Thursday, 31 October 2024

१६४ उमेदवारांचे २२३ नामनिर्देशनपत्र वैध तर ४८ नामनिर्देशन अवैध १८५ उमेदवारांनी दाखल केले होते २७१ नामनिर्देशनपत्र


१६४ उमेदवारांचे २२३  नामनिर्देशनपत्र वैध तर ४८ नामनिर्देशन अवैध १८५ उमेदवारांनी दाखल केले होते २७१ नामनिर्देशनपत्र

 

धाराशिव दि.३० (माध्यम कक्ष) 

 विधानसभा सार्वत्रिक निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी प्रक्रिया आज ३० ऑक्टोबर रोजी पार पडली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा २९ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस होता.या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात १८५ उमेदवारांनी २७१ नामनिर्देशनपत्र दाखल केले.यापैकी चार विधानसभा मतदारसंघातून १६४ उमेदवारांचे २२३  नामनिर्देशनपत्र वैध तर ४८ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहेत. दि.३० ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची छननी करण्यात आली.

२४० - उमरगा विधानसभा मतदारसंघातून एकूण प्राप्त ३२ उमेदवारांच्या ४३ नामनिर्देशनपत्रापैकी ३४ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहे.तर ९ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहे. प्राप्त नामनिर्देशनपत्रामध्ये २८ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहे. ४ नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले आहे.

शेवटच्या दिवशी २९ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातून १८५ उमेदवारांनी २७१ नामनिर्देशनपत्र दाखल केले. यामध्ये उमरगा विधानसभा मतदारसंघातून ३२ उमेदवारांनी ४३, तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ५४ उमेदवारांनी ८७, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून ५० उमेदवारांनी ७१ आणि परंडा विधानसभा मतदारसंघातून ४९ उमेदवारांनी ७० नामनिर्देशनपत्र दाखल केले.

२४१ - तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ५४ उमेदवारांनी ८७ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यापैकी ७७ नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहे. तर १० नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहे.वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची संख्या ५१ इतकी आहे तर ३ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले आहेत.

 

२४२ - उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात ५० उमेदवारांनी ७१ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५५ नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत.तर १६ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत.वैधरित्या नामनिर्देशित झालेले ४३ उमेदवार असून ७ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले आहेत.

 २४३ - परंडा विधानसभा मतदार संघात ४९ उमेदवरांनी ७० नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले होते.त्यापैकी ५७ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.तर १३ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहेत. यातील ४२ उमेदवार हे वैधरित्या नामनिर्देशित झाले आहेत तर ७ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले आहेत.

आज ३० ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी दुपारी पार पडली.छाननी प्रक्रियेनंतर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहेत.२० ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील १ हजार ५२३ मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

Labels:

Wednesday, 30 October 2024

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी शक्ती प्रदर्शन करत अखेरच्या क्षणी अपक्ष उमेदवारी केले दाखल

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी शक्ती परीक्षण करत अखेरच्या क्षणी अपक्ष उमेदवारी केले दाखल

तुळजापूर ,दि.३०: शिवाजी नाईक 

 तुळजापूर विधानसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी मंगळवारी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तुळजापुरात  मोठे शक्तिप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी दाखल केली.


काँग्रेस पक्षाने माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना तुळजापूरची उमेदवारी न दिल्याने त्यानी  निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तुळजापुरात भव्य रॅली काढून मोठे शक्तिप्रदर्शन करीत आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले.

सात दशकांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ  राहिलेल्या , पाचवेळा आमदार म्हणून भुषविलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी मंगळवारी तुळजापुरात भव्य रॅली काढून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण ही निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी यावेळी घोषित केले.रॅलीनंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना चव्हाण  म्हणाले की,७० वर्ष ज्या पक्षाची सेवा केली, कुटुंबापेक्षा ही पक्षाला जपले, वाढवले,  त्याच पक्षाने मला एकनिष्ठतेचे फळ म्हणून की काय मला  विश्वासात न घेता, कुठलेही कारण न सांगता उमेदवारी दिली नाही, आज त्यांना सोडून केवळ कार्यकर्त्यांच्या इच्छे खातर मी ही निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्धार पक्का केला. कार्यकर्त्याच्या जीवावर  ही निवडणूक जनतेच्या हितासाठी आपण लढवणार आहे. ५ वेळा जनतेनी मला मोठे मताधिक्य देऊन या मतदार संघातून विजयी केले असून याही वेळी नक्कीच जनता मलाच निवडून देणार असा विश्वास माजी  चव्हाण यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांना हा निर्णय घेताना चव्हाण भावनिक झाले होते. या वेळी एका,मुस्लिम महिला कार्यकर्तीने १०हजार रुपये,तर अणदूर चे मनोज मुळे व ढोबळे गुरुजींनी ५ हजार रुपये साहेबांना निवडणूक निधी म्हणून सुपूर्त केला.

यावेळी मुकुंद डोंगरे, ऋषिकेश मगर, डॉ नागनाथ कुंभार, बाबुराव चव्हाण,प्रकाश चव्हाण, अरुण दळवी, शरणाप्पा कबाडे,आझर मुजावरसह मधुकरराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक ,पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपल्या भाषणात काँग्रेसने माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना उमेदवारी नाकारुन  अन्याय केला असून चव्हाण यांनी तुळजापूर विधानसभा निवडणूक लढवावी अशी विनंती केली, 

यावेळी व्यासपीठावर,अशोक पाटील, लक्ष्मण सरडे, दिलीप सोमवंशी ,अशोक मगर, लक्ष्मण शिंदे, साधू मुळे , चव्हाण समर्थक उपस्थित होते. याप्रसंगी आबा तोडकरी, सुनील रोचकरी, सिद्धू मुळे, धनराज मुळे, आप्पू धमुरे, संगप्पा हगलगुंडे, गौरीशंकर कोडगिरे,अख्तर काझी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित हंगरकर यांनी केले.

  

Labels:

Tuesday, 29 October 2024

पृथ्वीराज केवलचंदजी जैन यांचे निधन

पृथ्वीराज केवलचंदजी जैन यांचे निधन 

सोलापूर,दि.२९ :

 श्री पृथ्वीराज केवलचंदजी जैन यांचे अल्पशा आधाराने  निधन झाले आहे.ते  सोलापूर युनिटी मल्टिकॉन्स प्रा.लि कंपनीचे  दिवंगत संचालक भरत जैन यांचे वडील होत.त्याच्या पश्चात सुन युनिटीच्या संचालिका वैशालीताई भरत जैन, मुलगा  श्री सुहास जैन, दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.

अंत्ययात्रा मंगळवार दि. 29 ऑक्टोंबर रोजी सकाळी10:30 वाजता निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांच्या आत्म्यास चिरशांती व सद्गती लाभो हीच युनिटी परिवारातर्फे ईश्वरचरणी प्रार्थना व अखेरचा निरोप. त्यांच्या परिवारास या दुःखद समयी या परिस्थितीतून सावरण्याचे ईश्वर त्यांना बळ देवो अशी श्रध्दाजली शोकाकुल युनिटी  मल्टीकॉन्सचे मुख्य संचालक  कफील श. मौलवी श्री जयधवल अ. करकमकर व परिवारानी वाहिली.




Labels:

Monday, 28 October 2024

पक्षाने पुनर्विचार करून पुन्हा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना उमेदवारी देण्याची समर्थकांची मागणी

अणदूर,दि.२८

महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना तुळजापूर विधानसभेची उमेदवारी न दिल्याने  चव्हाण यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे सोमवार दि.२८ ऑक्टोंबर रोजी तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथे पहावयास मिळाले.यावेळी अनेक नागरिकांच्या भावना अनावर झाल्या होत्या.


पक्षाने पुनर्विचार करून पुन्हा चव्हाण यांनाच उमेदवारी द्यावी, नाहीतर मधुकरराव चव्हाण यांनी आता सयंमाने न घेता आपला अपक्ष फॉर्म भरावा जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त करीत अणदूर व परिसरातील शेकडो समर्थकांनी  चव्हाण यांच्या घरी जाऊन विनंती वजा मागणी केली.  

तुळजापूर विधानसभा मतदार संघात काँग्रेसने ॲड धिरज पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अणदूर व परिसरातील जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. त्याचाच एक भाग म्हणून शेकडो नागरिकांनी सोमवारी सकाळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण  यांच्या अणदुर ता.तुळजापूर येथिल निवासस्थानी त्यांची भेट घेऊन आता माघार घ्यायची नाही, असा निर्धार व्यक्त केला. या वेळी चव्हाण  यांनी योग्य निर्णय घेऊ आपण शांत रहावे असे सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी  ॲड. विशाल शेटे, माजी सरपंच धनराज मुळे, शरणप्पा कबाडे, अणदूरचे उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार, ग्रामपंचायत सदस्य डॉ विवेक बिराजदार यांची भाषणे झाली. 

 भाषणात काँग्रेस पक्षाने घोषित केलेली उमेदवारी बदलून मधुकरराव चव्हाण यांना घोषित करावी, नाहीतर  ही निवडणूक अपक्ष लढवावी. संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, तसेच उद्या हजारोंच्या संख्येने नागरिक बंधू भगिनींनी तुळजापुरात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा करण्यात आली. 

याप्रसंगी आप्पू धमुरे, संतोष दादा मुळे, संगप्पा हगलगुंडे, बाबुराव मुळे, कारबसपा धमुरे, मधुकर बंदपट्टे, खंडू मुळे, सुधीर ठाकूर आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Labels:

Sunday, 27 October 2024

बहुचर्चित , सर्वांचे लक्ष वेधलेल्या तुळजापूर विधानसभेची काँग्रेसकडून ॲड धिरज पाटील यांना अखेर उमेदवारी जाहीर

बहुचर्चित व सर्वांचे लक्ष वेधलेल्या तुळजापूर विधानसभेची  काँग्रेसकडून ॲड  धिरज  पाटील यांना अखेर उमेदवारी जाहीर 

नळदुर्ग,दि.२७: 
बहुचर्चित व सर्वांचे लक्ष वेधलेल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी शनिवार रोजी उशिरा महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाकडून अखेर उमेदवारी जाहीर करून ॲड कुलदीप ऊर्फ धीरज आप्पासाहेब कदम -पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.तर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका यापुढे काय असणार याबाबत मतदारसंघात चर्चा रंगली आहे. काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी आघाडीवर असलेल्या अशोक जगदाळे यांच्या ही भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याकरिता अवघे काही दिवस राहिल्याने शनिवार दि. 26 ऑक्टोबर रोजी  काँग्रेस पक्षाने 16 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यामध्ये ॲड धिरज पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे समजताच महाविकास आघाडीच्या समर्थकांनी नळदुर्ग शहरात फटाक्याची  आतीषजी करून पक्षाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. निवडणुकीच्या मैदानात महायुती भाजपचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील विरुद्ध महाविकास आघाडी काँग्रेसकडून जाहिर  करण्यात आलेल्या ॲड धिरज पाटील यांच्यात लढत होणार असली तरी राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे, अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी निवडणुकीपूर्वीच मतदारसंघ ढवळून काढले आहे.

  माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या वयाचे कारण पुढे करीत त्यांना उमेदवारी नाकारली आहे. मधुकरराव चव्हाण व अशोक जगदाळे यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले आहे. पाच वेळेस आमदार राहिलेले व एक वेळेस विधानसभा लढविलेल्या मधुकरराव चव्हाण यांना काँग्रेसने संधी दिली नाही. चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरत प्रचार सुद्धा सुरू केल्याचे सर्वश्रुत आहे.      

 काँग्रेस पक्षाने राज्यातील पहिल्या 48 उमेदवारांच्या व दुसऱ्या 23 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये तुळजापूर मतदारसंघाची उमेदवाराचे नाव नव्हते. मात्र तिसऱ्या 16 उमेदवार यांच्या यादीत तुळजापूर मतदार संघातून धीरज कदम यांना उमेदवारी घोषित केली. काँग्रेसने आतापर्यंत 86 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाकडून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील विश्वास शिंदे हे इच्छुक होते. त्यात कदम पाटील यांनी बाजी मारली.यापूर्वी दोन पाटील मध्ये एका कार्यक्रमात वाद निर्माण झाला होता. सध्या तरी तुळजापूर  विधानसभा निवडणुकीत पाटील विरुद्ध पाटील अशी लढत रंगणार असल्याचे दिसत असले तरी उमेदवारी अर्जाची छाननी होऊन , माघारी घेतल्यानंतर  प्रचाराला सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार असणार, प्रचारात कोण बाजी मारणार त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल.

Labels:

Saturday, 26 October 2024

दिवाळीच्या शुभेच्छा पत्रातून विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती ; छोट्यांचे मोठे काम - पारंपारिकता जपत सामाजिक योगदान


दिवाळीच्या शुभेच्छा पत्रातून विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती

पिंपळ्यातील छोट्यांचे  मोठे काम - पारंपारिकता जपत सामाजिक योगदान

तुळजापूर,दि.२६ :

सध्या महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे तर समाज जीवनात दिवाळीच्या उत्सवाची संपूर्ण तयारी ही सुरू असल्याचे आपणास पहावयास मिळते . पिंपळा खुर्द तालुका तुळजापूर येथे या दोन्ही बाबींचा सुंदर मिलाफ साधणारा दिवाळीच्या शुभेच्छा पत्रातून मतदान जनजागृती करणाऱ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षक श्री विठ्ठल नरवडे यांच्या कल्पनेतून मुलांना आनंद देणाऱ्या व कल्पकत्तेला उधाण आणणारा हा उपक्रम राबवण्यात आला . या उपक्रमाचे केंद्रप्रमुख साधना चव्हाण व मुख्याध्यापक देविदास गायकवाड यांनी कौतुक केले आहे .
नवनिर्मिती ही मुलांना आनंद तर देतेच शिवाय आत्मविश्वास ही प्रदान करते . कल्पनाशक्तीला मूर्त रूप अशाच उपक्रमातून येते . सांस्कृतीक वारसा व परंपरा जपत सामाजिक ऐक्याचे ऋणानुबंध शुभेच्छाच्या माध्यमातून दृढ होतात . नात्यातील व्यक्तींना दिवाळीच्या गोड शुभेच्छा देत मुलांनी थोरांना मतदान करण्याचे आवाहनही केले . "मतदान तुमचे - भविष्य आमचे "  अन्  "तुमच्या हाताने माझे भाग्य घडवा" अशी भावनिक साथ मुलांनी या पत्रातून घातली आहे . लोकशाहीच्या बळकटीसाठी निवडणूक आयोगाकडून मतदान जनजागृती केली जाते . यात पिंपळा खुर्द येथील मुलांनी शुभेच्छा पत्रातून मतदानाचे महत्त्व व मतदान जनजागृतीचा संदेश पाठवला आहे .

दिवाळीचा उत्सव फटाके ,फराळ व आकाश दिव्याने संपन्न होतो तर सशक्त व सक्षम लोकशाहीचा उत्सव हा प्रत्यक्ष मतदानाने साजरा करावा असे आवाहन मुलांनी केले .सण हे केवळ उत्सव साजरे करण्यापुरते मर्यादित नसतात , त्यांचा वापर समाजात सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी करता येतो . या गोष्टीची प्रचिती अशा उपक्रमातून येते .एक वेगळा दृष्टिकोन जपत पारंपारिक सण व मतदान जागृती याचा अनोखा समन्वय यातून साधला गेला आहे .चिमुकल्या हाताने योग्य रंग संगती साधक पणती , आकाशकंदील चित्ररूपाने साकारून गोड शुभेच्छा तर दिल्याच अन् दिवाळीच्या उत्सवानंतर लोकशाहीचा उत्सव पवित्र मतदारांनी करून हा ही सण गोड करा .*सर्वांना माझी विनंती मत द्या आणि दाखवा शक्ती* असे म्हणत जागरूक मतदार बना असाच संदेश चिमुकल्यांनी दिला आहे . या प्रसंगी  देविदास गायकवाड ,दयानंद जेटीथोर , विठ्ठल नरवडे , पांडुरंग जावळे , प्रशांत वैदकर , मनोज पाटील , गुणवंत चव्हाण , अगरचंद शिंदे , ज्ञानेश्वर रोमन यांची उपस्थिती होती .


श्री . विठ्ठल नरवडे सहशिक्षक - पिंपळा खुर्द,ता.तुळजापूर
अशा उपक्रमातून मुलांची सर्जनशीलता आणि कल्पकता वाढीस लागते .विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा पत्रातून शुभेच्छा संदेश देण्याबरोबरच मतदान करा अशी विनंती केली आहे . शिवाय मतदानाचे महत्त्वही सांगून मतदान जागृती मध्ये खारीचा वाटा त्यांनी उचलला आहे .निश्चितच पोस्ट कार्डद्वारे दिवाळीत शुभेच्छा व मतदानाची विनंती असा समन्वय यातून साधला आहे . निश्चितच विद्यार्थ्यांचे हे आवाहन पालकांमध्ये मतदानाबद्दलची जागृता वाढवण्यास निश्चित फायदेशीर ठरेल असा विश्वास वाटतो .




Labels:

पवनचक्कीच्या पात्यात शेतक-याच्या स्वप्नांची राख रांगोळी ,प्रशासनाकडून दुर्लक्ष ?

पवनचक्कीच्या पात्यात शेतक-याच्या स्वप्नांची राख रांगोळी ,प्रशासनाकडून दुर्लक्ष ?

पवनचक्की कंपनीने शेतीचे नुकसान करुन बेकायदेशीर रस्ते केले तयार

नळदुर्ग,दि.२६ : शिवाजी नाईक 
तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि) महसुल मंडळा अंतर्गत गावाच्या शिवारात पवन ऊर्जा कंपनीने शेतीचे नुकसान करुन बेकायदेशीर रस्ते  तयार करीत असल्याची घटना उघडकीस आली आहे.
पवनचक्की बसविण्यासाठी यंत्रसामग्री घेऊन जाण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची उभी पिकं उध्वस्त करून शेतकऱ्यांच्या जमिनीचीही वाट लावली आहे. तर कांही ठिकाणी अवजड वाहनांमुळे शेतातील जमिनी खाली असलेल्या पाईपलाईनची पुरती वाट लागली आहे. तब्बल दिडशे पेक्षा  जास्त पाईप फुटून मानेवाडी शिवारात शेतक-याचे नुकसान झाले आहे. तुळजापूर तालुक्यातील चिवरी- हगलुर शिवारात पवन ऊर्जा क्षेत्रातील एका कंपनीने ऐन सुगीच्या हंगामात धुमाकूळ घातला आहे.

तुळजापूर तालुक्यातील बसवंवाडी,बोरनदवाडी, चिवरी,हगलुर,मानेवाडी,गंधोरा, सलगरा, मुर्टा, चिकुंद्रा, अणदुर या गावाच्या शिवारात अंदाजे ५० पेक्षा अधिक पवनचक्की बसविण्याची माहिती समोर आली आहे.

यापैकी मानेवाडी शिवारात  शेतात बसविलेल्या पवनचक्की शेजारी असलेल्या अल्पभुधारक शेतकरी  मोतीराम पवार, देविदास अंबादास राठोड,गणपत अंबादास राठोड, भानुदास राठोड यांच्या शेतातील उभ्या पिकांवर सावली पडून सोयाबीन व उडीद उत्पादनात मोठी घट झाल्याचे मिथुन गणपत राठोड यांनी माहिती सांगितले.

पवन चक्क्यांची उभारणी करणाऱ्या  कंपनीने स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून तालुक्यात बस्तान मांडले आहे. सुरवातीला  शिवारात  वेगवेगळ्या ठिकाणी स्थळ निश्चिती करून कंपनीने संबंधित शेतमालकासोबत 30 वर्षांचे करार केले. असे करताना कंपनीने संबंधित ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्रही घेतले नसल्याचे समजते.

 पवनचक्कीच्या उभारणीसाठी मोठ मोठी यंत्रसामग्री अवजड वाहनातुन वाहून न्यावी लागते. त्यासाठी विस्तीर्ण रस्त्यांची आवश्यकता असते. कंपनीने स्थानिक पातळीवरील कांहीं  लोकांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे रस्ते तयार करायला सुरुवात केली आहे. तालुक्यातील संबंधित प्रशासनास  मॅनेज करून कंपनीने स्वतःची  यंत्रणा उभी केली असल्याची चर्चेअंती समजते. या यंत्रणेने कंपनीला रस्ते तयार करून देण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांची उभी पिकं उध्वस्त करायला सुरुवात केली आहे. पोकलेन आणि जेसीबी सारख्या मोठमोठ्या यंत्रणेने शेत खोदून निघालेली माती, मुरूम आणि झाडे निर्दयीपणे पुन्हा त्याच शेतात लोटून उरल्या सुरल्या पिकांचेही नुकसान केले जात आहे. विशेष म्हणजे कुठलीही शासकीय यंत्रणा सोबत नसताना, कुठलाही प्रशासकीय अथवा शासकीय आदेश नसताना खासगी यंत्रणेद्वारे हा धुमाकूळ घातला जात बोलले जात आहे.

 स्वतःच्या मालकीची जमीन उघड्या डोळ्याने उध्वस्त होताना पाहण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय उरलेला नाही. याबाबत पीडित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात तक्रार करणे गरजेचे आहे.दरम्यान रेनिव कंपनीचे उत्तम कुमार प्रधान यांच्याशी संपर्क साधला असता याविषयी माहिती देण्याचे टाळुन दुसऱ्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.

दरम्यान तुळजापूर तहसिलदार अरविंद बोळंगे, नायब तहसिलदार संतोष पाटील यांच्याशी मोबाईल फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलले नाही. सालगरा (दिवटी) मंडळ अधिकारी श्रीनिवास पवार, चिकुंद्रा सज्जाचे तलाठी जयराज कुलकर्णी यांच्याशी याप्रकरणी संपर्क साधला असता पवन ऊर्जा कंपनीने किंवा संबंधित यंत्रणेने कसलेही अर्ज देऊन परवानगी घेतली नाही. संबंधित शेतकऱ्यानी तहसिल कार्यालयात तक्रार देण्याचे सांगितले.

Labels:

Wednesday, 23 October 2024

ऐतिहासिक नळदुर्ग शहरात बसवसृष्टीचे स्तंभपूजन वीरशैव बंधवांच्या उपस्थितीत थाटात संपन्न

ऐतिहासिक नळदुर्ग शहरात बसवसृष्टीचे स्तंभपूजन  वीरशैव  बंधवांच्या उपस्थितीत थाटात संपन्न 

 नळदुर्ग, दि. 22 

मंगळवार दि.२२ रोजी ऐतिहासिक नळदुर्ग शहरात बसवसृष्टीचे स्तंभपूजन  वीरशैव  बंधवांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाले.

तुळजापूरकडे जाणा-या गोलाई चौकात राष्ट्रीय महामार्गालगत शासनाने बसवसृष्टी निर्माण करण्यासाठी 
जागा उपलब्ध करून दिली आहे. या अनुषंगाने मंगळवारी  शेकडो वीरशैव समाजबांधवांच्या हस्ते  स्तंभ पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

 राज्य सरकारने नळदुर्ग येथे भव्य बसवसृष्टी उभारण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गालगत गोलाई चौकात पाच एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बसवसृष्टीमुळे ऐतिहासिक नळदुर्ग शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उभारण्यात येणारी ही भव्य बसवसृष्टी राज्यातील पहिलीच बसवसृष्टी असल्यामुळे  वीरशैव समाजबांधवांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.
 
बसवसृष्टी उभारण्याच्या कामाचा पहिला टप्पा म्हणून नळदुर्ग येथील गोलाई चौकात मंगळवारी स्तंभ पूजन कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात शेकडो वीरशैव समाजबांधवांच्या उपस्थितीत स्तंभ पूजनाचा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर समाजबांधवांच्या हस्ते विधीवत स्तंभ पूजन करण्यात आले.
 
या कार्यक्रमास भाजपचे सुशांत भुमकर, माजी नगरसेवक संजय बताले, बसवराज धरणे, नय्यर जहागिरदार, शफीभाई शेख, दत्तात्रय कोरे, सुधीर हजारे, तुळजापुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. आशिष सोनटक्के, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अ‍ॅड. दीपक आलुरे, वसंत वडगावे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सिद्धेश्वर कोरे, दयानंद मुडके, सोमनाथ शेटे, दहिटण्याचे सरपंच पप्पू पाटील, व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, दयानंद स्वामी, खोबरे गुरुजी, नळदुर्ग शहराध्यक्ष धीमाजी घुगे, भाजपचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोतदार, माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, सिंदगावचे सरपंच विवेकानंद मेलगिरी, माजी पंचायत समितीचे सदस्य साहेबराव घुगे, होर्टीचे महादेव पाटील, शिवसेनेचे बंडप्पा कसेकर, भाजपचे संजय विठ्ठल जाधव यांच्यासह नळदुर्ग, लोहगाव, खुदावाडी, अणदुर, होर्टी, सिंदगाव, बोळेगाव, खानापूर यासह परिसरातील गावांतील वीरशैव समाज बांधव व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

Sunday, 20 October 2024

वादळातल्या नंदा दिपातील प्राणज्योत अखेर मालवली

वादळातल्या नंदा दिपातील प्राणज्योत अखेर मालवली                     

 गेल्या सहा दशकापासून धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एक समंजस नेता म्हणून नरेंद्र बाबुराव बोरगांवकर यांचे नाव सुपरिचित होते. स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्वाचे समर्पण करून आत्मबलिदानाचे अग्निदिव्य करणाऱ्या हुतात्मा बाबुराव बोरगांवकरांचे नरेंद्र बोरगांवकर हे द्वितीय सुपुत्र त्यांचा जन्म १३ जून १९३७ रोजी झाला.  वयाच्या  ८८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवल्याने जिल्हयात  सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

बोरगांवकर यांनी हैद्राबाद येथे कायद्याची पदवी संपादन केली .या व्यक्तीला नौकरी अथवा स्वतंत्र वकिली व्यवसाय करून खूप माया जमविता आली असती परंतू त्यांनी तसे न करता आपल्या पदवीचा उपयोग समाजकार्यासाठी व्हावा, या हेतूने प्रेरित होऊन त्यांनी या कार्यास वाहून घेतले. 

सदैव लोकांसाठी धडपडणाऱ्या नरेंद्र बोरगावकरांनी १९६२ साली राजकारणात प्रवेश केला. १९६२ ते १९७४ पर्यंत त्यांनी तुळजापूर पंचायत समिती सभापती म्हणून काम पाहिले. १९७० ते १९८१ पर्यंत त्यांनी धाराशिव जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर राहून त्यांनी पक्षाची प्रतिमा उजाळून पक्ष बळकट केला. त्या कार्याची पावती त्यांना १९८२ ला धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या स्वरूपात मिळाली. १९८२ पासून राजकारण सत्यासाठी आणि त्यागासाठी  न राहता सत्ता आणि स्वार्थापलीकडे त्याची मर्यादा वाढत गेली. संघर्ष हे राजकारणाचे माध्यम ठरले , जाहिरातबाजी हे राजकारणाचे अंग बनले . पक्षापेक्षा स्वार्थ व सत्तेला महत्व देणाऱ्या लोकांनी राजकारणात प्रवेश केल्याने खरे बावनकशी सोने बाजूला फेकले गेले. कारण एप्रिल १९८९ मध्ये धाराशिव जिल्हा परिषद पुरोगामी लोकशाही दलाच्या प्रभावाखाली गेल्याने त्यांना अध्यक्ष पदाचा  त्याग करावा लागला . पण सेवेच्या माध्यमातून पक्षाशी इमान राखून जे काय करता येईल तेच आपले राजकारण करणारे धिरोदत्त वृत्तीचे नरेंद्र बोरगांवकर नावाप्रमाणे संयमी व गंभीर बनून सत्ता संघर्ष टाळून सर्वसामान्य लोकांचा सतत जनसंपर्क ठेवला. त्यामुळे बोरगांवकरांचे निवासस्थान पक्षनिष्ठ कार्यकर्त्याचे वारूळच बनले. या कालावधीत त्यांनी मोठ्या कौशल्याने पक्षनिष्ठ व संघटित कार्यकर्त्यांची फळी व साखळी तयार करून जनमताला प्रमाण मानून स्थिर  राजकारणाचा खराखुरा पायंडा त्यांनी निर्माण केला. राजकीय कालावधीत राजकीय मंथनातून निर्माण झालेले कडवट जहर प्राशन केले व ते पचविले देखील . उदात्त आणि स्वच्छ मनाचा एक उदारमतवादी राजकारणी म्हणून ते सर्व जिल्ह्यात व महाराष्ट्रातील पक्षश्रेष्ठींना परिचित झाले. 

तुळजापूरच्या उघड्या बोडक्या माळरानावर ऊसाचा शिरपेच खोवणारे तालुक्यातील मरगळलेल्या शेतकऱ्यांत संजिवनी निर्माण करणारे  नरेंद्र बोरगांवकर श्री. तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना नळदुर्गचे संस्थापक अध्यक्ष बनले. या काळात आमदार मधुकरराव चव्हाण , आमदार कै. सिद्रामप्पा आलुरे गुरुजी  आमदार कै. शिवाजीराव पाटील बाभळगांवकर यांनी त्यांना मोलाची साथ दिली होती.

साखर कारखान्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर  विकासाला तणावातून निर्माण झालेले सर्व  अडसर व अडथळे  बाजूला सारून  कारखान्याच्या विकासाला स्पर्धात्मक स्वरूप  आणले. शेतकऱ्यांचे हित हे एकच ध्येय समोर ठेऊन त्यांनी कारखाना कर्जमुक्त केला. अगदी थोड्या अवधित साखर उद्योगातील एक अभ्यासू  व तज्ञ संस्था प्रमुख म्हणून १९९१ - ९२ या वर्षासाठी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. या वर्षात त्यांनी केलेले काम पाहून पुन्हा एकदा १९९२- ९३ साली त्यांची फेरनिवड झाली. या काळात त्यांनी अनेक होतकरू व गरीब तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात नौकरीत सामावून घेतले. बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून दिला. निरक्षिताना झोपडी व घरकुलाद्वारे आसरा प्राप्त करून दिला. जिल्हा विकासाच्या अनेक योजना राबवून गोरगरीबांचा व्यक्तीविकास साधला.संयम , धिरोदत्तपणा व कर्तत्व हे नरेंद्र बोरगांवकर यांचे गुणविशेष होते.  ज्या तळहातात आपल्या भाग्यरेषा असतात, त्याच तळहाताता लगतच्या मनगटातील कर्तत्वाने त्या भाग्य रेषा उजळाव्या लागतात .हे त्यांनी इतरांना शिकवलेले सैद्धात्विक मूल्य होते. आई- वडीलांनी ठेवलेले नरेंद्र हे नाव त्यांनी आपल्यातील संयमाने खरे करून दाखविले. यातच त्यांच्या निर्भिड नेतृत्वाचे गमक होते. हा लोकाभिमुख नेता राजकीय कालावधीत ज्या चपळाईने , जिद्दीने व जोमाने काम करायचा. ते पाहून अंगीभूत कर्तात्वस वयाचे बंधन नसते हेच प्रकर्षने जाणवायचे. कारण त्यांचा त्याकाळचा कामाचा उत्साह तरुणांना लाजविणारा होता. माझ्यासारख्या अनेक सुशिक्षित तरुणांच्या घरच्या अर्थिक परिस्थीतीची नाळ ओळखून त्याना नौकरी देऊन आयुष्यात उभे करून आयुष्याची भाकरी देणाऱ्या अन्नदात्याची आज प्राणज्योत मालवली ही काळीज हेलावून टाकणारी बाब आहे.

प्रा. डॉ. दिपक तुळशिदासराव जगदाळे ,  
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग

Labels:

Saturday, 19 October 2024

नळदुर्ग: आपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने सुरु


 पोलिसाचा आपघातात जीव गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची बुजविण्याचे काम सुरु

नळदुर्ग,दि.१९ :

नळदुर्ग शहरातील महामार्गावर जागोजागी पडलेले खड्डे बुजवून दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने सुरू करण्यात आले. शनिवार रोजी सकाळी अंदाजे साडेनऊ  वाजण्याच्या दरम्यान अपघात होवुन  दुचाकीस्वार पोलिस कर्मचा-यांचा जागीच मृत्यू झाला.तर एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर  कांहीं तासांतच नळदुर्ग बसस्थानक ते आपलं घर प्रकल्प पर्यंत महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु करण्यात आले.

 महामार्गावरील खड्ड्यांमुळे गेला पोलीसाचा बळी, एक गंभीर 

 राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग  येथे शनिवार  दि.१९ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नळदुर्गकडे येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला पाठीमगून धडक दिल्याने दुचाकीवरील एक पोलीस कर्मचारी ठार तर एक  पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त पोलीस कर्मचारी हे उमरगा पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे समजते. अपघातग्रस्ताना सदगुरू स्वामी नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेतून सुनिल भोळे यांनी मदत केले. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर नळदुर्ग उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून सोलापूर शासकीय रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.

नळदुर्ग जवळील राष्ट्रीय महामार्गावरील जूना जकात नाका येथे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र खड्डेच, खड्डे पडाले आहेत.  मोटार सायकल क्रमांक एम.एच.२५ ए. १७१२ या दुचाकीवरील  मयत पोलीस कर्मचारी हिराचंद दिनकर मुळे (वय ३६,) व जखमी गहिनीनाथ विठ्ठल बिराजदार (वय ३८) यांच्या दुचाकीला सोलापूरच्या दिशेने चाललेला कंटेनर क्र.टी.एन ०१ बी एल ७९५२ या ट्रकने जोरदार धडक दिली. अपघाता नंतर रस्त्याच्या दुतर्फा एक  किलोमीटर पेक्षा अधिक वाहनाच्या रांगा लागून वाहतुक कोंडी झाली. महामार्गावर असंख्य ठिकाणी खड्डे पडल्यामुळे अपघात झाल्याचा आरोप करत लहुजी शक्तीसेनेचे शिवाजी गायकवाड यांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध केला.

दरम्यान यापुर्वी महामार्ग पोलिस केंद्राने रस्त्यावरील खड्डे बुजवून त्याची डागडुजी करण्याबाबात राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा पत्र व्यवहार केल्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंढे यांनी सांगितले. मात्र या अपघातानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु केल्याचे दिसून आले.

Labels:

Thursday, 17 October 2024

कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रदर्शनात रसिकांनी घेतला कविता व गीतांचा मनमुराद लुटला आनंद

कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रदर्शनात रसिकांनी घेतला कविता व गीतांचा आनंद.....                       

 मुरूम, ता. उमरगा, ता. १७ : 

येथील बसव सहकार भवनमध्ये कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, महात्मा बसवेश्वर सार्वजनिक ग्रंथालय व रोटरी क्लब मुरूम सिटी यांच्या सयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. १६) रोजी कोजागिरी काव्य मैफिलचे आयोजित करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे होते. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे, रोटरीचे अध्यक्ष कमलाकर मोटे, सचिव सुनील राठोड, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, डॉ. सुवर्णा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

विविध घटना, प्रसंग, वास्तव जीवनावर आधारित यावेळी कविवर्य सहशिक्षक रुपचंद ख्याडे यांनी संवेदना.....
" कसे सांगावे दुःख सारे, कशा व्यक्त करू वेदना, माणसासाठी माणसाला, उरल्या नाही संवेदना " ,
सहशिक्षक नागनाथ बदोले यांनी " वंदन माह्या माय मराठीला, अभिमान माझ्या या मराठी मातीला...", शिवशरण वरनाळे यांनी दगडाचा देव मानवा तू शोधलास दगडात देव..., कलाप्पा पाटील यांनी सोयासिस चातक मी उडत आलो तुझ्या किनाऱ्या काठी जल पिण्या गुलाबी ओठी..., विजयकुमार देशमाने यांनी विझवून आज रात्री कृत्रिम दीप सारे, गगनात हसणारा तो चंद्रमा पहा रे..., मारोती बोडरे यांनी " माय माझी शेतात राबत जाई अजूनही नाही सुटल तिच्या पाठीच खुरप ग बाई ", तत्रस्नेही सहशिक्षक सुनील राठोड यांनी ऋतू मागून ऋत नवे, दिसामागून दिस नवे..., हुसेन नुरसे यांनी महंमद रफी यांचे गीत, पत्रकार अजिंक्य मुरुमकर यांनी हॅपी पिरियड्स डे...., उपप्राचार्य कलय्या स्वामी, प्रकाश रोडगे, मोहन जाधव, गुंडेराव गुरव यांनी कविता सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली. 

याप्रसंगी आनंद बिराजदार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ निर्मळे, प्रा. शिवाजी राठोड, प्रा. राजकुमार वाकडे, मल्लीनाथ बदोले, संचालक अशोक जाधव, अमृत वरनाळे आदिंची विशेष उपस्थिती होती. डॉ. सुवर्णा पाटील व  प्रा. डॉ. महेश मोटे यांनी मनोगत व्यक्त केले. दत्तात्रय इंगळे यांनी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की, कविवर्यांनी सादर केलेल्या कवितेमागे एक विशिष्ट भावना, अनुभव व विचार असतो. कवितेतील शब्द, प्रतीकं आणि रूपकं यांचा वापर करून कवी त्या भावनांना व्यक्त करत असतो. शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे, चिदानंद स्वामी, प्रशांत काशेट्टी, धीरज मुदकण्णा, सचिन कंटेकूरे, राजू मुदकण्णा, महांतय्या स्वामी, संतोष मुदकण्णा आदींनी पुढाकार घेतला. या काव्य मैफिलचे प्रास्ताविक संतोष कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक बालाजी भोसले तर आभार प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी मानले.                                     

फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील बसव भवनमध्ये काव्य मैफिलीत कविता सादर करताना कविवर्य कलप्पा पाटील व मान्यवर.

Labels:

नळदुर्ग येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्या शुक्रवार पासून प्रारंभ

नळदुर्ग येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा शुक्रवार रोजीपासून सुरु

नळदुर्ग,दि.१७: नवल नाईक 

नळदुर्ग शहरातील व्यासनगर येथे शुक्रवार दि. १८  ते दि. २४ ऑक्टोबर या या कालावधीत श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आले आहे. पारायणे हे ४५ वे वर्ष आहे

सप्ताह कालावधीत प्रवचन, कीर्तन, हरिजागर व महिला भजनी मंडळाच्या  भजनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री ज्ञानेश्वरी पारायण कालावधीत दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती ,सकाळी ६ ते ७ माऊलीची पूजा, ७ ते ९ ज्ञानेश्वरी वाचन, दुपारी बारा ते चार गाथा भजन व महिला भजन, त्यानंतर साडेचार ते साडेपाच पर्यंत प्रवचन,  नामजप, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ , त्यानंतर रात्री ९ ते ११ हरिकीर्तन ,१२ ते पहाटे ४ हरीजागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.

दि.१८ ते२४ यादरम्यान श्री ह भ प बलि बागल महाराज चिकुंद्रा, ह भ प संजय पवार महाराज शहापूर, तात्या महाराज सलगरा, मोहन पाटील किलज, कृष्णात जाधव, राजू पाटील वागदरी यांचे प्रवचन तर ह भ प महेश महाराज माकणी, विश्वनाथ गर्जे महाराज, प्रल्हाद सरडे महाराज नांदुरी, लक्ष्मण महाराज सोलापूर, राम महाराज गायकवाड चिकुंद्रा, गुरुवर्य ऋषिकेश महाराज वासकर यांचे कीर्तन होणार आहे. त्याचबरोबर गुरुवार दि. २४ रोजी गुरुवर्य श्री अप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांच्या हस्ते कालावाटप तर श्रीहरी ढेरे महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल. यावेळी शिवाजी व-हाडे गुरुजी यांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.तसेच बुधवारी सायंकाळी पाच वाजता दिपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी नळदुर्ग शहर व परिसरातील भाविक भक्तांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन माऊली महिला भजनी मंडळ ,श्री विठ्ठल रुक्माई मंदिर व्यवस्थापक मंडळ, जय हिंद तरुण गणेश मंडळ( व्यासनगर) व  पारायण समिती नळदुर्ग यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे

Labels:

तुळजापूर: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी लक्षावधी भाविकाच्या गर्दीने सर्व स्स्ते गेले फुलून

तुळजापूर: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त  दर्शनासाठी लक्षावधी भाविकाच्या गर्दीने सर्व  स्स्ते गेले फुलून 

भाविकांना बालाजी अमाईन्सच्या वतीने  महाप्रसाद,तर तुळजापूरात श्रीनाथ मंगल कार्यालयाच्या वतीने केशरयुक्त  दुधाचे वाटप

तुळजापूर,दि.१७:उमाजी गायकवाड
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या अश्विन पोर्णिमा सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह परप्रांतातून लाखोच्या संख्येने तिर्थक्षेञ तुळजापूरात अनवाणी पायी चालत  दाखल झाले. बुधवारी सोलापूर आणि नळदुर्ग रस्ते  भक्तांच्या अलोट गर्दीने फुलून गेले. त्यामुळे अश्विन पौर्णिमेला सर्वत्र वातावरण मंगलमय झाल्याचे दिसुन आले.
नवरात्र महोत्सव किंवा अश्विन पौर्णिमा कालावधीत किमान एकाने तरी तुळजाभवानी मातेचे  पायी चालत वारी करायचे असा संकल्प अथवा नवस विशेष करून धाराशिव,लातूर, बीड,सोलापूर,बार्शी,अहमदनगरसह कर्नाटकातील गुलबर्गा, विजापूर जिल्ह्यातील भाविक भक्ताकडून केला जातो.त्यामुळे ते पायी  तुळजापूरला येतात.

अलीकडच्या काळात हैदराबाद ,सिकंदराबाद, संगारेड्डी,बसव कल्याण, हुमनाबाद येथूनही चालत मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. 

कोजागिरी पोर्णिमा बुधवारी असली तरी देवीचे अश्विन पोर्णिमा विधी गुरुवारी संपन्न होणार असल्याने 
यंदाचा अश्विन पोर्णिमा सोहळ्यास विक्रमी संख्येने भाविक आले आहे. श्रीतुळजाभवानी मातेची  पाच दिवसाची गुरुवारी दि.17 रोजी पहाटे श्रीतुळजाभवानी मुर्ती सिंहासनावर विराजमान करण्यात आल्यानंतर श्री तुळजाभवानी  मातेस पहाटे भविकांचे दही ,दुध,पंचामृत अभिषेकानंतर नित्योपचार पुजा करण्यात आली.नंतर  सकाळी सहा वाजता पुनश्च भाविकांचे दहीदुधष अभिषेक करण्यात आले.रात्री सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या दोन काठ्या व पालख्यांचे  घाटशिळ मार्ग 17 ऑक्टोंबर रोजी तुळजापुरात आगमन होणार आहे. 

ठिकठिकाणी अन्नदान वाटप; बालाजी अमाईन्सच्या वतीने अन्नदान तर श्रीनाथ मंगल कार्यालयाच्या वतीने केशर युक्त 350 लिटर दुधाचे वाटप

सोलापूरहून  तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय  संचालक एन. राजेश्वर रेड्डी व कार्यकारी संचालक डि.राम रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स कंपनी समोर भाविकांना अन्नदान वाटप करण्यात आले.

नळदुर्ग रोडवर श्रीनाथ मंगल कार्यालयाच्या वतीने साडेतीनशे लिटर दुधाचे वाटप

नळदुर्गहुन तुळजापूरकडे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी येणाऱ्या भाविकांसाठी श्रीनाथ मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा गणेश पुजारी व महेश पुजारी यांच्या वतीने 350 लिटर केशर  युक्त मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. तसेच भाविकांसाठी सोलापूर व नळदुर्ग रोडवर ठिकठिकाणी अन्नदान, नाष्टा,चहा पाण्याची सोय करण्यात आली होती.

संतोष दादा मित्र परिवाराच्या वतीने सावरगाव-सुरतगाव रस्त्यावर अन्नदान

उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा मार्ग तुळजापूरकडे येणाऱ्या भाविकांसाठी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष (दादा)बोबडे मित्र परिवाराच्या वतीने सावरगाव -सुरतगाव रोडवर यशवंत स्टोन क्रशर केंद्रा समोर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अन्नदान वाटप करण्यात आले.
प्रारंभी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांच्या हस्ते आई तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन करुन अन्नदान कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी संतोष बोबडे मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.

 सोलापूर अक्कलकोट मार्ग कर्नाटकातील भाविक पायी चालत भाविक तुळजापूरकडे मार्गक्रमण करीत आहेत.
त्यामुळे बुधवारपासून  तिर्थक्षेञ तुळजापूरात भाविकांची मोठी गर्दी  होत आहे. सध्या बीड, लातूर, उमरगा, बार्शी अहमदनगर तसेच सोलापूर येथून तुळजापूरकडे येणाऱ्या सर्व मार्गावर भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे दिसत आहेत. यामध्ये तरुणाई मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे तुळजापूरकडे येणारे सर्व रस्ते हे भक्तांच्या गर्दीने फुलून गेले असून बुधवारी  लाखोच्या  संख्येनी भाविकांनी हजेरी लावली आहे.

रात्री  सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या दोन काठ्या छबिना अग्रभागी घेवुन वर्षातील मानाचा छबिना काढण्यात येणार आहे त्यानंतर महंत तुकोजीबुवा यांनी प्रक्षाळ,पुजा केल्यानंतर जोगवा कार्यक्रम होवुन अश्विनी पोर्णिमा धार्मिक विधीचा सांगता होणार आहे.

Labels:

राज्यातील पहिल्या बसवसृष्टीच्या जागेचा प्रश्न मिटला;महायुती सरकारने विशेष बाब म्हणून घेतला निर्णय

राज्यातील पहिल्या बसवसृष्टीच्या जागेचा प्रश्न मिटला;
महायुती सरकारने विशेष बाब म्हणून घेतला निर्णय



 धाराशिव, दि. १५

 नळदुर्ग शहरात साकारल्या जाणार्‍या राज्यातील पहिल्या बसवसृष्टीच्या जागेचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. मंगळवारी राज्य सरकारने विशेष बाब म्हणून नळदुर्ग पालिकेची स्मारकासाठी देऊ असलेल्या 6 एकर जागेच्या आरक्षण बदलाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच पाच कोटी रूपयांचा निधी बसवसृष्टीसाठी उपलब्ध झालेला आहे. आपण केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून लवकरच राज्यातील पहिली भव्यदिव्य आणि आकर्षक बसवसृष्टी आकाराला येणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे बसवसृष्टी उभारण्यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आला आहे. महात्मा बसवेश्वर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी लावून धरली होती. याविषयी आपण सातत्याने पाठपुरावा करून नळदुर्गजवळ राष्ट्रीय महामार्गालगत असलेली वाहनतळासाठी आरक्षित जागा बसवसृष्टीसाठी मिळावी याकरिता सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. नळदुर्ग शहराचा विकास आराखडा राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे त्याअंतर्गत वाहनतळासाठी आरक्षित असलेली ही सहा एकर जागेवरील आरक्षण बदलून बसवसृष्टीसाठी देण्यात यावी, अशी मागणी आपण राज्य सरकारकडे केली होती.परंतु या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने या 6 एकर जागेसाठी विशेष बाब म्हणून आरक्षण बदलून देण्यासाठी आपण सरकारकडे मागणी केली होती. आपल्या मागणीनुसार मंगळवारी विशेष बाब म्हणून या जागेवर बसवसृष्टी आणि वसंतराव नाईक स्मारकासह विस्तृत उद्यान उभारण्यासह इतर अनुषंगिक बाबीसाठी 10% जागेवर बांधकाम करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याने एकूण सहा एकर असलेल्या या जागेतील पाच एकर क्षेत्रावर महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसा अश्वारूढ पुतळा, ध्यानकेंद्र, आकर्षक बागबगीचा, सुशोभिकरण, त्याचबरोबर लाईट अ‍ॅन्ड साऊंड-शो करण्याचे ठरविले असल्याची माहिती आ.पाटील यांनी दिली आहे.

राज्यातील पहिली आकर्षक भव्यदिव्य अशी बसवसृष्टी या ठिकाणी आकाराला येणार आहे. तर उर्वरित एक एकर क्षेत्रावर हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे समारक आणि उद्यान विकसित केले जाणार आहे. हे ठिकाण एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून राज्याच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित करण्याचाही उद्देश आहे. त्यासाठी सहा एकर जागेचे आरक्षणात विशेष बाब म्हणून बदल केल्याबद्दल महायुती सरकारचे धन्यवाद, लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता भासल्यास तो उपलब्ध करून देण्यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. 

Labels:

Wednesday, 16 October 2024

शिवाजी महाविद्यालयाची शुभांगी सीतापुरे एम ए इतिहास मध्ये विद्यापीठात प्रथम.

शिवाजी महाविद्यालयाची शुभांगी सीतापुरे एम ए इतिहास मध्ये विद्यापीठात प्रथम.

मुरुम,दि.१६:

 डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या मार्च एप्रिल 2024 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये पदव्युत्तर परीक्षेत एम ए इतिहास या विषयात संपूर्ण विद्यापीठात प्रथम येण्याचा मान श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे एम ए इतिहास द्वितीय वर्षात शिकत असलेल्या शुभांगी सीतापुरे हिने पटकावला आहे.
 
विद्यापीठ परीक्षेत एम. ए. इतिहास विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना सौ. करुणा ज्ञानेश्वर चापोलीकर मेमोरियल हे रुपये दोन हजार आणि प्रमाणपत्र असे पारितोषिक दिले जाते. वरील  पारितोषिक
कु. शुभांगी सीतापुरे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय अस्वले यांच्या हस्ते देण्यात आले. 

यावेळी उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, इतिहास विभागाचे विभाग प्रमुख डॉ.गिरीधर सोमवंशी, डॉ. बी जी माने, प्रा. संग्राम जाधव, प्रा. पंढरीनाथ बनसोडे इत्यादी उपस्थित होते. या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे, उपाध्यक्ष आश्लेष शिवाजीराव मोरे, सरचिटणीस जनार्दन साठे, सचिव पद्माकरराव हराळकर, सहसचिव डॉ. सुभाष वाघमोडे आणि सर्व संचालक, प्राध्यापक यांच्या वतीने शुभांगी सीतापपुरे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Labels:

प्रतिक्षा संपली! हे आहेत नळदुर्ग अपरचे तहसीलदार

नळदुर्ग दि.१६ : नवल  नाईक 

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे नळदुर्ग येथे महिन्याभरापूर्वी मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाचे  तहसिलदार म्हणुन धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार अभिजीत जगताप यांच्याकडे  अतिरिक्त पदभार देण्यात आले असल्याचे आदेश धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले आहे..

जा.क्र.२०२४/ महसुल/ अस्था-०४/तह/एसआय-१३    दि.१४/ १०/२०२४  रोजी आदेशान्वये  तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे अपर तहसिल कार्यालय स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार सदर कार्यालयातील तहसिलदार संवर्गातील अधिकारी यांचे ०१ पद मंजुर करण्यात आलेले आहे. त्यानुषांगाने "अपर तहसिल कार्यालय नळदुर्ग" या पदाचा अतिरिक्त् पदभार अभिजीत जगताप तहसिलदार (महसुल) जि.का.धाराशिव यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे  आदेश दि.१४ ऑक्टोंबर रोजी निर्गमित केले आहे.

 अभिजित जगताप (महसुल) जिल्हा कार्यालय धाराशिव यांनी संदर्भीय शासन निर्णनयानुसार आवश्यक कार्यवाही करावी व पुढील आदेश होईपर्यंत मुळपदासह अतिरिक्त् पदाचे कामकाज करावे संबंधीत अधिकारी यांनी सदर आदेशाची अमलबजावणी करण्याचे धाराशिव निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी आदेश दिले आहेत.

नळदुर्ग अपर तहसिल कार्यालयांतर्गत या महसुल मंडळातील गावाचा समावेश 

नळदुर्ग महसूल मंडळातील येडोळा ,आलियाबाद, रामतीर्थ, अणदुर ,चिवरी, उमरगा चिवरी,  होर्टी, मुर्टा-मानमोडी, खुदावाडी, सराटी ,वागदरी तर जळकोट महसूल मंडळातील जळकोटवाडी नळ, हंगरगा नळ, इंदिरानगर, बोरगाव, नंदगाव ,लोहगाव,  सिंदगाव,  कुन्सावळी, सलगरा  बोळेगाव ,शहापूर,  गुजनूर ,दहिटणा ,गुळहळ्ळी यासह वाडी वस्ती, तांडे असे मिळुन नळदुर्ग अपर तहसील कार्यक्षेत्रात नळदुर्ग व जळकोट महसूल मंडळातील ३६ गावांचा समावेश आहे. 

नळदुर्ग येथे शासनाने मंजूर झालेल्या अपर  तहसील कार्यालयाचे आमदार राणाजगजजितसिंह पाटील यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात विजयादशमीच्या मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य ऐतिहासिक चावडी चौकात  नगरपालिकेच्या सभागृहात हे अपर तहसील कार्यालय सुरू करण्यात येत आहे.  तहसीलदार व लिपिक ही दोन पदे येथे मंजूर असून याच ठिकाणी तलाठी कार्यालयही मागील काही महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले आहे. यामुळे जुन्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना याचा व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने दिलासा मिळाला आहे. 
या अपर तहसील कार्यालयाचा शासन निर्णय घेण्यात आला असून महसूल व वन विभागाकडून बुधवार दि.९ आॕक्टोबर रोजी शासन निर्णय झाला.  अपर तहसील कार्यालयास उच्चस्तरीय समितीची मंजूरी मिळाल्याची माहिती दि. १२ सप्टेंबर रोजी मिळाली.  महिनाभरात याबाबत शासन निर्णयही झाला. लागलीच आता तहसिलदार पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याचे आदेश निर्गमित झाले.त्यामुळे नळदुर्ग येथे लवकरच तहसिलचे कामकाज सुरु होणार असल्याने 
शहर व परिसरातील व्यापारी ,नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
गणेश मोरडे, व्यापारी, नळदुर्ग 
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे तहसील कार्यालय कार्यान्वित होत असल्याने शहरातील व्यापारीच्या वतीने गणेश मोरडे यांनी आभार मानले. नागरिकांना तहसिलच्या कामासाठी तुळजापूरला जाण्याची गरज भासणार नाही.नळदुर्ग परिसरातील अनेक गावातील नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार आहे.शहरातील विविध व्यवसायाची उलाढाल वाढणार असुन व्यवसायिक व नागरिकांतून आनंद व्यक्त केले जात आहे.

Labels:

Tuesday, 15 October 2024

विधान परिषद सदस्यत्वाची घेतली शपथ

विधान परिषद सदस्यत्वाची घेतली शपथ 

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची आज शपथ घेतली. सदस्य हेमंत श्रीराम पाटील, पंकज छगन भुजबळ, श्रीमती मनीषा कायंदे, इद्रिस इलियास नाईकवाडी, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, श्रीमती चित्रा किशोर वाघ यांना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.

विधान भवन, मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात दुपारी १२ वाजता हा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यामध्ये श्री संत सेवालाल महाराजांचे वंशज पोहरादेवी तीर्थक्षेत्र गडाचे गादीपती धर्मगुरू  बाबूसिंगजी महाराज यांची भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड करण्यात आली.

Labels:

वस्तुनिष्ठता आणि अचूकता यावरच संशोधनाची उपयोगिता :डॉ. सय्यद अझरुद्दीन


वस्तुनिष्ठता आणि अचूकता यावरच संशोधनाची उपयोगिता :डॉ. सय्यद अझरुद्दीन

उमरगा,दि.१५;

 संशोधन हा केवळ माहितीचा संग्रह नसून संशोधनामुळे सामाजिक प्रश्नांची उकल व्हायला मदत झाली पाहिजे, त्यामुळे समाज उपयोगी संशोधन व्हायचे असेल तर संशोधकाने वस्तुनिष्ठता आणि समाज उपयोगिता लक्षात घेतली पाहिजे असे मत छत्रपती संभाजी नगर येथील डॉ . सय्यद अझरुद्दीन यांनी व्यक्त केले. ते श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाणिज्य शाखेद्वारा आयोजित संशोधन पद्धती आणि आराखडा या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत बोलत होते.


यावेळी प्रोफेसर वाल्मिक सरवदे प्रकुलगुरू डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या उपस्थित या कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले, ऑनलाईन उद्घाटनपर संदेश त्यानी दिला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माकणी येथील प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव हे होते.  

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात धाराशिव येथील डॉ. सुयोग अमृतराव यांनी संशोधकांनी संशोधनाला सुरुवात करताना माहितीचे संकलन कसे करावे, माहिती संकलनासाठी तयार करण्यात येणारी प्रश्नावली कशी असावी याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले. नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टी विकसित करण्यासाठी संशोधन प्रकल्प आणि क्षेत्रीय अध्ययन प्रकल्प हे अनिवार्य करण्यात आले असून ते तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टिकोन रुजवावा लागेल, यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरेल असा विश्वास डॉ.  संजय अस्वले यांनी यावेळी व्यक्त केला. प्राचार्य घनश्याम जाधव यांनी यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. 

या प्रसंगी कार्यशाळेसाठी तुळजापूर येथील प्राचार्य  मुकुंद गायकवाड, गुंजोटी येथील डॉ. गुलाब राठोड, प्रा. आर. डी. गायकवाड, डॉ. सहदेव बिराजदार, डॉ. सुधीर पंचगले, उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, डॉ . विनोद देवरकर, डॉ. वसंत हिस्सल, प्रा. मुरळीकर, प्रा. अक्षता बिराजदार, प्रा. संध्या चौगुले, विजय मुळे,  धाराशिव  जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि पदव्युत्तर वाणिज्य विभागातील २०५ सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.

Labels:

कुठले लोक म्हणत आहेत? आमदारांनी आमच्या गावातच घर करावे

कुठले लोक म्हणत आहेत? आमदारांनी आमच्या गावातच घर करावे

विकासाचा महामेरू आमदार राणाजगजितसिंह पाटील 

नळदुर्ग दि.१५: शिवाजी नाईक 

नळदुर्ग भागातील शेतकऱ्यांसह  नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हावे याकरिता सतत शासनाकडे पाठपुरावा करत अनेक दशकांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच विकास कामांसाठी नळदुर्गला भरघोस निधी मंजूर करुन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी  विकासाचे पर्व सुरू  केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय रंगला आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील 

नळदुर्ग शहराच्या सर्वागीण विकासासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून जवळपास दोनशे कोटी रुपयांचा निधीतून  नळदुर्ग शहरात अनेक महत्वाची विकास कामे होत आहेत. नळदुर्ग शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच शहराच्या विकास कामासाठी इतका मोठा निधी उपलब्ध झाला आहे.
 
आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी नळदुर्गच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहिल्याने शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे ४६ कोटी रुपये खर्चाचे काम सुरू आहे. हे कामामुळे शहरवासियांना दररोज नळाव्दारे पाणी मिळणार आहे. पाणीपुरवठा हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा व महत्वपूर्ण आहे.
 कुरनूर (बोरी धरण) मध्यम प्रकल्पात मुबलक पाणी असूनही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र नेहमीचे झाल्याचे सर्वश्रुत आहे. त्यावर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शहरवासीयांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला आहे. त्याचबरोबर शहरात अप्पर तहसील कार्यालयाचे विजयादशमीच्या मुहूर्तावर उदघाटन करण्यात आले.आमदार  पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे हे शक्य झाले आहे.शहर व परिसरातील नागरिकांनी आ. राणा जगजितसिंह पाटील यांचे आभार मानले व त्यांचा सत्कारही केला आहे. 


आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा कार्यकाल

२००४ - २००९ : कृषि, उद्योग, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, रोजगार, स्वयंरोजगार आणि
रोजगार हमी योजना खात्याचे राज्यमंत्री, 
२००८ ते नोव्हेंबर २००९ : महसूल व पुनर्वसन, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, उद्योग व
संसदीय कार्य खात्याचे राज्यमंत्री,
२००५ ते २००८ : सदस्य महाराष्ट्र विधानपरिषद.
२००८ ते २०१४ : सदस्य महाराष्ट्र विधानपरिषद.
ऑक्टोबर २०१४ मध्ये  विधानसभेवर निवड.
२०१९ - तुळजापूर विधानसभा मतदार संघातून निवड.
२००९ धाराशिव (उस्मानाबाद) विधानसभा निवडणुकीत पराभुत

 त्याचबरोबर या निधीतून भव्य अशी बसवसृष्टी, कै. वसंतराव नाईक स्मारक, मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक, शादीखाना ही कामे होणार आहेत. तर पाच एकर क्षेत्रावर भव्य असा बुध्द विहार निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशिल आहेत.या कामामुळे नळदुर्ग शहराच्या सौदर्यात मोठी भर पडणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी भव्य अशी ई-लायब्ररी व अद्यायवत अभ्यासिका केंद्र उभारण्यात येणार आहे. 
  
सुमारे  ९३ कोटी रुपये खर्चाची शहरातील विविध ठिकाणी रस्त्याची कामे होत आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे रस्त्याचे काम म्हणजे राष्ट्रीय महामार्ग हे जुन्या खंडोबा मंदिरापर्यंत रस्त्याचे काम आहे. या रस्त्याची रुंदी वाढविण्यात येत आहे. 

  त्यामुळे श्री खंडोबाच्या यात्रेसाठी नळदुर्ग -मैलारपूर येथे येणाऱ्या भाविकांना आता वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार नाही. भाविक तसेच चिंकुद्रा, किलज, सलगरा दिवटी या भागात जाणाऱ्या नागरिकांसाठी देखील हा रस्ता सोईचा ठरणार आहे. त्याचबरोबर शहरातील विविध भागात गटार व रस्त्याची कामे, सभागृह, जॉगिंग ट्रॅक, बगीचा विकसित करणे, सभामंडप, व्यायाम शाळा, सांस्कृतिक सभागृह नूतनीकरण करणे ही कामे होत आहे. शहरातील विविध दहा ठिकाणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या निधीमधून आर.ओ. प्लॅन्ट उभारण्यात आले आहे. याचा शहरातील नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. या आर.ओ.प्लॅन्टमधून फक्त पाच रुपयांमधून २० लिटर शुद्ध पिण्याचे पाणी नागरिकांना मिळत आहे. पाणीटंचाई तसेच उन्हाळ्यात नागरिकांना या आर.ओ. प्लॅन्टचा मोठा आधार ठरला आहे. भीमनगर येथेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपये खर्चाची विकासकामे होत आहे. 
   येणाऱ्या काळात नियोजित नळदुर्ग तालुका निर्मितीचा प्रश्न, औद्योगिक वसाहत, पर्यटकांना राहण्यासाठी अद्यायावत  भव्य असे विश्रामगृह, कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजारपेठ ही महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहेत. 


  शेतकऱ्यांना दिलासा व होणार पाणी बचत
पश्चिम महाराष्ट्राच्या धरतीवर धाराशिव जिल्ह्यातील शिवार हिरवेगार होण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र सिंचन व सुधारणा कार्यक्रम अंतर्गत नळदुर्ग येथील कुरनूर मध्यम प्रकल्पासाठी मुख्य कालवा (९.७५कि.मी) अस्तरीकरण व वितरण व्यवस्था सुधारणा या कामासाठी रुपये २९ कोटी ६५ लाख रुपये खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली असून सदर कामाची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे बोरी धरणातून शेतीसाठी कॕनाॕलद्वारे मिळणारे पाणी वाया न जाता पाणीबचत होणार आहे. शेतक-यातुन आनंद व्यक्त केला जात आहे.


नळदुर्गवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विशेष जीव असण्याचे कारण म्हणजे ज्येष्ठ नेते डाॕ.पद्मसिंह पाटील यांना नळदुर्गकरांनी दिलेली साथ व डाॕक्टरसाहेबांचे नळदुर्गकरांशी असलेले जिव्हाळ्याचे संबध. मागील पाच वर्षात आमदार पाटील यांनी नळदुर्ग शहरास दिलेला भरमसाट  निधी व दिलेल्या असंख्य  भेटीबद्दल काही नळदुर्गकर विनोदाने म्हणतात की  दादांनी आमच्या मनात घर केलय मात्र दुर्गातही एक घर करावे.


Labels: