सदस्य प्रभाग रचनेचा निर्णय राज्य मंत्री मंडळाने घेतला आहे . निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला नाही, मात्र  परंडयातील राजकीय पक्षाचे नेतेमंडळीं व इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे . कोरोना संसर्गामुळे निवडणुका पुढे ढकलले जातील  असा अंदाज बांधला जात आहे. 


संध्या मात्र कोरोना संसर्ग आटोक्यात  आल्याने निवडणुकांची हालचाली सुरु झाल्या आहेत .
परंड्याच्या राजकारणातील दोन मातब्बर गट आमने सामने येणार असुन दोन्ही गटाची आक्रमकता अजेंड्यावर कोणते विषय असणार ?
 दोन्ही गटाकडुन नगरपालिकेच्या १७ सदस्याकरीता ८ प्रभाग ५० टक्के महिला आरक्षण आहे. तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे . आशा परिस्थीतीत नेतेमंडळीनी प्रत्येक प्रभागातुन सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे . 

 निवडणुक आयोगाने राज्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्था, महानगर पालिका ,नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्याबाबत सुचविले आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे . निवडणुक आयोगाने ओबीसी प्रवर्गातील इच्छुकांनी जात प्रमाणपत्र काढुन घेण्याबाबत सांगीतले आहे .


  इच्छुकांनी नगरपालिका निवडणुकासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. नगरसेवक होण्यासाठी  वार्डातील तरूणांच्या भेटी गाठी घेत  आहेत . या निवडणुकीत शहरात घडलेल्या लहान मोठया घटनांचे पडसाद व राजकिय कुरघोडयांमुळे आणि ५० टक्के महिला आरक्षण दोन सदस्य प्रभाग रचनेमुळे होणारी ही निवडणुक चांगलीच रंगण्याची चिन्हे आहेत .  
यासाठी सर्वच पक्षांनी आतापासुनच कंबर कसली आहे . येत्या डिसेंबर महिन्यात  पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मुदत संपणार आहे .
 पालीकेवर आपल्याच पक्षाची सत्ता यावी यासाठी सर्वच पक्षानी शहरातील सर्व प्रभागावर लक्ष केद्रिंत केले आहे . कोण स्वबळावर तर कोण कोणाशी युती, आघाडी करणार का ?  हे स्पष्ट झाले नाही.
..

कांही नगरसेवकांचे  तिकीट कापले जाणार ? 

पाच वर्षात बरेच पाणी पुलाखालुन वाहून गेले आहे . नगरसेवकांनी कोणती कामे केली याचा हिशोब मतदार मागणार असुन  अकार्यक्षम नगरसेवका बद्दल मतदारात नाराजी आहे . या नगरसेवकांनी पक्षाचे काम देखील केले नाही, उलट पक्षाला कोंडीत पकडण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी  देखील त्यांच्यावर नाराज आहे .आशा विद्यमान नगरसेवकांचे  तिकीट कापले जाणार  असल्याची खात्रीलायक माहिती आहे .

   
 पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेल्या कांही नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली तर कांही नगरसेवक मतभेदामुळे  पक्षापासुन दुर गेले असुन ते सत्तेत असुन नसल्यासारखे आहे. ते दुसऱ्या पक्षात उघडपणे गेले नाहीत मात्र ते कुंपणा जवळ गेले आहेत योग्य वेळी ते आपली भुमिका  स्पष्ट करणार आहेत .

Labels: