Tuesday, 30 June 2026

पूर्वीच्या ठिकाणाऐवजी किल्ला गेट ते चावडी चौक दरम्यान भरणार आठवडी बाजार; व्यापारी व नागरिकांना दिलासा


पूर्वीच्या ठिकाणाऐवजी  किल्ला गेट ते चावडी चौक दरम्यान आठवडी बाजार; व्यापारी व नागरिकांना  दिलासा


नळदुर्ग, दि. ३० जून : 


नळदुर्ग शहरातील अनेक वर्षांपासून भरत असलेल्या आठवडी बाजाराच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला असून, येत्या रविवार, दि. ५ जुलै पासून बाजार नवीन नियोजनानुसार भरविण्यात येणार आहे. याबाबत नगरपालिकेच्या वतीने शहरात दवंडी देऊन शेतकरी, फळ विक्रेते, भाजीपाला व्यावसायिक तसेच सर्व बाजारकरुना नव्या व्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत कुरेशी गल्ली ते साठेनगर मार्गावर भरणारा आठवडी बाजार वाहतूकीस अडथळा, अस्वच्छता आणि नागरिकांच्या गैरसोयीचा विषय ठरत होता. अरुंद रस्ता, वाढती गर्दी आणि घाणीचे साम्राज्य यामुळे व्यापारी तसेच नागरिकांकडून सातत्याने नाराजी व्यक्त होत होती. या प्रश्नावर 'तुळजापूर लाईव्ह' तसेच नळदुर्ग व्यापारी मंडळाने सातत्याने आवाज उठवून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली होती. या मागणीची सकारात्मक दखल घेत नगरपालिकेने बाजाराचे नियोजन बदलण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नगरपालिका कर्मचारी आनंद खारवे व सतीश गायकवाड यांनी रविवारी शहरात दवंडी देत जाहीर केले की, दि. ५ जुलैपासून कुरेशी गल्ली ते साठेनगर या मार्गावर शेतकरी, भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी व्यवसाय करू नये. त्याऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्र ते ऐतिहासिक किल्ला गेट, पोलीस ठाणे आणि चावडी चौक या परिसरात आठवडी बाजार भरविण्यात येणार आहे.

या बदलामुळे शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून, पर्यटक, ग्राहक, व्यापारी आणि बाजारकरुना  अधिक सुलभ व सुरक्षित वातावरण उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 


दरम्यान, नळदुर्ग व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष मुकूंद नाईक यांनी नगरपालिकेच्या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, "भाजीपाला व साप्ताहिक बाजार किल्ला गेट ते चावडी चौक या परिसरात नियमित भरविण्याच्या व्यापारी मंडळाच्या मागणीची सकारात्मक दखल घेऊन दवंडीद्वारे सूचना करण्यात आली आहे. तसेच येत्या रविवारी बॅरिकेट्स उभारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नगरपालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांचे मनःपूर्वक आभार. व्यापारी व नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह असून शहराच्या सुव्यवस्थित विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे."


Labels:

कोथळी येथील प्रतिभा निकेतन विद्यालयास रोटरी क्लबकडून स्मार्ट टीव्ही भेट

कोथळी येथील प्रतिभा निकेतन विद्यालयास रोटरी क्लबकडून स्मार्ट टीव्ही भेट

​मुरूम, ता. उमरगा, दि. ३०  :

 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी आणि त्यांचे शिक्षण अधिक प्रभावी व्हावे, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ मुरूम सिटीच्या वतीने कोथळी येथील प्रतिभा निकेतन विद्यालयास 'स्मार्ट टीव्ही' भेट देण्यात आला. 

या उपक्रमाचे उद्घाटन मंगळवारी ( ता. ३०) कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवराज पाटील होते. प्रारंभी कै. माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, सचिव कलाप्पा पाटील, माजी अध्यक्ष गोविंद पाटील, डॉ. नितीन डागा, प्रा. डॉ. महेश मोटे, उपसरपंच बाबासाहेब पाटील, नूतन अध्यक्ष कलय्या स्वामी, कोषाध्यक्ष प्रकाश रोडगे, मुख्याध्यापक इरफान मुजावर, पालक मल्लिनाथ बिराजदार, हनुमंत आपचे, बिभीषण कांबळे, पोर्णिमा कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या समर्थ बिराजदार, समीक्षा कांबळे, प्राजक्ता स्वामी, अस्मिता आलेगावे, प्रज्ञा कांबळे, गणेश जमादार, मल्लिकार्जुन बिराजदार, रितेश कांबळे, भाग्येश कट्टेपुरे, ओमकार पाटील, समर्थ बेळवडे, शिवानंद स्वामी, लक्ष्मण बंदीछोडे, इब्राहिम मकानदार, अमिना शेख या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला.

आपल्या मनोगतात डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी म्हणाले की, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी डिजिटल साधनांचा वापर करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे. भविष्यात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवण्यासाठी या स्मार्ट टीव्हीचा मोठा फायदा होईल. यावेळी गोविंद पाटील, डॉ. नितीन डागा, डॉ. महेश मोटे यांनी रोटरी क्लबच्या कार्याचा आढावा घेत या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक इरफान मुजावर यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब सोनकटले यांनी केले तर आभार रवींद्र सुरवसे यांनी मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश गुरव, नंदू आपचे आणि रवी गावडे यांनी विशेष पुढाकार घेतला.

 फोटो ओळ :  कोथळी, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात रोटरी क्लब मुरूम सिटी च्या वतीने स्मार्ट टीव्ही व शालेय साहित्य वाटप करताना मान्यवरांसह शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी.

Labels:

कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्ग मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्ग मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

नळदुर्ग, दि. ३० जून :
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी नळदुर्ग शहरातील  गोलाई चौकात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
 या सामाजिक उपक्रमात तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हे रक्तदान शिबिर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यातून गरजू रुग्णांना मदतीचा हात मिळणार आहे. युवकांसह सर्व पात्र नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आयोजकांनी नमूद केले आहे.

रक्तदात्यांचा उत्साह वाढावा यासाठी प्रत्येक रक्तदात्यास रक्तदानाचे प्रमाणपत्र, टेबल फॅन तसेच पाण्याचा जार भेट म्हणून देण्यात येणार आहे.

या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन समस्त गावकरी मंडळ, वसंतनगर (नळदुर्ग) यांच्या वतीने करण्यात आले असून, रक्तदान करून मानवतेच्या सेवेत योगदान देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Labels:

Monday, 29 June 2026

नळदुर्ग नगरपालिकेच्या लेखा विभागातील कथित गैरकारभाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी; दोषींवर कठोर कारवाईची मागणी तीव्र

नळदुर्ग नगरपालिकेच्या लेखा विभागातील कथित गैरकारभाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी; दोषींवर कठोर कारवाईची मागणी तीव्र

नळदुर्ग, दि. ३० जून :

नळदुर्ग नगरपालिकेच्या लेखा विभागातील कथित आर्थिक गैरकारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिका कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

मागील आर्थिक वर्षांतील नगरपालिकेचे मंजूर अंदाजपत्रक (बजेट) व सुधारित अंदाजपत्रकाची तपासणी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याच कालावधीत विविध विभागांमार्फत झालेल्या खर्चाचा तपशील, ५० हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च करून करण्यात आलेल्या कामांची शहानिशा, तसेच संबंधित कामांची गुणवत्ता व आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

याशिवाय ठेकेदार व पुरवठादारांना अदा करण्यात आलेल्या देयकांचे धनादेश, बिले, व्हाउचर तसेच सर्व आर्थिक नोंदींची तपासणी व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. नगरपालिकेच्या सर्व बँक खात्यांमधील शिल्लक रक्कम, मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण (ऑडिट) अहवाल, त्यातील हरकती आणि त्या हरकतींवर प्रशासनाने कोणती कार्यवाही केली, याचाही खुलासा करण्याची मागणी होत आहे.

राज्य व केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या विविध योजनांतील अनुदानाचा नेमका उपयोग कोणत्या कामांसाठी करण्यात आला, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि मानधनावर झालेला एकूण खर्च, तसेच मालमत्ता कर, पाणी कर आणि इतर करांमधून जमा झालेल्या महसुलाचा विनियोग कोणत्या विकासकामांसाठी करण्यात आला, याचीही चौकशी व्हावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

यासोबतच नगरपालिकेच्या कर थकबाकीदारां विरोधात प्रशासनाने कोणती कारवाई केली, थकबाकी वसुलीची स्थिती काय आहे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता का राखली गेली नाही, असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, लेखा विभागातील कथित आर्थिक अनियमिततेस जबाबदार असलेल्या तत्कालीन आधिकारी व कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी  नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाकडे आता स्थानिक नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांचेही लक्ष लागले असून प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगरपालिकेच्या अंदाजपत्रकाविरोधात काँग्रेसचा लढा कायम
नळदुर्ग नगरपालिकेच्या अंदाजपत्रकास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध नोंदवत ते प्रथम स्थायी समितीत मांडून नंतर सर्वसाधारण सभेची मंजुरी घेण्याची मागणी  लेखी व तोंडी करुन हा विषय प्रोसिंडिगवर  घेण्याची मागणी केली होती. मात्र नगराध्यक्षांनी ती मागणी डावलून अंदाजपत्रक मंजूर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंदाजपत्रकातील आक्षेपार्ह बाबींविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्यात आले असून ते पुढे विभागीय आयुक्त, संभाजीनगर यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. नगरपालिकेतील गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी विरोधी पक्षाचा पाठपुरावा सुरूच राहील, असे काँग्रेसचे गटनेते मारुती खारवे यांनी सांगितले.

Labels:

सामाजिक क्रांती आणि महात्मा बसवेश्वरांचे तत्वज्ञानलेखक:प्रा. डॉ. महेश मोटे

सामाजिक क्रांती आणि महात्मा बसवेश्वरांचे तत्वज्ञान

लेखक:प्रा. डॉ. महेश मोटे 

महात्मा बसवेश्वर क्रांतीकारी समाजसुधारक आणि त्यांचे सद्यस्थितीतील विचार.
​बाराव्या शतकातील कर्नाटकच्या भूमीतून उगम पावलेले महात्मा बसवेश्वर हे केवळ एक धर्मगुरू नव्हते, तर ते एक महान मानवतावादी, अर्थशास्त्रज्ञ आणि लोकशाहीचे आद्य प्रणेते होते. शब्दापेक्षा कृती मोठी असा संदेश देणाऱ्या बसवण्णांनी तत्कालीन विषमतेवर आधारित समाजव्यवस्थेला छेद देऊन समताधिष्ठित समाजाचा पाया रचला.

​ सामाजिक समतेचा जाहीरनामा : अनुभव मंटप
​महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचे सर्वात महत्त्वाचे केंद्र म्हणजे ' अनुभव मंटप. ' हे जगातील पहिले संसद मानले जाते. येथे जात, धर्म, पंथ आणि लिंगाचा कोणताही भेदभाव न करता सर्वांना आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य होते. 

 समता आणि सामाजिक न्याय :  ​बसवेश्वरांनी जातीनिर्मूलन आणि स्त्री-पुरुष समानता यांचा पाया रचला. आजच्या काळात जेव्हा जातीभेद आणि लिंगभेद हे मोठे सामाजिक प्रश्न आहेत, तेव्हा त्यांचा मानवता हाच खरा धर्म हा विचार सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी महिलांना 'अनुभव मंटपात' स्थान देऊन लोकशाही मूल्यांची जपणूक केली, जी आजच्या महिला सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी आहे.

लोकशाही मूल्ये : सामान्य कष्टकऱ्यांपासून ते विद्वानांपर्यंत सर्वांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांनी सामाजिक लोकशाहीचा प्रयोग यशस्वी केला.

 ​स्त्री-पुरुष समानता : स्त्रियांना धार्मिक आणि सामाजिक चर्चेत बरोबरीचे स्थान देऊन त्यांनी स्त्री मुक्तीच्या चळवळीचा पाया रचला. अक्कमहादेवींसारख्या अनेक शरण स्त्रिया याचे ज्वलंत उदाहरण आहेत.
 ​ ' कायकवे कैलास ' आणि आर्थिक विचार : ​बसवेश्वरांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी ' कायकवे कैलास ' म्हणजे कष्ट हाच कैलास/देव  हा मंत्र दिला. कायकवे कैलास (श्रमाचे महत्त्व)
​' कायकवे कैलास ' म्हणजे ' काम हाच स्वर्ग. ' हा सिद्धांत आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेतही लागू होतो.

​कोणतेही काम लहान किंवा मोठे नसून ते प्रामाणिकपणे करणे, हीच खरी ईश्वरसेवा आहे, हा विचार आजच्या ' वर्क कल्चर 'मध्ये व्यावसायिक नीतिमत्ता (Work Ethics) वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
​स्वतःच्या कष्टावर जगणे आणि इतरांवर विसंबून न राहणे हा स्वावलंबनाचा मंत्र त्यांनी दिला.
 ​​श्रम प्रतिष्ठा : कोणताही व्यवसाय श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो, तर प्रामाणिकपणे केलेले श्रम हीच देवाची पूजा आहे, असे त्यांनी पटवून दिले.

​दसोह संकल्पना : कमावलेल्या संपत्तीचा विनियोग केवळ स्वतःसाठी न करता समाजातील गरजूंसाठी करणे म्हणजे दसोह, हा त्यांचा समाजवादी आर्थिक विचार होता. यामुळे समाजात संपत्तीचे केंद्रीकरण न होता ती प्रवाहित राहिली. दशोह (सामाजिक उत्तरदायित्व) ​बसवण्णांनी केवळ संपत्ती साठवण्यापेक्षा ती समाजातील गरजूंसाठी खर्च करण्यावर (दशोह) भर दिला. आजच्या काळात ज्याला आपण ' Corporate Social Responsibility ' (CSR) म्हणतो, त्याचे मूळ त्यांच्या ' दशोह ' संकल्पनेत आढळते. आर्थिक विषमता कमी करण्यासाठी ही संकल्पना आजही मोलाची ठरते.

​​  वचनांच्या माध्यमातून प्रबोधन : ​बसवेश्वरांनी त्यांचे विचार कठीण संस्कृतमध्ये न मांडता जनसामान्यांच्या कन्नड भाषेत वचन साहित्यात मांडले. त्यांची वचने अत्यंत साधी पण विचारप्रवर्तक आहेत.

 ​नैतिकता : चोरी करू नको, हत्या करू नको, खोटे बोलू नको या सप्तसूत्रीच्या माध्यमातून त्यांनी मानवी वर्तणुकीची आचारसंहिता मांडली.
o भाषेचे लोकशाहीकरण (वचन साहित्य) : ​त्यांनी तत्त्वज्ञान हे क्लिष्ट भाषेतून बाहेर काढून सर्वसामान्यांच्या भाषेत (वचनांच्या माध्यमातून) मांडले. आजच्या काळात शिक्षण आणि माहिती ही सर्वसामान्यांच्या भाषेत असावी, हे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांचे हे कार्य दीपस्तंभासारखे आहे.

 ​​मूर्तीपूजा आणि कर्मकांडाला विरोध : त्यांनी बाह्य अवडंबरापेक्षा अंतःशुद्धीला महत्त्व दिले. " देह हेच देऊळ " मानून ईश्वराचा शोध स्वतःमध्ये घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
 अंधश्रद्धा निर्मूलन आणि  वैज्ञानिक दृष्टिकोन :
​बसवेश्वरांनी कर्मकांड, मूर्तीपूजा आणि अंधश्रद्धेवर कडाडून प्रहार केला. सद्यस्थितीत समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि विवेकनिष्ठ विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांचे विचार दिशादर्शक आहेत.

​ आधुनिक संदर्भात प्रासंगिकता :
​आज २१ व्या शतकात जेव्हा जग जातीयवाद, भ्रष्टाचार आणि विषमतेशी झुंजत आहे, तेव्हा बसवेश्वरांचे विचार अधिक मार्गदर्शक ठरतात.
 ​जातीअंताची चळवळ : त्यांनी आंतरजातीय विवाहांचे समर्थन करून जातीव्यवस्थेच्या मुळावर घाव घातला होता.

 ​संसदीय प्रणाली : आजच्या संसदीय लोकशाहीची बीजे त्यांच्या ' अनुभव मंटप ' मध्ये आढळतात. लोकशाही मूल्ये आणि अनुभव मंटप :​बसवेश्वरांनी स्थापन केलेले ' अनुभव मंटप ' हे जगातील पहिले संसद मानले जाते. यात समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य होते.
 ​सद्यस्थितीतील उपयोग : आजच्या लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सर्वसमावेशक चर्चेची गरज आहे, ज्याचा आदर्श बसवेश्वरांनी ९०० वर्षांपूर्वीच घालून दिला होता.

 ​​श्रमाची प्रतिष्ठा : बेरोजगारी आणि कौशल्याच्या अभावाच्या काळात ' कायक ' तत्वज्ञान युवकांसाठी प्रेरणादायी आहे.
​ सारांश रूपाने असे म्हणता येईल की, ​महात्मा बसवेश्वर हे केवळ एका विशिष्ट समाजाचे नेते नव्हते, तर ते अखिल मानवजातीचे मार्गदर्शक होते. जगातील प्रत्येक माणूस माझा आहे. इवनु नम्मवा ही वैश्विक बंधुत्वाची भावना त्यांनी रुजवली. त्यांच्या विचारांचा अवलंब करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
​" कलुबेड़ा, कोलुबेड़ा, हुसिया नुडिय लुबेड़ा..."
चोरी करू नको, हिंसा करू नको, असत्य बोलू नको... हेच ईश्वराला प्रसन्न करण्याचे खरे मार्ग आहेत. महात्मा बसवेश्वरांचे कार्य केवळ एका धर्मापुरते मर्यादित नसून ते मानवतावादाचे वैश्विक तत्त्वज्ञान आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, कष्टकऱ्यांचा सन्मान आणि समताधिष्ठित समाज घडवण्यासाठी त्यांचे विचार आजही तितकेच प्रभावी आहेत.

प्रा. डॉ. महेश मोटे 
मुरूम, ता. उमरगा, जि. धाराशिव.



​
​
​
​

Labels:

धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात वटपौर्णिमा साजरी

धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात वटपौर्णिमा साजरी; सौभाग्यवती महिलांनी वडाच्या वृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले व्रत; मंदिर परिसरात भाविकांची गर्दी


धाराशिव,दि.२९:

जिल्ह्यात सोमवारी वटपौर्णिमेचा सण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागात सकाळपासूनच सौभाग्यवती महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वडाच्या वृक्षाची विधीवत पूजा करून पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी प्रार्थना केली.
श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटेपासूनच महिलांची गर्दी दिसून आली तसेच विविध मंदिर परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वडाच्या वृक्षांजवळ महिलांची मोठी गर्दी दिसून आली. महिलांनी हळद, कुंकू, फुले, अक्षता, फळे, नैवेद्य अर्पण करून वडाच्या वृक्षाला पवित्र दोरा गुंडाळत प्रदक्षिणा घातल्या. यावेळी सावित्री-सत्यवानाची कथा श्रवण करून वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व सांगण्यात आले.

जिल्ह्यातील तुळजापूर, धाराशिव, उमरगा, परंडा, कळंब, भूम, लोहारा आणि वाशी तालुक्यांमध्ये वटपौर्णिमेनिमित्त मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. अनेक महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी, दागिने आणि फुलांनी सजून पूजाविधी पार पाडल्याने सणाला विशेष आकर्षण लाभले.काही ठिकाणी महिला मंडळांच्या वतीने सामूहिक पूजा, सावित्री सत्यवान कथावाचन तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

महिलांनी एकमेकींना हळद-कुंकू लावत वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. सामाजिक सलोखा आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा सण जिल्हाभर आनंदात साजरा झाला.

वटपौर्णिमा हा सण पती-पत्नीतील विश्वास, निष्ठा, प्रेम आणि परस्पर सन्मानाचे प्रतीक मानला जातो. आधुनिक काळातही या परंपरेचे जतन करत महिलांनी श्रद्धा आणि उत्साहाने व्रत पाळल्याने जिल्हाभर धार्मिक आणि मंगलमय वातावरण अनुभवायला मिळाले.

Labels:

नसरापूर प्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा; निर्णयाचे नळदुर्ग शहरात स्वागत

नसरापूर प्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा; निर्णयाचे नळदुर्ग शहरात स्वागत

नळदुर्ग, दि. २९ जून :

पुणे येथील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाचे नळदुर्ग शहरात विविध स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
सदर प्रकरणात भीमराव कांबळे या आरोपीने अमानुष कृत्य करत चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. समाजमनाला हादरा देणाऱ्या या प्रकरणाचा न्यायालयाने जलदगतीने निकाल लावत आरोपीस कठोर शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे हा खटला जलदगतीने निकाली निघालेल्या प्रकरणांपैकी एक म्हणून ओळखला जात आहे.
या निर्णयानंतर समाजातून समाधान व्यक्त केले जात असून, अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी या शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणीही होत आहे.
दरम्यान, नळदुर्ग येथे ब्राह्मण समाज संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध करत निवेदन देण्यात आले होते. तसेच नागरिकांच्या सहभागातून निषेध मोर्चाही काढण्यात आला होता. या घटनेने माणुसकीला काळिमा फासल्याची भावना व्यक्त होत असताना आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत होती.

न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत पेशवा युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांनी सांगितले की, “आरोपीस दिलेली मरेपर्यंत फाशीची शिक्षा ही योग्य असून तिची लवकरात-लवकर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे कायद्याचा धाक निर्माण होईल व भविष्यात अशा घटना घडण्यास आळा बसेल.”

Labels:

नळदुर्ग:टिप्परला दुचाकीची भीषण धडक; उपचारापूर्वीच दुचाकीस्वाराचा मृत्यू

टिप्परला दुचाकीची भीषण धडक; उपचारापूर्वीच दुचाकीस्वाराचा मृत्यू

नळदुर्ग,दि.२९ जुन:

नळदुर्ग शहरातील जुन्या राष्ट्रीय महामार्गावर सितारा हॉटेलसमोर सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, नळदुर्गहून खंडोबा मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या जुन्या महामार्गावर दुपारी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी (क्र. एमएच-१३ बी.वाय-५६०४) चालविणारे परमेश्वर महादेव गायकवाड (वय ४५, रा. किलज, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी समोरील टिप्परला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेचे चालक सुनिल भोळे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीस तातडीने नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेंद्र मडके यांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच परमेश्वर गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. अपघाताचे नेमके कारण आणि पुढील तपास संबंधित पोलीस करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे किलज गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.


Labels:

अनेक वर्षांनंतर हगलूर गावात धावली 'लालपरी'; विद्यार्थिनींच्या शिक्षणाला मिळाले नवे पंख

 अनेक वर्षांनंतर हगलूर गावात धावली 'लालपरी'; विद्यार्थिनींच्या शिक्षणाला मिळाले नवे पंख!
नळदुर्ग–हगलूर–मानेवाडी बससेवेचा शुभारंभ; हलगीच्या गजरात जल्लोष, एसटी कर्मचाऱ्यांचा सत्कार

नळदुर्ग, दि. २९ जून :

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या, विशेषतः मुलींच्या शिक्षणातील वाहतुकीची मोठी अडचण अखेर दूर झाली असून, नळदुर्ग–हगलूर–मानेवाडी या मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) नवीन बस सेवा सोमवारपासून सुरू करण्यात आली. 

या निर्णयामुळे नळदुर्ग येथे महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच हुतात्मा बाबुराव बोरगावकर विद्यालय (साखर कारखाना परिसर) येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरक्षित आणि नियमित सार्वजनिक वाहतुकीअभावी विद्यार्थिनींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते, तर काहींच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होत होता. नव्याने सुरू झालेल्या एसटी बस सेवेमुळे आता विद्यार्थिनींना सुरक्षित, सुलभ आणि किफायतशीर प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

 हगलूरचे सरपंच अॅड. जयपाल पाटील यांनी  पाठपुरावा केला. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश मिळाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. हा निर्णय केवळ वाहतुकीची सुविधा नसून ग्रामीण मुलींच्या शिक्षणाला नवी दिशा देणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

अनेक वर्षांनंतर गावात आली एसटी; हलगीच्या गजरात जल्लोष

हगलूर आणि मानेवाडी या दोन्ही गावांमध्ये नव्या बसचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. हलगीच्या गजरात बसचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी चालक मेहराज पटेल, वाहक विष्णू माळी तसेच नळदुर्ग वाहतूक नियंत्रक अनिल हांडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांनंतर गावात एसटी बस दाखल झाल्याने ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी उपस्थितांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

'लालपरी'लाच प्राधान्य देण्याची ग्रामस्थांची ग्वाही
हगलूर व मानेवाडी ग्रामस्थांनी यापुढे शक्यतो खासगी वाहनांचा वापर टाळून एसटीनेच प्रवास करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे नव्याने सुरू झालेली बस सेवा नियमित आणि टिकाऊ राहण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

विद्यार्थिनीचे मनोगत ठरले लक्षवेधी

हगलूर येथील विद्यार्थिनी राजनंदिनी मनोहर घुगे हिने मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "आमच्या गावात बस सुरू झाल्याने हगलूर पाटी ते गाव असा तीन किलोमीटरचा रोजचा पायी प्रवास वाचला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेचा आम्हा ग्रामीण भागातील मुलींना मोठा लाभ होत असून, शिक्षणासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे."

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास हगलूरचे सरपंच अॅड. जयपाल पाटील, मानेवाडीचे सरपंच माने, हुतात्मा बाबुराव बोरगावकर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार नरवडे, मल्लय्या स्वामी, उमाकांत मोरे, उपसरपंच महेश गवळी, माजी सरपंच नालंदा पाटील, रंभाजी घुगे, मनोहर घुगे, दिनकर घुगे, संतोष दराडे, प्रमोद कांबळे यांच्यासह दोन्ही गावांतील विद्यार्थी, पालक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी ही बस सेवा 'जीवनदायिनी' ठरणार असून, शिक्षणाचा प्रवास आता अधिक सुरक्षित, सुलभ आणि आत्मविश्वासपूर्ण होणार असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.


Labels:

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत नळदुर्ग शहरात उल्लेखनीय कामगिरी; २ हजार ४१ बालकांना पोलिओ लसीचे डोस; ९५ टक्क्यांहून अधिक उद्दिष्ट पूर्ण

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत नळदुर्ग शहरात उल्लेखनीय कामगिरी; २ हजार ४१ बालकांना पोलिओ लसीचे डोस; ९५ टक्क्यांहून अधिक उद्दिष्ट पूर्ण

नळदुर्ग, दि. २९ जून :

नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयाच्या मार्फत शहरातील १८ बुथवर राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी (दि. २८ जून) रोजी शहरात मोठ्या उत्साहात लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

 शहरातील विविध अंगणवाड्या, शाळा तसेच विशेष पथकांच्या माध्यमातून एकूण २,०४१ बालकांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी १,७६९ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात आली.

आरोग्य विभागाने बूथ, मोबाईल टीम आणि ट्रान्झिट टीमच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक बालकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मोहिमेत अनेक केंद्रांवर समाधानकारक प्रतिसाद मिळाला असून काही भागांत शंभर टक्क्यांच्या जवळपास लसीकरण पूर्ण करण्यात आले.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच स्वयंसेवकांनी घराघरात जाऊन पालकांना जनजागृती करत लसीकरणासाठी प्रोत्साहित केले. शहरातील विविध केंद्रांवर सकाळपासूनच पालकांनी आपल्या लहान मुलांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यासाठी गर्दी केली.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, उर्वरित बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी घरभेटी व विशेष पाठपुरावा मोहीम सुरू ठेवण्यात येणार असून एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आरोग्य अधिकाऱ्यांनी पालकांना आवाहन केले आहे की, ज्यांच्या मुलांना अद्याप पोलिओचे डोस मिळाले नसतील त्यांनी तातडीने आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या पाल्याला पोलिओ प्रतिबंधक लस द्यावी.असे आवाहन केले.

उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ चंचल बोडके, वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेंद्र मडके, डॉ अविनाश मोरे, डॉ गौरव आंनदगावकर, डॉ ओंकार खराडे, सहाय्यक अधीक्षक अविनाश धरणे, परिसेविका श्रीमती निर्मला तोडकरी, मनिषा होगले, मस्तुद चंद्रभागा, सुमन फुले, अश्विनी शेरखाने, गजानन डावरे, यासह आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

Labels:

शिवसेनेच्या डिएनटी राष्ट्रीय नेतेपदी कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांची नियुक्ती

शिवसेनेच्या  डिएनटी राष्ट्रीय नेतेपदी संजय राठोड यांची नियुक्ती; राज्यभरासह देशातील विमुक्त-भटक्या समाजाची संघटनात्मक जबाबदारी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नियुक्तीपत्र

मुंबई/नळदुर्ग, दि. २९ जुन : 

शिवसेना पक्षाने विमुक्त व भटक्या जमाती समाजामध्ये संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राज्याचे मृद व जलसंधारण खात्याचे कॅबीनेट मंत्री ना.
 संजय  राठोड यांची 'विमुक्त व भटक्या जमाती  राष्ट्रीय नेते' म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे  नेते  ना.एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र दिले आहे.

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय  बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच पक्षाच्या विचारधारेप्रती असलेली निष्ठा, समाजकार्यातील उल्लेखनीय योगदान आणि संघटनात्मक क्षमतेची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

संजय राठोड यांच्याकडे पश्चिम विदर्भातील शिवसेना संघटन विस्ताराची जबाबदारी कायम ठेवत राज्य आणि देशभरातील विमुक्त व भटक्या जमाती समाजामध्ये शिवसेनेचे संघटन उभारणे, विस्तार करणे आणि अधिक सक्षम बनविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यासोबतच डीएनटी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणे, समाजाला मुख्य प्रवाहाशी जोडणे तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणे हीदेखील त्यांची प्रमुख जबाबदारी राहणार आहे.
नियुक्तीपत्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत, त्यांच्या अनुभव आणि कार्यक्षमतेच्या जोरावर राज्यासह देशभरातील विमुक्त-भटक्या समाजामध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन पक्ष विस्तारासाठी सर्वांना सोबत घेत समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

या नियुक्तीमुळे विमुक्त व भटक्या जमाती समाजातील शिवसेनेच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळणार असून, समाजाच्या विविध प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे वाचा फोडण्यास बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया शिवसैनिक आणि डीएनटी समाजातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

Labels:

Sunday, 28 June 2026

मुरूममध्ये १२ वा राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न...

मुरूममध्ये १२ वा राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

​विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव; समाजसेवेच्या कार्याला मिळाली नवी ऊर्जा...

​मुरूम, ता. उमरगा, दी. २८  : 
क्रांतीसूर्य, समतानायक जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती उत्सवानिमित्त बसव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १२ वा राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (ता. २८) रोजी रत्नमाला मंगल कार्यालयात अत्यंत थाटामाटात आणि उत्साही वातावरणात पार पडला. समाजकार्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.

​मान्यवरांची उपस्थिती आणि दीपप्रज्वलन
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील होते. यावेळी औसाचे उद्योजक श्रुनक उटगे, नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश अर्दाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश मंगरुळे, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, रशिद शेख, रोटरीचे माजी अध्यक्ष गोविंद पाटील, दत्ता बिराजदार, नगरसेवक राजेंद्र बेंडकाळे, रूपचंद गायकवाड, गणेश अंबर, अहमद मिनियार आणि सुनील ख्याडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या सोहळ्यात बापूराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील सत्कारमूर्तींना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, फेटा आणि पुष्पहार देऊन गौरविण्यात आले. ​राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार राजेंद्र पाचंगे, प्रकाश कांबळे, वीरभूषण लिमये तर राज्यस्तरीय पुरस्कार पंकज शहाणे, आशा कांबळे, दीपक शिंदे, डॉ. बालाजी बिराजदार, विठ्ठल चारे, रतन कटके, इरफान मुजावर, उल्हास घुरघुरे, राहुल मुळे, भारत सातपुते, मुस्तान मिर्झा, तानाजी भालेराव, कुमारी लव्या वाघमारे, विक्रम दासमे आणि तुळजाभवानी संघर्ष समितीचे सर्व सदस्य. ​यावेळी तीन शाळेतील ४०० गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती कविवर्य भारत सातपुते, डॉ. बालाजी बिराजदार, आशाताई कांबळे यांनी आपल्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त करताना पुरस्कारांमुळे मिळते सामाजिक कामाची ऊर्जा, या पुरस्कारांमुळे भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून तो आमच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याची पावती आहे, असे त्यांनी सांगितले. ​नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी, बसव प्रतिष्ठानचा हा उपक्रम समाजाला योग्य दिशा देणारा असून, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी तो प्रोत्साहनाचा असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसव प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी या सोहळ्यामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार अजिंक्य मुरूमकर यांनी मानले. या सोहळ्यासाठी मुरूम शहर व परिसरातून  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

नळदुर्गच्या पाणीपुरवठा योजनेची ‘संथगती एक्सप्रेस’; नागरिकांचा संयम ‘आऊट ऑफ कव्हरेज’!

नळदुर्गच्या पाणीपुरवठा योजनेची ‘संथगती एक्सप्रेस’; नागरिकांचा संयम ‘आऊट ऑफ कव्हरेज’!

नळदुर्ग, दि. २८ जून :
नळदुर्ग शहरात सध्या दोनच गोष्टींचा बोलबाला आहे.एक म्हणजे पावसाळा आणि दुसरी म्हणजे पाणीपुरवठा योजनेची ‘धिम्या गतीने धावणारी’ एक्सप्रेस! फरक एवढाच की पाऊस कधी तरी वेळ पाळतो, पण ही योजना अजूनही ‘लगेच सुरू होणार’ या वचनावरच अडकली आहे.

नागरिकांना आता गंभीर शंका यायला लागली आहे. ही पाणीपुरवठा योजना आहे की संयम वाढवण्याचा सरकारी प्रयोग? कारण शहरात जिथे तिथे खणलेले खड्डे पाहिले की वाटतं, आपण विकासकामात नसून ‘खड्डे संवर्धन स्पर्धेत’ सहभागी झालो आहोत. काही ठिकाणी खड्डे खणून ते दिवसन्‌दिवस तसेच ठेवले जातात. जणू ते शहराच्या सौंदर्यवर्धनाचा भाग आहेत.

मागील आठवड्यात बसस्थानकाजवळ एका खड्ड्यात मुलगी पडून जखमी झाल्यानंतर प्रशासनाला आठवलं की खड्डे हे फक्त सजावटीसाठी नसतात, ते धोकादायकही असतात! पावसाळ्यात तर या खड्ड्यांनी चिखलाचा ‘लाईव्ह शो’ केल्याशिवाय  राहणार नाही. नागरिकांना रोज ‘रिस्क घेऊन घराबाहेर पडण्याचा गेम’ खेळावा लागतो.
दरम्यान, दादांच्या प्रयत्नांतून तब्बल ४६ कोटींची योजना मंजूर झाली, तेव्हा नळदुर्गकरांनी आनंदाने जल्लोष केला होता."आता रोज पाणी येणार!" पण सध्याची परिस्थिती पाहता हा आनंद ‘सीरियलच्या पुढच्या भागासारखा’ लांबत चालला आहे.

हे काम करणाऱ्या सुजाता कन्स्ट्रक्शन कंपनीची गती पाहता ‘काम चालू आहे’ हा फलक लावण्यापेक्षा ‘काम सुरू करण्याची तयारी सुरू आहे’ असा फलक जास्त योग्य वाटतोय! त्यातच नगरपालिकेने दिलेल्या वारंवार मुदतवाढीमुळे ठेकेदाराचे ‘लाड पुरवले’ जात असल्याची चर्चा रंगली आहे.

या योजनेचा सर्वात भन्नाट भाग म्हणजे काम चालू आहे, पण माहिती ‘मिसिंग’! कोणती पाइपलाइन टाकली जातेय, तिचा आकार काय, दर्जा कसा हे जाणून घेण्यासाठी नागरिकांनी ‘CID’ मध्ये भरती व्हावं लागेल अशी परिस्थिती आहे. कारण शहरात एकही माहिती फलक नाही!
चावडी चौक, किल्ला गेट, बसस्थानक यांसारख्या ठिकाणी माहिती फलक लावणं बंधनकारक असताना ठेकेदाराने त्याकडे ‘नो कमेंट’ धोरण स्वीकारल्याचं दिसतंय. त्यामुळे ‘पाणी कधी येणार?’ या प्रश्नाचं उत्तर अजूनही ‘लवकरच’ या जादुई शब्दातच अडकलेलं आहे.

नळदुर्गकरांनी आधीच १०-१२ दिवसांनी पाणी येण्याची ‘कला’ आत्मसात केली आहे. आता रोज पाणी मिळेल, अशी आशा होती; पण सध्याच्या गतीने ‘दररोज पाणी’ हा शब्दप्रयोग सध्या तरी फक्त स्वप्नातच दिसतोय.
विशेष म्हणजे ही योजना पुढील ३० वर्षांसाठी असल्याने कामाचा दर्जा उत्तम असणं गरजेचं आहे. कारण आजची छोटी चूक उद्या मोठं डोकेदुखी ठरू शकते आणि मग पुन्हा ‘खड्डे आणि चर्चा’ हा कार्यक्रम सुरूच!

नागरिकांची मागणी अगदी सोपी आहे ,काम लवकर पूर्ण करा, दर्जेदार करा आणि माहिती पारदर्शक ठेवा. अन्यथा ‘खड्डे खोदण्याच्या कलेत पारंगत’ असलेल्या ठेकेदाराला वास्तवाची जाणीव करून देण्याची वेळ येईल.
आता पाहायचं एवढंच,प्रशासन जागं होतं की नागरिकांचा संयम ‘नेटवर्क आउट’ होतो!

Labels:

तुळजापूर तालुक काँग्रेस अध्यक्षपदी अँड अरविंद अप्पा राव बेडगे यांची निवड

धाराशिव जिल्हा काँग्रेस  अध्यक्षांची घोषणा; तुळजापूरसह सात तालुक्यांवर नव्या नेतृत्वाची जबाबदारी

धाराशिव, दि. २७ :

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने राज्यातील विविध जिल्ह्यांतील  अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून, त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील सात  अध्यक्षांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

 नव्या नियुक्त्यांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीला गती मिळणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार धाराशिव  अध्यक्षपदी विनोद जीवनराव वीर, धाराशिव शहर तालुका अध्यक्षपदी धनंजय रामभाऊ राजवत, वाशी तालुका अध्यक्षपदी अमर मुरलीधर तागंडे, भूम बतालुका अध्यक्षपदी ॲड. सिराज हुसेन मोगल, लोहारा तालुका अध्यक्षपदी दयानंद सुग्रीव पाटील, तुळजापूर तालुका अध्यक्षपदी ॲड. अरविंद बेडगे, तर लोहारा शहर  अध्यक्षपदी रऊफ बागवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांवर पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, बूथस्तरावरील कार्यकर्त्यांचे जाळे वाढविणे आणि आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी बळकट करण्याची जबाबदारी असणार आहे.

नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून, जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक प्रभावीपणे उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Labels:

मल्हार पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा; अनाथ विद्यार्थ्यांना भोजन, टीबी रुग्णांना किराणा किट; विद्यार्थिनीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार

मल्हार पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा; अनाथ विद्यार्थ्यांना भोजन, टीबी रुग्णांना किराणा किट; विद्यार्थिनीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार

नळदुर्ग, दि. २८ जून :

भाजपचे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांचा वाढदिवस नळदुर्ग येथे नगराध्यक्ष बसवराज धरणे व शहर भाजपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. समाजोपयोगी उपक्रमांमुळे वाढदिवसाला सेवाभावी स्वरूप प्राप्त झाले.

यावेळी "आपलं घर" प्रकल्पातील अनाथ विद्यार्थ्यांना प्रेमाने भोजन देण्यात आले. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

याशिवाय २० क्षयरोग (टीबी) रुग्णांना एक महिन्यासाठी आवश्यक किराणा साहित्याचे किट वितरित करण्यात आले. गरजू रुग्णांना दिलेल्या या मदतीमुळे सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमातील आणखी एक उल्लेखनीय निर्णय म्हणजे, अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या लक्ष्मी मल्हारी कोकणे या होतकरू विद्यार्थिनीच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी स्वीकारली. या निर्णयाचे उपस्थितांनी कौतुक करत स्वागत केले.
या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष नय्यरपाशा जहागिरदार, नगरसेवक तानाजी जाधव, माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे, किशोर नळदुर्गकर, श्रमिक पोतदार, भाजपचे पदाधिकारी, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नागरिक, रुग्ण तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक उत्तरदायित्व जपत गरजूंच्या मदतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे मल्हार पाटील यांचा वाढदिवस नळदुर्गमध्ये सेवाभावी वातावरणात आणि उत्साहात साजरा झाला.

Labels:

तुळजापूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी ॲड. अरविंद बेडगे यांची नियुक्ती; अनुभवी, अभ्यासू नेतृत्वाची पक्षाकडून निवड; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण


तुळजापूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी ॲड. अरविंद बेडगे यांची नियुक्ती; अनुभवी, अभ्यासू नेतृत्वाची पक्षाकडून निवड; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

नळदुर्ग, दि. २८ जून : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी नळदुर्ग येथील ज्येष्ठ विधिज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते ॲड. अरविंद अप्पाराव बेडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

गेल्या अडीच दशकांपासून वकिली व्यवसायात कार्यरत असलेले ॲड. बेडगे यांनी कायदेविषयक क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि संघटनात्मक कामातही सक्रिय सहभाग नोंदविला आहे. सर्वधर्मीय समाजात त्यांची अभ्यासू, संयमी आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख आहे.त्याचबरोबर माजी जिल्हा अध्यक्ष ॲड.धिरज पाटील यांच्या सहकारी मित्र म्हणून सर्वश्रुत आहे.

ॲड. बेडगे यांनी यापूर्वी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य, तुळजापूर वकिल संघाचे अध्यक्ष तसेच वीरशैव सभा संघटना (पुणे) यांच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. याशिवाय ते गेल्या आठ वर्षांपासून भारत सरकारचे नोटरीधारक म्हणूनही कार्यरत आहेत.
त्यांच्या संघटन कौशल्याची आणि पक्षनिष्ठेची दखल घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल आणि पक्षाच्या जनाधारात वाढ होईल, अशी अपेक्षा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, ॲड. अरविंद बेडगे यांच्या निवडीबद्दल नळदुर्ग व तुळजापूर परिसरातील विविध सामाजिक, राजकीय आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

111111
ॲड अरविंद अप्पाराव  बेडगे यांची तुळजापूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती

नळदुर्ग, दि. २८ जून :

 राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी नळदुर्ग येथील अँड अरविंद बेडगे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.
अडीच दशकांपासून वकिली व्यवसाय करणारे अँड अरविंद बेडगे हे सर्वधर्मीयामध्ये लोकप्रिय आहेत. धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य, तुळजापूर वकिल संघाचे अध्यक्ष, वीरशैव सभा संघटना ( पुणे) तुळजापूर तालुकाध्यक्ष म्हणुन काम पाहिले आहे.तर भारत सरकार नोटरीधारक म्हणून गेल्या ८  वर्षापासून आहे.

अभ्यासू कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या बेडगे यांची नियुक्ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीमुळे तुळजापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाला अधिक बळ मिळेल आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Labels:

Saturday, 27 June 2026

मोहरमनिमित्त नळदुर्गमध्ये बंधुभावाचे दर्शन; दिवसभर सरबत-ज्यूसचे वाटप


मोहरमनिमित्त नळदुर्गमध्ये बंधुभावाचे दर्शन; दिवसभर सरबत-ज्यूसचे वाटप

नळदुर्ग,दि.२७:

योमे आशूरा (मोहरम) निमित्त शुक्रवारी (दि. २६) नळदुर्ग शहरात धार्मिक उत्साहात विविध पंजे-सवारींच्या मिरवणुका काढण्यात आल्या. हिंदू-मुस्लिम बांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शहरात बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले. मिरवणुकीदरम्यान भाविकांसाठी विविध ठिकाणी दिवसभर सरबत  मोफत वाटप करण्यात आले.

शहरात बारा इमाम, इमाम कासीम, अब्बास अली, हुंडे नालसाब, नाले हैदर, अली असगर, मौला अली व हुसेन बादशाह अशा एकूण नऊ पंज्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मोहरमच्या दहाव्या दिवशी दुपारी ३ वाजता ऐतिहासिक किल्ल्यातील सरकारी पंजे बडे बारे इमाम व छोटे बारे इमाम यांना विधीपूर्वक बाहेर आणण्यात आले. त्यानंतर इमाम कासीम, अब्बास अली, नाले हैदर, हुंडे नालसाब, अली असगर आणि हुसेन बादशाह यांचे पंजेही जागेवरून उठविण्यात आले.

सायंकाळी सर्व पंजे एकत्र आल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेण्याचा पारंपरिक सोहळा पार पडला. हा भावनिक क्षण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मिरवणूक शहरातुन  मुख्य बाजपेठ मार्गे काढत नानीमा दर्ग्याच्या पाठीमागील कर्बला मैदानात पोहोचली. तेथे धार्मिक विधीनुसार पंज्यांचे विसर्जन करण्यात आले.

मिरवणुकीदरम्यान नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

दहा दिवस चाललेल्या मोहरम उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मैनोद्दीन शेख, नुरोद्दीन शेख, खमरोद्दीन शेख, जहीर सय्यद, रहेमान कुरेशी, कौसर शेख, सलाउद्दीन शेख, अजहर शेख, इसाक गाताडे, निजाम शेख, अबुबकर शेख, तौफिक कुरेशी, मुजम्मिल कुरेशी, गौस कुरेशी, वसीम कुरेशी, जब्बार कुरेशी, राजू शहा, अरफात सय्यद, शमशोद्दीन शेख, सलीम शेख, मैनोद्दीन मासुलदार, अन्वर शेख, इस्माईल शहा, सुलतान शेख, महेबूब सय्यद, इकबाल शाह, फारुक शहा व युसुफ शेख यांनी परिश्रम घेतले.

मोहरमनिमित्त शहरात विविध ठिकाणी दिवसभर सरबत व ज्यूसचे वाटप करण्यात आले. त्यामुळे धार्मिक उत्सवाबरोबरच सेवाभाव आणि सामाजिक सलोख्याचीही प्रचिती नागरिकांना अनुभवायला मिळाली.

Labels:

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेनिमित्त कंटेकुर येथे जनजागृती प्रभातफेरी

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेनिमित्त कंटेकुर येथे जनजागृती प्रभातफेरी

 मुरूम, ता. उमरगा, दि. २७  : 

कंटेकुर, ता. उमरगा येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कंटेकुर यांच्या वतीने गावात जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. 

या प्रभातफेरीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ तसेच स्थानिक मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रभातफेरीची सुरुवात शाळेपासून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी "प्रत्येक बालकाला दोन थेंब–पोलिओला कायमचा अंत", "पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करूया", "दोन थेंब जीवनाचे, प्रत्येक बालकासाठी सुरक्षिततेचे" अशा विविध घोषणांद्वारे गावकऱ्यांमध्ये पोलिओ लसीकरणाबाबत जनजागृती केली. प्रभातफेरी गावातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली. यावेळी लक्ष्मीकांत पटणे यांनी गावातील नागरिकांना २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण दिनाची माहिती दिली. तसेच ग्रामीण भागात २९ जून ते २ जुलै २०२६ दरम्यान आणि त्यानंतर ४ जुलै २०२६ रोजी घरोघरी जाऊन बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार असल्याचे सांगितले. 

पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजणे अत्यंत आवश्यक असून कोणतेही बालक या मोहिमेपासून वंचित राहू नये, असे आवाहन करण्यात आले.
प्रभातफेरीनंतर उपस्थित ग्रामस्थांना पोलिओ लसीकरणाचे महत्त्व, पोलिओ रोगाचे दुष्परिणाम आणि लसीकरणामुळे मिळणारे संरक्षण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. गावातील नागरिकांनीही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन केले. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक नागेंद्र समन, लक्ष्मण येवते, लतिफ लदाफ, जीवन सूर्यवंशी, विजयकुमार कलशेट्टी, चित्ररेखा दंडे, तनुजा गाढवे व लक्ष्मीबाई शिकारे, ग्रामपंचायत सदस्य, आशा व अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कंटेकुर यांच्या वतीने करण्यात आले.

Labels:

कर्तव्यदक्ष, दूरदृष्टीचे नेतृत्व : अशोकभाऊ जगदाळे— सुधीर पोतदार

कर्तव्यदक्ष, दूरदृष्टीचे नेतृत्व : अशोकभाऊ जगदाळे
— सुधीर पोतदार

समाजात काही व्यक्ती पदामुळे मोठ्या होत नाहीत, तर त्यांच्या कार्याचा ठसा जनमानसावर उमटल्यामुळे त्यांना लोकमान्यता मिळते. जनतेच्या सुख-दुःखात सातत्याने सहभागी होत लोकसेवेला जीवनाचे ध्येय मानणारे आणि विकासाची स्पष्ट दृष्टी बाळगणारे नेतृत्व म्हणजे  अशोकभाऊ जगदाळे.

अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय आणि लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करत अशोकभाऊंनी सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे. समाजातील दुर्बल, वंचित आणि गरजू घटकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची त्यांची भूमिका नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे. सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करून अनेक कुटुंबांचा आर्थिक भार हलका करणे, शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात देणे, गरजूंना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविणे तसेच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेणे, या त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकीची प्रचीती येते.

अशोकभाऊंच्या नेतृत्वावर जनतेने वेळोवेळी विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग नगरपरिषद, तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांसारख्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर अनेक लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. हे त्यांच्या संघटन कौशल्याचे, कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचे आणि जनतेच्या विश्वासाचे जिवंत उदाहरण आहे.
साधेपणा, कार्यकर्त्यांशी आत्मीय संवाद, सर्वसामान्यांच्या प्रश्नांप्रती संवेदनशीलता आणि समाजहिताची प्रामाणिक तळमळ या गुणांमुळे अशोकभाऊ आज लोकनेते म्हणून ओळखले जातात. विकासाभिमुख विचार, लोकाभिमुख निर्णय आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांचे कार्य अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

समाजकारणात निष्ठा, विकासात सातत्य आणि जनतेशी जपलेले विश्वासाचे नाते हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद आहे. आगामी काळातही त्यांच्या हातून समाजहिताची अशीच व्यापक सेवा घडत राहो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा प्रवास अधिक वेगाने पुढे जावो, हीच सर्वांची अपेक्षा आहे.

 अशोकभाऊ जगदाळे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

सुधीर पोतदार 
पत्रकार/ न.प.सदस्य,
 नगरपरिषद नळदुर्ग 

Labels:

तुळजापूर तालुक्यातील शिक्षकांची केंद्र प्रमुखपदी नियुक्ती; अनेकांना नव्या समूह साधन केंद्रांची जबाबदारी

तुळजापूर तालुक्यातील शिक्षकांची केंद्र प्रमुखपदी नियुक्ती; अनेकांना नव्या समूह साधन केंद्रांची जबाबदारी

नळदुर्ग, दि. २७ जून :

 जिल्हा परिषद, धाराशिवच्या शिक्षण विभागाने विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा-२०२५ मधून निवड झालेल्या प्राथमिक शिक्षक व प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) पदावरील नियुक्तीचे आदेश जाहीर केले आहेत.
 या आदेशानुसार तुळजापूर तालुक्यातील अनेक शिक्षकांना विविध केंद्रांवर केंद्र प्रमुख म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे. तुळजापूर तालुक्यातील नियुक्त्या पुढीलप्रमाणे :
बालाजी बळीराम क्षीरसागर – जि.प. प्राथमिक शाळा मोर्डा (ता. तुळजापूर) येथून  येडशी (ता. धाराशिव) केंद्रावर नियुक्ती,
अविनाश शंकरराव राठोड – जि.प. प्राथमिक शाळा वसंतनगर येथुन   नळदुर्ग   केंद्रावर नियुक्ती.,धनराज मल्लिनाथ कुडकळे – जि.प. प्राथमिक शाळा  जवळकोट (ता. तुळजापूर) येथून आष्टा (ता. लोहारा) केंद्रावर नियुक्ती,दीप्ती विश्वास खाडकीकर – जि.प. प्राथमिक शाळा सांगवी मार्डी (ता. तुळजापूर) येथून काटी (ता. तुळजापूर) केंद्रावर नियुक्ती, इरशाद पापामिया शेख – जि.प. प्राथमिक शाळा कुंभारी (ता. तुळजापूर) येथून कानगरा (ता. धाराशिव) केंद्रावर नियुक्ती, भरत जनार्दन माने – जि.प. प्राथमिक शाळा  वाणेवाडी (ता. तुळजापूर) येथून अपसिंगा (ता. तुळजापूर) केंद्रावर नियुक्ती, सिमा रमेश दूधगी – जि.प. प्राथमिक शाळा केशेगाव (ता. तुळजापूर) येथून अणदूर (ता. तुळजापूर) केंद्रावर नियुक्ती, संतोष विलासराव पाटील – सावंतवाडी क्र. १ (ता. तुळजापूर) येथून सरोळा (बु.) (ता. धाराशिव) केंद्रावर नियुक्ती, शांताराम विष्णू कुंभार – जि.प. प्राथमिक शाळा चव्हाणवाडी (ता. तुळजापूर) येथून होर्टी (ता. तुळजापूर) केंद्रावर नियुक्ती.
भूषण रामा थानंबीरे – जि.प. प्राथमिक शाळा आरळी (ता. तुळजापूर) येथून  शहापूर (ता. तुळजापूर) केंद्रावर नियुक्ती.
या नियुक्त्यांमुळे तुळजापूर तालुक्यातील समूह साधन केंद्रांचे कामकाज अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नव्याने नियुक्त झालेल्या केंद्र प्रमुखांकडे शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षक मार्गदर्शन, विविध शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन आणि देखरेखीची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे तालुक्यातील शैक्षणिक व्यवस्थेला बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया शिक्षक व शिक्षणप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

Labels:

Friday, 26 June 2026

वसंतराव नाईक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन; जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी प्रसाद राठोड यांची निवड


वसंतराव नाईक  जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन; जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी प्रसाद राठोड यांची निवड

नळदुर्ग, दि. २६ : 

हरितक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शेतकरी हितचिंतक वसंतराव नाईक यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी नळदुर्ग शहरातील महामार्गावरील वसंतनगर गोलाई चौक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या जयंती उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी शुक्रवारी बंजारा समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हारिश जाधव, सुरेश राठोड, दत्ता राठोड,,आकाश जाधव आणि शिवाजी राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत जयंती उत्सवासाठी नूतन कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली.

बैठकीत जयंती उत्सवाचे नियोजन, मिरवणुकीची रूपरेषा, वृक्षारोपण कार्यक्रम करणे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करणे, सामाजिक सहभाग आणि विविध समित्यांच्या जबाबदाऱ्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजातील युवकांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

जयंती उत्सव कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष : प्रसाद (लखन) धनराज राठोड,

 उपाध्यक्ष : मोहन मानसिंग चव्हाण (उपसरपंच), धनु चांगु राठोड (माजी सरपंच) कार्याध्यक्ष : नितीन आप्पा राठोड, खजिनदार : मारुती पांडुरंग राठोड, आकाश कंठूराम जाधव, सचिव : प्रवीण अमृतराव चव्हाण, सहसचिव : लखन चव्हाण (उपसरपंच), मिरवणूक प्रमुख : गणेश वसंत राठोड, सुनील लक्ष्मण चव्हाण, संतोष चव्हाण (पुजारी तांडा), गुरुदेव मनू राठोड, प्रभाकर पांडुरंग जाधव, कुमार भीमराव राठोड (उपसरपंच), पृथ्वीराज शिवाजी चव्हाण आदींची निवड करण्यात आली आहे.

बैठकीच्या शेवटी १ जुलै रोजी होणाऱ्या जयंती उत्सवात बंजारा समाजासह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वसंतराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

Labels:

स्टॉक रजिस्टरला पाय फुटले? नळदुर्ग पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील नोंदी गहाळ;


स्टॉक रजिस्टरला पाय फुटले? नळदुर्ग पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील नोंदी गहाळ; कारभारावर संशयाचे सावट; 
तीन महिन्यांपासून नगरसेवकांचा पाठपुरावा; 'रजिस्टर नाही'पासून 'हस्तांतरच झाले नाही'पर्यंत बदलती उत्तरे

नळदुर्ग, दि. २६ जून : 

नळदुर्ग नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागा  मधील साहित्य खरेदी, तुरटी व ब्लिचिंग पावडरच्या स्टॉकची नोंद असलेले महत्त्वाचे स्टॉक रजिस्टर गहाळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, या प्रकारामुळे नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. "रजिस्टरला पाय फुटले का?" अशी उपरोधिक चर्चा शहरात रंगू लागली आहे.

काँग्रेसचे विरोधी पक्षातील नगरसेवक सुधीर पोतदार यांनी दि. २६ मार्च २०२६ रोजी पालिकेतील स्टॉक रजिस्टरच्या सत्यप्रतीची मागणी अर्जाद्वारे केली होती. मात्र, सलग तीन महिन्यांच्या पाठपुराव्यानंतरही संबंधित कागदपत्र उपलब्ध करून देण्याऐवजी नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून टोलवाटोलवीची भूमिका घेतली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सुरुवातीला "रजिस्टर सापडत नाही" असे सांगण्यात आले. त्यानंतर "पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुखांनी दीर्घ रजेवर जाताना स्टॉक रजिस्टर हस्तांतरित केले नाही," असे लेखी उत्तर देण्यात आले. त्यामुळे चार्ज स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याने स्टॉक रजिस्टरशिवाय विभागाचा कार्यभार कसा स्वीकारला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, नगरपालिकेने दि. १९ मे २०२६ रोजी दिलेल्या पत्रात स्टॉक रजिस्टर उपलब्ध नसल्याचे म्हटले असले, तरी सध्याच्या घडीला ते भांडार विभागात सुरक्षित असल्याची माहिती पुढे आल्याने प्रशासनाच्या उत्तरांमध्येच विसंगती असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रजिस्टरमध्ये काही अनियमित नोंदी दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, गेल्याच आठवड्यात लेखापरीक्षण विभागाने नगरपालिकेच्या तीन वर्षांच्या कामकाजाचे ऑडिट केले. त्या वेळी संबंधित स्टॉक रजिस्टर लेखापरीक्षकांना तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते का? तसेच मुख्य लेखापरीक्षकांनी आपल्या अहवालात रजिस्टर गहाळ असल्याची नोंद केली आहे का? याबाबतही आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे नळदुर्ग नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिकांसह विरोधी पक्षाकडून होत आहे. प्रशासन याबाबत नेमके काय स्पष्टीकरण देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Labels:

नळदुर्ग ऐतिहासिक किल्ल्यातील अतिक्रमणावर कारवाई; पुरातत्त्व विभागाची नोटीस जारी

नळदुर्ग येथिल  किल्ल्यातील संग्रहीत फोटो 
 
नळदुर्ग  ऐतिहासिक किल्ल्यातील  अतिक्रमणावर कारवाई; पुरातत्त्व विभागाची नोटीस जारी 

नळदुर्ग, दि. २६ जून :

नळदुर्ग किल्ला परिसरातील राज्य संरक्षित स्मारक क्षेत्रात करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात पुरातत्त्व विभागाने कठोर भूमिका घेत संबंधितांना नोटीस बजावली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सहायक संचालक (पुरातत्त्व) कार्यालयाकडून ही नोटीस दि.२३जुन रोजी जारी करण्यात आली असून अतिक्रमण तात्काळ हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या नोटिसीमुळे अतिक्रमण धारकात खळबळ उडाली आहे.

नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे, नळदुर्ग भुईकोट किल्ला हा राज्य संरक्षित स्मारक असून त्याच्या संरक्षित क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम करणे कायद्याने गुन्हा आहे. महाराष्ट्र प्राचीन स्मारक व पुरातत्त्वीय स्थळे व अवशेष अधिनियम १९६० अंतर्गत संबंधित व्यक्तींनी नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, संबंधितांनी केलेले अतिक्रमण त्वरित स्वतःहून काढून टाकावे, अन्यथा शासनाकडून ते हटवून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे. याशिवाय, नियमांचे पालन न केल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल याचिकेचा उल्लेखही नोटीसमध्ये करण्यात आला असून अद्याप अंतिम निर्णय प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधितांना दि .२९ जुलै  रोजी सकाळी  ११ वाजता आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या नोटीसीची प्रत धाराशिव जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच नळदुर्ग नगरपरिषद प्रशासनालाही पाठविण्यात आली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Labels:

Thursday, 25 June 2026

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ८ जुलैला नरिमन पॉईंटवर जलसमाधी आंदोलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ८ जुलैला नरिमन पॉईंटवर जलसमाधी आंदोलन

नळदुर्ग ,दि.२५ जुन:

शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने येत्या ८ जुलै रोजी मुंबईतील नरिमन पॉईंट येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

 यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपर तहसीलदार, नळदुर्ग यांच्या मार्फत सादर करण्यात आले.
शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी, जिल्हाध्यक्ष सरदारसिंग ठाकूर व तालुकाध्यक्ष व्यंकट पाटील यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचा उल्लेख करण्यात आला आहे. शासनाने तातडीने शेतकरी कर्जमाफी जाहीर करून पात्र शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करावेत, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रलंबित पीकविमा रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करावी, तसेच केंद्र सरकारच्या धान्य वाटप योजनेतील थकीत रक्कम अदा करून धान्याऐवजी रोख स्वरूपात मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय बंद करण्यात आलेली पीकविमा योजना पुन्हा सुरू करावी, साखर कारखान्यांकडे थकीत असलेली उसाची बिले तातडीने अदा करावीत, तसेच शेतकऱ्यांच्या मुलांच्या शालेय व उच्च शिक्षणाचे शुल्क माफ करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

निवेदनात नळदुर्ग-अक्कलकोट मार्गावरील आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
शेतकरी संघर्ष समितीने यापूर्वी नळदुर्ग येथे ट्रॅक्टर मोर्चाद्वारे आंदोलन केले होते. मात्र, मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्याने आता नरिमन पॉईंट येथे जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस शासन जबाबदार राहील, असा इशाराही शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

महादेव बिराजदार, पंडित पाटील, अशोक पडोळे, संतोष फडतरे, गुलाब शिंदे, महेश घोडके, आजमुद्दीन शेख, बालाजी ठाकूर, रेहमान शेख, काशिनाथ काळे, प्रतापसिंह ठाकूर, श्रीकांत पोतदार ,गणपत सुरवसे, महेश घोडके,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

Labels:

धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, तब्बल ५९ जणांवर गुन्हे दाखल; सुमारे २० लाखांचा मुद्देमाल जप्त


धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई;  जुगार अड्ड्यावर छापा, तब्बल ५९ जणांवर गुन्हे दाखल; सुमारे २० लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव, दि. २५ जुन : 

जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत कळंब परिसरातील एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत ५९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील आजवरची ही सर्वात मोठी जुगारविरोधी कारवाई मानली जात आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती रीतू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, परिमंडळ पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. कळंब-ढोकी रोडवरील हॉटेल हिमालय बार शेजारी असलेल्या ‘संदीप कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ’ येथे क्लब परवान्याचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर तीन पत्ती (तिरट) जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांनी अत्यंत गुप्तपणे नियोजन करून रात्रीच्या वेळी अचानक धाड टाकली. छापेमारीदरम्यान जुगार खेळणारे अनेक जण रंगेहात आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून ५४ जणांना ताब्यात घेतले असून, जुगार खेळणारे तसेच क्लबचे पाच संचालक अशा एकूण ५९ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ व ५ अन्वये कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन, चारचाकी व दुचाकी वाहने असा एकूण १९ लाख ९६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे जुगार व्यवसायाशी संबंधित घटकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

या यशस्वी मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, सुरेश कासुळे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे तसेच आरसीपी (RCP) आणि क्यूआरटी (QRT) विशेष पथकातील अधिकारी, अंमलदार व चालक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, जिल्ह्यातील अवैध जुगार, मटका, हातभट्टी दारू व अमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबविली असून, अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात यापुढेही गोपनीय आणि प्रभावी कारवाया सुरू राहतील. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Labels:

नळदुर्गच्या आठवडी बाजारातील समस्यांवर सकारात्मक तोडगा; महिला स्वच्छतागृहासह सुविधांसाठी लेखी आश्वासन


नळदुर्गच्या आठवडी बाजारातील समस्यांवर सकारात्मक तोडगा; महिला स्वच्छतागृहासह सुविधांसाठी आश्वासन

नळदुर्ग, दि. २५ जून :

नळदुर्ग येथे रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातील स्वच्छता, महिला स्वच्छतागृह व व्यापारी-शेतकरी यांना भेडसावणाऱ्या विविध मूलभूत समस्यांबाबत नगरपालिका प्रशासन आणि व्यापारी मंडळाच्या शिष्टमंडळामध्ये झालेली चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडली. बाजारातील गैरसोयी दूर करण्यासाठी लवकरच आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी दिली.

नळदुर्ग शहरातील आठवडी बाजारातील विविध समस्या आणि नागरिकांना होत असलेल्या गैरसोयींबाबत “तुळजापूर लाईव्ह”ने सातत्याने आवाज उठविला होता. त्यानंतर गुरुवार, दि. २५ जून रोजी व्यापारी मंडळाच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष बसवराज धरणे, उपनगराध्यक्ष नय्यरपाशा जहागिरदार आणि मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी व्यापारी मंडळाच्या वतीने महिला स्वच्छतागृहाची उभारणी, बाजारपेठेतील शेतकरी व व्यापाऱ्यांच्या जागेचा प्रश्न, स्वच्छता व्यवस्था यांसह विविध मागण्या मांडण्यात आल्या. यावर सकारात्मक चर्चा करून महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न पुढील तीन महिन्यांत मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

तसेच ऐतिहासिक किल्ला गेट ते भवानी चौक या परिसरात आठवडी बाजार भरविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. बाजार परिसरात स्वच्छतागृह उभारण्यात येणार असून बाजाराच्या दिवशी चारचाकी व दुचाकी वाहनधारकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाई केली जाणार आहे. येत्या रविवारी दवंडी देऊन भाजी विक्रेते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना नव्या व्यवस्थेबाबत माहिती देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि व्यापारी वर्ग यांनी एकत्रितपणे संवाद साधत शहराच्या विकासासाठी व व्यापाऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक पावले उचलल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

या बैठकीस नगरसेवक तानाजी जाधव, रिजवान काझी, शशिकांत पुदाले, सुधीर पोतदार, मारुती खारवे, आकाश कुलकर्णी, बंजारा समाजाचे प्रतिनिधी रवी महाराज राठोड, संजय जाधव तसेच व्यापारी मंडळाचे सतीश पुदाले, मुकुंद नाईक, दयानंद स्वामी, सुभाष कोरे, संदीप सुरवसे, राजेंद्र महाबोले, अतुल हजारे, सय्यद सावकार, मारुती घोडके, जमन ठाकूर आदी व्यापारी बांधव उपस्थित होते.

Labels:

नळदुर्ग येथील हुतात्मा बाबूराव बोरगावकर माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना एसटी पासचे वितरण


नळदुर्ग येथील हुतात्मा बाबूराव बोरगावकर माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना एसटी पासचे वितरण

नळदुर्ग, दि. २५ जून : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विद्यार्थी हिताच्या उपक्रमांतर्गत हुतात्मा बाबूराव बोरगावकर माध्यमिक शाळा, साखर कारखाना, नळदुर्ग येथे विद्यार्थ्यांना मोफत व रोखीच्या एसटी पासचे प्रत्यक्ष शाळेत जाऊन वितरण करण्यात आले.

विभाग नियंत्रक अजय पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी मधुरा जाधव तसेच तुळजापूर आगार प्रमुख महेश रामपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नळदुर्ग एसटी स्थानकाचे वाहतूक नियंत्रक अनिल हांडे, गुंडू डुकरे, मुकुंद वैद्य व महेश डुकरे यांनी शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शंभर टक्के सवलत योजनेअंतर्गत मोफत पास तसेच रोखीचे एसटी पास वितरित केले.

विद्यार्थ्यांना एसटी स्थानकावर जाण्याची गरज भासू नये आणि त्यांचा वेळ वाचावा, या उद्देशाने शाळेतच जाऊन पास वितरण करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनीही समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि प्रवास सुलभ करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

या कार्यक्रमास संस्थेचे संचालक मोहन भोसले, प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार नरवडे, उमाकांत मोरे, सहशिक्षक सुधाकर सुभेदार, नरवीर वीरसंगप्पा, श्रीमती छाया कामशेती, श्रीमती शुभांगी भोकरे, स्वामी मल्लय्या शंकरय्या, ज्ञानेश्वर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

Labels:

“रस्ता कमी, कोडे जास्त! नळदुर्गचा पूल बनला ‘लाइव्ह अ‍ॅडव्हेंचर पार्क’”

“रस्ता कमी, कोडे जास्त! नळदुर्गचा पूल बनला ‘लाइव्ह अ‍ॅडव्हेंचर पार्क’”

नळदुर्ग, दि. २५ जून :

नळदुर्ग बाह्यवळणावरील पूल हा वाहतुकीसाठी बांधला की वाहनचालकांच्या धाडसाची परीक्षा घेण्यासाठी, हा प्रश्न आता प्रवाशांना पडू लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बहुधा "अपघात टाळण्यासाठी रस्ता" या संकल्पनेऐवजी "अपघात कसा घडू शकतो?" याचा प्रत्यक्ष नमुना उभारला असावा, अशी चर्चा परिसरात रंगली आहे.

पूलाजवळ पोहोचलेल्या चालकाला प्रथम प्रार्थना करावी लागते, नंतर अंदाज घ्यावा लागतो आणि शेवटी नशिबावर भरोसा ठेवून वळण घ्यावे लागते. कारण येथे रस्ता कमी आणि कोडे जास्त आहे. मोठ्या वाहनांच्या चालकांची अवस्था तर "एक पाऊल पुढे, दोन पाऊल मागे" या जुन्या गाण्यासारखी झाली आहे. वाहन वळवताना ट्रक मागे घ्या, पुन्हा पुढे घ्या, पुन्हा मागे घ्या... तोपर्यंत मागच्या वाहनांच्या रांगा किलोमीटरभर वाढलेल्या असतात.
सर्व्हिस रोड बंद असल्याने चालकांना मुख्य महामार्गावरच जीव मुठीत धरून वळावे लागते. प्रशासनाच्या दृष्टीने कदाचित हा "साहसी पर्यटन" प्रकार असावा. कारण प्रत्येक वळणावर थरार, प्रत्येक क्षणी सस्पेन्स आणि समोरून येणाऱ्या वाहनामुळे हृदयाची धडधड वाढवणारा अनुभव येथे मोफत मिळतो.

स्थानिक नागरिक सांगतात की येथे यापूर्वी अपघात झाले आहेत. मात्र प्रशासनाचा दृष्टिकोन पाहता, अपघात हा बहुधा अधिकृतपणे मोठा होईपर्यंत अपघात मानला जात नसावा. त्यामुळे "आधी अपघात, मग उपाययोजना" हेच सूत्र अद्याप कायम असल्याचे दिसते.

वाहतूक तज्ज्ञांनी गोलाकार जंक्शन, दिशादर्शक फलक, हायमास्ट दिवे, सुरक्षा आरसे आणि सर्व्हिस रोड सुरू करण्याच्या मागण्या केल्या आहेत. पण या मागण्या मंजूर होईपर्यंत एखादा नवीन समिती अहवाल, त्यावर अभ्यासगट, त्यावर उपअभ्यासगट आणि शेवटी फाईलचा पर्यटन दौरा पूर्ण होण्याची शक्यता अधिक असल्याचे नागरिक उपरोधिकपणे सांगतात.

Labels:

Wednesday, 24 June 2026

नळदुर्गचा आठवडी बाजार ओस पडण्याच्या मार्गावर; मूलभूत सुविधांच्या अभावामुळे व्यापारी-शेतकऱ्यांची पाठ फिरली,नगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी


नळदुर्गचा आठवडी बाजार ओस पडण्याच्या मार्गावर; मूलभूत सुविधांच्या अभावामुळे व्यापारी-शेतकऱ्यांची पाठ फिरली,
नगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी

नळदुर्ग, दि. २५ :

एकेकाळी तुळजापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या व गजबजलेल्या बाजारपेठांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा नळदुर्गचा रविवारचा आठवडी बाजार आज अस्तित्व टिकविण्याच्या संघर्षात असल्याची खंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संतोष पुदाले यांनी व्यक्त केली आहे.

"तुळजापूर लाईव्ह"शी बोलताना त्यांनी सांगितले की, पूर्वी तुळजापूरनंतर नळदुर्गचा आठवडी बाजार तालुक्यात विशेष महत्त्वाचा मानला जात होता. परिसरातील अनेक गावांमधून शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने येथे येत असत. मात्र, सध्या विविध गावांमध्ये स्वतंत्र आठवडी बाजार सुरू झाल्याने नळदुर्गच्या बाजारातील गर्दी लक्षणीयरीत्या घटली आहे.
पुदाले  यांनी सांगितले की, पूर्वी नगरपालिका भाजीपाला विक्रेत्यांकडून नाममात्र दोन रुपये कर आकारत होती. मात्र, कर वसुलीचे ठेके देण्याची पद्धत सुरू झाल्यानंतर काही ठेकेदारांकडून शेतकरी व व्यापाऱ्यांकडून २० ते ३० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अनेक व्यापारी व शेतकरी नळदुर्ग बाजाराकडे पाठ फिरवत असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यांच्या मते, बाजाराच्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असून पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. ग्रामीण भागातून भाजीपाला व फळे विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना बसण्यासाठी योग्य जागा मिळत नसल्याने त्यांना गटारीलगत अथवा अस्वच्छ परिसरात व्यवसाय करावा लागत आहे. त्याचबरोबर बाजारात शेतकऱ्यांना जागेवरून स्थानिक विक्रेत्यांकडून नाहकच त्रास देवुन सतत तक्रारी, वाद होत असल्यामुळे  शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक व्यापारी व शेतकऱ्यांनी बाजार स्वच्छ व प्रशस्त जागेत भरविण्याची मागणी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे केली असल्याचेही पुरावे यांनी सांगितले. मात्र, या प्रश्नाकडे अद्याप गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सध्या नळदुर्गच्या आठवडी बाजारात पूर्वीच्या तुलनेत केवळ २५ टक्के व्यापारी व शेतकरी उपस्थित राहत असल्याचा दावा त्यांनी केला. याउलट अणदूर व जळकोट येथील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापारी आणि ग्राहकांची गर्दी होत असून तेथे स्वच्छ व ताजा भाजीपाला उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.

बाजार परिसरात रस्त्याच्या कडेला व रस्त्यावरच फळविक्रेत्यांनी गाड्या उभ्या केल्याने महिला ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. बाजार व्यवस्थापनातील त्रुटी, अस्वच्छता आणि सुविधांचा अभाव यामुळे व्यापारी, शेतकरी व ग्राहक नळदुर्गच्या बाजारापासून दूर जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर नळदुर्ग नगरपालिका प्रशासनाने बाजार व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन स्वच्छता, पिण्याचे पाणी, विक्रेत्यांसाठी योग्य जागा आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी संतोष पुदाले यांनी केली आहे.


Labels:

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आ. बसवराज पाटील यांची सदिच्छा भेटविधान परिषद निवडणुकीतील विजयाबद्दल मानले आभार; सहकुटुंब उपस्थिती

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आ. बसवराज पाटील यांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणुकीतील विजयाबद्दल मानले आभार; सहकुटुंब उपस्थिती

मुरुम,दि.२४: डॉ सुधीर पंचगल्ले 

धाराशिव, बीड व लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य बसवराज पाटील यांनी मुंबई येथील ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.

 यावेळी नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीतील विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानत त्यांचा सत्कार करण्यात आला.
निवडणुकीतील यशानंतर प्रथमच झालेल्या या भेटीत विविध विकासात्मक विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार बसवराज पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा मुरुमचे नगराध्यक्ष बापुराव पाटील , सचिन गुदगे, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना उमरगा-लोहारा तालुका सहअध्यक्ष शरण पाटील, सौ. संपदा शरण पाटील, स्मिता पाटील तसेच पाटील कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते.

नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, या सदिच्छा भेटीमुळे परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Labels:

ग्रामीण विद्यार्थिनींना १०० टक्के सवलतीच्या एस.टी. पासचे वाटप

ग्रामीण विद्यार्थिनींना १०० टक्के सवलतीच्या एस.टी. पासचे वाटप

नळदुर्ग, दि. २४ जून :

येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामीण विद्यार्थिनी योजनेअंतर्गत त्रैमासिक १०० टक्के सवलतीच्या एस.टी. प्रवास पासचे वितरण उत्साहात करण्यात आले. वाहतूक नियंत्रक महेश डुकरे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांच्या हस्ते विद्यार्थिनींना पासचे वाटप करण्यात आले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी महेश डुकरे यांचा शाल व पुष्पहार देऊन महाविद्यालयाच्या वतीने सत्कार केला. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रवास सुलभ व्हावा आणि आर्थिक भार कमी व्हावा, या उद्देशाने शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ विद्यार्थिनींनी घ्यावा, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक धनंजय पाटील, उपप्राचार्य डॉ. अशोक कदम, डॉ. एन. बी. जाधव, डॉ. दिपक जगदाळे, डॉ. एच. एम. मिर्झा, डॉ. अतिश तिडके, प्रा. एच. व्ही. पाटील, प्रा. के. पी. भोसले, प्रा. के. एम. काळे, डॉ. बी. एस. सावते, प्रा. पी. के. पिरजादे, डॉ. जयश्री घोडके, प्रा. झरीना पठाण, प्रा. कल्पना जाधव, प्रा. उषा बदने, प्रा. जी. डी. बेले, विजय सुरवसे, शाम पाटील यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रवास करणे अधिक सुलभ होणार असून शासनाच्या लोककल्याणकारी योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचत असल्याचे चित्र दिसून आले.

Labels:

मृत्यूचा सापळा’ ठरत असलेला नळदुर्ग बाह्यवळणावरील पूल; अपघात टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

‘मृत्यूचा सापळा’ ठरत असलेला नळदुर्ग बाह्यवळणावरील पूल; अपघात टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

फलक नाही, दिवे नाहीत, सर्व्हिस रोडही बंद,


नळदुर्ग, दि. २४ जून :

सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग आणि तीर्थक्षेत्र तुळजापूर–नळदुर्ग मार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन नळदुर्ग शहराबाहेर बाह्यवळण रस्ता उभारण्यात आला. मात्र, वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी उभारलेला हा पूल आता वाहनचालकांसाठीच डोकेदुखी ठरत असून अपघातांना निमंत्रण देणारा ‘धोक्याचा बिंदू’ बनल्याची भावना प्रवासी व स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.

सोलापूर–हैदराबाद महामार्गावरून दररोज हजारो मालवाहू, प्रवासी व खासगी वाहनांची वर्दळ सुरू असते. नळदुर्ग बाह्यवळणावरील तुळजापूर मार्गाच्या पुलाखालून मुख्य राष्ट्रीय महामार्ग जातो. या ठिकाणी वाहनांना दिशा बदलताना अत्यंत अरुंद व धोकादायक वळण घ्यावे लागत असल्याने चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

वाहन वळवताना चालकांचा जीव टांगणीला

नळदुर्ग व तुळजापूरकडे जाणाऱ्या वाहनांना पूल गाठण्यासाठी अत्यंत अरुंद जागेतून वळण घ्यावे लागते. अनेकदा मोठ्या वाहनांना पूर्ण वळण घेणे शक्य होत नसल्याने चालकांना वाहन मागे घेऊन पुन्हा पुढे सरकावे लागते. या प्रक्रियेत वाहन काही काळ रस्त्यावर आडवे ,उभे राहत असल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावावे लागतात. त्यामुळे अपघाताचा धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सर्व्हिस रोड बंद; वाहनचालकांची गैरसोय

उमरगा येथून नळदुर्ग किंवा तुळजापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी असलेला पर्यायी सर्व्हिस रोड बंद असल्याने चालकांना मुख्य महामार्गावरूनच धोकादायक पद्धतीने वळण घ्यावे लागत आहे. त्याचवेळी नळदुर्ग व तुळजापूरकडून येणारी वाहने अचानक समोर येत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण वाढत असून वारंवार कोंडी होत असल्याचे चित्र आहे.

पूर्वीही घडले अपघात; प्रशासनाचे दुर्लक्ष?
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पुलाच्या परिसरात यापूर्वी अपघात घडले आहेत. मात्र अद्यापही वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

‘हे उपाय तातडीने करा’
वाहतूक तज्ज्ञ व स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये 
पुलाच्या दोन्ही बाजूंना वर्तुळाकार जंक्शन उभारणे, स्पष्ट दिशादर्शक फलक बसविणे,
रिफ्लेक्टिव्ह ग्लास बिट्स ( सुरक्षा आरसे) बसविणे, पुलाखालील बंद असलेले सर्व्हिस रोड तात्काळ सुरू करणे, सर्व्हिस रोड व पुलावर हायमास्ट दिव्यांची व्यवस्था करणे, अणदूर–नळदुर्ग–मुर्टा पाटीपर्यंतचा जुना महामार्ग वाहतुकीसाठी खुला करणे,
या उपाययोजना झाल्यास पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहतूक सुरक्षित होईल असे मत व्यक्त केले जात आहे.

भाविक व पर्यटकांनाही होईल दिलासा
ऐतिहासिक नळदुर्ग किल्ला, तुळजाभवानी मंदिरास भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या वर्षभर मोठी असते. जुना महामार्ग व सर्व्हिस रोड कार्यान्वित झाल्यास या पर्यटकांना सुरक्षित व सोयीस्कर पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य धोका ओळखून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

डॉ.जिंतेद्र कानडे, जिल्हा परिषद सदस्य, धाराशिव 

 तिर्थक्षेत्र अणदुर ,ऐतिहासिक नळदुर्ग शहर, मुर्टा पाटीपर्यंतचा जाणारा  जुना महामार्ग सुरू करण्याबाबत आंदोलन करुनही प्रशासनाकडून 
अद्याप पर्यंत कांहींच हालचाल झाली नाही.त्यामुळे सर्व पक्षीय बैठक घेऊन फुलेवाडी टोलनाका येथे लवकरच रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.


Labels: