Friday, 28 February 2014

अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान

पांगरी (गणेश गोडसे) -: पांगरी (ता. बार्शी) परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वा-यासह व विजेच्या गडगडाटात अवकाळी पाऊस झाला. संपुर्ण रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतक-यांसह ज्वारी, गहु, आंबा, कांदा, फळभाज्या आदी पिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. गुरुवारी सकाळी कडक उन पडल्यामुळे द्राक्षांचे घड फुटण्‍यास मोठया प्रमाणात सुरूवात झाली आहे.
    पांगरी मंडलचे आर.एस.देशमुख यांनी द्राक्षबागांची पाहणी करूण 60 टक्के बागा नुकसानग्रस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला असुन वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर पंचनामे करू, असे बोलताना सांगितले. दुपारपासुनच आकाशात काळे ढग जमा होऊ लागले होते. विजांचा कडकडाटही होत होता. सहा वाजण्‍याच्या सुमारास अचानक वादळी वा-यासह पावसाला प्रारंभ झाला. वरूणराजाने चांगलीच हजेरी लावली. यादरम्यान अर्ध्या तासाच्या आसपास व पुन्हा रात्री 9 वाजण्‍याच्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावली. 5 ते 6 दिवसांपासुन असेच वातावरण या भागात असल्यामुळे आजही वरूणराजा येथे हजेरी लावणार नाही अशी आशा शेतक-यांना होती. पांगरी व कारी भागात सोलापुर जिल्हयात सर्वाधिक द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. द्राक्षबागांचा हंगाम निम्यावर आला होता. कांही बागा मध्यावर तर कांहीची तोडणी आजपासुन करण्‍यात येणार होती. बाजारपेठेत द्राक्षांना उठाव नसल्यामुळे शेतक-यांच्या निम्या बागा हया शिल्लक होत्या. व्यापारी बागा घेण्‍यास टाळाटाळ करत असल्यामुळे अनेकांच्या बागा तशाच उभ्या राहील्या असल्यामुळे त्या शेतक-यांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका सहन करावा लागला आहे. आधीच दुष्काळच्या छायेत सापडलेल्या शेतक-यांचे अवकाळी पावसाने कंबरडेच मोडले आहे. व्यापारी अवकाळी पाऊस पडल्यामुळे व द्राक्षांना तडे जात असल्यामुळे घेतलेल्या बागा सोडतात. त्यामुळे पांगरी परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
    प्रत्येक शेतकरी व्यापा-यांना विनवणी करून आपलीच बाग नेण्‍यासाठी तयार करत असल्याचे चित्र आज पांगरीत पहावयास मिळत होते. निसर्गाच्या लहरीपणापुढे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला आहे. व्यापा-यांनी दरात 40 टक्के घट केली आहे. निसर्गाने एका क्षणात शेतक-यांचे आर्थिक स्वप्न उदधवस्त केले असुन अपेक्षित उत्पादनात त्यांना 50 टक्के घट सहन करावी लागणार आहे. पांगरीसह उक्कडगांव पांढरी, चिंचोली, चारे, शिराळे, पिंपळवाडी, धानोरे, आगळगांव आदी भागातही पाऊस पडल्याचे वृत्त आहे. अवकाळी पावसामुळे व्यापा-यांनी घेतलेल्या बागा सोडुन देण्‍यास सुरूवात केली आहे. गतवर्षीही 18 मार्चला पडलेल्या अवकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील शेतकरी पुर्णतः कंगाल झाला होता.
        कांही दिवसांपासुन पांगरी परिसरातील ढगाळ पावसाच्या वातावरणामुळे व बदलेल्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादक शेतक-यांची झोप उडाली होती. व्यापारी बाजारपेठेत दर कोसळल्यामुळे ठरवुन घेऊन कापनी सुरू केलेल्या बागा आहे तशा अवस्थेत उभ्या सोडुन देऊन पळ काढत आहेत. त्यामुळे द्राक्ष ऊत्पादकांमधुन तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांना एकवेळचे अन्नही गोड लागेनासे झाले आहे. उत्पादक शेतकरी बागा ठरलेल्या दरांपेक्षा दर कमी करून द्राक्षे घेऊन जावाच अशी विनवणी करताना दिसत आहेत. अलीकडील काही दिवसात ठरवुन घेतलेल्या बागा मधुनच सोडण्‍याच्या व्यापा-यांच्या पध्‍दतीमुळे पांगरी परिसरात व्यापारी व शेतक-यांमध्ये अनेकदा खटके उडण्‍याचे प्रकारही घडले आहेत. क्‍वचीतप्रसंगी व्यापा-यांना दम भरूनही द्राक्षे कापण्‍यास भाग पाडल्याचे प्रकारही घडले आहेत. यावर्षी व्यापा-यांची संख्या या भागात खुपच कमी प्रमाणात आढळुन येत आहे.
    पांगरी व कारी परिसरात द्राक्ष बागांची संख्या लक्षणीय असुन बागा विक्रीस आलेल्या आहेत. वर्षेभर द्राक्ष ऊत्पादक शेतक-यांना डावणीचा प्रादुर्भाव अवकाळी पावसाचा फटका मिलीब्गज, थ्रिप्स आदी अनेक नैसर्गिक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. चालु हंगाम जोमात होत असला तरी पाऊस कमी झालेला असल्यामुळे सध्या अनेक शेतक-यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असुन पुढील एप्रिल महिन्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी छाटनी कशी करायची व पुढील वर्षीसाठी बागा कशा जोपासायच्या या एकाच विवंचनेत आहे. कारण ज्या बागांना एप्रिल छाटणीच्या वेळी पाणी मिळत नाही त्या बागा आगामी वर्षी फेल जातात. ओषधे खते यांच्या किमतीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत भरीव वाढ झालेली असल्यामुळे यावर्षी उत्पादन खर्चात ही मोठी वाठ झाली आहे. वातावरणातील बदल मजुरित झालेली दुप्पट वाढ निसर्गाची अवकृपा शासनाचे द्राक्ष उत्पादक शेतक-याबाबत असलेले उदासिन धोरण यासह विविध समस्यांच्या गर्तेत द्रास उत्पादक सापडला आहे. निसर्गाच्या लहरीपणावरील पिक म्हणु या पिकाकडे पाहीले जाते. द्राक्ष पिकाला शासनाने हमी भाव जाहीर करून द्राक्षापासुन उपपदार्थ निमिर्ती केंद्र पांगरीत सरू करावे, अशी येथील शेतक-यांची मागणी आहे. रक्ताचे पाणी करून जिवापाड सांभाळलेल्या द्राक्ष बागांमधुन भरमसाठ उत्पादनाची शेतक-यांनी धरलेली अपेक्षा फोल ठरू पहात असुन बाजारात उठाव नसल्याचे कारण सांगुन व्यापारी द्राक्ष उत्पादकांची पिळवणुक करत असुन बागा कवडीमोल दराने खरेदी करण्याच्या विचारात आहेत. यामुळे उत्पादक शेतक-यांचा जिव टांगणीला लागला असुन आता पुढे काय हा प्रश्‍न त्यांना भेडसावु लागलेला आहे. पांगरी भागातील अनेक शेतक-यांचे द्राक्षबागाचे प्लॉटस विक्रीस आलेले असुन शेतक-यांनी विचार करून शेवटी स्वतःच बागामधील द्राक्षे काढुन लातुर, नांदेड, परभणी, कळंब, अंबाजोगाई, अकोला, बीड, नागपूर, हिंगोली आदी ठिकाणी पाठवण्यास सुरूवात केलेली आहे. चालु वर्षी ऊत्पादन खर्चात मोठी भरीव वाढ झालेली असुन एकरी एक लाख तीस ते एक लाख चाळीस हजार रूपये खर्च झालेला असुन उत्पन्न घटल्यास अथवा दर कमी मिळाल्यास द्राक्ष ऊत्पादकाचा एकरी केलेला खर्चसुदधा मिळण्याची शक्यता नसल्याचे द्राक्ष उत्पादक शेतक-यांचे म्हणणे आहे. यावर्षी पाण्याअभावी अनेक द्राक्षबागाना द्राक्षे लागलेले नाहीत.
   द्राक्ष ऊत्पादकांच्या एकीची गरज
  पांगरी भागात ऐवढया मोठया जिवापेक्षा जास्त जपुन व रात्रीचा दिवस करून वर्षभर बागा जोपासल्या जातात पण त्या बागा विक्री करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा बाहेरच्या व्यापा-यांच्या पायावर लोटांगण घालण्याची वेळ द्राक्ष ऊत्पादक शेतक-यांवर प्रतिवर्षीच येते. त्यामुळे हे कुठेतरी थांबणे गरजेचे असुन शेतकरी टिकण्यासाठी त्यांनीच पुढे येणे गरजेचे असुन संघटन करून द्राक्षांसाठी बाजारपेठ शोधुन स्वतःच त्या बाजारपेठेवर कब्जा करणे गरजेचे आहे. पांगरीतुन जात असलेल्या पुणे-लातुर राज्यमार्गावर शेतक-यांनी द्राक्षांचे स्टॉल्स ऊभारल्यास त्यांना चांगला पतिसाद मिळण्याची शक्यता असुन शेतक-यांना हक्काची बाजारपेठ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादकाची अवस्था तोंड दाबुन बुक्यांचा मार अशीच झालेली असुन बागावर केलेले नियोजन पुर्णपणे कोलमडले आहे. बँकासह खाजगी सरकारी देणं कस फेडायच हा एकच प्रश्‍न शेतक-यांच्या समोर आहे. कृषी खात्याचे कर्मचारी पाहणी करू लागले असुन नुकसान भरपाई मिळणार का हे आगामी काळात कळेल.
    निवडणुकीपुरते शेतक-यांच्या मतदानासाठी त्यांच्या घराचे उंबरठे झिजवणा-या पुढा-यांना द्राक्ष उत्पादकांच्या परिस्थतीची पुर्ण माहिती असुनही कोणताच राजकीय पुढारी द्राक्ष उत्पादक शेतक-यासाठी काही करण्यास तयार नसुन या भागातील द्राक्ष ऊत्पादनाचे प्रमाण पाहता येथे एखादा छोटा-मोठा लघुउद्योग उभारून द्राक्षांपासुन उपपदार्थ निमिर्ती करून त्यांला बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे असताना कोणीच याबाबत सकारात्मक असल्याचे दिसत नाही.

Thursday, 27 February 2014

काळ्या पाण्याची शिक्षा; आरोग्य विभागाचा कारभार

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शीतील ऐनापूर रस्त्यावरील नागरिकांना नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाची देणगी म्हणून कित्येक वर्षांपासून काळ्या पाण्याची शिक्षा दिली जाते. हे काळे पाणी म्हणजे गटारीतील मैलामिश्रीत गाळ होय.
    बार्शी शहराची भर मध्यवस्ती व मुख्य बाजारपेठेतील ऐनापूर मारुती
मार्गावर अगदी किरकोळ पावसानेही कित्येक वर्षांपासून पाणी साठत आहे. सदरच्या मार्गावर येणारे पाणी हे आजू बाजूच्या सर्व परिसरातून वाहणारे पाणी असून सांडपाण्याची नीटपणे व्यवस्था नसल्याने, गटारीतील गाळ वेळोवेळी काढण्यात येत नसल्याने, गरजेपेक्षा लहान गटारी असल्याने, लेंडीनाला बंदिस्त केल्याने तसेच राजकिय हेतूने येथील नागरिकांना त्रास देण्याच्या उद्देशाने, स्वच्छता कर्मचार्‍यांना पाठीशी घालण्यासाठी, कागदोपत्रीच स्वच्छता होत असल्यानेही नागरिकांना त्रास होत आहे. थोड्या पावसानेही दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर साठल्याने नागरिक नाकातोंडाला हात लावून ये-जा करतात. बर्‍याच वेळेस लहान मुले, महिला व वृध्द पुरुषांना पाठीमागून भरधाव वेगाने वाहनधारक घाण पाणी उडवून जातात. बर्‍याच ठिकाणचे नागरिक देखिल जाणीवपूर्वक केरकचरा उघड्या गटारांत टाकून मोकळे होतात. अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या व सार्वजनिक मुतार्‍यांची संख्या कमी होत असल्यामुळे मिळेल त्या ठिकाणी नागरिक घाण करतांना दिसून येत आहे. ऐनापूर रस्त्यावरील मुतारीदेखिल दुरुस्तीच्या नावाखाली दोन तीन वर्षांपूर्वीच नेस्तनाभूत करण्यात आली त्याचा वापर करणारे नागरिक निर्लज्जपणे उघड्यावरच आपला विधी उरकू लागले. उघड्यावरील घाण कमी करण्यासाठी राजकिय सल्ल्याने वेगळाच फॉर्मुला वापरल्यानंतर वापरकर्ते व्यापार्‍यांच्या दुकानांच्या कुलूपांवर आणि घरासमोर घाण करत असल्याने वेगळीच समस्या निर्माण होत आहे. खुश्कीचा मार्ग व सतत महिलांची वर्दळ असलेला परिसर म्हणून दत्त बोळ प्रसिध्द आहे. सदरच्या ठिकाणचा स्लॅब फोडून गाळ काढण्यात आला परंतु त्या ठिकाणी डागडुजी करणे व सांडपाण्यालामार्ग करणे गरजेचे होते. परंतु तात्पुरता मुरुम टाकून बुजविण्यात आल्याने, अल्पशा पावसाने चिखल झाला आहे. अत्यावश्यक सेवा असलेल्या आरोग्य खात्याचे प्रत्येक भागात विविध प्रश्‍न निर्माण झाले आहेत, दिवसेंदिवस आरोग्य खात्याचा खर्चही वाढविण्यात येतो परंतु नागरिकांना कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे.

Labels:

वादळी वा-यासह पावसाने नळदुर्ग परिसराला झोडपले; 1 बैल ठार

नळदुर्ग :- सलग दुस-या दिवशी म्‍हणजे गुरुवारी दुपारी तीनच्‍या सुमारास जोरदार वादळी वा-यासह पावसाने नळदुर्ग व परिसराला झोडपून काढले. तर किलज (ता. तुळजापूर) शिवारात वीज पडून एक बैल जागीच ठार झाला. तसेच परिसरात वादळी वा-यामुळे अनेकांच्‍या घरावरील पत्रे उडून गेले. अवेळी झालेल्‍या पावसामुळे काढणी सुरु असलेल्‍या ज्‍वारी, गहू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले असून तालुक्‍यातील मुर्टा व मानमोडी शिवारात जवळपास चारशे एकर द्राक्ष बागेचे नुकसान झाल्‍याचे प्राथमिक अंदाज आहे.
       तुळजापूर तालुक्‍यातील किलज शिवारातील आमराई तांडा येथे गोविंद मानसिंग राठोड (रा. आमराई तांडा, किलज) हे शेतात दुपारी नांगरत होते. ढगाळ वातावरणामुळे बळीनांगर सोडून नांगरालाच बैल बांधून चारा टाकले. तेथून गोविंद राठोड हे घराकडे जात असताना जोरदार वादळी वारा होऊन मोठा पाऊस झाला. यावेळी अचानक वीज पडून नांगरला बांधलेल्‍या एका बैलाच्‍या  अंगावर वीज कोसळली. या दुर्घटनेत एक बैल जागीच ठार झाला. तर दुसरा बैल दोरखंड तोडून दुसरीकडे पळून गेला. 
          अशोक राठोड (रा. आमराई तांडा), बंडू पवार, राजेंद्र राठोड, मोतीराम पवार (तिघे रा. मारखोरी तांडा) यांच्‍या घरावरील पत्रे वादळी वा-याने उडून गेल्‍याने मोठे नुकसान झाले आहे. त्‍याचबरोबर शेतातील काढणीला आलेल्‍या पिकाचे मोठे नुकसान झाल्‍याचे सरपंच राजेंद्र राठोड यांनी बोलताना सांगितले. दरम्‍यान तुळजापूर तालुक्‍यातील येडोळा, लोहगाव, वागदरी, गुजनूर, शहापूर, मानेवाडी, जळकोट, मुर्टा, होर्टी, अणदूर, गंधोरा, बोरनदीवाडी यासह परिसराला पावसाने झोडपून काढले. बोरनदीवाडी येथे अवेळी पावसामुळे काढणी सुरु असलेल्‍या पिकाचे मोठे नुकसान झाल्‍याचे सरपंच तानाजी चव्‍हाण यांनी सांगितले. तर मुर्टा गावच्‍या शिवारात शेती पिकाचे नुकसान झाले असून ज्‍वारी व कडबा काळा पडला. तर मोठ्याप्रमाणावर हरभरा, गहू पिकाचे नुकसान झाल्‍याचे निलकंठ इटकरी यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.
       मुर्टा, मानमोडी (ता. तुळजापूर) येथे जवळपास चारशे एकर द्राक्षांच्‍या बागा असून अवकाळी पावसामुळे द्राक्षांच्‍या बागेतील मणीं गळून पडले. पाने फाटले, द्राक्षेचे घड तुटून खाली पडले. यामुळे बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागातील माल तयार झाला होता. तर काही जणांचे तोडणी सुरु आहे. मात्र अवकाळी पाऊस व वादळी वारा दोन दिवस झाल्‍यामुळे बागेचे प्रचंड नुकसान झाले. पहिल्‍या दिवशी द्राक्ष बागेचे तीस टक्‍के, तर गुरुवार रोजी झालेल्‍या वादळी वा-यामुळे जवळपास निम्‍मे बागांचे नुकसान झाले असून शासनाने शेतक-यांच्‍या शेतीचे तात्‍काळ नुकसानीचे पंचनामे करुन मदत देण्‍याची मागणी प्रगतशील शेतकरी गोपाळ सत्‍यवान सुरवसे यांनी केली आहे.

Labels:

बावी येथे ट्रकची चोरी

पांगरी (गणेश गोडसे) -:  घरासमोरील गायरानात लावलेली ट्रक अज्ञात चोरटयाने चोरून नेऊन चार लाख रूपयांचे नुकसान केल्याची घटना बावी (आ) ता. बार्शी येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
      नितिन नारायण मोरे (वय 26, रा.बावी) असे ट्रकची चोरी झालेल्या मालकाचे नांव मोरे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, त्यांच्या मालकीची मालवाहु ट्रक क्रमांक एम एच 14 बीटी 1721 हा त्यांच्या घरासमोरील शासकीय गायरानात उभी केलेली होती. कोणीतरी अज्ञात चोरटयाने पाळत ठेऊन त्यांच्या मालकीची ट्रक त्यांच्या संमतिशीवाय चोरून नेली आहे. पांगरी पोलिसात अज्ञाताविरूदध ट्रक चोरून घेऊन जावुन नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.

Labels:

इतरांचेही जीवन निर्विघ्न करा : संगीताबहनजी

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: व्यर्थच्या चिंतनापासून मुक्त राहिल्यास जीवन सुकर व इतरांबद्दल चांगल्या भावना ठेवल्यास त्यांचेही जीवन सर्व संकटापासून मुक्त होईल. स्वत:सह इतरांचेही जीवन निर्विघ्न बनविण्याची प्रतिज्ञा करा, विघ्नांमुळेच दु:खाची निर्मिती होत असल्याचे ब्र.कु.संगीताबहनजी यांनी म्हटले.
     महाशिवरात्रीनिमित्त सेवाकेंद्रात आयोजित केलेल्या शिवध्वजारोहन, शिव अवतरण व शुभसंदेश या वर्षभर चालणार्‍या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी रोटरीचे तेजस वखारिया, लायन्सचे प्रकाश महामुनी, विनोद बुडूख, वर्षा खांडवीकर, भ.के.गव्हाणे, वैजिनाथभाई, मोहनभाई आदी उपस्थित होते.
    संगीताबहनजी म्हणाल्या, महाशिवरात्रीच्या उपवासाकरिता आपण आपल्या दैनंदिन भोजनात बदल करुऩ स्थूल उपवास केला आहे त्याप्रमाणे नकारात्मक संकल्पांचा त्याग करुन सकारात्मक संकल्प अंगिकारल्यास सूक्ष्म उपवास घडेल. ब्रह्माद्वारे सत्ययुगाची स्थापना, विष्युद्वारे पालना तर शंकराद्वारे कलियुगाचा विनाश ही परमात्म्याची तीन कर्तव्ये आहेत. शिवलिंगाच्या पिंडीवर तीन पानाच्या बेलाची पाने, विभुतीचे तीन पट्टे धारण करतात. कलियुगातील काटेरी आणि विषारी फुलांप्रमाणे मनुष्याच्या अवगुणांना शिव परमात्मा हा ज्ञानामृताचा अभिषेक करतो. प्रत्येकातील शांती, प्रेम, आनंद अन पवित्रता या मूळ गुणांना जागृत करत सुगंधी फुलाप्रमाणे बनविले जाते, त्याचे प्रतिक म्हणून अभिषेक केला जातो, धोतर्‍याचे फूल अर्पण केले जाते. आपण आत्मरुपी दिपक असल्याचे सतत स्मरण व्हावे याकरिता नंदादिप लावण्यात येतो. सेवाकेंद्रातून सूक्ष्म धारणांचा अगिकार व शिवपरमात्मा राजयोगाचे शिक्षण देतात असेही त्यांनी यावेळी म्हटले.

Labels:

मातंग समाजावर झालेल्‍या लाठीमार घटनेचा नळदुर्ग येथे निषेध


नळदुर्ग -: मातंग समाज हा आजही सामाजिक, आ‍र्थिक, राजकीय व शैक्षणिक प्रगतीपासून दूर आहे. अन्‍न, वस्‍त्र, निवारा, शिक्षण या मुलभूत गरजापासून वंचित आहे. या गोष्‍टी पदरात पाडून घेण्‍यासाठी, मातंग समाजाला लोकसंख्‍येच्‍या प्रमाणात स्‍वतंत्र आरक्षण द्यावे व लहुजी वस्‍ताद साळवे यांचा पुतळा मुंबई येथील विधीभवन व दिल्‍ली  संसद भवन येथे बसवावा, या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आपल्‍या मागण्‍या लहुजी शक्‍तीसेना  संघटनेच्‍यावतीने अधिवेशनाचे औचित्‍य साधून मागत असताना अचानकपणे मातंग समाजावर धरपकड व लाठीमार करणा-या मुंबई पोलीस व राज्‍य सरकारचा नळदुर्ग येथील सामाजिक संस्‍था, संघटनांच्‍यावतीने जाहीर निषेध करण्‍यात आले आहेे  
        डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्‍ये जनतेला न्‍याय मिळवण्‍याच्‍या दृष्‍टीने आंदोलने हा पर्याय सांगितलेला आहे. त्‍याचाच आधार घेऊन लोकशाही पध्‍दतीने, सामाजिक न्‍यायाच्‍या मार्गाने, लहुजी शक्‍तीसेनेच्‍या मार्फत मागण्‍या पदरात पाडून घेण्‍यासाठी काढलेल्‍या मंत्रालयावरील मोर्चात मातंग समाजावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. राज्‍यातील प्रत्‍येक जिल्‍ह्यातून अनेक महिला, मुली, वृध्‍द, अपंग या मोर्चामध्‍ये सहभागी झाले होते. त्‍यात उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील मातंग समाज मोठ्याप्रमाणात प्रांताध्‍यक्ष सोमनाथ कांबळे यांच्‍या समवेत सहभागी झाला होता. त्‍यांच्‍या मताचा, भावनेचा विचार न करताना हाणामारी, पळापळ, अटक याचा अवलंब करुन हा मोर्चा धुडकावून लावला. 
      मातंग समाजावर मुंबई पोलीस व राज्‍य सरकारने केलेल्‍या लाठीमार घटनेबद्दल नळदुर्ग पोलीस ठाण्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड यांना दिलेल्‍या निवेदनाच्‍या माध्‍यमातून निषेध व्‍यक्‍त केला आहे. यावेळी राष्‍ट्रसेवा दलाचे जिल्‍हा संघटक दयानंद काळुंके, राज्‍य सदस्‍य शिवाजी पोतदार, बामसेफचे जिल्‍हाध्‍यक्ष दयानंद काळुंके, बसपाचे आर.एस. गायकवाड, रिपाइंचे तुळजापूर तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड, बहुजन रयत परिषदेचे सुधारक सगट यांनी आपल्‍या मनोगतातून निषेध व्‍यक्‍त केला. याप्रसंगी सिकंदर अंगुले, राजेंद्र गायकवाड, शामराव गायकवाड, लक्ष्‍मण देडे, भुजंग पांडागळे, लक्ष्‍मण क्षिरसागर, सुनिल क्षिरसागर, लक्ष्‍मण शिंदे, बालाजी माने, आण्‍णासाहेब सनदी, कांत भिसे, नारायण चिमणे, चंद्रकांत कांबळे, अंकुश क्षिरसागर यांच्‍यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

लाईफ इन्‍सुरन्‍स असोसिएशनच्‍या उपाध्‍यक्षपदी चंद्रकांत मुळे

चंद्रकांत मुळे
पांगरी (गणेश गोडसे) :- बार्शी तालुका लाईफ इन्सुरन्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी पांगरी (ता.बार्शी) येथील चंद्रकांत मुळे यांची तर अध्यक्षपदी संजय चापले यांची बिनविरोध निवड करण्‍यात आली.
    बार्शी येथील प्लाझा मंगल कार्यालयात तालुक्यातील एजंटांच्या झालेल्या बैठकीत पदाधिका-यांच्या निवडी पार पडल्या. र्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सदस्य बाबुकाका गांधी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन बार्शी शाखेचे शाखाधिकारी भजनावळे, साताराचे सुदर्शन इंगळे, पुणे विभागीय अध्यक्ष निलकंठ ताकमोघे यांच्यासह तालुक्यातुन बहुसंख्य सभासद हजर होते. कार्यक्रमात माळवळे अध्यक्ष अनिल सोलापुरे, सचिव रमेश गिरी यांच्यासह इतर पदाधिका-यांचा सत्कार करण्‍यात आला. बार्शी तालुका शाखेचे नुतन अध्यक्ष संजय चापले, उपाध्यक्ष चंद्रकांत मुळे, सचिव अनिल मोरे, खजिनदार आर.के.पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्‍यात आला.
  सुदर्शन ईंगळे यांनी लारइफ इन्सुरन्स कंपनीच्या विविध योजनासंदर्भात माहिती देऊन व्यवसाय वृदधीबाबत सखोल मार्गदर्शन केले. निवड प्रक्रिया पार पाडण्‍यासाठी करोडपती सन्मानार्थी, शकिल पठाण, सुरेश कुंभार, राजेंद्र गायकवाड यांच्यासह असोसिएशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. मुळे यांच्या निवडीबद्द त्यांचे पांगरी परिसरातुन अभिनंदन होत आहे.

Labels:

बार्शी शहर व तालुक्यात अवकाळी पाऊस

पांगरी (गणेश गोडसे) -:  बार्शी शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी साडे पाच वाजण्‍याच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या गडगडाटांसह गारांचा 25 ते 30 मिनिटे पाऊस पडला असुन द्राक्षे, आंबा, ज्वारी, गहु यासह भाजीपाल्यांच्या पिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ग्रामीण भागात पांगरीसह कारी, उक्कडगांव, कांदलगांव, आगळगांव, कुसळंब, घारी, पुरी, गोरमाळे, नारी, जामगांव आदी बार्शी तालुक्यातील गांवात सर्वदुर अवकाळी पाऊस पडला आहे.
  दिवसभर वातावरणात उष्णता जाणवत होती. सायंकाळच्या दरम्यान अचानक आकाशात ढग जमा होऊन अवकाळी पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला पंधरा मिनिटे पाऊस पडल्यानंतर विश्रांती घेत पुन्हा वरूणराजाने बरसायला सुरूवात केली. र्धा तास अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे बार्शी तालुक्‍यातील कारी, उक्कडगांव, पांगरी, पांढरी आदी द्राक्ष बागांच्या पटयात हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागायतदारांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. काढुन टाकण्‍यात आलेल्या ज्वारी गहु कांदा आदी पिकांना मोठी हानी पोहचली आहे. धीच चटके सोसट असलेल्या शेतक-यांना निसर्गानेही झटके दिल्यामुळे बार्शी तालुक्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शासनाने नुकसानीची पाहणी करून शेतक-यांना भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.

Labels:

भाकरीचा प्रश्‍न बाजूला : कॉं.तानाजी ठोंबरे

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : राजकीय पुढार्‍यांचे फंटर गावागावात पैसे घ्या अन जयंती करा असे सांगून नाचायला लावत आहेत, शिवाजी, बाबासाहेब, आण्णाभाऊच्या नावाने नाचवले जात आहे व गरिबांच्या भाकरीचा प्रश्‍न बाजूलाच राहत असल्याचे कॉं.तानाजी ठोंबरे यांनी म्हटले.
    बार्शी नगरपरिषदेचे कंत्राटी कामगार, बार्शी टेक्स्टाईल मिलचे कंत्राटी कामगार व रेशनच्या रास्त भाव दुकानाती धान्याच्या प्रश्‍नाबाबत विविध संघटनांनी एकत्र येऊन आयटकच्या वतीने लहूल वस्ताद चौक येथून बार्शी तहसिलवर मोर्चा काढण्यात आला यावेळी ते बोलत होते.
     यावेळी कॉं.शौकत शेख, प्रविण मस्तूद, धनंजय शिंदे, बापू यमगर, विनायक माळी, संदीप गायकवाड, युवराज चव्हाण, अर्जुन शिंदे, रंगनाथ शिराळ, मॅमूना मुलाणी, लैला शेख, रमाबाई कुचेकर, राजश्री सर्वगोड, सुनिता लिंगे, रुक्साना शेख, लक्ष्मी नेवसे, वनमाला आगरकर, शारदा पंढरपूरे, महानंदा स्वामी, सुमन बोकेफोडे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार व पदाधिकारी उपस्थित होते.
   
     
  पुढे बोलतांना कॉ.तानाजी ठोंबरे म्हणाले, या पुढार्‍यांजवळ पैसा आहे पैशाने यांना सत्ता पाहिजे सत्तेच्या जीवावर यांना मस्ती करायची आहे. तेंव्हा त्यांच्या सत्तेला त्यांच्या पैशाला भुलू नका, त्यांचं शिवाजीचं प्रेम खरं नाही, शिवाजी गरिबांचा आहे. शिवाजी काय मटकेवाल्यांचा, कॉन्ट्रॅक्टर, आकडेवाल्यांचा, दहा दहा कोटी, चौदा-चौदा कोटी निवडणुकीला खर्च करणारांचा शिवाजी आहे काय? उढा करायचा असेल तर गरिबांच्या प्रश्‍नावर लढा करा, कुठलाही झेंडा घेऊन लढा करा. शिवबांच्या राज्यात राहायचं तर लढा करावाच लागेल नाहीतर काहीही मिळणार नाही, आईचं नाव घेऊन परडी पुढे केल्यासारखे शिवाजीच्या नावाने अशीच परडी फिरवली जाईल. यांचा जन्म उन्हातच आहे, आयुष्य करपले आहे, भाकरीचा प्रश्‍न खरा आहे, त्या मुलीच्या नावाला लागू नका ते देवळाचा, मशिदीची भानगड करुन भांडणे लावतात. कोणत्याही राजकिय नेत्यांवर विश्वास ठेऊ नका. पालकमंत्री सोपल यांनी फोनवर निवेदन स्विकारल्याचे सांगीतले ते आपण स्पिकरवर ऐकवले आहे. पूर्वकल्पना देऊन आलो आहोत अधिकारी जागेवर नाहीत, आम्ही कोणी उपटसूंभे म्हणून आलो नाहीत. नगरपालिका कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम सेवेत सामावून घेणे, जहॉंगिर दरबारात आलो नाहीत आणि न्याय द्या म्हणून मागायची गरज नाही आपण पाकीस्तानमध्ये नाहीत, तहसिलदारांनी लेखी द्यावे लागेल. बार्शी टेक्स्टाईल मिलने कायदे मोडले आहेत. यावेळी कामगारांनी केलेल्या उपोषणाचे ५ दिवस झाले तरी तालुका मॅजीस्ट्रेट लक्ष देत नाहीत इतके संवेदनाहिनपणे वागल्याने त्याचा खेद वाटतो. त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळत नाही. कामगारांचा अधिकार आहे डॉ.बाबासाहेबांनी अधिकार दिला आहे, किमान वेतन दिले जात नाही, अनेक वर्षांपासून बोनस देण्यात येत नाही. पगारवाढ मिळत नाही. प्रोबिशन कुठल्या कायद्याने ते सांगीतले जात नाही, आमच्या मागण्या न्यायाच्या असल्यामुळेच न्यायालयाने एकतर्फी निकाल दिला आहे. आम्ही कोणाकडून हप्ता वगैरे घेतो की काय? ३५ किलो धान्य द्यायलाच पाहिले. प्रसंगी जेलभरो आंदोलन करु, काही बदल झाले असल्यास तसे जीआर द्या, दरवेळेस आश्वासने देता, धान्य मिळाले का असा प्रश्‍न उपस्थितांना केला असता अनेकांनी धान्य मिळत नसल्याची तक्रार केली. धान्य देण्यात येत नाही. या महिन्यात धान्य देण्यात येत नाही म्हणणारे हरामखोर कोण? कोण लागून गेले आहेत, लोकांच्या सामन्य मागण्या असतांनाही त्यांना आंदोलन करावे लागते ही शर्मनाम बाब आहे, आम्ही काय दारुचे दुकान हवे म्हणून मागणी करायला आलो नाही. नुसत्या आशिर्वादाने आणि चांगल्या गोष्टीने पोट भरत नाही. लोकांच्या जगण्यासाठी अन्नधान्याची गरज असते, कायद्याच्या अधिकारात असलेल्या मागण्या व तुमची जबाबदारी असतांना कोणत्याही बाबत लक्ष दिले जात नाही. माझे घर गोडाऊन जवळ आहे कोणत्या वेळेस कोणत्या गाड्या बाहेर पडतात हे मला माहिती आहे इतक्या खोलवर जायचे नाही. तो घाणेरडा धंदा आहे त्या रेशनमध्ये हात घालेल त्याच्या हाताला घाण लागते. माझ्या सहिचा अर्ज यापूर्वीच दिला होता त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आपण बघतो म्हणत म्हणत बदली होईल तर मग केंव्हा निर्णय घेणार, आम्हाला रेशन दुकानदारांशी भाडणे करुन हप्ते घ्यायचे नाहीत ते तुमचे काम आहे. जे नागरिकांचे प्रश्‍न आहेत ते लेखी व सर्वांसमोर जे सांगायचे ते सांगीतले आहे. आता उन्हात आलो आहोत पुन्हा पुन्हा या हे उत्तर कशाला देता, त्या अधिकार्‍यांना बोलवून घ्या. तीन तीनवेळेस मोर्चे झाले एका ओळीचे उत्तर नाही. आमची आम्हालाच लाज वाटत आहे परंतु आपल्याला लोकांच्या प्रश्‍नाबाबत काहीच देणेघेणे नाही. महात्मा फुले, शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवले, पेशवे आहात की काय? लेबर ऑफिसर ला बोलवून घ्या, यावेळी तहसिलदार यांनी ४ तारखेला रेशन दुकानदारांसोबत बैठक घेण्यात येईल, विविध मागण्यासंदर्भात त्याच्याशी संबंधीत अधिकार्‍यांशी बैठक लावू आणि प्रश्‍न मार्गी लावू असे आश्वावसन यावेळी तहसिलदार बालाजी सोमवंशी यांनी दिले.

Labels:

पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा करा : पाटील

उस्मानाबाद -: जिल्ह्यातील पाणीटंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ज्या गावात व शहरात पाणी टंचाई आहे, त्या गावास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पुर्वीच्या योजनांची माहिती संबंधित अधिका-यांनी घेऊन पाणी टंचाई परिस्थितीचा गावनिहाय कृती आराखडा आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
       जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी बैठक झाली. जिल्ह्यातील पाणीटंचाई परिस्थितीचा आढावा या बैठकीत पाटील यांनी यावेळी घेतला.  उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी आणि सचिन बारवकर, नगर प्रशासन विभागाचे श्री.कुरवलकर यांच्यासह विविध तालुक्यांचे तहसीलदार, विविध नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची  उपस्थिती होती.
      पाटील म्हणाले की, सद्यस्थितीत भूम मधील 9 गावे व 2 वाडयात, कळंब मधील 2 गावात, तर वाशी मधील 3 गावात अशा 14 गावे व २ वाडयात, 17 विहीर/बोअर अधिग्रहणाच्या माध्यमातून आणि 12 शासकीय व 5 खाजगी अशा एकूण 17 टँकरद्वारे  पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रथम शासकीय टँकरने पाणी पुरवठा करावा. कमतरता भासल्यासच खाजगी टँकरचा वापर करावा. नवीन बोअरसाठी प्रस्ताव आल्यास संबंधित तहसीलदारांनी पाहणी करुन अहवाल घ्यावा. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची  कमतरता भासणार नाही, याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी याबैठकीत दिले.
         ज्या गावात टँकरने पाणी पुरवठा करावयाचा आहे. त्या गावात नळ योजना दुरुस्ती, तात्पूरती पूरक योजना, विंधन विहिर विशेष दुरुस्ती, टँकरद्वारे पाणी पुरवठा, विंधन विहीर अधिग्रहण, नवीन विंधन विहीर घेणे, बुडकी खोदणे,पाण्याचा स्त्रोत आहे किंवा पूर्वीच्या पाणी विषयक कोणत्या योजना राबविण्यात येत आहे, याची माहिती घेऊन पाहणी केल्यानंतरच आवश्यक बाबी तपासून तहसीलदार मार्फत नवीन टँकरसाठी प्रस्ताव सादर करावा, अशी सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. या बैठकीस सर्व संबंधित विभागाचे प्रमुखांची उपस्थिती होती. 

Labels:

विद्यार्थींनींची शिष्यवृत्ती रक्कम बॅंक खात्यात जमा

उस्मानाबाद :- जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे विविध  शिष्यवृत्तीची  योजना राबविण्यात येते. सन 2013-14 या शैक्षणिक  वर्षात 5 वी ते 7 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या 408 प्राथमिक शाळेतील 3 हजार 710 मुलींना 22 लाख 26 हजार रुपयाचे  तसेच इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या 208 माध्यमिक शाळेतील 3 हजार 98 मुलींना 30 लाख 98 हजार अशी एकुण 53 लाख चोवीस हजार रुपये अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलींना दिली जाणारी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीची रक्कम मुलींच्या वैयक्तिक बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली  आहे.
     ज्या शाळेतील मुख्याध्यापकांनी आजपावेतो सदरील योजनेतील पात्र लाभार्थ्यांची माहिती समाज कल्याण विभाग, उस्मानाबाद यांच्याकडे वर्ग केलेली नाही, त्यांनी त्वरीत माहिती/ यादी   पाठवावी.  या योजनेपासून कुणीही मुली वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर राहील, याची संबंधितानी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.

Labels:

अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांच्‍या मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीसाठी आवाहन

उस्मानाबाद :- सन 2013-14 शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 9 वी  ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅक्ट्रीकपुर्व शिष्यवुत्ती योजना लागू करण्यात आली आहे. मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थ्याचे अर्ज ऑनलाईन भरुन त्यांचे कागदपत्र जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्याकडे सादर केल्यास त्यास मान्यता देवून शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
       अर्जासोबत विद्यार्थ्यांचे जातीचा दाखला जोडणे आवश्यक असल्याचे यापुर्वी कळविले होते. परंतु कांही विद्यार्थ्यांकडे  जातीचा दाखला नसल्याचे दिसून आल्याने ते शिष्यवृत्तीपासून वंचित राहून नये, म्हणून त्यांच्या वडिलांचा, सख्या भावांचा किंवा सख्या बहिणीचा जातीचा दाखल असल्यास पाठविण्यात यावेत, ही सवलत फक्त या वर्षासाठीच राहील.
      सदर योजनेसाठी सक्षम अधिकाऱ्यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नसल्याचे कळवून जर पालक नोकरीत असतील तर त्यांनी वार्षिक उत्पन्नाबाबत त्यांनी तसे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. आणि जर पालक नोकरीत नसतील तर त्यांनी 100 रुपयाच्या हमीपत्रावर वार्षिक उत्पन्नाबाबतचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
      तसेच नोकरी करीत असलेल्या व अन्य  उत्पन्न असलेल्या पालकांनी मात्र तसे प्रमाणपत्र आणि रु 100 च्या हमीपत्रावर त्यांचे सर्व मार्गानी मिळून असणारे वार्षिक उत्पन्न अशी दोन कागदपत्र जोडणे आवश्यक राहील. 

Labels:

आठ ग्रामसेवकांना उत्कृष्ट कामगिरीबाबत पुरस्कार

उस्मानाबाद :- जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातर्फे सन 2012-13 या वर्षात ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत स्तरावर उत्कृष्ट  मगिरी केलेल्या आठ ग्रामसेवकांची निवड करण्यात आली असून या पुरस्काराचे  वितरण येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात दि.28 फेब्रुवारी,2014 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे यांच्या हस्ते होणार आहे.
    या समारंभास जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी व सदस्य, सरपंच व ग्रामसेवकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिष्द (ग्रामपंचायत) विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे
.

Labels:

Wednesday, 26 February 2014

सुंदरवाडी येथे वार्षिक स्‍नेहसंमेलन उत्‍साहात

उमरगा (लक्ष्‍मण पवार) :- सुंदरवाडी (ता. उमरगा) येथील ज्ञान प्रसाकर विद्यालयात आयोजित केलेल्‍या वार्षिक स्‍नेहसंमेलनामध्‍ये एकापेक्षा एक सरस असे नृत्‍य व गीते सादर करुन रसिकांची मने जिंकली.
  सुंदरवाडी येथे वार्षिक स्‍नेहसंमेलनाचे आयोजन करण्‍यात आले होते. या
स्‍नेहसंमेलनाचे उदघाटन जि.प. अध्‍यक्ष डॉ. सुभाष व्‍हट्टे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. अध्‍यक्षस्‍थानी माजी पंचायत समिती सभापती गोविंद पाटील हे तर मुरुम नगरपालिकेचे नगराध्‍यक्ष प्रदिप दिंडगावे, दिलीप भालेराव, मुरुम पोलीस ठाण्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद निंगदळे, उल्‍हास गुरगुरे, रफिक तांबोळी, पं.स. सदस्‍य रागिनी बिराजदार, चिंचोली (भू) चे तंटामुक्‍त अध्‍यक्ष किशनराव पाटील, सरपंच महादेव गायकवाड, सुंदरवाडी तंटामुक्‍ती समितीचे अध्‍यक्ष मगरध्‍वज चव्‍हाण, मुख्‍याध्‍यापक हणमंत शिंदे, साईबाबा बहुउद्देशीय संस्‍थेचे अध्‍यक्ष संतोष जाधव, सचिव डॉञ एम.जी. मुल्‍ला, केशव सुरवसे, पंडीत सुरवसे, प्रदीप पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
         तब्‍बल चार ताास चाललेल्‍या स्‍नेह संमेलनाची सुरुवात 'ओमकार स्‍वरुपा' या गिताने करण्‍यात आली. महाराष्‍ट्राची परंपरा जपणारे मराठं मोळं गाणं सादर करीत विद्यार्थ्‍याने रसिकाना ठेका धरायला लावले. सुधीर मुळे याने सादर केलेल्‍या वासुदेव या गीताने महागाईची आठवण रसिकांना करुन दिली. सूरज गाडेकर, सुरज वेळंब, राहुल सोनटक्‍के, लक्ष्‍मण मोरे, गिरीष सगर, हसन मुल्‍ला याने मुक अभिनय सादर करुन मोबाईलचे दुष्‍प‍रिणाम सांगितले. तर नूरजहॉं शेख हिने तुमच्‍या पुढयात कुठ ते मी ज्‍वानीचा मसला, विकीता कदम हिने अप्‍सरा आली ही मराठमोळी लावणी सादर करुन आपल्‍या दिलखेच नृत्‍याने प्रेक्षकांची मने जिंकली. प्राजक्‍ता, करिश्‍मा,विकिता, सलिमा, फरीन यांनी उदे गं अंबे उदे हे गीत सादर केले. याशिवाय आमच्‍या गावची शाळा हे पथनाट्य सादर करनु विद्यार्थ्‍यांनी शिक्षकापेक्षाही हुशार असल्‍याचे ग्रामस्‍थांना पटवून दिले.
          'गड आला पण सिंह गेला' या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. विद्यार्थ्‍यांने आपल्‍या नृत्‍याद्वारे प्रेक्षकांना कधी धनगर वाड्यात, कधी दारुच्‍या गुत्‍यावर घेऊन गेले. देवयानी, जलवा, चांदणं चांदणं, देवा श्री गणेशा, तेरा सराफा, ललाटी भंडार, निंबूडा निंबूडा, पारु गं पारु, वाजले की बारा, सलाम-ए-इश्‍क मेरी जान, जलवा तेरा जलवा आदी गीतावर बाल कलाकारांनी नृत्‍य सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधारक जाधव यांनी तर आभार माधव जाधव यांनी मानले. स्‍नेह संमेलनाच्‍या यशस्‍वीतेसाठी मुख्‍याध्‍यापक सुग्रीव मुळे, अभिमन्‍यू गायकवाड, गोविंद राऊत, शरद पवार, किशाेर जाधव, तानाजी राठोड,  बालाजी जाधव यांनी परिश्रम घेतले.
         

Labels:

युनिट हेडक्वार्टर कोटा सैन्यभरती 15 मे रोजी

सोलापूर -: तोफखाना रेजिमेंट (Arty) मध्ये सेवा करुन सेवानिवृत्त माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, युध्द विधवा यांना कळविण्यात येते की, दिनांक 15 मे 2014 ते 17 मे 2014 या कालावधीमध्ये तोफखाना रेजीमेंट, नाशिक येथे युनिट हेडक्वार्टर कोटयाची सैन्य भरती आयोजित केलेली आहे.
      फक्त आर्टलरी रेजीमेंट मधून सेवा निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Labels:

वृत्‍तपत्रामध्‍ये फोटोग्राफर महत्‍त्‍वाचा दुवा : पाटील

कळंब (भिकाजी जाधव) -: वृत्तपत्रामध्ये फोटोग्राफर महत्वाचा दुवा असुन तालुका पत्रकार संघाने प्रेस फोटोग्राफर यांना सुरक्षा कवच देऊन वेगळा उपक्रम राबवला असल्याचे मत हसेगाव (केज) ता. कळंब येथील उपसरपंच विलास पाटील यांनी व्यक्त केले.
      कळंब तालुका पत्रकार संघाने पत्रकारांबरोबर वृत्तपत्र फोटोग्राफर यांनाही सुरक्षा कवच (विमा पॉलिसी) चे वितरण येथील शासकीय विश्रामगृहामध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवसिंह राजपूत होते. यावेळी प्रेसफोटोग्राफर राजाभाऊ पवार, गणेश शेळके यांना विलास पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. या उपक्रमाचे कौतुक करून यापुढील काळातही पत्रकार बांधवांना मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी बोलताना प्राचार्य मोहेकर यांनी वृत्तपत्र क्षेत्रातील व्यक्तींना संरक्षण महत्वाचे असुन वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम करणा-या पत्रकार, एजंट, वृत्तपत्र वाटप करणारे, प्रेस फोटोग्राफर यांना संरक्षण देणे महत्वाचे आहे. तालुका पत्रकार संघाने हा आगळा वेगळा उपक्रम राबवून कळंबचे नाव राज्यभर उज्वल केले आहे. समाज बदलासाठी वृत्तपत्र महत्वाचे साधन असल्याने त्यात काम करणा-या व्यक्तीही तितक्याच महत्वाच्या असल्याचे मत शि. म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर यांनी व्यक्त करून पत्रकार संघास शुभेच्छा दिल्या.
      यावेळी उपप्राचार्य डॉ. डी. एस. जाधव, प्रा. अंकुश पाटील यांच्या हस्ते रमेश आंबिरकर, भिकाजी जाधव, कलायोगचे संपादक शरद आडसुळ, गणेश मोरे, सुनिल देशमुख, परमेश्वर पालकर यांना विम्याचे वितरण करण्यात आले.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधवसिंह राजपूत यांनी केले. यावेळी सतिश टोणगे, शितल धोंगडे, परवेज मुल्ला, बापूराव जाधव, मंगेश यादव, अनिल गाडे, गणेश शेळके, भिकाजी जाधव, शरद आडसुळ, रमेश आंबिरकर, शिवप्रसाद बियाणी यांची उपस्थिती होती.

Labels:

शेतकरी सुख झाला तरच देश सुखी : पठाण

पांगरी (गणेश गोडसे) :- शेतकरी, कामगार, गरीब, दलित, पिडीत आदी वंचित घटकांसाठी भारतीय शेतकरी संघटना सतत प्रयत्नशिल राहील, कोणाच्या दबावाला संघटना भिक घालणार नसुन शेतकरी सुखी झाला तरच देश सुखी रहावू शकतो, असे प्रतिपादन भारतीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष इस्माईल पठाण यांनी व्यक्त केले.
    चिंचोली (ता. बार्शी) येथे भारतीय शेतकरी संघटनेच्या नामफलकाच्या उदघाटनप्रसंगी पठाण हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाभाउ शिंदे हे होते .छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्‍यात आली. यावेळी संघटनेच्या इतर पदाधिका-यांनीही संघटनेबाबत आपले विचार व्यक्त केले.
    शेतकरी संघटनेचे शाखाध्यक्ष दिपक बोधले यांनी शेतक-यांच्या विविध प्रश्‍नावर ही संघटना सदैव अग्रेसर राहुन शेतक-यांना न्याय मिळवुन देण्‍यासाठी प्रयत्नशिल राहील, असे आश्‍वासन दिले. यावेळी बार्शी शहर उपाध्यक्ष तनविर पठाण, शाखा उपाध्यक्ष उमेश बोधले, संतोष शिंदे, दत्तात्रय पवार, सुरेश शिंदे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

उस्‍मानाबाद येथे शिवलिलामृत ग्रंथ पारायण सोहळा

उस्‍मानाबाद -: श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली ट्रस्‍टच्‍यावतीने अखंड हरिनाम सप्‍ताह, ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा, शिवलिलामृत ग्रंथ पारायणास मंगळवारपासुन प्रारंभ झाले आहे. या पारायण सोहळ्याचा सांगता समारंभ बुधवार दि. 5 मार्च रोजी प्रकाश महाराज बोधले डिकसळकर यांच्‍या काल्‍याच्‍या किर्तनाने होऊन महाप्रसाद वाटपाने होणार आहे.
          उस्‍मानाबाद येथील संत ज्ञानेश्‍वर माऊली ट्रस्‍टचे संस्‍थापक अध्‍यक्ष वसंतराव नागदे यांनी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. पारायण सोहळा कालावधीत दररोज पहाटे 4 ते 6 काकडा आरती, सकाळी 9 ते 11 गाथा भजन, 11.30 ते 3 ज्ञानेश्‍वरी पारायण, 4 ते 6 शिव‍लिलामृत ग्रंथपारायण प्रवचन, सायंकाळी 7 ते 9 हरिकिर्तन, 10 ते 4 हरिजागर कार्यक्रम होणार आहेत. 
         बुधवार दि. 26 फेब्रुवारी रोजी ह.भ.प. कमलाकर महाराज हारंगुळकर यांचे शिवलिलामृत ग्रंथाचे पारायण प्रवचन, दि. 27 रोजी दत्‍तात्रय महाराज येवले सोनेगावकर व भारत महाराज काकोट दासखेडकर, दि. 28 रोजी हरि महाराज लवटे आचलबेटकर, दि. 1 व दि. 2 मार्च रोजी दत्तात्रय महाराज अंबीकर डिकसळ यांचे ज्ञानेश्‍वरी भावचिंतन या विषयावर प्रवर्चन होईल. तर सोमवार दि. 3 मार्च रोजी आप्‍पा महाराज जावळे हाळदगांवकर (आळंदी) व नाना महाराज कदम नेकनूरकर (बीड), दि. 4 रोजी एकदशस्‍कंध उध्‍दवगीता या विषयावर भागवताचार्य नंदू महाराज रणशूर वैरागकर यांचे प्रवचन होणार आहे.
       जयवंत महाराज बोधले धामणगावकर (पंढरपूर), संदीपान महाराज शिंदे हसेगावंकर (आळंदी), सदाशिव महाराज झणझणे (खाडे पारगाव, बीड), सुभाष महाराज सुर्यवंशी (केडगांवकर, अहमदनगर), जगन्‍नाथ महाराज पाटील (ठाणे), धर्मराज महाराज हंडे (पुणे), प्रल्‍हाद महाराज शास्‍त्री दैठणकर (परभणी), बाबासाहेब महाराज इंगळे (चिंचवडगावकर, बीड) यांचे किर्तन होणार आहे. 
     त्‍याचबरोबर रात्री 10 ते पहाटे 4 पर्यंत हरिजागराचा कार्यक्रम होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

Labels:

आचारसंहितेचे पालन केल्यास शांततापूर्ण वातावरणात निवडणूक : जिल्‍हाधिकारी

उस्मानाबाद :- जिल्ह्यात होणारी निवडणूक मुक्त व शांततेच्या वातावरणात व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असून राजकीय पक्षांनीही निवडणूकीतील आदर्श आचारसंहितेनुसार कार्यवाही केल्यास हे प्रयत्न सफल होतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. निवडणूक आयोगाच्या विविध आदेश, परिपत्रक व निर्देशासंदर्भातील कायदेशीर माहिती  राजकीय पक्षांना हवी असेल तर त्या कायदेशीर बाबींच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र  लीगल सेल सुरु करण्यात येईल जेणेकरुन निवडणूक आयोगाच्या कोणत्याही आदेशाबाबत संबंधितांमध्ये संभ्रमावस्था राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
       येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार रोजी डॉ. नारनवरे यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची निवडणूक पूर्वतयारीसंदर्भात बैठक घेतली. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) बी.एस चाकूरकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी डॉ. नारनवरे यांनी जिल्हा प्रशासनाने केलेल्या निवडणूक पूर्वतयारीची माहिती संबंधितांना दिली. मतदार जनजागृतीसाठी प्रशासनाने विविध पातळीवर वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे जागृती करण्याचा प्रयत्न केला. राजकीय पक्षांनीही आपल्या मतदार प्रतिनिधींना याबाबत जागरुकता वाढवून मतदारांपर्यत पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले.
     आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्षांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्याच्या संकेतस्थळावर निवडणुकीसंदर्भातील सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राजकीय पक्षांनी त्या माहितीचा उपयोग करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रचार काळात घ्यावयाच्या विविध मान्यता, घ्यावयाची काळजी, स्टार प्रचारकांची नावे वेळेत कळविणे आदींबाबतही त्यांनी या प्रतिनिधींना अवगत केले.
      निवडणूक जाहीर झाल्यानंतरच्या पहिल्या रविवारी मतदान केंद्रांवर मतदार यादीचे वाचन करण्यात येईल. याठिकाणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही उपस्थित राहिल्यास  नंतर होणारी गैरसोय टाळता येईल, असे डॉ. नारनवरे यांनी सांगितले.
       त्यानंतर, डॉ. नारनवरे यांनी निवडणूक विषयक विविध कक्षांच्या प्रमुखांचीही बैठक घेतली.
       निवडणूक विषयक कामांसाठी एक मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येकाने निवडणूक विषयक कामे गांभीर्याने पार पाडावीत. कोणत्याही प्रकारे हयगय झाल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. समन्वय साधून कामे केली तर कामे सोपी होतील. त्यादृष्टीने नियोजन करावे. आपल्यावर सोपविलेली जबाबदारी संबंधितांनी वेळेत आणि बिनचूकपणे पार पाडण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
        कायदा व सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक कार्यवाही, आवश्यक व पुरेसा पोलीस बंदोबस्त, संवेदनशील मतदान केंद्र असतील तर त्याठिकाणी घ्यावयाची काळजी याबाबतही आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले.

Labels:

केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहोचवावा : डॉ.पाटील

उस्मानाबाद :- केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ संबंधित लाभार्थ्यांपर्यंत जाईल, यादृष्टीने तात्काळ पाठपुरावा करण्याचे निर्देश खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी दिले.
       जिल्हास्तरीय दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक खासदार डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज झाली. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांची यावेळी उपस्थिती होती.
विविध योजनांची कामे अपूर्ण दिसत आहेत. संबंधित यंत्रणांनी त्याची नोंद घ्यावी, केंद्र शासनाच्या वैयक्तिक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांपर्यंत ती योजना पोहोचली पाहिजे, अशा सूचना यावेळी खा. डॉ. पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिल्या.
      यावेळी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, इंदिरा आवास योजना, पाणलोट विकास कार्यक्रम, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, भूमी अभिलेख्यांचे संगणकीकरण, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रम, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना, आम आदमी विमा योजना आदी केंद्र अर्थ साहाय्यीत योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा यावेळी घेण्यात आला.
     विविध पंचायत समित्यांचे सभापती,  योजनांशी निगडीत विविध यंत्रणांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.  

Labels:

Tuesday, 25 February 2014

समाजसुधारण्‍यासाठी प्रयत्‍न करा : अविनाश बागवे

पांगरी (गणेश गोडसे) :- जातीपातीचे राजकारण न करता समाजसुधारण्‍यासाठी प्रयत्न करा, त्यातच खरी समाजसेवा घडते व समाजाची प्रगतीही साधली जाते, असे प्रतिपादन मातंग एकता आंदोलनचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी केले.
    कुसळंब येथे बार्शी तालुका एकता आंदोलनच्यावतीने आयोजित शाखा उदघाटन व मातंग समाजाच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बागव हे बोलत होते. बागवे पुढे बोलताना म्हणाले की, समाजाला दिशा देण्‍यासाठी शासनाच्या विविध विभाग, महामंडळे यांच्या योजना, माहिती समाजाच्या पिचलेल्या घटकांना देऊन त्यांना प्रवाहात आणण्‍यासाठी प्रयत्न करा. अडचणींची सोडवणुक करण्‍यासाठी सदैव तत्पर राहील असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले.
    कार्यक्रमाला मातंग एकता आंदोलनचे प्रदेश सचिव अशोक कांबळे, प्रदेश समन्वयक विठ्ठल थोरात, उपाध्यक्ष किसनराव हनवते, सोलापुर जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे, उपाध्यक्ष दशरथ जाधव, संयोजक व बार्शी तालुकाध्यक्ष बालाजी झोंबाडे, महिला अघाडी तालुकाध्यक्ष निता पवार, जिल्हा उपाध्यक्षा शोभा झोंबाडे, बार्शी शहाराध्यक्ष नाथा मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रामभाऊ वाघमारे, विठ्ठल थोरात, किसन हनुवते आदींनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक शितल जाधव यांनी केले.
    कुसळंब येथे निवडण्‍यात आलेली कार्यकारिणी अशी -: अध्यक्ष दत्तात्रय झोंबाडे, उपाध्यक्ष हनुमंत झोंबाडे, खजिनदार नेताजी शिंदे, लक्ष्मण शिंदे. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी बालाजी झोंबाडे, अशोक शिंदे, सतिश पोटरे, प्रसाद झोंबाडे, लक्ष्मण थोरात, विशाल झोंबाडे, अनंत चौधरी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन संदिप ठोंगे यांनी केले. कार्यक्रमाला बार्शी तालुक्यातुन मोठया संख्येनी समाजबांधव हजर होते.

Labels:

बलात्‍काराप्रकरणी एकास अटक

पांगरी -: पोटच्या मुलीवर बलात्कार करून अटक होण्‍याच्या भितीने फरार झालेल्या नराधम पित्याला पांगरी पोलिसांच्या पथकाने पकडुन अटक केली आहे.
    शिवाजी गायकवाड (रा. नारी, ता. बार्शी) असे अमानुष कृत्य करणा-या व अटक करण्‍यात आलेल्या पित्याचे नांव आहे. अत्याचारित मुलीने स्वतः आईसमवेत येऊन बापाविरूदध सोमवारी उशिरा फिर्याद दाखल केली होती. माणुसकीला काळीमा फासण्‍याचे कृत्य करणा-या पित्याने मुलीला शेतात काम करण्‍याच्या उद्देशाने दुचाकीवर जबरदस्तीने घेऊन जावुन तिला फाशी देऊन विहीरीत फेकुन देण्‍याची भिती घालुन तोंड दाबुन तिच्यावर जन्मदात्या पित्यानेच 19 फेब्रुवारी रोजी बुधवारी भर दुपारी नारी ता.बार्शी शिवारात बलात्कार केला होता. बलात्कारासारखे अमानवी कृत्य केल्यानंतर आरोपी गायकवाड याने गावातुन पळ काढला होता. पोलिसांनी उस्मानाबाद, नारी आदी ठिकाणी शोध घेत अखेर त्याला अतिशय नियोजनब्दध पदधतीने ताब्यात घेऊन अटक केली. तपास अधिकारी व पांगरी पोलिस ठाण्याचे स.पो.नि.बि.डी.होवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जनार्धन शिरसट, गणेश पोफळे, विरभद्राप्पा कलशेटी यांच्या पथकाने आरोपीला अटक करण्‍यासाठी प्रयत्न केले.

Labels:

जन्मदात्या पित्‍याकडुनच मुलीवर बलात्‍कार

पांगरी (गणेश गोडसे) :-  स्वतःच्या मुलीला शेतात काम करण्‍याच्या उदेशाने दुचाकीवर जबरदस्तीने घेऊन जावुन तिला फाशी देऊन विहीरीत फेकुन देण्‍याची भिती घालुन तोंड दाबुन तिच्यावर जन्मदात्या 55 वर्षीय पित्यानेच बलात्कार केल्याची घटना 19 फेब्रुवारी बुधवारी शिवजयंतीदिनी भर दुपारी नारी ता.बार्शी शिवारात घडली.
   शिवाजी गायकवाड असे बलात्‍कारप्रकरणी गुन्‍हा करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे याबाबतची  माहिती अशी की,  आठवीत शिक्षणा-या  व शिवजयंतीनिमित्त शाळेला सुटी असल्यामुळे गावी आलेल्या चौदावर्षीय मुलीवर हा अत्याचाराचा प्रसंग ओढावल्यामुळे सर्वत्र तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
  शालेय शिक्षण घेत असलेली अत्याचरीत मुलगी ही तिच्या गावातील सार्वजनिक पंप हाऊसजवळ धुनी धुण्‍याचे काम करत असताना नराधम पित्याने तिच्याजवळ जावुन शेतात काम आहे तु चल असे म्हणुन तिला दुचाकीवर बसवुन शेतात घेऊन गेला.अत्याचरीत मुलगी वडीलांसमवेत जाण्‍यास तयार नसताना तिला तिच्या मनाविरूदध शेतात नेवुन पित्याने शेतातील ज्वारीच्या पिकात  अतिप्रसंग केला.अतिप्रसंगानंतर रक्तस्त्राव झाल्याने मुलीला बेशुदधावस्थेत तसेच सोडुन घटनास्थळावरून व गावातुन पोबारा केला आहे. घटनेनंतर मुलीने गाव सोडुन  नातेवाइकांकडे आसरा घेतला होता.
  मुलीच्या नातेवाइकांनी घटनेची तक्रार  पांगरी पोलिसात दिल्‍यावरून  नराधमपित्‍याविरूध्‍द रितसर गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्‍याचा प्रयत्न केला मात्र आरोपी घटनास्थळावरून पळुन जाण्‍यात यशस्वी झाला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.

Labels:

Monday, 24 February 2014

कळंब येथे रांगोळी व फॅन्‍सी स्‍पर्धेचे बक्षिस वितरण

कळंब (भिकाजी जाधव) :- येथील राणाजगतसिंह पाटील युवा प्रतिष्‍ठानच्‍यावतीने शिवजयंतीनिमित्‍त रांगोळी व स्‍पर्धा श्री विठ्ठल मंदिरात पार पडल्‍या. या स्‍पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज, लेक वाचवा, निसर्गाचे जतन करा आदी सामाजिक विषयांवर स्‍पर्धकांनी सुरेख रांगोळी काढल्‍या. 
         प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या प्रतिमेचे पूजन आशा भवर तर दिपप्रज्‍वलन शोभा ठाकूर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या स्‍पर्धेत 225 स्‍पर्धकांनी भाग घेतला. रांगोळी स्‍पर्धेमध्‍ये अ गटातून आदित्‍य चौलाखे हा प्रथम तर द्वितीय वैष्‍णवी काळे, तृतीय सुहानी काळे, ब गटातून प्रथम ऋतुजा काळे, द्वितीय वैष्‍णवी वेदपाठक, तृतीय उल्‍का वेदपाठक, क गटातून प्रथम पायल मालपाणी, अनिता पोटे, अश्विनी चोपडे, तसेच फॅन्‍सी ड्रेस स्‍पर्धेमध्‍ये अ गटातून प्रथम अक्षरा पोतदार, द्वितीय आदित्‍य सुर्यवंशी, तृतीय वैष्‍णवी कदम, ब गटातून प्रथम मयूर काटे, द्वितीय आकांक्षा गुजर, तृतीय आलिशा बागवान, क गटातून प्रथम दादा बाल ग्रुप, द्वितीय गौरी जोशी, तृतीय स्‍नेहल स्‍वामी यांनी यश संपादन केले. या विजयी स्‍पर्धकांना जि.प. सदस्‍या अर्चना पाटील यांच्‍या हस्‍ते सन्‍मानचिन्‍ह, प्रमाणपत्र व रोख रक्‍कम देऊन गौरविण्‍यात आले.
     यावेळी भारत खोसे, संजय मुंदडा, किरण हौसलमल, सुधीर भवर, तारेख मिर्झा, अनंत बाेराडे, सुनिल रितापुरे आदीजण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी शिवाजी कराळे, सुजित भोसले, बप्‍पा चोंदे, उमेश कुलकर्णी, संतोष भंडारे, गुणवंत गटलेवार, पांडुरंग काळदाते, गणेश भांगे, योगेश रेणके, अमोल बारटक्‍के आदीनी परिश्रम घेतले.

Labels:

गटारगंगा आणि आरोग्य विभागाची साखरझोप

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील राऊत चाळ परिसरातील सर्व सांडपाण्याचा प्रवाह रेल्वे स्टेशनरोडवरील लेंडी नाल्यात नेऊन सोडण्यात आला आहे. सदरच्या नाल्यावरील पूलातून पुढे जाणार्‍या पाण्याचा प्रवाह वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा, गाळ, काटेरी वनस्पती व वाळलेल्या काटेरी झुडूपांनी बंद झाला आहे.
    सदरच्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह थांबल्यामुळे डबके साठले आहे व या
ठिकाणी प्रचंड दुर्गंधी तसेच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आजूबाजूला राहणार्‍या मुलगे मळा, रुद्राके मळा तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
    अशाच प्रकारे घोरओढ्याजवळ साठलेल्या कचर्‍यामुळे अवकाळी पावसानंतर सात जणांचा बळी घेतला आहे. वेळोवेळी नाल्यांची सफाई करणे गरजेचे आहे परंतु नगरपरिषदेच्या आरोग्य कर्मचार्‍यांनी व अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. सार्वजनिक स्वच्छतेच्या अनेक तक्रारी येत असूनही नगरपरिषदेचा आरोग्य विभाग कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. वेळोवेळी सार्वजनिक स्वच्छतेसाठी खर्चाच्या वाढीची तरतूद करण्यात येत असतांनाही स्वच्छता होत नसल्याने अधिकारी साखरझोप घेत आहेत की काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Labels:

गरिबांच्या धान्यासाठी बार्शीत आंदोलन सुरु

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : अन्नसुरक्षा योजनेतील देण्यात येणारे धान्य अपुरे असल्याने वाढ करावी या प्रमुख मागणीसाठी आण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या वतीने मोर्चा व बार्शी तहसिलसमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले.
    यावेळी शहराध्यक्ष एल.बी.शेख, तालुकाध्यक्ष बाबुराव जाधवर, उमेश स्वामी, सचिन गायकवाड, विक्रम सावळे, पोपट वीर, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल अवघडे, सिकंदर आतार, गुलमोहम्मद आतार, श्रीधर कदम, पांडू घोलप, आरपीआयचे तानाजी बोकेफोडे, महंमद चितापूरे आदी उपस्थित होते.
    भगवंत मैदान ते तहसिल कार्यालय निघालेला मोर्चा तिरंगी ध्वज हातात घेऊन घोषणा देत शहरातून तहसिल कार्यालयासमोर आला. याठिकाणी आंदोलनकर्त्यांसाठी मंडप व बैठक व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांनी मनोगते व्यक्त केली.
     यावेळी एल.बी.शेख यांनी बोलतांना कमी करण्यात आलेले धान्य वाढवून द्यावे, केशरी शिधापत्रिकाधारकांना गरिब अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करुन घ्यावे, राजीव गांधी आरोग्य योजनेचे ओळखपत्र तातडीने देण्यात यावे अन्यथा यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. संघटनेच्या वतीने देण्यात येणार्‍या विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार यांनी स्विकारले. या धरणे आंदोलनासाठी सचिन नवगण, राहुल काळे, रणजीत व्हनमाने, फिरोज पठाण, अकिब शेख, दयानंद स्वामी, इमाम लांडगे, रमिद शेख, अय्युब बागवान, पप्पू व्हनमाने, बबलू शेख, भरत म्हेत्रे, रमेश देशमाने, विकी झव्हेरी, प्रदिप माळी, आनंद लोहार, अक्षय तामीले, राहूल शेंडगे, उमेश देशमाने, लक्ष्मण चव्हाण, दिपक सावंत, किरण निकम, अखिल शेख, चंद्रकांत घोलप, भागवत कावरे, किसन वायकर, रज्जाक क्षीरसागर यांच्यासह विविध भागातून आलेले आंदोलक सहभागी झाले होते.

Labels:

मुख्याध्यापकांना आवाहन

उस्मानाबाद :- जिल्ह्यातील सर्व खाजगी, जिल्हा परिषद, प्राथमिक/ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना कळविण्यात येते की, महाशिवरात्रीच्या सुट्टीचे कार्यालयीन परिपत्रकान्वये दि. 28 फेब्रुवारी 2014 रोजी महाशिवरात्रीची सुटटी जाहीर  करण्यात आली होती.
    मात्र,महाशिवरात्री  27 फेब्रुवारी 2014 रोजी असल्याने सदर सुटटीच्या तारखेत 28  ऐवजी 27 फेब्रुवारी 2014 असा तारखेत बदल करण्यात आला आहे. या बदलाची नोंद जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांनी घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक)जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये केले आहे.         

Labels:

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना आवाहन

उस्मानाबाद :- तालुक्यातील संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेतंर्गत लाभ घेणा-या सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येते की, त्यांनी त्यांची नावे काढलेले निवडणूक ओळखपत्र आणि आधार कार्ड व चालू बँक खाते क्रमांक यांच्या छायांकित प्रती तात्काळ 3 दिवसाच्या आत तहसिल कार्यालय, उस्मानाबाद येथे दाखल करावे अथवा संबंधित सज्जाचे तलाठी यांचे कडे देण्यात यावे  अन्यथा त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान देता येणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन तहसिलदार, उस्मानाबाद यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Labels:

लोहारा व वाशी बसस्थानकाचे खा.डॉ. पाटील यांच्‍या हस्‍ते भूमिपूजन

उस्मानाबाद -: लोहारा व वाशी येथील नुतन बसस्थानकाचे भुमिपुजन व कोनशिलाचे अनावरण खासदार डॉ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, आमदार ज्ञानराज चौगुले, सुरेश बिराजदार, बाजार समितीचे सभापती दिनकर जावळे-पाटील, लोहारा येथील सरपंच नशीमाबी बागवान, उपसरपंच अभिमान खरडे, मोहन पनुरे, माजी सरपंच  बाळासाहेब पाटील, जयश्री वाघमारे, अच्युत साठे, महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक आर. एन. गायकवाड, तहसिलदार शशिकांत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
    तर वाशी येथील नुतन बसस्थानकाचे भुमिपुजन करतांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे , गोदावरी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार राहुल मोटे, जि.प. सदस्य श्री.मोटे आदि मान्यवर उपस्थित होते.
     सदरील लोहारा येथील बसस्थानकास अंदाजित रक्कम 53 लाख 53 हजार 635 इतका खर्च  तर  वाशी येथील बसस्थानकास 70 लाख 41 हजार 466 इतका खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही कार्यक्रमास त्या-त्या तालुक्यातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. 

Labels:

मतदार याद्यांचे ग्रामसभामध्ये वाचन करावे : डॉ. गेडाम

सोलापूर :- दि. 1 जानेवारी 2014 अर्हता दिनांकावरील आधारित पुनरिक्षण कार्यक्रमानंतर दि. 31 जानेवारी 2014 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिध्द झाल्या आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीसाठी मतदार याद्या अद्यावत करणे आवश्यक आहे. अनेक मतदारांचे मतदार यादीत फोटो नाहीत, त्यामुळे संपूर्ण मतदार यादी फोटो नसलेल्या मतदारांची यादी व वगळण्यात आलेल्या मतदार यादीचे ग्रामसभा / वार्ड सभा घेऊन वाचन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी केले आहे.
     यासाठी दि. 26 फेब्रुवारी ते 5 मार्च 2014 या कालावधीत नागरिकांना याची माहिती होण्यासाठी ग्रामसभा / वार्ड सभांचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर सभेत नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांनी संपूर्ण मतदार यादी, फोटो नसलेल्या मतदारांची यादी व वगळणी केलेले मतदाराची यादीचे वाचन करावे. मतदार यादीत नाव  नसलेल्या युवक / युवतींनी आपले नाव मतदार यादीमध्ये फॉर्म क्र. 6 भरून नोंदवावे. तसेच ज्या महिला नव्याने लग्न होऊन आलेल्या आहेत व इतर महिलांनी फॉर्म क्र. 6 रहिवास व वयाचे पुराव्यासह मतदार नोंदणीसाठी अर्ज सादर करावा.
     तसेच ज्या मतदारांचे मतदार यादीमध्ये फोटो नाहीत अशा मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO)  यांच्या मार्फत फोटो जमा करावेत. आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मतदारांनी मतदानाच्या दिवशी भयमुक्त वातावरणात मतदानासाठी बाहेर पडून आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Labels:

ना. चव्‍हाण यांच्‍या ज्ञानकिरण विशेषकांचे प्रकाशन

नळदुर्ग :- राज्याचे पशुसंवर्धन, मस्त्यव्यवसाय व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते दि. 22 फेब्रुवारी रोजी ज्ञानकिरण विशेषांकचे प्रकाशन झाले. नळदुर्ग येथील आपलं घर या ठिकाणी ज्ञानकिरण बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अणदूर यांच्या वतीने संत रविदास (रोहिदास) यांच्या जीवन कार्यावर आधारित हा विशेषांक काढण्यात आला.
          यावेळी बोलताना पालकमंत्री चव्हाण म्हणाले की. जसे जात धर्म यांचा विचार न करता सर्वांना समान मानून संत सर्वांची सेवा करतात. त्याप्रमाणे आपणही जात, धर्म यापासून दुर राहून संघटीत होऊन एकदिलाने काम करावे. संतांसारखी माणसे समाजात दुर्मिळ असतात.  या विशेषांकासाठी ज्ञानकिरण संस्थेचे भैरवनाथ कानडे यांनी खुप प्रयत्न केले, त्यांची धडपड स्त्युत्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
           याप्रसंगी जि.प.चे अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे, जिल्हा काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील, जि.प.सभापती पंडीत जोकार, पं.स. तुळजापूरचे उपसभापती प्रकाश चव्हाण, राजाभाऊ शेरखाने, नितीन शेरखाने,विकास गायकवाड, राजलक्ष्मी गायकवाड हे उपस्थित होते.
        अध्यक्ष पदावरुन बोलताना डॉ. व्हट्टे म्हणाले की, संतांचे विचार काय आहेत हे जाणून त्याचे ज्ञान व भान ठेवणे आवश्यक आहे.आपल्या आजूबाजूला असलेल्या गुणवंतांचे भान ठेवावे. त्यांची संगत ठेऊन प्रत्येकाने पुढे जावे. यावेळी  पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भैरवनाथ कानडे यांनी केले. सुत्रसंचालन संतोष पवार यांनी केले.

Labels:

ठिबक सिंचन साहित्य, शेळ्यांची पिले चोरणारा मुद्देमालासह जेरबंद

उस्मानाबाद : रुई, ता. बार्शी, जि. सोलापूर येथील सौ. छाया सुरेश हंडीबाग यांच्या शेतातील दि. २३ फेब्रुवारी रोजी ठिबक सिंचन साहित्य व शेळ्यांची पिल्ले चोरणा-यास आरोपीस दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद करून ९४ हजार १५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
    रूई ता. बार्शी जि. सोलापूर येथील शेत वस्तीवर राहणा-या सौ. छाया सुरेश हंडीबाग यांच्या शेतातील सालगडी छाया हंडीबाग यांच्या ३५ शेळा नेहमीप्रमाणे दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास शेतातील शेडमध्ये बांधुन जेवण करून झोपी गेला होता. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी छाया हंडीबाग यांच्या सालगड्याच्या घरास बाहेरून कडी लावून रात्री २ वाजण्याच्या सुमारास ३५ शेळ्यापैकी १० शेळ्यांची पिल्ले तसेच ठिबक सिंचन लॅटरचे १२ बंडल व ९ प्लॅस्टिकचे पी. व्ही. सी. पाईप केबल वायर असा एकूण १ लाख ६० हजाार ७०० रूपयांचा माल चोरून नेहला होता. या चोरीचा वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
    उस्मानाबाद येथील दरोडा प्रतिबंधक पथक हे या चोरीच्या मालाविषयी तसेच घडलेल्या गुन्ह्यातील चोरांचा शोध घेत असताना त्यांना खब-यामार्फत त्यांना माहिती मिळाली की, गावसुद येथील राहणारा मोतीराम रघु पवार याने त्याच्या साथीदारासोबत कोठून तरी ठिबक सिंचनाचे लॅटर तसेच शेळ्यांची पिल्ले शासकीय गायरानात आणून ठेवली आहेत. या मिळालेल्या माहितीवरून पोलिस अधिक्षक सचिन पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक एम. डी. गुंडीले यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोहेकाँ. मधुकर घायाळ, तानाजी माळी, मोईज काझी, सुनिल कोळेकर, प्रफुल्ल ढगे, काका शेंडगे यांनी गावसुद शिवारात छापा टाकून आरोपी मोतिराम रघु पवार रा. गावसुद यास पकडून दहा शेळ्यांची पिल्ले, केबल वायर, पाईप, ठिबक सिंचन लॅटरचे १२ बंडल असा एकूण ९४ हजार १५० रूपयांचा माल जप्त केला. आरोपी मोतिराम रघु पवार यास ताब्यात घेऊन पुढील तपास कामी पोलिस ठाणे वैराग यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

Labels:

पांगरी परिसरातील गावे झाली डिजीटलमुक्‍त

पांगरी (गणेश गोडसे) : एकीकडे प्रसिध्‍दी, डामडौल, मिरास, मोठेपणा याच्यापाठीमागे लागलेल्या आजच्या काळात पांगरी परिसरातील कांही महत्वाची गांवे अपवाद ठरत आहेत. या परिसरातील महत्वाची गावे डिजीटलमुक्त ठरल्यामुळे व अनेक गावे ही डिजीटलमुक्तीच्या मार्गावर असल्यामुळे अलिकडील कांही काळात झपाटयाने पुढे आलेली एक विकृत परंपरा या गांवातील लोकांनी झिडकारल्याचेच पहावयास मिळत असुन बार्शी तालुक्यातील इतर गांवांना ही गांवे आदर्श ठरू पहात आहेत. समाजात अलिकडील कांही वर्षात स्वस्तात प्रसिदधी मिळवुन देणारी डिजीटल संस्कृतीने चांगलाच जम बसवलेला असुन अशा डिजीटल फलकांमुळे समाजात अनेकवेळा जातीय, सामाजीक तेढ निर्माण होऊन त्यातुन समाजा समाजात दंगली पेठुन वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेच्यांची हानी झाल्याच्या ताज्या घटना आहेत.मात्र स्तुती व प्रसिदधी ही सर्वानाच हवी हवीशी वाटणारी गोष्ठ असल्यामुळे सहजासहजी यापासुन कोणीच वाचु शकत नाही. मात्र औदयोगिकरणाचे वाढते फायदे यामुळे डिजीटल फलकांचे दरपत्रक ढासळल्यामुळे उठ सुठ कोणीही आपली प्रसिदधीची हौस भागवुन घेऊ लागले आहेत.
   पांगरी पोलिस ठाण्याच्या हदीतील साठ गांवामध्ये पांगरी पोलिसांतर्फे नो डिजीटल ही संकल्पना गत एक महिन्यांपासुन राबवण्‍यास सुरूवात केली असुन या मोहिमेस ब-याच अंशी यशही प्राप्त होऊ लागले आहे. पांगरी पोलिस ठाण्याच्या हदीमधील पांगरी शहरासह इतर अनेक महत्वाच्या गावातही माहिम यश्स्वी होऊन गावेच्या गावे डिजीटलमुक्त होऊ लागलेली असुन अनेक छोटी-मोठी गांवे डिजीटलमुक्त होण्‍याच्या आसपास पोहचलेली आहेत. अलीकडे आपले नेत्यावरील प्रेम, निष्ठा व जवळीक दाखवण्‍यासाठी तर काहीजण स्वतःच्या मोठेपणासाठी चार हौशे नवशांचे फोटो घेऊन आपली प्रसिध्‍दीची इच्छा पुर्ण करून घेतात. गावाच्या चौकातील महत्वाची ठिकाणे बस स्थानके, रेल्वे स्थानके, महत्वाची शासकीय, निमशासकीय कार्यालये ही डिजीटल फलकांच्या विळख्यातच सापडलेली होती. ती नो डीजीटल या मोहिमेमुळे मुक्त होऊ लागली आहे. ज्या गांवांमध्ये ही मोहिम फत्ते झालेली आहे तेथील गांवात चौक रस्ते मोकळा श्‍वास घेऊ पहात आहेत.
  पांगरी पोलिसांनी फलकांमुळे निर्माण होणारी स्फोटक परिस्थती टाळुन हदीत शांतता प्रस्थापित करण्‍याच्या उदेशाने सर्वसंमतीने एक आदर्श अशी आचारसंहीता तयार करून त्याची माहिती गावोगावी पोहचवुन जनप्रबोधन केले आहे. ग्रामपंचायत, पोलिस ठाणे यांच्या पुर्वपरवानगीशिवाय डिजीटल लावु नयेत, फलक लावण्‍याची, काढन्याची व आक्षेपार्ह मजकुरामुळे कांही घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीतांची राहणार असुन त्याच्यावर कारवाई करण्‍यात येणार आहे. बॅनर लावण्‍याच्या ठिकाणासह त्यावर फोटो असणा-यांचे भ्रमनध्वनी यांची माहिती द्यावी लागणार असुन शासकीय इमारतींवर बॅनर लावण्‍यास बंदी करण्‍यात आली आहे. पांगरी हद्दीत नो डिजीटल वॉर वेगाने गती घेत असुन पांगरी पोलिसांनी गावोगावी जावुन ग्रामपंचायतीत ग्रामसभांमधुन जनजागृती करत लोकांना डिजीटल फलकांमुळे उदभवणा-या परिस्थतीची माहिती दिल्यामुळे प्रबोधन होऊन गावोगावी डिजीटल फलक लोकांकडुन स्वतः काढले जावु लागले आहेत.
   अनेक संवेदनशिल गांवांमधुन डिजीटल फलक गायब :
पांगरी पोलिसांनी तयार केलेल्या डिजीटलफलकांच्या आचारसंहितेचा धसका घेऊन व झालेल्या जनजागृतीमुळे पांगरीसह चिखर्डे, येळंब, ममदापुर आदी पांगरी पोलिस ठाण्याच्या हदीमधील गावांमधील सुजान नागरीकांनी स्वतः डिजीटलफलक काढुन घेऊन एक आदर्श इतर गांवांसमोर ठेवण्‍याचा मान मिळवला आहे. चिखर्डे गावात तयार करण्‍यात आलेल्या आचारसंहितेच्या फलकाचे अनावरनही करण्‍यात आले.पांगरी पोलिस ठाण्याच्या हदीतील सर्वच गांवे डिजीटलमुक्त करून जातीय तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा निर्माण होणारा प्रश्‍न संपवुन डिजीटलमुक्तीचा पांगरी पॅर्टर्न तयार करू असा आशावाद पांगरी पोलिस ठाण्याचे स.पो.नि.शरद मेमाणे यांनी बोलताना व्यक्त केला.

Sunday, 23 February 2014

कसबा पेठेतील शिवजयंतीची मिरवणूक

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: कसबा पेठेतील शिवजन्‍मोत्सव मंडळाच्यावतीने शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते उत्सव मूर्तीस पुष्पहार अर्पण करुन मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.
    यावेळी नगराध्यक्ष कादर तांबोळी, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, तुकाराम शिंदे, अॅड.बी.एन.चव्हाण, आबा पवार, दत्ता शिंदे, गटनेते नागेश अक्कलकोटे, विलास रेणके, मनिष चौहान, बाळासाहेब पाटील, मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे, नगरसेवक अंबादास शिंदे, संदीप बारंगुळे, गणेश जाधव, रमेश पाटील, पंकज शिंदे, अॅड. अविनाश गायकवाड, अजित कांबळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  खासदार डॉ.पाटील यांनी जय भवानी जय शिवाजीचा नारा देत नृत्य करणार्‍या घोड्याची सवारी करुन भगवा ध्वज हाता घेऊन जयजयकार केला. यावेळी उपस्थितांनी त्यांना दाद दिली.
     बाल शिवाजीच्या वेशातील लहान मुले व मावळे, दांड पट्टा पथक अस्सल मराठमोळ्या पारंपरागत वेषातील महिलांचा समावेश असलेले चिंचवड पुणे येथील आर्या ढोल पथक सर्वांचे लक्ष वेधत होते. डिजे डॉल्बी, बॅण्ड पथक, वानेवाडी येथील नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या आनंदाश्रमातील बाल वारकरी टाळ मृदंगाच्या तालात मिरणुकीत सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गाने ही मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. बेटी बचाव, जल है तो कल है असा संदेश देणारे तसेच राष्ट्रपुरुषांची प्रेरणा देणारे डिजीटल मिरवणुकीच्या अग्रभागी होते.
    औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीर सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक श्रीकांत शिंदे यांच्यासह कसबा ग्रुपचे पाडुरंग राऊत, तुकाराम ढगे, मनोज फुले, अभिजीत मुंडलीक, पंकज शिंदे, भाऊ मोरे, किशोर भोसले, अन्वर कझी, राहुल शिंदे, इब्राहिम शेख, आकाश व सागर शिंदे, तसेच दिलीपरावजी सोपल मित्र मंडळ, शहर व तालुका राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. राऊत व सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या दोन्ही शिवजयंती मिरवणूकीत डिजेचा मोठा आवाज पोलिसांनी व नागरिकांनी विना तक्रार सहन केला.

Labels:

रुग्‍णांचे दैवत : डॉ. राकेश नेवे

डॉ.राकेश नेवे
वैद्यकीय क्षेत्रात दिवसेंदिवस परिवर्तन होत असले तरी रुग्‍णांवर औषधोपचाराबरोबर मानसिक दिलासा देऊन वैद्यकीय उपचार करुन नावलौकीक मिळविणारे पुणे येथील ऑन्‍कॉलॉजिस्‍ट डॉ. राकेश नेवे हे होय.
    मानवी जीवनात अनेक चढ-उतारामधून घडणा-या प्रसंगातून चांगले, वाईट अनुभव येतात. अनेक चांगल्‍या वाईट प्रवृत्‍ती दिसून येतात. बहुतेक माणसे स्‍वतःसाठीच जगतात, तरी थोडी फार माणसे ही इतरांसाठी जगतात व हेच लोक जीवन कसे जगावे याचा आदर्श घालून देतात. पण हा आदर्श घालून देण्‍यासाठी त्‍यांनी जन्‍मभर साधना केलेली असते आणि त्‍यानंतरच ते सकल मानव जातीला मार्गदर्शक ठरतात. कारण त्‍यांनी जिवनातील प्रत्‍येक पाऊल हे विचारपूर्वक टाकलेले असते. आपण मात्र संपूर्ण जीवन अविचाराने जगतो. सध्‍याच्‍या या कलयुगात असे लोक फारच कमी प्रमाणात लाभतात आणि हेच लाक सकल मानव जातीचे उध्‍दारक ठरतात. यांनी आपले संपूर्ण जीवन आदर्श तत्‍वांनी जगलेले असतं. पृथ्‍वीवर जन्‍म घेतलेल्‍या मानवरुपी देहामध्‍ये माणूसपण निर्माण करण्‍याचं कार्य ते करतात. ज्‍यांनी आपले पूर्ण आयुष्‍य इतरांसाठी वेचलं, अनेकांना मृत्‍यूच्‍या दाढेतून बाहेर काढून त्‍यांना निडरपणे जगण्‍यासाठी प्रोत्‍साहन दिलं, असे डॉ. राकेश नेवे यांचे करावे तितके कौतुक‍कमी आहे. डॉ. राकेश नेवे हे पुणे येथील नोबल हॉस्‍पीटल, साने गुरुजी रुग्‍णालय अशा अनेक हॉस्पिटलमध्‍ये ते कॅन्‍सरसारख्‍या आजाराचे निदान करुन त्‍यावर योग्‍य ती शस्‍त्रक्रिया करुन रुग्‍णास रोगमुक्‍त करतात व त्‍याला जगण्‍याची नवी दिशा देतात. अत्‍यंत मितभाषी व प्रेमळ असलेले डॉ. राकेश नेवे हे सर्वप्रथम रुग्‍णास विश्‍वचासात घेऊन त्‍याला या आजाराची माहिती देऊन कमीत कमी खर्चामध्‍ये रुग्‍णाला बरे करण्‍याचा प्रामाणिक प्रयत्‍न करतात. ग्रामीण भागातून जाणा-या अनेक गरीब रुग्‍णांना त्‍यांनी कमीत कमी खर्चामध्‍ये दुरुस्‍त केले आहे. वेळेप्रसंगी ते रुग्‍णास केलेल्‍या शस्‍त्रक्रियेची फिस देखील माफ करतात. सकाळी नऊ वाजल्‍यापासून संध्‍याकाळी आठ वाजेपर्यंत ते वेगवेगळ्या ठिकाणी शस्‍त्रक्रिया करीत असतात. या कामासाठी डॉ. नेवे यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. नेवे या ही त्‍यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभ्‍या आहेत. पुणेसारख्‍या एका मोठ्या शहरात ग्रामीण भागातील रुग्‍णासाठी एक आपलेसे वाटणारे डॉक्‍टर डॉ. राकेश नेवे यांची ओळख आहे.
Success is not permanent,
and failure is not final. 
So never stop working 
after success and 
never stop trying after failure.
कोणतेही यश हे कायमस्‍वरुपी नसते आणि अपयश हे ही अंतिम नसते. म्‍हणून यशानंतर काम करणे थांबवू नका आणि अपयशानंतर प्रयत्‍न करणे थांबवू नका.
 
- प्रा. दिपक जगदाळे   
नळदुर्ग,
मो. 9422609525

बार्शीत शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : राऊत चाळ येथील राज-विजय क्रिडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती मिरवणुकीत डिजीटलद्वारे महान देशभक्त, थोर स्वातंत्र्यसेनानी, शहिद व राष्ट्रपुरुषांची प्रेरणास्थाने, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यातील काही घटनांचे छायाचित्र यांचे प्रबोधन करण्यात आले. मोरया चित्रपटातील गाजलेल्या नादब्रह्म पुणे या ढोल पथकाने बार्शीकरांचे लक्ष वेधले.
    छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्याचे पूजन तसेच मिरवणुकीचे उदघाटन माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी राजेंद्र मिरगणे, जिल्‍हा परिषद विरोधी पक्षनेते संजय पाटील, अॅड. सुभाष जाधवर, पट्टम पवार, नगरसेवक सोमनाथ पिसे, रावसाहेब मनगिरे, जि.प. विरोधी पक्षनेते वैरागचे संतोष निंबाळकर, विजय नाना राऊत, न.पा. विरोधी पक्षनेते अरुण बारबोले, पंचायत समिती सभापती सौ. कौसल्‍या माळी, उपसभापती केशव घोगरे, दादा गायकवाड, वैभव पाटील, अभिजित राऊत, किशोर मांजरे, नागेश राऊत, महावीर कदम, अभिजीत गाढवे, दिपक राऊत, काका फुरडे आदीजण उपस्थित होते.
    सवाद्य मिरवणुकीतनेक प्रकारच्‍या वाजंत्री तसेच घोडे व हत्‍तीवर शिवाजी महाराजांचा वेश परिधान केलेल्‍या लहान बालकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Labels:

Saturday, 22 February 2014

ज्ञान रचनावाद भावी शिक्षकांनी समजावून घ्यावा : मुक्ता दाभोलकर

उस्मानाबाद :- भावी शिक्षकांनी ज्ञानरचनावादाचं तत्व समजावून घेऊन मुलांना त्याप्रमाणे मार्गदर्शन केले पाहिजे. मुलांचे भावविश्व आपण समजावून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी केले.
    येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) आणि अंनिस, उस्मानाबादच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मुक्ता दाभोलकर यांचे शैक्षणिक क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.  अंनिसचे राज्य सचिव माधव बावगे, उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष एम.डी. देशमुख, डायटच्या प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे, महाराष्ट साहित्य परिषदेचे अध्यक्ष नितीन तावडे, सचिव बालाजी तांबे, प्रा. अर्जुन जाधव,  सुजीत ओव्हाळ, पत्रकार रवींद्र केसकर आणि चंद्रसेन देशमुख, शीतल वाघमारे, श्रीमती शिंदे आदींची उपस्थिती होती.
   यावेळी मुक्ता दाभोलकर यांनी, आपण प्रत्येक गोष्टीत वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासला पाहिजे, असे आवाहन केले. मुलांचे भावविश्व वेगळे असते. मात्र, आपण त्यांना प्रश्न विचारण्यापासून रोखतो. खरेतर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुलांना प्रश्न विचारु दिले पाहिजे. त्यांच्यातील संशोधक वृत्ती, जिज्ञासा जोपासण्याचे काम आपण केले पाहिजे. दुर्देवाने तसे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
    मुलांचे भावविश्व समजून घेऊन त्यासाठी त्यांना योग्य वातावरण मिळायला हवं. शाळेत शिक्षक आणि घरी पालकांची ही जबाबदारी असल्याचे त्या म्हणाल्या. प्रश्न विचारल्याशिवाय समाजाची प्रगती होत नाही. स्वताच्या मनातील सत्याचा शोध घेणं हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी भावी शिक्षकांनी अधिकाधिक वाचन केले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
    यावेळी बावगे यांनी अंनिसचे काम, महाविद्यालय स्तरावर विवेकवाहिनीच्या रुपाने सरु असणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. समाजातील अनिष्ट रुढी संपवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन अत्यावश्यक असून महाविद्यालयीन जीवनात तो अधिकाधिक विकसित होत जातो. त्यामुळेच या युवक-युवतींची विज्ञाननिष्ठ, विवेकवादी समाजनिर्मितीसाठी मोठी जबाबदारी असल्याचे  बावगे यांनी नमूद केले.
    प्राचार्य डॉ. आवटे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक अध्यापक विद्यालयात विवेकवाहिनी सुरु केली जाईल, असे सांगितले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तांबे यांनी केले तर आभार अजय वाघाले यांनी मानले. कार्यक्रमास डायटमधील शिक्षकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

ठाकूर यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त नळदुर्गात खाऊ वाटप

नळदुर्ग : भारतीय जनता पार्टीचे महाराष्‍ट्र राज्‍य प्रदेश स‍रचिटणीस तथा कल्‍याण सागर अर्बन को-ऑप बँकेचे संस्‍थापक चेअरमन सुजितसिंह ठाकूर यांच्‍या 47 व्‍या वाढदिवसानिमित्‍त नळदुर्ग येथे राजपूत समाज सेवा मंडळ व मित्र परिवार यांच्‍यावतीने नुतन मुकबधीर व अपंग शाळेतील विद्यार्थ्‍यांना खाऊ वाटप करण्‍यात आले. यावेळी मंगेशसिंह चंदिले, राहुल हजारे, सागर हजारे, संदीप हजारे, अजित हजारे, दिपक चव्‍हाण, अमोल हजारे, श्रमिक पोतदार, मयूर महाबोले, स‍ुमित यादगिरे, रोहित डुकरे आदीजण उपस्थित होते.

Labels:

आजी-माजी जिल्हाधिकारी यांच्या स्वागत-निरोपाने वातावरण भारावले

उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्हा टंचाईचा भीषण सामना करत असताना जिल्हाधिकारी म्हणून केलेल्या कामांची पावती देत उस्मानाबादकरांनी मावळते जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांना आज निरोप दिला तर नूतन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडून असलेल्या अपेक्षा लक्षात घेत तितक्याच समर्थपणे साथ देण्याची ग्वाहीही दिली.
    निमित्त होते, मावळते जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांची यशदा येथे उप महासंचालक म्हणून बदली झाल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या निरोपाचे आणि नूतन जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या स्वागताचे! येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम रंगला. जिल्हा प्रशासनातील विविध अधिकारी-कर्मचारी संघटना, विविध कार्यालयांचे प्रमुख, विविध संस्था, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी भावपूर्ण सत्कार करुन डॉ. नागरगोजे यांना निरोप दिला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र तावडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
     अपर  जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, विविध विभागांचे कार्यालयप्रमुख, विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनातील सहका-यांकडून डॉ. नागरगोजे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
     आपल्या मनोगतात डॉ. नागरगोजे यांनी आपल्या भावना अतिशय समर्पकपणे मांडल्या. नैतिक मूल्य सांभाळून आणि सर्वच अधिकारी व कर्मचारी यांना विश्वासात घेऊन टंचाई परिस्थितीत चांगले काम करता आले. राज्य पातळीवरही या कामाची दखल घेतली गेली, याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. तुळजापूर विकास प्राधिकरणाची कामे अंतिम टप्प्यात आहेत, आम आदमी विमा योजनेत जिल्हा आघाडीवर आहे.  महसूल अभिलेखांचं स्कॅनिंग करण्यात जिल्ह्याने आघाडी घेतली. जास्त प्रचारावर भर न देता रिझल्ट देण्यावर आपला भर राहिल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
     नूतन जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी या काळातील चांगली कामे यापुढेही अधिक गतीमान करण्यावर आपला भर राहील. लोककल्याण हाच सर्व अधिकारी-कर्मचारी यांचा अजेंडा राहिला पाहिजे.त्यादृष्टीने सर्वांना बरोबर घेऊन काम करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रशासनात काम करताना शिस्त आवश्यक असून प्रत्येकानेच त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
     विविध मान्यवरांनी यावेळी डॉ. नागरगोजे यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आणि नवीन जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्याकडून अपेक्षाही व्यक्त केल्या.

Labels: