Wednesday, 29 March 2017

नळदुर्ग येथे महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न



नळदुर्ग  (प्रतिनिधी) : येथे  आंबाबाई मंदिरातील सभागृहात अक्षरवेल महिला साहित्य मंडळ , नवदुर्गा साहित्य मंडळ, संस्कृती महिला मंडळ, भोईराज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खास महिलाकरिता विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या अध्यक्षा सौ. रेखा व-हाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जळकोट येथील अंबव्वा महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती कस्तुरा कारभारी, नगरसेविका सौ. अंबुबाई दासकर, माजी नगरसेविका सौ. सुप्रिया पुराणिक, सौ. सुमन जाधव, डाॅ.सौ. सुजाता सुरगुडे, अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या प्रसिद्धी प्रमुख सौ. लता नाईक आदीजण उपस्थित होत्या.

सांस्कृतिक कार्यक्रमात समाज प्रबोधनात्मक गीत, जलसाक्षरता, बेटी  बचाओ, महिलांचे आरोग्य या विषयावर गीत व नाट्य सादरीकरण करण्यात आले. त्यास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलासाठी हक्काचे व्यासपीठ अक्षरवेल मार्फत मिळाले आहे.या कार्यक्रमास महाराष्ट्र ग्रामीण बॕकेच्या व्यस्थापिका कल्पना सबनीस,डाॕ. सुजाता धुरगुडे ,प्रा.जयश्री घोडके,प्रा.स्मिता पुदाले,कविञी आशा शेख,सामाजिक कार्यकर्त्या शाहेदाबी सय्यद ,संगीता गायकवाड, कल्पना गायकवाड यासह नळदुर्ग  शहरातील सर्व महिला बचत गटाच्या पदाधिकारी ,सदस्या  आसे मिळुन जवळपास दोनशे महिला  सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता पुदाले व माधुरी घोडके यांनी केले तर सौ. राधिका मिटकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवदुर्गा महिला मंडळाच्या अध्यक्षा मीना काळे, शोभा शिंदे, अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या सचिव सौ. मिलन कासार, भोईराज मडळाच्या गीता पुदाले मार्गदर्शिका अनुराधा जेवळीकर आदींनी पुढाकार घेतले

Labels: ,

Monday, 27 March 2017

महिनाभरात मतदारांना आश्‍वासन पुर्ण करत महेंद्र धुरगुडे यांनी दिला सुखद धक्‍का




नळदुर्ग :- निवडणुका, आश्‍वासन आणि विजय यानंतरच्‍या कालावधीत कुठलाही उमेदवार आपल्‍या मतदारसंघात फिरकतो अशा घटना अपवादानेच घडतात. काही उमेदवार दिलेल्‍या आश्‍वासनापैकी पाच वर्षात एखादेच आश्‍वासन पुर्ण करताना दिसून येतात. जि.प. निवडणुकीच्‍या निकालास महिना उलटण्‍यापूर्वी उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील नंदगाव जि.प. गटातून विजयी झालेले *राष्‍ट्रवादीचे महेंद्र धुरगुडे* यांनी आपल्‍या कामाचा ठसा उमटवत तमाम राजकीय पदाधिका-यापुढे मतदारांच्‍या अपेक्षापुर्ती कशी केली जाते याचे सकरात्‍मक उदाहरण आपल्‍या कार्यातून दाखवून दिले आहे. त्‍यामध्‍ये एका विद्यार्थ्‍यास उज्‍वल भवितव्‍यासाठी मदत केली तर दुस-या घटनेत विद्यार्थ्‍याच्‍या मृत्‍यू पश्‍चात कुटुंबियास अनमोल मदत मिळवून दिली.

महिनाभरापूर्वी जिल्‍हापरिषद निवडणुकीत नंदगाव गटासाठी मूळचे मंगरुळ (ता. तुळजापूर) येथील रहिवाशी असलेले मात्र काक्रंबा गटातील जि.प. सदस्‍य असलेले राष्‍ट्रवादीचे महेंद्र धुरगुडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच गेटकेन उमेदवार म्‍हणून त्‍यांच्‍यावर विरोधकाकडून टीका करण्‍यात आली. मात्र यापूर्वी सलग दोनदा जिल्‍हापरिषदेमध्‍ये आपल्‍या कामाची चुणूक दाखविणारे धुरगुडे यांनी न डगमगता नेटाने प्रचार करत विजयश्री खेचून आणल्‍याच्‍या घटनेला महिना होत आहे. निवडणुक प्रचाराच्‍या दरम्‍यान नंदगाव गटातील अनेक ठिकाणी नागरिकांशी थेट संवाद साधत अडचणी सोडविण्‍याचे आश्‍वासन दिले.

नंदगाव जि.प. गटातील बोळेगाव येथील खंडू रुपनर या विद्यार्थ्‍याचा अपघातामध्‍ये एक डोळा निकामी झाला होता. या अपघातामुळे खंडूने सार्वजनिक जीवनातून स्‍वतःस वेगळे करत घराबाहेर पडणे बंद केले होते व तो काळा चश्‍मा वापरत असे. प्रचारादरम्‍यान धुरगुडे यांना ही घटना समजली. यावेळी त्‍यांनी खंडूच्‍या डोळ्यावर उपचार करण्‍याचे आश्‍वासन दिले आणि विजयानंतर महिनाभरातच आश्‍वासनपूर्ती करत पुणे येथील डोळ्याच्‍या दवाखान्‍यात खंडू वर उपचार केले. तेथेच न थांबता धुरगुडे यांनी त्‍याच्‍या  पुढील शिक्षणाची जबाबदारी घेत आपल्‍या कंपनीमध्‍ये काम करण्‍याची संधी दिली. सध्‍या खंडू आत्‍मविश्‍वासाने वावरत आहे. तसेच नंदगाव येथील जि.प. शाळेस धुरगुडे यांनी भेट दिली असता शाळेतील बसवराज मिनजगे हा विद्यार्थी सन 2013 मध्‍ये सर्पदंशाने मयत झाल्‍याचे व त्‍या विद्यार्थ्‍याच्‍या  कुटूंबियास शासकीय मदत मिळाली नसल्‍याचे समजले. धुरगुडे यांनी तात्‍काळ पाठपुरावा करत जिल्‍हाधिका-यांची भेट घेवून राजीव गांधी सानुगृह योजनेतून 75 हजार रुपयाचा धनादेश पिडीत मुलाच्‍या कुटूंबियास सुपूर्द केला. विशेष म्‍हणजे वरील दोन्‍ही घटना या एकाच महिन्‍यात घडल्‍या आहेत.

Labels: ,

Saturday, 25 March 2017

शिवशंकर कोळी यांना नोकरी देवून 'युनिटी' कंपनीने जोपासली सामाजिक बांधिलकी



नळदुर्ग : नुकतेच अवयव दान करुन चौघांना जीवनदान देणा-या शिवपार्थ कोळीचे वडील शिवशंकर कोळी याना युनिटी मल्ट्रीकाॅन्स कंपनीने नौकरीचे नेमणुक पत्र नळदुर्ग येथील किल्ल्यात आयोजित जिल्हा पत्रकार अभ्यास दौ-याच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

   उस्मानाबाद जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने दि. १६ ते २२ मार्च दरम्यान पत्रकार अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौ-याचा समारोप नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर  माहिती जनसंपर्क संचानालय औरंगाबाद विभागाचे प्रभारी संचालक यशवंत भंडारे, औरंगाबाद पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अजित कुमार खंदारे, जेष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, उस्मानाबाद जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, युनिटी मल्ट्रीकाॅन्सचे कार्यकारी संचालक कफील मौलवी, अनिल विपत आदीजण उपस्थित होते.

उस्मानाबाद येथील शिवपार्थ कोळी याचे काही दिवसांपूर्वी ब्रेनडेड झाल्याने मृत्यू झाला होता. त्याचे अवयन दान करण्यात आल्याची माहिती मिळताच  शिवशंकर कोळी यांची युनिटी कंपनीने भेट घेवुन सामाजिक बांधिलकी जोपासत कोळी यांना नौकरीचे नियुक्ती पत्र मान्यवरांच्याहस्ते यावेळी दिले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी युनिटी कंपनीचे एम.डी. कफिल मौलवी यानी उपली बुरुज,पाणी महालसह किल्ल्यातील सुशोभिकरणाचे करण्यात येत असलेल्या कामाची माहिती देवुन झालेली कामे उपस्थित  पत्रकारांना  दाखविले. त्याचबरोबर अजितकुमार खंदारे, अनिल विपत यानी किल्ला संबंधी सविस्तर माहिती आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज सानप तर सर्व उपस्थितांचे आभार कफिल मौलवी यांनी मानले

Labels: ,

नळदुर्गचा किल्‍ला काल, आज आणि उदया




*नळदुर्गचा किल्‍ला काल, आज आणि उदया*

पौराणिक, ऐतिहासिक व आधुनिकतेची विरळ अशी अदभूत पार्श्‍वभूमी असलेल्‍या नळदुर्ग किल्‍ल्‍यामध्‍ये पर्यटकांच्‍या डोळ्याचे पारणे फेडणारा विहंगम दृश्‍याची निर्मिती झाली आहे. तीन वर्षापूर्वी नळदुर्गचा किल्‍ला अखेरची घटका मोजत होता. याचदरम्‍यान महाराष्‍ट्र वैभव राज्‍य संरक्षित स्‍मारक संगोपन योजनेंतर्गत सोलापूरच्‍या युनिटी मल्ट्रिकॉन्‍स प्रा.लि. कंपनीने हा किल्‍ला संगोपनार्थ पुरातत्‍व व वास्‍तू संग्रहालय संचनालय महाराष्‍ट्र शासनाकडून सामंजस्‍य करारान्‍वये दि. 26 ऑगस्‍ट 2014 रोजी घेतला. अल्‍पावधीतच भग्‍न अवस्‍थेतील किल्‍ल्‍यात सुशोभिकरण व विकासात्‍मक बदल घडवून हजारो पर्यटकांना साद घालण्‍यात यशस्‍वी ठरत आहे. युनिटी मल्ट्रिकॉन्‍सचे कार्यकारी संचालक कफील मौलवी, संचालक भारत जैन, जयधवल करकमकर, अनिल पाटील हे पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्‍ध करण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहेत.

    नळ राजाची पत्‍नी दमयंती ही श्री खंडोबाची भक्‍त असल्‍यामुळे महाराष्‍ट्रातील असंख्‍य भक्‍तांचे कुलदैवत असलेल्‍या खंडोबाचे लग्‍न बाणाईशी याच नळदुर्ग किल्‍ल्‍यामध्‍ये झाल्‍याची अख्‍यायिका आहे. वार्षिक यात्रोत्‍सवा दरम्‍यान महाराष्‍ट्रातील असंख्‍य भाविक किल्‍ल्‍यास भेट देवून उपली बुरुजाच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या खंडोबाच्‍या मुळ स्‍थानाचे दर्शन घेतात. स्‍थापत्‍य शास्‍त्रातील अदभूत चमत्‍कार समजला जाणारा किल्‍ल्‍यातील नर-मादी धबधबा सोळाव्‍या  शतकात इब्राहीम आदिलशहा दुसरा याच्‍या कालखंडात बांधण्‍यात आला. याच कालखंडामध्‍ये किल्‍ल्‍यातील अनेक वास्‍तूंची निर्मिती करण्‍यात आली. स्‍वातंत्र्यपूर्व काळात किल्‍ल्‍यामध्‍येच मुन्‍सफ कोर्ट व नळदुर्ग हे जिल्‍हयाचे ठिकाण होते. हैद्राबाद मुक्‍ती संग्राम लढयानंतर हा प्रदेश भारतात विलीन झाला व ऐतिहासिक किल्‍ला केंद्र शासनाच्‍या  अधिपत्‍याखाली आला. किल्‍ल्‍याचा अवाढव्‍य परिसर पाहता सरकारकडून नेमण्‍यात आलेल्‍या जेमतेम कर्मचा-यावर देखरेखीचा भार होता. या अपु-या कर्मचा-यामुळे किल्‍ल्‍याच्‍या भग्‍न अवस्‍थेमध्‍ये दिवसेंदिवस भर पडत गेली. पावसाळ्यातील पंधरा-वीस दिवस वगळता वर्षभर किल्‍ल्‍यात येणा-या पर्यटकांची संख्‍या कमी असायची. मात्र आजघडीला युनिटी कंपनीच्‍या परिश्रमामुळे पर्यटकांचा ओघ सुरु आहे.  

  युनिटी कंपनीच्‍या माध्‍यमातून किल्‍ल्‍यात येणा-या पर्यटकांसाठी सुसज्‍ज वाहन पार्किंगची सोय उपलब्‍ध केली आहे. किल्‍ल्‍याच्‍या तटबंदीवर व किल्‍ल्‍यात सर्वत्र झाडे-झुडपे वाढली होती. किल्‍ल्‍यात जाण्‍यासाठी रस्‍ते नव्‍हते. जे होते ते अरुंद व पाऊलवाटा होत्‍या. किल्‍ल्‍यात सर्वत्र जनावरांचे मलमूत्र पडायचे. मात्र युनिटी कंपनीने संगोपनार्थ हा किल्‍ला  घेतल्‍यानंतर आश्‍चर्यकारक परिस्थिती बदलली आहे. वरील सर्व अडचणी दूर करुन हा किल्‍ला सुंदर व आकर्षक, मनोरंजनाच्‍या ठिकाणात परिवर्तित झाल्‍याचे दिसत आहे. किल्‍ल्‍याच्‍या मुख्‍य प्रवेशद्वारास ऐतिहासिक स्‍वरुपाचा दरवाजा बसविण्‍यात आले आहे. किल्‍ल्‍यामध्‍ये आठ सुरक्षा रक्षक तैनात करण्‍यात आले आहे.

*युनिटीने किल्‍ल्‍यात केलेली ठळक विकास कामे :-*

मुख्‍य प्रवेशद्वार, बारादरी, पाणीमहल, उपली बुरुज आदींची डागडुजी करण्‍यात आली. (खर्च - दीड कोटी रु.)

किल्‍ल्‍यातील ऐतिहासिक इमारतीस जोडणारे सर्व रस्‍ते सुसज्ज तयार करण्‍यात आले. रस्‍त्‍याच्‍या कडेला फुलझाडांचे सुशोभिकरण करण्‍यात आले. (खर्च - अडीच कोटी रु.)

बोरी नदी ते पाणी महाल पर्यंत गाळ काढून नदीतील झाडे-झुडपे काढून नदीपात्राची रुंदीकरण व खोलीकरण करण्‍यात आले. (खर्च - 3 कोटी रु.)

किल्‍ल्‍यास भेट देणा-या पर्यटकांकरीता महिला व पुरुषांकरीता प्रत्‍येकी तीस स्‍वच्‍छता गृह बांधण्‍यात आले. (खर्च - 10 लाख रु.)

पर्यटकांना पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध करुन देण्‍याकरीता विंधन विहीर घेवून जलशुध्‍दीकरण यंत्र बसविले आहे. त्‍यामुळे पर्यटकांना मिनरल वॉटर (साधे पाणी) मोफत उपलब्‍ध केले आहे. तर थंड पाणी एटीएम मशीनद्वारे अल्‍प दरात उपलब्‍ध केले आहे. (खर्च - 3 लाख रु.)

पर्यटकांसाठी किल्‍ल्‍यात ठिकठिकाणी आसनव्‍यवस्‍था निर्माण करण्‍यात आली आहे. (खर्च - 15 लाख रु.)

किल्‍ल्‍यातील स्‍वच्‍छतेकरीता सहा सफाई कामगारांची नेमणूक केली असून जागोजागी डस्‍टबीन (कचराकुंडी) ची सोय करण्यात आली आहे. त्‍यावर महिनाकाठी 40 हजार रुपये खर्च केला जातो.

राज्‍यातील पुणे व आंध्रप्रदेशातील राजमंद्री येथून देशी-विदेशी आकर्षक विविध प्रकारची 10 हजार फुलझाडे किल्‍ल्‍यात सर्वत्र लावून सुशोभित करण्‍यात आले आहे. (खर्च - 60 लाख रु.). फुलझाडे कामासाठी बाहेरुन 2 हजार पेक्षा अधिक ट्रॅक्‍टर काळी माती आणून त्‍यावर फुलझाडे लागवड करण्‍यात आली आहेत. यापैकी अनेक ठिकाणचा परिसर रंगबेरंगी फुलांनी बहरुन गेला आहे. काळ्या मातीसाठी जवळपास 35 ते 40 लाख रुपये खर्च झाला आहे.

किल्‍ल्‍यामध्‍ये सर्वत्र ठिकठिकाणी बगीचा (लॉन) तयार करण्‍यात येत आहेत.

केरकचरा, साफसफाई, सुरक्षा रक्षक, किल्‍ल्‍यातील भिंतीवरील व जमिनीवरील झाडे-झुडपे वेळोवेळी काढण्‍याच्‍या कामावर दरदिवशी 5 हजार तर महिन्‍याकाठी दीड लाख रुपये खर्च करण्‍यात येत आहे.
भविष्‍यात संगीत कारंजे, किल्‍ल्‍याच्‍या बाह्य तटबंदीस आकर्षक विद्युत रोषणाई करण्‍यात येणार आहे.

नर-मादी
नर-मादी धबधबा हा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. वर्षभरातील सुट्टीच्‍या व ठराविक दिवशी आधुनिक तंत्रज्ञानाच्‍या सहाय्याने चालू करण्‍याचा मानस आहे. नर-मादी धबधबा व पाणी महालच्‍या आतील बाजू स्‍वच्‍छता करुन डागडुजी करण्‍यात आली. सुरक्षा जाळी बसविण्‍यात आल्‍या. वाहून जाणारे पाणी थांबण्‍यासाठी 90 हजार क्‍युबिक मीटरचे दोन तलाव तयार करण्‍यात आले. त्‍यामध्‍ये 2 कोटी लीटर पाणी साठवण्‍याची क्षमता आहे. या पाण्‍यावरच नर-मादी धबधबा चालू करण्‍यात येणार आहे. या कामावर जवळपास 2 कोटी रुपये खर्च झाले आहे.

साहसी क्रीडा प्रकाराच्‍या माध्‍यमातून आत्‍मनिर्भर होण्‍यासाठी विविध उपक्रम राबविण्‍यात येणार आहे. यामध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍यातील सर्वात मोठी झीप लाईन (वायर रोब) उपली बुरुज ते परंडा बुरुज यादरम्‍यान अंदाजे 600 मीटर लांबीचे तयार करण्‍याचे काम प्रगतीपथावर आहे.

बोटींग, रायफल शुटींग, रोप क्‍लायबिंग, स्‍पोटर्स, पॅरा ग्‍लॉडिंग, चक्रव्‍यूह, आर्चरी, झारबिंग, लहान मुलांसाठी एटीव्‍ही ट्रॅक्‍स, गिर्यारोहण, स्विमिंग आदी साहसी खेळासाठी प्रकल्‍पाचे काम सुरु आहे.

उस्‍मानाबाद, लातूर, सोलापूर या तीन जिल्‍ह्यासाठी मनोरंजनात्‍मक व शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांसाठी साहसी खेळाची निर्मिती करण्‍यात येत आहे.


Labels: ,