Wednesday, 30 September 2026

एमआयएममध्ये ‘इनकमिंग’; आपचे शहराध्यक्ष, काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशनळदुर्ग शहरासह तुळजापूर तालुक्यात संघटन विस्ताराला वेग

एमआयएममध्ये ‘इनकमिंग’; आपचे शहराध्यक्ष, काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
नळदुर्ग शहरासह तुळजापूर तालुक्यात संघटन विस्ताराला वेग

नळदुर्ग, दि. ३० सप्टेंबर :

धाराशिव जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या हालचालींना वेग आला असून, नळदुर्ग शहरासह तुळजापूर तालुक्यात पक्षाचे संघटन तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाची बैठक मंगळवारी (दि. २९) पार पडली. यावेळी आम आदमी पार्टीचे नळदुर्ग शहराध्यक्ष वसीमखान पठाण यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला.

एमआयएमचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शहाबाज काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत नळदुर्ग शहर आणि तुळजापूर तालुक्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. पक्षाचे ध्येय व धोरण तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, आम आदमी पार्टीचे नळदुर्ग शहराध्यक्ष वसीमखान पठाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह एमआयएममध्ये प्रवेश केला. तसेच इटकळ व निलेगाव येथील काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत इमाम शेख, शरीफ शेख, नुमान शेख, एजाज शेख, बसोद्दीन शेख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष शहाबाज काझी यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.

जिल्हा कार्यकारिणीसह विविध पदांची नियुक्ती प्रदेश पातळीवरील मान्यतेनंतर
धाराशिव जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने जिल्हा कार्यकारिणीसह विविध पदांवरील नियुक्त्या प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेश पातळीवरील मान्यतेनंतर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस हैदर कुरेशी, अजहर शेख, शायन काझी, जाफर बागवान, अल्ताफ शेख, अखलाख शेख, इमरान पठाण, समीर पठाण, आहात काझी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

आलियाबाद शिवारात दुष्काळी पंचनाम्यांना सुरुवात ; प्रशासनाची बांधावर धाव; पिकांसह चारा-पाण्याच्या संकटाने शेतकरी हवालदिल

आलियाबाद शिवारात दुष्काळी पंचनाम्यांना सुरुवात ; प्रशासनाची बांधावर धाव; पिकांसह चारा-पाण्याच्या संकटाने शेतकरी हवालदिल

नळदुर्ग, दि. ३० सप्टेंबर :

तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नुकसानग्रस्त पिकांचे प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी आलियाबाद शिवारात महसूल व कृषी विभागाच्या पथकाने भेट देत शेतातील पिकांची पाहणी करून नुकसानीची नोंद केली.

शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने तालुक्यात ‘ट्रिगर प्रथम’ लागू झाल्याने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली पिके संकटात सापडली आहेत. त्यातच जनावरांसाठी चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे.

आलियाबाद शिवारात प्रशासनाच्या पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. पिकांची सद्यस्थिती, झालेल्या नुकसानीचे स्वरूप आणि बाधित क्षेत्राची नोंद घेण्यात आली. या पंचनाम्याच्या आधारे शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना मिळण्यास मदत होणार आहे.
पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. उत्पादन हातातून गेल्याने पुढील हंगामासाठी भांडवलाचा प्रश्न निर्माण झाला असून, जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्थाही अडचणीची ठरत आहे. त्यामुळे पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शासनाने दुष्काळी मदत व इतर सवलतींचा लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण, पोलीस पाटील शिवाजी चव्हाण, यशवंतराव चव्हाण, माणिक राठोड, थावरू राठोड, गणपती राठोड, हरिदास चव्हाण, देविदास राठोड, काशीनाथ जाधव, रवि चव्हाण, विनोद चव्हाण, सुनील राठोड, शिवाजी चव्हाण, कृषी सहायक संतोष माने, ग्रामसेवक अविनाश खुटेंगावे यांच्यासह शेतकरी व महिला उपस्थित होत्या.

Labels:

सलगरा शिवारात सोयाबीन नुकसानीचे पंचनामे सुरू ; महसूल, ग्रामपंचायत व कृषी विभागाची संयुक्त पाहणी; दहा शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पंचनामे


सलगरा शिवारात सोयाबीन नुकसानीचे पंचनामे सुरू ; महसूल, ग्रामपंचायत व कृषी विभागाची संयुक्त पाहणी; दहा शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पंचनामे

नळदुर्ग, दि. ३० सप्टेंबर :

तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दिवटी) परिसरात पावसाअभावी व प्रतिकूल हवामानामुळे सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान नोंदविण्यासाठी बुधवार, दि. ३० सप्टेंबरपासून प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात झाली. महसूल, ग्रामपंचायत आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सलगरा शिवारातील शेतांची पाहणी करून पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली.

तलाठी कोरडे, ग्रामपंचायत अधिकारी गुरुशरण पारे आणि कृषी सहाय्यक संतोष रणदिवे यांनी सलगरा शिवारात भेट देऊन विविध शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांची पाहणी केली. यावेळी पिकाची सद्यस्थिती, झालेल्या नुकसानीचे स्वरूप तसेच बाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनाम्याची प्रक्रिया करण्यात आली.

पहिल्या टप्प्यात अहमद शेख, राजेंद्र जाधव, भुजंग कुंभार, बालाजी गरड, नागनाथ काटवटे, गोविंद पुजारी, दिनकर तोंडवळे, राजेंद्र भरगंडे यांच्यासह एकूण दहा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्यात आले. प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी होत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडूनही या प्रक्रियेला प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी सागरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रशांत लोमटे, गोविंद पुजारी, श्याम माळी, राजेंद्र लोमटे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीची वस्तुस्थिती संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

नुकसानग्रस्त क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात येत असल्याने शासनाकडून मिळणाऱ्या संभाव्य मदतीसाठी ही नोंद महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे पंचनाम्याची प्रक्रिया पारदर्शकपणे व वस्तुनिष्ठ पद्धतीने पूर्ण करण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.



Labels:

नळदुर्गमध्ये रेखाकलेचा रंग भरला; ६०१ विद्यार्थी परीक्षेला; १५ कक्षांत एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा; २० शाळांचा सहभाग

नळदुर्गमध्ये रेखाकलेचा रंग भरला; ६०१ विद्यार्थी परीक्षेला;  १५ कक्षांत एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा; २० शाळांचा सहभाग

नळदुर्ग, दि. ३० सप्टेंबर : 

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षेने नळदुर्ग येथील जिल्हा परिषद प्रशालेत रंगत आणली आहे.
कला संचालनालय महाराष्ट्र राज्य तर्फे घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षा 2026
 एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेसाठी तब्बल ६०१ विद्यार्थी सहभागी झाले असून, दि. २८ सप्टेंबरपासून सुरू झालेली परीक्षा दि. १ ऑक्टोबर रोजी अंतिम पेपरने पूर्ण होणार आहे.

नळदुर्ग येथील परीक्षा केंद्रावर जिल्हा परिषद तसेच खासगी अशा २० शाळांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेसाठी केंद्रावर १५ कक्षांची व्यवस्था करण्यात आली असून, परीक्षा सुरळीत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्रप्रमुख म्हणून मुख्याध्यापक निजाम इनामदार, तर केंद्रसंचालक म्हणून अफझल शेख कार्यरत आहेत. त्यांच्या समवेत १५ पर्यवेक्षक परीक्षा प्रक्रियेची जबाबदारी सांभाळत आहेत.

या परीक्षेत तुळजापूर,नळदुर्गसह हंगरगा, जळकोट, आलियाबाद, चिवरी, शहापूर, तुळजाभवानी साखर कारखाना, होर्टी, आरळी, काटगाव, नंदगाव, देवकुरळी, मंगरूळ, गंधोरा व कुन्सावळी आदी ठिकाणच्या शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

रेखाकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला आणि कलात्मक अभिव्यक्तीला चालना मिळत असल्याने या परीक्षेकडे विद्यार्थी व पालकांचे विशेष लक्ष लागले आहे.

Labels:

तुळजापूरच्या शिक्षणक्रांतीचे शिल्पकार आलुरे गुरुजी; माजी मंत्री चव्हाणांनी जागवल्या जुन्या आठवणीगोरगरीब, वंचितांना ज्ञानाच्या प्रवाहात आणून स्वावलंबी केले

तुळजापूरच्या शिक्षणक्रांतीचे शिल्पकार आलुरे गुरुजी; माजी मंत्री चव्हाणांनी जागवल्या जुन्या आठवणी

गोरगरीब, वंचितांना ज्ञानाच्या प्रवाहात आणून स्वावलंबी केले 

नळदुर्ग, दि. ३० सप्टेंबर :

तुळजापूर तालुक्यात शिक्षणाचा पाया भक्कम करून गोरगरीब व वंचित घटकांना ज्ञानाच्या प्रवाहात आणण्याचे मोलाचे कार्य शिक्षणमहर्षी दिवंगत सि. ना. आलुरे गुरुजी यांनी केले. त्यांच्यासोबत माझी सुमारे साठ वर्षांची मैत्री होती. त्यामुळे त्यांच्या आठवणी आजही मनात जिवंत असून त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.

अणदूर (ता .तुळजापूर)  येथील जवाहर महाविद्यालयात शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. ‘मोबाईल आणि सोशल मीडिया : ज्ञानाचे विश्व की व्यसनाचा विळखा?’ या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली.
चव्हाण म्हणाले, जवाहर परिवाराने शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, सांस्कृतिक जडणघडणीला आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे. या संस्थेने शिक्षण क्षेत्रात निर्माण केलेला आदर्श महाराष्ट्रासाठी अनुकरणीय आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरातील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध झाले आहे.

 राज्याच्या विविध भागांतून विद्यार्थी दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होत असून तिची व्याप्ती सातत्याने वाढत आहे. मोबाईलचा वाढता वापर लक्षात घेता युवकांनी तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञानवृद्धीसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे सचिव रामचंद्र आलुरे यांनी मोबाईलचा वापर विवेकाने करण्याचा सल्ला दिला. ‘मोबाईल रक्षक ठरावा, भक्षक होऊ नये’, असे सांगत त्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
स्पर्धेत राज्यभरातून ३२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी विषयाच्या बाजू-विरोधात अभ्यासपूर्ण मांडणी करत प्रभावी युक्तिवाद सादर केले. नवख्या आणि अनुभवी वक्त्यांच्या सादरीकरणामुळे स्पर्धेला रंगत आली.
मुंबई विद्यापीठाची जोडी प्रथम
स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या यश रवींद्र पाटील व अभय कृष्णात आळशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. न्यू आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, पारनेर येथील आकाश दत्तात्रय मोहिते व महेश जनार्दन उशीर यांनी द्वितीय, तर राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथील कु. दिव्या मच्छिंद्र सूर्यवंशी व कु. पौर्णिमा कुलींद मस्के यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
उत्तेजनार्थ पारितोषिक शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय, लोहारा येथील कु. सुजाता रविशंकर  लोहार व अनिसा हमीद मुजावर यांनी मिळविले. प्रभावी वक्ता म्हणून माकणी येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या कु. सुप्रिया नेताजी मुगळे आणि जवाहर महाविद्यालय, अणदूरच्या कु. प्रतीक्षा सिद्धार्थ गायकवाड यांची निवड झाली.

परीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार रविंद्र केसकर, ज्येष्ठ साहित्यिक अरविंद जोशी आणि प्रा. डॉ. राजशेखर शिंदे यांनी काम पाहिले. विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रामचंद्र आलुरे होते. प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, माणिक आलुरे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे, स्पर्धा समन्वयक प्रा. डॉ. अनिता मुदकन्ना आदी उपस्थित होते. 
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी  ,
सूत्रसंचालन प्रा. डॉ. मल्लिनाथ बिराजदार यांनी  तर आभार डॉ. राजशेखर नळगे यांनी मानले.

Labels:

सरपंच-ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात बंड; उपसरपंचासह आठ सदस्य मैदानाबाहेर

सरपंच-ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात बंड; उपसरपंचासह आठ सदस्य मैदानाबाहेर

सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कथित मनमानी कारभाराचा आरोप; विकासकामांत अनियमितता होत असल्याचे सांगत सदस्यांचे धक्कादायक पाऊल

नळदुर्ग, दि. ३० सप्टेंबर :

तुळजापूर तालुक्यातील कटगाव ग्रामपंचायतीत कारभारावरून अंतर्गत धुसफूस उफाळून आली असून, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या कथित मनमानी कारभारामुळे विकासकामांत अनियमितता होत असल्याचा आरोप करत उपसरपंचासह तब्बल आठ सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. १३ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीतील आठ सदस्यांनी एकाचवेळी राजीनामे दिल्याने ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली असून, सत्ताधारी गटातील दोन सदस्यांचाही त्यात समावेश असल्याने या घडामोडीने राजकीय रंग घेतला आहे.

राजीनामा देणाऱ्या सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचा, तसेच विकासकामांमध्ये कथित अनियमितता होत असल्याचा आरोप केला आहे. कारभाराबाबत वारंवार मतभेद निर्माण होत असल्याने अखेर सदस्यांनी राजीनाम्याचा मार्ग स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे.

उपसरपंच जगदेवी शिवानंद कोणाळे यांच्यासह सदस्य प्रकाश अशोक पाटील, अलाउद्दीन अहमद घाटवाले, मुकेश राम शिवशिंगावले, सूर्यकांत वसंत कांबळे, संगीता सतीश खोबरे,अंजना सुर्यकांत जोकार,कोमल योगेश धुते राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. यामध्ये काँग्रेसच्या सहा, तर भाजपच्या दोन सदस्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

राजीनाम्यामुळे ग्रामपंचायतीसमोर पेच
१३ पैकी आठ सदस्यांनी राजीनामे दिल्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. हे राजीनामे स्वीकारले जाणार की संबंधित सदस्यांची समजूत काढून राजीनामे मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राजीनामा देणाऱ्या सदस्यांनी केलेल्या आरोपांबाबत सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे, याकडेही ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Labels:

“पोक्सो तपासाची दिशा स्पष्ट; धाराशिव मध्ये ५२ पोलिस अधिकाऱ्यांना कायद्याचे धडे”

“पोक्सो तपासाची दिशा स्पष्ट; धाराशिव मध्ये ५२ पोलिस अधिकाऱ्यांना
 कायद्याचे धडे”

 
धाराशिव, दि. ३० सप्टेंबर :

पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा तपास करताना कायदेशीर प्रक्रिया अचूकपणे राबविण्या सोबतच पीडित बालकांशी संवेदनशील व बालस्नेही पद्धतीने वर्तन करण्याची गरज आहे. याच उद्देशाने धाराशिव जिल्ह्यातील १८ पोलीस ठाण्यांमधील ५२ पोलीस अधिकाऱ्यांसाठी पोक्सो कायद्यावर एकदिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि युवा ग्राम विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रशिक्षण सभागृहात मंगळवारी हे प्रशिक्षण पार पडले.
एफआयआरपासून वैद्यकीय तपासणीपर्यंत प्रक्रियेचे धडे
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) भाग्यश्री पाटील यांनी पोक्सो प्रकरणातील कायदेशीर प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत एफआयआरची प्रत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठविणे, पीडित बालिकेची तातडीने वैद्यकीय तपासणी करणे, तिचा जबाब नोंदविणे तसेच बालकास बाल कल्याण समितीसमोर सादर करण्याची प्रक्रिया त्यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केली.

‘मनोधैर्य’च्या लाभासाठी कागदपत्रांवर मार्गदर्शन
अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी पोक्सो प्रकरणातील पीडितांना ‘मनोधैर्य योजने’चा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, बँक खाते उघडण्याची प्रक्रिया आणि विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याबाबत मार्गदर्शन केले.

बाल कल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने यांनी बालकाला समितीसमोर सादर करताना घ्यावयाची काळजी तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली. प्रज्ञा बनसोडे यांनी महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध बालकल्याणकारी योजनांची माहिती दिली.

ॲड. संजय सेंगर यांनी पोक्सो कायद्यातील तरतुदी, तपासाची प्रक्रिया, बालस्नेही तपास पद्धती, ‘सपोर्ट पर्सन’ची भूमिका, पीडित बालिकेचे पुनर्वसन तसेच आवश्यक फॉर्म व अर्ज कुठे सादर करावेत, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
 ॲड. अभय पाथ्रुडकर यांनीही पोक्सो कायद्यातील महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदींवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच. पी. देशमुख यांनी केले. यावेळी युवा ग्राम विकास मंडळाच्या गेल्या ४० वर्षांतील कार्याची माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षणास सचिन पांडकर, मारुती शेळके, इकबाल सय्यद, भाग्यश्री पाटील, विजयकुमार माने, ॲड. संजय सेंगर, ॲड. अभय पाथ्रुडकर, वैशाली पाटील, विकास चव्हाण, मैना भोसले, सुजाता माळी आणि प्रज्ञा बनसोडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी इकबाल महेबूब सय्यद, अतिश दशरथ सरफळे, संतोष रेपे, संजीव आगळे, नीता बहीर, ॲड. अनिता शिंदे आणि राऊ भोसले यांनी परिश्रम घेतले.

Labels:

Tuesday, 29 September 2026

अथलेटिक्समध्ये नळदुर्गच्या खेळाडूंची सुवर्ण भरारी ; जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी; विभागीय स्पर्धेसाठी निवड


अथलेटिक्समध्ये नळदुर्गच्या खेळाडूंची सुवर्ण भरारी ; जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी; विभागीय स्पर्धेसाठी निवड

नळदुर्ग, दि. २९ सप्टेंबर : 
धाराशिव येथे सोमवार (दि. २८) रोजी झालेल्या जिल्हास्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर महाविद्यालयाच्या खेळाडूंची आगामी विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

महाविद्यालयाचे रितेश नाईक, बसवराज कलशेट्टी, अथर्व कांबळे आणि ओम हागलगुंडे यांनी विविध मैदानी स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी केली. हातोडा फेक स्पर्धेत रितेश नाईक व अथर्व कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण कामगिरी केली. बसवराज कलशेट्टी याने थाळीफेक आणि 
क्रॉसकंट्री ओम हागलगुंडे याने ८०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले.

या सर्व खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाल्याने महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
खेळाडूंच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी त्यांचा सत्कार करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्य डॉ. अशोक कदम, कार्यालयीन अधीक्षक धनंजय पाटील, क्रीडा शिक्षक डॉ. कपिल सोनटक्के, डॉ. हंसराज जाधव, प्रा. मोतीराम पवार, प्रा. डॉ. जयश्री घोडके आदी उपस्थित होते.

Labels:

नुकसान पोहोचवायला संपूर्ण वातावरण आहे गुलजार, आपल्या हृदयाची स्वतःच काळजी घ्याल

नुकसान पोहोचवायला संपूर्ण वातावरण आहे गुलजार, आपल्या हृदयाची स्वतःच काळजी घ्याल
(जागतिक हृदय दिन विशेष – 29 सप्टेंबर 2026

आजच्या आधुनिक युगात मनुष्याने भौतिक सुखाच्या मागे लागून आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी तडजोड केली आहे. जिकडे पाहावे तिकडे अनैतिकता, स्वार्थ आणि फसवणुकीचे साम्राज्य पसरलेले आहे. कोणी आपल्याशी उंच आवाजात बोलले तरी आपण त्याला उलट उत्तर देतो किंवा वाद घालतो; परंतु कोणी भेसळ, प्रदूषण आणि अस्वच्छतेच्या माध्यमातून आपल्याला महागड्या, असाध्य आणि जीवघेण्या आजारांची भेट दिली, तरी आपण त्याविरोधात साधा हुंकारही भरत नाही, कारण आपण आपली मानसिकताच तशी बनवून घेतली आहे. आपण केवळ प्रत्यक्ष स्वरूपात निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत थोडेफार जागरूक असतो; मात्र अप्रत्यक्षपणे जाणाऱ्या आपल्या जीवाची आपल्याला कधीच काळजी नसते. वाढत्या मानवी लालसेने पृथ्वीवर दूषित वातावरणाचे चक्रव्यूह निर्माण केले आहे, ज्याने संपूर्ण जीवसृष्टीला घातक आजारांनी जखडले आहे, ज्यामुळे अकाली होणाऱ्या मृत्यूंमध्ये प्रचंड वाढ झाल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे; परंतु माणूस हे समजून घ्यायलाच तयार नाही. अशा लोकांच्या चुकीची शिक्षा इतर निष्पापांनाही आपला जीव गमावून भोगावी लागते. 

दूषित वातावरणामुळे आज वेगाने जीवघेणे आजार वाढले आहेत. कर्करोग, हृदयरोग, स्ट्रोक या आजारांची नावे आता आपल्याला दररोजच ऐकायला मिळतात. एखादा पूर्णपणे निरोगी मनुष्य, जो व्यसन करत नाही, नेहमी पौष्टिक आहार घेतो आणि उत्तम निरोगी जीवनशैलीचा अवलंब करतो, अशा व्यक्तीलाही अनेकदा घातक आजारांमुळे जीव गमवावा लागत आहे; कारण निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांची भरमार, भेसळखोरी आणि दूषित वातावरणात श्वास घेण्यास तो मजबूर आहे. आपल्या चटोरी जिभेच्या चवीच्या लालसेपोटी जनावरांनाही खाण्यायोग्य नसतील असे खाद्यपदार्थ आपण मोठ्या चवीने खातो आणि संपूर्ण शरीराला कचरापेटी बनवतो. खराब कोलेस्ट्रॉल तर आता आपल्या शरीराचा एक भागच बनले आहे. आपल्या देशात तर गोड पदार्थ, मैदा, मसाला, तेल आणि नमकीन यांच्याशिवाय दैनंदिन दिनचर्याच पूर्ण होत नाही; परंतु हे खाद्य अत्यंत घातक आहेत. वाढता लठ्ठपणा, आळस आणि दीर्घकाळ बसून करावे लागणारे काम या समस्या अधिक वाढवत आहेत. आजारपणामुळे वाढणारा आर्थिक ताण आणि मानसिक अस्वस्थताही आपल्या शरीराला नुकसान पोहोचवते.

प्रगत देशांनी ज्या खाद्यपदार्थांवर किंवा उत्पादनांवर बंदी घातली आहे, तीदेखील आपल्या देशात सर्रास विकली जातात. जीवघेण्या रसायनांचा खाद्यपदार्थांमध्ये वापर आणि बनावट खाद्यपदार्थ बाजारपेठा गजबजवत आहेत. उत्पादने किंवा खाद्यपदार्थांवरील मुदतची तारीख खोडून नवीन तारीख टाकून ते पुन्हा विकले जाण्याच्या घटना आपण अनेकदा पाहतो. लालची व्यापारी किंवा दुकानदार केवळ आपल्या एका रुपयाच्या फायद्यासाठीही निष्पापांच्या जीवाशी खेळण्यास घाबरत नाहीत. तुकाराम मुंडे महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदावर कार्यरत आहेत. त्यांनी भेसळखोरी, बनावट खाद्यपदार्थ आणि निकृष्ट खाद्यपदार्थांवर बंदी घालण्यासाठी कठोर नियम लागू केले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या जीवघेण्या खाद्यपदार्थांच्या बाजाराला आळा बसला आहे. जरा विचार करा, या कारवाईपूर्वी सर्रास सुरू असलेल्या या व्यवसायामुळे रसायनांपासून तयार केलेले बनावट दूध, त्यापासून तयार केलेले पनीर, मिठाई आणि विविध खाद्यपदार्थ यांच्या माध्यमातून आतापर्यंत किती निष्पाप लोकांना घातक आजारांनी ग्रस्त करून अकाली मृत्यूच्या दाढेत ढकलले असेल. निरोगी राहण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अशा मेहनती आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची नितांत गरज आहे.

आजच्या वातावरणात हृदयाशी संबंधित आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या सर्वोच्च पातळीवर आहे. दोन दशकांपूर्वीपर्यंत असे विकार श्रीमंत आणि वृद्धांच्या वाट्याला येतात असे मानले जात होते. परंतु आज लहान मुलेदेखील हृदयविकारामुळे जीव गमावत आहेत. आजकाल लहान-लहान शालेय मुले खेळता-खेळता अचानक चक्कर येऊन पडतात आणि डॉक्टर सांगतात की हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. इतकी लहान मुलेही हृदयरोगामुळे जीव गमावतात, हे खरोखरच आश्चर्यकारक वाटते; कारण आपल्या आजूबाजूचे वातावरणच इतके दूषित झाले आहे.

जागतिक हृदय महासंघानुसार, दरवर्षी वायुप्रदूषणामुळे 70 लाख लोकांचा मृत्यू होतो. वायुप्रदूषणाशी संबंधित मृत्यूंपैकी 50 टक्के मृत्यू हृदयरोग आणि स्ट्रोकमुळे होतात. स्वयंपाक करण्यासाठी आग पेटवल्यामुळे निर्माण होणाऱ्या धुराच्या संपर्कात आल्याने दरवर्षी 38 लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. दरवर्षी उच्च कोलेस्ट्रॉलमुळे 44 लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. ‘लॅन्सेट’मध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अहवालात सांगण्यात आले आहे की, अंदाजे 10 कोटी लोक अशा हृदयविकारांसह जीवन जगत आहेत, ज्यांच्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. यामध्ये जीव गमावणारे बहुतांश लोक गरीब असतात. वर्ष 2023 मध्ये जगभरात 23 लाख मुले जन्मजात हृदयरोगासह जन्माला आली. अमेरिकेत गुंतागुंतीच्या जन्मजात हृदयरोगासाठी प्रति रुग्ण आयुष्यभराचा सरासरी खर्च 2.1 मिलियन अमेरिकी डॉलर आहे, तर आयुष्यभराचा एकूण आर्थिक परिणाम 3.35 ट्रिलियन अमेरिकी डॉलरपेक्षाही अधिक आहे.

ग्लोबल अलायन्स फॉर क्रॉनिक डिसीजच्या मते, वर्ष 2021 मध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजारांमुळे 2.05 कोटी लोकांचा मृत्यू झाला, जे जगभरात झालेल्या एकूण मृत्यूंच्या 32 टक्के आहे. हृदयरोगामुळे होणाऱ्या 85 टक्के मृत्यूंपैकी हार्ट अटॅक आणि स्ट्रोक ही प्रमुख कारणे आहेत. यापैकी 75 टक्क्यांहून अधिक मृत्यू कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. देशात दरवर्षी हृदय आणि हृदय-वाहिन्यांशी संबंधित आजारांमुळे जवळपास 28 - 31 लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. वर्ष 2024 मध्ये हृदयरोगामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या 3,165,172 होती. भारतात हृदयविकाराच्या जवळपास 70 टक्के रुग्णांकडे आरोग्य विमा नाही आणि ते आर्थिक सुरक्षिततेपासून वंचित आहेत. या आजारामुळे जवळपास 32 टक्के रुग्ण आणि 36 टक्के कुटुंबांच्या मासिक उत्पन्नात मोठी घट होते. 17.7 टक्के कुटुंबांना वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी अनिश्चित काळासाठी कर्ज घ्यावे लागते किंवा मालमत्ता विकावी लागते.

हृदय कमजोर करणाऱ्या गोष्टींपासून सदैव दूर राहा. कोणत्याही प्रकारचे व्यसन जीवघेणे ठरू शकते. वजन, उच्च रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवा. पौष्टिक आहार घ्या. मानसिक ताणाकडे दुर्लक्ष करू नका, मानसिक आरोग्याची काळजी घ्या. आनंदी वातावरण निर्माण करा, समाधानी राहायला शिका. 8 तासांची पूर्ण झोप घ्या, दररोज व्यायाम करा, निरोगी छंदांना जोपासा. खोट्या दिखाव्यापासून दूर राहा. ज्यांना भावनांची कदर नाही, त्यांच्यापासून दूर राहा. लोकांकडून अपेक्षा ठेवू नका, आधुनिक जीवनशैलीचा त्याग करा. गोड पदार्थ, मसाला, मैदा, तेल, नमकीन, पॅकबंद खाद्यपदार्थ, कोल्ड्रिंक आणि अत्याधिक प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ शरीराचे नुकसान करतात. खाद्यपदार्थांची निवड चवीप्रमाणे नव्हे, तर त्यांच्या पोषणमूल्यांकडे पाहून करा.

प्लास्टिकपासून बनवलेल्या पिशव्या, भांडी आणि बाटल्यांचा वापर त्वरित बंद करा. खाद्यपदार्थांसाठी प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर विषासमान आहे. नेहमी स्वच्छतेची काळजी घ्या. आधुनिक साधनसामग्रीवरील अवलंबित्व कमी करा. आळसाचा त्याग करा. सतत बसून राहण्याचे काम टाळा; शक्य नसेल तर थोडा ब्रेक घ्या. सामाजिक परोपकाराची जाणीव ठेवा. पर्यावरणाला नुकसान पोहोचवणाऱ्यांचा कडाडून विरोध करा, कारण निरोगी राहण्यासाठी सर्वप्रथम शुद्ध ऑक्सिजन, पौष्टिक आहार आणि स्वच्छ पाणी आवश्यक आहे, हे कधीही विसरू नका. जेव्हा कोणी प्रदूषण, भेसळखोरी, अस्वच्छता, झाडांची तोड, अतिक्रमण, घोंघाटा किंवा भ्रष्टाचार करतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तो अप्रत्यक्षपणे आपलाच जीव घेत आहे. कीटकांप्रमाणे आपले जीवन वाया घालवू नका. जीवन पुन्हा मिळत नाही; आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.

लेखक – डॉ. प्रितम भि. गेडाम
(महाराष्ट्र शासनाद्वारे पुरस्कृत लेखक)
ईमेल आयडी – prit00786@gmail.com

Labels:

अनेक महिन्यांपासून आरओ प्लांट बंद; वसंतनगर-दुर्गानगरकरांचा पालिकेला आठ दिवसांचा अल्टिमेटम; ७ ऑक्टोबरला उपोषणाचा इशारा

अनेक महिन्यांपासून आरओ प्लांट बंद; 
वसंतनगर-दुर्गानगरकरांचा पालिकेला आठ दिवसांचा अल्टिमेटम; ७ ऑक्टोबरला उपोषणाचा इशारा

नळदुर्ग, दि. २९ सप्टेंबर :

शहरातील वसंतनगर - दुर्गानगर येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आमदार निधीतून सुमारे चार लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेला आरओ प्लांट गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. सार्वजनिक निधीतून उभारलेली सुविधा वापराविना पडून असल्याने वसंतनगर-दुर्गानगर परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्लांट आठ दिवसांत सुरू न झाल्यास दि. ७ ऑक्टोबर रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा रवी महाराज राठोड व नागरिकांनी दिला आहे.

वसंतनगर परिसरातील नागरिकांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने हा आरओ प्लांट उभारण्यात आला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तो बंद असल्याने योजनेचा मूळ उद्देशच बाधित झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना इंदिरानगर परिसरात जावे लागत असल्याने रोजच्या गरजेच्या पाण्यासाठीही त्यांना अंतर कापावे लागत आहे.
पाण्याचा स्रोत जवळ, तरीही प्लांट बंद
आरओ प्लांटच्या शेजारीच नगरपरिषदेने विंधन विहीर घेतली असून त्यास मुबलक पाणी  आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असतानाही आरओ प्लांट बंद का ठेवण्यात आला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्लांटच्या देखभाल-दुरुस्तीबाबत नगरपरिषद प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही होत आहे.

आरओ प्लांटची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी आणि नागरिकांसाठी तो नियमितपणे सुरू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्याकडे करण्यात आली आहे. आठ दिवसांत प्लांट सुरू न झाल्यास दि. ७ ऑक्टोबर रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर श उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

चार लाख रुपये खर्चून उभारलेल्या या सुविधेचा नागरिकांना लाभ मिळत नसल्याने आरओ प्लांट बंद असण्याचे कारण, त्याच्या देखभालीची जबाबदारी आणि तो सुरू करण्यासाठी करण्यात आलेली कार्यवाही याबाबत नगरपरिषद प्रशासनाने  माहिती देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
निवेदनावर रवी महाराज राठोड, संजय जाधव, दिलीप राठोड, गणेश राठोड, हनुमंत दुर्लेकर,मोहन राठोड, शेखर राठोड आदीच्या स्वाक्षरी आहेत.

Labels:

Monday, 28 September 2026

जागतिक कनिष्ठ सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी सुयश आडेची निवड; जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या वतीने गौरव

तांड्यातून थेट चीनच्या मैदानात; धाराशिवच्या सुयशची विश्वभरारी!

जागतिक कनिष्ठ सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी सुयश आडेची निवड; जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या वतीने गौरव 

धाराशिव, दि.२८ सप्टेंबर : शिवाजी नाईक 

तांड्या-वाड्यांच्या मातीत दडलेली क्रीडा गुणवत्ता आता थेट आंतरराष्ट्रीय मैदानावर झेप घेत आहे. धाराशिव शहरातील शिंगोली तांडा येथील होतकरू खेळाडू सुयश संजय आडे याची चीनमधील जिंगशान येथे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ५व्या जागतिक कनिष्ठ सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सुयशच्या या आंतरराष्ट्रीय भरारीमुळे धाराशिवच्या क्रीडाविश्वात नव्या आशेची पालवी फुटली आहे.

सुयश आडे हा रुईभर येथील जयप्रकाश विद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात सातत्याने सराव करीत त्याने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाने ग्रामीण आणि वंचित भागातील खेळाडूंसाठी प्रेरणेचा नवा अध्याय लिहिला आहे.

चीन येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सुयशचा गौरव केला. यावेळी त्यांनी सुयशला पेढा भरवून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सुयशच्या यशाचे कौतुक करताना, धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातही गुणवत्तेची कमतरता नसून योग्य संधी, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास येथील युवक जागतिक पातळीवर आपली क्षमता सिद्ध करू शकतात, हे या यशातून अधोरेखित झाले.
तांड्यातील युवकाची आंतरराष्ट्रीय झेप
शिंगोली तांड्यासारख्या ग्रामीण परिसरातून आलेल्या सुयशने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेपर्यंत मजल मारल्याने तांड्या-वाड्यांतील तसेच ग्रामीण भागातील युवा खेळाडूंच्या आशा उंचावल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठ गाठता येते, याचा आदर्श सुयशने निर्माण केला आहे.

यावेळी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे समर्थक सचिन राठोड, संतोष पटाडे, कालीदास आदी उपस्थित होते.

Labels:

आपलं घर शाळेची बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी : मुर्टा रस्त्यावरील अपघात; जखमींवर नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात उपचार

आपलं घर शाळेची बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी : मुर्टा रस्त्यावरील अपघात; जखमींवर नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात उपचार

नळदुर्ग, दि. २८ : 

मुंबई–हैदराबाद महामार्गावरून मुर्टा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी (२८) सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ‘आपलं घर’ शाळेची विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाली. या अपघातात बसमधील आठ विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले असून, त्यांना तातडीने नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, ‘आपलं घर’ शाळेची बस ( एम.एच.२५ ए.जे २६३६)  विद्यार्थ्यांना घेऊन मुर्टा गावाच्या दिशेने जात होती. मुर्टा रस्त्यावरील एका कॉर्नरजवळ चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच सुर्यकांत गायकवाड यांनी जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज संस्थांन रुग्णवाहिका चालक सुनील भोळे  यांना कळविले. त्यानंतर जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमी विद्यार्थी :
पूजा साळुंके (१४), साक्षी आतकरे (१५), दुर्वा शक्ती पवार (१०), पृथ्वीराज राजकुमार चव्हाण (१०), श्रावणी वामन चव्हाण (१४), अर्पिता वामन चव्हाण (१६), आलिशा अश्फाक शेख (१५) आणि राजेश भैय्यासाहेब भालेराव (१४), अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी भेट दिली. महामार्ग पोलिस केंद्राचे पोलिस हवालदार बालाजी बेंबडे,
पंडित शिंदे गणेश अर्धलिंग, सुर्यकांत गायकवाड, विक्रम पतंगे, राहुल टेलप, उदय पवार आदीसह नळदुर्ग व मुर्टा गाव व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताच्या घटनेमुळे पालकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

Labels:

ऊस उत्पादकांसाठी ‘तुळजापूर शुगर’ची मोठी घोषणा, प्रतिटन बत्तीशे रुपयांचा भाव देणार; यंदा दिड लाख टन गाळपाचे लक्ष्य - चेअरमन ॲड अनिल काळे यांची ग्वाही

ऊस उत्पादकांसाठी ‘तुळजापूर शुगर’ची मोठी घोषणा, प्रतिटन बत्तीशे रुपयांचा भाव देणार; यंदा दिड लाख टन गाळपाचे लक्ष्य - चेअरमन ॲड अनिल काळे यांची ग्वाही 

तुळजापूर, दि. २८ सप्टेंबर : 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा करत काटी येथील तुळजापूर शुगर प्रायव्हेट लिमिटेडने यंदाच्या २०२६-२७ गळीत हंगामात उसाला प्रतिटन ३ हजार २०१ रुपये भाव देण्याची घोषणा केली आहे. मराठवाड्यातील विक्रमी दर देण्याचा निर्धार कारखान्याचे चेअरमन ॲड अनिल काळे यांनी व्यक्त केला. रविवारी (दि. २७) कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन,  व  मोळीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
७५ हजारांवरून थेट दीड लाख टनांचे लक्ष्य!
तुळजापूर शुगरने सन २०२४-२५ मध्ये ट्रायल सीझनमध्ये २० हजार टन ऊस गाळप केले. त्यानंतर २०२५-२६ मध्ये गाळपाचा टप्पा ७५ हजार टनांवर नेण्यात आला. आता २०२६-२७ या हंगामात १ लाख ५० हजार टन ऊस गाळपाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट कारखान्याने निश्चित केले आहे.

कारखान्याने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलांसह ठेवीदार, वाहनमालक आदींची १०० टक्के बिले अदा केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कारखान्यावर विश्वास दृढ झाला असल्याचे ॲड काळे यांनी सांगितले.

‘बिले थकणार नाहीत’

शेतकरी आणि कामगारांचा विश्वास हीच कारखान्याची खरी ताकद आहे. यंदा दीड लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांचे ऊस बिल, वाहनमालक व तोडणी-वाहतूक ठेकेदारांची बिले वेळेत अदा केली जातील, अशी ग्वाही ॲड काळे यांनी दिली.

“शेतकऱ्यांनी तुळजापूर शुगरला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून सहकार्य करावे,” असे आवाहनही त्यांनी केले.

जास्त ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हस्ते पूजन
कारखान्याच्या मोळीपूजन कार्यक्रमात चेअरमन ॲड अनिल काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी ॲड सुनीता अनिल काळे यांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करण्यात आले. मागील हंगामात कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे जवळगाव येथील शेतकरी आकाश जाधव यांनी सपत्नीक मोळीपूजन केले. तसेच धामणगाव येथील शेतकरी नानासाहेब कदम यांनी सपत्नीक बॉयलर पूजन केले. यावेळी तुळजापूर शुगरचे कार्यकारी संचालक आदित्य काळे, ऋषी वडगावकर, गिरीश देशमुख, चीफ इंजिनिअर संदेश सूर्यवंशी, शेतकी अधिकारी संतोष तिडके यांच्यासह कारखान्याचे कामगार व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

३ हजार २०१ रुपयांचा भाव आणि दीड लाख टन गाळपाचे लक्ष्य यामुळे यंदाच्या हंगामात तुळजापूर शुगरकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Labels:

गरोदर महिलेच्या खुनातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या जाळ्यात

गरोदर महिलेच्या खुनातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या जाळ्यात ;धुळे जिल्ह्यातील निर्घृण हत्येप्रकरणी कारवाई; गुन्ह्यात वापरलेली कारही हस्तगत

धाराशिव, दि. २८ सप्टेंबर : 

धुळे जिल्ह्यातील नरवाळ परिसरात गरोदर महिलेचा निर्घृण खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी फरार असलेल्या पुरुष व महिला आरोपीला कळंब पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. 

फारुख हजु शेख (वय २९, रा. सुर्डी, ता. केज, जि. बीड, ह.मु. शेरे गल्ली, कळंब) आणि रोहिणी स्वप्निल जाधव ऊर्फ माधुरी महेंद्र मेघे (वय २६, रा. जामखेड कला केंद्र, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

 त्यांच्याकडून या गुन्ह्यात वापरलेली होंडा मोबिलिओ कारही पोलिसांनी हस्तगत केली.
२२ सप्टेंबर रोजी नरवाळ, ता. जि. धुळे येथील चाळीसगाव-धुळे महामार्गालगत मुरमा टेकड्यांच्या परिसरातील वनक्षेत्रात निर्जन ठिकाणी एका अनोळखी गरोदर महिलेचा मारहाण करून खून करण्यात आला होता. त्यानंतर तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेप्रकरणी मोहाडीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान मृत महिलेची ओळख नर्तिका पिंकी हनुमंत काटकर (वय ३१, रा. जामखेड कला केंद्र) अशी निष्पन्न झाली. या प्रकरणात सरफराज ऊर्फ शफीक अलीम मोमीन, आरीफ ऊर्फ खुज्या आसीफ शेख, लक्ष्मी बालाजी पवार, स्वाती ऊर्फ आरती गणेश कुहाडे यांना यापूर्वीच धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन मोहाडीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र फारुख शेख व रोहिणी जाधव हे दोघे फरार होते.

हॉटेलसमोर दबा धरून कारवाई

फरार आरोपी कळंब येथून केज रोडकडे जेवणासाठी जाणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिस निरीक्षक शकील शेख यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी केज रोडवरील ७/१२ हॉटेलसमोर सापळा रचला. पोलिसांचे पथक अंधारात दबा धरून बसले असताना संशयित पुरुष व महिला तेथे आढळून आले.
चौकशी केल्यानंतर त्यांची नावे व गुन्ह्यातील सहभागाची खात्री करण्यात आली. त्यानंतर दोन्ही आरोपींना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी मोहाडीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

नंबर प्लेट काढलेली कार बेवारस अवस्थेत
दरम्यान, आरोपींनी गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली पांढऱ्या रंगाची होंडा मोबिलिओ कार (क्रमांक MH 43 AR 4070) कळंब शहरात बेवारस अवस्थेत आढळून आली. कारची नंबर प्लेट काढण्यात आली होती. पोलिसांनी कार ताब्यात घेऊन तीही मोहाडीनगर पोलिसांच्या स्वाधीन केली.

ही कारवाई धाराशिव पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शकील शेख, सहायक पोलिस निरीक्षक समाधान बजबळकर, पोलिस हवालदार महादेव मुंडे, पोलिस हवालदार अजीज शेख आणि महिला पोलिस अंमलदार सपना गिते यांच्या पथकाने केली.


Labels:

शेतातील काम अडवून जातीवाचक शिवीगाळ; नळदुर्ग पोलिसात तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह गुन्हा


शेतातील काम अडवून जातीवाचक शिवीगाळ; नळदुर्ग पोलिसात तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह गुन्हा

नळदुर्ग, दि. २८ सप्टेंबर : 
तुळजापूर तालुक्यातील अलियाबाद शिवारातील शेतात काम करीत असलेल्या अनुसूचित जातीतील शेतकऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागनाथ भुजंगराव कांबळे (वय ५९, रा. अणदूर, ता. तुळजापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारास कांबळे हे अलियाबाद शिवारातील गट क्रमांक ६७ मधील त्यांच्या शेतात काम करीत होते. यावेळी अनिल  बेडगे, बंकट  बेडगे (दोघे रा. जळकोट) आणि तनविर अहमदहुसेन कुरेशी (रा. नळदुर्ग) यांनी संगनमत करून शेतातील काम अडविल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

आरोपींनी कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच शेतावर कब्जा करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी २६ सप्टेंबर रोजी रात्री १०.४६ वाजता भारतीय न्याय संहितेतील कलम १२६(२), ११५(२), ३५२, ३(५) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ मधील कलम ३(१)(r)(s), ३(२)(va) अन्वये गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याचा पुढील तपास तुळजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर पाटील करीत आहेत. पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Labels:

खो-खोच्या मैदानात नळदुर्ग महाविद्यालयाची दमदार झेप!

खो-खोच्या मैदानात नळदुर्ग महाविद्यालयाची दमदार झेप!
अंतर महाविद्यालयीन स्पर्धेत विद्यापीठस्तरीय द्वितीय क्रमांकावर मोहोर

नळदुर्ग, दि. २८ सप्टेंबर :

पाटोदा (जि. बीड) येथील वसंतदादा पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत विद्यापीठस्तरीय द्वितीय पारितोषिक पटकाविले. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या स्पर्धेत महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करीत प्रतिस्पर्धी संघांना कडवी झुंज दिली. खेळाडूंच्या वेगवान हालचाली, अचूक डावपेच आणि सांघिक समन्वयाच्या जोरावर संघाने अंतिम टप्प्यापर्यंत मजल मारत द्वितीय क्रमांक मिळविला.

 खो खो  विजयी संघात राज जाधव, सुधीर जाधव, अमर चव्हाण, भूषण पवार, तेजस पाटील, आकाश राठोड, राहुल चव्हाण, श्रीशंभो पेठे, जनार्दन सावंत, धन्यकुमार चव्हाण यांच्यासह अन्य खेळाडूंचा समावेश होता.

या यशाबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, सचिव उल्हास बोरगांवकर, कोषाध्यक्ष रामचंद्र आलुरे, संचालक बाबुराव चव्हाण, प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, उपप्राचार्य डॉ. अशोक कदम, मार्गदर्शक डॉ. कपिल सोनटक्के, कार्यालयीन अधीक्षक धनंजय पाटील तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

खेळाडूंनी आगामी स्पर्धांमध्येही सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी करावी, यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Labels:

रायफल शूटिंगमध्ये तैबा सौदागरचे सुवर्ण; कुस्तीत श्रावणी मुळजेची बाजीदोन्ही खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

 रायफल शूटिंगमध्ये तैबा सौदागरचे सुवर्ण; कुस्तीत श्रावणी मुळजेची बाजी
दोन्ही खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

नळदुर्ग, दि. २८ सप्टेंबर :
क्रीडा क्षेत्रात नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी दमदार कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. १९ वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. तैबा सौदागर हिने सुवर्णपदक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील महाविद्यालयांतून प्रत्येकी एक स्पर्धक सहभागी झाला होता. या स्पर्धेत तैबा सौदागर हिने अचूक नेमबाजी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

दरम्यान, जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेतही महाविद्यालयाच्या कु. श्रावणी मुळजे हिने ५२ किलो वजनगटात दमदार कामगिरी करत विजेतेपद मिळविले. तिचीही विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दोन्ही विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, सचिव उल्हास बोरगांवकर, रामचंद्र आलुरे, प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, उपप्राचार्य तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. विभागीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.



Labels:

Sunday, 27 September 2026

१८ वर्षे पूर्ण? मग मतदार यादीत नाव नोंदवा!’नळदुर्ग महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबिर; तरुणांना मतदानाच्या हक्काची जाणीव

‘१८ वर्षे पूर्ण? मग मतदार यादीत नाव नोंदवा!’, नळदुर्ग महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबिर; तरुणांना मतदानाच्या हक्काची जाणीव

नळदुर्ग, दि. २७ सप्टेंबर :

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तरुणांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग महत्त्वाचा असून, १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक तरुणाने आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी केले.

कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्ग आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने नवमतदार नाव नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 यावेळी तहसीलदार प्रमोद गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड होते.

राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. निलेश शेरे यांनी प्रास्ताविकातून नवमतदार नोंदणीचे महत्त्व स्पष्ट केले. भारतीय लोकशाही अधिक प्रगल्भ करण्यासाठी १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक तरुणाचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. नाव नोंदवल्यानंतर मतदानाच्या प्रक्रियेतही सक्रिय सहभाग घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

‘तरुणांनी मतदानाचा हक्क समजून घ्यावा’
तहसीलदार प्रमोद गायकवाड म्हणाले की, गावपातळीवर बीएलओ तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदार यादीत नवमतदारांची नावे समाविष्ट करण्याचे काम केले जाते. मात्र, विविध कारणांमुळे काही तरुण या प्रक्रियेपासून वंचित राहतात. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये शिबिरे घेऊन तरुणांमध्ये मतदार नोंदणी व मतदानाबाबत जनजागृती करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अशा उपक्रमांतून १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक तरुणाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी भारतीय राज्यघटनेने १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदानाचा अधिकार दिल्याचे सांगितले. मतदार यादीत नाव नोंदविणे ही प्रत्येक पात्र तरुणाची जबाबदारी आहे. देशाचे भविष्य तरुणांच्या हातात असून, तरुणांनी जागरूक होऊन लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतल्याशिवाय देशाची प्रगती शक्य नाही, असे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमास उपप्राचार्य डॉ. अशोक कदम व कार्यालयीन अधीक्षक धनंजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. लक्ष्मण थिट्टे, डॉ. बृहस्पती वाघमारे, प्रा. बाबासाहेब सावते, डॉ. दीपक जगदाळे, डॉ. शिवतेज भोसले, प्रा. बालाजी क्षीरसागर, उमेश सर्जे, भागिनाथ बनसोड यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Labels:

सर्पदंशाने मंदिर पुजाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

सर्पदंशाने मंदिर पुजाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

शाहापूर पंचक्रोशीत शोककळा; धार्मिक कार्यातील सक्रिय व्यक्तिमत्त्व हरपले

नळदुर्ग, दि. २७ सप्टेंबर :

तुळजापूर तालुक्यातील शाहापूर येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरासह विठ्ठल-रुक्मिणी व हनुमान मंदिराचे पुजारी काशिनाथ भगवान गिरी (वय ५२) यांचा सर्पदंश झाल्यानंतर उपचारादरम्यान सोलापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शाहापूर गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

काशिनाथ गिरी यांना चार-पाच दिवसांपूर्वी पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास घरातच विषारी सापाने कानाला दंश केला. दंश झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सापाला ठार केले व पत्नीला घटनेची माहिती दिली. त्यानंतर शेजारी जितेंद्र पाटील यांना कळवून त्यांना तातडीने खासगी वाहनातून सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, उपचार सुरू असतानाच रविवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. काशिनाथ गिरी हे शाहापूर पंचक्रोशीतील विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत सामाजिक व धार्मिक कार्यात योगदान देत होते. त्यांच्या अकस्मात निधनाने ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे. शेतकरी संघर्ष समितीचे नेते दिलीप जोशी यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.


Labels:

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत नळदुर्गच्या मल्लांची दमदार बाजी; अथर्व कांबळे, बसवराज कलशेट्टी व शिवराज पाटील यांची विभागीय स्तरावर निवड

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत नळदुर्गच्या मल्लांची दमदार बाजी; अथर्व कांबळे, बसवराज कलशेट्टी व शिवराज पाटील यांची विभागीय स्तरावर निवड

नळदुर्ग, दि. २७ सप्टेंबर :

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या मल्लांनी दमदार कामगिरी करत तीन सुवर्णवेध घेतले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे अथर्व कांबळे, बसवराज कलशेट्टी आणि शिवराज काकासाहेब पाटील यांची विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेत अथर्व कांबळे याने ६२ किलो ग्रीको-रोमन वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. बसवराज कलशेट्टी याने ९२ किलो फ्रीस्टाईल गटात अव्वल स्थान मिळविले. तसेच शिवराज काकासाहेब पाटील याने ६५ किलो ग्रीको-रोमन गटात प्रथम क्रमांक मिळवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली.

तीनही मल्लांनी जिल्हास्तरावर केलेल्या दमदार कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आता विभागीय स्तरावरील स्पर्धेतही या मल्लांकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.विजेत्यांना  प्रा.कपील सोनटक्के यांचे 
मार्गदर्शन लाभले.त्यांच्या यशाबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण , उपाध्यक्ष, डॉ अभय शहापूरकर, सचिव   उल्हास बोरगांवकर, रामचंद्र आलुरे, प्राचार्य डॉ सुभाष राठोड, उपप्राचार्य, व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा- यांनी अभिनंदन  करून पुढील वाटचालीस  शुभेच्छा दिल्या.

Labels:

मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षणाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;नवमतदार नोंदणीसाठी श्री माधवराव पाटील महाविद्यालयात विशेष मोहीम

मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षणाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;नवमतदार नोंदणीसाठी श्री माधवराव पाटील महाविद्यालयात विशेष मोहीम

मुरूम, ता. उमरगा, दि. २७ सप्टेंबर :

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ मोहिमेला मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंगळवार, २२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेत नवमतदार नोंदणीसह पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच परिसरातील पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेत मतदार यादीत आपले नाव नोंदवून घ्यावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी केले आहे.

नवीन मतदार नोंदणीसाठी पात्र तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे, प्रा. डॉ. सतीश शेळके, प्रा. डॉ. विनायक रासुरे, प्रा. अक्षय हलसे, प्रा. लक्ष्मण पवार, डॉ. महेश मोटे, प्रा. डॉ. विलास खडके आदींनी पुढाकार घेतला आहे. नमुना ६ भरून नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्याबाबत प्रा. डॉ. विलास खडके व डॉ. महेश मोटे यांच्याकडून सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.
१८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांना संधी
३१ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे पात्र भारतीय नागरिक नवीन मतदार म्हणून नोंदणी करू शकतात. अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक असून, त्याचे नाव अन्य कोणत्याही मतदारसंघातील मतदार यादीत आधीपासून समाविष्ट नसावे.

नवीन नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमुना ६ भरणे आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येतो. तसेच महाविद्यालयाशी संपर्क साधून नमुना ६ चा अर्ज घेऊन आवश्यक कागदपत्रांसह जमा करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही कागदपत्रे आवश्यक नोंदणीसाठी जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र, तसेच पॅनकार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, बँक अथवा पोस्ट ऑफिस पासबुक यापैकी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. पत्ता पुराव्यासाठी पाणीपट्टी, वीज बिल किंवा महसूल विभागाचे कागदपत्र आणि पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो आवश्यक आहे.
आगामी अंतिम मतदार यादीत पात्र नागरिकांचे नाव समाविष्ट होण्यासाठी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तसेच अद्याप मतदार म्हणून नोंदणी न झालेल्या नागरिकांनी विलंब न करता नमुना ६ भरून या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Labels:

Saturday, 26 September 2026

मध्यरात्री पोलिसाचा जुगार अड्ड्यावर छापा; २२ जुगारी जेरबंद, तिरट जुगारातून रोकड मोबाईल, चारचाकीसह तब्बल सव्वा सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त

मध्यरात्री पोलिसाचा जुगार अड्ड्यावर छापा; २२ जुगारी जेरबंद, तिरट जुगारातून  रोकड मोबाईल, चारचाकीसह तब्बल सव्वा सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव, दि. २६ सप्टेंबर :

वाशी तालुक्यातील मांडवा येथील पारधी पेढी परिसरात सुरू असलेल्या लाखो रुपयांच्या तिरट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मध्यरात्री धडाकेबाज कारवाई केली. संवेदनशील परिसरात नियोजनबद्ध पद्धतीने टाकलेल्या या छाप्यात पोलिसांनी २२ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत रोख रक्कम, १५ मोबाईल, जुगाराचे साहित्य व चारचाकी वाहन असा एकूण १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. २५ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना मांडवा गावातील पारधी पेढी परिसरात मोठ्या प्रमाणावर तिरट जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. संबंधित ठिकाण संवेदनशील असल्याने कारवाईचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार, जलद प्रतिसाद पथक तसेच दंगा नियंत्रण पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. त्यानंतर अचानक जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला.

 पोलिसांचा छापा पडताच जुगाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून पैशांची पैज लावत तिरट जुगार खेळणाऱ्या २२ जणांना ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान २ लाख ४६ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम, १५ मोबाईल फोन, जुगाराचे साहित्य आणि एक चारचाकी वाहन असा एकूण १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आली आहे.

दोन आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील पाहिजे
या कारवाईत पकडण्यात आलेल्या संतोष रमेश काळे (रा. मांडवा) हा १४ चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच अतुल कालीदास काळे (रा. कन्हेरवाडी पाटी) हा वाशी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, दत्ता राठोड, दया गादेकर, अशोक ढगारे, योगेश कोळी, चापोह महेबुब अरब, चापोशि केदार तसेच आरसीपी व क्यूआरटी पथकातील अंमलदारांनी केली. एलसीबीच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध जुगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

Labels:

नेदरलॅंडला सोयाबीन फूड ऑईल निर्यातीचे आमिष; सव्वासहा लाखांची फसवणूक!आंतरराष्ट्रीय कागदपत्रांच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप; नोएडातील चौघांविरुद्ध गुन्हा

नेदरलॅंडला सोयाबीन फूड ऑईल निर्यातीचे आमिष;  सव्वासहा लाखांची फसवणूक!
आंतरराष्ट्रीय कागदपत्रांच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप; नोएडातील चौघांविरुद्ध गुन्हा

तुळजापूर, दि. २६ सप्टेंबर :

नेदरलॅंड येथे सोयाबीन फूड ऑईलची निर्यात करून देण्याचे आमिष दाखवत, आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्याच्या नावाखाली तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील रामकृष्ण हरी कृषी व पणन सेवा सहकारी संस्थेची तब्बल ६ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तामलवाडी पोलिस ठाण्यात नोएडातील चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(२), ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विवेकानंद सुदर्शन जाधव (वय २०, रा. मसला खुर्द, ता. तुळजापूर) यांनी २५ सप्टेंबर २०२६ रोजी तामलवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणविर सिंग, आकांक्षा, भुपेंद्र सिंग व रिया ठाकूर (सर्व रा. नोएडा, उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

निर्यातीचे आमिष दाखवून विश्वास संपादन
फिर्यादीचे वडील सुदर्शन गोरख जाधव यांच्या नावे असलेल्या रामकृष्ण हरी कृषी व पणन सेवा सहकारी संस्था, मसला खुर्द यांच्याशी आरोपींनी संपर्क साधला. 'एंकाश ग्लोबल'च्या माध्यमातून सोयाबीन फूड ऑईल युरोपातील नेदरलॅंड येथे निर्यात करून देतो, तसेच त्यासाठी आवश्यक आंतरराष्ट्रीय कागदपत्रांची पूर्तता करून देण्याचे आश्वासन आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या आश्वासनामुळे विश्वास निर्माण झाल्यानंतर आरोपींनी निर्यात प्रक्रियेसाठी विविध कारणे सांगून पैसे मागितले. त्यानुसार आरटीजीएस तसेच यूपीआयच्या माध्यमातून वेळोवेळी एकूण ६ लाख ७५ हजार रुपये संबंधित खात्यावर जमा करण्यात आल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे.
पैसे घेतल्यानंतर फसवणूक झाल्याचा आरोप
फिर्यादीनुसार, आरोपींनी मोहित शर्मा यांच्या नावाने असलेल्या बँक खात्यावर ही रक्कम स्वीकारली. मात्र, पैसे घेतल्यानंतरही सांगितल्याप्रमाणे निर्यातीची प्रक्रिया पूर्ण न करता आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजल्यापासून २७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजेपर्यंतच्या कालावधीत ही आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तामलवाडी पोलिसांनी फिर्यादीच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Labels:

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक लाखांची मदत द्या,शेतकरी संघर्ष समितीसह शिवसेनेचे निवेदन; उजनीचे पाणी तुळजापूरला देण्याचीही मागणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना  एक लाखांची मदत द्या,शेतकरी संघर्ष समितीसह शिवसेनेचे निवेदन; उजनीचे पाणी तुळजापूरला देण्याचीही मागणी

तुळजापूर, दि. २६ सप्टेंबर :

तुळजापूर तालुक्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तालुक्यातील तातडीने  बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीसह शिवसेना उबाठाच्या वतीने शनिवारी शिवसेनेचे (उबाठा) माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह संबंधिताना  निवेदन देत विविध मागण्या मांडल्या आहेत.
तुळजापूर तालुक्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. सन २०२३ पासून तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत असून, मागील वर्षी अतिवृष्टी आणि यंदा पावसाच्या खंडाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शासनाने केवळ कागदोपत्री उपाययोजना न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

उजनीचे पाणी तुळजापूरला आणण्याची मागणी
तुळजापूर तालुक्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून रामधरा तलावामार्गे तुळजापूरला पाणी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. या योजनेबाबत शासनस्तरावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
पीकविमा व ऊस बिलाचा प्रश्नही ऐरणीवर
कृषी विभागाकडील पीकविमा अनुदानासह प्रलंबित ऊस बिले तातडीने शेतकऱ्यांना अदा करावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाकडे सादर केलेल्या विविध प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गाचा मुद्दा
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५२ वरील नळदुर्ग-अक्कलकोट मार्गासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन व्हावे, अशी मागणीही समितीने केली आहे. न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीबाबत संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही न केल्यास न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी पुढील कायदेशीर पाऊल उचलण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

याशिवाय एक रुपयात पीकविमा  शेतकरी हिताची योजना पुन्हा सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून, तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शिवसेनेचे कमलाकर चहाण, सरदारसिंग ठाकुर, संतोष पुदाले,  शाम कनकधर, सोमा मेहेत्रे नेताजी महाबोले, चंदु सगरे, खंडु माने,   दिलीप पाटील, पंडीत पाटील,  गुलाब शिंदे, महेश घोडके, मानसिंग ठाकूर, दशरथ ठाकूर, बालाजी ठाकूर, प्रताप ठाकूर आदी उपस्थित होते.

Labels:

अखेर दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांसाठी राज्य सरकारची ‘दिलासा’ पॅकेजची घोषणा!जमीन महसुलात सूट ते पीक कर्ज पुनर्गठन; वीजबिल, परीक्षा शुल्क माफीसह १२ उपाययोजना लागू

अखेर दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांसाठी राज्य सरकारची ‘दिलासा’ पॅकेजची घोषणा!
जमीन महसुलात सूट ते पीक कर्ज पुनर्गठन; वीजबिल, परीक्षा शुल्क माफीसह १२ उपाययोजना लागू

मुंबई, दि. २६ सप्टेंबर :

राज्यातील यंदाच्या खरीप हंगामात  (प्रथम कळ) लागू झालेल्या तब्बल २६५ तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागाला राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार या तालुक्यांसाठी विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
महसूल व वन विभागाच्या २४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त शेतकरी व नागरिकांना तातडीच्या मदतीसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

 Trigger-1 लागू झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या १२ उपाययोजनांचा समावेश
दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांसाठी शासनाने पुढील उपाययोजना जाहीर केल्या आहेत—
जमीन महसुलात सूट
पीक कर्जाचे पुनर्गठन
शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
७.५ हॉर्सपॉवरपर्यंत क्षमतेच्या कृषीपंपांच्या वीजबिलात सूट
शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
रोहयोच्या कामांच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे
आवश्यक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर
टंचाई जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या विहिरींच्या वीजजोडण्या खंडित न करणे
शेतीवर अवलंबून शेतकरी, मजूर आदींना अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी व्यवस्था
जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध करून देणे
जलसंधारणाची कामे सुरू करणे.

पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे
पिकांच्या नुकसानीची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धतीनुसार मिळण्यासाठी स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे कार्यवाही जाहीर करण्यात आली आहे. पिकांची सद्यस्थिती दर्शविणारे छायाचित्र व जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा अहवाल आयुक्त, कृषी यांच्यामार्फत शासनास तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे पावसाच्या प्रदीर्घ खंडाने अडचणीत आलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागाला तातडीच्या मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता घोषित सवलतींची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती वेगाने होते, याकडे दुष्काळग्रस्त तालुक्यांचे लक्ष लागले आहे.

Labels:

Friday, 25 September 2026

डॉल्बीचा कर्णकर्कश दणका; तलवारीसह गणपती विसर्जन मिरवणूकजळकोटमध्ये ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन; धोकादायक आरास, तलवार बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे

डॉल्बीचा कर्णकर्कश दणका; तलवारीसह गणपती विसर्जन मिरवणूक
जळकोटमध्ये ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन; धोकादायक आरास, तलवार बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे

नळदुर्ग, दि.२५ सप्टेंबर :

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज करीत ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन, तसेच वाहनावर धोकादायक पद्धतीने आरास उभारून सार्वजनिक रहदारी व विजेच्या तारांना धोका निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध नळदुर्ग पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. याच कारवाईत एका व्यक्तीकडे विनापरवाना धारदार तलवार आढळून आल्याने शस्त्र कायद्यान्वयेही स्वतंत्र कारवाई करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग बाळासाहेब बोबडे व अमोल नागनाथ पारवे (दोघेही रा. बसवंतवाडी, तुळजापूर) यांनी २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजण्याच्या सुमारास जळकोट येथे गणपती विसर्जन मिरवणूक काढली. या वेळी वाद्ये पारंपरिक पद्धतीने अथवा पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार न वाजवता डॉल्बी साउंड सिस्टीमचा आवाज निर्धारित ध्वनी तीव्रतेपेक्षा अधिक व कर्णकर्कश ठेवल्याचा आरोप आहे.

मिरवणुकीतील वाहनावर उंची व रुंदीच्या मर्यादांचा विचार न करता आरास उभारण्यात आली होती. त्यामुळे सार्वजनिक रहदारीस तसेच विजेच्या तारांना धोका निर्माण होण्याची शक्यता होती. गणेशमूर्तीचेही नुकसान होऊ शकते, अशा पद्धतीने मिरवणूक काढल्याचे पोलिसांच्या कारवाईत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, संबंधित टेम्पोमध्ये निसर्ग बोबडे याच्या ताब्यात विनापरवाना धारदार तलवार आढळून आली. या प्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी संबंधितांविरुद्ध स्वतंत्र दोन गुन्हे दाखल केले आहेत.

भा.न्या.सं. कलम २२३, २८१, २८५, २८९, २९२, २९३, पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम ३ व १५, ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० मधील कलम ३, ४, ५, ६, शस्त्र कायद्यातील कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये ही कारवाई करण्यात आली.

Labels:

समता, सेवा अन् माणुसकीचा नळदुर्गात जागर‘समतेच्या वाटेवर’ पुस्तक प्रकाशनासह "आपलं घर" बालगृहातील मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

‘समतेच्या वाटेवर’ पुस्तक प्रकाशनासह "आपलं घर" बालगृहातील मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर; मैत्री पब्लिकेशन, वृंदावन फाउंडेशन व राष्ट्र सेवा दलाचा संयुक्त उपक्रम

शिवाजी नाईक 
_______________
नळदुर्ग, दि. २५ सप्टेंबर :

 सामाजिक परिवर्तनाची वाटचाल, समतेचा विचार आणि बालकांच्या आरोग्याची जपणूक अशा सामाजिक बांधिलकीच्या दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांनी नळदुर्गमध्ये वैचारिक व सेवाभावी वातावरण निर्माण होणार आहे. संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनवादी कार्यकर्ते सचिन पाटील यांच्या सामाजिक, वैचारिक आणि सेवामय वाटचालीचा वेध घेणाऱ्या ‘समतेच्या वाटेवर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तसेच ‘आपलं घर’ बालगृहातील मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मैत्री पब्लिकेशन, पुणे व वृंदावन फाउंडेशन, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ४ ऑक्टोबर  रोजी सकाळी ११ वाजता ‘आपलं घर प्रकल्प’, नळदुर्ग येथे ‘समतेच्या वाटेवर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. तर संत चोखामेळा आरोग्य केंद्र, आळंदी (पुणे) व राष्ट्र सेवा दलाच्या ‘आपलं घर’ प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता बालगृहातील मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे.
परिवर्तनवादी विचारांना मिळणार व्यासपीठ
‘समतेच्या वाटेवर’ या पुस्तकातून सचिन पाटील यांच्या सामाजिक, वैचारिक आणि सेवामय कार्याचा वेध घेण्यात आला आहे. समता, सेवा आणि माणुसकीच्या मूल्यांना समर्पित असलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने साहित्य, सामाजिक कार्य आणि परिवर्तनवादी विचारांशी संबंधित मान्यवर एकत्र येणार आहेत.
प्रकाशन सोहळ्यास माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची  उपस्थिती राहणार असून अध्यक्षस्थानी माजी  खासदार डॉ. सुनीलराव गायकवाड तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी साथी गुंड्डू पवार, प्रा. अलका सपकाळ , भैरवनाथ कानडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे निमंत्रक साथी संतोष बुरुंगे, मोहिनी कारंडे आणि सिद्धेश्वर माने आहेत.
बालगृहातील मुलांची आरोग्य तपासणी
दरम्यान, ‘आपलं घर’ बालगृहातील मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात बालकांची संपूर्ण आरोग्य तपासणी, वाढ व पोषण मूल्यांकन, आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन तसेच मूलभूत औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

शिबिराचे उद्घाटन बाल कल्याण समितीचे सदस्य दयानंद काळुके यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय महाजन, अध्यक्ष, संत चोखामेळा आरोग्य केंद्र, आळंदी तसेच गोरख जगताप, सचिव, ‘आपलं घर’ प्रकल्प व्यवस्थापन समिती, नळदुर्ग उपस्थित राहणार आहेत.

यावेळी डॉ. शशिकांत सोमवंशी, संदीप चवले,  सौदागर पवार यांचीही उपस्थिती राहणार आहे. या उपक्रमाचे संयोजन साथी संतोष बुरुंगे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

विचार आणि सेवेला एकाच व्यासपीठाची जोड
एकीकडे ‘समतेच्या वाटेवर’ या पुस्तकातून सामाजिक समता, सेवा आणि माणुसकीचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे बालगृहातील मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्यक्ष आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे नळदुर्गातील हे दोन्ही उपक्रम विचार आणि कृती यांचा संगम घडविणारे ठरणार आहेत.

समतेचा विचार आणि निरोगी बालपण या दोन्ही सामाजिक मूल्यांना बळ देणाऱ्या या उपक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Labels:

Thursday, 24 September 2026

मी नाही, तर तुम्ही’चा सेवाभाव रुजवा; मुरूम महाविद्यालयात एनएसएस स्थापना दिन उत्साहात

‘मी नाही, तर तुम्ही’चा सेवाभाव रुजवा; मुरूम महाविद्यालयात एनएसएस स्थापना दिन उत्साहात

मुरूम, दि. २४ सप्टेंबर :

‘मी नाही, तर तुम्ही’ या सेवाभावी विचारातून समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन प्राचार्य गोविंद इंगोले यांनी केले. भारत शिक्षण संस्था, उमरगा संचलित कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मुरूम येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन व उद्घाटन शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी, सेवाभाव, राष्ट्रप्रेम आणि नेतृत्वगुणांची जाणीव करून देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद इंगोले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. मनोज गायकवाड, तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. किसन माने, प्रा. सुजित चिकुंद्रे व प्रा. भगवान चौगुले उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना प्रा. मनोज गायकवाड यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण करणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगितले. समाजाच्या विकासात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. सेवा, समर्पण आणि परिवर्तन ही मूल्ये अंगीकारून विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी कार्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य गोविंद इंगोले यांनी ‘मी नाही, तर तुम्ही’ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विचारामागील व्यापक सामाजिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांसमोर मांडला. स्वतःपुरते न जगता समाजासाठी काहीतरी करण्याची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण करणे, हे एनएसएसचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ‘सेवा ही केवळ कृती नसून भावना आहे; समाजासाठी जगणे हीच खरी राष्ट्रीय सेवा आहे,’ असे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. गजानन उपासे व प्रा. प्रसाद इंगोले यांनी केले. 

कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक-स्वयंसेविका तसेच शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थापना दिनानिमित्त झालेल्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कार्याची प्रेरणा निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन बी. व्ही. मोरे यांनी केले, तर आभार आय. पी. चौधरी यांनी मानले.

Labels:

शब्दांच्या मैफलीत रंगला मुरूमचा साहित्यिक सोहळा, नामवंत कवींच्या बहारदार काव्य वाचनाने रसिकांची मने जिंकली

शब्दांच्या मैफलीत रंगला मुरूमचा साहित्यिक सोहळा, नामवंत कवींच्या बहारदार काव्य वाचनाने रसिकांची मने जिंकली

मुरूम, दि. २४ सप्टेंबर :

कधी सामाजिक वास्तवाचा आरसा, कधी ग्रामीण जीवनातील गंमत, तर कधी मानवी नात्यांचा हळवा स्पर्श... अशा विविध भावछटांनी मुरूम येथील श्री. माधवराव पाटील महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहात काव्याची मैफल रंगली. नामवंत कवींच्या बहारदार काव्यवाचनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिल्याने कवी संमेलनाला साहित्यिक रंगत लाभली.

अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष, सांस्कृतिक विभाग आणि श्रीराम गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. २२) कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार अध्यक्षस्थानी होते. उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, संस्थेचे संचालक प्रा. डॉ. सतीश शेळके, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे, मुख्याध्यापक उल्हास घुरघुरे, श्रीराम गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी, डॉ. रवींद्र गायकवाड, प्रा. गोपाळ कुलकर्णी आदी उपस्थित होते.
बालमनापासून सामाजिक वास्तवापर्यंत...
छत्रपती संभाजीनगरचे कविवर्य गणेश घुले यांनी बालमन, शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, माणुसकी, नातेसंबंध आणि सामाजिक वास्तवाला स्पर्श करणाऱ्या आशयघन कविता सादर केल्या. साध्या शब्दांत प्रभावी आशय मांडत त्यांनी रसिकांना अंतर्मुख केले. संघर्ष, प्रेम आणि जीवनमूल्यांचे विविध पदर त्यांच्या कवितांतून उलगडले.

पुण्याचे डॉ. स्वप्नील चौधरी यांनी समकालीन सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या कविता सादर केल्या. त्यांच्या चर्चेत असलेल्या ‘चल दंगल समजून घेऊ’ या रचनेतून सामाजिक घटनांकडे चिकित्सक नजरेने पाहण्याचा संदेश दिला. त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

परभणीचे कवी संतोष नारायणकर यांनी ग्रामीण बोलीतील विनोदी ढंगातून सभागृहात हास्याची कारंजी उडवली. ‘मामाला माझ्या’ या लोकप्रिय रचनेला रसिकांनी भरभरून दाद दिली. विनोदासोबतच ग्रामीण जीवन, नाती आणि सामाजिक वास्तवाचे चित्रण त्यांच्या कवितेतून प्रभावीपणे उमटले.

पुण्याचे कवी श्रीराम पोतदार यांनी समाज, संस्कृती, पर्यावरण, युवकांचे प्रश्न, स्त्रीशक्ती, शेतकरी, ग्रामीण जीवन, प्रेम, विद्यार्थी-शिक्षक नाते आणि समकालीन वास्तव अशा विविध विषयांना कवितेच्या माध्यमातून भिडवले.
स्थानिक कवींनीही रंगत वाढवली
मुरूमचे निर्मलकुमार लिमये आणि आशिष वेदपाठक यांनीही आपल्या कविता सादर करून काव्यमैफलीत स्थानिक साहित्यिक रंग भरला. विविध विषय, वेगवेगळ्या शैली आणि भावनांचा सुंदर मिलाफ झाल्याने संमेलनाला बहुआयामी स्वरूप प्राप्त झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. राम बजगिरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी केले, तर श्रीराम कुलकर्णी यांनी आभार मानले. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच साहित्यप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Labels:

Wednesday, 23 September 2026

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी इंगळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात; अखेर करजखेड्यात थेट भेट!

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी इंगळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात; अखेर करजखेड्यात थेट भेट!

दुष्काळाची दाहकता फडणवीसांसमोर मांडत स्वाभिमानीची शेतकरी मदतीसाठी आक्रमक भूमिका
 
तुळजापूर, दि. २३ सप्टेंबर  :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रवींद्र भीमाशंकर इंगळे यांना तुळजापूर पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले. मात्र, पोलिसांच्या या कारवाईने इंगळे यांची शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याची भूमिका अधिकच ठाम झाली. अखेर उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर पाटील यांच्या मध्यस्थीनंतर इंगळे यांना करजखेडा येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देण्यास परवानगी देण्यात आली.

पोलिस बंदोबस्तात करजखेडा येथे पोहोचलेल्या इंगळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत दुष्काळाची तीव्रता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. 
“मुख्यमंत्री साहेब, यंदाचा दुष्काळ अत्यंत कठीण आहे. शासनाची भरीव मदत मिळाल्याशिवाय शेतकरी या संकटातून सावरणे शक्य नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपण दुष्काळाची पाहणी करण्यासाठीच आलो असून, परिस्थितीची गंभीरता निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही दिल्याचे इंगळे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी इंगळे यांना ताब्यात घेतल्याने काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. मात्र, अखेर शेतकऱ्यांचा आवाज थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात स्वाभिमानीला यश आले.
यावेळी धनाजी पेंदे, विष्णू काळे, शहाजी सोमवंशी, तात्या पवार, भोजने, मनोज सरवदे, महादेव टेकाळे, राजेंद्र हाके यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Labels:

भुतांच्या साम्राज्यात गणरायाचा जल्लोष! नळदुर्गच्या ‘भूत बंगल्या’ने उडवली नागरिकांची भंबेरी

भुतांच्या साम्राज्यात गणरायाचा जल्लोष! नळदुर्गच्या ‘भूत बंगल्या’ने उडवली नागरिकांची भंबेरी

नळदुर्ग, दि. २३ सप्टेंबर :

गणेशोत्सवातील पारंपरिक धार्मिक वातावरणाला थराराची किनार देत शास्त्री चौकातील जय हनुमान तरुण गणेश मंडळाने यंदा ‘भूत बंगला’ हा आगळावेगळा देखावा साकारला आहे. भेसूर हालचाली, काळोखातून उमटणारे आवाज, लक्षवेधी प्रकाशयोजना आणि प्रभावी ध्वनीसंयोजनामुळे हा देखावा गणेशभक्तांसह नागरिकांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे.
जय हनुमान तरुण गणेश मंडळाकडून दरवर्षी सामाजिक, धार्मिक तसेच मनोरंजनात्मक विषयांवर वैविध्यपूर्ण देखावे सादर केले जातात. यंदा ‘भूत बंगला’च्या माध्यमातून मंडळाने या परंपरेत वेगळा प्रयोग केला आहे. देखाव्यातील थरारक दृश्ये आणि कलाकारांच्या जिवंत अभिनयामुळे परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून, हा अनोखा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

"दरम्यान, सोमवारी मंडळाच्या वतीने गणरायाची आरती लखन कांबळे यांनी सपत्नीक केली. तसेच कै. मल्लिनाथ शिवाजी कांबळे यांच्या स्मरणार्थ भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले."

‘भूत बंगल्या’च्या नाट्यमय सादरीकरणात नीरज गेहरवार, आरक्ष काळे, ओम ठाकूर, अमित ठाकूर, राहुल कोकणे, समर्थ ठाकूर, समर्थ घोडके, समर्थ काळे, अनिल वाघमारे, संजय फरताळे आदी कलाकार सहभागी झाले आहेत.
मंडळाचे अध्यक्ष गजानन हळदे, उपाध्यक्ष राहुल ठाकूर व किरण दुस्सा, कोषाध्यक्ष अजय कांबळे व नीरज गेहरवार, सहसचिव आकाश कोकणे व लखन कोकणे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते देखाव्याच्या उभारणीसाठी परिश्रम घेत आहेत.

Labels:

आरळी बुद्रुकच्या कुस्ती आखाड्यात होर्टीच्या मल्लांची दणदणीत कामगिरी!लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची विजयी झेप; तीन मुलींना सुवर्णयश

कार्तिकी भोसले 

आरळी बुद्रुकच्या कुस्ती आखाड्यात होर्टीच्या मल्लांची दणदणीत कामगिरी!
लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची विजयी झेप; तीन मुलींना सुवर्णयश

नळदुर्ग, दि. २३ सप्टेंबर : 

आरळी बुद्रुक (तुळजापूर) येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत होर्टी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या मल्लांनी दमदार कामगिरी करत चार प्रथम क्रमांक पटकावले. यात तीन मुलींनी आपल्या गटात अव्वल ठरत कुस्तीच्या आखाड्यात विद्यालयाचा झेंडा उंचावला.

५७ किलो वजनी गटात कार्तिकी दत्ता भोसले, ५३ किलो गटात अश्विनी सुभाष भोसले, ४८ किलो गटात मंजिरी दत्ता घोडके यांनी मुलींच्या गटातून प्रथम क्रमांक मिळवला. मुलांच्या ४८ किलो वजनी गटात शंभुराजे परमेश्वर भोसले याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपद पटकावले.
या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ कल्लशेट्टी, सर्व शिक्षक, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष दत्ता भोसले तसेच ग्रामस्थांनी यशस्वी मल्लांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी भर पडली असून, पुढील स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Labels:

राज्यस्तरीय लाठी चॅम्पियनशिपमध्ये धिरज पवार, वीर कोंगुळवार यांना सुवर्णपदक; देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय लाठी चॅम्पियनशिपमध्ये धिरज पवार, वीर कोंगुळवार यांना सुवर्णपदक; देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड

उमरगा, दि. २३ सप्टेंबर : 

विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही प्रावीण्य मिळवावे. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आत्मविश्वास, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांत सर्वगुणसंपन्न होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक तथा कवी भूमिपुत्र वाघ यांनी केले.

उमरगा येथील जिवलगा सामाजिक बहुउद्देशीय संस्था, गुंजोटी संचलित डॉ. रामानुजन प्री-प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नागपूर येथे झालेल्या ७ व्या राज्यस्तरीय लाठी चॅम्पियनशिप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. चि. धिरज लक्ष्मण पवार याने एकम लाठी प्रकारात, तर चि. वीर चैतन्य कोंगुळवार याने पंचम लाठी प्रकारात आपल्या गटातून खेळताना सुवर्णपदक पटकावले. या यशाबद्दल शाळेच्या वतीने दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी भूमिपुत्र वाघ बोलत होते.

भूमिपुत्र वाघ यांनी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून संवाद साधत क्रीडा क्षेत्राचे महत्त्व पटवून दिले. माजी गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण, क्रीडा शिक्षक महंमदरफी शेख, पत्रकार सचिन बिद्री व महेश अंबर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या यशाचे कौतुक केले.

देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड
राज्यस्तरीय स्पर्धेतील दमदार कामगिरीनंतर धिरज पवार व वीर कोंगुळवार यांची देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. लाठी हा क्रीडा प्रकार विद्यार्थ्यांसाठी भविष्यात संधी निर्माण करणारा असून, सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर पुढील स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करावी, अशी अपेक्षा क्रीडा शिक्षक महंमदरफी शेख यांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावण्याचा धिरजचा निर्धार
“नागपूर येथील राज्यस्तरीय लाठी चॅम्पियनशिपमध्ये एकम लाठी प्रकारात सुवर्णपदक मिळाले. या यशासाठी शाळेचे अध्यक्ष महेश अंबर व क्रीडा शिक्षक महंमदरफी शेख यांचे मार्गदर्शन लाभले. भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे,” असा निर्धार सुवर्णपदक विजेता धिरज लक्ष्मण पवार याने व्यक्त केला.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष महेश अंबर, सचिव गुलाब माळी, प्रमुख मार्गदर्शक तथा माजी गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण, पत्रकार अंबादास जाधव, सचिन बिद्री, लक्ष्मण पवार, विकास गायकवाड, नसरोद्दीन फकीर, महादेव पाटील, राहुल थोरात, विशाल देशमुख, प्राचार्य युसूफ मुल्ला, अमोल पाटील, महेबुब पठाण तसेच विद्यार्थ्यांचे पालक भक्ती लक्ष्मण पवार व पूनम चैतन्य कोंगुळवार उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहशिक्षक गंगा अंबर, दुर्गाराणी बिद्री, श्रीनिधी गोडेकर, संध्या ममाळे, कांचन खंडाळकर, कल्याणी बबलादे, अश्विनी मुळे, उज्वला धुमाळ, प्राजक्ता गुरव, रंजना मुळे, मंजुश्री घोंगडे, स्वाती जेवळे व धनश्री अंबर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक दुर्गा बिद्री यांनी केले, तर गंगा अंबर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

Tuesday, 22 September 2026

दुष्काळाच्या झळा सोसताना जुगाराचा विळखा; नळदुर्ग परिसरात कारवाईची मागणी

दुष्काळाच्या झळा सोसताना जुगाराचा विळखा; नळदुर्ग परिसरात कारवाईची मागणी
वसंतनगरात ऑनलाइन चक्री जुगार सुरू असल्याचा आरोप; सलगरा दिवटीसह जळकोट, अणदूर, इटकळ बीटमध्ये पत्त्यांचे क्लब सुरू असल्याची नागरिकांची तक्रार

नळदुर्ग, दि. २२ सप्टेंबर :

एकीकडे दुष्काळाच्या तीव्र झळांनी सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना सणासुदीच्या काळात नळदुर्ग शहर व परिसरात कथित चक्री जुगार आणि पत्त्यांचे क्लब पुन्हा सुरू झाल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांवर अधिक संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त करीत नागरिकांनी पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

नळदुर्ग शहरातील वसंतनगर परिसरात ऑनलाइन चक्री जुगार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. यापूर्वीही शहरात ऑनलाइन जुगार सुरू झाल्यानंतर विद्यार्थी, शेतकरी कुटुंबातील युवक तसेच विविध घटकांतील नागरिक त्याच्या आहारी गेल्याचे प्रकार घडल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. त्यावेळी पोलिसांनी कारवाई करून हा प्रकार बंद केला होता. आता काही कालावधीनंतर पुन्हा अशाच प्रकाराला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सलगरा दिवटी बीटमध्ये पत्त्यांचा क्लब सुरू असल्याची तक्रार पुढे आली आहे. तसेच जळकोट, अणदूर आणि इठकळ बीटमध्येही चक्री जुगार व पत्त्यांचे क्लब सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या तक्रारींची पोलिसांनी प्रत्यक्ष पडताळणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सध्या तुळजापूर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेती व रोजगारावर त्याचा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत जुगाराच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक अथवा नुकसान होऊ नये, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर पाटील आणि नळदुर्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी शहरासह ग्रामीण बीटमध्ये सुरू असल्याच्या तक्रारींची चौकशी करून बेकायदेशीर जुगार आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पोलिसांच्या कारवाईकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Labels: