Saturday, 31 October 2020

सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; तुळजापुर तालुक्यातील घटना

 


जळकोट  : मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी (नळ) येथे एका युवा शेतकऱ्याने सतत तीन वर्षाच्या नापिकीला कंटाळून व उसनवारी कर्जाला कंटाळून स्वतःच्या राहत्या घरातील खोलीत लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना दि. २९ (गुरुवार) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबतच्या अधिक माहिती अशी की, जळकोटवाडी( नळ) येथील शिवाजी राम कदम हा शेतकरी त्यांचे वडील राम मारुती कदम यांच्या नावे जळकोट शिवारात गट नं ४२९ व ४३६ मध्ये एकूण १ टहेक्टर ४३ आर एवढी शेतजमीन आहे. वडिलांच्या नावे असलेली शेती शिवाजी कदम हा पाहत होता. शेतीमध्ये गेल्या तीन वर्षापासून सतत नापिकी होत आल्याने व ऊसनवारी कर्जाचा बोजा वाढत चालल्याने शिवाजी हा चिंताग्रस्त होता. यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे कोणतेही पीक हाती लागले नाही. उत्पन्न नाही कर्ज फेडायचे कसे या चिंतेत शिवाजी कदम राहत होता. सतत नापिकी व कर्जाला कंटाळून शिवाजी राम कदम(वय-४२) या युवा शेतकऱ्यांने गुरुवार(दि.२९) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरातील खोलीत लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. जळकोट व जळकोट वाडीत एकाच दिवशी दोन शेतकरी आत्महत्या झाल्याने खळबळ माजली असून शेतकरी आत्महत्या वर ठोस उपाययोजना व्हाव्यात. अशी मागणी आता पुढे येत आहे.

या घटनेचा जळकोट सज्जाचे तलाठी तात्यासाहेब रुपनवर यांनी केला. कृषी विभागाचे कृषी सहायक जी. एस. कांबळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. शिवाजी कदम या युवा शेतकऱ्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी,२ मुले,१ भाऊ व तीन बहिणी असा परिवार आहे.

Labels:

तुळजापुरात हिंदुराष्ट्र सेनेच्यावतीने पाकच्या पंतप्रधानाचा निषेध

 


तुळजापुर :  कुमार नाईकवाडी

पुलवामा येथे भारतीय वीर जवान यांच्यावर झालेल्या हल्ला हा पाकिस्तान चा पंतप्रधान इम्रान खान याने कट रचून केल्याची माहिती पाकिस्तानच्या संसदेतील सदस्याने स्पस्ट केली. याच्या निषेधार्थ  हिंदुराष्ट्र सेना तुळजापूर यांच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे शनिवार दि. ३१ शनिवार रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या फोटोला पायदळी तुडवून व पाकिस्तान तसेच इम्रान खान याचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी ओंकार पवार, कृष्णा काळे, युवराज शिंदे, विजय भोसले, रतन व्यव्हारे, विकास सुरवसे, सौरभ कदम, योगीराज जाधव, अविनाश भांगे, कुणाल मोरे, रुपेश शिंदे, राहुल शिंदे, अभिजित देशमुख, परीक्षित साळुंके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

उस्मानाबादेत बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांना श्रद्धांजली

 


उस्मानाबाद, दि. 31 : बंजारा समाजाचे धर्मगुरू महातपस्वी संत डॉ. रामराव महाराज यांना उस्मानाबाद येथील  छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष्श ॲड. नितीन काळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, विद्यानंद राठोड, सुरेश पवार, राज राठोड, दयानंद राठोड, रमेश राठोड, नितीन भोसले, बिभीषण राठोड, दिगंबर बंडगर,अण्णा कोलटकर, संजय माळी आदीजण उपस्थित होते.

Labels:

उस्मानाबाद येथे काँग्रेसच्यावतीने लोहपुरुष सरदार पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

 


उस्मानाबाद, दि. ३१ : थोर स्वातंत्र्यसेनानी, भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त व भारताच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त उस्मानाबाद येथे काँग्रेसच्या वतीने अभिवादन कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री बसवराज पाटील ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण माजी जिल्हाध्यक्ष विश्वासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांच्या शुभहस्ते सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी संघटक राजाभाऊ शेरखाने, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळु, माजी जि.प.सभापती मुकुंद डोंगरे, पं.स.सभापती शिवाजीराव गायकवाड, प्रशांत पाटील, आशिष मोदाणी, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, जावेद काझी, शहाजी मुंडे सर, धनंजय राऊत,  सलमान शेख, राजाभाऊ नळेगावकर, राजेश शिंदे, अवधूत शिरसागर, देवानंद एडके, गोरोबा झेंडे, राजू स्वामी, अब्दुल लतिफ, मोईज शेख, सुभाष हिंगमिरे, मिलिंद गोवर्धन, अनंत घोगरे, राहुल लोखंडे, कृष्णा तवले, प्रसन्न कथले, इलियास खान, मेहबूब खान, सौरव गायकवाड, प्रेम सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Labels:

शेतकरी विरोधी कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार - बसवराज पाटील

 


उस्मानाबाद, दि. ३१ : केंद्र सरकारने घाईघाईत शेतकरी विरोधी कायदे संमत केले असून हे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. या कायद्यानुसार शेतकऱ्यांच्या  शेतीमालाला हमीभाव मिळू शकणार नाही त्यामुळे शेतकरी उध्वस्त होईल, हे थांबविण्यासाठी काँग्रेसने देशपातळीवर याविरोधात आंदोलन सुरू केले असून हे काळे कायदे रद्द होईपर्यंत सातत्याने आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा ठाम निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री बसवराज पाटील यांनी व्यक्त केला.

केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी व कामगार विरोधी कायदे हुकूमशाही पध्दतीने पारित केले असून ते कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने राज्यभर "किसान बचाव दिवस" पाळला जात आहे. याचाच भाग म्हणून उस्मानाबाद येथे दि.३१ ऑक्टोबर रोजी येथील जिल्हा काँग्रेस भवनसमोर बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली  "सत्याग्रह" आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष विश्वासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळु, माजी जि.प.सभापती मुकुंद डोंगरे, पं.स.सभापती शिवाजीराव गायकवाड उपस्थित होते.

पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, या कायद्या विरोधात यापूर्वी आम्ही विविध आंदोलने केले असून आजही आम्ही या कायद्या विरोधात सत्याग्रह करीत आहोत. त्यामुळे केंद्र सरकारने या कायद्याची अंमलबजावणी करणे घातक ठरणार असून या कायद्याची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी होऊ नये. हा कायदा जर उद्या अस्तित्वात आला तर शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय होऊन समस्त कृषी व्यवस्थेवर दूरगामी वाईट परिणाम होतील.

त्यामुळे हा कायदा तात्काळ रद्द करणे आवश्यक असून जोपर्यंत केंद्र सरकार हा कायदा रद्द करीत नाही. तोपर्यंत आम्ही या कायद्याच्या विरोधात सातत्याने आंदोलने सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.  

Labels:

राष्ट्रीय एकता दिनाची उस्मानाबाद जिल्हा परिषदेत शपथ

 


उस्मानाबाद, दि. 31 : लोहपुरुष वल्लभभाई पटेल, महर्षी वाल्मिकी जयंती सह देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी उस्मानाबाद जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली .यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या उपस्थित लोहपुरुष वल्लभभाई पटेल ,महर्षी वाल्मिकी आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी ए.जी.नवाळे,पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, सामान्य प्रशासन विभागाचे सावंत यांची उपस्थिती होती.

देशांमध्ये अखंडता आणि एकसंघता निर्माण करण्यासाठी लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांचे मोठे योगदान आहे त्याचप्रमाणे देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषींचा प्रवास देशासाठी कायम प्रेरणादायी असणार आहे असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी यावेळी व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार नवाळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून वल्लभभाई पटेल,इंदिरा गांधी यांच्यासह महर्षी वाल्मिकी यांच्या या कार्याला उजाळा दिला. 

यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना यावेळी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देण्यात आली.

Labels:

नळदुर्ग येथे बंजारा समाजाच्या वतीने संत रामराव महाराज यांना श्रद्धांजली

 


जळकोट : मेघराज किलजे 

संत सेवालाल महाराजांचे वंशज तथा बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ रामराव बापू महाराज यांचे मुंबईत शुक्रवारी दि.३० ऑक्टोंबर २०२० रोजी रात्री उपचारा दरम्यान निधन झाल्याने नळदुर्ग येथे उस्मानाबाद जिल्हा बंजारा समाजाच्या वतीने शासकीय विश्रामगृहात शोक व्यक्त करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

बंजारा समाजाचे धर्मगुरू बाल ब्रह्मचारी तपस्वी संत श्री रामराव महाराज यांनी बंजारा संस्कृतीची जपणूक करणे ,दिशाहीन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.तसेच शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले. संत श्री रामराव बापू महाराज यांच्या निधनाने एका प्रर्दिर्घ कालखंडाला पुर्ण विराम मिळाला असून बंजारा समाजाची कधीही भरून न निघणारी प्रचंड मोठी हाणी झाली असल्याची भावना जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांनी व्यक्त केली. 

यावेळी हरिष जाधव, वैभव जाधव, अमृता चव्हाण, संजय राठोड, प्रा. सुभाष राठोड, दामाजी राठोड, लक्ष्मण चव्हाण, एम.पी.राठोड, डी.यु.राठोड , सुर्यकांत राठोड,राजु चव्हाण, पिन्टु जाधव, कुमार राठोड, वसंत राठोड, यांच्या सह बंजारा बांधव उपस्थित होते.

Labels:

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात‍ शनिवारी 45 पॉजिटीव्ह; तर दिवसभरात 40 रुग्ण बरे

 


उस्मानाबाद, दि. 31 : उस्मानाबाद जिल्हयात आज शनिवार दि. 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 41 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तसेच आज दिवसभरात 40 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 14 हजार 726 इतकी झाली आहे. यातील 13 हजार 372 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 527 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 827 जणांवर उपचार सुरु आहेत.






Labels:

उमरगा जनता सहकारी बँकेचा 6 वा वर्धापन दिन साजरा

 


जळकोट : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जळकोट-जळकोटवाडी (नळ) रस्त्यालगत असलेल्या उमरगा जनता सहकारी बँकेचा ६ वा वर्धापन दिन बँकेत साजरा करण्यात आला.

उमरगा जनता सहकारी बँकेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त लक्ष्मीचे पूजन करण्यात आले. बँक शाखेत बँकेच्या विविध ठेवी संदर्भात माहिती देण्यात आली. खातेदारांसाठी असलेल्या सोयीसुविधा संदर्भात बँकेचे व्यवस्थापक सिद्धलिंग स्वामी यांनी माहिती दिली. 

यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य शिवराज स्वामी, श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष व पत्रकार मेघराज किलजे, बँकेचे पासिंग ऑफिसर गजानन जायफळे, कॅशियर सोमनाथ महाजन, सेवक बालाजी कुंभार, पिग्मी एजंट दर्याप्पा माळगे, शिवानंद स्वामी, भीमाशंकर स्वामी, राजेंद्र यादगौडा, धनराज मडोळे, डॉ. मोहन बाबरे, गणेश भोसले, सलीम शेख, बँक खातेदार, ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात कोजागिरी पोर्णिमा भाविकाविना साजरी


तुळजापूर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात शनिवार दि. ३१ रोजी आश्विन कोजागिरी पोर्णिमा निमित्त भाविकाविना सन्नाटा पसरला होता. 

शारदीय नवराञ महोत्सवानंतर येणाऱ्या आश्विन कोजागिरी पोर्णिमा निमित्त दरवर्षी भक्तांचा महापुर ओसांडुन वाहत असतो. मात्र यावर्षी संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे या आश्विन पोर्णिमावर कोरोना चे सावट उभा राहिले होते. श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना संसर्गजन्य कोरोनामुळे दर्शनासाठी प्रवेश बंद करण्यात आला होता. या वर्षीचा आश्विन कोजागिरी पोर्णिमाचा  खेटा भक्ताना झाला नसल्यामुळे त्यांचा भ्रम निराश झाला.

तत्पूर्वी शारदीय नवराञ महोत्सवाच्या नंतर विजयादशमी दिनी म्हणजे सोमवारी श्री देवीचे सिमोल्लघंन झाल्यानंतर पाच दिवसाच्या मंचकी निद्रे नंतर शनिवार दि. ३१ रोजी पहाटे अडीच वाजता वाजता श्री तुळजाभवानी मातेची मुख्य चलमुर्ती सिंह गाभाऱ्यातील लाकडी पलंगावरती निद्रीस्त असलेली श्री तुळजा भवानी मातेची मुर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर श्री देवीजीस पंचामृत अभिषेक करवुन वस्ञो अलंकार पुजा करण्यात आली. 


या वेळी श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा, श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे विश्वस्त तथा तहसीलदार सौदागर तांदळे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, मंदीर कर्मचारी जयसिंग पाटील, पाळीचे मुख्य भोपे पुजारी अजित परमेश्वर आदीसह भोपे पुजारी, पाळीकर पुजारी, उपाध्ये पुजारी, सेवेदार, मंदीर कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर सकाळी ६ वाजता श्री देवीजीस पुन्हा पंचामृत अभिषेक पुजा करवुन वस्ञोअलंकार घालण्यात आले. यानंतर श्री देवीची कोजागिरी पोर्णिमा निमित्त नित्योपचार पुजा करवुन धुपारती करण्यात आली. अंगारा काढण्यात आला.

श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात आश्विन कोजागीरी पोर्णिमा दिनी पुणे येथील श्री देवी भक्त आर आर किराड यांच्याकडुन संपुर्ण मंदीरासह श्री शिवाजी महाराज दरवाजा, राजे निंबाळकर दरवाजा, होम कुंड, राज माता जिजाऊ महाद्वार व राजे शहाजी महाद्वार या ठिकाणी आकर्षक फुलाची सजावट करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षापासुन आश्विन पोर्णिमा दिनी श्री देवीच्या चरणी मोफत सेवा समर्पीत करण्यात येत आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीर परिसर आदीसह सर्व भागात विविध प्रकारच्या देशी विदेशी फुलांची नेञ दिपक फुलांची सजावट करण्यात आली.

सायंकाळी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरात रुढी परंपरेने सोलापूर येथील शिवलाड तेली समाज बांधवाच्या काठ्या सोबत कोजागिरी पोर्णिमा छबिना काढण्यात आला.



Labels:

शिवमल्हार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील यांचा वाढदिवस साजरा

 


उस्मानाबाद, दि. 31 : उस्मानाबाद जिल्हा शिवमल्हार संघटनेच्या वतीने सांगली जिल्ह्यातील शिवमल्हार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रा.काँ. नेते  संजय पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन व कोजागिरी पोर्णिमा निमित्त शनिवार दि. ३१  रोजी उस्मानाबाद येथील कुष्ठधाम येथील गोर गरीब रुग्ना ना केळी सफरचंद आदीसह अल्पोहाराचे साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी शिवमल्हार संघटनेच्या उस्मानाबादच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती संगिता ढोकळे, सोलापुरच्या शिव मल्हार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सविता वाघमारे, तालुकाध्यक्षा कविता काळे, सुनिता कोळेकर आदीसह माहिला उपस्थित होत्या.

Labels:

तुळजापूर : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सलग 21 व्या वर्षीही महाप्रसाद - अन्नदान वाटप

 


तुळजापूर : कुमार नाईकवाडी

ओम साई माऊली ट्रस्ट तुळजापूर व मुंबई यांच्या वतीने शनिवार दि. ३१  रोजी कोजागिरी पोर्णिमा दिनाचे औचित्य साधुन सलग 21 व्या वर्षीही  श्री देवी भाविकांसाठी महाप्रसाद रुपी अन्नदान वाटप करण्यात आले.

कोविडच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरात देवी भाविकांना बंदी असल्याने प्रतिवर्ष घाटशीळ पायथ्याशी होणारा अन्नदान कार्यक्रम यावर्षी अत्यंत साधेपणाने व मोजक्याच कार्यकर्त्यांसमवेत भवानी रोडवरील दिपक चौक येथे घेण्यात आला. 

श्री देवीच्या महाप्रसाद अन्नदानात खंड पडु नये म्हणून ट्रस्टचे पदाधिकारी चंद्रकांत काळे यांनी यावर्षी श्री तुळजाभवानी मातेच्या सेवेत जे शहरात पोलीस व सुरक्षा कर्मचारी बंदोबस्ताला आले आहेत तसेच शहरात सफाई करणारे कर्मचारी या सर्वांना जागेवर वरण, मसाला भात व शिरा हा प्रसाद पोहच केला व आपली अन्नदानाची सेवा अखंड ठेवली. 

याकामी विपुल काळे, कुमार इंगळे, दत्ता गवळी, गौतम रोचकरी, संजय केवडकर, सतीश पवार व जाधव परिवार यांनी सहकार्य केले. यासाठी संपूर्णपणे सोशल डिस्टन चे पालन करण्यात आले होते.

Labels:

आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त किराणा मालाचे किट व मास्कचे वाटप

 

नळदुर्ग, दि. ३१ : तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार भाजपा नेते  राणाजगजितसिंह पाटिल यांच्या वाढदिवसानिमित्त आज नळदुर्ग शहर भाजपा व युवा मोर्चा वतीने नळदुर्ग शहरातील बसस्थानक येथे येणाऱ्या प्रवाशांना व शहरातील नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोनाचे सावट आहे. तसेच परतीच्या पावसामुळे आलेल्या पुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता वाढदिवस साजरा न करता या परिस्थितीत अडचणीत असलेल्या नागरिकांना मदतीचा हात द्यावे वाढदिवसादिवशी माझ्यासाठीयाच शुभेच्छा असतील असे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत शहर भाजप च्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. 


    कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे कोरोना पूर्णपणे गेलेला नाही अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे त्यामुळे गाफील न राहता प्रवासात किंवा दैनंदिन जीवनात मास्क वापराने गरजेचे आहे. बसस्थानक येथून बसने प्रवास करणारे असंख्य प्रवासी हे विनामास्क दिसत असतात त्यामुळे वाढदिवसाचे औचित्य साधून मास्कचे वाटप करण्यात आले तसेच शहरातील आर्थिक दुर्बल असणाऱ्या कुटुंबास किराणा मालाच्या किटचे देखील वाटप करण्यात आले यावेळी व्यवसाय आघाडी चे जिल्हा संयोजक सुशांत भूमकर, नगरसेवक निरंजन राठोड, दयानंद बनसोडे, व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष धिमाजी घुगे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, सरचिटणीस विशाल डुकरे, संभाजी कांबळे, सरचिटणीस सागर हजारे, बबन चौधरी आदी उपस्थित होते.

Labels:

एसबीआय तर्फे जागतिक बचत दिन साजरा


नळदुर्ग, दि. ३१ : तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ, रामनगर, गायरान तांडा, येडोळा, जखणी तांडा येथे एसबीआय फाउंडेशन मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्या समन्वयाने ग्रामसेवा कार्यक्रमांतर्गत 30 ऑक्टोबर रोजी जागतिक बचत दिनाचे औचित्य साधून रामतिर्थ येथे बचतीचे महत्त्व सांगून एसबीआय बँक शाखा नळदुर्ग तर्फे जनधन खाते उघडणे, प्रधानमंत्री जीवन ज्योति योजनेचे फॉर्म भरणे, विमा, योनो अॅप डाऊनलोड करणे, मुद्रा अंतर्गत कर्ज प्रकरण फॉर्म भरणे, अदि कार्यक्रम घेण्यात आले.

     यावेळी एसबीआय बँकेचे मुख्य व्यवस्थापक (FIDSM) उस्मानाबाद मिलिंद जरीपटके, एसबीआय शाखा नळदुर्ग व्यवस्थापक महेंद्र भोर, दिलासाचे प्रकल्प व्यवस्थापक विलास राठोड, एसबीआयच्या मंगल गवळी, काश्मीरा पाटील, निळकंठ राठोड, csp संचालक इमरान शेख, लबडे, रामतिर्थचे सरपंच बालाजी राठोड, लक्ष्मण राठोड, रामू चव्हाण, गुरूदेव राठोड, अजित राठोड, भूषण पवार, शेषेराव राठोड, योगेश राठोड, सुरेश राठोड, महिला सीआरपी निर्मला राठोड, सीताबाई चव्हाण, वंदना राठोड, मिरा राठोड आदी. महिला बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास राठोड यांनी केले तर आभार बालाजी राठोड यांनी केले.

Labels:

बोरेगाव येथे जनावरांच्या विविध रोगांवर उपचार व लसीकरण शिबीर

 


हन्नुर : नागराज गाढवे

बोरेगाव (ता. अक्कलकोट) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने जनावरांना लाळखुरकत व विविध रोगांवर उपचार आणि लसीकरण करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन सरपंच उमाकांत गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पशुधन अधिकारी डॉ. सचिन मोरे, पशुधन पर्यवेक्षक संतोष कसबे, मनोज वडगावे, शांताराम चव्हाण, गौरीशंकर खांडेकर, बसवणाप्पा पावले, भीम खांडेकर, कलाप्पा औरसंगे, मनोहर बनसोडे यांच्यासह गावातील पशुपालक मोठ्या संख्येने शिबिरात उपस्थित होते.

तसेच या शिबिरामध्ये एकूण 347 जनावरांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी लाळखुरकत या रोगांवर १७८ जनावराना लसीकरण करण्यात आले. वंध्यत्व उपचार म्हणून २३ आणि जनऔषध ८७ जनावरे तसेच गोळी उपचार म्हणून ३२ जनावरे व इतर आजार म्हणून २७ जनावरे यावर उपचार करण्यात आले.

पशुपालकांनी वेळोवेळी पशूंची काळजी घ्यावी.  जून आणि नोव्हेंबर महिन्यात जनावरांना लसीकरण करण्यात येते. पशुपालकांनी दर सहा महिन्यांनी न चुकता जनावरांना हे लसीकरण करावे. यामुळे लाळ खुरकत आणि लहान मोठ्या होणाऱ्या  रोगापासून वाचवता येतो. तसेच वेळोवेळी पशूंना जंतनाशक औषध द्यावे आणि विविध आजारांवर लवकर पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून योग्य ते काळजी घ्यावी.

   - पशुधन डॉ. सचिन मोरे

सद्या तालुक्यात लाळ खुरकत ची साथ जनावरांवर आली आहे. या आजारामुळे अनेक जनावर दगावली आहे. जनावरांना ताप आणि तोंडाला फेस येणे तसेच चारा न खाणे अशी लक्षणे दिसतात. या रोगामुळे जनावरं दगावण्याची शक्यता जास्त असते. याचीच वेळीच उपचार म्हणून ग्रामपंचायतीच्या वत्तीने ही उपचार आणि लसीकरण शिबिराचे मोहीम राबविली आहे.

  - उमाकांत गाढवे, सरपंच बोरेगाव

बंजारा सामाजाचे धर्मगुरु संत रामराव महाराज यांचे निधन

 


मुंबई : बंजारा समाजाचे धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे शुक्रवार दि. 30 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा दिर्घ आजाराने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संत रामराव महाराज हे वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी संस्थानचे प्रमुख होते. 

बंजारा समाजाचे रामराव महाराज यांचा जन्म 7 जुलै 1935 रोजी पोहरादेवी येथे झाला. रामराव महाराज यांना पोहरादेवी जि. वाशिम येथील संत सेवालाल महाराज यांच्या गादीवर वयाच्या 14 व्या वर्षी बसविण्यात आले. त्यांनी सन 1948 मध्ये अन्नत्याग केला होता. त्यानंतर ते फक्त कडूनिंब, दूध आणि फळांचे सेवन करत होते. 

गेल्या काही महिन्यांपासून दूध घेतानाही त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे ते फक्त कडूनिंब आणि ज्यूस घेत होते. मात्र त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना 17 ऑक्टोबरला उपचारासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यामुळे देशभरातील बंजारा समाजावर शोककळा पसरली आहे. दरम्यान आज सोमवारी 31 ऑक्टोबर रोजी त्यांचे वाशिम जिल्ह्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Labels:

Friday, 30 October 2020

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात‍ शुक्रवारी 41 पॉजिटीव्ह; तर दोघांचा मृत्यू

उस्मानाबाद, दि. 30 : उस्मानाबाद जिल्हयात आज शुक्रवार दि. 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 41 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 47 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 14 हजार 680 इतकी झाली आहे. यातील 13 हजार 333 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 525 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 822 जणांवर उपचार सुरु आहेत.






Labels:

बेंबळी : ह. जिंदाशाहवली ह. लालशाहवली दर्गात उरुसानिमित्त मजारवर चादर चढविण्यात आली

उस्मानाबाद : महेश पाटील

ग्रामिण महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान व हिंदू-मुस्लिम बांधवांचे ऐक्याचे प्रतिक असलेल्या बेंबळी ता. उस्मानाबाद येथील हजरत जिंदाशाहवली हजरत लालशाहवली यांच्या ऊर्सानिमित्त दर्गात मजारवर ऊर्स कमिटीच्या वतीने फुलाची चादर चढविण्यात आली. 

यावेळी ऊर्स कमिटीचे अध्यक्ष असद शेख, उपाध्यक्ष महेश पाटील, खजिनदार आसिफ पठाण, सचिव मोईन पठाण, कार्याध्यक्ष बिलाल कोतवाल, सहसचिव समीर जमादार, संघटक आरेफ बरोडे, सहसंघटक अजमेर शेख सरचिटणीस फेरोज कोतवाल, माजी उपसभापती सत्तार शेख, माजी संचालक नवाब पठाण, शिवसेना कक्षप्रमुख मोईनखान पठाण, राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष महंमद कोतवाल, वि.का.सोसायटी चेअरमन सोमनाथ गवळी, संचालक जुनेद शेरीकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हासंघटक मजहर शेरीकर, तुळजापूर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सलमान शेख, वसीम सरकार, अब्दुल्ला जमादार, राजभाऊ नळेगावकर, निजाम कोतव, मुतवल्ली रफातुल्ला शेख आदींची उपस्थिती होती. 

Labels:

तामलवाडी पोलिस ठाण्याचे सपोनि काळे यांची कोरोनावर मात

 


तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांचे दि. ३० रोजी ठाण्यात आगमन होताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून, तसेच फेटा, पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. 

     देशासह राज्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे जनता हैराण झाली होती. या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर तसेच पोलीस हे देवदूत म्हणून जनतेची सेवा करीत असताना या देवदुतानांही कोरोना विषाणुने सोडले नाही.तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांचेही कोरोना अहवाल पाॅजीटिव्ह आले होते परंतु सपोनि काळे व सपोउनि जमदाडे यानी कोरोनावर यशस्वी मात केली असुन जमदाडे हे दि. २७ रोजी कर्तव्यावर पुन्हा रूजू झाले असुन त्यांचेही पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले होते. तसेच कोरोनावर यशस्वी मात करून सपोनि दत्तात्रय काळे यांचे दि. ३० रोजी ठाण्यात आगमन होताच उपस्थित सहकारी, कर्मचारी, नागरीकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचेही स्वागत केले तसेच फेटा, पुष्पहार व शाल घालून सन्मानही करण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे असे सपोनि दत्तात्रय काळे यांनी यावेळी सांगितले. 

     याप्रसंगी शिवसेवक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सर्जेराव गायकवाड, निरंजन करंडे, अप्पा रणसुरे,प्रमोद गुंड,महेश गायकवाड,गुरुनाथ मसुते, भिमा भुईरकर, पोलीस हेड काॅन्स्टेबल गोरोबा गाढवे, आकाश सुरणार, ताटे, जट्टे, गायकवाड, राठोड, ठाकूर,माने,सुनील गवळी तसेच महीला कर्मचारी आदी उपस्थित होते.

Labels:

ऑनलाईन रक्कम हस्तांतरणात वाढीव गेलेली रक्कम हडपणाऱ्यावर गुन्हा दाखल

 


तुळजापूर, दि. 30 : भारत मुरलीधर देवकर, रा. कार्ला, ता. तुळजापूर यांच्या तुळजापूर येथील आडत दुकानावर दि. 26.10.2020 रोजी भिमराव बाबुराव टकले, रा. मानेवाडी, ता. तुळजापूर यांनी सोयाबीन विक्री केले होते. त्याचे 75,000 ₹ मोबदला रक्कम  भारत देवकर यांनी ऑनलाईन पध्दतीने भिमराव टकले यांच्या बँक खात्यावर स्थलांतरीत करतांना अनावधानाने शुन्य जास्त लिहीला त्यामुळे 75,000 ₹ ऐवजी 7,50,000 ₹ अशी रक्कम स्थलांतरीत झाली. अशा प्रकारे 6,75,000 ₹ वाढीव रक्कम भिमराव टकले यांच्या बँक खात्यावर जमा झाली. 

हा प्रकार लक्षात येताच भारत देवकर यांनी भिमराव यांना फोन करुन ही हकीकत सांगीतली व अनावधानाने जास्त दिली गेलेली 6,75,000 ₹ रक्कम परत करण्यास सांगीतले परंतु भिमराव टकले यांनी रक्कम परत करण्यास मनाई केली. अशा मजकुराच्या भारत देवकर यांनी दि. 29.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 406 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

जळकोट येथे काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

 


जळकोट : मेघराज किलजे 

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कायदे मंजूर केल्यानंतर काँग्रेसने शेतकऱ्यांना जनजागृती करून जळकोट येथे स्वाक्षरी मोहीम राबवली.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वेठीस धरणारे कायदे केले आहेत.या कायद्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळणे कठीण होणार आहे. यात खाजगी कंपन्याचा शिरकाव होऊन शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व संपुष्टात येणार असल्याने जिल्हा परिषदेचे सदस्य तथा तालुका समन्वयक प्रकाश चव्हाण, तुळजाभवानी कारखान्याचे संचालक अशोक पाटील यांनी शेतकऱ्यांना जनजागृती करून स्वाक्षरी मोहीम राबवली.

यावेळी नारायण पटणे, कृष्णात मोरे, प्रभाकर कदम, बसवराज कवठे, वजीर शेख, जितू कदम, शिवराम कदम, आनंद सावंत, राजकुमार कदम, शिवराज स्वामी, सुनील माने, प्रकाश कदम, आर.बी. टेलर, विठ्ठल कठोरे, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

महाराष्ट्र उद्योजकता सल्लागार समितीवर भैरवनाथ कानडे यांची निवड

 


नळदुर्ग, दि. 30 : महाराष्ट्र राज्य उद्योजकता  विकास केंद्र ( एम.सी.ई.डी. ) च्या उस्मानाबाद जिल्हा उद्योजकता विकास सल्लागार समितीवर चिकुंद्रा ता. तुळजापूर येथील श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक तथा ज्ञानकिरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ खंडू कानडे यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्रद्वारा जिल्हास्तरावर महाराष्ट्र  उद्योजकता विकास सल्लागार समिती  कक्ष स्थापन करण्यात आला असून  सदर समितीवर शैक्षणिक,  सामाजिक आणि उदयोजकता विकास मार्गदर्शन, व्यावसायिक प्रशिक्षण व संशोधनाशी संबंधित क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची  नियुक्ती करण्यात येते. 

भैरवनाथ कानडे यांनी आजतागायत  शैक्षणिक, सामाजिक कार्याबरोबर उदयोजकता व व्यक्तीमत्व विकास,व्यावसायभिमुख कौशल्य विकास कार्यक्रम, व्यावसाय वृध्दीसाठी भाषा विकास व संवाद कौशल्य, नेतृत्व विकास आदी शासकिय व निमशासकीय पातळीवर होणाऱ्या शिक्षण,प्रशिक्षण आणि संशोधनात्मक कार्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. 

संबधित क्षेत्रातील त्यांचा अनुभव विचारात घेवून  सदर समितीवर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा महाव्यवस्थापक , जिल्हा उदयोग केंद्र उस्मानाबाद व प्रकल्प अधिकारी , महाराष्ट्र उदयोजकता विकास केंद , उस्मानाबाद यांनी कळविले आहे. या निवडीबददल कानडे यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Labels:

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून तामलवाडी येथे सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. तामलवाडी पंचायत समितीचे सदस्य दत्ता शिंदे यांच्या संकल्पनेतून तामलवाडी पंचायत समिती मतदारसंघात येणाऱ्या सांगवी (का), सुरतगाव, तामलवाडी, पिंपळा बुद्रुक, देवकुरुळी, पिंपळा खुर्द, गावातील ग्रामपंचायत शिपाई व पाणीपुरवठा शिपाई यांना बॅटरी, बूट, हॅन्ड ग्लोज, मास्क व शाल इत्यादी वस्तू चे वाटप केले. 

कोरोना महामरीच्या  काळात आपल्या जीवाची पर्वा न करता गावातील लोकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आपले गाव स्वच्छ ठेवले. पाणी पुरवठा शिपाई गावाची तहान भागवण्यासाठी रात्री-अपरात्री कधीही गाव विहिरीवर जाऊन आपला जीव धोक्यात घालून पाणीपुरवठा सुरळीत करतात.त्यामुळे आज त्यांना सुरक्षाकवचचे वाटप करण्यात आले. 

या  कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी सौ.सुषमाताई शहाजी लोंढे, तर प्रमुख पाहुणे तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तामलवाडीचे माजी सरपंच  दत्तात्रय वडणे यांच्या हस्ते सेवा देणाऱ्या, सांगवी (का) येथील पाणी पुरवठा शिपाई महादेव माळी, ग्रामपंचायत शिपाई रघुनाथ मगर, सुरत गावचे सौदागर गुंड,राजकुमार गुंड, देवकुरुळीचे त्रिमूर्ती नवगिरे, जालिंदर गायकवाड, पिंपळा बुद्रुक पोपट शिरसाट, संजय डोलारे, पिंपळा खुर्द पोपट कदम,वसंत परीट, व तसेच तामलवाडी चे दस्तगीर पटेल, व शिवाजी माळी, या सर्व कर्मचाऱ्यांना सेफ्टी किट देऊन,शाल,पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मल्लिकार्जुन मसुते, भास्कर पवार, आब्बास पटेल, ज्ञानेश्वर माळी, देविदास म्हमाणे, प्रशांत राऊत, रामलिंग सगर, मारूती रोकडे, श्रीकांत गायकवाड, बाळू रणसुरे, शशिकांत गायकवाड  उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सिध्देश्वर मसुते यांनी केले.

Labels:

किसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी गौरीशंकर मुळे

जळकोट : मेघराज किलजे 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या किसान काँग्रेस विभागाच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी बोरगाव तुपाचे (ता. तुळजापूर) येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते गौरीशंकर सिद्रामप्पा मुळे यांची नियुक्ती झाली आहे.

किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून मराठवाडा अध्यक्ष ऍड. माधव जाधव यांनी गौरीशंकर मुळे यांची  उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांचे काँग्रेस पक्षाची ध्येय, धोरणे व विचार तळागामध्ये पोचविण्यासाठी व घराघरांमध्ये काँग्रेस पक्षाचा विचार पोचविण्यासाठी व देशहित, समाजहित व शेतकरी, शेतमजूर यांच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी प्रयत्न करावेत. असे मुळे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

या निवडीबद्दल उस्मानाबाद जिल्ह्यातून पक्ष पदाधिकारी, नेतेमंडळी व कार्यकर्त्यांमधून गौरीशंकर मुळे यांचे अभिनंदन होत आहे.

Labels:

मानवापेक्षा पक्ष्यांना निसर्गाचा अचूक ज्ञान; अतिवृष्टीतही पक्ष्यांचे घरटी तग धरून उभे

चिवरी : राजगुरू साखरे

स्वतःला बुद्धिवादी समजणाऱ्या माणसालादेखील निसर्गाचा नीटसा अंदाज नाही. परंतु पक्ष्यांना मात्र या निसर्गाचा अचूक अंदाज माहीत असावा असे वाटते. यंदाच्या वर्षी जास्त पाऊस काळ असल्याचे पक्ष्यांना ज्ञान होते. त्यामुळे तर विविध जातीच्या पक्षांनी तालुक्यातील धरणाच्या, तलावाच्या, विहिरीच्या, ओढ्याच्या काठी तळ ठोकला होता. तर चिमण्यांनी आणि सुगरण पक्षांनी आपली घरटी विहिरीत डोकावणाऱ्या झाडावर न बांधता ती वादळी वार्याच्या पावसापासून वाचवण्यासाठी उंच झाडाच्या फांदीवर बांधले असावीत.

निसर्गाचा अचूक अंदाज करणे भल्याभल्यांना जमला नाही. हवामान अंदाज सांगणाऱ्याचा देखील अंदाज बऱ्याच अंशी चुकीचा ठरू शकतो. गेल्या अनेक वर्षी पाहायला न मिळालेल्या मान्सूनच्या सरी तुळजापूर तालुक्यात जोरात बरसल्या. याचा बहुतेक अंदाज कितपत  नवाला कोणाला होता माहित नाही , परंतु जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच सर्व पक्षांनी घरटी बांधायला सुरुवात केली होती. वादळ वारा आणि पावसाच्या सरी आणि विहिरी, नद्या ,तलाव,ओढे यांना येणारे पुराचे पाणी यापासून सुरक्षित अशी ही घरटी बांधली. 

इतर वेळी विहिरीच्या आत मध्ये डोकावणाऱ्या झाडावर, तळ्याकाठच्या झाडा झुडपावर बांधली जाणारी घरटी यंदा मात्र उंच झाडाच्या शेंड्यावर सुरक्षित अशा ठिकाणी आपली घरटी बांधलेली दिसून आले. जिथे वादळी वारा, पुराचे पाणी या नैसर्गिक आपत्तीपासून बचावण्यासाठी सुरक्षित अशी घरटी बांधले होते. यावरून असे लक्षात येते की मानवापेक्षा पक्ष्यांना निसर्गाचे अंदाज चांगला येतो. 

चालू वर्षी चिञा नक्षञात तर अतिवृष्टी झाली. त्यामुळे मानवनिर्मित अनेकांचे घरे वादळ वारा व पावसाने पडली, अनेक जनावरे मरण पावली तर शेतीचे तर अतोनात नुकसान झाले. मात्र अशा परिस्थितीत देखील  पक्ष्यांनी जून महिन्यात बांधलेले घरटी आज देखील सुस्थितीत आहेत. त्यामुळे मानवाने निसर्गाचा अंदाज घ्यायचा असेल तर प्राणी व पक्षांच्या हालचालींवर नजर ठेवायला हवे, असे वाटते.

Labels:

इटकळ येथे देवीभक्त आराधी महिलांना फराळाचे वाटप

 


नळदुर्ग : एस.के.गायकवाड

श्री तुळजाभवानी देवीचे भक्त, उपवास करणाऱ्या आराधी महिलांना इटकळ ता. तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कृषी उत्पादन बाजार समिती तुळजापुरचे संचालक अरविंद पाटील यांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले.

यावर्षी कोरोना महामारीमुळे तिर्थक्षेत्र श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात नवरात्र निमित्ताने महाराष्ट्रासह परराज्यातील लाखोंच्या संख्येने भरणारी यात्रा भरविण्यात आली नाही. कोजागिरी पोर्णिमेच्या निमित्ताने मंदिरात व मंदिर परिसरात होणारी भाविक भक्तांची मोठी गर्दी कोरोनामुळे झालीच नाही. प्रत्येकानी शक्यतो घरीच देवीची पुजा करून नवरात्र उत्सव साजरा केला. इटकळ येथील सामाजीक कार्यकर्ते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद पाटील यांनी देवीच्या नावाने उपवास करणाऱ्या देवीभक्त महिलांना मोफत फराळाचे वाटप केले. यावेळी ग्रामस्था, कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels: ,

महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून मुक्ती मिळावी यासाठी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान करणार जनजागृती

 


नळदुर्ग, दि. 30 : रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान हे गेली अनेक दिवसांपासून महिलांचे प्रश्न, अडीअडचणी, माहवारी शाप की वरदान, तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा याबद्दल महिलांमध्ये जागृती निर्माण करणे, याकरिता शाळा-कॉलेज, तसेच महिला बचतगट यांकरिता प्रतिष्ठानच्या वतीने वेळोवेळी शिबिराचे आयोजन केले जात आहे.

महिलांना हिंसाचारापासून सुरक्षितता देणे, त्यांना घरात सुरक्षितता लाभावी व त्यांना बेघर केले जाऊ नये,तसेच महिलांच्या आधिकाराची कडक अंबलबजावणी व्हावी ही काही महत्वाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान काम करत आहे.

पीडित महिला या आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्थानकात जात असतात.अशा समस्त महिलांना मदतीचा हात देणेकामी, समोपदेशन करण्यासाठी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान सदैव सेवेची ठायी तत्पर आहोत असे सांगण्यात आले.

प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अश्विनीताई महांगडे यांनी या उपक्रमाची सुरुवात प्रथम सातारा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते आणि पोलीस उपनिरीक्षक वाई उपविभाग अजित टिके यांची भेट घेऊन त्यांना एक पत्र देऊन विनंती केली. त्यांनतर रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या टीमच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व पोलीस स्थानकाला हे पत्र देऊन विनंती करण्यात आली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील  रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे सदस्य राम जळकोटे  यांनी तुळजापूर तालुका पोलिस स्टेशन मध्ये प्रतिष्ठान च्या महीलांविषयी समस्या, अत्याचार या विषयी जनजागृती व शिबीरं घेणे या उपक्रमाची माहिती तसेच पोलीस स्टेशल ला आलेल्या महिलांविषयी केसची माहीती प्रतिष्ठानला देणेबाबत अशा सर्व उपक्रमांची माहीती देत पत्र दिले. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी  यांनी पत्र वाचून उपक्रमाला आम्ही सहकार्य करू असे आश्वासन दिले व शुभेच्छा दिल्या.

प्रत्येक माणसाच्या तोंडात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असते पण मात्र तेच शिवविचार आपण आपल्या रोजच्या जीवनात आमलात आणतो का हा प्रश्नच आहे. स्त्रियांचा आदर करण्याचा संस्कारच आपल्याला छत्रपती शिवाजी  महाराजांनी दिला असून त्याची आठवण सर्वानी ठेवली पाहिजे. महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. असा पीडित महिलांना हिंसाचार विरोधात लढणे,रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान हे वेळोवेळी मदत करत आहेत आणि राहिलंच असा विश्वास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अश्विनीताई महांगडे, उपाध्यक्ष निलेश जगदाळे, प्रवक्ते प्रमोद कारकर, यांनी पोलीस स्टेशन तसेच पीडित महिलांना दिला.

समाजात तळागाळात जाऊन काम करीत असताना बहुतांश महिला "कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे  संरक्षण कायदा २००५ नियम २००६ या कायद्याबाबत अनभिज्ञ असल्याचे आढळून येत आहे. सदर संरक्षण कायद्याची संपूर्ण माहिती देणे कामी प्रतिष्ठानने आजवर अनेक शिबिराचे आयोजन ही केले आहे. येथून पुढे सुद्धा करीत राहू असे आवाहन रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्षा अश्विनीताई महांगडे यांनी केले आहे. यानंतर  प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या उपक्रमासाठी आपल्या स्थानिक पोलीस स्टेशन ला पत्र देऊन विनंती करायला सुरुवात केली आहे.


Labels:

शासनाने दिशा कायदा लागू "करावा उस्मानाबाद जिजाऊ ब्रिगेडची मागणी


उस्मानाबाद - आंध्र प्रदेश सरकारने महिलांच्या  सुरक्षितेच्या दृष्टीने दिशा हा कायदा लागू केलेला आहे.  दिशा कायद्यानुसार पिडीतांना लवकर न्याय मिळणार आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील दिशा कायदा लवकरात लवकर लागू करून महिलांना न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही याची हमी देण्याची मागणी उस्मानाबाद जिजाऊ ब्रिगेडची जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे केली आहे.

 जिजाऊ ब्रिगेड जिल्हा पदाधिका-यानी   निवेदनात पुढे म्हटले आहे की,   दिवसें दिवस महिलांवरील अत्याचा-याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे जन्मलेल्या मुलींचे देखील भविष्य सुरक्षित राहिलेले नाही. ही पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबाला अन्याय होऊन देखील न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागते आणि न्यायालयात आपली पावले झिजवावी लागतात. त्यामुळे समाजात महिलांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. . निवेदन देतांना उस्मानाबाद  जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष किरण निंबाळकर, बाबई चव्‍हाण, मीना सोमाणी,रुपाली घाडगे,आशा लांडगे इत्यादी उपस्थित होते.

Labels:

अचलेर येथील बालाजी पुजारी यांचे निधन


अचलेर : लोहारा तालुक्यातील अचलेर येथील युवक बालाजी बाबुराव पुजारी वय ३५ वर्षे यांचे शुक्रवार दिनांक ३० रोजी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक भाऊ,पत्नी, एक लहान मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता अचलेर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांचे मोठे बंधू भीमाशंकर बाबुराव पुजारी यांनी सांगितले आहे.या तरुण युवकाच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Labels:

Thursday, 29 October 2020

दुचाकी खरेदीप्रकरणी 68 हजाराचे ऑनलाईन फसवणूक; एकाविरुध्द गुन्हा दाखल



नळदुर्ग, दि. 29 : केशेगाव ता. तुळजापूर येथील एकास मोटारसायकल खरेदी घेण्याच्या प्रकरणात सुमारे 68 हजार रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी एका विरुध्द नळदुर्ग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जुनी मोटारसायकल स्वस्त दरात विक्रीस असल्याची जाहिरात फेसबुकवर बघुन सोमेश्वर नागनाथ स्वामी, रा. केशेगांव, ता. तुळजापूर यांनी ती खरेदी करण्यासाठी त्या संबंधीत व्यक्तीशी संपर्क साधला. त्या व्यक्तीने वेळोवेळी सांगीतल्या प्रमाणे दि. 26 ते 30.08.2020 या कालावधीत सोमेश्वर स्वामी यांनी गुगल पे, फोन पे या ऑनलाईन प्रणालीतून एकुण 66,800 ₹ त्या व्यक्तीस पाठवले. त्यानंतर त्या व्यक्तीने सोमेश्वर स्वामी यांना आजपावेतो मोटारसायकल दिली नाही व रक्कमही परत न करता स्वामी यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या सोमेश्वर स्वामी यांनी काल दि. 28.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी), 66 (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. 

Labels:

भूम : ऑनलाईन 60 हजार रुपयाची फसवणूक

 


भुम, दि. 29 : बँकेच्या खात्यातील 60 हजार रुपये ऑनलाईन काढून अज्ञाताने एकाची फसवणूक केल्याची घटना भुम येथे घडली असून याप्रकरणी पोलीसात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ऋषीकेश सुनिल नवले, रा. विद्यानगर, भुम यांच्या फोनवर दि. 31.03.2020 रोजी अनोळखी मोबाईल फोनवरुन एक लिंक आली होती. या लिंकच्या वैधतेविषयी खात्री न करता नवले यांनी त्या लिंकवर व्यक्तीगत बँक खाते, पासवर्ड भरला तसेच आलेला ओटीपी संदेश समजून न  घेता ओटीपी भरला यावर लिंक पाठवणाऱ्या समोरील अज्ञात मोबाईल धारकाने नवले यांच्या खात्यावरील 60,000 ₹ रक्कम फोन पे द्वारे ऑनलाईन वळती केली. यावर नवले यांनी त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधुन पैसे परत मागीतले असता त्या अज्ञात व्यक्तीने त्यांना 10,000 ₹ ऑनलाईन पध्दतीने परत करुन उर्वरीत रक्कम लवकरच परत करेल, असे आश्वासन दिले. यावर नवले यांनी ती रक्कम परत मिळेल याची वाट पाहीली परंतु आजतागायत त्या अनोळखी व्यक्तीने बाकी असलेली 50,000 ₹ परत न करता नवले यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या ऋषीकेश नवले यांनी काल दि. 28.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Labels:

आमदार सतिश चव्हाण यांचा तुळजापूर तालुक्यात संवाद

 


नळदुर्ग / तुळजापूर, दि. 29 : नळदुर्ग येथील कला व वाणिज्य महाविद्यालयास आज मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी सदिच्छा भेट देऊन प्राध्यापक, शिक्षक, पदवीधर मतदारांशी संवाद साधला. 

यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, सचिव उल्हास बोरगावकर, संस्थेचे संचालक रामचंद्र आलूरे, सहसचिव शहबाज काझी, डॉ. रमेश दापके, प्राचार्य संजय कोरेकर, नितीन बागल, सतीश इंगळे, किशोर सांळुके, उपप्राचार्य रामदास ढोकळे, प्रा. अंकुश कदम आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांनी केले.

याप्रसंगी आमदार सतीश चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीसोबत संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही दिली. यानिमित्ताने अध्यक्षीय समारोप माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी करताना उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रश्नासाठी आमदार सतीश चव्हाण हे चांगले अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याचे सांगून येणाऱ्या काळात या भागाचे आमदार चव्हाण यांना सहकार्य असेल असे सांगितले. सूत्रसंचालन व आभार संतोष पवार यांनी केले.

Labels:

नळदुर्ग : अर्भकास बेवारस सोडणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल



नळदुर्ग, दि. 29 : अर्भकाच्या पालनपोषणाची जबाबदारी टाळण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने नुकत्याच जन्मलेल्या पुरुष जातीच्या अर्भकास बाभळगांव येथील पुलाखालील रस्त्याच्या बाजूस दि. 28.10.202 रोजी 15.00 वा. सु. त्या अर्भकास उघड्यावर सोडले होते. अशा मजकुराच्या नळदुर्ग पो.ठा. च्या महिला पोलीस- सुवर्णा गिरी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 317 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवार दि. 28 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फुलवाडी ता. तुळजापुर येथील टोल नाका या ठिकाणी पेट्रोलींग करत असताना बालाजी हिप्परगे ड्रायव्हरचे लक्ष्य  फेकलेल्या नवजात बाळाकडे गेले. सदरील बाळ हे पिशावीत होते. या पिशवीतुन रडण्याचा आवाज येत असल्याने सदरील पिशवी उघडुन पाहिली असता या पिशवीत नुकतेच जन्मलेले बाळ आढळुन आले.  या बाबत तात्काळ नळदुर्ग पोलीस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळात नळदुर्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी पिशवी पाहिली असता सदरील बाळ हे जखमी अवस्थेत होते. भुकेने रडत असल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी यांनी स्वःताचे दूध पाजले. या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे मातृत्व जागे झाले रडणारे बाळ पाहुन मन हेलावले म्हणुन या महिला कर्मचारी यांनी स्वःताचे दुध पाजुन मातृ धर्म निभावला त्यामुळे बाळाचे प्राण वाचवले.

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात दक्षता सप्ताहनिमित्त भ्रष्टाचार निर्मूलन शपथ

 


तुळजापूर : कुमार नाईकवाडी 

येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सतर्क भारत समृद्ध भारत याअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर जगदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी दुपारी महाविद्यालयात सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलन संदर्भात शपथ देण्यात आली. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. श्यामकांत डोईजोडे यांनी केले तर आभार उपप्राचार्य रवी मुदकना यांनी मानले. यावेळी प्रबंधिका सुजाता कोळी, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी सोशल डिस्टन्सचे नियमानुसार पालन करण्यात आले.

Labels:

अक्कलकोट : पितापुर येथील पुरग्रस्थांना अन्नधान्य वाटप

 


हन्नुर  : नागराज गाढवे

अक्कलकोट तालुक्यातील पितापुर येथील पुरग्रस्थांना चप्पळगांव येथील श्री महालक्ष्मी प्रतिष्टान आणि दानशूर व्यक्तींनी अन्नधान्य वाटप केले.

पितापुर ता. अक्कलकोट येथील हरणा नदीला पूर आल्याने गावात प्रत्येकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. गावातील साडेपाचशे लोकांना स्थलांतर करण्यात आले. घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने नागरिकांचे उपासमार होत असल्याने चप्पळगांव येथील श्री महालक्ष्मी प्रतिष्टान आणि दानशूर व्यक्ती यांनी स्थलांतरित लोकांना अन्नधान्य वाटप केले. 

यासाठी बोरे गाव येथील सहकारी सोसायटी अध्यक्ष सिद्रामप्पा खेड, आडत व्यापारी निलेश धनशेटटी, ग्रामपंचायत सदस्य आशपाक हवालदार, चप्पळगांव येथील प्रकाश खैराटे, प्रदिप वाले, आप्पाराव म्हमाणे, प्रथमेश जोजन, लायक बागवान, आदींनी सहकार्य केले.

यावेळी श्री महालक्ष्मी प्रतिष्टानचे स्वप्नील बणजगोळे यांनी पितापुर आणि सांगवी येथे नदीचे पाणी गावात शिरल्यामुळे अनेक नागरीकांचे संसार उघड्यावर पडले आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची उपासमार होत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने मदत केली असल्याचे सांगितले.

श्री महालक्ष्मी प्रतिष्टान आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी सहकार्य केल्याने दिलासा मिळाला आहे, असे पितापुर आणि सांगवी येथील स्थलांतरित नागरिकांनी सांगितले. श्री महालक्ष्मी प्रतिष्टान आणि दानशूर व्यक्तींनी केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे.

Labels: