Wednesday, 30 September 2020

तुळजापूर : बंदुकीचा धाक दाखवुन दरोडेखोरांनी कारसह रोख रक्कम केले लंपास





तुळजापूर, दि. 30 : औसा-तुळजापूर महामार्गावर बुधवारी पहाटेपूर्वी अज्ञात पाच अनोळखी दरोडेखोरांनी कार आडवून बंदुकीचा धाक दाखवून रोख रक्कम, दोन मोबाईल व कार घेऊन गेल्याची खळबजनक घटना घडली आहे. त्याचबरोबर कारचालकास रस्त्याच्या लगत शेतातील चिंचेच्या झाडाला बांधुन दरोडेखोर पसार झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रमाकांत लक्ष्मण सोनकांबळे, रा. वाकडी, जि. रायगड हे दि. 29 सप्टेंबर रोजी रात्री 02.30 वा.सु. औसा - तुळजापूर रस्त्याने हुंदाई आय- 20 स्पोर्ट कार एम.एच. 04 एफएफ 591 ही चालवत जात होते. प्रवासा दरम्यान टोलनाक्यापासुन साधारण 20 कि.मी. अंतरावर अनोळखी 5 व्यक्तींनी रमाकांत सोनकांबळे यांना कार बाजूस घेण्यास सांगुण बंदुकीचा धाक दाखवून, "आवाज करुन नको नाहीतर गोळी घालीन. तुझ्या जवळ जेवढे पैसे आहेत ते सर्व आम्हाला दे" असे धमकावून रमाकांत यांच्याजवळील ओपो- 11 प्रो व सॅमसंग जे-7 हे दोन मोबाईल फोनसह रोख रक्कम 8,000/-रु. काढून घेतले. तसेच रमाकांत यांना त्यांच्याच कारमध्ये बसवून तुळजापूर पासुन 10 कि.मी. अंतरावर नळदुर्ग रस्त्यालगत असलेल्या शेतातील चिंचेच्या झाडाला बांधुन त्यांची नमूद हुंदाई कार घेउन गेले. अशा मजकुराच्या रमाकांत सोनकांबळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 395, 342 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Labels:

उस्मानाबाद पोलीस, नगरपरिषद व एनजीओ मार्फत ऑनलाईन जनजागृती कार्यक्रम

 


उस्मानाबाद, दि. 30 : कोविड-19 या महामारीच्या अनुषंगाने ऑनलाईन जनजागृती करण्याच्या  उद्देशाने उस्मानाबाद पोलीस, उस्मानाबाद नगरपरिषद व पुणे येथील ‘ग्रीनी द ग्रेट’ या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. 

https://docs.google.com/forms/d/e/1FAlpQLScHgyuA9flwl-2h8b7E_JGfBLG3oT3TMAS5JfEttWqhNfAd_w/viewform इंटरनेटवरील या लिंकवर एक प्रश्नमंजूषा उपलब्ध करुन दिली असुन या प्रश्नमंजुषेची योग्य उत्तरे उपयोगकर्त्याने सादर केल्यानंतर त्याच्या इ-मेलवर ऑनलाईन प्रमाणपत्र पोलीस विभागामार्फत प्राप्त होणार आहे. यासंबंधाने आज दि. 30.09.2020 रोजी उस्मानाबाद पोलीस मुख्यालयातील ‘अलंकार सभागृह’ येथे पोलीस उप अधीक्षक श्री. मोतीचंद राठोड यांच्या अध्यक्षतेखाली एक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. 

या प्रसंगी नगरपरिषद उस्मानाबादचे मुख्याधिकारी  हरीकल्यानम् एलगट्टे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. कोविड- 19 जनजागृती संदर्भात कार्य केलेल्या पोलीसांना या प्रसंगी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. या कार्यक्रमास शहरातील मान्यवर, पोलीस अधिकारी व नगरपरिषद आरोग्य सल्लागार अमोल गायकवाड उपस्थित होते.

Labels:

नूतन महाबीज जिल्हा व्यवस्थापक डॉ. राजू माने यांचा अचलेर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

 


अचलेर : जय गायकवाड 

लोहारा तालुक्यातील अचलेर येथील सुपुत्र डॉ.राजू मल्लिकार्जुन माने यांनी उस्मानाबाद जिल्हा महाबीज व्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या ऑफिस ला भेट देऊन अचलेर ग्रामस्थांच्या वतीने लोहारा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सिद्रामप्पा दुलंगे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना शेतीसंबंधी खत,बी-बियाणे यामध्ये अडचण येत असल्यास संपर्क करावा नक्कीच मनामध्ये कोणत्याही प्रकारची कुभावना न ठेवता प्रामाणिकपणे मार्गदर्शन करेन असे डॉ.माने यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. यावेळी त्यांचे लहान बंधू पृथ्वीराज माने, शरण दुलंगे, सूरज दुलंगे आदी उपस्थित होते.

Labels:

जलसंधारण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर धेंडे यांचे आत्मदहन आंदोलन मागे

 


काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील दहिवडी हद्दीत उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यच्या सिमेवर बार्शी तालुक्यातील कासारी येथील शेतकरी हरि भोरे यांची गट नं 139 मध्ये सोळा एकर शेतजमीन आहे. या सोळा एकरात 2004 मध्ये एक पाझर तलाव मंजूर झाला. या पाझर तलावात सुमारे सव्वा दहा एकर या पाझर तलाव प्रकल्पात गेली. संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी या शेतकऱ्यांचे  मागील सोळा वर्षांपासून उपविभागीय जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. 

या दरम्यान एक वेळा हरि भोरे यांनी जमिनीचा मावेजा मिळत नसल्याने व घरातील आर्थिक अडचणींमुळे हरि भोरे जगण्यासाठी बाहेर गावी गेल्यानंतर भाऊ,आई वडिलांचा तेथे दुर्दैवी मृत्यू झाला. या नैराश्यातून जमीन संपादित शेतकरी हरि मोरे यांनी शेतामध्येच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तलाठ्यापासून कलेक्टर व आमदार, खासदार पासून मंत्र्यापर्यंत जमिनीचा मावेजा मिळविण्यासाठी निवेदनाद्वारे अनेकवेळा पाठपुरावा केला. परंतु सोळा वर्षांनंतरही या गरीब भोरे कुटुंबाला न्याय मिळत नसल्याने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र चिटणीस संपतराव दगडू धेंडे यांनी बुधवार दि.(30) रोजी दुपारी 12 वाजता त्याच ल.पा. पाझर तलावात आत्मदहन करणार असल्याचा इशारा संबंधित विभाग व प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला होता. 

बुधवारी सकाळी 11:30 वाजता आत्मदहनस्थळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी जी.एस. होळकर, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध जमादाडे यांनी आंदोलनकर्ते संपतराव दगडू धेंडे यांच्याशी चर्चा करून भुसंपादन कार्यालयामार्फत मावेजासाठी करण्यात आलेल्या प्रकियेचा अहवाल दाखवून जलसंधारण कार्यालय जलद गतीने मावेजा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून भूसंपादनासाठी शासनाकडून निधी प्राप्त होताच प्राधान्याने तलावातील बाधित शेतकऱ्यास मावेजा देण्याचे लेखी आश्वासन जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद (ल.पा.) उस्मानाबाद ए.सी. कदम यांच्या सहिनिशी दिले. लेखी आश्वासनानंतर संपतराव धेंडे यांनी आत्मदहन आंदोलन मागे घेतले.

 यावेळी जलसंधारण विभागाचे जी.एस. होळकर, आंदोलक संपतराव धेंडे, तुळजापूर ल.पा.चे उपअभियंता बी.एस.जगताप, मंडळ अधिकारी एस.जी. शिंदे, तलाठी एन.एस. काशिद, आदीसह शेतकरी उपस्थित होते.

Labels:

नळदुर्ग येथे कॉम्प्युटरवर जुगार खेळणा-या 7 जणांविरुध्द गुन्हा दाखल

प्रतिकात्मक

नळदुर्ग, दि. 30 : येथील अक्कलकोट रोडलगत असलेल्या शॉपींग कॉम्पलेक्समध्ये संगणकावर जुगार खेळत असताना पोलीसांनी अचानक छापा मारुन सुमारे साडे हजार रुपये रोख रक्कम जप्‍त केले. या कारवाईत सात जणांविरुध्द मुंबई जुगार कायदयांतर्गत नळदुर्ग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, 1) सागर हजारे 2) संजय भोगे 3) ख्वॉजा शेख 4) मोबीन शेख 5) मजर शेख 6) ताहेर शेख 7) मुशाहिद मोमीन, सर्व रा. नहदुर्ग हे दि. 30.09.2020 रोजी नळदुर्ग शहरातील अक्कलकोट रस्त्यालगत असणाऱ्या जगदंबादेवी शॉपींग सेंटर मधील गाळा क्र.1 मध्ये संगणकावर जुगार खेळत असतांना साहित्य व रोख रक्कम 6,480/-रु. बाळगले असतांना पो.ठा. नळदुर्ग यांच्या पथकास आढळले. यावरुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.

दरम्यान, नळदुर्ग शहरात अनेक ठिकाणी संगणकावर जुगाराचा बेकायदेशीर धंदा जोमात सुरु आहे. यापूर्वी या जुगा-याच्या आहारी जावून अनेकजण कर्जबाजारी झाले. तर वस्तू गहाण ठेवल्या. अनेक कुटूंब जुगारामुळे उध्दवस्त होण्याच्या मार्गावर असून जिल्हा पोलीस अधिक्षकांनी विशेष बाब म्हणून नळदुर्ग व परिसरात जुगारासह इतर अवैध धंदे बंद करण्याची मागणी नागरिकांतुन होत आहे.


Labels:

सास्तुर येथे मोबाईल युनिटव्दारे तपासणी मोहिमेचा जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शुभारंभ

 


उस्मानाबाद, दि. 30 : जिल्हयात कोरोनाचा मृत्यूदर  कोरोनामध्ये मृत्यु दर कमी करणेच्या अनुसंघाने "माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही मोहिम जिल्हयात दि.15 सप्टेबर 2020 पासुन राबविण्यात येत आहे.या मोहिमेत प्रत्येक गाव व वार्ड पातळीवर आरोग्य व स्वयंसेवकाच्या चमुने घरोघरी तपासणी येत असुन या मोहिमचा व मेडीकल मोबाईल युनिट चा शुभारंभ स्पर्श रुग्णालय सास्तुर येथे जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर यांचे शुभ हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमेत राबविण्यात येणाऱ्या सेवे बाबत माहिती देतांना म्हणाले  की,कोरोना विषाणु व्हायरस उपचार बरोबरच गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची तपासणी करण्यात येत आहे असुन कुटुंबातील आजाराबाबत माहिती घेण्यात येत आहे.त्यामध्ये ताप,खोकला ,सर्दी ,रक्तदाब व इतर आजाराची माहिती पथकाव्दारे घेण्यात येत आहे.त्यासाठी प्रत्येक नागरीकांनी स्वःता बरोबर कुटुंबाची काळजी घेण्यात यावी व घरोघरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करावे,असे यावेळी सांगीतले. तसेच "माझे कुटुंब माझी जबाबदारी" मेडीकल मोबाईल जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन व प्रतिज्ञा घेण्यात आली.मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.यावेळी सदस्य जिल्हा परिषद श्रीमती शितलताई पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच व्ही वडगावे, जिल्हा परिषद हॅलो मेडीकल फाउंडेशन अणदुर डॉ.शशीकांत अहंकारी, , तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक कठारे, श्री रमाकांत जोशी स्पर्श रुग्णालय सास्तुर,उपस्थित होते.

तसेच जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी कास्ती (बु) येथील सर्वेक्षण करित असलेल्या पथकास भेट देवुन मार्गदर्शन केले व तेथील उपकेंद्रास भेट देवुन पाहणी व कामाचा आढावा घेण्यात आला. या कार्यक्रमास स्पर्श रुग्णालयाचे अधिकारी,कर्मचारी,आशा कार्यकर्ती,गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Labels:

उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी 196 कोरोना रुग्णांची वाढ; तर 8 जणांचा मृत्यू



उस्मानाबाद, दि. 30 : उस्मानाबाद जिल्हयात आज बुधवार दि. 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 196 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 182 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 12 हजार 172 झाली आहे. यातील 9 हजार 384 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 375 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 413 जणांवर उपचार सुरु आहे. 









Labels:

रस्त्याअभावी हगलूर ग्रामस्थांचे प्रचंड हाल; रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी



नळदुर्ग, दि. 30 : देशातील गावे, वाडी, वस्ती पक्क्या रस्त्याने जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना राबविण्यात आली. मात्र तुळजापूर तालुक्यातील हगलूर गावांतर्गत असलेल्या बंजारा समाजाची वस्तीपर्यंत आजही रस्ताच नाही. रस्त्याअभावी ग्रामस्थांचे ऐन पावसाळ्यात प्रचंड हालअपेष्टा सोसतच ये-जा करावी लागते. सर्वाधिक फटका रुग्ण, वयोवृध्द, लहान बालके, महिलांना सहन करावा लागत असून प्रशासनाने तातडीने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांनी उस्मानाबाद जि.प. च्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, तुळजापुर तालुक्यातील हगलुर या गावाच्या बाजूस हगलूर तांडा असून याठिकाणी 300 लोकांची वस्ती आहे. सदर तांडयाला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत डांबरी रस्ता झालेला नाही. सद्यस्थितीत असलेला रस्ता हा कच्चा स्वरुपाचा व दगड चिखलांचा आहे. सदर रस्त्याचे आजपर्यंत कधीही डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याने पायी जाणे सुध्दा अडचणीचे असून मोटारसायकल किंवा इतर वाहने त्या रस्त्याने जावुच शकत नाहीत. त्यामुळे सदरील रस्ता होणे आवश्यक असून हगलूर पाटी ते हगलूर गावामध्ये जाणा-या रस्त्याला जोडलेला हगलूर तांडा रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर ॲड. जयपाल पाटील, सतीश दराडे, अण्णासाहेब दराडे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

Labels:

गोर बंजारा समाजातील कलावंतांना शासनाने आर्थिक मदत करावी; कलावंत संघटनेची मागणी

 


नळदुर्ग : एस.के. गायकवाड

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी पुकारन्यात आलेल्या लाँडाऊनमुळे गोर बंजारा समाजातील लोक कलावंतांना कार्यक्रमच नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.तरी शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी असी मागणी गोर बंजारा लोक कलावंत संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

गोर बंजारा कल्याणकारी संस्था प्रणित आँल इंडिया  गोर बंजारा कलावंत संघटनेच्या वतीने कलावंत संघटनेचे तुळजापूर तालुका अध्यक्ष राजुदास जाधव ,शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, यांच्या नेतृत्वाखाली या संदर्भात तुळजापूर तहसीलदार यांना विविध मागण्याचे एक लेखी निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की,गोर बंजारा समाजातील लोक कलावंतांना आर्थिक मदत करावी,६० वर्षा पुढील व्रध्द कलावंताना दरमहा अनुदानाची तरतुद करावी,हरीत क्रांतीचे जनक स्व.वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे,आदी सह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत.

 तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनावर कलावंत संघटनेचे तालुका प्रमुख राजुदास जाधव,शिवसेनेचे तालुका अध्यक्ष जगन्नाथ गवळी,यूवा सेना प्रमुख सागर ईगंळे,शिवसेना तुळजापूर शहर उपप्रमुखघ बाळासाहेब शिंदे, येडोळा ग्रा.प.सदस्य शिवाजी नाईक,सह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Labels:

शुक्रवारी जिल्हा काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन - अ‍ॅड. धिरज पाटील

 


उस्मानाबाद, दि. 30 : महाराष्ट्र  प्रदेश काँग्रेसच्या आदेशान्वये उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवार दि. 02 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता केंद्र सरकारच्या विरोधात छत्रपती शिवाजी चौक उस्मानाबाद येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने शेतक-च्या विरोधात व शेतक-यावर अन्यायकारक अशी तीन विधेयके संसदेत मंजूर करून घेतली आहेत. या काळ्या कायद्यामुळे शेती व शेतकरी पूर्णपणे उध्द्वस्त होणार आहे. या विधेयकाच्या विरोधात लाखो शेतकरी व शेतमजूर रस्त्यावर येवून विरोध करत असताना हे निर्दयी सरकार त्यांचा आवाज बंद करण्यासाठी लाठीमार करत आहे. हे सरकार संसदेत कोणालाही विश्‍वासात न घेता हे विधेयक शेतक-यावर लादत आहे.

हे शेतकरी विधेयक त्वरीत मागे घेण्यासाठी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी हे आंदोलन करण्यात येत आहे. सदर आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, राजेश राठोड साहेब, जिल्हा निरीक्षक कल्याणराव दळे, माजी अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, माजी अध्यक्ष विश्‍वासराव शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. सदरील आंदोलन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. धिरज पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

तरी जिल्हा काँग्रेसच्या आजी, माजी पदाधिकारी, युवक काँग्रेस, सेवा दल, एन.एस.यु.आय., मागासवर्गीय विभाग, अल्पसंख्याक विभाग, ओ.बी. सी. सेल, असंघटीत कामगार विभाग, व काँग्रेस अंतर्गत सर्व विभाग व सेल यांच्या प्रमुख पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे व शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी केले आहे. 

Labels:

तुळजापुरात वंचित बहुजन आघाडीने १७२ दिवसात तीन हजार गरजू कुटुंबाना केले धान्य किटचे वाटप

 


नळदुर्ग : एस.के. गायकवाड

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते मिलिंद दादा रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आता पर्यंत तुळजापूर १७२ दिवसात तुळजापूर तालुक्यातील ३०१७ गरजू कुटुंबाना धान्य किटचे वाटप करण्यात आले असून या मानवतेची साखळी अखंड ठेवणाऱ्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे.

वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, प्रबुद्ध कुष्ठरोग निर्मूलन व पुनर्वसन संस्था, कामठा,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थ उदगीर ,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व हितचिंतक दानशूर  यांच्या सहकार्याने व मिलिंद रोकडे ,जीवन कदम सुरेश चौधरी ,विकास बनसोडे ,आदींच्या पुढाकारातून  हे वितरणप करण्यात येत असून लाँडाऊन सुरु झाल्या पासून ते आज तागायत १७२ दिवसात तुळजापूर व परिसरातील एकूण ३०१७ गरजू कुटुंबाना किराणा व अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले आहे. दि.२९/सप्टेंबर रोजी तुळजापूर येथील वंचित बहुजन आघाडीचे लातूर व नांदेड जिल्हा निरिक्षक बालाजी शिंदे यांच्या हस्ते तुळजापूर येथे १७२ व्या दिवसी १३ कुटुंबाना किराणा किटचे वाटप करून एकून ३०१७ कुटुंबाचा अकडा गाठला आहे. प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद (दादा) रोकडे ,जीवन कदम,अनंत फुलसुंदर सर,बाळासाहेब जेटीथोर सर ,सुरेश चौधरी,बाळासाहेब राऊत कमलेश कदम,शुकेशन ढेपे, कृष्णा लोंढे  आदी उपस्थित होते.


Labels:

श्री तुळजाभवानी मातेच्‍या शारदीय नवरात्र महोत्सवास दि. 17 ऑक्टोबर पासून प्रारंभ

 


तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यावधी जणाचे आराध्यदैवत असलेल्या देशातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास अश्विन शुध्द १ शके १९४२ शनिवार दि. १७ आँक्टोबर रोजी विधीवत घटस्थापनेने प्रारंभ होत आहे.

तत्पुर्वी अधिक अश्विन वद्य ७ सह ८ शके १९४२ रोजी शुक्रवार दि .९ ऑक्टोबरपासून  श्री. देवीची मंचकी निद्रा सुरू होणार आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन पुढीलप्रमाणे  केले आहे.

शुक्रवार  दि. ९ ऑक्टोबर रोजी तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस सांयकाळी  प्रारंभ होईल. शनिवार दि. १७ ऑक्टोबर रोजी देवीची पहाटे सिहांसनावर प्रतिष्ठापना आणि दुपारी 12 वाजता विधीवत घटस्थापनेनंतर शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. घटस्थापना झाल्यानंतर रविवार दि. १८ रोजी श्री देवीजींची नित्योपचारपुजा व रात्रौ छबिना आणि सोमवार दि .१९ रोजी श्रीदेवीजींची नित्योपचार पुजा व रात्रौ छबिना, मंगळवार दि . २० रोजी  ललित पंचमी रथ अलंकार महापुजा व रात्रौ छबिना,  बुधवार दि .२१ रोजी श्री देवीजींची नित्योपचार पुजा  मुरली अलंकार, रात्रौ  छबिना गुरुवार दि. 22 रोजी श्री देवीजींची नित्योपचार पुजा  शेषशाही अलंकार,व रात्रौ  छबिना शुक्रवार दि .23 श्री देवीजींची नित्योपचार पुजा , भवानी अलंकार, पुजा व रात्रौ छबिना शनिवार दि .24 श्री देवीजींची नित्योपचार पुजा , महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा पहाटे 2 वा. होमहवनास आरंभ  व  सकाळी ७ वाजुन ५ मिनीटाने पुर्णाहुती, तर रविवार दि. 25 महानवमी   दिवशी तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा दुपारी १२ वाजता होमावर धार्मिक विधीनंतर घटोत्थापन, रात्री पलंग पालखीची मिरवणूक, विजयादशमी, सार्वत्रिक  सिमोल्लंघन,  सोमवार दि. 26 उषःकाली श्री देविजींचे शिबिकारोहन व मंचकी निद्रा, शुक्रवार  दि. 30  रोजी कोजागिरी पोर्णिमा रात्री देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, शनिवार दि .31 रोजी श्री तुळजाभवानी मंदीर पोर्णिमा रात्रौ सोलापूर काठ्यासह छबिना व जोगवा, रविवार दि .1 नोव्हेबर रोजी अन्नदान व रात्रौ  सोलापूरच्या  काठ्यासह छबिना. असे विविध  धार्मिक  कार्यक्रमाचे आयोजन नवरात्रौउत्सवा निमित्त केले आहे.

Labels:

रोहन देशमुख यांची तुळजापूर उपजिल्हा रूग्णालयास भेट; कोव्हिड सेंटरची केली पाहणी

 


 तुळजापूर : कुमार नाईकवाडी

तुळजापूर शहरात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.  येथील उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजपा नेते रोहन देशमुख यांनी उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हीड सेंटरला भेट देत तेथील सोयी सुविधांची माहिती घेतली.

 कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने तुळजापुरात गेल्या आठवड्यात शहरात जनता कर्फ्यु होता. शहरातील कोरोना रूग्णांवर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर रोहन देशमुख यांनी  रूग्णालयास भेट देऊन त्यांनी डॉक्टरांनाकडून तेथील रूग्णांची माहिती घेतली.  रूग्णालयात काय सोयी- सुविधा आहेत हे जाणून घेतले. रूग्णांवर व्यवस्थित उपचार करावेत, काही मदत लागत असल्यास त्वरित कळवावे, असे देशमुख यांनी डॉक्टरांना सांगितले. याच रुग्णालयात भाजपचे दत्ता राजमाने हेही उपचार घेत आहेत. त्यांचीही भेट घेऊन विचारपूस देशमुख यांनी केली. 

यावेळी प्रभाकर मुळे, शिवाजी बोधले, अनिल जाधव, बाळासाहेब भोसले, बालाजी शिंदे, सचिन अमृतराव, सचिव हरिभाऊ वट्टे, पंकज पाटील, गजानन वडणे, अनंत बुरांडे, अजय ढोणे, लिंबराज साळुंके, बाबा बेटकर  आदी उपस्थित होते.

Labels:

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व सेतू सुविधा केंद्र चालू करण्याची भाजप मीडिया सेलची मागणी

 


तुळजापूर : कुमार नाईकवाडी

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र चालू करावे, याबाबतचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या मीडिया सेलच्यावतीने बुधवार दि. 30 सप्टेंबर उस्मानाबाद याना तुळजापूर नायब तहसीलदार शिंदे यांच्यामार्फत देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, तहसील कार्यालय आवारातील सेतू सुविधा केंद्र गेल्या 7 महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे बाहेर चालु असलेले महा ई सेवा केंद्रामध्ये भरमसाठ पैसे घेवून सर्वसामान्यांची लुटमार होत आहे. कारण सेतु सुविधा केंद्रामध्ये 33 रु होणारे काम बाहेरील ई सेवा केंद्रमध्ये 100 ते 150 रुपये नागरीकांना मोजावे लागत आहेत. यामुळे शेतकरी विद्यार्थी व नागरीकांना नाहक त्रास होत आहे. मार्च 2020 पुर्वी सेतु सुविधा केंद्रात विविध प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या संचिका नागरीकांना अद्याप पर्यंत प्रमाणपत्र मिळाले नाहीत. वारंवार पोचपावती दाखवुन सुध्दा संबधित कर्मचारी टाळाटाळीचे उत्त‍र देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातुन येणा-या नागरीकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. त्याना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. 

तरी जिल्हाधिकारी यांनी सदरील बाबीकडे लक्ष देवुन जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र त्वरित सुरु करावे, अन्यथा भारतीय जनता पार्टी मिडीया विभागाच्यावतीने याबाबत तीव्र अंदोलन करण्यात येईल. आंदोलन दरम्या‍न काही अनुचित प्रकार घडल्या सर्वस्वीं जबाबदारी प्रशासनावर राहिल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  निवेदनावर जिल्हाउपाध्यक्ष संजय खुरुद, तालुकाध्यक्ष सचिन ताकमोघे, शहराध्यक्ष सागर कदम, तालुका उपाध्यक्ष सोमनाथ शेटे यांच्या साक्ष-या आहेत.


Labels:

आमदार रोहित पवार व त्यांच्या पत्नी सौ. कुंतीताई पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त श्री तुळजाभवानी मातेस महाआरती

संग्रहित छायाचित्र

तुळजापुर : कुमार नाईकवाडी

मराठवाड्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार व त्यांच्या पत्नी सौ. कुंतीताई पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मंगळवार दि. २९ रोजी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेस पंचामृत अभिषेक यथा सांग पुजा करण्यात आली. यावेळी येथील श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी तथा रा.काँ. युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम यांनी श्री तुळजाभवानी मंदीर महाद्वार येथे महाआरती करुन पवार दांपत्यांना निरोगी व दिर्घायु देवो अशी श्री  देवी चरणी प्रार्थना केली.



Labels:

जिओ फोन नावाला रेंज नाही गावाला

प्रतिकात्मक

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी गावात जिओ फोनचे असंख्य ग्राहक असून गेल्या पाच-सहा महिन्यापासून मोबाईलला नेटवर्क व्यवस्थित येत  नसल्यामुळे जिओ फोन नावाला रेंज नाही गावाला अशी म्हणण्याची दुदैवी वेळ येथील ग्राहकांवर आली आहे. 

रिलायन्स ग्रुपने मोठा गाजावाजा करत आणि स्कीम  भडीमार करत ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढले. कंपनीच्या अमिशाला बळी पडून ग्राहकांनी जिओ ला जवळ केले. मात्र, काही महिन्यांनी जिओ कंपनीने ग्राहकांना परवडणा-या स्कीम बंद केल्या असून रिचार्ज प्लॅनच्या रक्कमेत भरमसाठ वाढ केली आहे. महिन्याचा रिचार्ज वाढवूनही सेवा योग्य पद्धतीने मिळत नसल्यामुळे ग्राहक वैतागले आहेत.  

सध्या शाळा कॉलेज बंद असून शाळा कॉलेज चा पूर्ण अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने चालू आहे. मात्र या गावातील परिसरात जिओ कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी छताचा, टेकडीचा, झाडाचा, आसरा घ्यावा लागत आहे. नेटवर्कचा अंदाज घेत रात्रभर जागून अभ्यास करावा लागत आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून विद्यार्थी व मोबाईल ग्राहकांची होणारी हेळसांड थांबविण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

गेल्या तीन वर्षापासून मी जिओ कंपनीचा ग्राहक आहे. यापुर्वी गावात व्यवस्थित रेंज येत होती. मात्र गेल्या वर्षापासून रेंज गायब झाली आहे. मी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असून अनेक कामे ऑनलाईन करावी लागतात. घटनास्थळांवर जाऊन लोकेशनचे फोटो घ्यावे लागतात. मात्र, गावात रेंज नसल्यामुळे जियो टॅगिंग होत नाहित. त्यामुळे गावकर्‍यांना अनेक शासकिय योजने पासून वंचित रहावे लागत आहे.

- शंकर सावंत, रोजगार सेवक पांगरदरवाडी.

संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे अन्यथा भविष्य काळात आंदोलन करावे लागेल.

- बापू साळुंके, नागरिक पांगरदरवाडी 


Labels:

तामलवाडी आरोग्य उपकेंद्रास एच.बी. मशीन भेट

 


तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील युवा उद्योजक ज्ञानेश्वर जगताप यांनी त्यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन तामलवाडी आरोग्य उपकेंद्रास एच.बी मशीन भेट देण्यात आले आहे.

       तामलवाडी येथील आरोग्य उपकेंद्र येथे एच.बी.मशीनची कमतरता असल्याची माहीती मिळताच तामलवाडी येथील युवा उद्योजक ज्ञानेश्वर जगताप यानी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व कोरीनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करता त्यानी स्वखर्चाने आरोग्य उपकेंद्रास एच.बी मशीन भेट दिली.आरोग्य सेविका संगीता चव्हाण यानी ती मशीन स्वीकारून जगताप याना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

    याप्रसंगी आरोग्य सेविका संगीता चव्हाण,हुजेफा शेख,सिध्देश्वर मसुते,सुधीर पाटील,मारूती रोकडे,प्रशांत राऊत,कृष्णा घोटकर,ज्ञानेश्वर माळी,रौफ सय्यद आदी उपस्थित होते.

Labels:

शिवसेवक समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी सर्जेराव गायकवाड यांची निवड

 


तामलवाडी : तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील शिवरत्न सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष,तथा ब्रिक्स मानवाधिकार मिशनचे तालुकाध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांची दि.२८ रोजी  शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य धाराशिव जिल्हाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

     शिवरत्न बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली २८ वर्षापासून संस्थापक अध्यक्षाची धुरा सांभाळत सतत सामाजिक कार्य कार्यात सहभागी असणारे व तुळजापुर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून सार्वजनिक शिवजन्मोत्सव घराघरात पोहचवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणारे तसेच शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून रक्तदान,वृक्षारोपण,विविध स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम,गरीब महीलांना साड्या वाटप,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,असे अनेक उपक्रम राबवणारे तसेच मराठा समाजबांधवासाठी सतत कार्यरत असणारे शिवरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची दि.२८ रोजी शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य धाराशिव जिल्हाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.शिवसेवक समितीचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब पाटील यानी निवडीचे पत्र देऊन सर्जेराव गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या आहेत.जनतेच्या हितासाठी विद्यार्थी ,शेतकरी,महीला ,कामगार,उद्योजक यांच्या न्याय हक्कासाठी तसेच आरक्षण,शिक्षण,नोकरी,उद्योग- व्यवसाय,शेतीच्या जनजागृतीसाठी व राजकीय,शासकीय,निमशासकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील लोकांच्या अन्याय अत्याचाराविरूध्द ही चळवळ उभारण्यात आली असुन या शिवसेवक समीतीच्या माध्यमातून चांगले शिवकार्य करू असे शिवसेवक समीतीचे नुतन जिल्हा कार्याध्यक्ष सर्जेराव गायकवाड यानी बोलताना सांगितले आहे.

     या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असुन  शिवसेना गणप्रमुख दत्तात्रय गवळी,सुधिर पाटील,शिवाजी सावंत,समाधान गायकवाड, योगेश निकम,शिवाजी पाटील,इंद्रजित घोटकर,तुकाराम गायकवाड,सोपान सावंत,नागेश घोटकर,कृष्णा घोटकर,निरंजन करंडे,निलेश चिवरे,दादा पाटील,संपत पाटील,दत्तात्रय जगताप,ज्ञानेश्वर जगताप,सचिन शिंदे,नागेश शिंदे,शशिकांत गायकवाड, यानी सर्जेराव गायकवाड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Labels:

तुळजापूर लाईव्ह | सकाळच्या टॉप हेडलाईन्स | दि. 30 सप्टेंबर 2020

 ✏    तुळजापूर लाईव्ह | सकाळच्या टॉप हेडलाईन्स |  दि. 30 सप्टेंबर 2020



🎯  *ताज्या अपडेटसाठी लॉग ईन करा -* www.tuljapurlive.in

----------------------------------------------------

✍🏻  *संकलन :- विकास नाईक 📱 8668973422*

----------------------------------------------------

💫 उस्मानाबाद : शुक्रवारी जिल्ह्यातील आमदार व खासदारांच्या घरासमोर मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार, तर 5 ऑक्टोबर रोजी तहसिलसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन...


💫 परंडा : टाकळी गावचे सुपुत्र भारतीय सैन्य दलातील जवान वामन मोहन पवार भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना शहीद....


💫 उस्मानाबाद : पावसामुळे झालेल्या नुकसानीची ऑनलाईन, ऑफलाईन, लेखी तक्रार विमा कंपनीकडे व कृषी कार्यालयाकडे करावी - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर...


💫 तुळजापूर : मराठा क्रांती ठोक मोर्चा  यशस्वी करण्यासाठी तुळजापुर तालुक्यातील गावागावात बैठका घेण्यात येत आहेत... आज तुळजापुर येथील पुजारी मंडळ सभागृहात बैठक...


💫 उस्मानाबाद : लातूर-टेंभुर्णी महामार्गासाठी 166 कोटीचा निधी मंजूर; लोकसभेच्या अधिवेशनात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला होता तारांकित प्रश्न....


💫 कळंब : कळंब नगरपरिषदेच्या सर्व स्वच्छता कर्मचा-यांना प्रत्येक दोन लाखांचा विमा कवच; न.प.च्या सर्वसधारण सभेत घेण्यात आला सर्वानुमते ठराव.... 


💫 उस्मानाबाद : अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार करणाऱ्यास आजन्म कारावासाची शिक्षा...


💫 लोहारा : कंत्राटी महिला कर्मचा-यांच्या सेवा कायम ठेवण्याच्या मागणीसाठी जिजाऊ बिग्रेडच्यावतीने मंगळवारी लोहारा तहसिलसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले....


💫 नळदुर्ग : येथील भुईकोट किल्ल्यातील ऐतिहासिक नर-मादी धबधबा सुरु; मात्र कोरोनामुळे पर्यटकांना किल्ल्यात प्रवेश नाही...


💫 परंडा : खुनाच्या गुन्ह्यात तीघांना आजन्म कारावासाची शिक्षा...

 ______________________

🌀 *आपणही आम्हाला बातम्या पाठवू शकता. व्हाटसअप नंबर 📱 8668973422*


🌐 *फेसबुक पेज लाईक करा -* https://www.facebook.com/livetuljapur

-----------------------------------------------------------

Labels:

Tuesday, 29 September 2020

एमएचटी सीईटी परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

 


उस्मानाबाद, दि.29 : एमएचटी सीईटी परिक्षा-2020 दि.1 ऑक्टोंबर 2020 ते 20 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 या वेळेत ऑनलाईन पध्दतीने तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानाबाद. व श्री. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाह्य उपद्रव कमी करणे, परीक्षार्थीना कसलाही अडथळा होऊ नये. या दृष्टीने परीक्षेसाठी संबंधित नसलेल्या व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करण्यास पाबंद करणे, तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स, फॅक्स, इमेल, रेडीओ, इंटरनेट सुविधा, भ्रमणध्वनी (मोबाईल), संगणक, गणनायंत्र (कॅलक्युलेटर) व अशा इतर प्रकारच्या स्वरुपातील बाबी विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात येवु नये. म्हणुन परीक्षा केंद्राच्या सभोवताली 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागु करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्याने  अपर जिल्हादंडाधिकारी उस्मानाबाद यांनी , फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन उक्त परीक्षा केंद्राचे 100 मीटरच्या परिसरात पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

परीक्षा केंद्राचे परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत.परीक्षा केंद्राचे परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल,असे कृत्य करण्यांत येणार नाही. परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानपट्टी, टायपिंग सेटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक, कॉम्प्युटर सेंटर्स, इंटरनेट कॅफे इत्यादी माध्यमे बंद राहतील. परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, फॅक्स, ईमेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल.कोणत्याही व्यक्तींकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही.परीक्षा केंद्रावर कोणत्याही वाहनांस प्रवेशास मनाई राहील.परीक्षेशी संबंधीत नसलेल्या व्यक्तींना परीक्षा केंद्रात प्रवेश नसेल.

केवळ संबधित परीक्षा केंद्रावर नेमणुक केलेले अधिकारी/कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी, संबधीत शाळेचे मुख्याध्यापक /शिक्षक/कर्मचारी आणि परीक्षार्थी यांनाच परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश राहील. इतरांना (परिक्षार्थीच्या नातेवाईकासह) प्रवेश असणार नाहीपरीक्षा केंद्राचे 100 मीटरचे आवारात 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही.

 परीक्षा केंद्रात परीक्षेशी संबधित अधिकारी/कर्मचारी आणि परीक्षार्थी सोडून कुणालाही प्रवेश असणार नाही.  हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी/कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षा केंद्रावर निगरानी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी/कर्मचारी यांचे परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत.

   सदरील आदेश दिनांक 01 ऑक्टोबर 2020 ते 20 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत वरील परीक्षा केंद्राचे परिसरात सकाळी 06.00 ते सायंकाळी 08.00 पर्यंत लागु राहतील.या आदेशाची अवमानना केल्यास भारतीय दंड विधानचे कलम 188 नुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कार्यवाही करण्यात येईल. असे ही आदेशात नमूद केले आहेत.

Labels:

नळदुर्गचा ऐतिहासिक नर-मादी धबधबा ओसंडून वाहू लागला


 नळदुर्ग : विकास नाईक

येथिल भुईकोट किल्ल्यातील  नयनरम्य नर-मादी हा धबधबा मंगळवार रोजी पासून सुरू झाला आहे. गेल्या आठवडा भरात झालेल्या  पावसामुळे झोडपुन काढल्याने  तिर्थक्षेत्र तुळजापूर व नळदुर्ग शहराला पाणी पुरवठा होणारा बोरी धरण पुर्णक्षमतेने भरून सांडवे सुरू झाल्याने हा  धबधबा सुरू झाला आहे. माञ सध्या कोरोना मुळे हा किल्ला पर्यटनासाठी बंद असल्याने पर्यटकांना किल्ल्यात प्रवेश बंद आहे.

 सोलापूर येथील युनिटी मल्टिकाँन्स कंपनीने पुरातत्व खात्याशी सामंजस्य करार करून किल्ल्यात मोठ्या प्रमाणात  विकास कामे केली आहेत. यामुळे किल्ला परिसर आधिकच सुशोभित झाला आहे. किल्ल्यात इ. स. १३ व्या शतकात तत्कालीन निजाम शासकाने  बोरी नदी किल्ल्यात वळवून त्यावर मोठा बंधारा बांधून त्यावर दोन धबधबे बांधून नदीचे पात्रातील अतिरिक्त पाणी याच दोन्ही धबधब्यातून वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या पावसाने बोरी नदीलाही चांगलेच पाणी आले आहे. शिवाय बोरी धरण ही पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे मंगळवार पासून नर-मादी धबधब्यातून पाणी वाहण्यास प्रारंभ झाला आहे. स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेला हा किल्ला पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. माञ कोरोणामुळें यंदा हा नरमादी धबधबा बघता येणार नाही.

   नळदुर्ग शहराच्या उत्तर बाजूने वाहत येणारी बोरी नदी किल्लयाचा आत येऊन तिला चंद्रकोरीचा आकार देऊन पुन्हा उत्तरेकडे वळविली आहे. पूर्व-पश्चिम असा हा बंधारा अतिशय कल्पकतेने परंतु भक्कम अशा तर्हेने बांधलेला आहे. बंधार्याच्या वरच्या बाजूला नदीच्या पुराचे पाणी वाहून जावे म्हणून दोन भले मोठे सांडवे तयार करण्यात आले आहेत. या दोन सांडवंना नर व मादी अशी नावे देण्यात आलेली आहेत. नर-मादी धबधबतील पाणी पुढे 100 फूटापेक्षा अधिक खाली खोल जाऊन आदळते. ते सुंदर व विहंगम दृश्य पाहताना अक्षरश: डोळ्यांचे पारणे  फिटते.

व्हिडिओ पहा -



Labels:

हगलुर ग्रामपंचायतीचे नूतन प्रशासक तांबोळी यांचा ॲड. पाटील यांच्या हस्ते सत्कार

  


नळदुर्ग, दि. 29 : तुळजापूर तालुक्यातील हगलुर येथील ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदावर तुळजापूर पंचायत समितीच्या कृषी विभागाचे विस्तार अधिकारी एस.बी. तांबोळी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ॲड. जयपाल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हगलुर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचासह सदस्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पंचायत समितीमधील कृषी विभागाचे विस्तार अधिकारी एस.बी. तांबोळी यांची नेमणूक झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ॲड. जयपाल पाटील यांच्यावतीने फेटा, शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी सत्काराला उत्तर देताना तांबोळी म्हणाले की, माझ्या प्रशासक पदाच्या कार्यकाळात गावच्या प्रश्नासंबंधी पुढाकार घेणार असून प्रश्न सोडवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन काम करणार आहे. तसेच आठवडयातून एकदा दर बुधवारी गावात हजर राहणार असून ग्रामस्थांना काही अडचणी असल्यास लेखी तक्रार द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना ॲड. जयपाल पाटील म्हणाले की, गावात तलाठी येत नाहीत, त्यांनी गावासाठी एक वार दिला पाहिजे. तसेच राज्याचे राज्यपाल भेटतील पण गावचे तलाठी लवकर भेटणार नाहीत असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे ग्रामसेवक व तलाठी यांनी गावात राजकारण न करता विकास कामाकडे लक्ष द्यावे, गावातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सुटल्या पाहिजेत, असे सांगुन गलूर गाव शंभर हागणदारी मुक्त झाले पाहिजे, गटार व्यवस्था करणे, सांडपाणी नियोजन करणे यासह नागरी समस्या नूतन प्रशासक तांबोळी यांच्याकडे ॲड. पाटील यांनी मांडल्या.

याप्रसंगी माजी सरपंच नालंदा पाटील, गावातील युवा नेतृत्व ॲड. जयपाल पाटील, अण्णासाहेब दराडे, विजय नागरगोजे, महेश गवळी, सतीश दराडे, गणेश घुगे, अनंता दराडे, गणेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Labels:

✏ तुळजापूर लाईव्ह | सकाळच्या टॉप हेडलाईन्स | दि. 29 सप्टेंबर 2020

 


✏ तुळजापूर लाईव्ह | सकाळच्या टॉप हेडलाईन्स | दि. 29 सप्टेंबर 2020

🎯
ताज्या अपडेटसाठी लॉग ईन करा - www.tuljapurlive.in
-----------------------------------------------------------
✍🏻 *संकलन :- विकास नाईक* 📱 *8668973422*
_____________
🔆 उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयात गंभीर रुग्णांसाठी बेंगळुरुच्या नामांकित विशेषज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून क्लाऊड फिजिशियन टेलिमेडीसिनचा उपक्रम राबविण्यात येणार, मृत्यू दर कमी करण्यासाठी पुढाकार, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती...

🔆 उस्मानाबाद : कोविडच्या पार्श्वभूमीवर तात्काळ तपासणीसाठी रामनगरात नागरी आरोग्य केंद्रात अॅन्टीजेन टेस्टची केलेली सुविधा अपुरी, या केंद्रास दररोज केवळ २५ कीट उपलब्ध, त्या अपुऱ्या पडत असल्याने कीटसची संख्या वाढविण्याची मागणी...

🔆 तुळजापुर : शहरातील जनता कर्फ्यू शिथील आजपासुन शिथील, व्यापा-यांच्या मागणीवरुन नगरपरिषदेचा निर्णय...

🔆 तुळजापूर : दि. 9 ऑक्टोबर रोजी तुळजापुरात मराठा आरक्षण आंदोलनाच्या पुर्वतयारीसाठी सकल मराठा समाजाची आज तुळजापुरात बैठक...

🔆 उस्मानाबाद : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबादेत लवकरच तुळजाभवानी रुग्णालयाचे 50 खाटांचे रुग्णालय, नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय...

🔆 नळदुर्ग : स्वस्त धान्य दुकानांतुन सप्टेंबर महिन्याचे दिलेले धान्य दर्जाहीन; सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांतुन संताप, पुरवठा अधिका-यांनी चौकशी करण्याची मागणी...

🔆 नळदुर्ग : श्री क्षेत्र तुळजापुर व नळदुर्ग शहराला पाणीपुरवठा करण्यात येणा-या कुरनूर मध्यमक (बोरी धरण) प्रकल्प तुडूंब भरुन सांडवे वाहू लागले...

🔆 उस्मानाबाद : शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वी शेतक-यांना अनुदान व पिक विमा देण्याची भाजपाची कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मागणी...

🔆 परंडा : दोन दुकानात छापा टाकुन ८२ हजार रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त; स्थानिक गुन्हे विभागाची कारवाई...

🔆 उमरगा : तालुक्यातील गुंजोटी येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम लढयातील हुतात्मा वेदप्रकाश यांच्या स्मृतिस्तंभाच्या कामाचे भुमीपूजन...

🔆 उस्मानाबाद : विविध मागण्यांसाठी राज्य कर्मचारी संघटनेचे आज जिल्हाभर आंदोलन; दिवसभर काळ्या फिती लावून करणार कामकाज...

🔆 तुळजापूर : रस्त्यावर विनाकारण फिरणा-या दुचाकीस्वारावर पोलीसांकडुन दंडात्मक कारवाई
_____________
*आपणही आम्हाला बातम्या पाठवू शकता. व्हाटसअप नंबर 📱 8668973422*
*फेसबुक पेज लाईक करा - https://www.facebook.com/livetuljapur
-----------------------------------------------------------

Labels:

Monday, 28 September 2020

भागवताचार्य वा. ना. उत्पात यांना नळदुर्ग येथे श्रध्दांजली

 


नळदुर्ग, दि. 28 : जेष्ठ विचारवंत, व्याख्याते, पंढरपूचे माजी नगराध्यक्ष, हिंदू धर्मशास्त्राचे अभ्यासक, भागवताचार्य वा.ना. उत्पात महाराज यांना नळदुर्ग येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.

संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि आपल्या रसाळ वाणीने संपूर्ण महाराष्टाला भागवत कथेने मंत्रमुग्ध करणारे भागवताचार्य वासुदेव नारायण तथा वा ना उत्पात यांचे करोना संसर्गामुळे पुण्यात उपचारदरम्यान आज निधन झाले. वा.ना. उत्पात महाराज हे पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष होते. तसेच ते 25 वर्ष नगरसेवक म्हणून ही काम केले आहेत. स्वा. सावरकरांचे विचारानी प्रेरित होऊन आयुष्यभर महाराष्ट्र भर व्याख्याने केली. ते हिंदू धर्मशास्त्राचे गाढे अभासक होते. रुक्मिणी मातेचे मुख्य पुजारीही होते. भागवताचार्य वा.ना.उत्पात महाराज यांच्या जाण्याने महाराष्ट्रच नव्हे तर देश पोरका झाला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी नगरसेवक विनायक अहंकारी, मनसेचे सरचिटणीस व स्वा. सावरकर युवा मंचचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, प्रशांत जोशी, संतोष नाईक, सोनू गवळी, मयूर जोशी, आदित्य कुलकर्णी, सूरज जोशी, अजय मोरे,गोटू कुलकर्णी आदीजण उपस्थित होते.

Labels:

उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी 110 कोरोना रुग्णांची वाढ; तर 3 जणांचा मृत्यू

 


उस्मानाबाद, दि. 28 : उस्मानाबाद जिल्हयात आज सोमवार दि. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 211 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 104 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 766 झाली आहे. यातील 9 हजार 139 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 356 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 271 जणांवर उपचार सुरु आहे. 






Labels: