Tuesday, 31 March 2020

अणदूर येथील चन्नबसव संस्थेच्या वतीने पोलिसांसह गरजुंना जेवण व मास्कचे वाटप


खानापूर, दि. ३१ :

कोरोनाच्या पाश्वभूमीवर दि.31मंगळवार रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी जनता कर्फ्यु घोषित केला होता. यानिमित्त अणदुर येथील चन्नबसव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पोलिसांसह गरजुंना अन्नाचे पाॅकिट, पाणी तसेच मास्कचे वाटप करण्यात आले. 

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांनी जनता कर्फ्यू घोषित केल्याने तुळजापूर तालुक्यातील अणदुर परिसरासह ग्रामीण भागात शुकशुकाट होता. दुकाने, हॉटेल्स बंद असल्याने अनेकांची गैरसोय झाली. त्या अनुषंगाने मंगळवारी अणदूर येथील चन्नबसव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गरजुंना मदत करण्यात आली. तुळजापूर तालुक्यातील खानापूर नाका येथिल सीमा तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना अन्नाचे पाकिट, पाण्यासह मास्कचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेले नागरिक, मनोरुग्ण यांनाही संस्थेच्या वतीने मदत केली गेली. संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर तिरगुळे, सचिन तोग्गी यांनी मनोरूग्णांचा शोध घेऊन त्यांना जेवण दिले. काही परप्रांतिय मजूंर पायी त्यांच्या गावी जात होते. त्यांची संस्थेच्या वतीने  हात धुण्यापासुन ते पिण्याच्या स्वच्छ पाण्यासह जेवणाची सोय करण्यात आली.सर्व हाँटेल बंद असल्याने या वेळी भुकेने व्याकुळ झालेले चेहरे सर्व काही सांगुन गेले. यासह अनेकांची भूक भागविण्याचे कार्य संस्थेने केले. सहायक पोलीस निरीक्षक अमित मस्के यांनी चन्नबसव संस्थेच्या या कार्याचे कौतूक केले.

Labels: ,

Saturday, 28 March 2020

काटी येथे प्रकाश आगलावे या शेतकऱ्यांची आत्महत्या

काटी, दि. 28 : 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील शेतकरी प्रकाश रंगनाथ आगलावे वय (60) या शेतकऱ्यांने शनिवार दि. 28 रोजी सकाळी शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.

     
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काटी येथील शेतकरी प्रकाश रंगनाथ आगलावे यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एक लाख पंच्च्याऐंशी हजार कर्ज होते. चालू बाकीत असल्याने त्यांना कर्जमाफीचा फायदा मिळाला नाही व ते कॅन्सर या रोगाने पिढीत होते. या नैराश्यातून त्यांनी शनिवारी शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. तामलवाडी पोलीस ठाण्याचे पो.कॉ. नाईकवाडी आणि तलाठी गुळवे यांनी प्रत्येक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून मृताचे शवविच्छेदन सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. ते माजी सरपंच शामराव आगलावे यांचे धाकटे बंधू होते.
   
  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Labels:

केमिस्ट संघटनेच्यावतीने नळदुर्ग पोलिस कर्मचाऱ्यांना सानिटायझर व मास्क वाटप.

नळदुर्ग, दि.२८ :

अणदूर नळदुर्ग जळकोट केमिस्ट संघटनेच्यावतीने नळदुर्ग पोलीसाना सानिटायझर व मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसआधिकारी , कर्मचारीना शनिवार रोजी  सानिटायझर   मास्कचे  वितरण  करण्यात आले. 

या वेळी बोलताना साहय्यक  पोलिस निरीक्षक  मनोहर वानखेडे  म्हणाले की, औषधी दुकानदार   धोका पत्थकरुन  समाजाची सेवा करीत आहेत. या संकटाला आपण सगळ्यांनी एकत्र येऊन  दुर करु ,  आपणही नियमाचे पालन करून लोकांना सेवा द्यावी. 
यावेळी नळदुर्ग अणदूर जळकोट केमिस्ट संघटनेचे येथील संजय जाधव, विकास करपे ,गणेश मोरडे, दीपक पवार ,संतोष मूळे, आप्पासाहेब गोगाव ,सचिन कासार, काझी ,गायकवाड नरवडे ,शिरगुरे,गोविंद शिंदे ,अजय अंदूरकर ,गुणवंत मूळे ,वैजू कुंभार ,शंकर जवळगे,जीवन मोजगे, महेश कार्ले आदी औषध विक्रेते उपस्थित होते.

Labels: ,

Friday, 27 March 2020

खानापूरमध्ये कोरोना सहायता कक्ष स्थापन


खानापुर, दि.  27 : 

तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, तहसीलदार सौदागर तांदळे व गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालय खानापूर येथे कोरोना सहायता कक्ष स्थापन करण्यात आले.
  
 या सहायता कक्षाचे कक्षप्रमुख म्हणून ग्रामसेविका घुले एस.ए  यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. तर कोरोना सहायता समितीमध्ये सहाय्यक म्हणून तलाठी प्रशांत देशमुख, कृषिसेवक सुनील जोगदंड, मुख्याध्यापक बशेटी, सहशिक्षक भीमराव घोडके,मा जि.प.सदस्य वसंतराव वडगावे,पो पाटील अमोल हिप्परगे, ग्रामरोजगरसेवक इब्राहिम पटेल, संगणक परिचालक बालाजी गायकवाड, आशा कार्यकर्ती शुभांगी सातपुते, अंगणवाडी कार्यकर्ती,सा व राजकीय कार्यकर्ते, गावातील युवक यांचा  समावेश करण्यात आला आहे.

यावेळी सरपंच उत्तम धुते, उपसरपंच रहीम मुजावर,इ मुजावर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

     
सहायता समितीने पुणे,मुंबई सह इतर बाहेर गावहून आलेल्या व्यक्तींची भेट घेऊन त्यांची नोंद घेतेली.आतापर्यंत बाहेरगावहून आलेल्या 90 जणांची नोंद झाली आहे. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच विशेष काळजी घेण्याच्या व बाहेर न फिरण्याच्या, 15 दिवसापर्यंत कोणाच्या संपर्कात न येण्याच्या सूचना देण्यात आल्या.

गावातील ग्रामस्थांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये,जमाव करून बसू नये आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी अन्यथा जमावबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.खानापूर ग्रामपंचायत प्रशासनाकडून आवशयक त्या उपाययोजना आखल्या जात आहेत.धुराची फवारणी केली जात आहे.जनजागृतीसाठी आवश्यक त्या सूचना वेळोवेळी दवंडीद्वारे  दिल्या जात आहेत.जनजागृतीसाठी पोस्टर लावण्यात आले आहेत.प्रशासन आपल्या आरोग्यासाठी कार्यरत आहे.आपण सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच उत्तम धुते यांनी केले आहे.

Labels: ,

Thursday, 26 March 2020

मंगरूळ येथे कोरोना सहाय्यता कक्षाच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशक औषधाची फवारणी


काटी, दि. 26 :

तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ  मुंडे मॅडम व तहसीलदार सौदागर तांदळे तसेच बीडीओ मोरड  साहेब यांच्या सूचनेनुसार गुरुवार दिनांक २६  मार्च  रोजी ग्रामपंचायत कार्यालय  व कोरोना मदत सहायक  कक्षाच्या वतीने सम्पूर्ण गावात जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. 

यावेळी पंचायत समिती उपसभापती चित्तरंजन सरडे , कोरोना सहायता कक्षाचे प्रमुख  ग्रामसेवक श्री . सुरवसे एल के सरपंच सत्तार मुलानी , पोलिस पाटील लक्ष्मण माळी , शाम पाटील , ग्राम पंचायत सदस्य आप्पासाहेब डोंगरे , पत्रकार चांदसाहेब शेख .तसेच सर्वच ग्रामपंचायत कर्मचारी तसेच या समितीचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

 गावांतील काही नागरिक विनाकारण फ़िरत असतील तर त्यांच्यावर संचारबंदी कायद्याच्या चौकटीत कारवाई केली जाईल असेही यावेळी समितीच्या माध्यमातून कळवण्यात आले आहे तसेच बाहेर आलेल्या नागरिकांची माहिती देऊन सहकार्य असेही आव्हान यावेळी करण्यात आले

Labels: ,

काटीतील वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. अनिस मुजावर यांचे माणुसकीचे दर्शन, सोलापूरातील मनोरूग्न व्यक्तींना दिले अन्न आणि कपडे


काटी, दि. 26 :

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव भारतात व महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेला असतांना तो रोखण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने ठोस पावले उचलली जात आहेत. संबंध महाराष्ट्रात सर्वत्र संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे.

त्या अनुषंगाने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून, देवदूत बनून पोलीस प्रशासन, वैद्यकीय स्टाफ, स्वच्छता कर्मचारी हे अत्यावश्यक सेवा देत आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहेत. आपणही समाजाचे काही देणे लागतो या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मागील 25 वर्षांपासून वैद्यकीय सेवा देणारे डॉ. युसुफ मुजावर यांचे चिरंजीव डॉ. अनिस मुजावर व डॉ. आसिफ मुजावर* या दोन बंधूंनी आपल्या स्वर्गीय आईच्या नावाने सुरू केलेल्या नाझ सहकारी फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना विषयी तसूभरही माहिती नसणाऱ्या सोलापूर येथे सिव्हिल हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बसस्थानक आदी विविध भागात फुटपाथवर फिरणाऱ्या ज्यांच्या डोक्यावर छत नाही, निराधार आहेत, मनोरुग्ण आहेत असे लोक संचारबंदीच्या काळात ते पोट कसे भरणार हा प्रश्र्न डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकी जपत बुधवार दि. 25 रोजी  सोलापूर शहरातील मनोरुग्ण व्यक्तींना अन्न आणि पाणी आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले.



 इतकेच नव्हे तर जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव भारतात व महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेला असतांना तो रोखण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व  राज्य सरकारच्या वतीने ठोस पावले उचलली जात आहेत. सर्वत्र संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. त्‍याचे पालन करीत घरी रहा, कोरोना विषयी काळजी घ्या, सुरक्षीत राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही डॉ. अनिल मुजावर यांनी केले आहे. शहरातील गर्दीच्या ठिकाणी बेघर व्यक्ती, मनोरुग्ण व्यक्ती, पहायला  मिळतात. बसस्थानक, रेल्वेस्थानक, रुग्णालय परिसर हेच त्यांचे छत बनलेले असते.येणाऱ्या-जाणाऱ्या कडून भीक मागून ते जगत असतात. पण, सध्या कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून लागू झालेल्या संचारबंदीमुळे रस्त्यावर चिटपाखरूसुद्धा नाही. हॉटेल, अन्नपदार्थ विक्रीचे गाडे बंद झाल्याने बेघर, निराधार, मनोरुग्ण लोकांनी पोट कसे भरायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांना कोरोनाची भिती वाटत असेल परंतु अशा लोकांना अशीच संचारबंदी लागू असेल तर त्यांना पोट भरण्याची भिती सतावत असणार ही भावना मनात ठेवून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे सांगून संचारबंदीच्या काळात आपला जीव मुठीत धरून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस बांधव अहोरात्र कष्ट घेत आहेत. त्या  पोलीस बांधवांचीही नाझ सहकारी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 यापुढे देशासमोर उभा टाकलेल्या संकटावर मात करण्यासाठी जातीभेदाच्या, धर्मांच्या भिंती पार करून सर्वांनी एकत्रित येऊन तसेच विविध सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन या संकटाचा सामना करण्याचे आवाहन केले. डॉ.अनिस व डॉ. आसिफ मुजावर यांना या सामाजिक कामात त्यांचे वडील डॉ. युसुफ मुजावर यांच्यासह संपूर्ण कुटुंब मदत करित आहेत.

Labels: ,

Wednesday, 25 March 2020

तुळजापूर : गुरुवार पासून आठवडा बाजार येथील "मच्छी मार्केट" मध्ये भाजीपाला विक्री चालू राहील


तुळजापूर, दि. २५ :

सध्या कोरोना व ची भीती सर्वत्र आहे.सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.राज्यात कलम 144 लागू झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल माध्यमातून कळवले आहे.कि जीवनावश्यक वस्तू विक्री करणारी आस्थापने चालू राहतील. 

 याकरता नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी कठोर पावले उचलली असून रोज भरणारा भाजीपाला भवानी रोड वर विक्री होत असतो यामुळे वाढती गर्दी लक्षात घेता दिनांक 26 गुरुवार पासून रोज भाजीपालाची विक्री आठवडा बाजार येथील "मच्छी मार्केट" येथे भरविण्यात येईल तरी शहरातील सर्व नागरिकांनी आठवडा बाजार येथील "मच्छी मार्केट" मध्ये भाजीपाला खरेदी करण्यास जावे दक्षता म्हणून तेथे नगरपरिषदेने सर्व उपाययोजना केल्या आहेत. हात वाशिंग स्वच्छता, तोंडावर मास लावून मध्ये प्रवेश करावा तसेच पुढील आदेश येईपर्यंत येते रोजचा भाजीपाला विक्री चालू राहील असे मुख्याधिकारी अधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले‌.

Labels: ,

नळदुर्ग शहरवासियाना आवाहन


नळदुर्ग, दि. २५ :

संचारबदीच्या काळात नागरिकाना जिवनावशयक वस्तु उपलब्ध राहणार आहे. शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात भाजीपाला व फळ  विक्रेत्यांना बसविले जाणार  असल्याचे आरोग्य सभापती सौ. भारती सुनिल बनसोडे यानी सांगितले .

कोरोना हे छातीत धडकी भरविणारे नाव. त्यामुळे सर्वानीच घरी बसून त्यावर मात करावी या हेतूने देशभरात  लॉक डाउन करण्यात आले आहे.  या काळात नागरिकांना जिवनावश्यक वस्तू नियमित मिळाव्यात या साठी स्थानिक पोलीस प्रशासन व पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. अत्यावश्यक सेवा तर सुरूच आहे तरी पण  उद्यापासून शहरातील काही ठराविक किराणा दुकानं परवाना देऊन ती नियमितपणे  उघडी ठेवण्यात येणार आहेत. जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही.  तसेच भाजीपालाही नियमितपणे मिळावा यासाठी  नळदुर्ग बस स्थानका समोरील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात भाजीपाला व फळ विक्रेत्यांना बसविले जाणार आहे. त्यामुळे आपणास दररोज ताजा भाजीपाला मिळणार आहे.  भाजीपाला पुन्हा मिळणार नाही म्हणून नागरिकांनी गर्दी करणे टाळावे. भाजीपाला किंवा किराणा माल घेतानाही नागरिकांनी 2 ग्राहकांमध्ये किमान 3 फुटाचे अंतर ठेवूनच खरेदी करावी. खरेदीला येताना कुटुंबातील एकाच व्यक्तीने बाजारात यावे.  जेणेकरून नाहक गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. *कोरोना* हा व्हायरस तुम्ही गरीब आहात की श्रीमंत किंवा आणखी कोण? आहात हे पाहणारा नाही. गर्दीत याची लागण कोणत्याही व्यक्तीपासून होऊ शकते. त्या मुळे सर्वांनी आपली पर्यायाने आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आवश्यक असेल तरच घराबाहेर खरेदीसाठी पडा अन्यथा घरामध्येच थांबा त्यातच आपले हित आहे.

Labels:

वागदरीत कोरोनाच्या सावटाखाली गुढीपाडवा साजरा; ग्रामस्थांना स्व:ताची काळजी घेण्याचा दिला संदेश

नळदुर्ग, देि. २५ :

वागदरी ता.तुळजापूर येथे साडेतीन महुर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे गुडीपाडवा मराठी वर्षाचा शुभारंभ असा सर्वांगाणी महत्त्वाचा मानला जाणाऱ्या गुडीपाडवा सणावर या वर्षी कोरोना व्हायरसचे सावट आले असून या सावटाखाली हा सण साजरा करण्यची वेळ वागदरीकरावर आली.

सकाळ पासुनच आपापल्या घरा समोर रांगोळी काढून सणानिमित्त गुडी उभारण्यात आले.असले तरी म्हणावा तसा उत्साह चेहऱ्यावर दिसून आला नाही. जनता कर्फ्युत वाढ झाल्याने सणाला माहेरी येणाऱ्या सासरवासीन मुली,पुणे, मुंबई येथून येणारे मुलं आहे त्याच ठिकाणी स्थानबध्द झाल्याने कुटुंबातील आनंद कोरोनाने हिरावून घेतल्याचे जाणवत होते.

 गुडीपाडवा निमित्ताने आयोजित विवाह,साखर पुडा ,दुकान पुजा या सारख्या कौटुंबिक कार्यक्रमवर ही कोरोनाचा परिणाम झाला असल्याचे दिसून आले. चा

चौ पाहूणे  एकत्र येवुन केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला कोरोनाच्या  खिळ बसली. लहान मुलांच्या गळ्यात साखरेचे , खारीक खोबऱ्याचे हार घालण्यात आले असले तरी एकमेकांना भेटण्याचा आनंद कोरोनाने हिरावलं असेच म्हणावे लागेल.सकाळीच गावचे सरपंच ज्ञानेश्वर बिरादार, उपसरपंच दत्ता सुरवसे, ग्रामसेवक जी. आर.जमादार, ग्रा. प.सदस्य रावसाहेब वाघमारे, पोलीस पाटील बाबूराव बिरादार, रोजगार सेवक ज्ञानेश्वर परिहार, ह.भ.प. राजकुमार पाटील आदीनी कोरोना संचारबंदी व शासनाच्या सुचनाचे पालन करा, घराबाहेर निघु नका स्वतःची काळजी घ्या, पर्यायाने  गावच्या आरोग्याची काळजी घ्या असा संदेश दिला. त्यामुळे गुडीपाडच्या शुभेच्छा ऐवजी  स्वतः ची काळजी घ्या असा संदेश दिला.

Labels:

Friday, 13 March 2020

अणदुर येथे रंगपंचमी उत्सवात साजरी

अणदुर, दि. १३ : 

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे  नेताजी तरुण मंडळा च्या वतीने  दरवर्षी प्रमाणे याहि वर्षी रंगपंचमी उत्सवात साजरी करण्यात आली. दर वर्षी अनेक युवक यात सहभागी होऊन रंगपंचमी ची शोभा वाढवतात. यावेळी अणदुर मधील युवक व नेताजी तरुण मंडळा चे सदस्य उपस्थित होते..

Labels:

Wednesday, 4 March 2020

ग्रामविकासच्या माध्यमातून वागदरी व देवसिंगा (तूळ) या गावात नैसर्गिक रंगनिर्मिती


तुळजापूर, दि. ३ : 

     गेल्या दोन वर्षांपासून गावात राष्ट्रिय स्वयंसेवक संघाअंतर्गत ग्रामविकासचे कार्य चालू असून या माध्यमातून गावात महिलांची ग्रामसमिती स्थापित करून समिती आधारे गावात दिवाळीत लागणारे शुद्ध नैसर्गिक उटणे निर्मिती, शुद्ध नैसर्गिक रंग निर्मिती असे छोटे-मोठे उद्योग सुरू झाले आहेत. 

सुगंधी उटण्याकरिता व रंग निर्मिती करिता प्रत्येकी 10 हजार रुपये गुंतवणूक करून उद्योग चालू केला होता.  कमी वेळेत ग्रामविकास कार्यकर्त्यांकडून प्रशिक्षण घेऊन रंग निर्मितीही केली आणि विक्री साठीही चांगली कसरत घ्यावी लागली. अगदी कमी कालावधीमध्ये गुंतवणुकीच्या 2 पट नफा महिलांना मिळाला. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत उमेद गटाकरिता हिरकणी महोत्सव स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धेत देवसिंगा (तूळ) ग्रामविकास महिला समितीतील उमेद गटाच्या महिलांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या प्रामाणिक कष्टाचे फळ त्या महिलांना मिळाले. या स्पर्धेत महिलांना तालुका स्तरीय 50 हजार रु. प्रथम बक्षीस व जिल्हा स्तरीय 2 लाख रु. प्रथम बक्षीस असे एकूण अडीच लाख बक्षीस देऊन जिल्हाधिकारी व त्या वेळेस मा. पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. यावर्षी याच अनुभवातून देवसिंगा (तूळ) व वागदरी या ग्रामविकास गावी शुद्ध नैसर्गिक रंगाची निर्मिती महिलांनी केली आहे.  


हा रंग शुद्ध नैसर्गिक व खाण्यायोग्य असल्याने या नैसर्गिक रंगाचा कोणताही परिणाम शरीराला किंवा त्वचेवर होणार नाही.  उटणेअसो वा रंग शुद्ध नैसर्गिक उत्पादन असल्याने शहरी भागातील लोकांकरीता कमतरता असलेले नैसर्गिक उत्पादन 100% विषमुक्त असून त्याचे महत्व सध्याच्या वातावरणातून जाणवत आहे. शहरी भागात या नैसर्गिक उत्पादनाची मागणी खूप मोठया प्रमाणात असून ग्रामविकास समितीतील महिला असे वेगवेगळे उत्पादन नियमित घेत आहेत. 
       
ग्रामजिल्हा संयोजक जयंतजी पाटील तसेच सर्व ग्रामविकास कार्यकर्त्यांसह कुटूंबातील सर्वांचे सहकार्य महिलांना मिळत असल्याने त्यांचा व्यवसायातील आत्मविश्वास उंचावला आहे.  वागदरी ता. नळदुर्ग या ग्रामविकास गावात लतिका पाटील, पार्वती बिराजदार, सुनीता पाटील, भाग्यश्री यादव, सुकुमार पाटील, वंदना सुरवसे, सविता पाटील, राजश्री सुरवसे, वनमाला पाटील व कल्पना पाटील तर देवसिंगा (तूळ) येथे भाग्यश्री भोसले, राणी मस्के, निर्मला भोसले, आशा दळवे, स्वाती जाधव, महादेवी भोसले, रजनी जाधव व ललिता भोसले या महिलांची रंग निर्मिती करिता समिती केलेली आहे. ग्रामविकास माध्यमातून नैसर्गिक रंग निर्मिती सारखेच यापुढेही गोआधाराईत वस्तू यात गोमय धुपबत्ती, मच्छर कॉईल तसेच रांगोळी असे विविध प्रकारचे लघुउद्योग सुरू करणार आहेत.

Labels:

Tuesday, 3 March 2020

भारतीय त्वचारोगतज्ञ संघटनेच्या माध्यम कक्ष (मीडिया सेल) अध्यक्षपदी डॉ नितीन ढेपे यांची निवड


उस्मानाबाद : 


उस्मानाबादचे सुपुत्र व सोलापूर येथील सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ञ व स्किनसिटी पदव्युत्तर प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ नितीन ढेपे यांची भारतीय त्वचारोगतज्ञ संघटना (IADVL) च्या माध्यम कक्षाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. आय ए डी व्हि एल ही भारतातील त्वचारोगतज्ञाची अधिकृत संघटना असून दहा हजाराहून अधिक त्वचारोगतज्ञ याचे सदस्य आहेत. या संघटनेचे अधिकृत प्रवक्ते म्हणून माध्यमांशी संवाद साधण्यासाठी व त्वचारोग विषयक जन जागृती करण्यासाठी डॉ नितीन ढेपे यांची निवड झाली आहे. 

त्वचारोग आणि त्यावरील उपचार याबद्दल सामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज आहेत. पहिला गैरसमज म्हणजे त्वचारोग बरे होत नाहीत. पण वस्तुस्थिती अशी आहे की अनेक आधुनिक उपचार उपलब्ध झाल्याने अनेक त्वचाविकार पूर्ण बरे होऊ शकतात. 

त्वचारोगावर उपचार करण्यासाठी अनेक भोंदू आणि अशिक्षित डॉक्टरांच्या जाहिराती पाहण्यात येतात. अशा अशास्त्रीय उपचारांमुळे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे त्वचा, नख, सौन्दर्य व केसांच्या समस्या असतील तर त्यावर मेडिकल कौन्सिल आणि त्वचारोगतज्ञ संगठना यांच्याकडून मान्यताप्राप्त डॉक्टरांकडूनच उपचार घ्यावेत. तुमच्याजवळ उपलब्ध असणाऱ्या त्वचारोगतज्ञाची सूची IADVL च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

अनेक अप्रमाणित मलमे गोरे होण्यासाठी किंवा त्वचाविकारासाठी जाहिरातीच्या माध्यमातून किंवा मेडिकल दुकानातून डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय सर्रास विकली जातात. अशी मलमे महिनोंमहिने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्याने चेहरा खराब होणे, त्वचेवर स्ट्रेच मार्क पडून त्वचा फाटने, त्वचेवर पुरळ व पू होणे असे अनेक दुष्परिणाम होतात. अशाच मलमांच्या अनियंत्रित वापरामुळे भारतात सध्या औषधाला दाद न देणाऱ्या बुरशीजन्य त्वचारोगाची प्रचंड मोठी साथ आली आहे. यात पूर्वी साध्या औषधाने बरे होणारे गजकर्ण आता हजारो रुपये खर्च करूनही लवकर आणि पूर्ण बरे होत नाही. त्यामुळे कोणतेही मलम चेहरा किंवा त्वचेवर लावण्यापूर्वी  त्वचारोगतज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

या आणि अशा अनेक त्वचाविकार संबधित विषयावर जनजागरण करण्याचे काम हा माध्यम कक्ष करणार आहे. ६ एप्रिल हा दिवस "जागतिक त्वचा आरोग्य दिवस" world skin health day  म्हणून साजरा केला जातो.  भारतीय त्वचारोगतज्ञ संघटना माध्यम कक्षाच्या वतीने देशभर अनेक जगजगरणाचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत अशी माहिती डॉ नितीन ढेपे यांनी दिली.

Labels:

अणदुर : जवाहर विद्यालयातील दहावीच्या परीक्षार्थींना शुभेच्छा

अणदूर, दि. 3 : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अणदूर शाखेच्या वतीने मंगळवार (दि. 3) रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

        अणदुर  येथील जवाहर विद्यालयात दहावीचे परीक्षा केंद्र आहे. या विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी  जिल्हा समिती सदस्य केदारनाथ पाटील,शहरमंत्री प्रशात सुरवसे, खंडु टिकंबरे, तुळशीराम घोडके, अनिकेत घोडके, प्रविण सुरवसे, अक्षय पैलवान आदी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels: